मावळत्या सूर्याचा देश – अलास्का
आशुतोष केळकर
उत्तर ध्रुव आणि तिथे जवळ वास्तव्य करणारी माणसांची जमात ह्या विषयी मला नेहमीच कुतूहल वाटत आलंय. मग तो अगदी उत्तरेकडील नॉर्वेचा भूभाग असो, नाहीतर ग्रीनलँडची भूमी असो, किंवा निर्मनुष्य बर्फाच्छादित रशियाचा प्रांत असो.
पण ह्या वेळेच्या प्रवासाचं वैशिष्ट्य म्हणजे फक्त उत्तर ध्रुवाजवळचा प्रदेश एवढाच नसून, पार अगदी पलीकडे पश्चिमेला वसलेला, उत्तर ध्रुवाशी जवळीक साधणारा, अमेरिकेचा प्रांत असला तरी रशियाला भिडू पाहणारा, ब्राउन, ब्लॅक आणि अगदी पोलार अस्वले यांच्याशी मैत्री साधणारा, व्हेल आणि किलर व्हेल यांच्याशी समुद्रात खेळणारा, मूस आणि इतर वन्य जमातीच्या अस्तित्वाची खूण दाखवणारा, कमी मनुष्यवस्ती असणारा पण निसर्गाच्या वैविध्याने नटलेला, हिरवेजगार झाडी आणि बर्फाच्छादित हिमशिखरे ह्याच्यातून डोकावणाऱ्या सूर्याला आलिंगन देणारा, नागमोडी रस्त्यांची वळणं घेत जवळून वाहणाऱ्या नदीच्या प्रवाहाबरोबर स्पर्धा करणारा प्रदेश हे आमचं गंतव्यस्थान म्हणून निश्चित झालं होतं.
मावळत्या सूर्याचा देश – अलास्का
जानेवारी महिना. आकाशात सूर्याची जेमतेम २-४ तास हजेरी. अशात रात्री ३ वाजताचा गडद अंधार, तीव्र वादळात वेगाने वाहणारे वारे, इतर कसलाही आवाज नाही,, वार्याबरोबर उडवला जाणारा पांढरा शुभ्र बर्फ, त्यामुळे रस्त्यावर जमा झालेले बर्फाचे डोंगर, निर्मनुष्य रस्ते, ह्यांतून मार्ग काढत जाणारी एक छोटिशी मोटार कार. त्याला कारणही तसंच — प्रसूतीच्या वेदना. गाडी भरधाव वेगाने धावते आहे. उत्तरेला अगदी आर्क्टिक सर्कल जवळ वसलेल्या नॉर्थ पोल गावाकडून अँकोरेजच्या दिशेने.
आम्ही अँकोरेजमध्ये पाय ठेवला त्या दिवशीच हा खरा घडलेला प्रसंग आम्हाला तिथे भेटलेल्या एका कुटुंबाने वर्णन करून सांगितला आणि आमच्या अंगावर शहारे आले.
“अँकरॉज” ही अलास्काची राजधानी. ३ लाख लोकवस्तीचं हे शहर विविधतेने नटलेलं आहे. मोकळे मोठे रस्ते, कमी रहदारी, चारही बाजूंनी बर्फाने आच्छादलेले डोंगर, नागमोडी वळणं घेत जाणारे रस्ते, उन्हाळ्यातील गुलाबी थंडी, तापमान सधारण १२ डिग्री सेल्सिअस. यामुळे बर्फाचा जोर ओसरू लागलेला अशा वातावरणात आम्ही तिथे पाऊल ठेवलं.
अलास्काला मावळत्या सूर्याचा देश म्हणण्याचं कारण की अलास्काचा भूभाग हा अगदी पश्चिमेकडे सरकलेला आहे. जपान किंवा न्यूझीलंडला उगवत्या सूर्याचा देश म्हणतात, तसंच पृथ्वी तलाच्या दृष्टिकोनातून सूर्य सगळ्यात शेवटी मावळण्याचं ठिकाण म्हणजे अलास्का. त्याच्या पश्चिमेला छोट्या बेटांवर वस्ती तशी नाहीच. त्यामुळे वस्तीच्या दृष्टिकोनातून मावळता सूर्य इथेच. म्हणजे उन्हाळ्यात इथे सूर्य मावळत असतानाच जपानमध्ये दुसऱ्या दिवसाची दुपार असते.
