महाराष्ट्राचे जनकवी पी सावळाराम
डॉ. रवी आपटे
त्यांचा जन्म ४ जुलै १९१३ रोजी झाला
गेल्या शुक्रवारी ४ जुलै होता. त्याच दिवशी या वर्षी ई एम एस (युरोपियन मराठी
संमेलन) सुरू झाले दुपारी अडीच वाजता. लेस्टर शहराच्या मध्य भागात असलेल्या
क्वीन्स (रोड) रस्ता वर असलेले अथिना या थेटरच्या हॉलमध्ये. म्हणजे या दिवशी ११२ वी जयंती होती ती सावळाराम यांची.
पी सावळारामांच्या लेखणीतून बाहेर
पडलेले प्रत्येक गीत / भावगीत / गाणे सबंध महाराष्ट्रातील स्त्रियांच्या ओठावरती व
प्रत्येक गाणं तरुण स्त्रिया त्यांची गाणी गुणगुणत असतात. सर्वात गाजलेले माझ्या
बालपणात लग्नानंतरच्या वरातीत सर्व क्लॅरीनेट मधून हे वरातीबरोबर वाजवले जात असे.
त्याची एक छानशी गोष्ट आहे ऐकण्यासारखी!
काही कामासाठी पी सावळारामांचे पुण्याला येणे झाले होते. काम आटोपल्यावर ठाण्याला
राहत असल्याने ते पुणे स्टेशनावर गाडीचे तिकीट काढून आले होते. मुंबईला जाण्यासाठी
प्लॅटफॉर्म वर गाडी उभीच होती त्या काळात प्रत्येक गाडीला फर्स्ट सेकंड व थर्ड
क्लास असायचा. विशेष गर्दी नसल्याने एक थर्ड क्लास मधल्या एका बोगीत
("वाघिणीत") जाऊन बसले. तेव्हा तिथे बसल्यावर त्याच वाघिणीत शिरण्यासाठी
नवरदेव नववधू व तिच्या माहेराच्या लोकांचा प्रचंड घोळका आला ती लहान वयाची वधू
आपल्या प्रेमळ आईचा हात धरून गाडीत शिरली व तिच्या मागे तिची आई बहिणी व इतर
नातेवाईक सुद्धा चढले. त्या नववधूच्या डोळ्यांतून अश्रूंचा पूर वाहत होता कोणाचेही
"हृदय हलवून" टाकणारे दृश्य प्रत्येकाचे मन हेलावून टाकणारे होते. सर्व
स्त्रिया डोळ्यांना पदर लावून डोळे सतत पुसत होत्या व त्याबरोबर न जाणता
पुरुषांच्या डोळ्यांच्या कडा ओलावून जात होत्या.
हे विलोभनीय, हृदय पिळवटणारे दृश्य
बघून प्रत्येकाच्या हृदयांत कालवाकालव न झाली तर आश्चर्य! त्याप्रमाणेच पी
सावळारामांचे हृदय द्रवलेसुद्धा! त्यांच्यातला कवी शीघ्रपणे जागृत झाला व कवी मन
विरघळून, पिळवटून गेले.ठाणे स्टेशनला उतरल्यावर घरी गेल्या
गेल्या त्यांनी या प्रसंगावरून सुचलेल्या ओळी लिहून एक अत्यंत हृदयद्रावक, प्रासंगिक गीत लिहून सबंध महाराष्ट्रात मातांना व इतरांना इतर
कुटुंबियांना वेड लावले हे नि:संशय!
प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात लग्न हे
घडतेच व जेव्हा पुरुष स्वतःच्या मुलीच्या लग्नानंतर निश्चितच हळुवार होतोच व नकळत
डोळ्यांच्या कडा ओल्या होतातच. या गाण्याने सर्व महाराष्ट्राला हेलावून सोडले होते
असे म्हणणे अतिशयोक्त होणार नाही.
पुढे वसंत प्रभूंनी त्याला सुंदर साल
लावून हे गाणे आणखी उंचावर नेले हे गाणे लतादीदींनी अतिशय सुंदर रीतीने प्रस्तुत
केले व सर्व मातांची मातांच्या हृदयात हे गाणे कायमचेच बसून गेले. ते गाणे म्हणजे
"गंगा जमुना डोळ्यात उभ्या का, जा मुली जा दिल्या घरी तू सुखी रहा"!
