Sunday, 28 September 2025

२.९ - कादंबरी - बे-जमाव (प्रकरण ३) - कुशल – ‘वन डे इन मुंबई’ (कुमार जावडेकर)

 

 

एक स्वतंत्र गोष्ट म्हणून आपण हा आणि इतर भाग वाचू शकता. अर्थात, आधीची प्रकरणं वाचलीत तर संपूर्ण कादंबरीचा आशय / विषय कळू शकेल आणि अजून मजा येईल, असं वाटतं.

पूर्वीच्या अंकांतील प्रकरणांचे दुवे: 

प्रस्तावना: Pashchimaai (पश्चिमाई): २.५ कादंबरी - 'बे-जमाव' : प्रस्तावना (कुमार जावडेकर)

प्रकरण १: Pashchimaai (पश्चिमाई): २.५ कादंबरी - बे-जमाव (प्रकरण १) - 'कुशल – पिंच हिटर’ (कुमार जावडेकर)


प्रकरण ३: ‘कुशल - वन डे इन मुंबई’ 

कुमार जावडेकर

आधी मी आणि मग रवीनं सचिन तेंडुलकरला आमच्या कॉलेजात आणणं ह्या दोन्ही घटना खरं तर अविश्वसनीय होत्या. पण रवीनं सचिनच्या कार्यक्रमाबद्दल नंतर काहीच वाच्यता केली नाही. मलाही त्याला अनुल्लेखानं मारण्यात मजा आली असती. पण मग प्रॅक्टिकलच्या वेळी दिशा समोर असताना आपण किती सहृदय आहोत हे दाखवायची माझी संधी हुकली असती. त्यामुळे वरकरणी कौतुक दाखवत मी म्हणालो,

थोडक्यात काय दिशा, ‘दुनिया झुकती है, झुकानेवाला चाहिये’, बरोबर आहे की नाही?

झालं इतकंच की रवीला बोलता करण्यात मी यशस्वी ठरलो.

मला वाटलं निदान ‘दुनिया रुकती है, रुकानेवाला चाहिये’, असं तरी म्हणशील. तू कुणी तरी वेगळा आहेस असं तुला दाखवायचं असतं ना नेहमी?

तुम्हां दोघांच्या बाबतीत ना मला एकच सांगायचंय, ‘दुनिया पकती है, पकानेवाला चाहिये’! अब पकाना बंद करो और प्रॅक्टिकल पर ध्यान दो. दिशानं तो विषय संपवला.   

थोडक्यात काय, अशाच चढाओढींत आमची कॉलेजातली पुढची दोन वर्षं निघून गेली. मात्र, दिशाच्या समोर आमचं एकमेकांचा विषय तिच्यासमोर काढून तिला पकवणं बंद झालं या प्रसंगानंतर.

शेवटच्या वर्षी जेव्हा प्रोजेक्ट करायची वेळ आली तेव्हा दिशानं मला त्यात आपला पार्टनर होशील का असं विचारलं. मी होकार दिला, पण त्याच बरोबर अजून दोघांनी मला विचारलंय असं सांगून रवीचा पत्ता कट केला. प्रोजेक्टमध्ये जास्तीत जास्त चार विद्यार्थीच असायला हवेत असा नियम होता. त्याचा मी पुरेपूर फायदा उठवला! प्रोजेक्टच्या निमित्तानं अनेकदा आम्ही तिच्या आणि इतर पार्टनर्सच्या घरी जात असू. कधी रात्री उशिरापर्यंत कॉलेजात टाइमपास करत असू. कधी पार्टीला किंवा पिक्चर बघायलाही जात असू. आमची मैत्री अजून घट्ट होत गेली यांतून.

अर्थात, यात जरी रवी नसला तरी त्याची आणि दिशाची मैत्री टिकून होती हे मला नाकारता येणार नाही. किंबहुना, रवी हा तिचा, अजूनही, माझ्यापेक्षा अधिक जवळचाच मित्र होता याची मला पुरेपूर जाणीव होती.

