नृत्यनिपुण डॉ. स्वाती राऊत
मीरा पट्टलवार
नृत्यनिपुण डॉ. स्वाती राऊत यांच्या बरोबर गप्पा.
मी स्वातीला पहिलाच प्रश्न विचाराला की तुझ्या नृत्यात इतकी
शक्ती आहे की श्रोते त्यांत क्षणार्धात मंत्रमुग्ध
होतात, याच कारण काय? स्वाती म्हणाली - आमची भरतनाट्यम शिकण्याची सुरवातच होते एका श्र्लोकाने-
यथो हस्त: तथो दृष्टी । यथो दृष्टी तथो मन:।
यथो मन:तथो भाव:। यथो भाव:तथो रस:।
मुद्रा करताना जिथे हातजातात तिथे दृष्टी पोचते, जिथे दृष्टी पोचते तिथे मन वळतं आणि जिथे मन रमत तिथे रस निर्माण होतो. प्रसिद्ध नृत्य-गुरु बालसरस्वती म्हणायच्या: भरतनाट्यम सादरीकरणाचा परमोच्च बिंदू म्हणजे संगीताचे दृश्य चित्रण (Visual depiction of music)! जेव्हा संगीत आणि काव्य सर्वांगातून प्रकट होतं तेव्हा भरतनाट्यम् यशस्वीपणे सादर झालं असं आपण म्हणू. त्यावेळी कलाकार आणि श्रोते दोघेही एकाच पातळीवर पोचतात.
नृत्याची आवड स्वातीला उपजतच होती. इतकी की ६-७ वर्षाची असल्यापासूनच
शाळेतील नृत्याचा क्लास तासंतास खिडकीबाहेर उभ राहून पाहायची. आणि मग स्वतःहूनच वडिलांच्या मागे लागून नृत्याचा क्लास सुरु केला. मुंबईच्या नृत्यश्री
संस्थेमध्ये स्वाती, गुरु कृष्णन कुट्टी यांच्याकडे भरतनाट्यम
आणि श्रीमती अम्मू कुट्टी यांच्याकडे मोहिनीअट्टम
शिकली.
१९७९ मध्ये विले-पार्ले, मुंबईच्या दीनानाथ मंगेशकर, सभागृहात स्वातीने अरंगेत्रम सादर केलं झालं. १९८० पासून साने गुरुजी विद्यालयात तिने भरतनाट्यम शिकवायला सुरुवात केली. नृत्यश्री तर्फे होणाऱ्या नृत्य-नाट्य निर्मितीमध्ये स्वातीने मोठी कामगिरी केली आहे. स्वाती सांगत होती- या कार्यक्रमांची गंमत म्हणजे स्टेजवर सेलोफोन चे कागद लावणे, प्रॉप्स पेंट करणे ही सगळी कामं आम्हीच करायचो. यात एक वेगळाच आनंद असायचा. आमचे बहुतेक वेळा कार्यक्रम रात्री असायचे. 'नादब्रह्म' हा कार्यक्रम औरंगाबादला होता यात भीमसेन जोशी, परवीन सुलताना असे दिग्गज कलाकार होते आणि नंतर रात्री उशिरा माझी टर्न होते. अशावेळी आई मला म्हणायची तू मेकअप आणि कॉस्च्युम करून पूर्ण तयार रहा आणि तुझा नंबर आल्यावर मी तुला उठवीन.
त्यावेळी नृत्याची तालीम प्रत्यक्ष साथीदारांसोबत
व्हायची. आपण गाऊ शकलो नाही तरी तुम्हाला काय आणि कसं हवं हे
साथीदारांना सांगता आलं पाहिजे. तसंच इतरांच्या नृत्यांचे सखोल निरीक्षण करणे, तटकळी
वाजवून त्यांना साथ करणे हा सुद्धा तालमीचाच एक भाग असायचा.
