Saturday, 8 March 2025

अंक २ - मुखपृष्ठ आणि अनुक्रमणिका

 मुखपृष्ठ आणि अनुक्रमणिका 


सर्व हक्क लेखकांस स्वाधीन. या अंकातील मते संबंधित लेखकांची आहेत, त्यांस संपादक मंडळ जबाबदार नाही.

मुखपृष्ठ आणि रेखाचित्रे – रवी दाते. 

1     स्वागत (रवी दाते)

2     लेख, कथा

2.1      आठवणी - माझी असामान्य बाल-मैत्रीण भारती वैशंपायन (डॉ. आनंद शिंत्रे )

2.2      लेख - राजयोग (डॉ. अनुपमा श्रोत्री)

2.3      कथा - इंद्रायणीचा पूर (अंजली शेगुणशी)

2.4      लेख - वय, शिक्षण आणि यश (रवी दाते)

2.5      कादंबरी –बे-जमाव’: (प्रकरण १) - 'कुशल – पिंच हिटर’  (कुमार जावडेकर)

2.6      लेखकीर्तनाचा गजर होतं (मीरा पट्टलवार)

3     आस्वाद (कविता, गीत, गजल)

3.1      कविता -  मनी या कसे हे नवे गीत येते  (श्रीकांत पट्टलवार)

3.2      कविता - नवीन  वर्ष (सौ. लीना फाटक)

3.3      कविता – संवाद परदेशातील मनाशी (जागृती जोशी)

3.4        कविता – मला आई व्हावंसं वाटतं (नेहा बापट-अन्वेकर)

3.5        ग़ज़ल - चालत जाणे (राहूल गडेकर)

3.6        सदर – 'ग' ची बाधा : शोध (कुमार जावडेकर)

4       गप्पा-टप्पा

4.1        नृत्यनिपुण डॉ. स्वाती राऊत (मीरा पट्टलवार)

5       डिंगूचा कट्टा

5.1        मामाच्या देशात जाऊया (कै. वि. म. जोशी)

6       चणे-फुटाणे

6.1        मोफत ज्ञान - प्रमाणामधे सर्व काही करावे (श्रीकांत पट्टलवार)

7. मलपृष्ठ - आराध्य भुजबळ 


१. पश्चिमाई होळी विशेषांक - स्वागत (रवी दाते)


“हुताशनी पौर्णिमा” या शब्दाचे गांभीर्य आणि पावित्र्य काळाच्या ओघात लुप्त होत असल्याची आणि रंगपंचमीच्या नावाखाली धुमाकूळ घालण्याची आपली देशी परंपरा परदेशात रुजत असल्याची कधी कधी थोडी खंत वाटत असली तरी सर्व भारतीयांना एकत्र आणण्यासाठी असलेले या सणाचे योगदान नाकारता येत नाही.

एकदा का धुळवडीच्या रंगांच्या मुखवट्याआड तोंड दडले की लहान थोर, पंजाबी, मद्रासी, मुंबईकर, पुणेकर, मुंबईतील सेंट्रल आणि वेस्टर्न रेल्वे असे अनेक देशी भेदभाव नाहीसे होतात आणि उरतो तो फक्त आनंदाचा जल्लोष. जल्लोष आहे आणि त्याला हिंदी चित्रपटातील संगीताची साथ नाही असं होणं शक्यच नाही मग तो जल्लोष “चाहे भीगे तेरी चुनरिया” सारखा सूचक असो की अगदी अलीकडच्या “हाय ये होली, उफ ये होली” सारखा विदेशी चालीवरचा थेट आणि बेफाम असो. याच रंगात “खाए गोरी का यार, बलम तरसे” च्या पावलावर पाऊल टाकून काही हातातून निसटणारे आणि दुसऱ्या हातात अलगदपणे जाऊन पडणारे हातही दडून जातात.

तर अशा रंगीबेरंगी आनंदात भर टाकण्यासाठी पश्चिमाईचा हा दुसरा अंक; फक्त संपादक मंडळाच्या  लेख आणि कवितांनीच नव्हे तर नवोदित लेखक आणि कवींच्या योगदानाने संपन्न झालेला. ही मंडळी कोणी परकी नाहीत तर चक्क इंग्लंड मधील स्थानिक, आपल्याच आजूबाजूची, रोज भेटणारी, आपल्याला व्हाट्सअप वर विश करणारी आणि अडीअडचणीला धावून येणारी आहेत. या सर्व “छुप्या रुस्तुमांना” शोधून त्यांना प्रोत्साहन देण्याच्या, आणि लिहिण्यासाठी प्रवृत्त करण्याच्या आमच्या प्रयत्नात सहभागी झाल्याबद्दल त्या सर्वांचे आभार.

या अंकात राहुल गडेकरांची ‘गझल’ वरची ‘गझल’ आहे, नेहा बापट अन्वेकरांची मातृत्वावर कविता आहे, जागृती जोशीने स्वत:च्याच मनाशी संवाद साधला आहे,  डॉक्टर आनंद शिंत्र्यांच्या “बाल मैत्रिणी”च्या आठवणी आहेत आणि बाल मित्रांकरिता वि मा  जोशींची ‘मामाच्या देशात जाऊया’ ही एक विशेष कविता पण आहे. आणि on-line मराठीचा डोस जरा जास्तच झाला तर काय करावे हे सांगायला श्रीकांतजींचे “मोफत ज्ञान”ही आहे.

पहिल्या अंकाच्या संगणकीय आणि छापील आवृत्त्यांना मिळालेला उदंड प्रतिसाद आम्हाला नक्कीच स्फूर्तीदायक आहे. असाच लोभ असू द्यावा. आपल्या आजूबाजूला असलेल्या कलाकारांबद्दल वाचायला आम्हाला नक्कीच आवडेल, तरी त्यांना शोधा आणि असेच लिखाण पाठवत राहा.

आमच्या हातून काही चुका झाल्या असतील आणि अंकात काही न आवडलेले लेख असतील तर या सणानिमित्त त्यांची “होळी” करण्याच्या संधीचा जरूर फायदा घ्या, पण त्याआधी आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा.

सर्वांना होळीच्या शुभेच्छा.

रवी दाते. 

२.१ आठवणी - माझी असामान्य बाल-मैत्रीण भारती वैशंपायन (डॉ. आनंद शिंत्रे )

माझी असामान्य बाल-मैत्रीण

(डॉ. आनंद शिंत्रे )


आपल्या आयुष्यात वेळोवेळी नवीन माणसे भेटतात काही कायमची लक्षात राहतात तर काही लगेचच विसरण्याजोगी असतात. आपले बाल सवंगडी अनेक वर्षानी अचानक भेटले तर होणारा आनंद हा निखळ आणि निर्व्याज असतो, त्यात प्रौढपणाच्या ईर्ष्या, असूया किंवा हेवे दावे यांना बिलकुल स्थान नसते. मग वयाच्या साठीत पन्नास वर्षांपूर्वीची आपली एखादी वर्गमैत्रीण अचानक भेटली तर आपले लहानपण पुन्हा उभे ठाकते! त्यातूनही माझ्या पिढीतल्या बहुतांश मुलींची नावे लग्नानंतर बदलल्याने लहानपणच्या वर्गातल्या मुली पुन्हा ओळखणे/ संपर्कात येणे जवळ जवळ अशक्यच! आताचे फेसबूक आणि व्हाटस-आप याचा जमाना नसताना केवळ कर्तृत्वाने मोठे असणाऱ्या मित्र मैत्रिणींचा थोडाफार छडा कुणाच्या बोलण्यावरून /वर्तमानपत्रामुळे लागायचा.गेली बत्तीस वर्षे इंग्लंडमध्ये राहिल्याने भारतातले मित्रमैत्रिणी  प्रत्यक्ष भेटण्यालाही प्रचंड मर्यादा पडल्या.

