Thursday, 26 June 2025

४.१ - गप्पा टप्पा - निसर्गाचा साक्षात्कार सलील यांच्या कॅमेऱ्यातून (मीरा पट्टलवार)

निसर्गाचा साक्षात्कार सलील तांबे यांच्या कॅमेऱ्यातून  

मीरा पट्टलवार



आपल्या सगळ्यांनाच सुट्टीत जंगल सफारीला जायला आवडतं, थोडे दिवस का होईना निसर्गाच्या सानिध्यात राहायला आवडतं. ह्या जंगल सफरीत वन्य प्राणी / पक्षी यांचे दर्शन झाले आणि मग ते कॅमेऱ्यात टिपले तर अहाहा तो आनंद गगनात  मावत नाही. जंगल सफारी मध्ये वन्य प्राणी/पक्षी-निरीक्षण ह्याचा आनंद मी लुटला  आहे. पण असाच अनुभव मला आला तो सलील तांबे यांचा चॅरिटी साठी केलेला टॉक शो पाहिला, या टॉक शो मधून त्यांनी जो निसर्ग दाखवला , पक्षी आणि प्राण्यांचे निरीक्षण आणि त्यांच्या रोमांचकारी हालचालींचे छायाचित्रण दाखवलं तेंव्हा ठरवलं त्यांच्या ह्या छंदाबद्दल त्यांच्याशी गप्पा माराव्या आणि ही मुलाखत जुळून आली.

सलील व्यवसायाने IT प्रोफेशनल आणि नावाजलेले तबला वादक. संगीतातल्या तालाबरोबर त्यांचा सूऱ् तर जुळलेला आहेच पण त्यामुळे विविध ठिकाणी भ्रमण करता करता निसर्गातील नाद आणि लय सुद्धा त्यांना सापडली आहे. 

आमच्या गप्पांची सुरवात मी केली ती त्यांच्या ह्या छंदाबद्दल जाणून घ्यायला.

सलील, हे निसर्ग-प्रेम आणि छायाचित्रण हा छंद तुम्हाला कधी जडला?


सलील म्हणतात, माझ्या शाळा / कॉलेजच्या वयात कधी फ्री पिरेड असला तर आम्ही जवळच असलेल्या सिरपूर लेकवर जायचो आणि पक्षी, किडे यांचं निरीक्षण करायचो. एकदा आमच्या ओळखीचे ३-४ ज्येष्ठ छायाचित्रकार काका नर्मदा नदीजवळच्या आदिवासी भागात जाणार होते. मला पण त्यांच्या बरोबर जाण्याची तीव्र इच्छा होती. घरी आई-वडिलांची एकच अट असायची की कुठे जायचं असेल तर फार खर्च नसावा. मग मी त्या काकांना विचारलं, ते म्हणाले तू आमच्या बरोबर आलास तर तुला कुठलाही खर्च येणार नाही. मी आई-वडिलांची परवानगी घेतली आणि त्यांच्या बरोबर गेलो. जवळ जवळ ६ तासांचा हा नावेंतला प्रवास पण त्यांच्या बरोबरच्या ह्या प्रवासाने माझा फोटोग्राफीचा दृष्टिकोनच बदलला .त्यांच्या बरोबरचा हा प्रवास माझ्यासाठी वळण बिंदू ठरला.

खरंतर ट्रेकिंग, किल्लेदर्शन हे सुद्धा मला आवडायचं पण निसर्ग, पक्षी आणि प्राण्यांचे निरीक्षण आणि त्याचं छायाचित्रण हे मला जास्त आवडायला लागलं. 

आणखीन एक गोष्ट म्हणजे माझ्या शाळा /कॉलेज च्या वयात प्रसिद्ध पक्षितज्ज्ञ डॉ सलीम अली यांची पुस्तक मी वाचायचो. एकदा ते  इंदोर ला आले होते खास ‘खरमोर’ हा पक्षी बघण्याकरिता. खरमोर हा पक्षी फक्त याच पाणथळावर आढळतो आणि हा एक दुर्मिळ पक्षी आहे. माझी आणि त्यांची भेट झाली आणि या भेटीतून मला खूप प्रेरणा मिळाली . त्यावेळी त्यांचं वय होतं ८५ वर्ष. इंदोर मध्ये जे विशिष्ट पाणथळे आहेत जिथे खूप निसर्ग संपदा आहे ते संरक्षित केले आणि त्यांचे संवर्धन केले तर इथे खूप पक्षी येतील ही कल्पना तेंव्हाच मनात रुजली. सिरपुर लेकला बर्ड सँक्चुरी मध्ये बदलण्या करिता आपण सुद्धा प्रयत्न करावेत असं तीव्रतेने वाटलं. पुढे वन्यजीव आणि पक्षी निरीक्षण करणारे आणि त्याचबरोबर त्यांचं छायाचित्रण करणारे मला भेटत गेले आणि मी पण या छंदात अधिकाधिक गुंतत गेलो.

