Saturday, 8 March 2025

३.६ 'ग' ची बाधा (सदर) - ग़ज़ल आणि गजाली (शोध) - कुमार जावडेकर

 शोध

कुमार जावडेकर 


ही मी लिहिलेली पहिली ग़ज़ल. या आधी मी काही ग़ज़ल -सदृश कविता केल्या होत्या; पण नियमांत बसणारी ही पहिलीच. गंमत अशी की खरं तर तेव्हा मला काफिया - अंत्ययमक, रदीफ - यमक आणि अलामत - स्वरचिन्ह या गोष्टी माहिती नव्हत्या. पण ग़ज़लेचे नसले तरी वृत्त-बद्ध कवितेचे नियम माहिती होते. सुदैवानं ती ग़ज़लेच्या नियमात बसणारी ठरली!

मला पहिले तीन शेर एकाच वेळी सुचले होते. 'रुंदावण्यास येथे क्षितिजास वाव आहे' ही ओळ (मिसरा) जेव्हा सुचली तेव्हा असं वाटून गेलं की आपण कविता करू शकतो. 

डॉक्टर मनोज भाटवडेकर यांचा

'सोडले मी बेट आता,
माणसे जोडीत आलो' 

हा शेर /विषय अनेक वर्षं डोक्यात घोळत होता. त्याच विचारांना माझ्या शब्दांत लिहिलं.

ही ग़ज़ल लिहिली तेव्हा (सुमारे सन २०००) मी पुण्यात होतो. (त्याचा आणि वरच्या ओळींचा संबंध नाहीये; परिच्छेद बदलला आहे😀).

पुढचे शेर असेच अनेक महिने करत होतो, शेवटचा शेर (मक्ता - ज्यात माझं नाव - 'तखल्लुस' - आहे) तर अनेक वर्षांनी लिहिला. 

यानंतर सुमारे वीस वर्षांनी पंडित नरेंद्र कोथंबीकर यांनी माझ्याशी संपर्क केला आणि आपण ती गाऊ इच्छित असल्याचं सांगितलं. त्यांनी गायलेल्या त्या गझलेचा यूट्यूबचा दुवा वर दिला आहे. संगीत-रचना शिवहरी रानडे यांची आहे. 

शोधीत चाललो मी माझेच नाव आहे
नाही अनोळखी हा माझाच गाव आहे

कित्येक थांबले अन् हासून बोललेही!
सलगीत साधला हा त्यांनीच डाव आहे

पाहून गाव गेले ते पाहुणे म्हणाले -
'रुंदावण्यास येथे क्षितिजास वाव आहे'

स्वप्ने नकोत आता बेधुंद सागराची
होडीस कागदाच्या कोठे टिकाव आहे?

सांगू कसे मनाला नाहीच वाट येथे
स्वप्नात गुंतण्याचा त्याचा स्वभाव आहे!

वाटेत खाच-खळगे असतील! जाणतो मी...
ही वाट चालण्याचा माझा सराव आहे

संकेत मीलनाचे घेऊन रात्र आली...
(बेकार वावड्यांना भरपूर वाव आहे!)

जा, घे 'कुमार' हाती तू हात दुश्मनाचा
भेटावयास तोही घेतोच धाव आहे...

- कुमार जावडेकर 

मी ही गझल लिहीत असतानाच तिला एक वेगळी चाल लावली होती. तिचं नोटेशन (स्वर-रचना) खाली दिली आहे.  अर्थात, मला हे नम्रपणे नमूद करावंसं वाटतं की शिवहरी रानडे यांची चाल आणि पं. नरेंद्र कोथंबीकर यांचं गायन हे दोन्ही अतिशय प्रगल्भ आहेत. मी तुलना करण्यासाठी हे दिलं नाहीये तर फक्त ही गझल मला कशी सुचत गेली (चालीसकट) ते सांगण्यासाठी म्हटलंय. 



'पाहून गाव.. ' हा शेर 'कित्येक थांबले..' प्रमाणे तर बाकीचे शेर 'सांगू कसे' प्रमाणे.
- कुमार जावडेकर




7 comments:

  1. वा वा. प्रस्तावनेमुळे गजल वाचताना आणि ऐकताना वेगळीच मजा आली. आणि कोथंबीकरांनी ती खूपच सुंदर गायली आहे.

    ReplyDelete
  2. ही कुणाची पहिली गझल असेल यावर विश्वास बसणं अवघड आहे. अतिशय मार्मिक ! संगीतरचना आणि गायन पण उत्कृष्ट !

    (परिच्छेद बदलून) तुझी नोटेशन्स वाचण्यापेक्षा तुझी चाल ऐकायला आवडेल. रेकॉर्ड करून पोस्ट करावी, ही नम्र विनंती !

    ReplyDelete
  3. फारच छान गझल कुमार जी . लिंक श्रवणीय आहे,तुमच्या आवाजात ऐकायला आवडेल .

    ReplyDelete
  4. श्री. श्रीकांत pattalwar ह्यांचेकडून हा अंक आम्हास प्राप्त झाला. तो वाचताना आयुष्यात प्रथमच आपली गझल वाचून अपूर्व आनंदित झालो, माझ्या जन्म गावात खूप वर्षांनी गेल्यावर आलेला अनुभब काव्यात आला व लगेच चाल मनात आली ती गाऊन आपणास पाठविली आहे.
    आयुष्यात

    ReplyDelete
  5. असे अनुभव पुन्हा पुन्हा यावेत आपल्या गझलांमध्ये हीच शुभकामना.

    ReplyDelete
  6. संजय भगवंत कुळकर्णी, पुणे

    ReplyDelete
  7. sbkulkarni2751@gmail.com

    ReplyDelete

प्रतिसाद

संयोजक

श्रीकांत पट्टलवार, मीरा पट्टलवार, रवी दाते, मुकुल आचार्य, कुमार जावडेकर