अखेर २००३ मध्ये आम्ही सगळे इंजीनियर झालो. दिशानं ‘गेट’ची परीक्षा देऊन मास्टर्स करायचं ठरवलं आणि व्ही. जे. टी. आय. मधला आपला मुकाम वाढवला. मला वाटतं या मागचं खरं कारण हे होतं की तिला कॉलेजच्या वातावरणाची (म्हणजे कॉलेजचं प्रमुख आकर्षण असण्याची) इतकी सवय झाली होती की त्यातून बाहेरच पडावंसं वाटत नव्हतं. गंमत म्हणजे मला मुंबईच्या एका आंतरराष्ट्रीय कंपनीत नोकरी मिळाली आणि रवीला पुण्याच्या एक कंपनीत! मला जरी मुंबईत घर शोधण्यापासून सुरुवात करायची असली तरी दिशाला वरचेवर भेटता येणार होतं हा एक मोठा फायदा होता.

नोकरी सुरू व्हायला काही दिवस असताना एकदा मी सकाळची बस पकडून नवी मुंबई गाठली. तिथे एखादा एका बेडरूमचा फ्लॅट भाड्यानं घेता येईल का याची चाचपणी करणं हा माझा उद्देश होता. दिवसभर घरं बघून संध्याकाळी हॉस्टेलमध्ये पोचायचं आणि एखाद्या मित्राकडे ‘पॅरासाइट’ म्हणून काही दिवस मुक्काम ठोकायचा असा माझा बेत होता. एका एजंटच्या मोटरसायकलवरून अनेक घरं बघून झाली. सुरुवातीला वन-बेडरूम-किचन दाखव असं सांगून शेवटी गाडी वन-रूम-किचनच्या घरांकडे वळली होती आमची. मनात भाडं, स्टेशनपासूनचं अंतर, तिथून माझ्या ऑफिसला जायला लागणारा वेळ अशी अनेक गणितं चालू होती. अखेर दुपारी चारच्या सुमाराला मी त्याचा ‘लवकरच कळवतो’ असं म्हणून निरोप घेतला.

बस पकडून वाशी स्टेशनाकडे जाताना लक्षात आलं, आपण दिशाला फोन करू शकतो! कालच घेतलेल्या नवीन मोबाइलचा वापर करायची याहून उत्तम संधी कुठली असणार? तिच्याकडे पूर्वीपासून मोबाइल होता आणि आमच्या प्रोजेक्टच्या निमित्तानं तो नंबरही मी मिळवला होता. लोकल पकडल्यावर मी तिला फोन लावला.

हाय दिशा! मी मुंबईमध्ये आहे...

हाय कुशल! मला वाटलं तू ट्रेनमध्ये आहेस...

‘तुला लोकलची धडधड ऐकू येतेय, पण माझ्या हृदयात चाललेली धडधड ऐकू येत नाहीये?’ मी मनात एकदम बॉलीवूड छाप वाक्य म्हटलं. अर्थात, येत नाहीये तेच ठीक आहे, नाही तर असली धडधड बहुतेक वेळा आपलं लक्षण धड नाहीये असंच दाखवते असंही मनाला समजवलं. म्हणून उघडपणे तिला मात्र,

हो, वाशीहून वडाळ्याला चाललोय. ट्रेन चेंबूरमार्गे जाते. म्हटलं बघावं तू काय करतेयस ते?

काय करायचंय ते सांग. त्यावर अवलंबून आहे...

स्टर्लिंगला ‘लीगली ब्लॉण्ड २’ आहे, मेट्रोला चलते चलते’ आणि...”. मी नुकताच वाशी स्टेशनात घेतलेला पेपर धुंडाळत म्हटलं.

चलते चलते... ‘लीगली ब्लॉण्ड २’ को जाते हैं! तिनं तेवढ्यात माझं बोलणं तोडून कोटी केली. तिच्या पटदिशी मिळालेल्या होकारापुढे मी साहजिकच तिनं मला असं तोडलेलं खपवून घेतलं.

चल. सव्वा सहाचा शो आहे.

चेंबूर स्टेशनात भेटू.

एकट्या माझ्याबरोबर यायला प्रथमच ती तयार झाली होती!

