DIY आणि माझे प्रयोग
डॉ आनंद शिंत्रे

DIY (Do-It-Yourself) हा नवीनच शब्द मी १९९४मध्ये इंग्लंडमध्ये
नोकरीसाठी आलो तेव्हा पहिल्यांदा ऐकला. कृषि रसायने बनवणाऱ्या दोन वेग-वेगळ्या
गावातील कारखान्यांची जबाबदारी माझेकडे होती. भारतापेक्षा प्रकर्षाने जाणवलेला फरक
म्हणजे व्यवस्थापनातले अतिशय कमी स्तर. बहुतांशी कामगारांकडे (Operators) असणारी बहुविध कुशलता (Multi-Skilling) आणि दिलेले काम स्वतःच अधिकाधिक कार्यक्षमतेने करण्याच्या प्रामाणिक
वृत्तीमुळे त्यांच्या मागे लागून काम करवून घेणारे सुपरवायझर / शिफ्ट मॅनेजर यांची
अगदी मोजकी संख्या होती. औद्योगीक कामगार संघटनांच्या सावलीत राहून कामचोरी करूनही
अधिकाधिक मागण्या पदरात पाडून घेण्याच्या त्या काळच्या (..?) भारतीय रसायन-क्षेत्राच्या वातावरणाशी हे चित्र विसंगत होते.
प्रक्रियेच्या रिएक्टर मधून ठराविक वेळी नमुने (Samples)
काढणे , त्याचे आवश्यक मोजमाप/पृथ्थकरण करणे, प्रक्रियेबद्दल अचूक आणि प्रामाणिक नोंदी
ठेवणे ,कच्चा माल गोडाउन मधून फॉर्क लिफ्ट ट्रक चालवत
रिएक्टर जवळ आणणे आणि काळजीपूर्वक योग्य पंपाच्या सहाय्याने भरणा करणे, रासायनिक प्रक्रिये मधून उत्सर्जित दूषित द्रव्यांची, घातकी वायूंची विल्हेवाट लावणे / प्रक्रिया
करणे अशी अनेक कामे त्यांच्या १२ तासांच्या शिफ्ट/
पाळी मद्धे बिनचूक आणि बिनतक्रार पार पाडत असताना प्रोसेस बद्दल विविधांगी
सुधारणाही सुचवत. आठवड्यात दोन दिवस आणि दोन रात्रपाळी करून, ही शालांत परीक्षाही अनुत्तीर्ण मंडळी, मधले ३ दिवस
सुट्टीवर (किंवा बाहेरचे दुसरे काम करीत) असत. नुसते घरात बसून ३ दिवसांची सुट्टी
घालवण्यापेक्षा ही मंडळी त्यांच्याकडे असणाऱ्या landscaping, carpentry, brick - laying , roof repair, electrician , plumbing ,कार दुरुस्ती, lorry-driving इत्यादि प्रकारचे कुशल जोड-व्यवसाय करून भरपूर कमाई करीत. यातले काहीजण
आता यशस्वी लघु-उद्योजकही झाले आहेत.
भारतातून इंग्लंडला आल्यामुळे आमच्या दैनंदिन जीवनातही
बरेच बदल झाले होते. स्वयंपाक, घराची स्वछता, धुणे-भांडी, कपड्यांची
इस्त्री, ड्रायविंग ही सगळी कामे आता स्वतःकडेच आली होती !
घराची हीटिंग सिस्टम,
बॉयलर, सेक्युर्टी अलार्म सेटिंग, लॉन कापणे, घराचे रंगकाम, डेकोरेशन,
भिंतींवर पडद्यांचे रॉड अगर Blinds बसवणे,
जमिनीवर टाइल्स / laminate बसवणे ही
कामे हळूहळू जमू लागली आणि नव्याने इथे येणारी अननुभवी (भारतीय) मित्र मंडळी सल्ला
विचारू लागली ! सुरवातीला ही सगळी कामे स्वतःच पार पाडणे ही हौसेपेक्षा गरज होती.
