Thursday, 26 June 2025

२.६ कादंबरी - बे-जमाव (प्रकरण २) - रवी – ‘जे न देखे कुशल’ (कुमार जावडेकर)

रवी – ‘जे न देखे कुशल’

कुमार जावडेकर 

 

पूर्वीच्या अंकांतील प्रकरणांचे दुवे: 

प्रस्तावना: Pashchimaai (पश्चिमाई): २.५ कादंबरी - 'बे-जमाव' : प्रस्तावना (कुमार जावडेकर)

प्रकरण १: Pashchimaai (पश्चिमाई): २.५ कादंबरी - बे-जमाव (प्रकरण १) - 'कुशल – पिंच हिटर’ (कुमार जावडेकर)

प्रकरण २: रवी - 'जे न देखे कुशल' 

दिशानं ‘पुन: आणशील त्याला?’ असं विचारलं तेव्हा कुशलचा चेहरा खरोखर फोटो काढण्यालायक झाला होता. सचिनबरोबर काढलेला त्याचा फोटो आमच्या नोटिस बोर्डावर लागला होता लगेच. (कारण त्यात प्रोफेसर्सही होते ना – त्यांना मिरवायला हवं होतंच की.) त्या फोटोशेजारी ‘हे चित्र पाहा आणि ते चित्र पाहा’ म्हणून कुशलचा असा रडवेला फोटो लावायला पाहिजे होता.

कुशल सचिनला कॉलेजात घेऊन आल्याचं भांडवल करणार हे तर उघड होतं. सुदैवानं तो दिशाशी बोलला तेव्हा मी तिथे होतो. लंच टाइमलाच माझं दिशाशी बोलणं झालं होतं - ‘तुला नाही सांगितलं त्यानं अजून?’ असं मी विचारल्यावर ती म्हणाली होती, ‘मी त्याच्याकडे बघतच नाहीये मुद्दाम. मला काय माहिती नाही की काय हे सगळं तो कशाला करतोय ते?’ तेव्हा मी इतकंच म्हटलं होतं, ‘सचिनला गणेशोत्सवात आणून याला आपणच सिक्सर मारलीये असं वाटतंय. हे म्हणजे गणपती वाहून नेणाऱ्या गाढवासारखं झालं.’ आम्ही दोघेही हसलो होतो.

मात्र आणलंच असतं यानं पुन: काही तरी खटपटी-लटपटी करून तर? दिशाचा शब्द झेलायला तो काही मागे-पुढे बघणार नाही. तसं झालं असतं तर खरंच दिशा त्याच्यावर लट्टू झाली असती. म्हणूनच मी ‘हो! मी आणेन’ असं म्हणून गेलो पटकन. शिवाय मला हेही जाणवलं की दिशा त्याला सचिनला पुन: आण असं म्हणाली तेव्हा तिचं अर्ध लक्ष कुशलच्या मागे असलेल्या माझ्याकडे होतं. जणू ती हे मलाच सुचवत होती, कुशलला चिडवताना. मला वाटलं मी हे आव्हान स्वीकारायलाच हवं. मी काही कमी नाही हे दाखवायलाच हवं. पण ते घडवून कसं आणायचं हा आता प्रश्न होता. त्याचा मी विचारच केला नव्हता. अवधीच मिळाला नव्हता तो करायला.

वास्तविक दिशाची आणि माझी मैत्री आधीची. आमचे बारावीचे मार्क्स सारखेच. प्रवेशाच्या यादीत आणि प्रत्यक्ष तो घेताना आम्ही लागोपाठच होतो. ती मिळाल्यावर ‘कुलार अँड कंपनी’मध्ये आम्ही बन-मस्का आणि चहा पिऊन सेलिब्रेटही केलं होतं! मग पहिल्या दिवसापासून कॉलेजात एकत्र असायचो. परतताना वडाळ्याला एकत्रच लोकल पकडायला जायचो (मी खरं तर किंग्ज सर्कललाही जाऊन पकडू शकलो असतो तरीही.) कॉलेजच्या अनेक कार्यक्रमांमध्येही आम्ही एकत्र टाइमपास करायचो. अर्थात, फक्त दोघेच नाही. आमचा बॅक बेंचर्सचा ग्रुपच झाला होता. असं असूनही कुशल कानामागून येऊन तिखट व्हायला लागला होता.

