Saturday, 8 March 2025

२.४ लेख - वय, शिक्षण आणि यश (रवी दाते)

वय, शिक्षण आणि यश

रवी दाते 

मागे मी 'यश - व्याख्या, प्राप्ती आणि मोजमाप' या लेखात माझे यशाच्या मोजमापाबद्दल  विचार लिहिले होते त्यात आज शिक्षणाच्या पैलूची थोडी भर पडली.

मनुष्य हा जन्म भराचा विद्यार्थी असतो किंवा शिक्षणासाठी वयाची अट नसते अशी अनेक वाक्य आपण ऐकत असतो, पण आज फावल्या वेळात इंटरनेटवर सर्फिंग करताना पैसा पाणी या यूट्यूब चैनल वर दोन व्हिडिओ पाहण्यात आले आणि या वाक्यांची प्रचिती आली. पहिल्या व्हिडिओवर पंधरा वर्षाचा मुलगा शेअर मार्केटचा दादा बनला आहे आणि दुसऱ्या व्हिडिओत एक आजीबाई त्यांना शोभेलशा वयात शेअर मार्केटमध्ये एक्सपर्ट बनल्या आहेत आणि स्वतःचे युट्युब व्हिडिओ बनवत आहेत. आयुष्याच्या या दोन टोकातील व्यक्तीची शिक्षणाची आवड खरोखरच वापरण्याजोगी आहे आणि नुसती आवडच नव्हे तर त्यासाठी त्यांनी घेतलेली मेहनतही. हे व्हिडिओ पाहिल्यावर  पूर्वानपार चालत आलेली “बिगरी ते मॅट्रिक (ते डिग्री) अशी  शिक्षणपद्धती किंवा गुरु बिना  ग्यान कहासे लावू इत्यादी विचार कालवाह्य होऊ लागलेत की काय अशी शंका मला येऊ लागली आहे.

अगदी फार पूर्वीच्या काळात गेलं जेव्हा कागद आणि लिहिण्याची कला अवगत नव्हती, खरंतर अस्तित्वात नव्हती, तेव्हा फक्त पाठांतर हा एकच ज्ञानप्राप्तीचा मार्ग होता. यानंतर शिक्षण पद्धतीत असंख्य बदल झाले. गुरुकुल आली, मग पुस्तक आली, युनिव्हर्सिटी झाल्या, डिग्री आल्या, इंग्रजांच्या देशात त्याचे लिटरसी आणि न्यूमरसी एवढ्यावरच भागवून नंतर टेक्निकल कोर्सेस किंवा पैसा मिळवून देणारे छोटे टेक्निकल कोर्सेस (जसे कार्पेट्री इलेक्ट्रिशियन वगैरे वगैरे) आले. पण या दोन व्हिडिओज नी मला खरं तर खूप खूपच अंतर्मुख केला की शिक्षणासाठी खरोखरच O लेव्हल, A level, ऑक्सफर्ड केंब्रिज सारख्या विद्यापीठांची गरज आहे का? आणि एवढ्या प्रचंड फिया घेऊन ही विद्यापीठ नक्की काय शिकवतात? थ्री इडियट मध्ये म्हटल्याप्रमाणे आपल्याला काबिल न बनवता केवळ सुशिक्षित  परीक्षार्थी बनवतात का?

मागे एकदा व्हाट्सअप वर एक छोटीशी गोष्ट वाचली होती

एक  मुलगा तळ्याकाठी एकटाच बसून व्हायोलिन वाजवत असतो, आपल्याच नादात अतिशय खुश असतो. तिथून एक अतिशय श्रीमंत माणूस चाललेला असतो. तो त्याला म्हणतो, अरे इथे बसून वेळ वाया काय घालवत आहेस? शाळेत जाऊन बस. शिक, मोठा हो. मुलगा म्हणतो, शिकून काय करू?” शिकून तुला चांगली नोकरी मिळेल, धंदा करशील, पैसे मिळवशील.” मुलाचा पुढचा प्रश्न, पैसे मिळवून काय करू?” चांगलं घर बांधशील, तुला चांगली बायको मिळेल, चांगली गाडी मिळेल आणि तुला हवी तशी चैन करू शकशील म्हणजे काय करू शकेन?” तुला पाहिजे त्या हॉटेलात जाशील, पाहिजे त्या हॉलिडेजवर जाऊ शकशील आणि तू सुखी होशील आणि सुखी झाल्यावर काय  करू?” “मग तू तुझ्या आवडीनिवडी जोपास, जसं की व्हायोलिन वाजवणं.” ते तर मी आत्ता पण वाजवतोय.” असं म्हणून तो मुलगा त्या माणसाला निरुत्तर करतो. या गोष्टीतील गमतीचा आणि बोध घ्यायचा भाग सोडून दिला आणि फक्त शिक्षणाकडे लक्ष दिलं तर असं लक्षात येतं की लहान मुलांनी शाळेत जावं, शिकावं आणि मोठं व्हावं या विचारांचा आपल्यावर ऐवढा पगडा आहे, की आपण त्या चाकोरीबाहेर विचार करण्याची कुवतच घालवून बसलोय.

 माझ्या एका मित्राचा मुलगा पोहण्यात एवढा तरबेज झाला, की नॅशनल लेव्हलला पोचू शकला असता. पण बारावीनंतर शिक्षण चालू ठेवायचे की पोहण्यावर लक्ष केंद्रित करायचे या विचारांनी आई-वडिलांची झोप उडाली होती. कदाचित असाच प्रकार सचिन तेंडुलकरच्या घरीही घडला असेल!!