अशी बारीक सारीक कामे करायला दर वेळी Handyman बोलावणे ही खर्चिक बाब होती. शनिवार आणि रविवार ही दोन दिवस सुट्टी या
कामांसाठी अगदी योग्य वेळ होती.
DIY चा इतिहास: DIY म्हणजे बऱ्याच जणांना IKEA मधून विकत
आणलेले पेटी-पॅक उघडून कपाटे अगर शेल्फ बनवणे किंवा घराचे रंगकाम करणे असे वाटते.
पण DIY ही चाकोरीतील गोष्टींपलिकडे जाणारी
मनोवृत्ति (स्टेट ऑफ माइंड) आहे. म्हणून आपण याचा थोडा इतिहास किंवा कारण मीमांसा
समजून घेऊ. मॅंचेस्टरचे आणि लंडनचे सायन्स म्यूजियम, आमच्या
रेडिंग मधले MERL (म्यूजियम ऑफ इंग्लिश रूरल लाइफ)
या ठिकाणी अनेक क्षेत्रातल्या अवजारांचे क्रमवार मांडलेले प्रदर्शन आपल्याला
अंतर्मुख करते. “गरज” ही शोधाची जननी खरी, पण “संधि” हा
शोधाचा बाप आहे असे कुणीतरी म्हटले आहे. पण गरजेपोटी शोध लावायला योग्य हत्यारे
मिळण्याची संधि आणि त्यांचा वापर करण्यासाठी जिज्ञासू वृत्ती मात्र असायला हवी.
दुसऱ्या महायुद्धानंतर इंग्लंडमध्ये भाजीपाला
महाग आणि दुर्मिळ झाला ,पण त्यातूनच सामान्य लोकांना स्वतः
कसून भाजीपाला उगवण्यासाठी allotment चे छोटे
प्लॉट सरकारकडून विनामूल्य उपलब्ध झाले आणि त्यातून देशभरात भाजीपाला उत्पादनातील
वेगवेगळे प्रयोग करणाऱ्यांच्या भावी पिढया तयार झाल्या. महायुद्धानंतर युरोपभर
पुनर्बांधणीचे युग सुरू झाले. युद्धकाळात वस्तू नादुरुस्त झाल्यास, फेकून न देता शक्यतो दुरुस्तीसाठी खटपट करणे ही सामाजिक ठेवण वाढीस लागलीच
होती. साधारण १९५० आणि १९६० च्या दशकामध्ये जगभरात DIY साठी सुवर्णयुग अवतरले. लोकांच्या हातात थोडा पैसा खेळू लागला, अनेक हत्यारे त्यांच्यातील नवनवीन सुधारणांमुळे वापरायला सोपी आणि अधिक
कार्यक्षम झाली. स्वतःच्या हाताने काही नवीन वस्तू बनविण्याचे छंद जोपासले जावू
लागले. लहान मुलांच्या यांत्रिक सृजनशीलतेला वाव देणाऱ्या खेळण्यांपैकी “मेकॅनो”चा
जन्मही याच दशकातला !


DIYचा च्या इतिहासात, १६८३-८५ मध्ये जोसेफ मॉक्सन याने लिहिलेले “Mechanic Exercises” नावाचे पुस्तक हे आद्य DIY चे पहिले Manual समजतात. या पुस्तकात लोहारकाम, धातूंचे ओतकाम ,कोरीवकाम, सुतारकाम ,नकाशे
बनविणे इत्यादि विषय हाताळले होते. वाफेच्या इंजिनाचा १७६९ मध्ये शोध लावणाऱ्या
जेम्स वॉटचे वर्कशॉप आणि त्याच्या हस्त-लिखित नोंदी आजही स्फूर्ति देतात.
