कीर्तनाचा गजर होतं
मीरा पट्टलवार
२०२४ चा गणेशोत्सव नुकताच पार पडल्यामुळे सगळीकडे भक्तीमय आणि उत्साहाच वातावरण
तयार झालं होतं. त्यातच सुप्रसिद्ध कीर्तनकार हरि-भक्त परायण डॉ. चारुदत्त
आफळेबुवा नवरात्रात इंग्लंड दौऱ्यावर येणार हे कळल्यावर देशभर विठ्ठल नामाचा गजर सुरू झाला. इंग्लंड मधील मुक्कामात
बुवांच्या कीर्तनाचे जवळपास दहा कार्यक्रम झाले. आणि विशेष म्हणजे इंग्लंड सारख्या
देशात प्रत्येक कार्यक्रम हाउसफुल झाला होता. कॉव्हेंट्री आणि वॉरिंगटन या ठिकाणी
झालेल्या कीर्तनांना उपस्थित राहण्याची संधी मला मिळाली.
कॉव्हेंट्री मराठी मंडळातील कार्यकर्ते वारकऱ्यांच्या वेषात आले
होते. कीर्तनाला येणाऱ्या भाविकांचे टिळा लावून स्वागत करत होते. मंडळाच्या
भगिनींनी स्टेजवरील समयांना सुंदर वस्त्रे नेसवून आणि दागिन्यांनी सजवून साक्षात
विठ्ठल रखुमाईच श्रोत्यांसमोर उभे केले होते. सभागृहातील भिंतींवर लावलेली संतांची
आणि वारकऱ्यांची विविध रेखाचित्रे श्रोत्यांचे लक्ष वेधून घेत होते.
कॉव्हेंट्री येथील आराध्य भुजबळ (वय १२ वर्षे) यांनी
काढलेली रेखाचित्रे
यशस्वी
कीर्तनकार होण्यासाठी गायन, वादन, अभिनय, वक्तृत्व या कलांबरोबरच समाजशास्त्र,
मानसशास्त्र, संत साहित्य, अध्यात्म आणि इतिहास अशा विविध विषयात एकाच वेळी पारंगत
असावं लागतं. कीर्तन परंपरेचा आठ पिढ्यांचा वारसा असलेले हरिभक्त परायण आफळे बुवा
वरील कलागुणांचे मूर्तीमंत उदाहरण. मुनीवर नारद म्हणजे आद्य कीर्तनकार, आणि आफळे बुवा
म्हणजे साक्षात नारदाची गादी चालवणारे त्यांचे आजचे वारस. ते इंग्लंडमध्ये आले
म्हणजे आमच्यासाठी एक सुवर्ण योगच. वॉरिंगटनच्या हौशी गायकांनी एक स्वरचित नारद
गौरव गीत गाऊन आणि विठ्ठलाची 3D प्रिंटेड मूर्ती भेट देऊन आफळे बुवांच
बुवांच स्वागत केलं.
सुरुवातीलाच बुवांनी कीर्तनाचा आराखडा कसा असतो हे सांगितलं. ईश्वराच्या किर्तीचे गायन म्हणजे कीर्तन. साथीदारांसोबत कीर्तनाचा प्रारंभ नमनाने करून बुवांनी ईश्वराच्या जयजयकारात सर्व श्रोत्यांना सहभागी करून घेतलं. साथीदार कसले, हर्षल काटदारे आणि रामकृष्ण करंबेळकर आमच्यासाठी सूरदूत आणि तालदूतच बनून आले होते. कीर्तनाचा विषय होता ‘महाराष्ट्रातील संत आणि भगवंत’. पूर्वरंगात बुवांनी संतांची महती सांगून त्यांनी महाराष्ट्राला आपल्या अभंगातून बोधामृत कसं दिलं हे सांगितलं.
काय वानू आता
संतांचे उपकार | मज निरंतर जागविती ||
“दगड आणि
परीस” हे आख्यान थोडक्यात सांगून उत्तररंगात बुवांनी कीर्तनाचा सारांश सांगितला.
काया ही
पंढरी| आत्मा हा विठ्ठल| नांदतो केवळ पांडुरंग ||
देही-जनी-वनी सगळीकडे पांडुरंग आहे. त्याला शरण जाऊन सदाचाराने आणि नित्य साधनेने ध्येय साध्य करता येते हा एक संदेश त्यांनी श्रोत्यांना दिला.
साद घालितो मना मना
कीर्तनात रंग भरू पुन्हा पुन्हा
हाती चिपळ्या गळ्यात वीणा
नित्य स्मरशी तू नारायणा
तव भक्तांना मार्ग दाविण्या
अवतरशी तू क्षणाक्षणा ।१।
पायी खडावा मंगलदायी
त्रिभुवन करशी तू सुखदायी
चराचराला तारण्यास रे
मंत्र देशी तू जना जना ।२।
(रचना – श्रीकांत पट्टलवार)
- मीरा पट्टलवार
खूपच छान, अभिनंदन, अभिमान वाटतोय तुमचा
ReplyDeleteआपल्या मंडळाचे अभिनंदन. आपण सर्वं मंडळी परदेशात असूनही असे कार्यक्रम आयोजित करता हे नक्कीच अभिनंदनी य आहे. श्री आफळे यांचे कीर्तन नेहमी स्फूर्तीदायकच असते.
ReplyDelete@मीरा - लेख छानच. कार्यक्रमाचे उत्कृष्टरित्या वर्णन केले आहेस. तू सायंटिस्ट व लेखिका अशा व इतर भूमिका पण समर्थ पणे करते असे दिसून येते. अभिनंदन व आपल्या मंडळास शुभेच्छा - सुनील डहाळे, यवतमाळ, भारत.
🙏 Thanks Sunil, वेळ काढून लेख वाचला.
ReplyDeleteलेख आवडला. शीर्षक अगदी समर्पक आहे.
ReplyDelete