मी कोण?
श्रीकांत कांबळे
स्थळ : पुणे, रात्री दोन सव्वा दोनचा सुमार. रस्त्यावर रहदारी अगदी तुरळक. एक तरुण व तरुणी मोटरसायकल वर चाललेले. अचानक एक महागडी पोर्श भरधाव वेगाने मागून येते. बहुधा चालकाचा ताबा सुटलेला. काही कळायच्या आत त्या दुचाकीला प्रचंड जोरात ठोकर बसते. ते दोघे दुर्दैवी जीव कुठल्या कुठे फेकले जातात. पोर्श गाडी जागच्या जागी गरकन फिरून बाजूच्या मेट्रोच्या पुलाला धडकते. झालेल्या कर्कश्श आवाजाने बरेच लोक जमतात. काही जखमींकडे तर काही गाडीकडे धावतात. पोर्शच्या एयरबॅग्स उघडलेल्या. वाहन चालक बाकी ठीक पण बराचसा शॉक मधे. वय साधारण १९, २० च्या दरम्यान. इतका प्यालेला की काय चालू आहे ते त्याला फारस कळत नाही. बाजूच्या सीटवर बसलेला मित्र कुणाला तरी फोन करायचा प्रयत्न करतोय. जेव्हा खवळलेले लोक वाहन चालकला बाहेर खेचायला बघतात तेव्हा तो ओरडतो – "ए, मी कोण आहे माहितीये का?"
ही कथा इथेच थांबवू यात. भारतात राहिलेल्या आणि वाढलेल्यांना, "मी कोण आहे माहितीये का?" हा प्रश्न नवीन नाही. राजकारण्यांची किंवा अति श्रीमंतांची बिघडलेली पोर आपल्या तीर्थरूपांच्या ताकदीचा माज दाखवायला नेहमीच हा प्रश्न विचारतात. त्याना म्हणायचय अस की मी फलाण्याचा मुलगा, भाऊ, मेव्हणा इ. माझ्या वाटेस जाऊ नका अन्यथा परिणाम वाईट होतील.
आता असे शेकडा ०.००१ लोक सोडले तर इतर सामान्य मर्त्य मानवांना, "मी कोण आहे माहितीये का?" असा प्रश्न विचारण्याचे प्रसंग येत नाहीत. बहुतेक जण "मी कोण" हे दुसऱ्यांना न विचारता "तुम्ही कोण?" ह्या प्रश्नाच उत्तर प्रसंगाप्रमाणे देतात. आणि तीच आपली ओळख मानतात. क्षणभर विचार करा की तुम्ही या प्रश्नाच काय उत्तर द्याल? उदाहरणार्थ – मी अमुक तमुक हा मध्य बिंदू धरून पहिले वर्तुळ म्हणजे मी हिचा नवरा, ह्याची बायको, ह्यांचा मुलगा अथवा मुलगी, कोणाचा तरी भाऊ किंवा बहीण, कोणाचे तरी वडील वा आई. त्याबाहेरचं वर्तुळ म्हणजे तुमची व्यावसायिक ओळख - मी या कंपनीचा संचालक, डॉक्टर, प्राध्यापक इ. त्याचं बरोबरची म्हणजे सामाजिक ओळख - मी हिंदू, भारतीय, ब्रिटिश इंडियन. आणि अर्थात सर्वात बाहेरचं वर्तुळ म्हणजे मी माणूस. थोडक्यात काय की, "मी कोण आहे माहितीये का?" ह्याचे आपल्यापुरते उत्तर आपण असे देतो.
हिंदी सिनेमातील नायकांना "मी कोण?" या प्रश्नाचं उत्तर माहीत असतं. राज कपूर म्हणतो "मैं आवारा हूं", संजय दत्त म्हणतो "मैं खलनायक हूं", कोणी म्हणतो की "मैं पल दो पल का शायर" तर कोणी "मैं रंग शरबतों का". बऱ्याच चित्रपटातील नायकांची जन्मसिद्ध ओळखच म्हणजे प्रेम करणं आणि नायिकेच्या धनिक बापला पिडणं – काही अपवाद वगळता.
थोडं मागे जायचं झाल तर संतकवीनी हाच प्रश्न वेगळाच हाताळला आहे. तुकाराम, "आम्ही विष्णुदास मेणाहून मऊ कठीण वज्रासही भेदू ऐसे" अशी ओळख सांगतात. भागवत संप्रदाय भक्ती, प्रेम, सामाजिक समता ह्या पायावर उभा असलेला. पण जेव्हा परकीय आक्रमण आले तेव्हा याच संतानी वज्रासही भेदण्याचा संदेश दिला. ही संतानी सांगितलेली स्वतःची आणि महाराष्ट्राची ओळख. उत्तरेत कबीर तर स्वतःला आणि आपल्या आराध्य दैवताला वेगळ पाहताच नाहीत. “जब मै था हरि नही, जब हरि है तो मै नही” हे त्यांच प्रसिद्ध वचन. हिंदू धर्माचं पुनरुज्जीवन करण्याचं श्रेय ज्यांच्याकडे जात असे आदि शंकराचार्य हे ८ व्या शतकातले. त्यांच्या निर्वाण षटकातला अखेरचा श्लोक “मी कोण “ हा प्रश्न किती खोल आहे ह्याची जाणीव करून देतो-
अहं निर्विकल्पो निराकार रूपो, विभूर्व्याप्त सर्वत्र
सर्वेन्द्रियाणां ।
सदा मे समत्त्वं न मुक्तिर्न बंध:, चिदानंद
रूपं शिवो-हं शिवो-हं॥
(मी निर्विकल्प निराकार आहे. मी पृथ्वी आणि आकाश व्याप्त करून सर्व इन्द्रियांमध्ये आहे. मी सर्वत्र
समत्व बघतो आणि मला मुक्ती आणि बंधन दोन्ही नाही. असा मी
शुद्ध चेतना, अनादि,
अनंत शिव आहे.)