क्रांतिकारी यंत्र Lathe (लेथ्)च्या अनेक सुधारणा
या काळात अनेक देशांमध्ये झाल्या आणि मग कारागिरांच्या कुशलतेला अशा बहुआयामी
यंत्राची सुंदर जोड मिळाली. युरोपातल्या त्या काळातील महिलाही यामध्ये मागे
नव्हत्या. मेरी गॅसकॉइन (Mary Gascoigne) या बाईने १८४२
मध्ये लेथ् वापरुन Woodturning केलेल्या
कामाबद्दलचे पुस्तक प्रकाशित केले. Samuel Smilesचे
१८५९ मधले 'Self Help: With illustrations
of character and conduct' ही पुस्तकही विचार करायला लावणारे
आहे. दुसऱ्या महायुद्धानंतर युरोपभर आत्मनिर्भरतेवर (Self-reliance)दिलेला भर म्यूजियममधल्या Dig For Victory, Make Do and
Mend, Grow Your Own Food इत्यादि घोषणांची भित्तिपत्रके(posters) पाहताना लक्षात येतो. DIY ला वाहिलेले
सुमारे ७०-वर्षापूर्वीचे इंग्लिश मासिक (फोटो १) पहा.
पाश्चात्त्य जगात DIY लोकप्रिय होण्याचे महत्वाचे कारण म्हणजे
छोट्या कामांसाठी येणारा न परवडणारा खर्च. यांत्रिक अवजारांच्या सुधारणांमध्ये
एकट्या माणसाला वापरता येईल अशी नवी हत्यारे बाजारात उपलब्ध झाली. त्यांच्या
वापराबद्दल सविस्तर माहिती देणारी पुस्तके/साहित्य आले. आत्ता तर इंटरनेटमुळे नवीन
अवजारांचा कार्यक्षमतेने कसा वापर करावा याचे विनामूल्य शिक्षण मिळते आहे. अशा या
लोकप्रिय DIY मार्केटला काबिज करणारी B&Q ही दुकान शृंखला Richard
Block आणि David Quayle यांनी
१९६९ मध्ये इंग्लंडच्या Southampton मधून सुरू केली. इंग्लंडमधली
माझी आवडती इतर दुकाने/शॉपिंग म्हणजे म्हणजे IKEA, WICKES, ToolStation,
वेगवेगळी गार्डन सेंटर्स हीच आहेत. टीव्ही वर बीबीसी / Channel-4च्या माझ्या आवडत्या मालिका म्हणजे Stacey
Solomon’s Renovation Rescue, Repair Shop, Sewing Bee, Bake-off, Great Pottery Throw Down, Britan’s Best
Woodkeeper, Landscape. Artist of theyear, Make it at market इत्यादि. हे प्रोग्राम पाहून
तुमच्या मनात सहजच नवीन कल्पना सुचतात. जुन्या काळी बीबीसीवर Barry
Bucknell च्या DIY शो ने
लोकप्रियतेचे नवे उच्चांक गाठले होते आणि बीबीसी वर आठवड्याला ४००००
प्रेक्षकांच्या पत्रांचा पाऊस पडत असे मी ऐकून आहे !
DIY आणि मी: १९६०च्या दशकात मी अर्थातच् भारतात होतो. माझे वडील सूतगिरणीचे तंत्रज्ञ
होते. ते इंग्लंडहून मागवलेली Woodcraft आणि Kodak चे Photography मासिके वाचून
त्यातील काही वस्तू / प्रयोग करीत. “सृष्टिज्ञान” मासिकात दिलेली शास्त्रीय खेळणी
आम्ही नेमाने घरी बनवायचो. “How Things Work” अशा
काहीशा नावाचे एक मोठे पुस्तकही आमच्या घरी होते,
त्यात घड्याळाचे यंत्र ,कारचे इंजिन, स्टीम इंजिन, एरोप्लेन, मोठ्या
बोटी यांच्या यंत्रणेचे सविस्तर वर्णन आणि आकृत्या होत्या. आमच्या गावातली सॉ-मिल,
कास्ट आयर्नची फौंडरी, गूळ आणि साखरेचे
कारखाने वयाच्या १३-१४ वर्षाआधीच वडिलांनी मला तिथे नेऊन सविस्तर दाखवले होते. मी
नववीत असताना उन्हाळी सुट्टीत वडिलांनी माझ्या कॅमेऱ्यात फिल्म घालून कापसापासून
सूत बनवण्याच्या पूर्ण प्रक्रियेचे फोटो काढवून त्या प्रत्येक processची माहिती लिहून पुस्तिका बनवण्याचा प्रोजेक्ट माझेकडून करून घेतला होता !