कुशल आणि मी रुपारेललाही बरोबर होतो. तिथे तो नुकताच पुण्याहून आलेला, एक शामळू मुलगा होता. हॉस्टेलला राहायचा. मी मुंबईतला – बोरिवलीचा – असल्यामुळे मला हॉस्टेलची काहीच गरज नव्हती. पण मी सकाळी इतरांपेक्षा लवकरच्या लोकलनं कॉलेजात पोचून पहिलं कॅंटीन गाठायचो. तिथे नेमका बंडी आणि लेंगा अशा पांढऱ्या ‘नाइट सूट’ मध्ये कुशल आलेला असायचा. आता मी हॉस्टेलला राहत नसलो तरी मुंबईच्या हवेत असले कपडे घालणारा तिथला तो एकमेव मुलगा असेल याची मला खात्री होती. पण चहा प्यायला साथीदार मिळायचा म्हणून चालवून घ्यायचो. कॉलेजात प्रॅक्टिकललाही मी ‘रवी सराफ’ आणि तो ‘कुशल सेठ’ असे पाठोपाठचे रोल नंबर्स असल्यामुळे आम्ही एकत्र असायचो. हिंदीत तर तो जाम कच्चा होता. त्यातून बोललाच तर शुद्ध तुपातल्या पुणेरी हिंदीत. भेटल्यावर ‘क्या बोलता है’ ऐवजी ‘कैसे हो’, कधी कॅंटीन किंवा एस. के. (उडिपी श्रीकृष्ण) मध्ये वेटरला हाक मारताना ‘बॉस’ ऐवजी ‘भाईसाब’ वगैरे म्हणणारा. मी जरी गढवाली सराफ असलो तरी जन्मापासून मुंबईत (किंबहुना माझे वडीलही जन्मापासून इथलेच) असल्यामुळे माझं हिंदी अगदी ‘रंगीला’ मधल्या आमिर खानसारखं नसलं तरी मुंबईच्याच धेडगुजरी वळणाचं आहे. या उलट मराठी मिडियममध्ये शिकल्यामुळे मराठी मात्र चांगलं आहे. मला हे सांगायला लागतं की ‘सराफ’ आडनाव असलं तरी ‘अशोक सराफ’ माझा कुणी नाही. आमच्या कम्प्युटर सायन्सच्या वर्गात बहुतेक मुलं सी. बी. एस. इ. किंवा आय. सी. एस. इ. मधून आलेली होती. त्यामुळे कुशलला, मला मराठीतून बोलता येतं या कारणानं, माझी साथ बरी वाटायची. (आणि जरी तेव्हा कबूल केलं नसलं तरी त्या हाय-फाय मुलांपेक्षा हा बरा भेटालाय असं मलाही वाटायचं.)

व्ही. जे. टी. आय. ला आल्यावर मात्र त्यानं कात टाकली. फुलशर्ट्स घालण्याच्याऐवजी चौकड्यांचे हाफशर्टस घालायला लागला. केसांना तेल लावणं बंद केलं. अखेर बंबय्या हिंदी बोलायला लागला. इतरांच्यात मिळू-मिसळू लागला. कार्यक्रमांमध्ये पुढे-पुढे करायला लागला. त्याला करायचं तर करू देत, माझं काय जातं? - असा माझा सुरुवातीचा विचार होता. मी आपले मागे बसून तीर सोडण्यात (कधी नजरांचे तर कधी कागदांचे) धन्यता पावायचो. प्रॅक्टिकलला इथे मोठा ग्रुप असायचा – रुपारेल सारखा दोनच मुलांचा नसायचा. त्यात आम्ही दोघे, अजून दोन मित्र आणि दोन मैत्रिणी होत्यात्यांत दिशाही होतीच.