लवकरच चेंबूर आलं. उतरल्यावर पंधरा-वीस मिनिटं वाट बघायला लागली तिची. पाऊस सुरू झाला होता. त्यामुळे गार वाऱ्याची झुळूक येत होती. प्रसन्न वाटत होतं. त्यात गडद हिरवा टॉप आणि फिक्कट निळी जीन्स घालून येणाऱ्या दिशाचं दुरून दर्शन झालं. शिताफीनं मी शेजारच्या स्टॉलवरून दोन ‘कटिंग’ घेऊन तिचं स्वागत केलं. तिच्या ‘थॅंक्स’मुळे अजूनच तजेला आलेला तो चहा पिऊन झाल्यावर लोकल पकडली आणि आमच्या खऱ्या गप्पा सुरू झाल्या. सुदैवानं रविवार असल्यामुळे गर्दी नव्हती. आम्ही खिडकीची जागा पटकावली.

‘मेगा ब्लॉक’ आणि पाऊस यांच्या संगनमतामुळे लोकल जात होती मात्र अगदी कूर्मगतीनं. वेग आला होता आमच्या संभाषणाला. अखेर सुमारे अर्धा तास उशिरा ‘कॉटन ग्रीन’ला येऊन धडकल्यावर तिथेच ती थांबून राहिली! दरम्यान आमचं बोलणं मात्र एका निरर्थक संवादापासून दुसऱ्याच एका निर्णायक स्थितीला येऊन पोचलं होतं...  

काय करत होतीस घरी? पटकन आलीस. मी गाडीत बसल्या बसल्या म्हटलं होतं. वास्तविक कुठलीही मुलगी लवकर तयार होत नसते. दिशा सोडून इतर फार मुलींशी ओळखीपेक्षा अधिक मैत्री नसली तरी मी काही अगदीच अडाणी नव्हतो या विषयात. पण दिशाला त्यातून जरा गुदगुल्या होतील अशी खात्री असल्यामुळे मी हे वाक्य टाकलं होतं.

काही नाही. माशा मारत होते. त्याही फिरकत नाहीत ए. सी. लावला की! ए, तू काय करत होतास वाशीत?

झक मारत होतो.

म्हणजे?

 म्हणजे? ‘झक मारणे’ म्हणजे ‘मासे मारणे’. माहिती नाही तुला? .. बरोबर! तू तर माशा मारतेस फक्त. त्याही मिळत नाहीत तुला!

तू दाखव कुठले मासे मिळवलेस ते?

सगळे सोडून दिले पुन: पाण्यात. (बरं सुचलं. मनात ‘एक गळाला लागण्याची पंचाईत’ असं म्हणून घेतलं होतं मी तेवढ्यात.)

थोडक्यात, झक – म्हणजे मासे – मारलेच नाहीस.

मारले नाहीत, धरले फक्त. मी ‘मा’चा ‘ध’ केला होता आणि खरं कारण सांगितलं होतं,

अगं, घरं बघत होतो. कुठली परवडतील का भाड्यानं ते.

मग?

महाग आहेत किंवा लांब आहेत. त्यातून वन रूम जेमतेम...

ए, तू विकतच का घेत नाहीस? तिला बोलणं तोडायला फार आवडतं.

चेंबूरला चार बेडरूम्सच्या, सर्वांत वरच्या मजल्यावर दोन फ्लॅट्स एकत्र करून केलेल्या आणि शिवाय टेरेस असलेल्या, घरात राहणाऱ्या दिशाची ही कल्पना ऐकून मला हसावं की रडावं हेच कळत नव्हतं.

अजून सुरू न झालेल्या नोकरीच्या जोरावर घरासाठी कुठली बँक कर्ज देईल? माझ्या वडिलांनी माझं पहिल्या महिन्याचं भाडं आणि डिपॉजिट देणं मान्य केलंय. बहीण एम. बी. बी. एस. करतेय. तिचं शिक्षण, लग्न असे अनेक खर्च आहेत पुढे. त्यामुळे माझं मलाच बघायला हवं.

हम्म. तिच्या डोक्यात थोडा प्रकाश पडला असावा.

