बैय्या ना धरो
डॉक्टर मुकुल आचार्य
काही दिवसांपुर्वी युट्युबवर
स्वैर संचार करत असतांना अचानक ‘दस्तक’ ह्या
चित्रपटातील एक गाणे दिसले. ह्या चित्रपटातील गाण्यांच्या चाली, मदन मोहन कोहली ह्यांनी
अतिशय भावमधुर अशा स्वरांमध्ये गुंफ़ल्या आहेत. त्या गाण्यांपैकी
नेमके ‘बैय्या ना धरो’ हे गाणे ऐकण्यात
आले. रात्रीच्या शांत वातावरणात ते गाणे ऐकत असतांना त्यातील अनेक बारकावे उलगडत गेले
आणि हा लेख मनःपटलावर उमटत गेला. तो लेख आज पश्चिमाईच्या तिसऱ्या अंकानिमित्त प्रकाशित
होत आहे.
‘बैय्या ना धरो’ हे अतिशय मधुर पण क्लिष्ट चाल असलेले
गाणे आहे.
एका रागातून दुसऱ्या
रागात सहजरित्या संचार करणारी चाल. मुखड्यामध्ये दुसऱ्याच ओळीत स्वरावली बदलते आणि स्वर लहरींचा हा हिंदोळा कडव्यात तर अजून वाढतो!
'ढलेगी चुनरीया तन से' च्या पुढची ओळ हसेगी रे चुडिया ‘छन से’ अशी
आहे.
त्या ‘छन
से’ मध्ये मदन मोहन ने अशी काय रचना केली आहे आणि दिदींनी जी जादू केली आहे ना
की ते ‘छन से’ ऐकताना आपल्याला चक्क
स्वरांच्या त्या बांगड्या एखाद्या सुंदर ललनेचा हातांच्या मोहक हलचालींमुळे किणकिणतांना
ऐकू येतात! हा स्वर्गीय अनुभव आहे आणे डोळे मिटून हे कडवे ऐकले तर डोळ्यांसमोर चक्क
आय-मॅक्स पडद्यावर एका सुंदर तरुणीच्या गोऱ्या मनगटांवर (इथे उर्दू मधला ‘कलाई’ शब्द इस्तेमाल केला तर त्यात एक हळूवार,
नजाकत येतो!) त्या रंगाची उधळण करणाऱ्या "चुडी नही मेरा दिल है" मधल्या चुडिया
दिसायला लागतात.
आणि त्या
पुढची ओळ ‘मचेगी झनकार’ जेव्हा येते तेव्हा
मात्र कहर होतो - त्या ‘झनकार’ शब्दाकरता
बहुतेक मदन मोहन ने पूर्ण गाणे बांधायला जितका वेळ घेतला असेल
त्याहून किमान दुप्पट वेळ घालून (घालवून नव्हे, वाया गेला नाही तो वेळ!) त्याची चाल
बांधली आहे. तार सप्तकाच्या षड्जापासून मध्य सप्तकाच्या षड्जा पर्यंत होणारा तो प्रवास
म्हणजे डोंगर माथ्या वरून वेगाने खाली केबल कारने येत असतांना चोहीकडून उधळत असलेल्या
स्वर तुषारांनी चिंब भिजून जावे अशी अनुभूती देणारा आहे!
आणि दिदींच्या
त्या गळ्यातून उगम पावणारे ते स्वर तुषार जेव्हा अपल्या कानावर पडतात, तेव्हा तर असे
वाटते की ती केबल कार अवेगाने उतरत असतांना बरोबर सहा ठिकाणी, मोक्याच्या वळणांवर क्षण
भर थांबत अलगद जमीनीवर उतरवते आणि ते पण केबल कार माध्ये
आपला हात अलगद धरूनआपल्या बाजूला कुणी तरी जन्नत की परी बसली असल्याची अनुभूती होते
- हे कडवं आणि ही झनकार शब्द असलेली ओळ तुम्ही डोळे मिटून एकदा
एकटे असतांना ऐका - तुम्हाला सुद्धा
ही अनुभूती नक्की येईल!