तसंच हा भूभाग उत्तरेला असल्यामुळे सूर्य उगवणे आणि मावळणे या दोन्ही गोष्टी दक्षिणेला घडतात. म्हणजे सूर्य पूर्वेकडे उगवून पश्चिमेला मावळतो ही संकल्पना लौकिकार्थाने थोडी चुकीची ठरते. उन्हाळ्यात जवळपास २२–२३ तास उजेड आणि हिवाळ्यात २० तास अंधार. मे महिन्यात रात्री १२:०० चा सूर्य पाहून गंमत वाटायची. त्यानंतर सूर्य मावळला असं वाटतं असतानाच अगदी २:०० वाजताच झुंजमुंजू व्हायला लागायचं.
पहिल्याच दिवशी 'मूस'चं दर्शन झालं. मूस हा घोड्यासारखा दिसणारा प्राणी. तसा कोणाच्या वाटेला जात नाही परंतु त्यापासून थोडं लांबच रहा असा आम्हाला सल्ला देण्यात आला होता. तगडे पाय आणि एक फटका प्राणघातक ठरायला पुष्कळ असतो. जागोजागी 'मूस आणि अस्वले' यापासून सावधान असे फलक पाहायला मिळाले. अलास्का खरं तर अस्वल आणि मूस यांची भूमी. मानवप्राण्याने या भागात अतिक्रमण केले आहे. परंतु राज्य त्यांचंच. त्यामुळे अनेक सूचना फलक जाणीव करून देतात की तुम्ही त्यांच्या राज्यात आला आहात. अस्वलांशी कसे वागायचे याचे नियम पाहून गंमत वाटली. जंगलातून चालताना अस्वल आले तर पहिले पळू नका. मुख्य म्हणजे पाठ दाखवू नका. तोंड त्याच्याकडेच ठेवा, हळूहळू मागे सरका. शिट्टी वाजवा. अस्वलाशी बोला असे गंमतीदार फलक. ब्राउन अस्वल आले तर जमिनीवर एखाद्या बॉलसारखे शरीराचं मुटकुळं करून डोकं जमिनीत घुसवून पडून रहा. शक्यतो श्वास रोखून ठेवा. खरोखरच अस्वल समोर आलं तर या गोष्टी लक्षात ठेवून जमिनीत तोंड खुपसून पडून माणूस राहील का, ह्या विचारानेच हसू फुटलं. धूम ठोकण हाच पर्याय मला वाटते आम्ही स्वीकारला असता, पण तशी वेळ आली नाही हे आमचं भाग्य. पण आम्ही अनेक जंगलातून पायी प्रवास केला तेव्हा मनात कायम भीती वाटत राहायची. मुळात अशा जंगलातून फिरताना दुसरा माणूस अपघातानेच दिसायचा. घनदाट झाडी, त्यात अस्वल केव्हा आणि कसं दिसेल ह्या विचाराने आमच्या मनाचं बरंच वेळा थरकाप उडाला, परंतु ते अनुभवण्यात एक थ्रिल देखील असायचं. सूचना होत्या की जंगलातून चालताना शिट्टी वाजवत चला. सहसा प्राणी जमात माणसाच्या वाटेला जात नाही.
अलास्का प्रांत हा प्रशांत महासागर प्लेट आणि उत्तर अमेरिका प्लेट यांच्या सरहद्दीवर वसलेला असल्यामुळे बऱ्याच भूगर्भीय हालचालींसाठी संवेदनशील आहे. या प्रांताने बरेच भूकंपाचे धक्के पचवले आहेत. १९६४ आणि १९६५ साली अनुक्रमे ९.२ आणि ८.७ रिश्टर स्केलच्या भूकंपाने अँकरॉज शहराला हादरवले. मोठी पडझड, जीवितहानी झाली. भूकंपाचा केंद्रबिंदू असणाऱ्या ठिकाणी आता एक मोठे उद्यान उभे आहे. भूकंपाच्या पूर्वी शहराची रचना कशी होती, भूकंपात काय हानी झाली, सरकारने त्यावर कशी मात केली आणि आता उभं असलेलं शहर — या सगळ्याची माहिती या उद्यानात ठेवली आहे.