सुमारे पंचवीस वर्षापूर्वी माझ्या वडिलांनी पुण्याच्या वर्तमानपत्रातिल (फोटोसकट पूर्ण पानभर असणारे) एक कात्रण मला दिले. श्री बापू वाटवे यांनी एका गायिकेवर लिहिलेल्या त्या लेखाचे शीर्षक आता आठवत नाही पण गायिकेचे नाव होते - (डॉ) भारती वैशंपायन. फोटो पाहूनच लक्षात आले की ही व्यक्ति माझ्या लहानपणी सांगलीमध्ये पाचवी ते आठवी अखेर (१९६३ ते १९६६)आमच्या वर्गातली -भारती ताम्हनकर! जयपुर-अत्रौली घराण्याची नामवंत गायिका आणि ती कोल्हापुरातल्या शिवाजी विद्यापीठात संगीत-नृत्य विभाग प्रमुख. तिचा संगीत प्रवास आणि तीनही मुलांची नावेही त्या लेखात कळली. मी मोठ्या उत्साहाने माझ्या संगीतप्रेमी पत्नीला (अंजनीला) ते कात्रण दाखवले. पण पुढील दहा वर्षे या बाल-मैत्रिणीशी संपर्क करणे राहून गेले आणि अचानक २०११ साली अंजनीने लंडनच्या कलाप्रेमी आठल्ये कुटुंबाशी फोनवर बोलताना त्यांच्याकडे आलेल्या पाहुणीचे नाव ऐकल्यावर ताबडतोब ओळखले आणि आम्ही तब्बल ४५ वर्षानंतर, म्हणजे आमच्या दोघांच्या ५७ व्या वर्षी बोललो आणि लवकरच प्रत्यक्ष भेटलो.

“कोण ह्या भारती वैशंपायन” याबद्दल जिज्ञासू वाचकांनी जरूर विकिपीडिया , गूगल आणि यूट्यूब यांची मदत घ्यावी. या ठिकाणी तिच्याबद्दल माहिती आणि अनेक ध्वनि / चित्र-फिती उपलब्ध आहेत. इथे पुनरुक्ति टाळून मी इतर अप्रकाशित गोष्टींवर लिहीत आहे.

तिची संगीतसाधना १२ व्या वर्षापासून चिन्तुबुवा म्हसकर यांचेजवळ सुरू झाली. सांगलीतल्याच दोन मुलीनी १९७१ साली पुण्याच्या बालगंधर्व नाट्यसंगीत स्पर्धेत पहिली दोन पारितोषिके पटकावली. प्रथम पारितोषिक विजेती - आशा पाटणकर (आताच्या आशा खाडीलकर) तर द्वितीय पारितोषिक मिळाले भारती ताम्हनकर (वैशंपायन)- स्पर्धेचे परीक्षक होते साक्षात पंडित भीमसेन जोशीपं.वसंतराव देशपांडे आणि पु ल देशपांडे! या दोघीनीही पुढे संगीतक्षेत्रात आपली कारकीर्द गाजवली . म्हणूनच प्रत्यक्ष पुलंबरोबरचा हा फोटो आणि भारतीचा परीक्षक मंडळींसमोर गातानाचा फोटो मला आवडतो.


१९७२ मध्ये ऑल इंडिया रेडियो वर ती प्रथम गायली. पुढे १९७६ मध्ये भारत सरकारची संगीत शिष्यवृत्ती मिळाली आणि अत्रौली–जयपूर घराण्यामधील  नामवंत पं सुधाकर डिग्रजकर, निवृत्तीबुवा सरनाईक यांचेकडून तालीम मिळाली. SNDT विद्यापीठाने तिला “गान-हीरा” म्हणून गौरविले तर गांधर्व महाविद्यालयाने “संगीत प्रवीण” (डॉक्टरेट) उपाधी दिली होती. आकाशवाणीची ती टॉप ए-ग्रेड आर्टिस्ट होती आणि अनेक वेळा मंगळवारची राष्ट्रीय संगीत सभा किंवा रविवार रात्रीचा शास्त्रीय संगीताचा नॅशनल प्रोग्राम तिने दिला. गायकी घराण्यांच्या चौकटीत न अडकता तिने ठुमरी, दादरा, कजरी, टप्पा या प्रकारातही प्राविण्य मिळवले. शास्त्रीय आणि उपशास्त्रीय / सुगम या दोन्ही प्रकारात ती सहजतेने वावरली.या उपशास्त्रीय संगीताचे तिचे गुरु श्री बाबुराव जोशी, तर नामवंत गायक पद्मविभूषण पं मल्लिकार्जुन मन्सूर यांचेकडून काही अप्रचलित रागही शिकली.पं यशवंतबुवा जोशी आणि पं पंचाक्षरी मंतीगट्टी यांचेकडूनही मार्गदर्शन लाभले होते. प्रख्यात गायिका गंगुबाई हनगल यांचा तिच्या वर लोभ होता आणि त्यांचे प्रोत्साहनही तिला मिळाले. पुढे जवळ जवळ पंचवीस वर्षे कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाचा संगीत आणि नृत्य नाट्य विभाग प्रमुख म्हणून तिने शून्यातून उभा केला. इतर अनेक (धारवाड,गोवा,पुणेमराठवाडावडोदराकुरूक्षेत्र..) भारतीय विद्यापीठानी तिच्या सखोल संगीत व्यासंगाचा लाभ घेतला.    

लग्नानंतर पुण्या-मुंबईच्या अनेक उपलब्धींपासून दूर राहूनही स्वतःचा रियाज , संगीत व्यासंग वाढवणे,संसाराच्यावाढत्या कुटुंबाच्या जबाबदाऱ्या पेलणे ही केवढी अवघड गोष्ट आहे. तरीही अखिल भारतीय दर्जा गाठणारी , अनेक पुरस्कारांनी सन्मानितविविध संगीत महोत्सवात नावाजलेलीअनेक विद्यापीठामध्ये संगीत विचार आणि अभ्यास या विषयांवर कार्यशाळा घेणारी आमची ही वर्ग-मैत्रीण हा माझ्या सर्व वर्ग-मित्रांचा आणि मैत्रिणीचा अभिमानाचा विषय आहे.पण तिच्या चालण्या-बोलण्यात तिच्या कर्तृत्वा बद्दल अहंकाराचा तिळभरही लवलेश नव्हता किंवा पुण्या-मुंबईहून दूर राहिल्याने प्रसिद्धीची संधि न मिळाल्याची खंत नव्हती. कुणी संगीतशास्त्राचा कसलाही प्रश्न विचारला तर त्याचे सविस्तर आणि प्रात्यक्षिकासह उत्तर मिळणारच.

