अपमान - कसा, किती, कुणी आणि कुठे?
रवी दाते
आपण ऐकतो की ‘शब्द’ हे शस्त्रासारखे असतात, जपून वापरले नाहीत तर जिव्हारी लागतात, अपमानित करतात. ट्रम्प तात्यांनी तर सर्व आंतरराष्ट्रीय संकेत मोडून, स्वतःच्या देशात बोलवून, युक्रेनच्या राष्ट्र
प्रमुखांचा भर दरबारात अपमान केला आणि रशिया युक्रेन युद्धाची दिशाच बदलून टाकली. युरोपीय देशांना अचानकपणे हे ‘आपले युद्ध’ असल्याचा साक्षात्कार झाला; युक्रेनला आपण
अमेरिका आणि रशिया अशा दोन्ही बाजूंनी कोंडीत पकडले गेल्याची आणि आपल्या नैसर्गिक
संपत्तीला आपण मुकणार याची स्पष्ट जाणीव झाली; तसंच अमेरिका हा देश, चीन प्रमाणेच आता कोणाचाही मित्र नाही हे सगळ्या जगाला जाणवलं. आणि ही सारी किमया फक्त काही शब्दांची!!
आपल्या घरात आणि समाजातही आपण काही कमी अपमान
करत नाही पण त्यांचे परिणाम एवढे दूरगामी नसतात. परिस्थितीनुरूप आणि तीव्रतेप्रमाणे अपमानाचे स्वरूपही बदलते - सासूने सुनेचा चारचौघात केलेला ‘पाणउतारा’ असतो, महाराष्ट्रातील भाषिक अभिमानी व्यक्तींचा
होतो तो ‘अवमान’, जर त्या
शब्दांनी आपली समाजातील प्रतिमा डागाळत असेल तर ती ‘मानहानी’, लहानांनी मोठ्यांचा केला तर तो ‘उपमर्द’ आणि एखाद्याला तुच्छ लेखताना होते ती ‘अवहेलना’.
उघड उघड छातीठोकपणे न करता, तिरकस
बोलून थोडा ‘खालच्या दर्जाचा’ अपमान करायचा असेल तर त्यासाठी वापरायची
क्रियाविशेषणे ‘कुजकट’, ‘उपहासात्मक’ आणि ‘घालून
पाडून’.
आपण अपमान करतोय की नाही याचा पत्ता लागू न
देता सौम्यसा अपमान करण्यासाठी वापरायचे शब्द म्हणजे ‘टोमणा’ किंवा ‘शालजोडीतले’.
अपमानांचे एवढे उपप्रकार बहुधा फक्त आपल्या
मायबोलीतच असावेत, इतर भाषांच्या नशिबी हे
भाग्य नाही. उगाच नाही मिळाला अभिजात भाषेचा दर्जा.
ह्या उपप्रकारांच्या भाषेतच बोलायचं झालं तर ट्रम्प तात्यांची वागणूक ही ‘मानहानीकारक’ आणि झेलिंन्स्किंची ‘अवहेलना’ करणारी होती. पण असो, आपल्याला नक्की किती आणि कुठल्या
दर्जाचा अपमान केला या भाषिक वादात पडायचे नाही. भाषिक
वादावरून आठवलं की या युद्धाचे एक कारण भाषिक वाद हेही होते. दहा वर्षांपूर्वी लोहांस, डंबास्क आणि डेनिस्क या प्रदेशातील लोकांवर रशियन भाषा लादण्यात या
युद्धाची नांदी होती असे म्हणतात. त्या मानाने आपण
महाराष्ट्रीयन लोक बरे, “मराठीने
कानडी भ्रतार” करून भाषिक सीमावाद
बेळगावला संपवला, भाषेच्या प्रश्नावरून युद्ध केले नाही.
किमान शब्दात कमाल अपमान करण्यासाठी
महाराष्ट्रातील काही शहरे प्रसिद्ध आहेत. परंतु त्या शहरांच्या या अद्भुत कलेस आव्हान देण्यात वैद्यकीय क्षेत्रही
फार मागे नाही. निदान मी वैद्यकी शिकत असताना तरी ही
कला तत्कालीन वैद्यक विश्वात फारच पुढे गेली होती. आपल्या हुद्द्याची मिजास दाखवून ज्युनिअर्सची अवहेलना करायचा माज
सर्वसाधारणपणे सीनियर रजिस्ट्रार लेव्हलला येऊ लागायचा. एकदा एका सीनियर रजिस्ट्रारला ज्युनियरने काही
प्रश्न विचारला; बहुधा “हे
असे का?” असा प्रतिप्रश्न
केला असावा. त्याच्या या ‘उद्धटपणाला’ उत्तर म्हणून त्याने आपल्या बॅजकडे बोट दाखवत जूनियरला विचारले,
“या बॅजवर काय लिहिले आहे?”
“सीनियर रजिस्ट्रार.”
“तुझ्या बॅज वर काय लिहिले.”
“इंटर्न.”
“म्हणून (कळल?)” केवळ एका शब्दात कमालीचा अपमान!!!