एस. इ. ला (दुसऱ्या वर्षात) आल्यावर कुशल आणि दिशाची घसट वाढायला लागली. ती त्याला शंका विचारायला लागली. त्याच्याकडे नोट्स मागायला लागली. अर्थात हा तिच्या धोरणीपणाचाच एक भाग आहे, किंवा अगदी स्पष्ट शब्दांत सांगायचं झालं तर ती त्याचा वापर करून घेते आहे, असं मला वाटायचं. घेतलं तर घेऊ देत. पण मैत्री तर माझ्याशीच आहे, अशी समजूत घालायचो माझी मी. तशी खात्रीच होती माझी. सचिनच्या भेटीनं हे संतुलन बिघडलं. कुशलचा हेतू आता उघड व्हायला लागला, त्याची मजल कुठपर्यंत जाऊ शकते हे दिसायला लागलं. मला काहीतरी करायला हवं असं जाणवलं आणि मी सचिनला परत आणेन हे म्हणून बसलो!...

कॉलेजमधून वडाळा स्टेशनपर्यंत चालत परत जाताना दिशा त्या दिवशी काही या विषयावर पुढे बोलली नव्हती. मीही नव्हतो बोललो. फक्त इकडच्या तिकडच्या गप्पा मारल्या होत्या थोड्या. दोघांनाही कळत होतं, मनात दुसरंच काही तरी चाललंय. हेही जाणवत होतं की टाळून हा विषय विसरला जाणार नव्हता. गेला असता तरी मीही त्याबरोबर बाराच्या भावात गेलो असतो.

रात्रभर विचार करत होतो. दुसऱ्या दिवशी सकाळी उठून मनगटावर घड्याळ बांधताना माझं त्यातल्या तारखेकडे लक्ष गेलं. आज ५ सप्टेंबर ... शिक्षक दिन! लगेच एक युक्ती सुचली. आपण सचिन आणि त्याचे गुरू रमाकांत आचरेकर यांना कॉलेजात बोलावलं तर? गुरु-शिष्य दोघांचाही सत्कार करण्यासाठी? आचरेकर सरांना शोधून काढणं सोपं होतं. कॉलेजात न जाता तडक शिवाजी पार्क आणि शारदाश्रम या ठिकाणी फेऱ्या मारल्या आणि सरांचा नंबर मिळवला. ताबडतोब त्यांना फोन लावला.

नमस्कार सर, आमच्या कॉलेजच्या शिक्षक दिनानिमित्त तुम्ही आणि सचिन तेंडुलकर असा तुम्हां गुरु-शिष्यांचा सत्कार समारंभ आयोजित करणार आहोत. तुम्ही येऊ शकाल का?

हो, मी येईन की. फक्त एक प्रश्न विचारतो. शिक्षकाला सगळेच विद्यार्थी प्रिय असतात. सचिनच्या ऐवजी दुसऱ्या कोणत्या तरी शिष्याला आणलं तर चालेल का?

मंडळाला विचारून सांगतो, म्हणून मी फोन ठेवला. सरांनी माझी विकेट काढली होती!

विमनस्क अवस्थेत मी तिथल्याच जवळच्या बस-स्टॉप वर बसून एकटयानं डबा खाल्ला. मग कॉलेजात परतलो. हॉस्टेलच्या बाजूनं येताना ती वाट नेहमीपेक्षाही लांबच लांब भासत होती. कुशलनं मी सचिनला परत आणण्याची घोषणा (वल्गना?) केल्याचं सगळ्यांना सांगितलंय, त्यामुळे सगळे माझ्याकडेच बघतायत, माझी चेष्टा करतायत, असं वाटत होतं. प्रत्येकाची नजर चुकवून मी चालत होतो. उजवीकडचा मोठ्ठा ‘डी’ ब्लॉक मागे गेल्यावर कुशलच्या ‘बी’ ब्लॉक समोरून जाताना कुणीतरी मागून ‘सचिन! लवकर ये!’ अशी हाक मारली. वास्तविक ती आमच्याच कॉलेजातल्याच एका सचिनला मारलेली होती. पण ते लक्षात येईपर्यंत माझ्या पोटात गोळा आला होता.

