Thursday, 26 June 2025

२.१ - 'ग' ची बाधा (सदर) - गद्य - 'निवडक अ-पुलं' - कुमार जावडेकर

निवडक अ-पुलं - कार्यवाहक बापू 

कुमार जावडेकर

[बारा जून हा पु. लं. चा स्मृतीदिन. त्यांचं बापू काणे हे व्यक्तिचित्र पुन: एकदा रंगवायचा हा मी केलेला प्रयत्न - माझ्या 'निवडक अपुलं' या इ-पुस्तकातून.]


यूट्यूब वर: 

दुपार असूनही सगळीकडे शुकशुकाट होता. संपूर्ण मुंबईवरच 'शुकासारिखं पूर्ण वैराग्य' आलंय असं माझ्या मनात आलं. मग शुकशुकाट आणि शुक यांचा काय संबंध असंही वाटून गेलं! सध्या वायफळ विचारांना भरपूर वेळ असतो.

तेवढ्यात 'शुक शुक' अशी हाक ऐकू आली.

'काय, करोना पाळताय ना?' 

तोंडाला घरगुती मुखवटा, हाताला मोजे, दुचाकीला दोन्ही बाजूंना लावलेल्या पिशव्या आणि मागे लावलेला गठ्ठा अशी ती बापू काणेची एकपात्री वरात माझ्या दारात (सुरक्षित अंतरावर) उभी होती.

'आत येत नाही, भरपूर कार्य आहे.'

जणू मी त्याला सद्यस्थितीत आत बोलवणारच होतो.

'बापू, करोना पाळणं? ते काय कुत्रा-मांजर पाळणं आहे?'

'तुम्ही कुत्रे-मांजरी पाळताय? देऊ का आणून?' तो देईलही. भटक्या प्राण्यांना वसवणाऱ्या संस्थेचाही तो कार्यवाह आहेच. 'तुम्ही फक्त पथ्य पाळणारे. साबणदेखील साबणानं धुवून घेणारे.'

('सध्या सगळ्यांवरच सोवळं पाळायची पाळी आली आहे.' - आम्ही मनातच म्हणायचे.) 

'तू बाहेर कुठे भटकतोयस?' मी प्रकट विचारलं.

'भटकतोय? अत्यावश्यक सेवांसाठी बाहेर पडायचा परवाना आहे माझ्याकडे.'

त्याच्या गळ्यात 'हेल्थ सोशल वर्कर'चं ओळखपत्र होतं.

'या दोन पिशव्यांत साबण आहेत. मागे मुखवटे, टोप्या आणि मोजे.'

बापू आता पाच नव्या संस्थांचा कार्यवाह झाला आहे आणि त्यांचं कार्य असं वाहून नेतोय ही माहिती मला पुढच्या संभाषणातून मिळाली. 'मास्क टास्क फोर्स'साठी सुशी घरी शिवणकाम करते. अनंत ओळखींमधून 'साबण वाटप समिती,' 'औषध वितरण समिती' आणि 'अन्न पुरवठा समिती' तयार झाल्या आहेत.

'आणि पाचवी संस्था?'

'त्याचसाठी तुझ्याकडे आलो होतो.'

बापू अंत्यविधी मंडळाचाही चिटणीस आहे. माझ्या मनात उगाचच शंकेची पाल चुकचुकली.

'दे की थोडी स्फूर्तिगीतं चालींसकट - 'उत्साहवर्धन' संस्थेसाठी. उद्या येतो.'

मी बोलायच्या आधीच तो अंतर्धान पावला आणि दोन दिवसांनी उगवला. बापूचा उद्या हा परवाही होऊ शकतो. त्याच्या बाबतीत 'करीन ती पूर्व' आणि 'म्हणेन ती वेळ' हे दोन्ही खरं आहे.

