Sunday, 28 September 2025

२.४ - दर वर्षी येत होतो , पुढल्या वर्षी येणार नाही! (आनंद शिंत्रे)

दर वर्षी येत होतो , पुढल्या वर्षी येणार नाही! 

आनंद शिंत्रे


(खालच्या काही सूचनांप्रमाणे आमच्या घरी बनवलेले गणपतीचे नमुने)

मराठी माणूस भाद्रपदातील रम्य निसर्गाच्या कुशीत गणपतीच्या आगमनाचे उत्साहाने स्वागत करतो आणि त्यानंतर येणाऱ्या हिंदू दिन-दर्शिकेतील घटस्थापना, नवरात्र, दसरा आणि दिवाळी अशा मागोमाग येणाऱ्या सणवारांचीही वाट पाहतो. सुमारे दीडशे वर्षांपूर्वी गणेश चतुर्थी हा बहुतांशी देवालयात किंवा लहान प्रमाणात साजरा होणारा सण होता. पेशवाईमध्ये १८ व्या शतकात अष्टविनायकांची महती वाढीस लागली, नंतर इंग्रजांच्या काळात त्याला राजाश्रय राहिला नाही. मग १९ व्या शतकाच्या अखेरीस लोकमान्य टिळकांनी निष्क्रिय समाजावर फुंकर घालतानाच एकता आणि संघटन यासाठी सार्वजनिक गणेशोत्सव (१८९३)आणि शिवजयंती उत्सव (१८९५) सुरू केले. यानिमित्ताने स्फूर्तिदायी भाषणे, कीचक-वधासारखे राजसत्तेविरुद्ध संदेश देणारे संगीत नाटक, पोवाडे, कीर्तने यातून स्वातंत्र्यप्रेमी समाजाला लोकजागृतीसाठी वैचारिक व्यासपीठ मिळाले.

स्वातंत्र्यानंतर मात्र गेल्या ६०-७० वर्षात मात्र मूळ हेतु विसरुन त्याचे स्वरूप झपाट्याने बदलत गेले. त्यातून बऱ्याच ठिकाणी स्थानिक राजकीय महत्वाकांक्षा बाळगणाऱ्या तरुणाना शक्तिप्रदर्शनाच्या प्रशिक्षणासाठी तेथील स्थानिक पुढाऱ्यानी या “कार्यकर्त्यांना” व्यासपीठ म्हणून वापरू दिले. सर्वच राजकीय पक्षांनी या पुंडगिरीमधून शहरातील मोक्याच्या जागा बळकावणे, खंडणीसारखी वर्गणी “वसूल” करणे, या दहा दिवसाच्या कालावधीत अनेक प्रकारचे बेकायदेशीर वर्तन करणे या गैर-प्रकारांकडे सोयीस्कर कानाडोळा केला. वाढत्या TV वाहिन्यामुळे या उत्सवाचेही व्यापारीकरण झपाट्याने सोपे झाले. बहुजन समाजापर्यंत पोचण्याच्या व्यापारी संधि दिसल्यामुळे जाहिराती/प्रायोजक यांच्या माध्यमातून अमाप पैशाचा खेळ सुरू झाला. आता हे लोण महाराष्ट्रातून कर्नाटक, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश या राज्यांतच काय पण भारताबाहेरही पसरते आहे. कदाचित् आजच्या भारतातील तरुण पिढीला आपापली वेगळी धार्मिक “ओळख” (identity) म्हणून असे शक्तिप्रदर्शन करायचे आहे. त्याचबरोबर आता बहुजन समाजाने स्वीकारलेल्या या उत्सवाचे स्वरूपही त्यांच्या कल्पनेनुसार आणि करमणुकीच्या गरजेप्रमाणे बदलले आहे. आपल्या अंतर्मनातील देवाचे चिंतन /दर्शन करायला कुणालाच सवड आणि उमज नाही. मात्र भारताबाहेर गेलेल्या सुजाण भारतीयांनी नुसत्या घरच्या गणेशपूजनावर न थांबता मोठाले ढोल-ताशे, लेजीम पथके यासोबतच अजून तरी सार्वजनिक उत्सवाला चांगल्या सांस्कृतिक कार्यक्रमांची जोड दिली आहे.