हे मी इंग्लंडमधल्या अनेक मैफिलीनंतरच्या श्रोत्यांशी तिने केलेल्या संवादात पाहिले आहे. ती आधी हाडाची संगीत शिक्षिका  आणि मग मैफिलीची गायिका होती. एखादा राग वेगवेगळे गायक किंवा घराण्यानुसार कसा सादर होईल याचे विवेचन आणि त्यातील कौशल्याचे वर्णन यातून तिची खोल विचार पद्धती आणि अभ्यास याचे दर्शन होई. विविध भारतीच्या संगीत सरिता कार्यक्रमातही तिने अनेक रागातले साम्य  आणि नाजुक फरक सुंदर उलगडून दाखवले आहेत.पं. कुमार गंधर्व स्मृति संमेलन (२०१३), सवाई गंधर्व महोत्सव (२०१५) या आणखी काही स्मरणीय अदाकारी.

भारतीचे २०११ ते २०२० या काळात इंग्लंड मध्ये ३-४ वेळा तिच्या मुलीकडे येणे झाले, तिच्या ५-६ (इंग्लंडमधल्या) मैफिलींपैकी पहिला कार्यक्रम २०११ साली मी आणि माझ्या पत्नीने पुढाकार घेऊन Ruislip (रॉयसलिप) या लंडनच्या उपनगरात एक हॉल भाड्याने घेऊन केला होता. धारदार , कमावलेला आणि सहजतेने तीनही सप्तकात विरणारा तिचा आवाज आमच्या सर्व श्रोत्यांना  आवडला. तिच्या साथीला तबल्यावर तिचा मुलगा (केदार) आणि तंबोऱ्यांवर मुलगी (मीरा) होते. तिचा मुलगा, जुळ्या मुली मीरा –मधुरा आणि सून (शीतल) हे चौघेही तिचे विद्यार्थी संगीतात MA झालेले आहेत.

नाट्यसंगीतावर ही तिचे प्रभूत्व असल्याने श्रोत्यांच्या फर्माईशीनंतर, आम्ही आयोजित केलेल्या या कार्यक्रमाशेवटी तिने आपल्या भावना “क्षण आला भाग्याचा” ही ज्योत्स्ना भोळे यांचे समयोचित नाट्यगीत गाऊन व्यक्त केल्या. त्या नंतर आणखीही दोन ठिकाणी तिचे कार्यक्रम झाले आणि श्रोत्याना तिच्या जवळच्या संगीत खंजिन्यांची कल्पना आली.

लंडन मधील अनेक जिज्ञासू आणि संगीत शिक्षण देणाऱ्या अनेक स्त्री-पुरूषांनी कार्यक्रमांनंतर पुनः भेटून तिच्याकडून शिकण्याची संधी घेतली. स्वतःचे कष्टपूर्वक जमवलेले हे  संगीतधन अशा जिज्ञासूंवर तिने हातचे न राखता मुक्तहस्ते उधळले.

त्या वर्षीच्या राखी पौर्णिमेला तिच्या मुलीच्या घरी तिने मला ओवाळून राखी बांधली त्यामुळे तर आमचे दोघांचे बहीण-भावाचे नाते झाले. तिच्या मुलांचा मामा आणि लंडन मधल्या नातवंडांचा मी आजोबा झालो आहे. सप्टेंबर् २०२० मध्ये लंडन मधल्या बैठकीच्या आधी एक दिवस आमच्या घरी विश्रांती घेण्यासाठी राहून गेली त्या कार्यक्रमातच गाताना तिला क्षणभर अंधारी आली होती .पण कुणालाच पुढे येवू घातलेल्या संकटाची कल्पना आली नाही. तिचा भारतात गेल्यावर लगेचच १४ सप्टेंबरला बंगलोरला “वीणा सहस्त्रबुद्धे फाऊंडेशन” मधील गाण्याची बैठक आणि (तिचा) सत्कार सोहळा यांची आम्हाला कल्पना देवून आमचा निरोप घेऊन  ती भारतात गेली. पण दुर्दैवाने त्या कार्यक्रमानंतर नंतर झपाट्याने मेंदूतील रक्तस्त्रावाने तिची तब्येत खालावून ती कोमात गेली. सर्व उपचार थकले आणि १९ जानेवारी २०२० ला कुटुंबाला आणि प्रियजनांना सोडून तिच्या अनंताच्या प्रवासाला निघून गेली- वयाच्या केवळ ६६ व्या वर्षी! 

शिवाजी विद्यापीठातल्या विभागाची केलेली शून्यातून उभारणी आणि कोल्हापूर रसिकांना आणि विद्यार्थ्यांना ख्यातनाम/ दिग्गज कलावंतांचा परिचय तिनेच घडवून आणलेल्या शाहू संगीत महोत्सव याचे आयोजन ही तिची खरोखर तिला मिळालेल्या कोल्हापूर-भूषण पुरस्कारपालिकडे पोचणारी कामगिरी आहे. तिचे विद्यार्थ्यांवर अपत्यवत् प्रेम करण्याचे आणि त्याना अडीअडचणीला मदत करण्याचे किस्से परिचितांकडून ऐकले आहेत. कोल्हापुरातल्या घरी अनेक विद्यार्थी (विनामूल्य) राहून आणि संगीत साधना करून गेले आहेत. कार्यक्रमात आयोजकांच्या अनेक चुका, बिदागीचे पैसे उशिरा अगर पूर्णतः न मिळणे, कार्यक्रमानंतर जेवणाची योग्य व्यवस्था नसल्याने कधी उपाशी झोपणे अशा गोष्टींची  तिच्या तोंडून कधी वाच्यता ऐकली नाही. याउलट शाहू रजनी कार्यक्रमासाठी आलेल्या उस्तादअल्लारखाँ, झाकीर हुसेन आणि विलायतखॉं यांना त्यांचे विमान चुकल्यावर तिच्या घरी साबूदाणा खिचडी खायला घालून टॅक्सीने मुंबईला रवाना केल्याची आठवण तिच्या तोंडून ऐकली आहे. तिच्या “नीलांबरी”या कोल्हापुरातल्या घरी तिचे भारतीय संगीतातल्या सर्वच दिग्गजांबरोबरचे फोटो पाहिले आहेत. मी पाहिलेल्या यशस्वी/ कीर्तिमान लोकांमध्ये भारतीचे व्यक्तिमत्व एक सोज्वळविद्वान पण विनयशीलपट्टीची गायिकाअंतर्बाह्य संगीत-शिक्षक म्हणून ठसा उमटवून गेले आहे.

तिच्या अनेक मोठ्या कार्यक्रमात हार्मोनियमवरची साथ करणारे पद्मश्री तुळशीदास बोरकर तिच्या श्रोत्यांच्या अचूक अंदाजाबद्दल म्हणतात “ भारती बाईना काय गावे , किती गावे आणि कुठे थांबावे हे बरोब्बर कळते म्हणूनच त्या मोठ्या गायक आहेत ”

आता हे बोरकर गुरुजीही नाहीत आणि माझी सात्विक,असामान्य बाल-मैत्रीणही नाही पण तिचे संगीत मात्र टिकून राहणार आहे!