दुपारचं प्रॅक्टिकल तर बुडवून चालणार नव्हतं. त्याला वेळ होता. तिथे दिशा आणि कुशल दोघेही असणार होते. तोवर वर्गात किंवा कॅंटीनमध्ये जायची मला इच्छाच होत नव्हती. त्यामुळे मी नुसताच कॉरिडॉरमध्ये भटकत राहिलो. फेऱ्या मारताना अचानक नजर समोरच्या ‘रंगवर्धन’च्या नोटिस बोर्डवर पडली. आमच्या मराठी वाङमय मंडळाचा हा फलक. महाविद्यालयात होणाऱ्या सगळ्या मराठी कार्यक्रमांची माहिती देणारा. या महिन्यात मात्र कुठलाच कार्यक्रम नसल्यानं तो मोकळा होता. त्याच्याकडे तरीही निरखून पाहता पाहता माझ्या मनात एक नवी कल्पना आली. विचारांचं चक्र सुरू झालं. एक पक्की योजना तयार झाली. आता मी दिशा आणि कुशलला सामोरं जाऊ शकणार होतो...

प्रॅक्टिकल करताना काही घडलंच नाही असे माझ्या चेहऱ्यावर भाव होते. दिशाला मी हा विषय टाळतोय किंवा विसरलोय असं वाटत असलं तर वाटू देत असा मी विचार करत होतो. कुशल माझ्याकडे जास्त लक्षपूर्वक बघत होता. पण मी ताकास तूर लागू दिला नाही. ‘काय मग कुशल? शिक्षक दिनानिमित्त आज कोण प्रमुख पाहुणे येणार आहेत कॉलेजात?’ असं सुरुवातीलाच म्हणून त्याला मात्र उगाच खजील व्हायला लावलं आणि दिशाला डोळा मारून घेतला.

प्रॅक्टिकल झाल्या-झाल्या मी सटकलो आणि पुन: दादर गाठलं – आयडियल बुक डेपो.

सचिनचे वडील रमेश तेंडुलकर हे मराठीचे प्राध्यापक आणि नावाजलेले साहित्यिक होते. त्यांची पुस्तकं मी धुंडाळली. विकत घेतली. घरी परत आल्यावर ती चाळून काढली आणि पत्र लिहायला घेतलं...

‘५ सप्टेंबर २०००.

माननीय श्री सचिन रमेश तेंडुलकर यांस,

सप्रेम नमस्कार.

व्ही. जे. टी. आय.च्या ‘रंगवर्धन’ तर्फे मराठी साहित्याची आवड जोपासण्यासाठी आम्ही नवनवे उपक्रम हाती घेत असतो. या वर्षी प्रा. रमेश तेंडुलकर यांच्यावर आधारित कार्यक्रम करायची आमची इच्छा आहे. यात त्यांच्या कवितांचं अभिवाचन तर होईलच पण त्याबरोबरच त्यांनी संपादन केलेल्या ‘कविता दशकाची’ सारख्या पुस्तकातून संधी मिळालेल्या कवींनाही आम्ही आमंत्रित करणार आहोत. त्यामुळे हा सोहळा फक्त काव्य-वाचन न राहता एक ऋणनिर्देश म्हणूनही साजरा होईल.

या प्रसंगी आपणां तेंडुलकर परिवाराची उपस्थिती लाभली तर आम्हांला कृतकृत्य वाटेल. आपली क्रिकेटमधली व्यग्रता जाणून चार तारखा (१४, १९, २१, २६) पर्याय म्हणून सुचवत आहोत. कृपया आपल्या दृष्टीनं सोयीची तारीख कळवू शकाल का? शक्य होत नसल्यास निदान आपल्या कुटुंबातल्या सदस्यांची उपस्थिती कळवावी ही विनंती. (आपल्या मातोश्री आणि बंधू यांचे पत्ते नसल्याने एकच पत्र फक्त आपणांस पाठवले आहे, तरी राग मानू नये.)

आपला,

रवी सराफ

भ्रमणध्वनी – ९८२१०९०९२३

ता. क. आमच्या शाळेच्या पुस्तकात असलेली ‘पाखरांनो तुम्ही’ ही अप्रतिम कविता माझी अजून पाठ आहे. ती खाली उद्धृत केली आहे.  

‘पाखरांनो, तुम्हांलाही आता याची सवय झाली असेल...

स्वच्छ निळ्या आकाशात रोज सकाळी

सायरनचे सूर पसरतात त्या वेळी

तुम्ही कुठे असता?

हवेत चढत जातात त्या सुरांची उंच उंच कंपने

तुमच्यासारखीच, तेव्हा तुम्ही कुठे जाता?