हे बघ दिशा. माझ्या साधा हिशोब आहे. आत्ता नोकरी इथे मिळाली आहे म्हणून मी मुंबईत राहीन. निदान एक वर्ष ट्रेनी म्हणून तरी... आणि तूच मला सांग, त्यानंतर माझ्यासारख्या इंजिनिअरला पुण्यात जॉब मिळणं अवघड आहे का? फक्त पुन: साधा ट्रेनी म्हणून जाण्यापेक्षा...

माझ्या लक्षातच आलं नव्हतं की रवीला पुण्यात नोकरी मिळालेली आहे आणि या माझ्या विधानाचा संबंध त्याच्याशी जोडला जाऊ शकतो. आमचा एकमेकांचा विषय न काढण्याचा अलिखित करार मी मोडला होता!

अच्छा, मतलब रवी को जो नौकरी मिली है वो बहोत इझिली मिली है!

दिशा हे बोलतानाच एकीकडे माझ्या बोलण्यातला विपर्यास माझ्या लक्षात आला होता. माझ्या नकळत मी केलेल्या या तुलनेमुळे गंमत वाटून चेहेऱ्यावर हसूही फुटलं होतं. त्यानं तिचा पारा अजूनच वर गेला होता.

... ‘कॉटन ग्रीन’ स्टेशनवरच्या लाऊड स्पीकरवरून तेवढ्यात घोषणा झाली. ‘दक्षिण मुंबईत झालेल्या जोरदार पावसामुळे ही लोकल इथेच रद्द करण्यात येत आहे.’ ती कानी पडताच दिशा उठली आणि सरळ तरातरा लोकलच्या बाहेर पडली! साहजिकच मीही तिच्या मागे, तिला गाठायचा प्रयत्न करत, धावत सुटलो. पण मला वाटतं रागावलेल्या मुलीच्या चालण्याच्या वेगाशी चित्ताही स्पर्धा करायला धजावणार नाही! मी तिला थांबवण्याची पराकाष्ठा करत होतो, पण तेवढ्यात ती दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर पोचलीसुद्धा होती! तिथे गेल्यावर आमच्या लक्षात आलं की परतीच्या लोकल्सही रद्द झाल्या आहेत. पुढे काय करायचं याची जुळवणी मनात होत असतानाच मला दिशा बाहेर जाताना दिसली.

आता मात्र मी ठरवलं की तिला परिस्थितीची जाणीव करून द्यायला हवी. मी धावत तिच्या समोर जाऊन उभा राहिलो आणि तिला हात वर करून म्हटलं,

दिशा, दोन गोष्टी फक्त ऐक. विश्वास ठेवायचा की नाही तो तुझ्या प्रश्न आहे. पहिली - पुण्यात परत जाणं ही माझी आर्थिक गरज आहे. त्यात रवीशी स्पर्धा, त्याला कमी लेखणं वगैरे काही अभिप्रेत नाहीये. दुसरी - या क्षणी, तुला घरी सुरक्षित पोहोचवणं ही माझी जबाबदारी आहे. आपण त्याचा जास्त विचार केला तर ते बरं होईल.

ती काही बोलण्याआधी तिचा मोबाइल फोन वाजला.

हां डॅडी.

हो, मी परत येतेय.

कॉटन ग्रीन.

नाही. कुशल आहे माझ्यासोबत.

शेवटच्या वाक्यानं तिच्या वडिलांना मिळाला असेल त्याच्यापेक्षा अधिक दिलासा मला मिळाला!

मला टॅक्सी पकडायची आहे, तिनं म्हटलं. वास्तविक अशा परिस्थितीत बस अधिक सुरक्षित ठरली असती. पण अजून फाटे फोडायला नकोत म्हणून मी फक्त समोरच्या टॅक्सीवाल्याला हात दाखवला. सुदैवानं तो चेंबूरला जायला राजी झाला. पावसाची संततधार चालूच होती.

बराच वेळ दोघेही गप्प होतो. एकमेकांच्या डोळ्यांत रोखून बघत. रागानं. जसजसा तो शमला, तसतसं त्याचं रूपांतर चेहेऱ्यांवर बारीकसं हसू फुलण्यात झालं.