कुरूक्षेत्र विद्यापीठातल्या संगीताच्या प्राध्यापिका शकुंतलाजी भारतीबद्दल लिहितात:

चेहरेकी सादगी, गानेकी अदाकारी, स्वरोंकी कशिश, बयाण नही कर सकति II

रागोमे परिपक्वता, स्वरोमे सजगता, तुम्हारे गानेमे झलकती II

हे संगीतकी तपस्विनीतुम्हारे गानेकी जादुगिरी, भुलाये भूल नही सकती II

डॉ. आनंद शिंत्रे

Sangeet sarita Ek Raag Do madhyam 2021

Raag Bageshri –Shahu mahotsav 1997

Raag Kambavati  -Yaad piyaaki aaye

***

२.२ लेख - राजयोग (अनुपमा श्रोत्री)

राजयोग

अनुपमा श्रोत्री 

जीवन धकाधकीचं झालं आहे ताण-तणाव वाढतो आहे असे उद्गार आपण  रोजच ऐकत असतो. पूर्वीच्या काळापेक्षा सध्या जीवन जास्त अवघड आहे की नाही कोणास ठाऊक पण जास्त गुंतागुंतीचे मात्र झाले आहे. सामाजिक आणि वैयक्तिक जीवनात ताण वाढला आहे. सोशल मीडियाच्या अनिर्बंध वापरामुळे शाळकरी मुलेही याला अपवाद राहिली नाहीत. नोकरी करणाऱ्यांमध्ये ताणतणावामुळे आजारी पडून कामावर गैरहजर राहण्याचे प्रमाण वाढत आहे, रक्तदाब हृदयरोग अशा सारखे आजार वाढीला लागले आहेत.

 गेल्या काही वर्षातल्या संशोधना नुसार स्ट्रेस मुळे माणसाची प्रतिकारशक्ती कमी होते व तो अनेक आजारांना बळी पडू शकतो असे निष्कर्षास आले आहे. कॅन्सर सारखा भयानक रोगही याला अपवाद नाही. साहजिकच त्यावर उपाय शोधण्याची घाई सुरु झाली आहे आणि त्या विविध उपायांमध्ये ध्यानधारणा किंवा meditation हा उपाय परिणामकारक असल्याचे उघडकीला येत आहे. ध्यान धारणेमुळे शरीर आणि मन या दोन्हींना विश्रांती मिळते, रक्तदाब व श्वसनाचा वेग कमी होतो, हृदयावर ताण कमी होतो असे अनेक फायदे सिद्ध झाले आहेत. साहजिकच ध्यानधारणेकडे बरेच लोक आकृष्ट होऊ लागले आहेत.

 मानसिक ताण कमी करणे हा काही ध्यानाचा मुख्य उद्देश नाही पण तो सध्याच्या जीवनाला आवश्यक असा एक उपयोग ठरला आहे. वास्तविक ध्यान हे राजयोगाचे महत्त्वाचे अंग आहे. कर्मयोग, ज्ञानयोग, भक्तीयोग व राजयोग हे माणसाला मुक्तीकडे नेणारे चार योग. या चार मार्गांचे प्रमुख ध्येय म्हणजे मोक्ष, अर्थात जिवाला शिवा मध्ये विलीन करणे. पण हे परम ध्येय डोळ्यासमोर ठेवून ध्यानधारणा करणारे विरळाच. बहुतेक लोक ध्यानाच्या मानसिक फायद्यामुळे तिकडे आकृष्ट होतात. परंतु नियमित अभ्यास केल्यानंतर त्यातून मिळणाऱ्या आत्मिक समाधानाची गोडी त्यांना लागल्या वाचून रहात नाही.

 ध्यानामुळे मानसिक तणाव का बरे कमी होतात? माणसाच्या जीवनाबद्दलच्या एकूण अपेक्षा सध्या फार वाढल्या आहेत. पैसा, यश, छानछोकीची राहणी, स्टेटस या सर्वांना फार महत्त्व आले आहे. प्रत्येकालाच या गोष्टींची अत्यंतिक गरज भासू लागली आहे. या अपेक्षा पूर्ण करण्याची धडपड आणि त्या पूर्ण न झाल्यास येणारी वैफल्यता यातून ताण वाढू लागतो. बऱ्याच वेळेला कुटुंबातील लोकांच्या एकमेकांकडून असलेल्या अपेक्षा पूर्ण होत नाहीत आणि कौटुंबिक जीवनातही ताण वाढू लागतो. सोशल मीडियाच्या प्रादुर्भावामुळे सामाजिक जीवनात इतरांबरोबरची स्पर्धाही या तणावाला कारणीभूत होऊ  लागते. एकदा अपेक्षा पूर्तीची इच्छा आणि अपेक्षाभंगाच्या दुःखाच्या आवर्तात मनुष्य अडकला की त्याचे मन त्यातून बाहेर पडू शकत नाही. मनात विचारांची गर्दी झाली की शांत झोप सुद्धा लागत नाही. ध्यानामध्ये माणसाला सतत भंडावणाऱ्या  विचारांपासून अलिप्त होण्याचे संधी मिळते. एकदा मन अस्वस्थ करणाऱ्या विचारांच्या जाळ्यातून बाहेर पडले की माणसाला शांततेची अनुभूती होते. मन शांत झाले की शरीरातले स्नायू शिथिल होऊ लागतात. श्वसनाचा वेग कमी होतो आणि रक्तदाब कमी होऊ लागते.

 हे सर्व जरी खरे असले तरी ध्यान करणे ही काही औषधाची गोळी घेण्याइतकी  सोपी गोष्ट नाही. त्यासाठी ठाम निश्चय करून प्रयत्न करण्याची तयारी असायला हवी. सुरुवातीला कोणाचे तरी मार्गदर्शन मिळणे जरुरीचे आहे. त्यानंतर स्वतः अभ्यास करून प्रगती करून घेता येते. सध्या ध्यानधारणा शिकवणाऱ्या बऱ्याच संस्था आहेत. काही फक्त मानसिक व शारीरिक स्वास्थ्यासाठी ध्यान शिकवतात तर काही अध्यात्मिक साधना म्हणून ध्यानधारणा शिकवतात.  Art of living आणि योग शिकवणाऱ्या इतर संस्था ध्यानाबरोबरच योगासने व प्राणायामही शिकवतात. ब्रह्मकुमारी संस्था राजयोग मार्गाने ध्यान शिकवते. याशिवाय Mindfulness meditation, Transcendental meditation अशा अनेक पद्धती उपलब्ध आहेत. आणि आता तर आपल्या फोन वरच ध्यानाचे अनेक 'ऍप' ही मिळू लागले आहेत.

 ध्यान करण्याच्या इतक्या सगळ्या वेगवेगळ्या पद्धती प्रचलित असल्यामुळे गोंधळात पडणं साहजिक आहे. आपल्यासाठी कुठली पद्धत योग्य हे कळणं सुरुवातीला अवघड होतं. कुठल्याही पद्धतीने ध्यान केलं तरी अखेर तो अनुभव एकच असतो. त्यामुळे कुठली पद्धत वापरून ध्यान करतो याला फार महत्त्व नसून ध्यानाचा नियमित अभ्यास करून ध्यान लागायला लागणे हे जास्त महत्त्वाचे आहे. त्याचबरोबर योग्य व्यक्तीकडून मार्गदर्शन मिळणे हे ही महत्त्वाचे आहे.

 आपण आता थोडक्यात राजयोगाच्या मार्गाने ध्यानधारणेचा विचार करू. राजयोगाच्या आठ पायऱ्या आहेत - यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी. यात ध्यान ही सातवी पायरी आहे. ध्यान करू इच्छिणारे लोक एकदम सातव्या पायरीवर उडी मारू पाहतात त्यामुळे ध्यान करणे व लागणे त्यांना अवघड वाटू लागते. आधीच्या सर्व पायऱ्या माणसाची ध्यानासाठी मानसिक व शारीरिक पूर्वतयारी करून घेतात त्यामुळे ध्यानाला बसणे व ध्यान लागणे शक्य होते. म्हणूनच आधी त्यांची ओळख करून घेणं महत्वाचं आहे.