अलास्का पूर्वी रशियाचा भाग होता. ह्या भूभागाचं महत्त्व त्यावेळी रशियन लोकांना कळालं नाही. “बेअरिंग” समुद्राने रशियापासून वेगळा झालेला हा भूभाग तसाही अमेरिकेच्या जवळ. सीमारेषेवर कॅनडा–रशियाचा अवाढव्यभूभाग बघता हा दूरवलेला प्रांत अमेरिकेला रशियाने १५० वर्षांपूर्वी ७२ लाख डॉलर्सना विकला. पण ही त्यांची चूक ठरली. वैश्विक निरीक्षणाच्या दृष्टिकोनातून खरं तर अलास्काला महत्त्व होतंच. परंतु आणखी महत्त्व प्राप्त झालं ते येथील समुद्रात मिळालेल्या तेल आणि नैसर्गिक वायूच्या आणि भूखजिनांच्या साठ्यांमुळे. हा भूभाग ताब्यात येताच अनेक आंतरराष्ट्रीय कंपन्यांनी अँकरेजमध्ये कार्यालयं स्थापन केली. मग त्याच्यामागोमाग इतर कॉन्ट्रॅक्टिंग कंपन्याही पोहोचल्या. अलास्काला मग आर्थिक आणि राजकीय महत्त्व प्राप्त झालं. परंतु आजही रशियन संस्कृतीचे ठसे आढळतात. रशियन बोलचाल, खाद्यपदार्थांची सवयी, भाषा यावर रशियाचा प्रभाव आढळतो. अर्थात अमेरिकेच्या धोरणांशी आता स्थानिक सहमत असल्याने दैनंदिन जीवनात अमेरिकेचा प्रभाव जाणवतो. हल्लीच झालेली ट्रम्प आणि पुतिन यांची भेट अलास्काच्या राजकीय महत्त्वाची साक्ष देते.
अँकरॉज नंतर आम्ही प्रस्थान केलं ते अँटन अँडरसन टनेलमधून सिवर्ड शहराकडे. ४ किलोमीटर लांबीच्या डोंगरातून वाट काढत खोदलेल्या या छोट्याशा टनेलमधूनच हा प्रवास करावा लागतो. दुसरा रस्ता नाही. जगात हा एकमेव टनेल आहे ज्यामधून आगगाडी आणि मोटार कार एकाच टनेलमधून जातात. ४ किलोमीटर हा प्रवास टनेलमधून कारने करताना थोडी भीती वाटते. कारण तुम्हाला रेल्वेच्या रूळांवरून गाडी चालवावी लागते. गाडीचा वेग हा २५ मैलांपेक्षा जास्त नसावा आणि मध्ये कुठे थांबायचं नाही. दर ठराविक वेळाने कार ट्रॅफिक बंद करून आगगाडी साठी टनेल मोकळा करण्यात येतो.
सिवर्ड हे थोडंसं पूर्व-दक्षिणेला वसलेलं छोटं शहर. समुद्रकिनारा आणि क्रूझसाठी प्रसिद्ध. येथे पहिल्या दिवशी आम्ही क्रूझ घेतली ते समुद्रातून दूर प्रवास करत हिमकडे पाहण्यासाठी. अलास्कामध्ये बर्फाच्छादित हिमनद्या समुद्राच्या किंवा सरोवराच्या काठावर पोहोचल्यावर त्यांच्या टोकावरून मोठे बर्फाचे तुकडे पाण्यात कोसळतात. या प्रक्रियेला 'ग्लेशियर कॅल्व्हिंग' म्हणतात. ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे जिथे हिमनदीचा पुढचा भाग तापमान, दाब आणि गुरुत्वाकर्षणामुळे कमकुवत होतो आणि अखेरीस तुटून पाण्यात पडतो. हे तुकडे नंतर हिमशिल्प किंवा 'आइसबर्ग' म्हणून ओळखले जातात. अलास्कामधील हबर्ड ग्लेशियर, कोलंबिया ग्लेशियर, ग्लेशियर बे नॅशनल पार्क आणि प्रिन्स विल्यम साउंड येथे ही दृश्ये पाहायला मिळतात. पर्यटक क्रूझ किंवा बोटींमधून ही दृश्ये अनुभवतात. थंड हवा, निरव शांतता, समुद्रात उभे असलेले उंच हिमकडे, त्यातून विलग होणारा एखादा छोटा कडा, तो पडताना होणारा प्रचंड आवाज आणि समुद्रात उसळणाऱ्या लाटा पाहणे हा एक विलक्षण अनुभव आहे.