अच्छा, म्हणजे त्यामुळे शिक्षण अगदी सहज तर होतंच पण सोबत एक टीम स्पिरीटही आपोआप तयार होतं. अगदी
बरोबर! स्वाती म्हणाली.
मग आम्ही भरतनाट्यम् बद्दल विस्ताराने बोललो. शास्त्रीय गायनाप्रमाणे भरतनाट्यम् मध्ये पण वेगवेगळ्या शैली किंवा घराणी असतात. त्यांना आंम्ही 'बाणी' म्हणतो. मी सुरवातीला पंडनल्लूर बाणी शिकले.
पुढे आचार्य प्रोफेसर C.V. चंद्रशेखर यांच्याकडे कलाक्षेत्र बाणी शिकले. पंडनल्लूर बाणी ह्या पद्धतीत
काव्य प्रधान सादरीकरण असतं. मी अजूनही पंडनल्लूर पद्धत सादर करते. यात सुरुवातीला तुम्ही साधे काव्य शिकता, नंतर त्याचा अर्थ, मग त्या काव्याचा संदर्भ. संदर्भ म्हणजे
काव्याशी किंवा कथानकाशी जुळलेलं एखादं स्थळ किंवा साहित्य या बद्दल
शिकता, वेगवेगळ्या स्वभावाच्या नायिका शिकता, उदा: अभिसारिका, विरोधकंठिता. तुम्ही भक्ती-अभिव्यक्ती (devotional expression) आणि मानवी-अभिव्यक्ती
(human expression) शिकता. शास्त्रीय गायन/वादनात
जसं गमक असतं म्हणजे स्वराचं आकर्षक वळण असतं त्याचप्रमाणे नृत्यात सुद्धा
वेगवेगळ्या मुद्रा करताना अ पासून ब पर्यंत हात कसा गेला पाहिजे? तुमचे हावभाव कसे
असले पाहिजेत हे तुम्ही शिकता. आणि अर्थात याकरता आपल्याला बरीच साधना करावी लागते.
मी स्वातीला विचारलं तुम्ही हे नृत्य-नाट्य प्रोडक्शन्स कसं
करता? नृत्य नाट्याची निर्मिती करताना आम्ही त्यातील कथानकाचा खोलात जाऊन अभ्यास करतो. या
कथानकाशी संबंधित स्थळ, काळ, त्यातल्या नायिका
कोण आहेत, त्यांचा स्वभाव कसा आहे, या
संबंधित साहित्य वाचतो, त्या स्थळांना प्रत्यक्ष भेट देतो .
मी ‘मायबोली’ करताना सरस्वती -महाल लायब्ररीला भेट दिली. तंजावरची आणि चोल मंदिरं पाहिली. या मागचा इतिहास जाणून घेतांना लक्षात आलं की जेव्हा आपले मराठा राज्यकर्ते तंजावर मध्ये होते तेव्हा तो एक बहुभाषिक काळ (मल्टी लिंग्वेअल पीरियड) होता. प्रजा आणि राजा यांच्या भाषा तेलुगु आणि मराठी, पण ही तंजावरी मराठी होती. ही वेगळी असते. हे काम करत असताना प्रसिद्ध मार्गदर्शक (mentor) प्रोफेसर हरिकृष्णन् यांनी मला तंजावरी लावणी शिकवली होती. ही लावणी म्हणजे त्या पूर्ण प्रदेशाच सौंदर्य कसं आहे, चोळ देश किती सुंदर आहे यावर ती आधारित होती. शहाजीराजे-दोन यांच्या कालखंडात भरतनाट्यमचा सुवर्णकाळ होता.