 यातील यम, नियम या दोन पायऱ्या मानसिक शुद्धीसाठी आहेत. 'यम' यामध्ये सत्य, अहिंसा (शारीरिक व मानसिक), अस्तेय (चोरी न करणे), ब्रह्मचर्य (संसारी माणसाच्या बाबतीत वैवाहिक बंधनांचे पावित्र्य राखणे)आणि अपरिग्रह (भौतिक/मटेरियल गोष्टींचा मोह टाळणे) ही पाच अंगे आहेत. 'नियम' यामध्ये शौच (मनाची व शरीराची स्वच्छता), संतोष (आहे त्या परिस्थितीत आनंदी राहणे), तप (भोगांपासून शक्यतो दूर राहणे), स्वाध्याय (नियमित अभ्यास करणे) व ईश्वर प्रणिधान (आपला मीपणा ईश्वरचरणी अर्पण करणे) ही पाच तत्त्वे अंतर्भूत आहेत. यमनियमांचे पालन केल्याने  मनोबल वाढते व आपोआपच  मानसिक शांती मिळू लागते.

 'आसन' ही पायरी एका स्तिथीत बराच वेळ बसता येणं या स्थिती पासून ते सर्व योगासनांचा नियमित अभ्यास असणं इथपर्यंत सर्वकाही सामावून घेते. आपल्या आवडीप्रमाणे आपली पातळी आपण ठरवून घ्यावी. ध्यानासाठी एका स्थितीत तासभर तरी बसण्याइतकी शरीराची तयारी करून घेणे आवश्यक आहे. या स्थितीत ताठ बसून पाठ, मान व डोकं एका सरळ रेषेत यायला हवीत.

 प्राणायाम म्हणजे श्वासोच्छ्वासाचे नियमन. आपल्या शरीराला चालना देणारी प्राण ही जी शक्ती आहे तिचे एक दृश्य स्वरूप म्हणजे श्वासोच्छवास. श्वासाचे नियमन केले असता प्राणशक्तीवर ताबा मिळवता येतो आणि त्यायोगे मन आणि शरीर यांच्यावर ताबा मिळू शकतो. ध्यानाला बसल्यानंतर डोळे मिटून श्वासावर लक्ष केंद्रित केले आणि श्वसनाचा वेग मंद केला की मन एकाग्र होऊ लागते.  

 प्रत्याहार म्हणजे मनाला इंद्रियांपासून विलग करून अंतर्मुख करणे. म्हणजे स्पर्श, ऐकणे, बघणे, वास घेणे आणि चव घेणे या पाच जाणिवांवरून लक्ष काढून घेऊन ते लक्ष आत वळवणे. सुरुवातीला आत म्हणजे कुठे ते कळत नाही तेव्हा बाहेरचे लक्ष काढून घेतले असता स्वतःमध्ये जी शांततेची अनुभूती होते त्यावर लक्ष केंद्रित करावे असा अर्थ घ्यायचा.

 धारणा म्हणजे मनाची एकाग्रता. बरेच साधक दोन भुवयांच्या मधल्या बिंदूवर मन एकाग्र करतात. काही श्वासावर तर काही लोक एखाद्या मंत्रावर मन एकाग्र करतात. भाविक लोक आपल्या इष्ट देवतेचे चिंतन करतात. जे आपल्याला जास्त सोपे वाटेल किंवा जमेल ते आपण करावे. धारणेमध्ये मन एकाग्र झाले की आपणहूनच  विचारहीन स्थिती येते तिला ध्यान असे म्हणतात. सुरुवातीला ही स्थिती अगदी क्षणिकच अनुभवाला येते. मन विचारांमध्ये भरकटते ते पुन्हा इच्छित स्थळी आणून एकाग्र करायचे असे बराच वेळ चालते. त्यातून हलकेच थोडा वेळ ध्यानाची स्थिती येते आणि पुन्हा मन विचलित होते. पण काही क्षणांसाठी जरी ध्यान अवस्था आली तरीही त्यातून प्रचंड शांती आणि आनंद मिळतो. त्यामुळे सुरुवातीला विचारहीन स्थिती येत नाही म्हणून वाईट वाटण्याचे काही कारण नाही. 

 बरीच वर्षे ध्यान साधना करणाऱ्या साधकाला जास्तीत जास्त वेळ ध्यान स्थितीत राहता येऊ लागते. समाधी ही पायरी फार दूरची आहे. या स्थितीत आत्मा परमात्मा यांची भेट होते. ही स्थिती राजयोगात बरेच जन्म वाहून घेतल्याखेरीज येत नाही. परंतु तिथपर्यंत न पोहोचताही सामान्य साधकाला ध्यान धारणेतून पुष्कळ लाभ होतो.

 एकदा राजयोगाच्या अष्टांगांची माहिती झाली की मगच ध्यानधारणेचा अभ्यास करावा. ध्यानासाठी पहाटेची आणि संध्याकाळची वेळ सर्वात उत्तम आहे. एकदा वेळ ठरवली की ती नियमितपणे पाळण्याचा प्रयत्न करायला हवा. बसण्यासाठी एकच जागा ठरवून टाकावी. ती स्वच्छ आणि प्रसन्न ठिकाणी असावी. बसल्यानंतर एखादी प्रार्थना म्हणून सर्व विश्वाचे शुभचिंतन करावे म्हणजे आपोआपच मन हळूहळू शांत होऊ लागते. मग श्वासावर लक्ष केंद्रित करावे. श्वासाची तीन-चार आवर्तने झाल्यानंतर आपल्या इच्छित ठिकाणी मन एकाग्र करावे. मन विचलित झाल्याचे लक्षात आल्यावर अत्यंत शांतपणे व प्रेमाने मनाला पुन्हा एकाग्र करावे. यामध्ये अट्टाहास उपयोगाचा नाही. पंधरा मिनिटांपासून सुरुवात करून हळूहळू अर्ध्या तासापर्यंत वेळ वाढवावा.

 साधना नियमितपणे केली असता मानसिक शांती, शारीरिक स्वास्थ्य लाभतेच शिवाय जीवनाकडे बघण्याची दृष्टी बदलू लागते. ज्यांना आध्यात्मिक प्रगती करून घ्यायची असेल त्यांची योग्य दिशेनी वाटचाल चालू होते. अशा लोकांना गुरुचे मार्गदर्शन अत्यावश्यक आहे. ज्या लोकांना अध्यात्माची गोडी नाही त्यांचीही ध्यान धारणेतून मानसिक शक्ती वाढते व त्यांची  रोजच्या जीवनात व कामात परिणामकारकता/एफिशियन्सी वाढते.

 हे सर्व फायदे अनुभवाला येत असल्याने सध्याच्या काळात ध्यान धारणेची नितांत गरज वाटू लागली आहे यात नवल ते काय? या शास्त्राचा उगम भारतवर्षात झाला या गोष्टीचा प्रत्येक भारतीय व्यक्तीला अभिमान वाटल्या वाचून राहणार नाही.