त्या काळातच वडिलांनी Origami, Fretwork अशा
अनेक छंदान्ची ओळख करून दिली होती. दरवर्षी बनणाऱ्या दिवाळीच्या आकाशकंदीलांची
बांधणी, किल्ल्याची रचना, गणपतीची
नवनवीन आरास या आम्हाला आपले DIY कलाकौशल्य
दाखवण्याच्या सुवर्णसंधि असत.
माझ्या इंग्लंडमधील तीस वर्षांच्या वास्तव्यात ८-९
वेळा घर बदलण्याचे प्रसंग आल्याने वारंवार नव-नवीन हीटिंग आणि शोभिवंत इलेक्ट्रिक दिव्यांची फिटिंग ,
किचन आणि बाथरूममधली फिटिंग, घराचे वेगवेगळ्या
प्रकारचे रंगकाम, इन्स्युलेशन, कौलारू
छतांची देखभाल,बागेतली विविध कामे यामुळे DIY ची जाण आणि आवड वाढत गेली ! आता गेल्या वर्षीच माझ्या मित्राने दिलेल्या
लाकडांच्या तुकड्यांमधून गॅरेजसाठी ६फू x ६ फू x १.५ मापाचे शेल्फ, किचनसाठीची
एक ट्रॉली आणि दोन चौरंग यांच्या निर्मितीचा आनंद मिळाला. (फोटो २,३) या कामासाठी इलेक्ट्रिक स्क्रू ड्रायवर , इलेक्ट्रिक
सर्क्युलर करवत वापरल्याने खूपच वेळ वाचला. आमच्या एका घरच्या बागेत अडलेला
सूर्यप्रकाश येण्यासाठी इलेक्ट्रिक करवतीने ६ झाडे कापून सरळसोट ८-१० फुट उंचीचे
खांब बनवले (फोटो ४ ) पण त्यापासून बागेत बसण्याचे बाक बनवायचे स्वप्न राहून गेले
पण झाडे कापण्याचा प्रचंड खर्च मात्र वाचला ! दर वर्षी घराभोवतीच्या फरसबंदी (walkway & patio) यावरचे शेवाळे/मातीचे डाग Jet-washer वापरुन स्वछ्छ करणे हे माझे एक आणखी आवडते काम आहे.