मी सलीलला विचारलं, तुमचा हा छंद म्हणजे कुतूहल, चिकाटी ,धैर्य संयम आणि मनातून असलेली आवड! तुम्हाला यात काही अडचणी आल्यात?

सलील म्हणतात निसर्गाकडून खूप काही शिकण्यासारखे आहे . प्रत्येक अनुभव तुम्हाला काहीतरी नवीन शिकवतो आणि अशा अनुभवातूनच तुम्ही अडचणींवर मात करायला शिकता. निसर्गाच्या सानिध्यात तुम्ही स्वतःला अगदी विसरून जाता.

मी सलीलला म्हटलं तुम्ही काढलेली छायाचित्रं पाहिली की आपण प्रत्यक्ष हा  अनुभव घेतो आहोत की काय असंच  वाटतं. उदा: किंगफिशर चोचीत मासोळी घेऊन उडताना , पफीन पक्षी खूप मासोळ्या चोचीत धरून फिरतानादोन काळवीटांची शिंगांनी दिलेली झुंज अशी खूप उदाहरणं आहेत. या प्रकारच्या छायाचित्रणात मला दोन गोष्टी महत्वाच्या वाटतात. एक म्हणजे म्हणजे वन्यप्राणी /पक्षी यांचा अधिवासनिवासत्यांच्या सवयीवर्तन या सगळ्यांचा अभ्यास आणि दुसरं म्हणजे फोटोग्राफीचं technical knowledge.

सलील म्हणाले, हो तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. वन्यजीव छायाचित्रणातला ८०% भाग म्हणजे domain knowledge आणि २०% भाग हा फोटोग्राफीचं technical knowledge. वन्यप्राणी / पक्षी यांचा अधिवासत्यांच्या सवयीवर्तन इत्यादींचा अभ्यास हे झालं domain knowledge . या क्षेत्रात काम करणारे निसर्गप्रेमी ह्या माहितीची नोंद करतात आणि मग या माहितीत भर पडत जाते. अशा अभ्यासामुळे तुमचं domain knowledge वाढत जातं आणि तुमचं निरीक्षण अधिक चौकस होतं . या अभ्यासामुळे तुम्हाला असे विशेष स्थळं /hot spots माहिती होतात आणि तुम्ही प्रत्यक्ष निरीक्षणाला गेल्यावर काय आणि कसं बघायचं ही अंतरदृष्टि (insight) तुम्हाला येते. यात आणखीन एक महत्वाचं म्हणजे योग्य जागा (right place) आणि योग्य वेळ (right time of the year). मग चौकस निरीक्षण यावर आम्ही विस्ताराने बोललो, त्याचा सारांश असा. तुम्ही जेव्हा एखाद्या स्पॉट निरीक्षणालाला जाता तेंव्हा तिथल्या अन्नसाखळी (Food chain) चे काही घटक दिसतात. उदा: घुबड (Owl) अशा स्पॉटला आढळतात जिथे उंदीर आहेत कारण हे त्यांचं खाद्य आहे किंवा पाणथळावर पाणपक्षी (Water birds) येतात कारण त्यात असलेल्या मासोळ्यां हे त्यांचं खाद्य . अशा प्रकारे प्राणी /पक्षी आणि त्यांचं खाद्य अशी अन्नसाखळी ही निसर्गाची रचना.भक्ष्य आणि भक्षण करणारे एका ठिकाणी आढळतात अशी ही रचना आहे . त्यामुळे प्राणी /पक्षी यांचे भक्ष्य , त्यांचे निवासस्थान आणि योग्य वेळ (time of  year) या तीन गोष्टी छायाचित्रणासाठी खूप महत्वाच्या आहेत. विशेष कॅमेरा आणि लेन्स या छायाचित्रणात क्षणात घडणाऱ्या हालचाली अधिक स्पष्ट पणे टिपू शकतात. 