समजतात तुम्हांला हे धोक्याचे इशारे?

आणि नंतरचे उतरत्या सुरांतले

‘ऑल क्लियर’चे दिलासे?

युद्ध्यमान जीवनसंघर्षाची आमची ही रोजची तालीम!

पाखरांनो तुम्ही काय करता?

आम्ही आमची घड्याळे लावतो

आणि कामाला जायला

किती वेळ आहे याचा अंदाज घेतो...

पाखरांनो तुम्ही?

कवी - रमेश तेंडुलकर’

 मी बराच धोका पत्करला होता. कुठेही मी सचिनला भरीस पाडतोय असं वाटू नये म्हणून त्याच्या कुटुंबियांनी आलं तरी चालेल, असं म्हटलं होतं. पत्र अगदी ‘प्राज्ञ’ मराठीत लिहून माझं त्या भाषेवरचं प्रभुत्व आणि पर्यायानं प्रेम दाखवलं होतं. 

त्या वेळी आमच्या घरात एकच मोबाइल फोन होता, तो माझ्या वडिलांचा. ते कधी कुणाला देत नसत. पण त्यांना मी ते पत्र दाखवलं. ‘आमच्या कॉलेजच्या वतीनं माझ्यावर ही जबाबदारी टाकण्यात आलेली आहे’ असं सांगितलं आणि त्यांनी मोबाइल माझ्याकडे ठेवायला परवानगी दिली! रात्री दुकान बंद झाल्यावरसुद्धा आम्ही जागून क्रिकेट बघत असू. शारजातली सचिनची शतकं, इंग्लंडमधल्या वर्ल्ड-कपमधून त्याचं परत येणं, मग भारताचा झिम्बाब्वेनं केलेला दारुण पराभव, नंतरचं केनियाविरुद्ध काढलेलं शतक – सगळं आम्ही एकत्र अनुभवलं होतं. दुकानातही टीव्ही होताच.

दुसऱ्या दिवशी लोकलनं बांद्रा स्टेशनात उतरून मी सरळ टॅक्सी पकडली आणि सचिनचं घर गाठलं. मला त्याच्या घरी जायचं वगैरे नव्हतं फक्त पत्र पोचेल याची खात्री करायची होती. ती तिथल्या वॉचमनशी अतिशय आदरानं बोलून त्याच्याकडून मिळवली आणि कॉलेजात आलो.

आता फक्त वाट बघणं माझ्या हातात होतं. बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार निघून गेले. पुन: त्याच्या घरी दुसरं पत्र घेऊन पुढच्या आठवड्यात जावं की काय, वॉचमन तोच असला तर त्याच्याकडून वर फ्लॅटमध्ये जायची परवानगी मागावी, निदान फोन नंबर घ्यावा  असं मनात येत होतं. वडिलांचाही लकडा मागे लागलाच होता ‘फोन कधी परत देणार’ म्हणून.

कॉलेजात मधल्या काळात दिशाचं माझ्याशी बोलणं जरा जास्तच ‘फॉर्मल’ व्हायला लागलं होतं. मी तिला एकदा सांगितलं मी विसरलो नाहीये सचिनबद्दल म्हणून. त्यावर ती ‘सीइंग इज बिलिव्हिंग’ इतकंच हसून म्हणाली...

सोमवार ११ सप्टेंबर २०००. मी कॉलेजात गेलोच नाही. ‘सोमवारी प्रॅक्टिकल्स नसतात, गणपतीच्या दिवसांत फारशी लेक्चर्स होत नाहीत’ अशी बंडलं मारून घरीच (खरं तर खाली दुकानात मोबाइल हातात घेऊन) बसून राहिलो. असं किती दिवस चालणार असा विचार करत दिवस निघून गेला. मोबाईलवरचा स्नेकचा एकच गेम खेळून कंटाळा आला होता. शंभरदा त्याची बॅटरी फुल करून झाली होती... शेवटी संध्याकाळी वैतागून बाहेर निघालो. आजूबाजूच्या त्या गाड्यांच्या आवाजात सातच्या आसपास फोन वाजलेला माझ्या बरोब्बर लक्षात आला - दस्तुरखुद्द अंजली तेंडुलकरांचा - सचिन आणि तेंडुलकर कुटुंबीय कॉलेजात येणार ही बातमी देणारा! ... पुढची दहा मिनिटं मी अक्षरश: थरथरत होतो. सगळं जग गरगर फिरतंय असं भासत होतं. आनंद गगनात मावेनासा होणं म्हणजे नक्की काय हे मला तेव्हा कळलं! घरी येऊन छोट्या बहिणीला घेऊन उड्या मारत मारत नाचलो. वडिलांनाही इतका आनंद झाला की मला ते तो मोबाइलच बक्षीस देतात की काय असं वाटून गेलं (पण तसं काही झालं नाही)!

