Thursday, 26 June 2025

१. स्वागत

स्वागत 

रवी दाते 

पुणेकर, मुंबईकर की नागपूरकर मध्ये पुलं लिहितात की “मुंबईत जसे उन्हाळा आणि पावसाळा हे दोनच ऋतू असतात….”  त्याचप्रमाणे इंग्लंडच्या “नॉर्थ वेस्ट” मध्ये उन्हाळा आणि हिवाळा असे दोनच ऋतू असतात. पावसाळा बारा महिने असतो त्यामुळे त्याला स्वतंत्र ऋतूचे स्थान नाही. कदाचित यामुळेच वर्ड्सवर्थ साहेबांना कविता सुचण्यासाठी फार लांब जावे लागत नसावे. सततचा पाऊस आणि लेक डिस्ट्रिक्ट मधील वास्तव्य. मुंबईत असते तर ग्रीष्मातील उकाड्यात पावसाऐवजी घामाच्या धारांवर किंवा वैशाखातील वणव्यावर कविता सुचणे कठीणच. काही म्हणा, पावसाचे आणि कवितांचे अतूट नाते आहे आणि का नसावे?

या “रिमझिम गिरे सावन” ने सगळी सृष्टी कधी तारुण्याने बहरून उठते तर कधी  “टप टप बरसणाऱ्या पाण्याने” याच तारुण्यात "आग" लागते, असो!

या पावसामुळे सगळ्यांच्याच मनातून काव्य सहज उमटते, मग ते काव्य अगदी “येरे येरे पावसा” सारखे बालगीत असो की बालकवींचे “श्रावण मासी हर्ष मानसी” असो किंवा बोरकरांचे “गडद निळे गडद निळे जलद भरुनी आले” किंवा शांता शेळके यांची “आला पाऊस मातीच्या वासात”. 

पश्चिमाईचे वाचकही या काव्य स्पर्धेत मागे नाहीत. यंदाच्या सृष्टी विशेषांकात पावसाची वर्दी देणाऱ्या “बहावा”ची पश्चिमाईत वर्दी लावली आहे करुणा नेहुरकरांनी. याशिवाय इतर अनेक कवींनी कवितांचा पाऊसच पडलाय.

निसर्गाकडे वेगळ्या “दृष्टी”ने पाहणाऱ्या सलील तांबेंची मुलाखत घेतली आहे मीराताईंनी. या पावसाळ्यात घराबाहेर पडायचा कंटाळा आला तर घरबसल्या करायच्या उद्योगांचे मार्गदर्शन केले डॉक्टर शिंत्रे यांनी.

लतादीदींच्या गाण्यांचे विश्लेषण करून त्यातील बारकावे साध्या सोप्या भाषेत समजावावेत ते डॉक्टर आचार्यांनीच.

१२ जून हा पुलंचा स्मृतिदिन. या निमित्ताने जावडेकरांच्या “निवडक अपुलं” मधून छोटासा भाग पुलंना श्रद्धांजली म्हणून आणि त्यांच्याच कादंबरीतील पुढील क्रमशः प्रकरण तुमच्या मनोरंजनासाठी समाविष्ट केली आहे .

याशिवाय यंदाच्या सृष्टी विशेषांकाच्या निमित्ताने "डिंगूच्या कट्ट्यात" पूर्वी गोठे या आपल्या बाल मैत्रिणींनी काढलेली सुंदर निसर्ग चित्रे आपल्याला नक्कीच आवडतील.

"गंमत जंमत" सदरातील संजय कुलकर्णींचे वैश्विक योगायोग आपल्याला आश्चर्यचकित करतील

प्रतिक्रिया लिहिण्यात अडचण असेल तर अस्मादिकांचा “अपमानकारक” लेख मदतीला आहेच.

पश्चिमाईचा वाचक वर्ग दिवसेंदिवस वाढत आहे हे आनंदाची गोष्ट आहे, तसाच प्रतिसाद नवनवीन लिखाणाने द्यावा.

कळावे, लोभ आहेच, तो वाढावा आणि लिहून कळवावा.

 - रवी दाते.


No comments:

Post a Comment

प्रतिसाद

संयोजक

श्रीकांत पट्टलवार, मीरा पट्टलवार, रवी दाते, मुकुल आचार्य, कुमार जावडेकर