मी म्हटलं म्हणजे ह्या अभ्यासामुळे तुम्ही मनाने आणि दृष्टीने निसर्गाला समजून घेण्याचा प्रयत्न करता आणि या प्रयत्नातूनच जेंव्हा तुम्ही छायाचित्रं टिपता तेंव्हा आम्हाला ती छायाचित्र म्हणजे प्रत्यक्ष अनुभव वाटतो , आपण प्रत्यक्ष पाहात आहोत असे वाटते.

सलील म्हणाले ह्या छायाचित्रणाचं सूत्र असं : OMG= C3Observation Moment/exact time ,Gear ready to capture = Composition ,Consistency, Conservation. आपल्या छायाचित्रणसाठी आपण निसर्गाला कुठलाही त्रास न देता हे करायचं.

सलील म्हणाले वन्यजीव छायाचित्रणाचे वैशिष्ट्य म्हणजे हे  छायाचित्रण तुम्हाला अनपेक्षित जगात घेऊन जाते. ज्या गोष्टी क्षणात घडतात, जसं की किंगफिशर आपलं भक्ष्य टिपून /मासोळी चोचीत पकडून जेंव्हा भरारी घेतो तो क्षण. तुम्ही कदाचित किंगफिशर चे एका ठिकाणी बसला आहे असे फोटो काढू शकाल पण आपले भक्ष्य टिपून भरारी मारतानाचा फोटो हे फक्त वन्यजीव छायाचित्रकारच आपल्या कॅमेऱ्यात बंदिस्त करून आपल्या पर्यन्त पोचवू शकतात . ह्या छायाचित्रणाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे काही motion pictures /फोटो पाहिल्यावर लोक विचारतात हे पेंटिंग किंवा स्थिर चित्र आहे असं वाटतं किंवा काही स्थिर चित्र पाहिल्यावर हे motion pictures आहेत असं वाटावं ही वन्यजीव छायाचित्रणाची किमया.

 जगभरातील काही प्रमुख कलादालनांमध्ये सलील यांचं  एकल छायाचित्र प्रदर्शन आयोजित केले गेले आहे. त्यांनी ४ प्रतिष्ठित पुस्तके लिहिली आहेत (२ ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि २  बीएनएचएस Bombay Natural History द्वारे प्रकाशित) आणि त्यांनी अनेक एकल प्रदर्शने भरवली आहेत, अनेक प्रकाशनेसाप्ताहिक स्तंभ हयात लेखन केले आहे . त्यांनी काढलेले  फोटो आणि लेख अनेकदा प्रमुख प्रकाशनेमासिकेऑनलाइन संसाधनांमध्ये दिसतात आणि ते एक लोकप्रिय स्तंभलेखक आहेत.

त्यांनी काढलेली छायाचित्रं मल्टीमीडिया प्रकाशनांमध्ये प्रदर्शित केल्या जातात. वाइल्डरनेस व्हिस्टा हे त्यांच्या मल्टीमीडिया प्रकाशनांपैकी एक आहे. भारतीय प्रजासत्ताकाच्या ६० व्या वर्षाच्या स्मरणार्थ नेहरू सेंटर लंडन येथे सलीलच्या प्रतिमांचे एक विशेष प्रदर्शन.भरवले होते . सलीलला अनेकदा निसर्ग आणि वन्यजीव छायाचित्रणावरील आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी आमंत्रित केले जाते. शाळा आणि विद्यापीठे त्यांना या विषयावरील चर्चासत्रांसाठी वारंवार आमंत्रित करतात. ते वन्यजीव आणि पर्यावरणीय सल्लागार आणि काही संवर्धन प्रकल्पांचे प्रमुख सदस्य देखील आहेत. सलील यांनी माहितीपट,चित्रपट निर्मिती आणि व्हिडिओ निर्मितीमध्ये देखील काम केले आहे.

पुरस्कार आणि मान्यता

भारतातून इंग्लंडला आल्यावरही निसर्गवन्यप्राणी आणि पक्षी निरीक्षण त्याचप्रमाणे त्यांचे छायाचित्रण हा छंद ते चिकाटीने जोपासत आहेत . १९९० च्या दशकापासून आजपर्यंत सलील यांना छायाचित्रणाचे अनेक पुरस्कार मिळाले आहेत.

