Saturday, 8 March 2025

३.२ कविता - नवीन वर्ष (सौ. लीना फाटक)

नवीन वर्ष 

सौ. लीना फाटक


निशादेवींनी, प्रेमाने आपली काळीभोर, मऊ, उबदार शाल धरतीराणीच्या अंगावर पांघरली होती. धरतीराणीला रवीराजांच्या आगमनासाठी जागे करायला, उषादेवींनी आपल्या हातांनी, ती शाल हलकेच बाजूला केली. पक्षीगण पण, आपल्या सुरेल आवांजात, तिला भुपाळी गाऊ लागले. भ्रमरांच्या गुंजारवाने जाई, जुई, चाफ्याला जाग आली. त्यांचा सुगंध आसमंतात पसरला. वृक्ष, वेली, आपल्या पानांनी धरतीराणीला जागे करायला हळुवारपणे वारा घालू लागले. 

धरती-राणीला आपल्या सुशांत निद्रेतून, हळूहळू जाग येऊ लागली. सर्वांगाला आळोखे देत, डोळे किलकिले करून, धरतीराणीनी  क्षितीजाकडे बघितले. अर्धोन्मलीत डोळ्यांनी, रवीराजांच्या आगमनाची, ती अधीरतेने वाट पाहू लागली. रवीराजांनीसुद्धां क्षितीजाच्यावर हळूच मान उंचावून धरतीराणीकडे पाहिले. त्यांना त्या रूपगर्वीतेचे विलोभनीय सौंदर्य पाहून आपल्या किरणशलाकांनी तिला बाहूत लपेटून घ्यायचा मोह अनावर झाला. 

पण, धरतीराणी कसली खट्याळ. ती रवीराज क्षितीजावर येण्याची मिस्किलपणे  हसत वाट पाहू लागली. रोमांचित झालेल्या रविराजांची गुलाबी लाली सगळ्या आकाशभर पसरली. ती पाहून लाजून हंसत, धरतीराणी क्षितीजापर्यंत केंव्हा पोचली ते तिला कळलेच नाही. आणि रवीराजांच्या सोनेरी बाहूंनी धरतीराणीला केंव्हा लपेटले ते त्यांना समजलेच नाही. क्षितीजावरच्या त्या स्वर्गीय मिलनांतून नवी पहाट, नवा दिवस उगवला आणि नविन आशा, आकांक्षा, नवी स्वप्ने, नव्या ध्येयांच्या सोनेरी क्षणांचा वर्षाव धरतीच्या लेकरांवर झाला. ते मोलाचे क्षण वेचून सर्वांनी आपले २०२५ चे उज्वल भवितव्य घडवले. 

तुमच्या सर्वांच्या जीवनांत ह्या सोनेरी क्षणांमुळे सुख, आनंद, सुआरोग्य, शांती व संप्पन्नतता लाभो ह्या शुभेच्छां. 

नवीन वर्ष---- 

नवीन वर्षाचा, नवा दिवस, नवीन महिना
मानवाची असे, ही कालमात्र गणना
पण खरं म्हणजे, पडतो का काही फरक?
कालचक्र मात्र असेल, माणसाला हसत ।।१।। 

रोजच दिवस उगवतो, आजच्या सारखाच
मावळतोही तो, रोजच्या सारखाच
मानव मात्र मोजतो, दिवस-रात्रीचे तास
अविचल असतो, तो स्थितप्रज्ञ काल ।।२।। 

शालिवाहनाची आपण, मोजतो शके
विक्रमादित्याची, मानतो संवत्सरे
ख्रिश्चनांची असती, सर्व प्रचलित वर्षे
स्थितप्रज्ञाची कशी, मोजावी शतके? ।।३।। 

कालगणनेवर, नियंत्रण मानवाचे
धरतीवर मात्र, वर्चस्व निसर्गाचे
भूकंप, ज्वालामुखी, कुठे "सुनामीचे" तडाखे
उद्धस्त करी जीवन, पराधीन मानवाचे।।४।। 

संकटी दिसे, मानवाची एकजुटी
खेद् होतो बघुनी, काहींची भ्रष्ट वृत्ती
स्वार्थ, धर्मांधता, माजवी अराजक जगती
भाऊबंधास मारती, होई होळी मानवतेची ।।५।। 

सावध होई, रे, बा, मानवा
बसशील करत,  तू कालगणना
नसे तुझी कदर, त्या स्थितप्रज्ञाला
काळच नाहीसा, करेल तुला ।।६।। 

करी रे,  बा मानवा, निसर्गाशी संगती
सर्व जिवी असो, सहानुभुती
जोवरी राहील, संतुलन धरती
मानवी अस्तित्व, असेल जगती
मानवी अस्तित्व, टिकेल जगती ।।७।। 

सौ. लीना फाटक, वाॅरिंग्टन यु.के.

1 comment:

  1. छान कविता ! प्रत्येक कडव्यात एकेक गोष्ट घेतली मानव धरती आणि शेवट केला तो मात्र मानवाच्या अस्तित्वाला निसर्गाशी मैत्री याने .👌

    ReplyDelete

प्रतिसाद

संयोजक

श्रीकांत पट्टलवार, मीरा पट्टलवार, रवी दाते, मुकुल आचार्य, कुमार जावडेकर