 डॉ अनुपमा श्रोत्री

लिव्हरपूल

(मूळ लेख - संजीवनी मासिक साल २००२ च्या दिवाळी अंकात प्रकाशित)


२.३ कथा - इंद्रायणीचा पूर (अंजली शेगुणशी)

‘इंद्रायणीचा  पूर’- ‘किस्से’ या मराठी पुस्तकातील एक किस्सा

कथा: अविनाश देशपांडे, शब्दांकन : अंजली शेगुणशी 

(वडिलांनी सांगितलेल्या बालपणीच्या कथा)

डोणजे, हे माझं जन्मगाव. तिथे मी, माझी आई, वडील, दोन थोरल्या बहिणी, तीन थोरले भाऊ आणि आजी एकत्र राहायचो. मी पाच एक वर्षाचा असताना आम्ही आळंदीला स्थलांतर केलं.

हा किस्सा आहे बाळचा! माझा सर्वर थोरला भाऊ. बाळ पुण्यात, अनंतराव देशपांडे म्हणजे माझ्या वडिलांच्या मावसभावाकडे रहात होता. अनंतराव बऱ्यापैकी सधन होते, त्यांना दोन मुलं होती, मोठा मुलगा वकील होता आणि मुलीचं लग्न झालं होतं. या काकांनी हायस्कूलसाठी बाळला, आग्रहाने स्वतःकडे ठेऊन घेतलं होतं. लहानपणापासून पुण्यात एकटं राहिल्यामुळे बाळ खूपच धीट आणि स्वतंत्र मनोवृत्तीचा झाला होता. पुण्यात राहून तो सायकल चालवणे, पोहणे, या सारख्या गोष्टींमध्ये अगदी तरबेज झाला होता.

शाळेच्या दर सुट्टीत तो आळंदीला यायचा. तो त्याच्या ठरावीक, दोन मित्रांबरोबर बाहेर फिरायला जायचा. माझ्या आठवणीत त्यातला एक होता आळंदीच्या मेयरचा मुलगा केशव, आणि दुसरा शरद गुंगुर्डे. मी कायम त्यांच्याबरोबर बाहेर जाण्यासाठी बाळच्या मागे लागायचो. कधीतरी तो मला बरोबर न्यायला तयार व्हायचा, तेव्हा मी अगदी खूष व्हायचो.

तो मी सोडून, इतर कुणालाही बरोबर नेत नसे. “सुरेश आला, तर तो आईला चुगल्या करतो,” असं म्हणून तो सुरेशला नेहमी टाळायचा. मोहन स्वतःहूनच बरोबर यायला विचारायचा नाही, मग राहिलो कोण? मी!

“माझ्याबरोबर यायचं असेल, तर खूप चालावं लागेल. नंतर कटकट करायची नाही, सांगितलेलं ऐकायचं, मधे बोलायचं नाही, प्रश्न विचारायचे नाहीत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे घरी काहीही सांगायचं नाही!” बाळच्या या सगळ्या अटी मान्य करणारा आणि त्याच्या अगोचर साहसांमध्ये सहभागी होणारा, मी एकटाच होतो.

मी आणि सुरेश सामान्यतः सगळी मुलं करतात, त्या सर्व खोड्या, उद्योग आणि टवाळ्या करायचो; पण बाळबरोबर केलेली प्रत्येक गोष्ट मला खूप थरारक आणि रोमांचकारी वाटायची. माझा आत्मविश्वास बळकट करण्यामागे बाळचा खूप मोठा सहभाग होता. त्यातला हा एक रोमहर्षक किस्सा!

त्या वेळी मॅट्रीकची परीक्षा झाल्यावर बाळ, सुट्टीसाठी म्हणून आळंदीला आला होता. मी तेंव्हा सात-आठ वर्षांचा असेन. दिवस पावसाळ्याचे होते आणि आळंदीत पावसानं आठ दहा दिवस जोर धरला होता. इंद्रायणीला पूर आला होता आणि तिचं पात्र दुथडी भरून वहात होतं. एका दुपारी पाऊस थोडा थांबला, तेव्हा बाळ हळूच जवळ आला आणि म्हणाला, “चल अविन येणार का?”

मला अगदी भरून आलं. अर्थातच कुठे? काय? असा प्रश्न विचारायच्या भानगडीत मी पडलो नाही आणि मान डोलावली. मग आम्ही दोघं हळूच घराबाहेर पडलो.

“बाळ, फार लांब जाऊ नकोस. पावसाचा काही भरवसा नाही,” असं आई ओरडली; पण त्याच्या नेहमीच्या थाटात, काहीही न बोलता त्यानं मला हातानं खुणावलं आणि आम्ही चुपचाप पोबारा केला. लगबगीनं चालत आम्ही इंद्रायणीच्या काठापाशी पोहोचलो.

उन्हाळ्यात स्वच्छ आणि सुंदर दिसणारी ही नदी, मला तिच्या या रौद्र रूपात अगदीच भीषण वाटली. तिचं वेगानं वाहणारं ते गढूळ पाणी,  बरोबर जे दिसेल ते मोठ्या आवेशानं ओढून नेत होतं.

मग थोड्या वेळात त्याचे दोन मित्र आले. केशव बाळला म्हणाला, “बाळ, आज आपण पुरात पोहायचं. पुरात पोहायची मजाच वेगळी.”

बाळने वळून माझ्याकडे पाहिलं, तेवढ्यात त्याचा दुसरा मित्र बोलला, “अरे, तू काळजी करू नकोस. मी पाहिलं आहे तुला पोहताना. तू फक्त आमच्या मागे रहा. नदीचे भोवरे टाळले, की झालं, अगदी सोप्पं असतं बघ.”

बाळ विचारात पडला, “मी खूप चांगला पोहतो तसा; पण मी कधी पुरात नाही रे पोहलो. झेपलं बिपलं नाही, तर फुकट जीव जायचा,” असं तो म्हणाला.

“पण मला तर पोहताच येत नाही,” मी चाचरत मधेच बोललो आणि ते सगळे मला हसले.

“येड्या, तुला कोण नेतंय पुरात? तू फक्त आमचे कपडे सांभाळ,” बाळ म्हणाला.

मग त्यांनी नदीची पाहणी केली आणि शेवटी त्यांचा बेत पक्का झाला. सगळ्यांनी त्यांचे कपडे काढून माझ्याकडे सोपवले.

“कपडे घेऊन घाटावरून आमच्या मागे पळत, पळत यायचं कळलं?” केशव बोलला आणि मी गोंधळून त्याच्याकडे पाहतच राहिलो.

“हे बघ, आम्ही खालच्या बाजूला पोहत जाणार आणि स्मशानाच्या आधी, जो घाट आहे, तिथे आम्ही बाहेर पडणार कारण नदीला खूप ओढ आहे, त्यामुळे पोहत पोहत परत वरच्या बाजूला येणं जमणार नाही, समजलं?” दुसरा मित्र बोलला.

मग त्यांनी अजून थोडी चर्चा केली आणि एक जागा निश्चित करून पुराच्या पाण्यात उड्या मारल्या. मी त्यांचे कपडे घेऊन, नदीच्या काठाने वेगात चालू लागलो; पण नदीला अशी काही ओढ होती की, काही क्षणातच, ते वेगाने पुढे गेले. आता मी हातात कपडे घेऊन, त्या तिघांबरोबर नदीच्या काठाने जोरात धावू लागलो. नदीचा जोर भलताच होता आणि हळूहळू त्यांची तीन डोकी, छोटी छोटी दिसायला लागली.

