'बे-जमाव' : प्रकरण १ - 'कुशल - पिंच हिटर'
कुमार जावडेकर
(ऑगस्ट
२०००, मुंबई)
“सचिन? धन्य! त्याला काय काम-धंदे नसतील का काही दुसरे?” एका मित्रानं मला उडवून लावलं. वास्तविक हा माझा अगदी रुपारेल
कॉलेजपासूनचा वर्गमित्र आहे. तिथेही त्यानं एकदा मी ‘मला व्ही. जे. टी. आय. ला
जायचंय’ असं म्हटल्यावर ‘सोपं आहे का ते?’ असं विचारलं होतं आणि मी इथे येऊन
धडकल्यावर ‘तू, आणि इथे?’ असं आश्चर्यही व्यक्त केलं होतं!
“आणि त्याला विचारणार कसं? गाठणार कुठे? त्याच्या घरी जाऊन?” दुसऱ्या मित्रानं विचारलं – अर्थात त्याच्या प्रश्नात उत्तर दडलेलं होतं.
मी उत्तर देणं अपेक्षित नसावं. त्यातून मी काही बोलण्याआधीच -
“हो! ‘फ्रांसिस बेल दबाएगा, मुसा दरवाजा खोलेगा’. तसंच इथे ‘कुशल बेल
दबाएगा, सचिन दरवाजा खोलेगा’, असं होणार असेल!” तिसरा मित्र
म्हणाला. या मित्राला आम्ही ‘परिंदा’मधला ‘अण्णा’ म्हणायचो. नानाची नक्कल करायचा
नेहमी. सगळे हसले. मीही हसलो.
कॉलेजच्या
गणेशोत्सवात सचिनला आणता येईल का याची चाचपणी करूया असं मी म्हटलं होतं. त्याची जबाबदारी माझी हेही मी स्पष्ट केलं
होतं! पण त्यावरून मला हे सगळं ऐकून घ्यायला लागत होतं.
“विनोद कांबळीला विचार, तो येईल कदाचित!”
“विनोदला कोण विचारतो!” अजून एक विनोद केला एकानं.
हे
चालू असतानाच एकीकडे आमच्या समोरच्या टपरीवाल्यानं आमची ‘चार कटिंग’ ही ऑर्डर ऐकून
त्याच्या स्टोव्हवर अॅल्युमिनियमचं भांडं चढवलं होतं. त्यांत पाणी, चहा, दूध, वेलदोडे
(शुध्द पुणेरी भाषेत, मुंबईत वेलची) टाकून ते मिश्रण भरपूर उकळलं होतं. मग एका
कळकट्ट कापडातून ते ग्लासांत ओतलं होतं. त्या चहामुळे उत्साहाला उधाण येण्याऐवजी
तजेला आला होता तो मात्र या मित्रांच्या टोमण्यांना. वास्तविक, मी अगदीच निरर्थक
बोलत होतो असं मला वाटत नव्हतं. माझा मुद्दा एवढाच होता की टोरांटोला दरवर्षी
होणारा ‘सहारा कप’ या वेळेस अचानक रद्द झालाय. इथे पावसाळ्याचे दिवस आहेत.
क्रिकेटचा सीझन नाहीये. त्यातून गणेश चतुर्थी जवळ आलीये. कुठला मराठी मनुष्य
दर्शनाला जाणार नाही? आपण योग्य वेळी, योग्य प्रकारे, योग्य व्यक्तीशी संपर्क साधला
की निम्मा किल्ला सर होईल. सिद्धिविनायक, लालबाग वगैरे जिकडे कुठे सचिन जाणार असेल
त्या दर्शनांमध्ये ‘व्ही. जे. टी. आय. सुद्धा सामील करशील का’ म्हणून त्याला विचारायचं.
अर्थात, 'योजकस्तत्र दुर्लभ:' या
नियमानुसार अशा अनेक कल्पना बहुतांशी प्रत्यक्षात उतरत नाहीत. ‘कटिंग’ पिताना
माझ्या मित्रांनाही ग्लास अर्धा रिकामा तेवढा फक्त दिसत होता.