अशीच एक सुंदर गोष्ट स्वतः पी
सावळारामानीच कथन केलेली फार सुप्रसिद्ध पण खूप जणांना ठाऊकच नसलेली आहे. त्यानंतर
पी सावळारामांची गाणी व वसंत प्रभूंची अप्रतिम चाल व लतादीदींनी आपल्या अलौकिक
स्वरांनी अजरामर केलेली अशी गाणी पी सावळारामांनी लिहून सबंध महाराष्ट्राला
गाण्याचा निश्चितच छंद जडवला. ही त्यांची सुंदर सुप्रसिद्ध गाणी ऐकून कवी श्रेष्ठ
कुसुमाग्रज उर्फ वि. वा. शिरवाडकर यांनी त्यांना "जनकवी" म्हणून
"किताब" बहाल केला तोच हा!
आता जनकवी पी सावळारामानीच कथन केलेली.
या गाण्याच्या उगमाची चक्रावून नेणारी ही गोष्ट खूप वर्षापूर्वीची आहे. ५० / ७०
वर्षांपूर्वीची असू शकते .एकदा अचानक लतादीदींचा सकाळी दहाच्या सुमारास जनकवी पी
सावळाराम यांनाच ठाण्याला फोन आला. लतादीदींचा फोन आल्याने पी सावळारामांना घामच
फुटला फोनच्या पलीकडचा आवाज नक्कीच लता दीदींचा होता. त्या फोनवर म्हणाल्या की एक
दोन आठवड्यातच त्यांच्या बाबांची पुण्यतिथी येत आहे. तर तुम्ही (पी सावळाराम)
त्यांच्यावर एखादे काव्य लिहू शकतील का ? त्यांनी "चाचरत" आपला होकार कळवला.
इकडे फोन झाल्यावर सावळारामांचं कवी मन अस्वस्थ झाले. एक दोन दिवस असेच विचार
करण्यातच गेले मग शब्दरूपी "सरस्वती माता" अवतरली व एकटाकी ते
सुप्रसिद्ध झालेले गाणे त्यांच्या लेखणीतून बाहेर पडले. तेच ते गाणे
"कल्पवृक्ष कन्येसाठी लावूनीया बाबा गेला, वैभवाने
बहरून आला, याल काहो बघायाला". गाणे लिहून तयार झाले पण
पी. सावळारामांना लता दीदींना सरळ थेट फोन करण्याचे धैर्यच होईना. पण फोन करणे
आवश्यकच होते. एक-दोन दिवसांतच धैर्य करून लतादीदींना फोन लावला व त्यांनीच तो
उचलला व धैर्य (गोळा) करूनच पी. सावळारामांनी लतादीदींना आपले काव्य / लिखाण / गीत
ऐकवले. गाणे ऐकल्यावर लतादीदींच्या प्रतिक्रिया व्यक्त न झाल्याने पी.
सावळारामांचे अवसान एकदम गळून गेले. पी. सावळारामांना भीती वाटली. त्यांना वाटले
लता दीदी काही न बोलल्याने त्यांना माझे गीत ऐकून प्रचंड राग आला असेल असेच सर्व
काही मनात वाटू लागले. पाच मिनिटे पी. सावळाराम हातात फोन धरून उभे होते. लगेचच
लता दीदी बोलू लागल्या म्हणाल्या की तुम्ही इतके सुंदर गीत / काव्य लिहिले की मला
माझे अश्रू आवरेनात त्यामुळे तोंडातून शब्दच फुटेना म्हणून मी गप्प होते. शेवटी मन
आवरल्यानंतर मी तुम्हाला उत्तर देऊ शकले. मला माफ करा. हे गाणे इतके सुंदर लिहिले
आहे की लगेचच रेकॉर्ड करून टाकू! लतादीदींचा फोन झाल्यावर पी. सावळारामांना काही
सूचेना, मग नेहमी जिथे एका खोलीत वसंत प्रभू पेटी तबला घेऊन
गाणी म्हणत आणि बसवत असायचे तिथे गेले, नुकतेच लतादीदी बरोबर
झालेले संभाषण सांगितले. इकडे येताना ते नुकतेच लिहिलेले काव्य गीत बरोबर आणलेच
होते, ते त्यांनी वसंत प्रभुंना दिले. वाचून झाल्यावर वसंत
प्रभूंनी नुकतीच चाल लावलेली त्या गीताला पेटी वाजवून ऐकवली व तिथे तीन-चार जणांना
ती खूप आवडली. वसंत प्रभूंनी स्वतःहून लावलेली चाल घेऊन लतादीदींना फोन करून ते
नवीन गीत / काव्य रेकॉर्ड करण्यास बोलावले. रेकॉर्डिंगची वेळ तारीख ठरली
त्याप्रमाणे सर्व घडून आले. ठरल्या दिवशी लतादीदी रेकॉर्डिंगला आल्या, गाणे सुंदर झाले. एकाच टेक मध्ये, पण रेकॉर्डिंग
झाल्यावर वसंत प्रभूंना थोडासा बदल हवा होता म्हणून त्यांनी लतादीदींना थांबण्याची
विनंती केली पण लतादीदींनी चक्क नकार दिला, पण जाता जाता एक
वाक्य अश्रू आवरत म्हणाल्या. हे गाणे म्हणत असताना बाबांच्या आठवणीने मी कसेतरी मन
आवरून, घट्ट मन करून ते गाणे संपवले पण आता मी आवरू शकत
नाही. मला माफ करा. असे म्हणत चपला घालून त्या स्टुडिओच्या चक्क बाहेर पडल्या. या
गाण्याची रेकॉर्ड जेव्हा बाहेर पडली त्याने उच्चांक गाठला. अशी पी. सावळारामांची
सबंध गाणी अप्रतिम होत होती व रेकॉर्डस खपत होत्या.
