Saturday, 8 March 2025

१. पश्चिमाई होळी विशेषांक - स्वागत (रवी दाते)


“हुताशनी पौर्णिमा” या शब्दाचे गांभीर्य आणि पावित्र्य काळाच्या ओघात लुप्त होत असल्याची आणि रंगपंचमीच्या नावाखाली धुमाकूळ घालण्याची आपली देशी परंपरा परदेशात रुजत असल्याची कधी कधी थोडी खंत वाटत असली तरी सर्व भारतीयांना एकत्र आणण्यासाठी असलेले या सणाचे योगदान नाकारता येत नाही.

एकदा का धुळवडीच्या रंगांच्या मुखवट्याआड तोंड दडले की लहान थोर, पंजाबी, मद्रासी, मुंबईकर, पुणेकर, मुंबईतील सेंट्रल आणि वेस्टर्न रेल्वे असे अनेक देशी भेदभाव नाहीसे होतात आणि उरतो तो फक्त आनंदाचा जल्लोष. जल्लोष आहे आणि त्याला हिंदी चित्रपटातील संगीताची साथ नाही असं होणं शक्यच नाही मग तो जल्लोष “चाहे भीगे तेरी चुनरिया” सारखा सूचक असो की अगदी अलीकडच्या “हाय ये होली, उफ ये होली” सारखा विदेशी चालीवरचा थेट आणि बेफाम असो. याच रंगात “खाए गोरी का यार, बलम तरसे” च्या पावलावर पाऊल टाकून काही हातातून निसटणारे आणि दुसऱ्या हातात अलगदपणे जाऊन पडणारे हातही दडून जातात.

तर अशा रंगीबेरंगी आनंदात भर टाकण्यासाठी पश्चिमाईचा हा दुसरा अंक; फक्त संपादक मंडळाच्या  लेख आणि कवितांनीच नव्हे तर नवोदित लेखक आणि कवींच्या योगदानाने संपन्न झालेला. ही मंडळी कोणी परकी नाहीत तर चक्क इंग्लंड मधील स्थानिक, आपल्याच आजूबाजूची, रोज भेटणारी, आपल्याला व्हाट्सअप वर विश करणारी आणि अडीअडचणीला धावून येणारी आहेत. या सर्व “छुप्या रुस्तुमांना” शोधून त्यांना प्रोत्साहन देण्याच्या, आणि लिहिण्यासाठी प्रवृत्त करण्याच्या आमच्या प्रयत्नात सहभागी झाल्याबद्दल त्या सर्वांचे आभार.

या अंकात राहुल गडेकरांची ‘गझल’ वरची ‘गझल’ आहे, नेहा बापट अन्वेकरांची मातृत्वावर कविता आहे, जागृती जोशीने स्वत:च्याच मनाशी संवाद साधला आहे,  डॉक्टर आनंद शिंत्र्यांच्या “बाल मैत्रिणी”च्या आठवणी आहेत आणि बाल मित्रांकरिता वि मा  जोशींची ‘मामाच्या देशात जाऊया’ ही एक विशेष कविता पण आहे. आणि on-line मराठीचा डोस जरा जास्तच झाला तर काय करावे हे सांगायला श्रीकांतजींचे “मोफत ज्ञान”ही आहे.

पहिल्या अंकाच्या संगणकीय आणि छापील आवृत्त्यांना मिळालेला उदंड प्रतिसाद आम्हाला नक्कीच स्फूर्तीदायक आहे. असाच लोभ असू द्यावा. आपल्या आजूबाजूला असलेल्या कलाकारांबद्दल वाचायला आम्हाला नक्कीच आवडेल, तरी त्यांना शोधा आणि असेच लिखाण पाठवत राहा.

आमच्या हातून काही चुका झाल्या असतील आणि अंकात काही न आवडलेले लेख असतील तर या सणानिमित्त त्यांची “होळी” करण्याच्या संधीचा जरूर फायदा घ्या, पण त्याआधी आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा.

सर्वांना होळीच्या शुभेच्छा.

रवी दाते. 

4 comments:

  1. १५ मार्च २०२५ लख्ख उन्हाची रम्य सकाळ ! पश्चिमाई च्या दुसऱ्या अंकाचा प्रकाशन सोहळा स्टॅफोर्ड इथे कुमार जावडेकर यांच्या कडे उत्साहाने संपन्न झाला.प्रकाशनाचे प्रमुख पाहुणे होते स्टॅफोर्ड इथले डॉ नितीश राऊत. या सोहोळयाला स्टॅफोर्ड,रेडिंग आणि मॅंचेस्टर इथली मंडळी उपस्थित होती . यात काही नवीन लेखक /कवि होते आणि विशेष म्हणजे काही तरुण मराठी प्रेमी वाचक.
    विशाखा आणि कुमार यांनी प्रकाशन सोहोळयाची जय्यत तयारी केली होती. प्रमुख पाहुण्यांकडे मर्यादित वेळ असल्यामुळे कार्यक्रम सकाळी वेळेत सुरू झाला.
    ‘पश्चिमाई’ उपक्रमा बद्दल प्रमुख पाहुणे म्हणाले की ह्या मासिकाच्या माध्यमातून मराठी भाषेची आणि पर्यायाने आपल्या संस्कृतीची नाळ आपण घट्ट करीत आहोत. अशा उपक्रमाद्वारे जास्तीत जास्त मराठी लोक एकत्र जोडले जातील. या अंकात नव्याने लिहिणारे नेहा बापट-अन्वेकर आणि आनंद शिंत्रे यांनी आपल्या लिखणाची पार्श्वभूमी सांगून आपले मनोगत व्यक्त केले. संपादक मंडळीनी सुद्धा ( रवी, कुमार,श्रीकांत,मीरा ) आपले अनुभव व्यक्त केले.
    कार्यक्रमाला आलेल्या वाचक मंडळीनी सुद्धा आपले अनुभव आणि अंकावरचे अभिप्राय व्यक्त केले. एकंदरीत हा उपक्रम सगळ्यांना खूप आवडला असा सूऱ होता. या वाचक प्रेमींमधली काही मंडळी आयटी कुशल असल्यामुळे त्यांनी काही नवीन कल्पना सुचवल्या आणि ह्या कल्पना पुढे नेण्याला सहकार्य करू असे सांगितले. या सोहोळयाला शर्मिला खासनिस (भारतातून स्टॅफोर्ड ला आपल्या मुलगी अमिता कडे आलेल्या) यांनी या निमित्ताने आपल्या स्वरचित ओळी सादर केल्या.
    जमलेल्या लेखक/वाचक प्रेमींसाठी मनमोकळे मनोगत व्यक्त होण्या करिता असे एकत्र येणे ही एक पर्वणीच आहे असे दिसले. पहिल्या अंकाची सुरुवात नॉर्थ वेस्ट मधून झाली पण पश्चिमाई चा दूसरा अंक आता ही सीमा पार करून इंग्लंड च्या वेगवेगळ्या भागात पोचतो आहे याचे समाधान संपादक मंडळींच्या चेहेऱ्यावर दिसत होते . ह्या कार्यक्रमासाठी केलेल्या अल्पोपहाराने कार्यक्रमाची रंगत आणखीनच वाढली.

    ReplyDelete
  2. कालचा कार्यक्रम तुम्हा सर्वांमुळे खूपच देखणा आणि स्मरणीय झाला.
    मीराने लिहिलेल्या मुलाखतीचा आणि आफळेबुवा कीर्तन लेखाचा आशय आणि मांडणी दोन्ही उत्तम झाले आहे.
    श्रीकांतच्या मनाचा श्लोक चांगलाच पण पंच- श्लोकी करायला हरकत नव्हती असे वाटले!
    कुमारची गझल ऐकायला आणि त्यामागची भूमिका वाचायला फारच मजा आली.त्यांनी लिहिलेले इतर ब्लॉगही सुंदर आहेत. रवी दातेही विचारप्रवर्तक लिहितात. कवितांचा ऑडियो पण असल्याने जास्त आवडल्या . नेहाकडून प्रत्यक्ष त्या कवितेबद्दल ऐकायला आनंद वाटला. अनुपमाने थोडक्या जागेत राजयोगाचा परिचय विषयाशी अपरिचित असणाऱ्यांसाठी छान लिहिला आहे.बाकी अंक वाचतो आहे…
    पश्चिमाई च्या उपक्रमास शुभेच्छा 🙏🏼

    ReplyDelete
  3. नमस्कार,
    मी जागृती जोशी.

    नुकत्याच प्रकाशित झालेल्या *पश्चिमाई होळी २०२५* विशेषांकामार्फत आपली कविता मराठी रसिकांपर्यंत पोहोचविण्याचा योग आला.

    कविता *"संवाद परदेशातील मनाशी"* , हा माझा छोटासा प्रयत्न मातृभूमी पासून दूर राहून त्यावर सतत प्रेम करणाऱ्या माझ्या मित्र मैत्रिणींच्या भावनांना समर्पक अशी कविता लिहिण्याचा.

    विशेष आभार मानावेसे वाटते ते म्हणजे पश्चिमाई च्या संपादक मंडळाचे. तुमची प्रोत्साहन आणि विश्वास पूर्ण साथ माझ्यासम नवोदित आणि हौशी कवींना अशीच मिळत राहो.

    पुनश्च एकदा अभिनंदन💐💐

    *पश्चिमाई* सारखे उपक्रम असेच सुरू राहोत आणि सातासमुद्रा पार असूनही आपले मराठी मातीशी ऋणानुबंध कायम बहरत राहोत☀️

    ReplyDelete
  4. आपण सर्वांनी या उपक्रमाला फार सुंदर प्रोत्साहन दिलेलं आहे. आपले मन:पूर्वक आभार!

    ReplyDelete

प्रतिसाद

संयोजक

श्रीकांत पट्टलवार, मीरा पट्टलवार, रवी दाते, मुकुल आचार्य, कुमार जावडेकर