सॉरी, दिशा म्हणाली.

आता मी ‘मैने प्यार किया’तलं जगप्रसिद्ध वाक्य म्हणू की ‘पेहेले काय को झक मारी’ म्हणू?

झक तू मारतोस, मी नाही. आणि ती तर तुला मारता येत नाही हे तूच मगाशी म्हणाला आहेस, दिशा म्हणाली.

ठीक आहे, जशी आपली आज्ञा, असं म्हणून मी नाटकी आवाजात दोस्ती का एक... असं म्हणायला लागलो आणि टॅक्सी ड्रायवरचा गैरसमज झाला.

दोस्ती एकर जाना है क्या?

आम्ही दोघेही हसलो आणि पुन: त्याला नक्की कुठे आणि कसं जायचंय ते सांगितलं! पाऊसही कमी व्हायला लागला होता. त्यामुळे जरी किंग्ज सर्कल सारख्या काही भागांत पाणी असलं तरी आम्हांला अडकून पडण्याची भीती वाटत नव्हती. रेडिओवरही सांगत होते की पाऊस दक्षिण मुंबईतच जास्त झालाय असं.

आमचं संभाषण आता मूळ विषयाकडे वळलं.

पुण्यात निदान हा प्रश्न येत नाही – पावसामुळे पिक्चर बुडण्याचा.

असं? मग पुण्यात कोणते प्रश्न येतात?

अस्सल पुणेकरांप्रमाणे ‘पुण्यात फक्त प्रश्नांची उत्तरं मिळतात’ असं मी सांगणार होतो. पण  तो मोह टाळून मी म्हटलं,

पुण्यात हवा दमट नाहीये इथल्यासारखी.

फार शुष्क वाटलं होतं मला तिथे. एकदाच गेले होते तेव्हा.

बरं बाबा. आम्ही आहोत कोरडे ठणठणीत. तुझं ठीक आहे. इथेच अजून शिकायचं, मग शिकवायचं. निदान लग्न करेपर्यंत तरी मुंबई सोडायची गरज नाही. मला मात्र घर शोधण्यापासून तयारी आहे.

महत्त्वाची गोष्ट म्हणजे बहुतेक कंपन्यांचं मुख्य ऑफिस इथे असतं आणि त्यांची फक्त एक छोटी शाखा असते पुण्यात. पगार चांगले हवे असले, वरची जागा लवकर मिळवायची असली, तर मुंबईला पर्याय नाही.

थोडक्यात, दिशा ‘पुण्याची गणना कोण करी’ हा बाणा सोडणार नाही हे मला कळून चुकलं. समाधानाची बाब इतकीच होती की नोकरीसाठी मी मुंबईत येत होतो आणि रवी पुण्याला जात होता! त्यामुळे तो मुंबईत येईपर्यंत मी सुरक्षित असणार होतो!

प्रियदर्शिनीच्या पुढे गेल्यावर दिशानं घरी फोन करून आम्ही पंधरा मिनिटांत पोचत असल्याचं सांगितलं आणि तो झाल्यावर, मी जेवायला तिच्या घरी थांबायचंय असं सांगितलं. मी आढेवेढे घेतले; पण पाऊसही आता कमी झाला होता. त्यामुळे परत जायला बस मिळणं शक्य वाटत होतं. पहाटेपासून घराबाहेर पडल्यामुळे थकवाही आला होता. मी ते निमंत्रण स्वीकारलं.

तिच्या घरी दिशांच्या वडिलांनी आमचं स्वागत केलं. गोरापान चेहेरा, भरपूर मिशी, सोनेरी चष्मा, सुमारे सहा फूट उंची आणि त्याला साजेसा देह. थोडक्यात कुणीही दबून जावं असं भारदस्त व्यक्तिमत्व असलेल्या त्यांना मी पहिल्यांदाच भेटत होतो. मी भीत भीत ‘नमस्ते अंकल’ म्हटलं. सुदैवानं त्यांनी हसून मला गोड आवाजात धन्यवाद दिले दिशाला सुखरूप आणल्याबद्दल.

