Saturday, 8 March 2025

२.१ आठवणी - माझी असामान्य बाल-मैत्रीण भारती वैशंपायन (डॉ. आनंद शिंत्रे )

माझी असामान्य बाल-मैत्रीण

(डॉ. आनंद शिंत्रे )


आपल्या आयुष्यात वेळोवेळी नवीन माणसे भेटतात काही कायमची लक्षात राहतात तर काही लगेचच विसरण्याजोगी असतात. आपले बाल सवंगडी अनेक वर्षानी अचानक भेटले तर होणारा आनंद हा निखळ आणि निर्व्याज असतो, त्यात प्रौढपणाच्या ईर्ष्या, असूया किंवा हेवे दावे यांना बिलकुल स्थान नसते. मग वयाच्या साठीत पन्नास वर्षांपूर्वीची आपली एखादी वर्गमैत्रीण अचानक भेटली तर आपले लहानपण पुन्हा उभे ठाकते! त्यातूनही माझ्या पिढीतल्या बहुतांश मुलींची नावे लग्नानंतर बदलल्याने लहानपणच्या वर्गातल्या मुली पुन्हा ओळखणे/ संपर्कात येणे जवळ जवळ अशक्यच! आताचे फेसबूक आणि व्हाटस-आप याचा जमाना नसताना केवळ कर्तृत्वाने मोठे असणाऱ्या मित्र मैत्रिणींचा थोडाफार छडा कुणाच्या बोलण्यावरून /वर्तमानपत्रामुळे लागायचा.गेली बत्तीस वर्षे इंग्लंडमध्ये राहिल्याने भारतातले मित्रमैत्रिणी  प्रत्यक्ष भेटण्यालाही प्रचंड मर्यादा पडल्या.

सुमारे पंचवीस वर्षापूर्वी माझ्या वडिलांनी पुण्याच्या वर्तमानपत्रातिल (फोटोसकट पूर्ण पानभर असणारे) एक कात्रण मला दिले. श्री बापू वाटवे यांनी एका गायिकेवर लिहिलेल्या त्या लेखाचे शीर्षक आता आठवत नाही पण गायिकेचे नाव होते - (डॉ) भारती वैशंपायन. फोटो पाहूनच लक्षात आले की ही व्यक्ति माझ्या लहानपणी सांगलीमध्ये पाचवी ते आठवी अखेर (१९६३ ते १९६६)आमच्या वर्गातली -भारती ताम्हनकर! जयपुर-अत्रौली घराण्याची नामवंत गायिका आणि ती कोल्हापुरातल्या शिवाजी विद्यापीठात संगीत-नृत्य विभाग प्रमुख. तिचा संगीत प्रवास आणि तीनही मुलांची नावेही त्या लेखात कळली. मी मोठ्या उत्साहाने माझ्या संगीतप्रेमी पत्नीला (अंजनीला) ते कात्रण दाखवले. पण पुढील दहा वर्षे या बाल-मैत्रिणीशी संपर्क करणे राहून गेले आणि अचानक २०११ साली अंजनीने लंडनच्या कलाप्रेमी आठल्ये कुटुंबाशी फोनवर बोलताना त्यांच्याकडे आलेल्या पाहुणीचे नाव ऐकल्यावर ताबडतोब ओळखले आणि आम्ही तब्बल ४५ वर्षानंतर, म्हणजे आमच्या दोघांच्या ५७ व्या वर्षी बोललो आणि लवकरच प्रत्यक्ष भेटलो.

“कोण ह्या भारती वैशंपायन” याबद्दल जिज्ञासू वाचकांनी जरूर विकिपीडिया , गूगल आणि यूट्यूब यांची मदत घ्यावी. या ठिकाणी तिच्याबद्दल माहिती आणि अनेक ध्वनि / चित्र-फिती उपलब्ध आहेत. इथे पुनरुक्ति टाळून मी इतर अप्रकाशित गोष्टींवर लिहीत आहे.

तिची संगीतसाधना १२ व्या वर्षापासून चिन्तुबुवा म्हसकर यांचेजवळ सुरू झाली. सांगलीतल्याच दोन मुलीनी १९७१ साली पुण्याच्या बालगंधर्व नाट्यसंगीत स्पर्धेत पहिली दोन पारितोषिके पटकावली. प्रथम पारितोषिक विजेती - आशा पाटणकर (आताच्या आशा खाडीलकर) तर द्वितीय पारितोषिक मिळाले भारती ताम्हनकर (वैशंपायन)- स्पर्धेचे परीक्षक होते साक्षात पंडित भीमसेन जोशीपं.वसंतराव देशपांडे आणि पु ल देशपांडे! या दोघीनीही पुढे संगीतक्षेत्रात आपली कारकीर्द गाजवली . म्हणूनच प्रत्यक्ष पुलंबरोबरचा हा फोटो आणि भारतीचा परीक्षक मंडळींसमोर गातानाचा फोटो मला आवडतो.