हीच अनुभूती दुसऱ्या
कडव्यात सुद्धा होते - रहा मोहे निहार!
तो निहार शब्द दिदींनी
इतक्या हळुवारपणे गायला आहे की त्या सुंदरीला तो कौतुकाने निहारणारा
तरूण सुद्धा लाजेल आणि त्या सुंदरीच्या काळजाचे पाणी होईल!
हे सर्व सांगण्याचे
प्रयोजन ह्या करता की इतकी क्लिष्ट चाल, त्यातले गाण्याच्या
मध्ये वाजणारे ते संगीताचे मुलायम तुकडे, हे सर्व लता दिदींनी केवळ दोन वेळा ऐकून ती
अवघड चाल आत्मसात केली, त्यातले झनकार, निहार, असल्या शब्दातले स्वरांचे बारकावे
फक्त परत एकदा समजून घेतलेत आणि संपूर्ण गाणे त्या मोठ्या वाद्यवृंदा बरोबर, त्या
अतिशय कसलेल्या आणि गुणी साजिंद्यांच्या साथीने केवळ एका टेक
मध्ये एक ही गलती न करता गायले आणि आपल्या सारख्या
श्रोत्यांना त्या आयुष्य भरा करता भारवून गेल्यात!
धन्य आहेत स्वरांची बरसात
करणाऱ्या त्या दिदी, ते सर्व गुणी साजिंदे, ते मजरूह आणि तो "काबिल-ए-तारीफ" मदन मोहन.
ही झाली बैया ना धरो
ची कथा. ‘ओ माई री’ ची बात तर गहजब आहे, पण ती और कभी ऐकवीन.
त्या काळातील गाणी आणि आजची गाणी ह्यांच्या मध्ये जमीन-आसमानाचा फरक
आहे!
मी गाण्याची ‘तर्ज’ बांधल्यावर ते माझ्या आवाजात किंवा एका
डमी गायकाच्या आवाजात ती चाल मुद्रित करून गायक/गायिकेला पाठवतो.
मग गायक ती चाल ऐकतात,
आत्मसात करतात आणि रेकॉर्डींग स्टुडीओमध्ये येतात.
तोपर्यन्त
ती चाल पेटी/कीबोर्ड वर वाजवून, त्या बरोवर फक्त एक किंवा दोन ताल वाद्यांची
संगत घेऊन ट्रॅक तयार केलेला असतो.
गायक मग ते गाणे त्यांच्या
आवाजात रेकॉर्ड करतात, त्या ट्रॅक मधल्या सूर आणि
तालाचा आधार घेऊन आणि हे सर्व एका टेक
मध्ये होत नाही - संगणक यंत्र वापरून डिजिटल पद्धतीने एक एक ओळ ध्वनी मुद्रित केली जाते,
म्हणजे हवी तशी गाण्यातली
जागा आली नाही तर त्याच ओळी पासून पुन्हा सुरूवात करून गाणे रेकॉर्ड केले जाते
हे सर्व सोपस्कार झाल्यानंतर त्या ट्रॅकवर उर्वरीत संगीत,
मधले तुकडे आणि पार्श्व-संगीत ध्वनीमुद्रित केले जाते!
अर्थात आजही खूप गुणी गायक कलाकार आहेत जे
कमी टेक्स् मध्ये गाणे रेकॉर्ड करतात. पण लता दिदी, आशा ताई, किशोर दा,
रफी साहेब, तलत, ह्या सगळ्यांची बात ही कुछ और थी!
डॉ. मुकूल आचार्य
लिव्हरपूल
इंग्लंड
१७/०४/२०२१
पहाटे ०४:०० वा.
ता.क.: ‘बैया ना धरो’ ह्या गाण्याच्या आठवणीने, त्या सुरांनी भारावून जाऊन हा लेख विचारांच्या प्रवाहाबरोबर टाईप करत गेलो.
khup divasanni tumcha lekh vachayla milala...sundar!!!
ReplyDelete