सचिनला
कसं विचारायचं याचा मी विचार करून ठेवला होता. पहिली गोष्ट – ‘पूछनेका पैसा नही
लगता है’. मुंबईत येऊन दादरच्या मराठी वस्तीतल्या गुजराथी दुकानांमधून सतत कानी
पडणारं हे विधान माझं ब्रीदवाक्य झालं होतं. बरं, दुसरं म्हणजे तशी तयारीही मी केली
होती. ‘सचिन नही तो विनोद सही’ हे मला करायचं नव्हतं. ‘मुसा नहीं मिला अन्ना सेठ’
चं उत्तर ‘तो उसकी बीबी को लेके आओ..’ होतं. (आता मुसा आणि सचिन या व्यक्तींची
तुलना नको हे मान्य, एक वेळ सुरुवातीच्या विनोदशी चालेल.) सचिन फोनवर येणार नाही,
पण त्याची बायको अंजली येईल की नाही? तिचा फोन नंबर मी तिच्याच वर्गातल्या माझ्या
एका चुलत बहिणीच्या मैत्रिणीमार्फत मिळवला होता. ती (म्हणजे अंजली) गुजराथी आहे हे
मला माहिती होतं. माझं गुजराथी असणं अशा वेळी कामी येणार नाही तर कधी? प्रयत्नांती
नकार मिळाला असता तर खपवून घ्यायलाच लागलं असतं मला... पण ते प्रयत्न करायचे एवढं मी
नक्की केलं होतं. चहा पिऊन झाल्यावर ‘मला पुण्याला घरी फोन करायचा आहे’ असं म्हणून
मी हॉस्टेलला परत जाणाऱ्या मित्रांमधून काढता पाय घेतला.
‘फाइव
गार्डन्स’ची एक गंमत आहे. दादर, माटुंगा, वडाळा, किंग्ज सर्कल या सगळ्यांपासून जवळ
असूनही तिथले काही रस्ते त्या मानानं कमी रहदारीचे आहेत. वाहनांचे / हॉर्नचे आवाज
इतके प्रकर्षानं / सातत्यानं तिथे कानावर पडत नाहीत. अशाच एका बंदिस्त, जरा शांत
एस. टी. डी. बूथकडे मी मोर्चा वळवला. तो एका तीन मजली इमारतीच्या कंपाउंडच्या आतल्या
बाजूला असलेल्या एका गॅरेजसारख्या खोलीत होता. एक म्हातारे पारसी बाबा वेळ
घालवण्यासाठी तो त्यांच्या मर्जीनुसार चालवायचे – अनियमितपणे. कधी तो उघडा असायचा
तर कधी नेमका बंद. त्यामुळे तिथे गर्दी नसायची. बूथवरून लोकल नंबर कशाला लावतोस
असं विचारलं जायचं नाही. सुदैवानं आज बूथ
उघडा होता. मी आत शिरलो आणि माझ्या खिशातला नंबर काढून फिरवला…
इंजिनियरिंगचं
हे माझं दुसरं वर्षं. पहिल्या वर्षात (एफ. इ. मध्ये) मी असे काही कार्यक्रम माझ्या
सिनीयर्सना आयोजित करताना बघितलं होतं, त्यांत मदतही केली होती - ‘प्रतिबिंब’, ‘फॅशन
शो’. ऑडिटोरियममधले अनेक संगीताचे कार्यक्रम यांच्यात तिकीटविक्रीची जबाबदारी,
लोकांची नोंदणी, अगदी पुष्पगुच्छ आणणे अशा कामांमध्ये सिनीयर्सना आम्ही लागायचो.