दुसऱ्या दिवशी आम्ही प्रशांत महासागरात व्हेल वॉचिंग करण्यासाठी प्रस्थान केले. खवळलेल्या समुद्रात शिरताना भीती वाटत होती खरी. थोड्याच वेळाने आजूबाजूला व्हेल माशांचा संचार जाणवू लागला. जाणवू लागला म्हणण्याचे कारण की फक्त शेपटाने सापसाप उडालेले पाणी दिसत होते. दुसरीकडे मात्र ऑटर सारखे प्राणी जवळच पाण्यात पलथे पडून पोहत होते. बाजूलाच असलेल्या अनेक खडक माथ्यांवर अनेक सीलची वस्ती होती. सील आळसावलेले दिसत होते. पाण्यातील छोट्या माशांची शिकार करण्याचा त्यांचा काही मानस दिसत नव्हता. अलास्कातील वन्यजीवन आपल्याला खरंच थक्क करून जाते. बरेच लोक किलर व्हेल पाहण्याच्या उद्देशाने देखील सेवर्डमध्ये येतात. किलर व्हेल आपल्या सावजाची शिकार कशी करतात हे पाहण्यासारखे असते. ५-२० च्या गटाने हे एकत्र येतात, सावजाला सगळीकडून सामूहिकरित्या घेरून शिकार करतात. हा अनुभव मात्र आमच्या वाट्याला आला नाही.
यानंतर आम्ही थोडे उत्तरेला सरकले आणि मोर्चा वळवला तो बर्च सिरप फॅक्टरी आणि 'उलू' सुरीच्या फॅक्टरीकडे. जगात सगळीकडे मेपल सिरप प्रसिद्ध आहे. परंतु बर्च झाडाच्या खोडातून येणाऱ्या रसापासून देखील असाच सिरप बनवता येतो. मेपल सिरप सारखाच याला विशिष्ट गोड चव असते. बर्च झाडांच्या वनातून फेरफटका मारताना प्रत्येक झाडाच्या बुंध्यांना लावलेली बादली आणि सालीतून गळणारा रस याचे दृश्य मोहक होते. तिथून आम्ही प्रयाण केले ते 'उलू' सुरीच्या फॅक्टरीकडे. अर्धचंद्राकृती आकार असलेल्या या सुरीचा वापर एस्किमो स्त्रिया ३००० वर्षांपासून करत आल्या आहेत. धडधार पात, लाकडाची मूठ आणि अर्धचंद्राकृती आकार यामुळे धारदार अस्त्र तयार होऊन कुठलाही चिवट अथवा कडक पदार्थ कापण्याची क्षमता या अस्त्रात तयार होते.
जसजसे आम्ही उत्तरेला सरकलो तसतसे तिथे राहणाऱ्या लोकांच्या दैनंदिन जीवनातील अडचणी लक्षात येऊ लागल्या. हिवाळ्यात तर ह्या अडचणी आ वासून उभ्याच राहतात. खरं म्हणजे बरेचसे लोक ह्या काळात पूर्वेकडील प्रदेशांकडे मार्गक्रमण करतात. ह्या अशा वातावरणात राहणे शक्यच नाही. ह्या काळात शाळा बंद असतात. “होम स्कूलिंग” हा शिक्षणासाठी सगळ्यात उत्तम मार्ग. ऑक्टोबर महिना सुरू लागताच मंडळी युरोपच्या दिशेने मार्गक्रमण करतात. शाळा बंद, होम स्कूलिंग हा सर्वात सोपा मार्ग उपलब्ध. सरकार त्यासाठी अनुदान देते. प्रत्येक होम स्कूलिंग करणाऱ्या कुटुंबाला सरकारकडून अनुदान मिळते. बरीचशी कुटुंबे ह्या संधीचा फायदा घेऊन नोव्हेंबर ते फेब्रुवारी महिन्यात युरोपात येऊन राहतात. होम स्कूलिंग करून परत मार्च महिन्यात अलास्काला प्रयाण करतात. परंतु बऱ्याच कुटुंबांना अनेक अडचणींमुळे हे शक्य होत नाही. म्हातारे आईवडील किंवा इतर जबाबदाऱ्या यामुळे ही मंडळी स्थानिकच राहतात. पण मग अशा कुटुंबांसाठी शाळा चालवणे ही एक जिकिरचं काम होऊन बसतं. थंडीच्या, वादळ वाऱ्याच्या दिवसात बर्फाच्छादित रस्त्यांमधून वाट काढत शिक्षकांना शाळेत यावं लागतं.