'हवालदारानं हडकावला.' एका दमात बापू म्हणाला, 'त्याला पाच मुखवटे आणि दोन साबण दिले. त्यांना बिचाऱ्यांना कोण देणार? पाडलीस गाणी? '

'हो. आता चाली करतोय.'

'त्यांत काय करायचंय? भजनी ठेका लाव. एखादं कर शास्त्रोक्त भीमपलासवगैरे. एक-दोन पारंपरिक ओव्यांच्या चालीत. बाकीच्यांना नवीन उडती हिंदी-पंजाबी धून चिकटव.'

'गाणार कोण आहे?' मी सवयीप्रमाणे त्याच्या कोडगेपणाकडे दुर्लक्ष केलं.

'बायकांची आणि लोकलमधली भजनीमंडळं बंदच आहेत. त्यांना आपापल्या घरी एक-एक ओळ बसवायला सांगू. उद्या येतो.'

बापूनं पुनः गायब झाला.

दोन आठवडे बापू आला नाही तेव्हा मात्र मला काळजी वाटायला लागली. दूरध्वनीही व्यस्त येत होता. अचानक त्यानंच संपर्क केला.

'घरीच आहे'.

'काय रे, बरं नाही?'

'खडखडीत आहे. पण मीच 'विलक्षण' वाहक निघालो करोनाचा.' (बापूला 'लक्षणविरहित' म्हणायचं होतं.)

'धन्य! कळलं कसं मग?'

'मोफत चाचणी केंद्र सुरू केलं. त्या संस्थेचा... '.

त्यानं पुढं बोलायची गरज नव्हती.

'तुझ्या संपर्कात आलेल्या लोकांना?'

'काळजी नाही. मी खबरदारी घेतलीच होती. तरी सगळ्यांचा माग काढून खात्री केली.'

'निदान या निमित्तानं तुला विश्रांती मिळाली असेल.'

'अरे केवळ दूरध्वनीवरून प्रत्येक संस्थेचं काम दुप्पट केलंय! माणसं कमी पडतायत. बाहेर निघणार उद्यापासून. पुनश्च हरिः ओम!' 

बापूच्या शब्दांत मला तुरुंगातून सुटून आलेल्या टिळकांचा भास झाला.

मी समोरच्या माझ्या कविता बघितल्या. एक गीत 'वसंततिलका' या वृत्तात होतं. त्यातला एक जुना श्लोक 'राजास विश्राम तसा क्षणमात्र नाही' मला नेहमी आठवतो. रवी, पवन आणि त्याप्रमाणे राजा यांना कधी विश्रांती मिळत नाही असं त्याच्यात अभिप्रेत आहे.

मला 'राजा' च्या जागी तिथे 'बापू' असायला हवं होतं असं वाटलं.

जागा झालो तेव्हा माझ्या लक्षात आलं, वेळ दुपारचीच होती. बाहेर शुकशुकाटच होता. माझ्या हातात 'व्यक्ती आणि वल्ली' घट्ट धरलेलं होतं. जाणीव झाली - बापू, गंपू, नारायण ही स्वप्नचित्रं नव्हती, ते आदर्श होते आपल्यासाठी.

उठताना विचार केला, आपणही कामाला लागायला हवं…

- कुमार जावडेकर

हे संपूर्ण इ-बुक वाचण्यासाठी कृपया खालील दुवे वापरा:

भारत:
https://www.amazon.in/dp/B086YZNVWH

यु. के:
https://www.amazon.co.uk/dp/B086YZNVWH

यु. एस. ए:
https://www.amazon.com/dp/B086YZNVWH

3 comments:

  1. छान लिहिलंय!

    ReplyDelete
  2. वाह वा , छान . शब्दांची कोटी करण्यात तुमचा हातखंडा . पु . लं च अपुलं आवडलं .

    ReplyDelete

प्रतिसाद

संयोजक

श्रीकांत पट्टलवार, मीरा पट्टलवार, रवी दाते, मुकुल आचार्य, कुमार जावडेकर