अखिल भारतीय व्यापारी संघटनेच्या अहवालानुसार २०२४ मध्ये भारतात गणेशोत्सवामुळे पंचवीस हजार कोटी रुपयांची उलाढाल झाली. मूर्ती बाजार केवळ ५०० कोटी ,मांडव उभारणी २००० हजार कोटी, कपडे/सजावट ३००० कोटि, व्यवस्थापन/सुरक्षा ५००० कोटी अशी मुख्य विभागणी आहे. हिंदू समाज उत्सवप्रिय तर आहेच आपल्या देशात २०२४ मध्ये जी. डी. पी. च्या १.२% (रु. ४.२५ लाख कोटी) उलाढाल दिवाळीमध्ये झाली ! दिवाळीचा हा आकडा २०२३ साली रु.३.७५ लाख कोटी इतका होता. तुलनेसाठी भारताचे संरक्षण बजेट GDP च्या २.२-२.४% तर शिक्षणावर खर्च २.९% असतो.

सार्वजनिक गणेश भक्तिचा एक नमुना : आंध्र प्रदेश मधील सार्वजनिक “खैरताबाद गणेश“ ची सुरवात १९५४ साली एका नगरसेवकाने केली आणि गणेशमूर्तीची उंची दरवर्षी १ फुटाने वाढविण्याचे त्याने जाहीर केले. त्यानुसार २०१४  साली ६० फूटी उंच मूर्तीसाठी एक कोटी रु खर्चून, ३५ टन प्लास्टर ऑफ पॅरिस (PoP) आणि २२ टन लोखंड आणि ५०० लीटर रंगद्रव्य वापरले गेले. या गणपतीसमोर ५०० किलोचा लाडू ठेवण्यात आला! पुढे लाडूच्या प्रायोजक हलवायाने त्याचा प्रायोजनाचा करार गणपतीच्या हातात ठेवण्याच्या लाडूसाठी असल्याचे सांगत ११०० किलोचा लाडूही देवाच्या हातात ठेवण्याचा आग्रह धरला.  सुरक्षेसाठी तो महाकाय लाडू देवाच्या चरणीच ठेवण्याची पोलिसांना सक्ती करावी लागली.या लाडूचा तुकडा तरी मिळवण्यासाठी झालेल्या चेंगराचेंगरीत अनेकजण जखमी झाले. हुसेन सागर तलावात अशा महाकाय मूर्तीचे विसर्जनास स्थानीय प्रशासनाने परवानगी नाकारली. या विरुद्ध सुप्रीम कोर्टापर्यंत हा विसर्जनाचा तंटा या गणपती मंडळाने नेला. दबाव-नीतीनुसार अनुकूल निर्णयापर्यंत विसर्जन मूर्तीला ताटकळत ठेवले गेले आणि शेवटी हुसैन सागर तलावाची गाळ उपसा करून खोली वाढवावी लागली! पुढे तर २०२० साली कोविड्ची राष्ट्रीय नियंत्रणे न जुमानता भक्तगणांनी (!) खैरताबादला गर्दी केली होती. आता या मंडळाने मूर्तीची कमाल ऊंची पायरी-पायरीने २० फुटांपर्यंत कमी करण्यास आणि ती मातीची घडवण्याचे मान्य केले आहे! (अधिक माहितीसाठी : विकिपीडिया)

मुंबईच्या गिरगाव चौपाटीवर गणेशाचे मूर्तीस्वरूप पाण्यात विसर्जित केल्यावर नदी किंवा समुद्रकाठी दुसरे दिवशी त्याच मूर्तीच्या भंगलेल्या अवशेषांचे, भोवती घिरट्या घालणाऱ्या कावळ्यांचे विषण्णकारक दृश्य दिसते. महापालिकेला वाळूत ट्रॅक्टर आणि बुलडोझर लावून हे अवशेष हलवण्याचे अवघड आणि खर्चीक काम करावे लागते. भारताच्या या आर्थिक राजधानीत प्रचंड विद्युत रोषणाई , लेजर किरणाचे (प्रसंगी दृष्टीला अपायकरक) झोत, कर्णबधीर करणारे (प्रसंगी अश्लील गाण्यांचे आणि नृत्याचे) कर्कश म्युझिक, विसर्जनाच्या मिरवणुकीदिवशी होणारी वाहतुकीची प्रचंड गैरसोय, नाचण्याच्या नावाखाली घातलेला धांगडधिंगा, महिलांची छेडछाड /असुरक्षितता , दहशतवाद / घातपाताची आणि इतर गुन्ह्यांची शक्यता यावर नियंत्रण ठेवण्यासाठी CCTV , Drones, वॉकी-टॉकी, अंबुलन्स, अग्निशामक दलाची व्यवस्था, पोलिसांचा प्रचंड फौजफाटा (एकट्या मुंबईत २०००० पोलिस) ,गर्दी /चेगराचेंगरी टाळण्यासाठीचे नियमन ,वाहतूक नियमनासाठी केलेले अनेक रस्त्यांचे तात्पुरते दिशाबदल या बाबींवरचा भोवळ आणणारा खर्च आणि कोट्यावधी मनुष्यतासांचा राष्ट्रीय अपव्यय पाहून गणपतीबाप्पा आणि जग अचंबित होत असेल!