यापुढे काय सांगणार? आपल्या तत्ववेत्यानी “मी कोण” ह्या
वरकरणी साध्या वाटणाऱ्या प्रश्नाची जी खोली दाखवली आहे ती बघून धडकीच भरते.
तुमच्या आतापावेतो लक्षात आल असेल की आपण हा "मी कोण"चा शोध २१ व्या शतकातल्या एका अपघातापासून सुरू केला आणि भूतकाळात जात जात ८ व्या शतकात पोहोचलो. दुसरं असं की, आपले तत्वज्ञ, “मी” ची खोलीच नाही तर व्याप्ती पण वाढवतात. म्हणजे ते या प्रश्नात मी सोबत जगाला आणि देवाला पण सामील करतात. जीव, जगत, आणि ईश्वर हे तिन्ही भारतीय संताच्या “मी” संकल्पनेत आहेत.
म्हणजे, गमतीत म्हणायच तर वरील पोर्श चालकने, योग्य प्रश्न विचारायचा म्हटला तर तो “मी, जग आणि परमेश्वर कोण आहे ते माहितेय का?” असा पाहिजे.
तर मंडळी, तुम्ही जर इथपर्यंत पोहोचला आहात तर बाहेर पडण्याआधी ह्या वाढलेल्या प्रश्नाची आपल्या परंपरेत दोन प्रकारे कशी उत्तरे आली आहेत ते पाहू.
अशी कल्पना करा की त्या पोर्श चालकासमोर प्रथम आपण नागार्जुनाला उभ केल. नागार्जुन हा दुसऱ्या शतकातला बौद्ध दार्शनिक. महायान परंपरेतला. त्याच्या सुप्रसिद्ध मूलमध्यमकरिका या ग्रंथात "शून्यता" या कल्पनेचा विकास आहे. भारताची जगाला जी शून्य ही देणगी आहे त्याचं मूळ ह्या ग्रंथात आहे. नागार्जुन जगाला आणि त्यातील व्यवहाराला नाकारत नाही. त्याला तो तो संवृत्ती सत्य म्हणतो की ज्यात मी अमुक तमुक आहे, माझे नातेवाईक आहेत, मद्यपान आहे, आणि पोर्श गाडी आहे. ह्या सर्व गोष्टी स्वभावतः शून्य आहेत आणि अंतिम सत्य नाहीत . अंतिम सत्याला नागार्जुन नाव देतो – परमार्थ सत्य. त्याची व्याख्या करता येत नाही किंवा शिकवता येत नाही. ज्यानं ते कळल आहे त्यांच्या दैनंदिन व्यवहारात हे दिसतं.
आपल्या प्रवासाच्या शेवटी आपण उद्दलकाला विनंती करू की “मी कोण” या प्रश्नावर काही सांगावे. उद्दलक आणि त्याचा मुलगा आरुणी यांची कथा बृहदारण्यक उपनिषदात येते. आरुणी नुकताच गुरूकडून विद्या प्राप्त करून आला आहे. आरुणीचे प्रश्न हे एखाद्या पदवीधारक तरुणाला साजेसे आहेत. अनेक उदाहरणे देत उद्दलक शिकवतो जे बाहेर आहे ते सर्व जग, त्यातले परस्पर व्यवहार ह्यांचा शोध हाच स्वतःचा, मी कोण या प्रश्नाचा शोध आहे. वेदांतामधलं एक महावाक्य इथे येतं – तत्वमसी. ते (ब्रह्म) म्हणजे तू (आत्म) आहेस. अगदी मराठीत सांगायचं तर पिंडी ते ब्रह्मांडी!
तर एका अतिश्रीमंत पोराच्या उर्मट प्रश्नातून सुरू झालेला हा शोध आपण “तत्वमसी “ पर्यंत पोहोचवला. आशा करतो की ज्ञानेश्वरांच्या शब्दात – 'दुरितांचे तिमिर जावो'.
- श्रीकांत कांबळे, मँचेस्टर, यु. के.
एकच प्रश्न मी कोण पण कोणाला पडतो त्यावर त्याचं भवितव्य अवलंबून. दारुड्याला पडला तर तो अहंकाराच्या अज्ञानात बुडतो आणि श्वेतकेतुला पडला तर त्याला ब्रह्मज्ञानाची प्राप्ती होते. विषयाची छान मांडणी केली आहे
ReplyDeleteधन्यवाद 🙏
Delete