१९७२ मध्ये ऑल इंडिया रेडियो वर ती प्रथम गायली. पुढे १९७६ मध्ये भारत सरकारची संगीत शिष्यवृत्ती मिळाली आणि अत्रौली–जयपूर घराण्यामधील  नामवंत पं सुधाकर डिग्रजकर, निवृत्तीबुवा सरनाईक यांचेकडून तालीम मिळाली. SNDT विद्यापीठाने तिला “गान-हीरा” म्हणून गौरविले तर गांधर्व महाविद्यालयाने “संगीत प्रवीण” (डॉक्टरेट) उपाधी दिली होती. आकाशवाणीची ती टॉप ए-ग्रेड आर्टिस्ट होती आणि अनेक वेळा मंगळवारची राष्ट्रीय संगीत सभा किंवा रविवार रात्रीचा शास्त्रीय संगीताचा नॅशनल प्रोग्राम तिने दिला. गायकी घराण्यांच्या चौकटीत न अडकता तिने ठुमरी, दादरा, कजरी, टप्पा या प्रकारातही प्राविण्य मिळवले. शास्त्रीय आणि उपशास्त्रीय / सुगम या दोन्ही प्रकारात ती सहजतेने वावरली.या उपशास्त्रीय संगीताचे तिचे गुरु श्री बाबुराव जोशी, तर नामवंत गायक पद्मविभूषण पं मल्लिकार्जुन मन्सूर यांचेकडून काही अप्रचलित रागही शिकली.पं यशवंतबुवा जोशी आणि पं पंचाक्षरी मंतीगट्टी यांचेकडूनही मार्गदर्शन लाभले होते. प्रख्यात गायिका गंगुबाई हनगल यांचा तिच्या वर लोभ होता आणि त्यांचे प्रोत्साहनही तिला मिळाले. पुढे जवळ जवळ पंचवीस वर्षे कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाचा संगीत आणि नृत्य नाट्य विभाग प्रमुख म्हणून तिने शून्यातून उभा केला. इतर अनेक (धारवाड,गोवा,पुणेमराठवाडावडोदराकुरूक्षेत्र..) भारतीय विद्यापीठानी तिच्या सखोल संगीत व्यासंगाचा लाभ घेतला.    

लग्नानंतर पुण्या-मुंबईच्या अनेक उपलब्धींपासून दूर राहूनही स्वतःचा रियाज , संगीत व्यासंग वाढवणे,संसाराच्यावाढत्या कुटुंबाच्या जबाबदाऱ्या पेलणे ही केवढी अवघड गोष्ट आहे. तरीही अखिल भारतीय दर्जा गाठणारी , अनेक पुरस्कारांनी सन्मानितविविध संगीत महोत्सवात नावाजलेलीअनेक विद्यापीठामध्ये संगीत विचार आणि अभ्यास या विषयांवर कार्यशाळा घेणारी आमची ही वर्ग-मैत्रीण हा माझ्या सर्व वर्ग-मित्रांचा आणि मैत्रिणीचा अभिमानाचा विषय आहे.पण तिच्या चालण्या-बोलण्यात तिच्या कर्तृत्वा बद्दल अहंकाराचा तिळभरही लवलेश नव्हता किंवा पुण्या-मुंबईहून दूर राहिल्याने प्रसिद्धीची संधि न मिळाल्याची खंत नव्हती. कुणी संगीतशास्त्राचा कसलाही प्रश्न विचारला तर त्याचे सविस्तर आणि प्रात्यक्षिकासह उत्तर मिळणारच.

हे मी इंग्लंडमधल्या अनेक मैफिलीनंतरच्या श्रोत्यांशी तिने केलेल्या संवादात पाहिले आहे. ती आधी हाडाची संगीत शिक्षिका  आणि मग मैफिलीची गायिका होती. एखादा राग वेगवेगळे गायक किंवा घराण्यानुसार कसा सादर होईल याचे विवेचन आणि त्यातील कौशल्याचे वर्णन यातून तिची खोल विचार पद्धती आणि अभ्यास याचे दर्शन होई. विविध भारतीच्या संगीत सरिता कार्यक्रमातही तिने अनेक रागातले साम्य  आणि नाजुक फरक सुंदर उलगडून दाखवले आहेत.पं. कुमार गंधर्व स्मृति संमेलन (२०१३), सवाई गंधर्व महोत्सव (२०१५) या आणखी काही स्मरणीय अदाकारी.