इतर गाण्यांची यादी खाली देत आहे.
१) लेक लाडकी या घरची, होणार सून मी त्या घरची
(टीका / भाष्य : एक अवखळ वधू )
२) गोड गोजिरी लाज लाजरी ताई तू होणार नवरी
(टीका / भाष्य : थोरल्या बहिणीला चिडवणारी)
३) गंगा यमुना डोळ्यात उभ्या का (टीका /
भाष्य : लाडक्या एकुलत्या एका लेकीला निरोप देणारी वत्सल माता)
४) लिंबलोण उतरता अशी का झालीस ग
बावरी (टीका / भाष्य : एक प्रेमळ सासू (?))
५) हृदयी जागा तू अनुरागा (टीका / भाष्य :
एक विनवणारी प्रिया समजावून सांगते)
६) जिथे सागरा धरणी ही मिळते (टीका / भाष्य : अतिशय आतुर झालेली प्रेयसी वाट
पाहत असलेली)
७) माझिया नयनांच्या कोंदणी उजळते शुक्राची
चांदणी (टीका / भाष्य : खूप लाडावणारी यौवनातली मुक्त प्रियाची)
८) हसले ग बाई हसले कायमची मी फसले (टीका /
भाष्य : खऱ्या प्रेमातच हरखून गेलेली एक यौवना मनातले गूढ)
९) गंध फुलांचा गेला सांगून तुझे नी माझे
व्हावे मिलन (टीका / भाष्य : लवकर मिलनाची आस बाळगणारी ललना)
१०)
कोकिळ कुहू कुहू बोले- चित्रपटातील गाणे उषाकिरण व चंद्रकांत
मांढरे (टीका / भाष्य : प्रीतीला साद घालणारी ललना (प्रिया))
११)
सप्तपदी मी रोज चालते तुझ्या सवे शतजन्मीचे नाते (टीका /
भाष्य : लग्नात कृतकृत्य झालेली पत्नी)
१२)
बाळा होऊ कशी उतराई तुझ्यामुळे मी झाले (टीका / भाष्य : आई
आपल्या आवडत्या मुला मुलींना जन्म देऊन आयुष्याचे दान देणारी ममताळू माता)
१३)
प्रेमा काय देऊ तुला ? भाग्य दिले तू मला - (टीका / भाष्य : चित्रपट
शिकलेली बायको, नववधूचे प्रेमगीत)
१४)
आली हासत पहिली रात (टीका / भाष्य : लग्नानंतर नववधूची
प्रतिक्रिया )
आजही या वरील सर्व गीतांचे सूर कधीही
कानावर पडल्यावर एकदम मन हळवे होते व ते शब्द आणखीच भावतात व मन तृप्त होत जाते.
भक्तिगीते -
१) रघुपति राघव
२) देव जरी मज कधी भेटला
३) पंढरीनाथा झडकरी आता
गवळणी
१) घट डोईवर घट कमरेवर - लता
२) राधा कृष्णावरी भाळणी -आशा
३) वेड लागले राधेला - आशा
४) राधा गवळण करिते मंथन -आशा
सर्व स्त्रियांचे भावविश्व, अवघड, प्रचंड सुखी भावविश्व ज्या एका घटनेवर अवलंबून असते ते म्हणजे तिचे लग्न. जनकवी पी सावळाराम यांनी आपल्या समर्पक शब्दांतून छान उतरवले आहे.
- डॉ. रवी आपटे, बरी (मँचेस्टर) , यु. के.
छान लेख ,आणि अजरामर गाणी ,कितीही जुनी झाली तरी पुन्हा ऐकविशी वाटतात .
ReplyDelete