सार्वजनिक गणेशोत्सवाचे असे कमर्शियल इवेंट / “व्यापारी संधी”त झालेल्या  परिवर्तनाचे प्रतिबिंब घराघरातील गणपती पूजेवरही पडले! मित्र मंडळी अगर शेजारी यांचेसमोर आपल्या श्रीमंतीचे प्रदर्शन करायला ज्यास्त उंचीचा किंवा वेगळ्या वेश-भुषेतला गणपती, त्याचे आसन, पूजा उपकरणे, दागिने , मुकुटच नव्हे पण अगदी पूजेच्या दूर्वा सुद्धा सोन्या/चांदीच्या बनवणे, आणि इलेक्ट्रिक रोषणाईच्या भारंभार माळा यातून  सुरुवात झाली आहे. पूजेची तयारी, उकडीचे मोदक ते रेडिमेड नऊवारी साडीपर्यन्त झटपट होम डिलीवरीची सोय झाल्याने वाचलेला वेळ सोशल मीडियावर आपले सजलेले फोटो /सेल्फी लावण्यासाठी मिळाला!

विघ्नहर्त्याचे गणेश चतुर्थीला पृथ्वीवर झालेले आगमन साधेपणा आणि अर्थपूर्ण भक्तीने साजरा करायचा प्रयत्न करायला काय हरकत आहे?

पर्यावरणास पूरक गणेश-मूर्ती : या विषयावर खालील पर्यायांचा विचार व्हावा. (यू-ट्यूब वर पहा)

१. दर वर्षी बाजारातून मूर्ती विकत न आणता एकदाच सुंदर गणेश प्रतिमा(चित्र/पेंटिंग) आणून दर गणेश चतुर्थीला तिच्याच भोवती दर वर्षी ताज्या फुलांची /रांगोळीची वेगवेगळ्या प्रकारे सजावट करून पूजेसाठी(आणि विसर्जनासाठी) सुपारीचा गणपती वापरावा.

२. वर्तमानपत्राच्या कागदाच्या लगद्या (Papier-mâché) पासून सुंदर मूर्ती बनवता येतात.

३. हस्तव्यवसायाची आवड असेल तर यू ट्यूब वर पाहून मातीचा गणपतीही घरी बनवता येतो

४. कणिक अगर Salt-dough पासून मूर्ती बनवून घरीच ओवनमध्ये भाजून नंतर रंगवता येते

५ ओरिगामीने गणेश-मुख बनवून सभोवती ओरिगामीने बनवलेली फुले /कमानी लावा.

६. लाकडाचे अगर Salt-dough चे गणेश प्रतिमेचे वेगवेगळे भाग बनवून, ovenbake करून ते Puzzle सारखे जुळवायला लहान मुलांना शिकवा.

 

७. घरी गणेश स्थापना न करता जवळच्या मंदिरात जाऊन तिथे पूजा आणि आरती मद्धे श्रद्धेने सामील व्हा! त्या निमित्ताने देवादारी पवित्र वातावरणात शांत चित्ताने ध्यान करा.  

सामान्य माणसाला “अमूर्त” स्वरूपातला ईश्वर उमजत नाही म्हणून आपल्याला भावणाऱ्या रूपात/मूर्तीत तो भजण्याचे असणारे स्वातंत्र्य/ लवचिकता हिंदू प्रार्थना पद्धतीतच  (religion) आहे. (“धर्म” शब्दाचा सहज होणारा चुकीचा वापर येथे टाळला आहे). खरे तर “तत्वमसि” या महावाक्यात सांगितलेला आपल्या मनात वसलेल्या ईश्वराचे अंतर्मुख होवून दर्शन घेण्याची, आत्मज्ञानाची सवय करून आपले चित्त प्रसन्न होवू शकते. हिंदू धर्मात अनेक सुंदर रुपके आहेत – गणाचे नेतृत्व करणाऱ्या गणेशाने त्याच्या रुपातून आपण अंगी बाणवण्यासारखे अनेक गुण सुचवले आहे. हत्तीचे मस्तक म्हणजे प्रचंड बुद्धी आणि अचाट स्मरणशक्तीची निदर्शक आहे. त्याचे मोठे सुपासारखे पुढे मागे हलणारे कान हे सर्व बाजुंचे म्हणणे(आवाज) ऐकून घेण्याचे सुचवते तर मोठे पोट (ऐकलेल्या) अनंत गोष्टीना (gossip न करता) पोटात ठेवण्याची आठवण करते. बारीक डोळे कोणतीही गोष्ट सूक्ष्म दृष्टीने पाहायला तर लांब सोंड ही कोणत्याही गोष्टीचा गंध आधी लांबून घेण्याचा दूरदर्शीपणां सुचवते.