'हस्की' कुत्रे हे असंच अलास्काचं वैशिष्ट्य. अगदी फार उत्तरेला बर्फाच्छादित डोंगरातून मार्गक्रमण करताना अलास्कन लोक हस्की कुत्र्यांच्या गाडीचा वापर करतात. याला कारण की हस्की कुत्रे मूलतःच हुशार, मार्ग शोधून काढण्याची त्यांची क्षमता, अती थंड तापमान सहन करण्याची शरीरधारणा यामुळे अलास्कन लोकांच्या, मुख्यत्वे वनविभागाच्या अधिकाऱ्यांच्या दैनंदिन जीवनात त्यांचं योगदान. हस्की कुत्र्यांच्या एका कार्यक्रमाला आम्ही हजेरी लावली. सुमारे ६–८ कुत्रे एका गाडीत जुंपून ती गाडी ओढली जाते. त्या ६–८ कुत्र्यांची एकत्रित हालचाल, सामूहिक गती वाखाणण्याजोगी आढळते. सगळी कुत्रे एकाच गतीने, एकाच दिशेला, एकमेकांना सांभाळून घेत गाडी कशी पुढे ओढतात हा एक कौशल्याचाच भाग. त्यांची वाटचाल एखादा समूह कसा एका तालात पुढे सरकू शकतो ह्याचं एक जिवंत उदाहरण. १५० किलोचं सामान एका गाडीत घालून हे कुत्रे सहज ओढून नेऊ शकतात. तेही शरीर गोठवणाऱ्या थंडीत बर्फातून वाट काढत.
डेनाली अभयारण्य हे अलास्का चे मुख्य आकर्षण. डेनाली वन्यजीव अभयारण्य हे अगदी उत्तरेला, आर्क्टिक सर्कलच्या थोडे खाली ६० लाख एकरच्या अवाढव्य परिसरात वसलेले आहे. घनदाट झाडी, अवाढव्य परिसर, अनेक वन्यजीव, श्वापदे, रम्य निसर्ग आणि आपण.
अभयारण्याच्या वाहतूक खात्याने नेमलेल्या बसने अभयारण्यात शिरताना तुम्ही कुठे खाली उतारू नये अशी सूचना. इथे राज्य असते ते वन्य जीवांचे. अरण्यातून वळत जाणारा छोटासा रस्ता आणि त्यावरून जाणाऱ्या बसमधले सगळेच प्रवासी वन्य जीवन पाहण्यात मशगुल. लांडगे, कॅरिबू, मूस आणि ग्रिझली अस्वले यांचे हे वास्तव स्थान. आजूबाजूला डेनाली पर्वतरांगांची वस्ती. हिमाच्छादित उंच शिखरे. त्याचे सौंदर्य काही निराळेच. उन्हाळ्यात बरेच पर्यटक हे वन्यजीवन अनुभवण्यासाठी डेनालीमध्ये येतात तर हिवाळ्यात या भूमीवर अवतरनारे नॉर्दर्न लाइट्स पाहायला बोचऱ्या थंडीत तुरळक का होईना पण पर्यटकांची गर्दी होते. डेनाली पर्वतरांगा आणि शिखरे यात डौलाने उठून दिसतो तो पर्वत मॅककिन्ले. उत्तर अमेरिका खंडातील सर्वात उंच पर्वत असे बिरुद मिरवणाऱ्या या पर्वताची उंची २०,३०० फूट आहे. पर्वत माथा पाहायला मिळणे कठीणच. बर्फ आणि ढग यातच तो सोनेरी किरणे लपवून ठेवतो.
शेवटचा दिवस उजाडला आणि आम्ही विमानतळाकडे मार्गस्थ झालो ते अनेक अनुभवांची आणि आठवणींची शिदोरी घेऊन. प्रवासाची आवड असल्याने अनेक प्रदेश, अनेक जागा खुणावत असतात. आणि प्रत्येक जागेची एक महती असते, काहीतरी वेगळेपण असते. पृथ्वीतलावर पसरलेल्या अगाध सृष्टीचा मागोवा घेताना आपली पावले छोटी वाटू लागतात. १० दिवसांच्या कालात आम्ही अनुभवलेली अलास्काची भूमी ही निसर्गाच्या भाषेत किरकोळ होती. एखाद्या प्रदेशात कधी कधी ५० वर्षे राहून देखील त्या भूमीची आपल्याला जेमतेम तोंडओळख होते. पण हेही नसे थोडके असं म्हणत प्रस्थान केलं ते अलास्का प्रांताला “परत भेटू” म्हणतच.
- आशुतोष केळकर, ॲबर्डीन, यु. के.
फारच छान माहिती . तिथल्या निसर्गाचे , प्राण्यांचे वर्णन वाचून तिथे भेट द्यावी असं वाटतं .
ReplyDeleteखूप वर्षापूर्वी तिथे गेलो होतो. वाचून पुन्ःप्रत्ययाचा झाला. काही राहून गेलेल्या गोष्टी कळल्या. असेच लिहित रहा.
ReplyDeleteछान लेख. पुन्हा एकदा अलास्काच्या ट्रीपचा आनंद घेतला.
ReplyDelete