मला एवढंच समजलं की, मला अजून वेगात धावायला हवं आणि मग मी जिवाच्या आकांतानी पळायला लागलो. माझा घसा, त्या ढगाळ आणि दमट हवेतपण, अगदी कोरडा पडला होता. मग थोड्या वेळानी ते स्मशानाच्या कमानीजवळ पोहोचले. केशव अगदी शिताफीनं पाण्यातून बाहेर पडल्याचं मी दुरून पाहिलं.

“इथेच बाहेर या. पुढे भोवरा आहे,” असं तो ओरडला.

पण त्याची सूचना मिळायच्या आत, बाळ पुढे गेला आणि भोवऱ्यात अडकला. माझ्या छातीत धस्स झालं. त्याचा दुसरा मित्र, त्याच्या मागे पोहत गेला; पण पाण्याचा जोर भलताच होता आणि त्याला काही बाळला पकडता आलं नाही. भल्या प्रयत्नांनी हातपाय मारीत थोडा पुढे तो भोवऱ्याच्या बाहेर पडला.

या सगळ्या प्रकरणात, बहुदा तेपण भांबावून गेले असावेत. ते दोघे हताशपणे एकमेकांकडे बघतच राहिले. बाळ भोवऱ्यात खाली ओढला गेला आणि माझ्या पायातला जीवच गेला.

“अरे त्यानं भोवरा तोडला, तो पुढं गेला.” मी कोणाचा तरी आवाज ऐकला.

दूरवर मला, एक हात आणि डोकं दिसलं. हातातले कपडे फेकून मी बाळच्या दिशेनी धावायला लागलो; अगदी स्मशानापर्यंत येऊन पोहोचलो. तसा काही मी फार भित्रा नव्हतो; पण या पूर्वी स्मशानात जाण्याचा प्रसंग, माझ्यावर कधीच आला नव्हता. त्यामुळेच स्मशानाच्या कमानीजवळ जाऊन, मी क्षणभर थबकलो; पण मग मनाचा हिय्या करून आत गेलो.

आत गेल्यावर, एका बाजूला मला भल्या मोठ्या गाळात अडकलेला, बाळ दिसला. मी वेगाने त्याच्या दिशेने पुढे सरकलो, तेवढ्यात तो उभा राहिला आणि ओरडला, “थांब! येऊ नकोस, तू लहान आहेस, गाळात रुतलास, तर मरशील.”

त्याचे शब्द ऐकून मी तिथेच थांबलो; पण पुढचं दृश्य पाहून मी अक्षरशः थिजलो. भीती आणि किळस ह्याचं एवढं परिपूर्ण मिश्रण, मी या पूर्वी कधीच अनुभवलं नव्हतं. त्या गाळात बरेच छोटे मोठे प्राणी अडकून किंवा मरून पडले होते. अनेक उंदीर, काही घुशी, कुत्री, झाडं आणि शेकडो साप. अगदी गांडूळासारखे. अनेक रंगांचे, आकाराचे, एवढे साप आणि नाग एकत्र मी कधीच पाहिले नव्हते.

“बाळ, साप!” मी एवढंच ओरडलो; पण बाळ मात्र निवांत होता. त्याच्या चेहऱ्यावरची रेषपण हलली नव्हती. तो इकडेतिकडे काही तरी शोधात होता. मग मोठ्या प्रयत्नांनी त्यांनं चिखलात रुतलेली बाभळीची एक मोठी फांदी ओढली. त्यावर साप उचलून, तो दूर फेकायला लागला. मग तीच काठी मोडून त्याच्या आधारानी, तो हळूहळू गाळातून पुढे सरकू लागला. त्या सापांच्या खचातून तो अगदी बिनधोकपणे पुढे पुढे सरकत होता.

“बाळ साप!” मी परत एकदा ओरडलो.

ते साप त्याला चावणार, असं वाटून मी डोळे घट्ट मिटून घेतले. तेवढ्यात माझ्या मागून त्याचे मित्रपण पळत आले. मग सगळ्यांच्या एकत्र प्रयत्नांनी, तो अखेर त्या गाळातून बाहेर पडला.

“च्यायला, आम्हांला वाटलं, तू मेला.” केशव बोलला आणि सगळे खदाखदा हसायला लागले.

आता ह्यात विनोद काय होता, हे मला तेव्हा उमगलंच नाही. मग बाळने शांतपणे सगळा चिखल साफ केला आणि नदीवर अंघोळ करून परत कपडे चढवले.

“तू सापांना घाबारला कसा नाहीस बाळ?” मी विचारलं.

“त्यात काय घाबरायचंय? ते साप स्वतःचा जीव वाचवणार की, मला चावणार?”

विचार केल्यावर मलाही त्याचं म्हणणं पटलं आणि मी मान डोलावली.

मग काहीच घडलं नाही अशा थाटात आम्ही घरी परतलो.

शांत डोक्यानी विचार केला, तर आपण मोठ्यात मोठ्या संकटातूनसुद्धा सहज बाहेर पडू शकतो. किंबहुना बरेचदा, नीट विचार केला, तर वरकरणी भीषण वाटणारी संकटं, सत्यात तेवढी भीषण नसतात हा धडा मला त्या दिवशी नकळतच मिळाला.

- अंजली शेगुणशी

२.४ लेख - वय, शिक्षण आणि यश (रवी दाते)

वय, शिक्षण आणि यश

रवी दाते 

मागे मी 'यश - व्याख्या, प्राप्ती आणि मोजमाप' या लेखात माझे यशाच्या मोजमापाबद्दल  विचार लिहिले होते त्यात आज शिक्षणाच्या पैलूची थोडी भर पडली.

मनुष्य हा जन्म भराचा विद्यार्थी असतो किंवा शिक्षणासाठी वयाची अट नसते अशी अनेक वाक्य आपण ऐकत असतो, पण आज फावल्या वेळात इंटरनेटवर सर्फिंग करताना पैसा पाणी या यूट्यूब चैनल वर दोन व्हिडिओ पाहण्यात आले आणि या वाक्यांची प्रचिती आली. पहिल्या व्हिडिओवर पंधरा वर्षाचा मुलगा शेअर मार्केटचा दादा बनला आहे आणि दुसऱ्या व्हिडिओत एक आजीबाई त्यांना शोभेलशा वयात शेअर मार्केटमध्ये एक्सपर्ट बनल्या आहेत आणि स्वतःचे युट्युब व्हिडिओ बनवत आहेत. आयुष्याच्या या दोन टोकातील व्यक्तीची शिक्षणाची आवड खरोखरच वापरण्याजोगी आहे आणि नुसती आवडच नव्हे तर त्यासाठी त्यांनी घेतलेली मेहनतही. हे व्हिडिओ पाहिल्यावर  पूर्वानपार चालत आलेली “बिगरी ते मॅट्रिक (ते डिग्री) अशी  शिक्षणपद्धती किंवा गुरु बिना  ग्यान कहासे लावू इत्यादी विचार कालवाह्य होऊ लागलेत की काय अशी शंका मला येऊ लागली आहे.

