Saturday, 8 March 2025

२.२ लेख - राजयोग (अनुपमा श्रोत्री)

राजयोग

अनुपमा श्रोत्री 

जीवन धकाधकीचं झालं आहे ताण-तणाव वाढतो आहे असे उद्गार आपण  रोजच ऐकत असतो. पूर्वीच्या काळापेक्षा सध्या जीवन जास्त अवघड आहे की नाही कोणास ठाऊक पण जास्त गुंतागुंतीचे मात्र झाले आहे. सामाजिक आणि वैयक्तिक जीवनात ताण वाढला आहे. सोशल मीडियाच्या अनिर्बंध वापरामुळे शाळकरी मुलेही याला अपवाद राहिली नाहीत. नोकरी करणाऱ्यांमध्ये ताणतणावामुळे आजारी पडून कामावर गैरहजर राहण्याचे प्रमाण वाढत आहे, रक्तदाब हृदयरोग अशा सारखे आजार वाढीला लागले आहेत.

 गेल्या काही वर्षातल्या संशोधना नुसार स्ट्रेस मुळे माणसाची प्रतिकारशक्ती कमी होते व तो अनेक आजारांना बळी पडू शकतो असे निष्कर्षास आले आहे. कॅन्सर सारखा भयानक रोगही याला अपवाद नाही. साहजिकच त्यावर उपाय शोधण्याची घाई सुरु झाली आहे आणि त्या विविध उपायांमध्ये ध्यानधारणा किंवा meditation हा उपाय परिणामकारक असल्याचे उघडकीला येत आहे. ध्यान धारणेमुळे शरीर आणि मन या दोन्हींना विश्रांती मिळते, रक्तदाब व श्वसनाचा वेग कमी होतो, हृदयावर ताण कमी होतो असे अनेक फायदे सिद्ध झाले आहेत. साहजिकच ध्यानधारणेकडे बरेच लोक आकृष्ट होऊ लागले आहेत.

 मानसिक ताण कमी करणे हा काही ध्यानाचा मुख्य उद्देश नाही पण तो सध्याच्या जीवनाला आवश्यक असा एक उपयोग ठरला आहे. वास्तविक ध्यान हे राजयोगाचे महत्त्वाचे अंग आहे. कर्मयोग, ज्ञानयोग, भक्तीयोग व राजयोग हे माणसाला मुक्तीकडे नेणारे चार योग. या चार मार्गांचे प्रमुख ध्येय म्हणजे मोक्ष, अर्थात जिवाला शिवा मध्ये विलीन करणे. पण हे परम ध्येय डोळ्यासमोर ठेवून ध्यानधारणा करणारे विरळाच. बहुतेक लोक ध्यानाच्या मानसिक फायद्यामुळे तिकडे आकृष्ट होतात. परंतु नियमित अभ्यास केल्यानंतर त्यातून मिळणाऱ्या आत्मिक समाधानाची गोडी त्यांना लागल्या वाचून रहात नाही.

 ध्यानामुळे मानसिक तणाव का बरे कमी होतात? माणसाच्या जीवनाबद्दलच्या एकूण अपेक्षा सध्या फार वाढल्या आहेत. पैसा, यश, छानछोकीची राहणी, स्टेटस या सर्वांना फार महत्त्व आले आहे. प्रत्येकालाच या गोष्टींची अत्यंतिक गरज भासू लागली आहे. या अपेक्षा पूर्ण करण्याची धडपड आणि त्या पूर्ण न झाल्यास येणारी वैफल्यता यातून ताण वाढू लागतो. बऱ्याच वेळेला कुटुंबातील लोकांच्या एकमेकांकडून असलेल्या अपेक्षा पूर्ण होत नाहीत आणि कौटुंबिक जीवनातही ताण वाढू लागतो. सोशल मीडियाच्या प्रादुर्भावामुळे सामाजिक जीवनात इतरांबरोबरची स्पर्धाही या तणावाला कारणीभूत होऊ  लागते. एकदा अपेक्षा पूर्तीची इच्छा आणि अपेक्षाभंगाच्या दुःखाच्या आवर्तात मनुष्य अडकला की त्याचे मन त्यातून बाहेर पडू शकत नाही. मनात विचारांची गर्दी झाली की शांत झोप सुद्धा लागत नाही. ध्यानामध्ये माणसाला सतत भंडावणाऱ्या  विचारांपासून अलिप्त होण्याचे संधी मिळते. एकदा मन अस्वस्थ करणाऱ्या विचारांच्या जाळ्यातून बाहेर पडले की माणसाला शांततेची अनुभूती होते. मन शांत झाले की शरीरातले स्नायू शिथिल होऊ लागतात. श्वसनाचा वेग कमी होतो आणि रक्तदाब कमी होऊ लागते.