म्हटलं तर रॅगिंगचाच एक भाग म्हणून हे आम्हां हॉस्टेलच्या मुलांवर यायचं. पण
त्यातून माझी अनेक जणांशी मैत्री झाली होती. त्या सगळ्या अनुभवामुळेच यावेळच्या
गणेशोत्सवाची जबाबदारी माझ्यावर मी ओढवून घेतली होती. नुसतीच मोठी आरास, भव्य
मूर्ती करण्यापेक्षा – आणि त्यांत भरपूर पैसे खर्च करण्यापेक्षा - काहीतरी सुपीक
कल्पना अंमलात आणावी असा माझा हेतू होता. एकदम स्वस्त आणि मस्त. लोकांच्या कायम
लक्षात राहील अशी. यापूर्वी न झालेली. पुन: न होऊ शकेल अशी... आणि झाली तरी हरकत नाही, पहिली गोष्ट
लोकांच्या स्मरणात राहते.
हा
फक्त विचार (किंवा ‘अविचार’) नव्हता. त्याच्यातून अनेक गोष्टी प्राप्त होऊ शकल्या
असत्या...
कॉलेजमध्ये
वर्गात तसा मी कमीच असायचो. टेबल टेनिस किंवा कॅरम खेळणं हा आमचा मुख्य उद्योग.
इंजिनियरिंगला आल्यावर आपला अभ्यास आपल्यालाच करायला लागतो हे आम्ही पहिल्या
वर्षीच पुरेपूर शिकलो(!) होतो. बहुतेक सगळे प्रोफेसर लोक, जेव्हा शिकवायचे तेव्हा,
पुस्तकांतूनच शिकवायचे. इलेक्ट्रिकल इंजिनियरिंगची प्रमेयं जर ‘बी. एल. थेराजा’मधूनच
शिकवली जाणार असली तर लेक्चरची थेरं कशाला हवीत? गणिताच्या नोट्स मला वाटतं गेली
तीस वर्षं बदलल्या नसतील. मग त्या कुठल्या तरी सिनीयरच्या चांगल्या
हस्ताक्षरातल्या झेरॉक्स करून घेतल्या की झालं. शिवाय गणितं मला पटापट येतात. एकदा
‘डेरिवेटीवह्ज’, ‘इंटिग्रेशन’ या कल्पना कळल्या की त्यांच्यासाठी वर्गात बसणं
म्हणजे ‘कंटिन्युइटी’चं ‘लिमिट’! मेकॅनिक्समध्ये आमच्या मॅडम ‘ट्रस’ शिकवणताना
स्वत:च इतका त्रास करून घ्यायच्या की त्यांना अजून छळण्यापेक्षा वर्गातून टळणं बरं
वाटायचं. त्यांच्या ‘ट्रस’च्या मेंबर्सपेक्षाही वर्गात कमी मेंबर्स असायचे!
‘ड्रॉइंग’ या विषयात ‘लाइन्स’ हा एकाच महत्त्वाचा ‘चॅप्टर’ होता. त्यात ‘चॅप्टर’
झाल्यावर आम्ही त्यांची आमच्या जीवनात प्रात्यक्षिकं करायची संधी शोधू लागलो. या
एका मिशनापुढे बाकी सब मिशन्स (‘सबमिशन्स’) क्षुल्लक वाटायला लागली. मग ती
सबमिशन्स ‘जी. टी.’ मारून (बहुतेक वेळा माझ्याच हॉस्टेलच्या खोलीत) आम्ही वेळ
मारून न्यायचो. जी. टी. (ग्लास ट्रान्सफर) हा इंजिनिअरिंग कॉलेजातला आद्य शोध आहे.
त्याची कृती अशी – एक बादली घ्यायची. तिच्यात शंभर वॉटचा दिवा उलटा (वर प्रकाश
येईल अशा प्रकारे) लावायचा. बादलीवर मोठी काच ठेवायची. तिच्यावर ज्याची नक्कल
करायची आहे ते ड्रॉइंग आणि त्यावर कोरा कागद. वरच्या कागदावर त्या चित्राची
प्रतिमा अगदी स्पष्ट दिसते. मग आपण त्यावर झटपट रेघा मारून ते पूर्ण करायचं. आता या
सगळ्यांत गोची अशी होती की आमच्या प्रोफेसर्सनाही हे माहिती होतं. अनेक जण जी. टी.