भारतीचे २०११ ते २०२० या काळात इंग्लंड मध्ये ३-४ वेळा तिच्या मुलीकडे येणे झाले, तिच्या ५-६ (इंग्लंडमधल्या) मैफिलींपैकी पहिला कार्यक्रम २०११ साली मी आणि माझ्या पत्नीने पुढाकार घेऊन Ruislip (रॉयसलिप) या लंडनच्या उपनगरात एक हॉल भाड्याने घेऊन केला होता. धारदार , कमावलेला आणि सहजतेने तीनही सप्तकात विरणारा तिचा आवाज आमच्या सर्व श्रोत्यांना  आवडला. तिच्या साथीला तबल्यावर तिचा मुलगा (केदार) आणि तंबोऱ्यांवर मुलगी (मीरा) होते. तिचा मुलगा, जुळ्या मुली मीरा –मधुरा आणि सून (शीतल) हे चौघेही तिचे विद्यार्थी संगीतात MA झालेले आहेत.

नाट्यसंगीतावर ही तिचे प्रभूत्व असल्याने श्रोत्यांच्या फर्माईशीनंतर, आम्ही आयोजित केलेल्या या कार्यक्रमाशेवटी तिने आपल्या भावना “क्षण आला भाग्याचा” ही ज्योत्स्ना भोळे यांचे समयोचित नाट्यगीत गाऊन व्यक्त केल्या. त्या नंतर आणखीही दोन ठिकाणी तिचे कार्यक्रम झाले आणि श्रोत्याना तिच्या जवळच्या संगीत खंजिन्यांची कल्पना आली.

लंडन मधील अनेक जिज्ञासू आणि संगीत शिक्षण देणाऱ्या अनेक स्त्री-पुरूषांनी कार्यक्रमांनंतर पुनः भेटून तिच्याकडून शिकण्याची संधी घेतली. स्वतःचे कष्टपूर्वक जमवलेले हे  संगीतधन अशा जिज्ञासूंवर तिने हातचे न राखता मुक्तहस्ते उधळले.

त्या वर्षीच्या राखी पौर्णिमेला तिच्या मुलीच्या घरी तिने मला ओवाळून राखी बांधली त्यामुळे तर आमचे दोघांचे बहीण-भावाचे नाते झाले. तिच्या मुलांचा मामा आणि लंडन मधल्या नातवंडांचा मी आजोबा झालो आहे. सप्टेंबर् २०२० मध्ये लंडन मधल्या बैठकीच्या आधी एक दिवस आमच्या घरी विश्रांती घेण्यासाठी राहून गेली त्या कार्यक्रमातच गाताना तिला क्षणभर अंधारी आली होती .पण कुणालाच पुढे येवू घातलेल्या संकटाची कल्पना आली नाही. तिचा भारतात गेल्यावर लगेचच १४ सप्टेंबरला बंगलोरला “वीणा सहस्त्रबुद्धे फाऊंडेशन” मधील गाण्याची बैठक आणि (तिचा) सत्कार सोहळा यांची आम्हाला कल्पना देवून आमचा निरोप घेऊन  ती भारतात गेली. पण दुर्दैवाने त्या कार्यक्रमानंतर नंतर झपाट्याने मेंदूतील रक्तस्त्रावाने तिची तब्येत खालावून ती कोमात गेली. सर्व उपचार थकले आणि १९ जानेवारी २०२० ला कुटुंबाला आणि प्रियजनांना सोडून तिच्या अनंताच्या प्रवासाला निघून गेली- वयाच्या केवळ ६६ व्या वर्षी! 

शिवाजी विद्यापीठातल्या विभागाची केलेली शून्यातून उभारणी आणि कोल्हापूर रसिकांना आणि विद्यार्थ्यांना ख्यातनाम/ दिग्गज कलावंतांचा परिचय तिनेच घडवून आणलेल्या शाहू संगीत महोत्सव याचे आयोजन ही तिची खरोखर तिला मिळालेल्या कोल्हापूर-भूषण पुरस्कारपालिकडे पोचणारी कामगिरी आहे. तिचे विद्यार्थ्यांवर अपत्यवत् प्रेम करण्याचे आणि त्याना अडीअडचणीला मदत करण्याचे किस्से परिचितांकडून ऐकले आहेत. कोल्हापुरातल्या घरी अनेक विद्यार्थी (विनामूल्य) राहून आणि संगीत साधना करून गेले आहेत. कार्यक्रमात आयोजकांच्या अनेक चुका, बिदागीचे पैसे उशिरा अगर पूर्णतः न मिळणे, कार्यक्रमानंतर जेवणाची योग्य व्यवस्था नसल्याने कधी उपाशी झोपणे अशा गोष्टींची  तिच्या तोंडून कधी वाच्यता ऐकली नाही. याउलट शाहू रजनी कार्यक्रमासाठी आलेल्या उस्तादअल्लारखाँ, झाकीर हुसेन आणि विलायतखॉं यांना त्यांचे विमान चुकल्यावर तिच्या घरी साबूदाणा खिचडी खायला घालून टॅक्सीने मुंबईला रवाना केल्याची आठवण तिच्या तोंडून ऐकली आहे. तिच्या “नीलांबरी”या कोल्हापुरातल्या घरी तिचे भारतीय संगीतातल्या सर्वच दिग्गजांबरोबरचे फोटो पाहिले आहेत. मी पाहिलेल्या यशस्वी/ कीर्तिमान लोकांमध्ये भारतीचे व्यक्तिमत्व एक सोज्वळविद्वान पण विनयशीलपट्टीची गायिकाअंतर्बाह्य संगीत-शिक्षक म्हणून ठसा उमटवून गेले आहे.