 हे सर्व जरी खरे असले तरी ध्यान करणे ही काही औषधाची गोळी घेण्याइतकी  सोपी गोष्ट नाही. त्यासाठी ठाम निश्चय करून प्रयत्न करण्याची तयारी असायला हवी. सुरुवातीला कोणाचे तरी मार्गदर्शन मिळणे जरुरीचे आहे. त्यानंतर स्वतः अभ्यास करून प्रगती करून घेता येते. सध्या ध्यानधारणा शिकवणाऱ्या बऱ्याच संस्था आहेत. काही फक्त मानसिक व शारीरिक स्वास्थ्यासाठी ध्यान शिकवतात तर काही अध्यात्मिक साधना म्हणून ध्यानधारणा शिकवतात.  Art of living आणि योग शिकवणाऱ्या इतर संस्था ध्यानाबरोबरच योगासने व प्राणायामही शिकवतात. ब्रह्मकुमारी संस्था राजयोग मार्गाने ध्यान शिकवते. याशिवाय Mindfulness meditation, Transcendental meditation अशा अनेक पद्धती उपलब्ध आहेत. आणि आता तर आपल्या फोन वरच ध्यानाचे अनेक 'ऍप' ही मिळू लागले आहेत.

 ध्यान करण्याच्या इतक्या सगळ्या वेगवेगळ्या पद्धती प्रचलित असल्यामुळे गोंधळात पडणं साहजिक आहे. आपल्यासाठी कुठली पद्धत योग्य हे कळणं सुरुवातीला अवघड होतं. कुठल्याही पद्धतीने ध्यान केलं तरी अखेर तो अनुभव एकच असतो. त्यामुळे कुठली पद्धत वापरून ध्यान करतो याला फार महत्त्व नसून ध्यानाचा नियमित अभ्यास करून ध्यान लागायला लागणे हे जास्त महत्त्वाचे आहे. त्याचबरोबर योग्य व्यक्तीकडून मार्गदर्शन मिळणे हे ही महत्त्वाचे आहे.

 आपण आता थोडक्यात राजयोगाच्या मार्गाने ध्यानधारणेचा विचार करू. राजयोगाच्या आठ पायऱ्या आहेत - यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी. यात ध्यान ही सातवी पायरी आहे. ध्यान करू इच्छिणारे लोक एकदम सातव्या पायरीवर उडी मारू पाहतात त्यामुळे ध्यान करणे व लागणे त्यांना अवघड वाटू लागते. आधीच्या सर्व पायऱ्या माणसाची ध्यानासाठी मानसिक व शारीरिक पूर्वतयारी करून घेतात त्यामुळे ध्यानाला बसणे व ध्यान लागणे शक्य होते. म्हणूनच आधी त्यांची ओळख करून घेणं महत्वाचं आहे.

 यातील यम, नियम या दोन पायऱ्या मानसिक शुद्धीसाठी आहेत. 'यम' यामध्ये सत्य, अहिंसा (शारीरिक व मानसिक), अस्तेय (चोरी न करणे), ब्रह्मचर्य (संसारी माणसाच्या बाबतीत वैवाहिक बंधनांचे पावित्र्य राखणे)आणि अपरिग्रह (भौतिक/मटेरियल गोष्टींचा मोह टाळणे) ही पाच अंगे आहेत. 'नियम' यामध्ये शौच (मनाची व शरीराची स्वच्छता), संतोष (आहे त्या परिस्थितीत आनंदी राहणे), तप (भोगांपासून शक्यतो दूर राहणे), स्वाध्याय (नियमित अभ्यास करणे) व ईश्वर प्रणिधान (आपला मीपणा ईश्वरचरणी अर्पण करणे) ही पाच तत्त्वे अंतर्भूत आहेत. यमनियमांचे पालन केल्याने  मनोबल वाढते व आपोआपच  मानसिक शांती मिळू लागते.

 'आसन' ही पायरी एका स्तिथीत बराच वेळ बसता येणं या स्थिती पासून ते सर्व योगासनांचा नियमित अभ्यास असणं इथपर्यंत सर्वकाही सामावून घेते. आपल्या आवडीप्रमाणे आपली पातळी आपण ठरवून घ्यावी. ध्यानासाठी एका स्थितीत तासभर तरी बसण्याइतकी शरीराची तयारी करून घेणे आवश्यक आहे. या स्थितीत ताठ बसून पाठ, मान व डोकं एका सरळ रेषेत यायला हवीत.

 प्राणायाम म्हणजे श्वासोच्छ्वासाचे नियमन. आपल्या शरीराला चालना देणारी प्राण ही जी शक्ती आहे तिचे एक दृश्य स्वरूप म्हणजे श्वासोच्छवास. श्वासाचे नियमन केले असता प्राणशक्तीवर ताबा मिळवता येतो आणि त्यायोगे मन आणि शरीर यांच्यावर ताबा मिळू शकतो. ध्यानाला बसल्यानंतर डोळे मिटून श्वासावर लक्ष केंद्रित केले आणि श्वसनाचा वेग मंद केला की मन एकाग्र होऊ लागते.  

 प्रत्याहार म्हणजे मनाला इंद्रियांपासून विलग करून अंतर्मुख करणे. म्हणजे स्पर्श, ऐकणे, बघणे, वास घेणे आणि चव घेणे या पाच जाणिवांवरून लक्ष काढून घेऊन ते लक्ष आत वळवणे. सुरुवातीला आत म्हणजे कुठे ते कळत नाही तेव्हा बाहेरचे लक्ष काढून घेतले असता स्वतःमध्ये जी शांततेची अनुभूती होते त्यावर लक्ष केंद्रित करावे असा अर्थ घ्यायचा.