बरोब्बर ओळखायचे! मग त्यांच्या कोण मर्जीतला आहे, कोण नाही हा हिशेब कामी यायचा –
विशेषत: सबमिशन्स आणि प्रॅक्टिकल्सच्या मार्क्ससाठी. हे मार्क्स फर्स्ट क्लास
मिळण्यासाठी उपयोगी पडायचे. सचिनच्या भेटीच्या वेळी अशा महत्त्वाच्या
प्राध्यापकांना बोलावून आपली वट वाढवणं हे ईप्सित साध्य करता आलं असतं आणि मग हा
मार्क्सचा प्रश्न निकालात निघाला असता.
रुपारेलला अकरावी-बारावीत असताना मी जरा बुजरा होतो. पुण्याहून मुंबईत येणं, नव्या वातावरणात (आणि हॉस्टेलात) रुळणं हे मला त्रासाचं गेलं. खोटं का बोला? पण व्ही. जे. टी. आय. ला आलो तेव्हा मी पुरेसा ‘पोचलेला’ झालो होतो. माझे हॉस्टेलच्या मित्रांसोबत, कॉलेजमधल्या मित्रांबरोबर असे वेगवेगळे मौज-मस्ती करणारे कंपू झालेले होते. आम्ही सिगरेटी किंवा दारू प्यायचो नाही. अगदी रात्री अकाराला इराण्याकडे चहाच पिऊन यायचो नंतर अभ्यास करायला म्हणून. प्रत्यक्षात तिथे बसून आणि हॉस्टेलला परत आल्यावर राजकारण, क्रिकेट, चित्रपट यांवर चर्चा, वितंडवाद हेच जास्त. अशा अनेक घोळक्यांमधला समाईक घटक म्हणजे मी. हळू-हळू त्यांचं पुढारीपणही माझ्याकडे यायला लागलं होतं. त्याचा नशा चढायला लागला होता. अजून काय काय करता येईल ही मनात सतत ईर्षा असायची. माझं शिक्षण मराठी मिडियममध्ये, त्यातून पुण्यात, झालेलं असल्यामुळे मला मराठी वाचनाची खूप सवय आहे आणि मराठी गाणी ऐकण्याचीही. समर्थ रामदासांच्या शिवाजी महाराजांचं उदाहरण देऊन संभाजीला लिहिलेल्या
‘आधी गाजवावे तडाखे । मग सर्व भूमंडळी धाके ।
तैसे न करिता धक्के । राज्यास होती
।।’
या पंक्ती अशाच मनात रुजल्या होत्या कधी तरी. आपण आधीच आपला तडाखा दाखवला नाही तर इतरांचे आपण कमकुवत किंवा सर्वसाधारण असल्याचे आडाखेच बरोबर ठरणार. आता सचिनला आणून असाच समर्थ तडाखा मला द्यायचा होता. साध्या भाषेत, सचिनच्या आडून मीच ‘पिंच हिटिंग’ करणार होतो.
कॉलेजचा
म्होरक्या होणं ही माझी महत्त्वाकांक्षा होती असं मात्र मुळीच नाही. तशी मुलं
वेगळ्या पातळीवर कामं करायची. ‘अखिल भारतीय विद्यार्थी परिषद’ किंवा ‘भारतीय
विद्यार्थी सेना’ यांच्यात सामील होऊन. त्यातली बहुतेक मुलं दरवर्षी एखादा विषय
(बहुधा कॉपी करून) सोडला तर बाकींत नापास होणं, हॉस्टेलमध्ये ठिय्या देऊन बसणं,
कसल्या तरी कारणावरून मुंबई विद्यापीठावर मोर्चे नेणं असे पराक्रम करायची. मी
त्यांतला कधीच नव्हतो. आपल्याला चांगले मार्क्स मिळवायला किती आणि कसा अभ्यास करणं
गरजेचं आहे हे जाणूनच मी हे बाकीचे उद्योग मांडले होते.
शिवाय,
आपली प्रतिमा फक्त प्रोफेसर्स आणि मित्र यांच्या मनातच चांगली राहावी असा निरागस
विचार माझ्या मनात होता असं म्हणणं चुकीचं ठरेल. कॉलेजात मुलीही होत्याच की.