लगेच आम्ही जेवायला बसलो. दिशाच्या आईला मी पूर्वी भेटलो होतो. जेवण म्हणजे मेजवानीच असणार मला माहिती होतं. त्याचा आस्वाद घेत असतानाच तिच्या वडिलांनी माझी मुलाखत घेणं सुरू केलं.

तो बेटा कुशल, बताओ, अब इंजिनिअरिंग के बाद क्या प्लान है?

डॅडी, कुशल आमच्या कॉलेजच्या टॉपर्सपैकी एक आहे. त्याला आता इथे मुंबईतच एका मल्टीनॅशनल कंपनीत नोकरी मिळाली आहे.

त्यासाठीच भाडयानं घर शोधायला मी इकडे आलो आहे. दिशा जेवत असल्यामुळे मला बोलायची संधी मिळाली.

इतनी कम उम्र में सेटल हो रहे हो? अंकल म्हणाले.

मला यावर काय बोलावं ते कळलं नाही. हा प्रश्न मला कुणीच विचारला नव्हता. उलट इंजिनिअर झालो की मी पैसे कमावून आपल्या पायावर उभा राहीन अशीच घरून अपेक्षा होती. माझ्यापेक्षा तीन वर्षांनी लहान असलेल्या माझ्या बहिणीच्या शिक्षण किंवा लग्नाचा खर्च यांची जरी माझ्या वडिलांची तयारी होत असली तरी त्या व्यतिरिक्त अजून खर्च करणं त्यांना परवडणार नव्हतं हेही मला माहिती होतं. पण दिशाच्या वडिलांना हे कोण सांगणार? हे म्हणजे दिशाला मी ‘भाडयानं घर शोधतोय’ असं सांगणं आणि तिनं मला ‘त्यापेक्षा विकतच का घेत नाहीस’ हे विचारण्यासारखंच झालं!

मात्र दिशाच्या वडिलांना माझी मन:स्थिती समजली असावी.

देखो बेटा, आज-कल एज्युकेशन लोन मिलना कौनसी बडी बात है? बाहर देस जाके पोस्ट-ग्रॅजुएशन करो. दुनिया देखो और सीखो नयी चीजे. ये सोचो की पांच साल बाद तुम कहां होंगे. मैं जब तुम्हारी उम्र का था तब पंजाब छोडके बिझनेस करने के लिये बॉम्बे आया था. दिशा की नानी उनके बेटी की शादी मुझसे कराने के लिये झिझक रही थी – बंबई में - इतनी दूर जगह पर. और अब देखो. हमें पता नहीं, दिशा की शादी इंडिया में होगी या बाहर!

ते दिलखुलास हसले. आम्ही सगळेच हसलो. पण ही हसण्यावारी नेण्यासारखी गोष्ट नव्हती इतकं मला कळून चुकलं त्यातून.

आप तो हमेशा काम और पैसे की बातें करते रहते हो. जरा बच्चों को खाना तो खाने दो. दिशाच्या आईनं विषय बदलला. नवीन विचारांत पुन: गढून गेल्यामुळे त्यानंतर मी मात्र फारसं बोललोच नाही. दिशाच्याही ते लक्षात आलं असावं.

जेवून मी निघालो तेव्हा दिशा गेटपर्यंत मला सोडायला आली.

पाऊस थांबला होता. सुंदर गारवा होता. मलाही पुन: ताजंतवानं वाटत होतं.

कुशल, डॅडी जे म्हणाले त्यावर जरूर विचार कर, पण शेवटी तुला जे करावंसं वाटेल तेच कर. बाय.

तिच्याशी हस्तांदोलन करून मी निघालो...

(क्रमश:)

 - कुमार जावडेकर, स्टॅफोर्ड, यु.के. 

1 comment:

  1. कोटी बहाद्दरांना कोटी कोटी प्रणाम 🙏

    ReplyDelete

प्रतिसाद

संयोजक

श्रीकांत पट्टलवार, मीरा पट्टलवार, रवी दाते, मुकुल आचार्य, कुमार जावडेकर