अगदी फार पूर्वीच्या काळात गेलं जेव्हा कागद आणि लिहिण्याची कला अवगत नव्हती, खरंतर अस्तित्वात नव्हती, तेव्हा फक्त पाठांतर हा एकच ज्ञानप्राप्तीचा मार्ग होता. यानंतर शिक्षण पद्धतीत असंख्य बदल झाले. गुरुकुल आली, मग पुस्तक आली, युनिव्हर्सिटी झाल्या, डिग्री आल्या, इंग्रजांच्या देशात त्याचे लिटरसी आणि न्यूमरसी एवढ्यावरच भागवून नंतर टेक्निकल कोर्सेस किंवा पैसा मिळवून देणारे छोटे टेक्निकल कोर्सेस (जसे कार्पेट्री इलेक्ट्रिशियन वगैरे वगैरे) आले. पण या दोन व्हिडिओज नी मला खरं तर खूप खूपच अंतर्मुख केला की शिक्षणासाठी खरोखरच O लेव्हल, A level, ऑक्सफर्ड केंब्रिज सारख्या विद्यापीठांची गरज आहे का? आणि एवढ्या प्रचंड फिया घेऊन ही विद्यापीठ नक्की काय शिकवतात? थ्री इडियट मध्ये म्हटल्याप्रमाणे आपल्याला काबिल न बनवता केवळ सुशिक्षित  परीक्षार्थी बनवतात का?

मागे एकदा व्हाट्सअप वर एक छोटीशी गोष्ट वाचली होती

एक  मुलगा तळ्याकाठी एकटाच बसून व्हायोलिन वाजवत असतो, आपल्याच नादात अतिशय खुश असतो. तिथून एक अतिशय श्रीमंत माणूस चाललेला असतो. तो त्याला म्हणतो, अरे इथे बसून वेळ वाया काय घालवत आहेस? शाळेत जाऊन बस. शिक, मोठा हो. मुलगा म्हणतो, शिकून काय करू?” शिकून तुला चांगली नोकरी मिळेल, धंदा करशील, पैसे मिळवशील.” मुलाचा पुढचा प्रश्न, पैसे मिळवून काय करू?” चांगलं घर बांधशील, तुला चांगली बायको मिळेल, चांगली गाडी मिळेल आणि तुला हवी तशी चैन करू शकशील म्हणजे काय करू शकेन?” तुला पाहिजे त्या हॉटेलात जाशील, पाहिजे त्या हॉलिडेजवर जाऊ शकशील आणि तू सुखी होशील आणि सुखी झाल्यावर काय  करू?” “मग तू तुझ्या आवडीनिवडी जोपास, जसं की व्हायोलिन वाजवणं.” ते तर मी आत्ता पण वाजवतोय.” असं म्हणून तो मुलगा त्या माणसाला निरुत्तर करतो. या गोष्टीतील गमतीचा आणि बोध घ्यायचा भाग सोडून दिला आणि फक्त शिक्षणाकडे लक्ष दिलं तर असं लक्षात येतं की लहान मुलांनी शाळेत जावं, शिकावं आणि मोठं व्हावं या विचारांचा आपल्यावर ऐवढा पगडा आहे, की आपण त्या चाकोरीबाहेर विचार करण्याची कुवतच घालवून बसलोय.

 माझ्या एका मित्राचा मुलगा पोहण्यात एवढा तरबेज झाला, की नॅशनल लेव्हलला पोचू शकला असता. पण बारावीनंतर शिक्षण चालू ठेवायचे की पोहण्यावर लक्ष केंद्रित करायचे या विचारांनी आई-वडिलांची झोप उडाली होती. कदाचित असाच प्रकार सचिन तेंडुलकरच्या घरीही घडला असेल!!

 सरते शेवटी त्या गोष्टीतील मुलाच्या विचारांप्रमाणे शिक्षण घ्यायचे ते कशासाठी मोठे होऊन पैसे मिळवण्यासाठी आणि पैसे मिळवून मिळणाऱ्या सुखासाठी?

सध्याच्या सोशल मीडियाच्या काळात सर्व प्रकारचे ज्ञान आपल्या हातातल्या मोबाईलवर, चक्क फुकट उपलब्ध आहे, आणि हेच शिक्षण जर शाळांशिवाय, तुमच्या आवडीच्या विषयात, पाहिजे त्या वयात, मिळत असेल तर पूर्वांपार शिक्षण पद्धती, काळाप्रमाणे बदलायला हवी का?

मी डॉक्टर असल्यामुळे फक्त मेडिसिन बद्दल बोलतो. माझ्या लहानपणच्या काळात आमचे फॅमिली डॉक्टर आम्हाला पॅरासिटॅमॉलचे प्रेस्क्रीप्शन द्यायचे. सध्याच्या काळात पॅरासिटॅमॉलचा उपयोग एखादा लहान मुलगाही सांगू शकतो, त्याचप्रमाणे हे ब्लड प्रेशर घेणे, स्वतःची शुगर चेक करणे यासारख्या गोष्टी फक्त लॅबरोटरी जाऊनच करणं शक्य होतं त्या गोष्टी कोणीही आपल्या स्वतःच्या घरात सहज करू शकतो. जखमांचं ड्रेसिंग करण्यासारखं काम जे पूर्वी फक्त सर्जनच करायचे, ते काम कालपरत्वे  नर्सेस करू लागल्या आणि आता तर फिजिशियन असोसिएट सारख्या नवीन ग्रेड्स तयार होत आहेत की जे नर्सेसची कामे करू लागली आहेत. लहान मोठ्या आजारांसाठी फार्मासिस्ट प्रिस्क्रीप्शन स्वतः देऊ शकतात, त्यासाठी डॉक्टरची आवश्यकता नाही.  थोडक्यात सांगायचं तर डॉक्टरांची गरज ही फक्त मोठ्या आजारांपुरतीच मर्यादित राहिली आहे. त्यांच्या व्यवसायातील छोट्या मोठ्या गोष्टी करण्यासाठी युनिव्हर्सिटी क्वालिफिकेशनची गरज राहिली नाही आणि हीच गोष्ट इतर व्यवसायातही लागू पडत असावी. काळाप्रमाणे या व्यवसायात जसे बदल झाले तसेच शिक्षणपद्धतीतही  करावेत का?

करोनाच्या काळात सोशल मीडियाचा शिक्षणावरील प्रभाव आपण सर्वांनीच पाहिला आहे. दगड विटांनी बांधलेल्या शाळेत प्रत्यक्ष न जाता ऑनलाइन शिक्षण देणे आणि परीक्षा घेणे, या दोन्ही गोष्टी, घरबसल्या करणे शक्य झाले आहे. घरबसल्या घेतलेल्या शिक्षणामुळे मनोविकारांचे वाढलेले प्रमाण हा वादाचा मुद्दा होऊ शकतो परंतु प्रचलित शिक्षण पद्धतीत केवळ ऑनलाइन शाळा एवढाच बदल न करता, अमुलाग्र बदल करण्याची वेळ आली आहे आणि हा बदल सरकारी पातळीवर जरी झाला नाही, तरी खरेखुरे ज्ञानार्थी, ज्यांना आयुष्यात काबिल बनायचय, ते इंटरनेट युनिव्हर्सिटीचा फायदा घेऊन यशस्वी होतीलच.

त्यासाठी कोणाला Oxbridge मध्ये जाण्याची गरज नाही

 रवी दाते

संयोजक

श्रीकांत पट्टलवार, मीरा पट्टलवार, रवी दाते, मुकुल आचार्य, कुमार जावडेकर