आमच्या वर्गातही अगदीच काही दुष्काळ नव्हता. प्रॅक्टिकलच्या आमच्या ग्रुपमध्ये आम्ही
पाच-सहा जण असायचो. त्यांत दोन मुलीही होत्या. प्रॅक्टिकल लवकर आटपून आमची दौड
असायची ती कॅंटीनकडे. याच ग्रुपमध्ये होती दिशा. ती कॉलेजातल्या अनेकांचा ‘एक दिशा
मार्ग’ अगदी पहिल्या दिवसांपासून झालेली होती. पण ‘कुशल सेठ’ आणि ‘दिशा सिंग’ असे
आमचे एकापुढे एक रोल नंबर्स असल्यामुळे आम्ही प्रॅक्टिकल्स, परीक्षा – तोंडी किंवा
लेखी – सगळीकडे साधारणत: पाठोपाठच असायचो. एफ. इ. त आमची एवढी चांगली ओळख नव्हती,
कारण कदाचित मी प्रॅक्टिकल्स सफाईदारपणे करत असलो तरी दिशाला माझ्या हुषारीचा
फारसा अंदाज नसावा. मी जेव्हा वर्गात तिसरा आलो, तेव्हापासून मात्र अचानक तिच्या
नजरेत माझ्याबद्दल आदर दिसायला लागला. वास्तविक तिला आपण होऊन नोट्स देणारे
सिनीयर्स होते. तिच्यावर जीव ओवाळून टाकणाऱ्या अनेकांना टाळून ती मला अनेक
अभ्यासाचे प्रश्न किंवा शंका विचारायला लागली. ‘कुठल्या पुस्तकातून अभ्यास करायचा’
इथपासून ‘हे मला समजावून देशील का’ पर्यंत आमची मजल गेली होती. वाटेत कधी भेटली तर
इतर मित्र नसले तरी माझ्यासोबत चहा प्यायलाही यायला लागली होती. पण पुढे काय?...
मी
अंजलीला फोन लावला. ‘सचिनचं मी सांगत नाही पण मी येईन’ इतकं मी तिच्याकडून वदवून
घेतलं आणि पुन: नक्की करायला कधी फोन करू तेही विचारून घेतलं. ती स्वत: ग्रँट
मेडिकल कॉलेजची असल्यामुळे व्ही. जे. टी. आय. बद्दल तिला पुरेशी माहिती आणि थोडा
तरी जिव्हाळा होता. अजून एक-दोन वेळा फोन केल्यावर तिनं सांगितलं की सचिन आणि ती
दोघेही आमच्या कॉलेजात गणपतीच्या दर्शनाला येतील! फक्त त्यांची एवढीच इच्छा होती
की कुठलाही बडा कार्यक्रम ठेवायचा नाही, गर्दी करायची नाही. ते गाडीतून येतील,
दर्शन घेतील आणि लगेच निघून जातील.
आणि
तसं घडलंही! ते (म्हणजे सचिन-अंजली) आले, त्यांनी (म्हणजे आमच्या व्ही. जे. टी.
आय. च्या लोकांनी) पाहिलं आणि (मी) जिंकून घेतलं सारं!... उण्यापुऱ्या पाच ते दहा
मिनिटांचीच ती भेट असावी. पण मी सगळ्या ‘अतिमहत्त्वाच्या’ प्राध्यापकांना आणि
आमच्या गणेशोत्सव मंडळाच्या सभासदांना तयार ठेवलं होतं. बाकी रविवार असूनही कॉलेजच्या
मुलांची आणि इतर बघ्यांची प्रचंड गर्दी
होतीच, पण त्यांना तेव्हा मंडपात यायला मज्जाव करण्यात आला होता. सचिनची गाडी कुठून
येणार ते आम्ही गुलदस्त्यात ठेवलं होतं. वेळही जरा चुकीची सांगितली होती (नंतरची).