हा ज्ञानदेवतेचा उत्सव कसा साजरा करता येईल?

-उत्तमोत्तम विषयांवरची मराठी पुस्तके स्वतः वाचण्यासाठी विकत घ्या. आपल्या मित्र मंडळीनाही भेटवस्तू म्हणून छोट्या गणेश मूर्ती न देता पुस्तके भेट द्या (त्यामुळे मराठी प्रकाशन व्यवसायास निकडीची मदतच होईल आणि वर्षानुवर्षे घरी साठणाऱ्या भेटवस्तू गणेश मूर्तीचे काय करावे हा प्रश्नही निर्माण होणार नाही !

- मुलांकडून / स्वतःकडून गणपती स्तोत्र आणि अथर्वशीर्ष यांचे पाठांतर आणि एखादी नवी कला शिकायला आरंभ करा. या विषयांवर वक्तृत्व स्पर्धा /संवाद आणि गुणदर्शन कार्यक्रम आयोजन करा.

सार्वजनिक गणेशोत्सवाचे राक्षसी व्यापारी स्वरूप आणि पर्यावरणाची हानी कमी करण्यासाठी लोकजागृती हाच उपाय आहे. केवळ शासकीय नियम किंवा कायद्याने हे साध्य होणार नाही. त्यासाठी या उत्सवाला कालानुरूप अधिक अर्थपूर्ण बनवण्याची जबाबदारी प्रत्येकांने स्वतःपासून उचलली पाहिजे.

प्रख्यात संगीतकार आणि कवी यशवंत देव यांच्या “गणपती-विसर्जन” कवितेतील बाप्पा काय म्हणतो पाहा:

आरती करण्याच्या मिषे, वेडेवाकडे गात बसता
तुमचंच रंजन अधिक होतं,  निमित्त मात्र माझं करता

तुम्ही ढोल पिटीत बसा, मी कौल देणार नाही
माझ्या प्रिय भक्तानो,  आता पुनः फसणार नाही

दर वर्षी येत होतो , पुढल्या वर्षी येणार नाही... 

- आनंद शिंत्रे. 

7 comments:

  1. अगदी खरं आहे . उत्सवाचे बाजारीकरण थांबले तर निश्चितच त्याचा खरा उद्देश साध्य होईल . छान लेख .

    ReplyDelete
  2. अगदी स्पष्टपणे आपले विचार मांडल्याबद्दल धन्यवाद. आपण सुचवलेले पर्याय वापरणं ही काळाची आणि पर्यावरणाची गरज आहे. शीर्षक आणि यशवंत देवांची कविताही विषयाला पुष्टी देतात.

    ReplyDelete
  3. छान विचार मांडले आहेत, याचं बाजारीकरण झालं आहे नक्की देवाचा आणि महापुरुषांचा सर्रास वापर केला जातो हे जगभर चालू आहे आणि हे थांबणं अशक्य वाटतय

    ReplyDelete
  4. शिंत्रेंचे विचार आपल्याच मनातील वाटतात.त्यांनी परखडपणे मांडलेत.गणपती उत्सवाचे हिडीस रूप खरंच पहावत नाही.बाजारीकरण थांबवून परिस्थितीनुरूप वैचारिक,बोधक ,पर्यावरणपूरक कार्यक्रम घ्यावेत

    ReplyDelete
  5. वासूआणि वृंदा जोशी30 October 2025 at 18:48

    लेख खूप आवडला अगदी विचार प्रवर्तक आहे सणांमध्ये आज काल बाजारूपणा खूप वाढला आहे. पर्यावरणास उत्तेजन देण्यासाठी त्यांनी स्वतः निरनिराळे गणपती कसे बनवावेत याचे उदाहरण दिले आहे. त्याबद्दल आनंद शिंत्रे यांचे मनापासून अभिनंदन!

    ReplyDelete
  6. Very well said! Agree entirely.

    ReplyDelete
  7. गणेश भक्ती आणि गणेश शक्ती ! मार्मिक विचार 👌

    ReplyDelete

प्रतिसाद

संयोजक

श्रीकांत पट्टलवार, मीरा पट्टलवार, रवी दाते, मुकुल आचार्य, कुमार जावडेकर