'ग' ची बाधा - वेगळा आणि सारखा
कुमार जावडेकर
दिवाळी अंक, तोही
'पश्चिमाई'चा म्हणून या वेळी दोन ग़ज़ला आणि त्यांच्या गजाली लिहितोय –
या दोन्ही मी पाठोपाठ लिहिल्या होत्या. दोन्हींचं वृत्त (बहर / मीटर) एक आहे पण 'आहे वेगळा' आणि 'होतो सारखा' ही दोन अंत्ययमकं आल्यामुळे त्यांच्यात सारखेपण आणि वेगळेपणाही भासेल असं वाटतं.
यांपैकी 'जीवनाचा नूर आहे वेगळा' ही ग़ज़ल तीन वेगळ्या चालींत स्वरबद्ध झाली आहे. मी माझीच एक यमन रागात साधी सोपी (मला गाता येईल अशी) चाल लावली होती. माझा जुळा भाऊ आश्विन आणि संगीतकार विनय राजवाडे यांनीही तिला वेगळ्या-वेगळ्या प्रकारे संगीतबद्ध केलं आहे. विनय राजवाड्यांच्या चालीला प्रशांत काळुंद्रेकर यांनी अगदी ताकदीनं पेललं आहे, शब्द-प्रधान गायकीचं भान सांभाळून.
खरं तर ‘जीवनाचा सूर आहे वेगळा’ ही ओळ बरेच दिवस माझ्या मनात घोळत होती. मग तिचा ‘नूर’ बदलून पूर्ण ग़ज़ल लिहिली.
वैभव जोशी (युवा साहित्य परिषद, पुणे), सदानंद डबीर (मराठी ग़ज़ल दिवस, मुंबई) अशा अनेक निष्णात कवी/
ग़ज़लकारांबरोबर झालेल्या मुशायऱ्यांतून मी ही ग़ज़ल सादर केली आहे. ग़ज़लकार प्रदीप निफाडकर 'लोकमत' मध्ये निवडक ग़ज़ला
प्रसिद्ध करत असत. तिच्यात त्यांनी हिला समाविष्ट केलं होतं आणि त्या संकलनाचं
नंतर एक 'आवडलेल्या गझला' असं पुस्तकही
आलं होतं.
जीवनाचा नूर आहे वेगळा
वेगळी पत्रातली भाषा तुझी
अंतरी मजकूर आहे वेगळा
सागराची रोज भरती पाहिली
आसवांचा पूर आहे वेगळा
प्रेम केले - भोगली मीही सजा!
कायदा मंजूर आहे वेगळा
मूक अत्याचार सारे सोसती...
कोण येथे शूर आहे वेगळा?
धावणाऱ्या माणसांचे शहर हे
गाव माझा दूर आहे वेगळा
ग़ज़लेत यमकांच्या जोड्या जुळतात पण अंत्ययमक (रदीफ) निराळी / अवघड केली की ते एक गणित / कोडं सोडवल्यासारखं होतं. नुसतं ‘होतो’ म्हणण्याऐवजी ‘होतो सारखा’ हे शब्द आले की पहिल्या आणि दुसऱ्या ओळींची सांगड घालताना ‘सारखा’ हा शब्द अनावश्यक तर होत नाहीये ना, हे भान ठेवावं लागतं.
तोच प्रयत्न या दोन्ही ग़ज़लांत मी केला आहे...
दूर मृत्यू नेत होतो सारखा...
वृत्त कळता तेच आले धावुनी
दोष ज्यांना देत होतो सारखा
तू न येथे जाणले आहे तरी
भेट घेण्या पोचुनी दारी तुझ्या
रद्द माझा बेत होतो सारखा...
थांबलो छायेत होतो सारखा...
एक तोही पूल आता मोडला
ज्यावरी मी येत होतो सारखा
- कुमार जावडेकर
No comments:
Post a Comment
प्रतिसाद