पुढचे दहा दिवस मी नुसती धावपळ करत होतो. कुणाच्याही गावी नसलेल्या कार्यक्रमाचं आयोजन करणं म्हणजे नक्की काय हेही मला तेव्हा कळलं! ‘रंगवर्धन’च्या मंडळाच्या ही गोष्ट गळी उतरवणं (त्यांनी ती हसण्यावारीच नेली पहिल्यांदा), प्रोफेसर लोकांना पटवणं, इतर कवींना पाचारण करणं, ऑडिटोरियम, बॅनर इत्यादी छोट्या-मोठ्या गोष्टी मार्गी लावणं हे मला पहिल्यांदाच अनुभवायला मिळालं. कार्यक्रमाची जाहिरात करायची गरजच नव्हती. तिकिटं पटापट विकली गेली. बाहेरच्या रस्त्यापासून, कॉलेजच्या कॉरिडॉरपर्यंत दुतर्फा लोकांची गर्दी होती हे सांगायची गरजच नाही.

सचिननं दीप-प्रज्वलन केलं, आपल्या वडिलांची एक कविता वाचून दाखवली आणि इतर साहित्यिकांचा सत्कारही केला. सुमारे अर्धा-पाऊण तास स्टेजवर उपस्थिती लाभली त्याची. 

दिशा पहिल्या रांगेत बसून हे सगळं बघत होती. अख्ख्या कार्यक्रमात मला मी एका कुठल्या तरी स्वप्नात असल्यासारखं वाटत होतं... दिशा मला काय म्हणेल, कॉलेजातले सगळे कसं कौतुक करतील, कुशल कसा जळत असेल असे असंख्य विचार येत होते मनात.

भारावलेल्या प्राध्यापकांच्या आणि साहित्यिकांच्या गराड्यातून निघताना ‘तुझं सुरेख अक्षर बघून मी होकार दिला’ असं हसून म्हणून सचिननं  कोपऱ्यात उभ्या असलेल्या माझा हात हातात घेऊन निरोप घेतला!

सचिनचं हे निरागस वाक्य ऐकल्यावर आणि तो निघून गेल्यावर मात्र इतके दिवस चढलेली धुंदी खाडकन उतरली! भयंकर अपराधी वाटू लागलं. स्वार्थ साधण्यासाठी मी कुठल्या थराला गेलो, सचिनला त्याच्या भावनेला आवाहन करून असं बोलावायची काय गरज होती, हे अचानक जाणवलं.... हा एक उच्चांक न वाटता एक नीचांक आहे असं वाटायला लागलं, नव्हे – लक्षात आलं. सगळा उत्साह गळून गेला. पायांतली शक्ती निघून गेली.

कार्यक्रम संपला. लोक शाब्बासकी देत होते, मी कुणाशीही नजर भिडवू शकत नव्हतो. दिशानं धावत येऊन माझा हात हातात घेऊन ‘प्राउड ऑफ यू’ म्हटलं... मी मात्र खजील झालेला होतो. कसंनुसं हास्य चेहेऱ्यावर आणून ‘आता मला पुन: आणायला सांगू नकोस त्याला’ इतकंच तिला म्हणू शकलो...

- कुमार जावडेकर 

(क्रमश:)

पुस्तकासाठी दुवे:

भारत:

यु.के.:

अमेरिका:



1 comment:

  1. सचिन ची हजेरी म्हणजे अतिशय रोमांचक परिस्थिती असेल

    ReplyDelete

प्रतिसाद

संयोजक

श्रीकांत पट्टलवार, मीरा पट्टलवार, रवी दाते, मुकुल आचार्य, कुमार जावडेकर