तिच्या अनेक मोठ्या कार्यक्रमात हार्मोनियमवरची साथ करणारे पद्मश्री तुळशीदास बोरकर तिच्या श्रोत्यांच्या अचूक अंदाजाबद्दल म्हणतात “ भारती बाईना काय गावे , किती गावे आणि कुठे थांबावे हे बरोब्बर कळते म्हणूनच त्या मोठ्या गायक आहेत ”

आता हे बोरकर गुरुजीही नाहीत आणि माझी सात्विक,असामान्य बाल-मैत्रीणही नाही पण तिचे संगीत मात्र टिकून राहणार आहे!

कुरूक्षेत्र विद्यापीठातल्या संगीताच्या प्राध्यापिका शकुंतलाजी भारतीबद्दल लिहितात:

चेहरेकी सादगी, गानेकी अदाकारी, स्वरोंकी कशिश, बयाण नही कर सकति II

रागोमे परिपक्वता, स्वरोमे सजगता, तुम्हारे गानेमे झलकती II

हे संगीतकी तपस्विनीतुम्हारे गानेकी जादुगिरी, भुलाये भूल नही सकती II

डॉ. आनंद शिंत्रे

Sangeet sarita Ek Raag Do madhyam 2021

Raag Bageshri –Shahu mahotsav 1997

Raag Kambavati  -Yaad piyaaki aaye

***

7 comments:

  1. छान ओळख 🙏

    ReplyDelete
  2. फारच छान लेख ! वाचतांना गहिवरून आले . भारती ताईंचा स्वभाव अगदी मृदू आणि मोकळा . एवढी मोठी गायिका पण त्यांच्याशी बोलतांना असं कधी जाणवलं नाही . त्या लंडन ला (मुलीकडे ) असतांना शुभदाने केलेल्या हौशी गायक/वादकांच्या मैफिल ग्रुप मध्ये त्यांच्याशी गप्पा मारण्याचा योग आला . अशा हौशी मंडळींना पण त्या दिलखुलास दाद देत . तुळशीदास बोरकर यांची साथ असलेले त्यांचे गायन पुन्हा पुन्हा ऐकावे वाटते ,भारती ताईंच्या आठवणी आणि अनुभव या लेखातून वाचायला मिळाले त्याबद्दल धन्यवाद

    ReplyDelete
  3. आपण लिहिलेल्या भारतीताईंच्या आठवणी खूपच प्रेरणादायी आहेत. ईंग्लंड भेटीत त्यांचे दोन कार्यक्रम ऐकायला मिळाले होते. त्याची पुन्हा आठवण झाली.

    ReplyDelete
  4. कुमार जावडेकर18 March 2025 at 07:38

    सुरेख लेख. पुलंनी ज्योत्स्ना भोळ्यांवर लिहिलेल्या लेखाची आठवण झाली.

    ReplyDelete
  5. आपली वर्गमैत्रिण,नंतरची मानलेली बहीण हे भावबंध खूप सुंदर आहेत.खूप सुरेख शब्दचित्र.

    ReplyDelete
  6. आपल्या सर्वांच्या आवडत्या भारतीचे, आपल्या बालमत्रिणीचे इतकं समर्पक वर्णन केलं आहेस की तो सगळा काळ आणि तिची यशस्वी कारकीर्द डोळ्यापुढे उभी राहिली.

    ReplyDelete
  7. Aditi Hiranwar8 July 2025 at 09:43

    अतिशय सुंदर लेख. माझं आजोळ सांगलीचे अणि आजोबा व्हायोलिन वादक त्यामुळे सांगलीच्या संगीत विश्वाशी आईचा जिव्हाळ्याचा संबंध. भारती ताई बद्दल बरेच ऐकून होते पण त्यांच्या कर्तुत्ववान जीवनाचा हा विस्तार पूर्ण लेख बरीच जास्त माहिती देऊन गेला

    ReplyDelete

प्रतिसाद

संयोजक

श्रीकांत पट्टलवार, मीरा पट्टलवार, रवी दाते, मुकुल आचार्य, कुमार जावडेकर