यातले काही मानाचे पुरस्कार म्हणजे British Wild Life Photography Award (2019),National Wild Life Federation USA mammal category award (2023),Wild Life Photographer of the Year Natural History Museum London UK, Bird Photographer of the Year आणि एक मोठा पुरस्कार म्हणजे असोशिएट ऑफ रोयल सोसायटी फोटोग्राफी अवॉर्ड. (ARPS).

सर्व वयोगटातील आणि पार्श्वभूमीच्या लोकांपर्यंत फोटोग्राफीद्वारे प्रेरणासर्जनशीलता आणि कनेक्शन आणणे हे प्रतिष्ठित रॉयल फोटोग्राफिक सोसायटी या संस्थेचे ध्येय आहे .या संस्थेने सलील तांबे यांना वाइल्ड लाईफ छायाचित्रणात महत्वाचे योगदान केल्याबद्दल  ARPS (Associate of Royal Photography Award)  हा पुरस्कार  दिला . "फोटोग्राफीचा मिशेलिन स्टार" म्हणून ओळखला जाणारा आंतरराष्ट्रीय संस्थेने दिलेला हा एक प्रतिष्ठित पुरस्कार मानला जातो.


ह्या पुरस्कारकरिता जी स्पर्धा घेतात त्याचे निकष खूप कठोर/ स्ट्रीक्ट  असतात . यातली पहिली अट म्हणजे २० वर्ष छायाचित्रणाचा अनुभव असला पाहिजे ,आणि दुसरं म्हणजे तुम्ही एक विषय निवडून त्यावर १५ फोटो submit करायचे आणि प्रत्येक फोटोत कुठला आशय व्यक्त होतो हे लिहून पाठवायचे . या स्पर्धेत सलील च्या सादरीकरणाचे शीर्षक/विषय होते "WINGS" नैसर्गिक इतिहास शैली . हा पुरस्कार सोन्याचे प्रतीक असलेले प्रमाणपत्रासह सोनेरी लेपल प्रदान करतो आणि ARPS शीर्षक अधिकृतपणे तुमच्या नावात जोडले जाते.(रॉयल फोटोग्राफिक सोसायटी).

निसर्ग निरीक्षण आणि छायाचित्रणातील थरारक अनुभव

मी सलीलला विचारलं तुम्ही अशा वेगवेगळ्या हॉट स्पॉट्सला जाताही सगळी स्थळं  म्हणजे निर्जन किंवा एकाट अशा जागा जिथे कधीही काहीही होऊ शकतंएखादं जनावर हल्ला करू शकतं. अशा ठिकाणी जायचं म्हणजे चिकाटी आणि संयम तर लागतोच पण तुम्हाला साहसी असावं लागतं. तुम्हाला असे काही थरारक अनुभव आले?

सलील म्हणाले, हो मला असे अनेक अनुभव आले. एकदा अरुणाचल प्रदेश (नॉर्थ ईस्ट ऑफ इंडिया) मध्ये ‘नामदफा नॅशनल पार्क आणि टायगर रिझर्व’ ह्या  ठिकाणी गेलो होतो. पॅरोटबील (Parrotbill) हा पक्षी फक्त इथेच आढळतो. प्रत्यक्ष ज्या दिवशी जायचे होते तेंव्हा माझ्याबरोबर बंदूकधारी वन्य रक्षक सुद्धा होता. त्याने मला कल्पना दिली होती की या भागात हत्ती असतात आणि साधारणपणे ते कळपात फिरतात. हा त्यांच्या विणीचा हंगाम ( mating season) असल्यामुळे ते आक्रमक होऊ शकतात. आम्ही ठरल्याप्रमाणे एका स्पॉट ला गेलो, पॅरोटबील ची शीळ घातली आणि त्याच्या दिसण्याची वाट बघू लागलो. (शीळ घातल्यामुळे पक्षांना आपले सोबती बोलावता आहेत असे वाटते) माझा कॅमेरा सज्ज होता. पण तेवढ्यात एक अकल्पित घडलं. त्या सुरक्षा रक्षकाने मला अचानक फरफटत एका आडवळणावर नेलं आणि आम्ही एका जागी लपून बसलो. कॅमेरा साहित्य तसेच तिथे टाकून दिले. एक प्रक्षोभक हत्ती सैरावैरा आमच्या मागून धावत येत होता आणि तो काही करणार हे सुरक्षा रक्षकाला लक्षात आल्याबरोबर त्याने मला ओढत आड जागेवर नेलं. अशा प्रक्षोभक हत्तीच्या मार्गात काही आलं तर ते उडवून लावतात आणि होत्याचं नव्हतं होतं. दुर्दैवाने सुरक्षा रक्षकाकडे बंदूक असून सुद्धा ती अनलोडेड होती त्यामुळे तिचा काहीही  उपयोग झाला नाही. थोड्या वेळानंतर आम्ही पुन्हा त्या जागी जाऊन पाहिले आणि सुदैवाने सगळे साहित्य सुखरूप होते आणि मला पॅरोटबील चे निरीक्षण आणि छायाचित्रण करता आले. माझ्या पायाला दुखापत झाली पण ज्या साठी इथे आलो ते साध्य झालं मात्र दुखापतीची किंमत देऊन! तो रक्षक म्हणाला हत्ती स्थिर गोष्टींना काही करत नाहीत पण काही हालचाल दिसली तर मात्र ते उडवतात . माझ्या आजपर्यंतच्या भटकंती मध्ये असे कितीतरी प्रसंग आले पण सुदैवाने त्यातून सुखरूप बाहेर पडत गेलो.