रस्त्यांची फरसबंदी (paving) करताना जे पाणी मुरण्यासाठी छिद्रे पाडतात त्यातून
दंडगोलाकार दगडी भक्कम एकसारखे तुकडे निघतात. असे तुकडे रस्ता बनवणाऱ्यानी मला
फुकट दिले, हे तुकडे घरामागच्या बागेत सर्व बाजूना वाफ्यांची
आणि लाकडी शेडभोवती किनार (बॉर्डर)आणि सौर- कारंज्यासाठी चबुतरा बांधण्यास उपयोगी
पडले. (फोटो ५,६) आणखीही एका बांधकामातून उरलेले चौकोनी
सीमेंटचे तुकडे मिळाले त्यामधूनही फुलझाडाच्या वाफ्या भोवतीची ४० फुट लांब आकर्षक
किनार घरच्या दर्शनी भागात झाली.प्रत्येक टाकून देण्याच्या वस्तूतून बरीच काही
नवनिर्मिती (सध्याच्या भाषेत “सर्क्युलर-इकॉनमी”) साध्य होऊ शकते. टाकावू
पुठठयापासून बनलेली लॅम्पशेड (फोटो ९),प्लायवूड कोरून
बनवलेल्या (fretwork) अनेक वस्तूंपैकी देवघर आणि वाघाचे
पोर्ट्रेट (फोटो ७,८,) हे त्याचे नमुने
आहेत. या कोरिवकामातून निघालेले तुकडे वापरुन ग्रीटिंग कार्डे बनवता येतात (फोटो
१०). लाकूड पट्ट्या सुबक/रेखीव कापण्याची सवय झाली की घरच्या सुशोभीकरणात
महत्वाच्या असलेल्या बॉक्स टाइप फ्रेम घरीच बनवणे सहज शक्य होते (फोटो ११).
इंग्लंडमध्ये अनेक छोट्या शहरात महिन्यातल्या ठराविक दिवशी हौशी आणि अनुभवी
सेवानिवृत्त मंडळी एकत्र जमून Walk-In
Repair-Café चालवतात. तिथे आपले बिघडलेले
टोस्टर, मिक्सर, लॉन-मोवर, वॅक्युम-क्लीनर,मुलांची जुनी खेळणी घेऊन गेलात तर
(माफक दरात/ ऐछ्छिक देणगीवर) दुरुस्त करून देतात! अशा एखाद्या कॅफेला भेट द्याल तर
तिथले उत्साही आणि आनंदी वातावरण तुम्हाला नक्की DIY साठी ऊर्जा देईल.
TV व्यतिरिक्त माझे DIY शिक्षण आजही “यू-ट्यूब” विद्यापीठात छान चालू आहे. अनेक वस्तूंचे उत्पादक
किंवा हौशी तज्ञ तिथे कुठल्याही DIY विषयावर
प्रात्यक्षिके दाखवत असतात. आजच्या लहान आणि तरुण पिढीला ही विद्या शिकण्यासाठी
दुसरीकडे जायलाच नको- केवळ जिज्ञासू वृत्ती आणि चिकाटी हवी ! गेल्या २-३ वर्षात
आमच्या बागेत फळ-भाज्या पिकवण्याचे आणि वेगवेगळी फुलझाडे वाढवण्याचे अनेक DIY प्रयोग केले. वेगवेगळ्या जातींचे टोमॅटो-बटाटे, मिरच्या,
गाजरे, वांगी, मटार,
घेवडा, भोपळा,सेलरी,
पालक, कोथिंबीर, लसूण ही
अगदी बियाण्यापासून वाढवण्याचा आनंद अनुभवला आहे.काही फसलेल्या प्रयोगातून पुढच्या
वर्षीसाठी खूप काही शिकलो आहे. या सगळ्यातून कुठल्या महिन्यात काय बागकाम करायचे
याचे वेळापत्रक आखावे लागते. ग्रीनहाउसमध्ये बियाण्यापासून
रोपे बनविणे, त्यांचे योग्य वेळी आणि योग्य प्रकारे त्यांचे
जमिनीत रोपण करणे, माशा-कीटक, गोगलगायी
, बुरशी आणि तण यापासून संरक्षण यामध्ये बरेच DIY आहे ! कारच्या जुन्या टायर किंवा जुन्या बादल्यांमद्धे बटाटे पिकवणे,
कमी जागेत काकडी/टोमॅटोची vertical लागवड
करण्यासाठी खास कुंड्या बनवणे (फोटो १२ ) हे सुद्धा यू ट्यूब विद्यापीठातून
गरजेपोटी शिकलेले ज्ञान आहे !