मी स्वातीला म्हंटल की भरतनाट्यम्चा कुठलाही प्रकार पाहताना त्यात सात्विक अंग आहे असं मला वाटत यावर तू काय सांगशील? स्वाती म्हणाली कुठलाही
शास्त्रीय प्रकार हा सात्विकच असतो. ज्यावेळी कलाकार परमेश्वराला किंवा कलेला
पुर्णपणे शरण जातो त्यावेळी नृत्यातून सात्विक भाव आपोआपच दिसू लागतो. नृत्य करतांना तुमचा उद्देश फक्त मनोरंजन हा असेल तर त्यातून उथळपणा
दिसेल, सात्विक भाव कधीच दिसणार नाही.
इंग्लंडला आल्यावर स्वातीने सेंट-अँड्र्यूज युनिव्हर्सिटी मध्ये ऑरगॅनिक केमिस्ट्री या विषयात पीएचडी केली. पण तिचं मन मात्र नृत्यातच होतं. 'मिलाप फेस्ट आर्ट स्कूल - लिव्हरपूल' या संस्थेत तिने भारतनाटयम शिकवायला सुरुवात केली. या दरम्यान दिग्गज डान्स आर्टिस्ट प्रोफेसर C.V. चंद्रशेखर यांच्याशी तिची ओळख झाली. त्यांना वेगवेगळ्या नृत्य निर्मिती मध्ये स्वाती मदत करायची. ‘मंडीअडाऊ’ हा प्रकार सादर करण्यात तिला नेहमीच त्यांच्याकडून कौतुकाची थाप मिळायची. त्यांच्याकडून स्वातीला खूप शिकायला मिळालं.
वेगवेगळ्या गृप्समधून नृत्य शिकवता शिकवता स्वातीने ठरवलं की या शिक्षणाकरता एक औपचारिक पद्धती असावी, पद्धतशीर दृष्टिकोन असावा आणि त्यातूनच स्वाती डान्स कंपनी ची निर्मिती झाली. या कामात तिला अनिता श्रीवास्तव यांचे सहकार्य आहे. कंपनीला आर्ट्स कौन्सिल ऑफ इंग्लंडचे आर्थिक सहकार्य आहे. गेली दोन दशकं ‘स्वाती डान्स कंपनी’ यशस्वीरित्या सुरू आहे. भरतनाट्यम या भारतीय शास्त्रीय नृत्य प्रकाराची उच्च प्रतीची निर्मिती आणि प्रसार करणे हा या कंपनी चा उद्देश आहे. आज स्वाती एक प्रस्थापित भरतनाट्यम कलाकार आहे. नृत्य दिग्दर्शिका आहे. मिलाप फेस्ट आर्ट स्कूल लिव्हरपूल इथली ती मुख्य शिक्षिका आहे. स्वातीच्या मार्गदर्शनाखाली आजवर १५० हून अधिक विद्यार्थ्यांनी आपले अरंगेत्रम पूर्ण केले आहे.
एक परफॉर्मिंग आर्टिस्ट म्हणून स्वातीने बऱ्याच नृत्य-नाट्यांची निर्मिती केली आहे. मायबोली, शिवोsहम, बसंत-बेल्स, अंबा-शिखंडीवर आधारित S/HE, देवी दिवा, 'Half of Me, अशी अनेक नावं आहेत. इंग्लड मधील नेहरू सेंटर-लंडन, सल्फोर्ड कीज लावरी-मॅंचेस्टर, युनिटी थिएटर-लिव्हरपूल, हेरॉन थिएटर-कम्ब्रिया अशा विविध प्रतिष्ठित ठिकाणी स्वातीला नृत्याकरिता नियमित आमंत्रित केलं जातं.