निसर्ग जागरूकता आणि निसर्गाचे संवर्धन

आपल्या छायाचित्रणाचा ठेवा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचावा आणि त्याद्वारे निसर्गाची जागरूकता वाढावी यासाठी देखील सलील प्रयत्नशील आहेत. टॉक शो, स्लाईड शोविविध चर्चासत्रं यांकरिता त्यांना शाळा आणि कॉलेज मध्ये निमंत्रित केले जाते. आपल्या टॉक शो द्वारे ते चॅरीटीजला निधी  देतात.

इंदोर येथील सिरपूर लेकला बर्ड सँक्चुरीमध्ये रूपांतरित करणे हे त्यांचे स्वप्न आता पूर्ण झाले आहे. हा प्रकल्प करणाऱ्या टीम मध्ये सलील यांचा मोठा सहभाग होता. इंदोरच्या स्थानीय पातळीवरून वरच्यापातळीवर योग्य विभागापर्यंत नेल्यामुळे हे कार्य होऊ शकलं. सिरपूर पाणथळाचे वैशिष्ट्य म्हणजे जैववैविध्यता (Biodiversity).पक्षी विहार म्हणून ओळखले जाणारे हे स्थळ जलचर वनस्पती , काही प्राणी आणि जवळ जवळ १३० पक्ष्यांच्या प्रजातीला आधार देते . यात महत्वाचे म्हणजे स्थानीय पक्षी, स्थलांतरित पक्षी आणि धोक्यात असलेल्या पक्षी प्रजातींचा (endangered species) समावेश आहे.

सलील वन्यजीव आणि पर्यावरणीय सल्लागार आणि काही संवर्धन प्रकल्पाचे प्रमुख सल्लागार आहेत.

वाचकांनी त्यांच्या टॉक शो चा जरूर लाभ घ्यावा.

सलील यांना पुढच्या वाटचाली करिता ‘पश्चिमाई’ तर्फे शुभेच्छा! आशा करते आपल्या सगळ्यांमध्ये दडलेलं निसर्ग प्रेम वाढीस लागेल आणि आपली निसर्गाबद्दलची जागरूकता वाढेल. 

खालील लिंक्स जरूर बघा निसर्गाचा नाद आणि लय तुम्हालाही सापडेल . 

https://youtu.be/Gak982ZFalc

https://youtu.be/0hvJUsKntLg

https://youtu.be/SRRD9r-9hM0

मीरा पट्टलवार, रनकॉर्न, चेशायर.


यूट्यूब वर हे कथाकथन ऐकण्यासाठी:

https://youtu.be/AI43eTEwev0




3 comments:

  1. What an excellent achievement, proud of you Saleel , excellent write up by Meera Pattalwar, A Big Thank You to both.

    ReplyDelete
  2. Excellent article Meera Pattalwar. Saleel is a fantastic and very skilled wild life photographer.
    Thank you .

    ReplyDelete
  3. एका निसर्गप्रेमी व संगीत प्रेमीची मुलाखत.👍

    ReplyDelete

प्रतिसाद

संयोजक

श्रीकांत पट्टलवार, मीरा पट्टलवार, रवी दाते, मुकुल आचार्य, कुमार जावडेकर