 सरते शेवटी त्या गोष्टीतील मुलाच्या विचारांप्रमाणे शिक्षण घ्यायचे ते कशासाठी मोठे होऊन पैसे मिळवण्यासाठी आणि पैसे मिळवून मिळणाऱ्या सुखासाठी?

सध्याच्या सोशल मीडियाच्या काळात सर्व प्रकारचे ज्ञान आपल्या हातातल्या मोबाईलवर, चक्क फुकट उपलब्ध आहे, आणि हेच शिक्षण जर शाळांशिवाय, तुमच्या आवडीच्या विषयात, पाहिजे त्या वयात, मिळत असेल तर पूर्वांपार शिक्षण पद्धती, काळाप्रमाणे बदलायला हवी का?

मी डॉक्टर असल्यामुळे फक्त मेडिसिन बद्दल बोलतो. माझ्या लहानपणच्या काळात आमचे फॅमिली डॉक्टर आम्हाला पॅरासिटॅमॉलचे प्रेस्क्रीप्शन द्यायचे. सध्याच्या काळात पॅरासिटॅमॉलचा उपयोग एखादा लहान मुलगाही सांगू शकतो, त्याचप्रमाणे हे ब्लड प्रेशर घेणे, स्वतःची शुगर चेक करणे यासारख्या गोष्टी फक्त लॅबरोटरी जाऊनच करणं शक्य होतं त्या गोष्टी कोणीही आपल्या स्वतःच्या घरात सहज करू शकतो. जखमांचं ड्रेसिंग करण्यासारखं काम जे पूर्वी फक्त सर्जनच करायचे, ते काम कालपरत्वे  नर्सेस करू लागल्या आणि आता तर फिजिशियन असोसिएट सारख्या नवीन ग्रेड्स तयार होत आहेत की जे नर्सेसची कामे करू लागली आहेत. लहान मोठ्या आजारांसाठी फार्मासिस्ट प्रिस्क्रीप्शन स्वतः देऊ शकतात, त्यासाठी डॉक्टरची आवश्यकता नाही.  थोडक्यात सांगायचं तर डॉक्टरांची गरज ही फक्त मोठ्या आजारांपुरतीच मर्यादित राहिली आहे. त्यांच्या व्यवसायातील छोट्या मोठ्या गोष्टी करण्यासाठी युनिव्हर्सिटी क्वालिफिकेशनची गरज राहिली नाही आणि हीच गोष्ट इतर व्यवसायातही लागू पडत असावी. काळाप्रमाणे या व्यवसायात जसे बदल झाले तसेच शिक्षणपद्धतीतही  करावेत का?

करोनाच्या काळात सोशल मीडियाचा शिक्षणावरील प्रभाव आपण सर्वांनीच पाहिला आहे. दगड विटांनी बांधलेल्या शाळेत प्रत्यक्ष न जाता ऑनलाइन शिक्षण देणे आणि परीक्षा घेणे, या दोन्ही गोष्टी, घरबसल्या करणे शक्य झाले आहे. घरबसल्या घेतलेल्या शिक्षणामुळे मनोविकारांचे वाढलेले प्रमाण हा वादाचा मुद्दा होऊ शकतो परंतु प्रचलित शिक्षण पद्धतीत केवळ ऑनलाइन शाळा एवढाच बदल न करता, अमुलाग्र बदल करण्याची वेळ आली आहे आणि हा बदल सरकारी पातळीवर जरी झाला नाही, तरी खरेखुरे ज्ञानार्थी, ज्यांना आयुष्यात काबिल बनायचय, ते इंटरनेट युनिव्हर्सिटीचा फायदा घेऊन यशस्वी होतीलच.

त्यासाठी कोणाला Oxbridge मध्ये जाण्याची गरज नाही

 रवी दाते

6 comments:

  1. This comment has been removed by a blog administrator.

    ReplyDelete
  2. एक छान विचारप्रवर्तक लेख.
    मूळ प्रश्न असा आहे की अशा प्रकारे विचार करण्याची बुध्दी किवा फक्त ईच्छा निवृत्तीकडे जातानाच का होते?

    कला, संगीत, खेळ किंवा अगदी राजकारण आणि गुंडगिरी अशा विषयांचा ध्यास असणारे अजूनही गुरू शिष्य परंपरेतूच पुढे येतात. मॅकालेची योजना फक्त वेगवेगळ्या प्रकारचे कामगार तयार करण्यासाठीच बनवली होती. त्या दृष्टीने ती नक्कीच यशस्वी झाली म्हणता येईल.

    ReplyDelete
  3. खरंच विचार करायला लावणारा लेख !.औपचारिक(formal Education ) किंवा अनौपचारिक (Informal Education) अशा कुठल्याही शिक्षणातून चाकोरी च्या बाहेर जाऊन विचार करण्याची क्षमता मिळावी हे खरे .

    ReplyDelete
  4. आमूलाग्र बदल करण्याची गरज आहे हे खरंच आहे. आपण काळानुसार न बदलता कित्येकदा काळात अडकून पडतो असं वाटतं.

    ReplyDelete
  5. मुळात शिक्षणाकडे व जीवनांकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलायला हवा. नाहीतर हा प्रश्न सुटणार नाही. असे निदान मला तरी वाटतंय. विचाराला चालना देणारा लेख. धन्यवाद

    ReplyDelete

प्रतिसाद

संयोजक

श्रीकांत पट्टलवार, मीरा पट्टलवार, रवी दाते, मुकुल आचार्य, कुमार जावडेकर