या पद्धतीने अपमान करण्याचे बाळकडू बहुधा
तत्कालीन आयांकडून मिळत असावे. मुलांनी विचारलेल्या “why is brick red?” “आकाश निळे का असतं?” या सारख्या असंख्य
प्रश्नांचं त्यांना गप्प करण्यासाठी एकच उत्तर असायचं “मी सांगते म्हणून”.
आम्हाला एक अतिशय हुशार प्रोफेसर होते. मूळचे ग्रीसचे, पण त्यांचे कोणीतरी वंशज “पुण्यनगरीतून” आल्यासारखं त्यांच्या अपमान करण्याच्या पद्धतीवरून वाटायचं. अगदी काही कारण नसताना सहज बोलता बोलता कमालीचा अपमान करायचे. एकदा ते परीक्षक म्हणून माझ्या मित्राच्या नशिबी आले. त्याकाळी त्यांच्याकडून तोंडी परीक्षेत नेहमी केला जाणारा अपमान म्हणजे सरळ नापास झालास असे न सांगता “समोर ते वठलेलं झाड दिसतंय? त्याला पालवी फुटली
की मग पुन्हा या, तेंव्हा बघू” असं सांगायचे. किंवा शरीरशास्त्राच्या तोंडी परीक्षेत जर तुम्ही घसरत असाल तर शेवटचा प्रश्न विचारला जायचा, “बरं आता सांग, हृदय छातीमध्ये उजवीकडे असतं का
डावीकडे?” हा प्रश्न आला म्हणजे नक्की समजावं की यापुढे
अजून नाचक्की होणे बाकी नाही.
कधीकधी या अपमानाचे फायदेही असतात. कवी भूषण हा शिवरायांचा
राजकवी होण्यापूर्वी घरात नुसता रिकामटेकडा बसलेला असायचा. सगळ्यात धाकटा भाऊ म्हणून सगळे लाड करायचे. पण
मोठ्या भावांची लग्नं झाली, त्यांच्या बायका आल्या आणि
एके दिवशी पानात मीठ कमी पडले म्हणून भूषणने मिठाची मागणी केली. वहिनीने उत्तर दिले “चिमूटभर मीठ कमवायची तरी
अक्कल आहे का तुम्हाला भावजी?” या अपमानाच्या तिरीमिरीत
भूषण घराबाहेर पडला आणि पुढे आपल्या प्रतिभेने राजकवी बनला.
पण कधी कधी या अपमानाचे शल्य एवढे जिव्हारी
लागते की महाराजांच्या दरबारात
आपला गमावलेला आत्मसन्मान पुन्हा मिळवण्यासाठी मराठी राज्याचे सरसेनापती प्रतापराव
गुजर इरेस पेटतात आणि बहलोल
खान समोर दिसल्यावर एवढे संतापतात की आपोआप त्यांच्या म्यानातून
उसळते तलवारीची पात आणि त्या वेडात खानाच्या दिशेने
मराठे वीर दौडले सात. त्या आत्मघातकी कृत्यामुळे मराठी
दौलतीचे एवढे नुकसान झाले की महाराजांनाही कदाचित प्रतापरावांना
अपमानास्पद बोलल्याची चुटपुट लागून राहिली असेल.
परंतु तो काळच वेगळा होता. सध्याच्या काळातले गुजर (युक्रेन) खानाबरोबर (रशिया बरोबर) हात मिळवणी करून तात्यांकडून
झालेल्या अपमानाचा बदला घेण्याची तयारी करू लागले तरी आश्चर्य वाटायला नको.
कालाय तस्मै नमः!
- रवी दाते ८ मार्च २०२५.
व्वा! अपमान एवढा आवडू शकतो हे तुमचा लेख वाचून कळलं.
ReplyDelete"अपमान" "आवड"ल्याबद्दल धन्यवाद!! अपमानाची आवड निर्माण झाली नाही म्हणजे मिळवली!!
ReplyDeleteHya lekhala maanache paan!
ReplyDeleteझकास!! अपमानाला रंजक बनवलेस! मला क्लिनिक मध्ये अपमान बऱ्याचदा दिसतो - पेशंट मान अवघडून अप -मान घेऊन येतो!!😂😂
ReplyDeleteचाणक्यांच्या अपमानामुळे अख्खे भारत बदलून गेले- मौर्य साम्राज्य आलं
ReplyDeleteगांधींना पण साउथ आफ्रिका मधल्या रेल्वे मधून हाकलून दिल्याचा अपमानातून सिविल डिसोबेडियन्स ची मोहीम सुरू झाली
अगदी चपखल उदाहरणं आहेत,🙏
Deleteरवी दाते आपल्या लेखातून आमच्या द्यानात भर पडली, धन्यवाद!
ReplyDeleteएकदम मस्त, अपमान ह्या शब्दाला इतके समानार्थी शब्द आहेत, आपल्याला ते सगळे माहित आहेत पण इतके चपखलपणे कुठे आणि कसे वापरतात हे अचूक मांडले आहे, आणि सध्याच्या राजकीय परिस्थीतिचे उदाहरण. खूप मजा आली वाचायला.
ReplyDelete😄 छानच लिहिलंस रवि!
ReplyDeleteअपमानाचे प्रकार आणि गोष्टी फारच छान सांगितल्यास. हसूही आलं आणि विचारही करायला लागलं.
Enjoyed reading it 👏