त्याच्या सिक्युरिटीचे लोकही होतेच सोबत. त्यांच्याबरोबर हे सगळं आधीच ठरलं होतं. त्यामुळे
लोकांना काय होतंय ते कळेपर्यंत तो मंडपात पोचला होता. येताच त्याचं स्वागत करणं,
दर्शन घेताना बरोबर फोटो काढून घेणं एवढेच सोपस्कार आम्हांला करता आले, आणि
जातानाचा त्यांचा ‘टाटा’ फक्त बाहेरच्या लोकांना दिसला. मी त्याच्याशी एक-‘थॅंक यू
आल्याबद्दल’ वगैरे एक-दोनच वाक्यं बोलू शकलो. पण माझी अपेक्षा तितकीच होती.
या
घटनेचा व्हायचा तोच परिणाम झाला. दुसऱ्या दिवशी प्रत्येक भेटणारी व्यक्ती – मग ते
प्राध्यापक असोत की सहाध्यायी – मला
फक्त सचिन आणि सचिनबद्दलच विचारत होते. माझं अभिनंदन करत होते. आमची ओळख आहे का,
मैत्री आहे का, – अनेक चित्रविचित्र प्रश्न पुसत होते. इतकं की दिवसभर तेच तेच
बोलून मला कंटाळा यायला लागला होता.
… त्या दिवशी नेमकं आमचं प्रॅक्टिकल नव्हतं. कधी नव्हे ते मी सगळी लेक्चर्स
वर्गात बसून काढली. फक्त दिशा तेवढी माझ्याशी बोलायला आली नव्हती. अर्थातच
प्रोफेसर्ससकट अनेकांनी मला विचारल्यामुळे तिच्याही कानावर या गोष्टी पडत होत्या
हे मला समजत होतं. इतर अनेक मुलीही ‘ग्रेट यार’ वगैरे म्हणत होत्या. पण दिशाची
नजरभेटही होत नव्हती.
शेवटी
संध्याकाळी निघताना, जरा वर्गात मागे रेंगाळून, मी तिला गाठलं.
“हाय!”
“हाय!” ती काही वेगळं न घडल्यासारखं बोलत होती.
“काय म्हणतेस?”
“मस्त... तू?” अजूनही काही उल्लेख नाही. मीच विषय
काढायला हवा अशी परिस्थिती निर्माण करत होती जणू ती.
“मजेत. ए तू ऐकलंस का? काल सचिन आला होता इथे. माझ्यामुळे..., ” बोलताना आपण काही तरी चूक करतोय हे मला कळत होतं; पण ‘कळतंय पण वळत
नाहीये’ ही माझी अवस्था झाली होती तोवर.
“अच्छा...! मी बघितलंच नाही त्याला... फिर से लेके आ सकता है क्या तू उसको?
पुन: आणशील ना त्याला एकदा? बाय!” माझं बोलणं मध्येच तोडत ती
म्हणाली आणि निघून गेली!
“हो! मी आणेन की.”
मागून
आवाज आला म्हणून मी चमकून बघितलं –
रवी!
दुसरा कोण असणार? याला इथे नेमकं उपटायची आणि असं माझ्या वर्मावर बोट ठेवून
बोलायची काय गरज होती? ... आणि माझ्याकडे
लक्ष न देता तोही तिच्यामागे निघून गेला...
- कुमार जावडेकर
आता आपल्या गोष्टीत रंगत यायला सुरू झाली आहे. सुरुवातीला वाटलं की गोष्टीचा फोकस सचिनवर आहे पण हळूहळू तो स्वतःवर आला आणि कथाभाग संपता संपता तो आपण दिशाकडे वळवला. आपली ही लेखनशैली वाखाणण्यासारखी आहे. पुढे काय होतं याची उत्सुकता वाढू लागली आहे.
ReplyDeleteही कथा वाचतांना पुढे काय होणार या बद्दल उत्सुकता आहे . वाचतांना मात्र Five Gardens ची जुनी आठवण जागी झाली ,तिथल्या झाडांवर खूप Bats पाहीले .
ReplyDelete