Sunday, 28 September 2025

३.१ - नाते मनाचे (अनुपमा श्रोत्री)

नाते मनाचे 

अनुपमा श्रोत्री

तुझी न माझी नाळ वेगळी
गोत्र वेगळे जात वेगळी
रंग वेगळा यष्टी वेगळी
वर्तणुकीची रीत वेगळी

तरिही काही खूप सारखे
समजू म्हणता अनवट वाटे
जणू बांधती तुला अन् मला
जन्मांतरिचे भाव अनोखे

कुठे कधितरी गाठी पडल्या
त्यांच्या स्म्रुतिही धूसर झाल्या
वेगवेगळ्या जन्मां मधुनी
रेशिमगाठी अलगद विणल्या

कसे समजती भाव मनातिल
कसे उमजते दु:ख तळातिल
अश्रु पाहुनी अश्रु वाहती
शब्द एकही वदल्या वाचुन 

मित्र म्हणावे तुला की सखी
सुह्रद किंवा म्हणू सौंगडी
अनेक रूपे मला दाविसी
तुझ्या विणा मी आधी अधुरी 

- अनुपमा श्रोत्री, लिवरपूल, यु. के. 

2 comments:

प्रतिसाद

संयोजक

श्रीकांत पट्टलवार, मीरा पट्टलवार, रवी दाते, मुकुल आचार्य, कुमार जावडेकर