मी भारतातून इथे आलेल्या अनेक तरूणांशी बोलतो तेव्हा
त्यांच्या DIY बद्दलच्या
अनुत्साह आणि अज्ञानामुळे धक्का बसतो. केवळ पुस्तकी शिक्षण, शहरी
“वापरा आणि फेका” या बाजारु अर्थव्यवस्थेची सवय लागल्याने कोट्यवधी ऊच्च पदवी
धारकांची अमाप संख्या असूनही भारतात आता Skills आणि Innovation चे दुर्भिक्ष जाणवत आहे.
या नव्या जमान्यात प्रत्येकच क्षेत्रात जसजसे AI अगर नवे तंत्रज्ञान
येणार तशी नोकरीची शाश्वती हा प्रकार नाहीसा होणार. मी काही शिक्षणतज्ञ नाही पण
बऱ्याचशा भविष्यहीन शिक्षणपद्धतीपेक्षा नवीन काळाच्या आव्हानांचा सामना करणारी
शिक्षणपद्धती हवी. एकविसाव्या शतकात आजवरचे शोध आणि ज्ञान हे पुढील ज्ञानासाठीचा
“कच्चा माल” असणार आहे. तो कच्चा माल वापरण्याची क्षमता कशी वाढवायची हे नव्या
शिक्षणपद्धतीने सांगायला हवे. म्हणजेच काय शिकायचे यापेक्षा कसे शिकायचे यावर जोर हवा. त्यासाठी
शिक्षक सुद्धा असा पाहिजे की जो वर्तमानाची जटीलता जाणतो आणि भविष्याची अनिश्चितता, गुंतागुंत आणि तरलता (Fluidity) स्वीकारण्यास सक्षम
आहे.

आजच्या स्पर्धात्मक युगातल्या कोणत्याही व्यावसायिक
यशासाठी किंवा दैनंदिन जीवनात DIY कौशल्यामुळे खालील प्रमुख फायदे होऊ
शकतात :
१. खर्चात बचत: किरकोळ समस्यांचे निराकरण
करण्यात सक्षम असल्याने छोट्या दुरुस्तीसाठी व्यावसायिकांना बोलवण्याची गरज न पडणे
.
२. प्रकल्प व्यवस्थापन: घरगुती/व्यावसायिक
प्रकल्पांचे काटेकोर नियोजन आणि अंमलबजावणी करताना वेळ आणि बजेट यावर ताबा
ठेवण्याची क्षमता
3. उद्योजकीय क्षमता: DIY कौशल्ये विकसित
करून लहान व्यवसाय सुरू करण्यासाठी करणे
४. अभियांत्रिकी गोष्टीं समजण्याची कुवत:
क्लिष्ट/गुंतागुंतीच्या सूचना किंवा प्रकल्पाचे
आराखडे सहज समजणे.
५. दमदार (robust) हस्तांतरणीय (transferrable) कौशल्ये: चाकोरीबाहेर विचार करण्याची सवय (Out
of box thinking), प्रकल्पांतर्गत
गोष्टींचा प्राधान्य-क्रम बनवणे, प्रकल्पातील/अंमलबजावणीतील
समस्यांचे घाबरून न जाता निराकरण करणे
यामुळेच DIYचा केवळ छंद म्हणून विचार न करता उपयुक्त
मनोवृत्ति किंवा विचारप्रणाली म्हणून अंगी बाणवण्याचा प्रयत्न होणे ही काळाची गरज
आहे. भविष्याचा सामना करताना पुस्तकी शिक्षणाव्यतिरिक्त जीवनोपयोगी, वेळेला चरितार्थ चालवू शकतील अशा DIY कला
तुमच्या व्यावसायिक यशात आणि कौटुंबिक समाधानात निश्चित भर घालतील.
- डॉ आनंद शिंत्रे
संदर्भ आणि अधिक माहिती :
https://www.sciencemuseum.org.uk/objects-and-stories/everyday-wonders/brief-history-diy
https://www.tandfonline.com/doi/full/10.1080/23265507.2018.1457453#d1e119