 धारणा म्हणजे मनाची एकाग्रता. बरेच साधक दोन भुवयांच्या मधल्या बिंदूवर मन एकाग्र करतात. काही श्वासावर तर काही लोक एखाद्या मंत्रावर मन एकाग्र करतात. भाविक लोक आपल्या इष्ट देवतेचे चिंतन करतात. जे आपल्याला जास्त सोपे वाटेल किंवा जमेल ते आपण करावे. धारणेमध्ये मन एकाग्र झाले की आपणहूनच  विचारहीन स्थिती येते तिला ध्यान असे म्हणतात. सुरुवातीला ही स्थिती अगदी क्षणिकच अनुभवाला येते. मन विचारांमध्ये भरकटते ते पुन्हा इच्छित स्थळी आणून एकाग्र करायचे असे बराच वेळ चालते. त्यातून हलकेच थोडा वेळ ध्यानाची स्थिती येते आणि पुन्हा मन विचलित होते. पण काही क्षणांसाठी जरी ध्यान अवस्था आली तरीही त्यातून प्रचंड शांती आणि आनंद मिळतो. त्यामुळे सुरुवातीला विचारहीन स्थिती येत नाही म्हणून वाईट वाटण्याचे काही कारण नाही. 

 बरीच वर्षे ध्यान साधना करणाऱ्या साधकाला जास्तीत जास्त वेळ ध्यान स्थितीत राहता येऊ लागते. समाधी ही पायरी फार दूरची आहे. या स्थितीत आत्मा परमात्मा यांची भेट होते. ही स्थिती राजयोगात बरेच जन्म वाहून घेतल्याखेरीज येत नाही. परंतु तिथपर्यंत न पोहोचताही सामान्य साधकाला ध्यान धारणेतून पुष्कळ लाभ होतो.

 एकदा राजयोगाच्या अष्टांगांची माहिती झाली की मगच ध्यानधारणेचा अभ्यास करावा. ध्यानासाठी पहाटेची आणि संध्याकाळची वेळ सर्वात उत्तम आहे. एकदा वेळ ठरवली की ती नियमितपणे पाळण्याचा प्रयत्न करायला हवा. बसण्यासाठी एकच जागा ठरवून टाकावी. ती स्वच्छ आणि प्रसन्न ठिकाणी असावी. बसल्यानंतर एखादी प्रार्थना म्हणून सर्व विश्वाचे शुभचिंतन करावे म्हणजे आपोआपच मन हळूहळू शांत होऊ लागते. मग श्वासावर लक्ष केंद्रित करावे. श्वासाची तीन-चार आवर्तने झाल्यानंतर आपल्या इच्छित ठिकाणी मन एकाग्र करावे. मन विचलित झाल्याचे लक्षात आल्यावर अत्यंत शांतपणे व प्रेमाने मनाला पुन्हा एकाग्र करावे. यामध्ये अट्टाहास उपयोगाचा नाही. पंधरा मिनिटांपासून सुरुवात करून हळूहळू अर्ध्या तासापर्यंत वेळ वाढवावा.

 साधना नियमितपणे केली असता मानसिक शांती, शारीरिक स्वास्थ्य लाभतेच शिवाय जीवनाकडे बघण्याची दृष्टी बदलू लागते. ज्यांना आध्यात्मिक प्रगती करून घ्यायची असेल त्यांची योग्य दिशेनी वाटचाल चालू होते. अशा लोकांना गुरुचे मार्गदर्शन अत्यावश्यक आहे. ज्या लोकांना अध्यात्माची गोडी नाही त्यांचीही ध्यान धारणेतून मानसिक शक्ती वाढते व त्यांची  रोजच्या जीवनात व कामात परिणामकारकता/एफिशियन्सी वाढते.

 हे सर्व फायदे अनुभवाला येत असल्याने सध्याच्या काळात ध्यान धारणेची नितांत गरज वाटू लागली आहे यात नवल ते काय? या शास्त्राचा उगम भारतवर्षात झाला या गोष्टीचा प्रत्येक भारतीय व्यक्तीला अभिमान वाटल्या वाचून राहणार नाही.

 डॉ अनुपमा श्रोत्री

लिव्हरपूल

(मूळ लेख - संजीवनी मासिक साल २००२ च्या दिवाळी अंकात प्रकाशित)


3 comments:

  1. चांगली माहिती दिली आहे .

    ReplyDelete
  2. लेख - विशेषत: विचारहीन स्थितीचा मुद्दा - आवडला.

    ReplyDelete
  3. छान, सविस्तर माहिती. मन शांत व एकाग्र करणे हे महत्वाचे पण तितकेच कठिण असते. फक्त प्रयत्न करणे आपल्या हातात आहे.

    ReplyDelete

प्रतिसाद

संयोजक

श्रीकांत पट्टलवार, मीरा पट्टलवार, रवी दाते, मुकुल आचार्य, कुमार जावडेकर