सामाजिक योगदान
स्वाती डान्स कंपनीतर्फे शाळांमध्ये कार्यशाळा (workshops) घेतल्या जातात. ज्या विद्यार्थ्यांना रंगमंचावर सादर करण्याची संधी मिळाली नाही अशा
विद्यार्थ्यांना या वर्कशॉप्स द्वारे संधी मिळते. काही वर्कशॉप्स हे Well-being स्वस्थ आरोग्य यासाठी सुद्धा असतात. एक वर्कशॉप विशेष गरजा असलेली मुले
(special needs children) यांच्याकरता घेतला होता. आणखीन एक विशेष
सांगण्यासारखा वर्कशॉप म्हणजे डिमेन्शिया पेशंट करिता. हा
खूपच वेगळा अनुभव होता आणि हा खूप आनंद देऊन गेला. म्हणजे
डिमेन्शिया पेशंट्स थोड्या वेळ का होईना जेव्हा आपण त्यांच्याबरोबर असतो आणि
त्यांच्याबरोबर हे हावभाव आणि मुद्रा करतो तेवढ्या वेळ ते सुद्धा संपूर्णपणे
स्वतःला विसरून आपलं नृत्य बघतात हा आनंद काही वेगळाच आहे. एवढे सामाजिक योगदान
असणाऱ्या व्यक्तीची नोंद विविध सामाजिक संस्था नक्कीच घेतात.
स्वातीला तिच्या या सामाजिक कार्याकरिता बरेच पुरस्कार मिळाले आहेत. अगदी लहान असताना ‘युवकभारती’चा
पुरस्कार, ’आचार्य रत्न’ पुरस्कार जो
डान्स टीचरला दिल्या जातो त्यानंतर ‘वन डान्स युके’ चा ‘पीपल्स चॉईस’ पुरस्कार
त्यानंतर 100 Inspirational women मध्येही स्वातीचं नाव
समाविष्ट करण्यात आलं आहे.
मुलाखतीच्या शेवटी मी स्वातीला म्हटलं तुझं नृत्य शिक्षिका म्हणून कार्य पण फारच मोलाचं आहे. असं म्हणतात प्रत्येक यशस्वी व्यक्तीच्या मागे त्याचं कुटुंब असतं याबद्दल तू काय सांगशील? स्वाती म्हणाली मला माझ्या कुटुंबाचा म्हणजे माझे पती आणि माझ्या सासूबाई यांचे सहकार्य खूप मिळालं कारण घरातल्या कामाव्यतिरिक्त तुम्हाला जर दुसरं काही करायचं असेल तर घर या एका गोष्टीसाठी तुम्हाला फार संघर्ष नसला म्हणजे ओढाताण नसली तरच तुम्ही घराबाहेर तुमचं लक्ष केंद्रित करू शकता. स्वाती पुढे म्हणाली की कलेत ही क्षमता असते की आयुष्यात काहीही होऊ दे तो वेळ ज्या वेळी तुम्ही रियाज करता, साधना करता त्यावेळी काहीही डोक्यात येत नाही. असं म्हणतात की कलेत तुमचं मानसिक आरोग्य उत्तम असतं जेव्हा तुम्ही रियाज करत असता तेव्हा तुम्ही फक्त कला आणि कलेचाच विचार करत असता. माझ्या या कार्याकरिता आर्ट्स कौन्सिलची (Arts Council of England) मी खूप आभारी आहे. वेगवेगळ्या प्रॉडक्शन्स आणि प्रोजेक्ट करता त्यांनी दिलेल्या आर्थिक मदतीमुळे हे प्रोजेक्ट होऊ शकतात.
स्वातीला तिच्या पुढच्या सगळ्या प्रोजेक्टस् करता पाश्चिमाई तर्फे खूप खूप शुभेच्छा!
Very nice
ReplyDeleteकुठली ही कला परमेश्वराला शरण जाऊन किंवा आपले सर्वस्व पणाला लाऊन सादर केली असतां ती कला निरंतर अप्रतिम होतेच : अगदी खरयं स्वाती यांचे मनःपूर्वक अभिनंदन ... वहिनी तुम्हीं अगदी सहजपणे आपल्या ओजस्वी भाषेत मुलाखत रंगवली तुमचे ही मनःपूर्वक अभिनंदन ..!
ReplyDelete