'बे-जमाव' : प्रस्तावना
कुमार जावडेकर
‘टू इज अ मॉब’ या नावानं मी ही कादंबरी इंग्रजीत लिहिली होती – मातृभाषा
मराठी असूनही. याचं मुख्य कारण इतकंच की ती भारत आणि इंग्लंड या दोन देशांत घडते. दोन्ही
देशांतल्या लोकांना ती वाचता यावी, एवढंच नव्हे तर तिच्यातली भूमिका जाणून घेता यावी
असं मला वाटत होतं. स्थलांतर म्हटलं की त्यातून काही प्रश्न, समस्या, पेचप्रसंग निर्माण
होतात. बेकायदेशीर स्थलांतरं, त्यांच्यामागची रंगीत / रक्तरंजित कारणं, त्यांच्यामुळे
होणारे सांस्कृतिक भेदभाव आणि राजकीय संधीसाधू घडामोडी यांवर खूप लिहिलं जातं. टी.
व्ही., चित्रपट यांतूनही अनेकदा बघायला मिळतं. मात्र सामान्य कारणांसाठी – मग ते शिक्षण
असो की नोकरी असो की लग्न – कायदेशीर देशांतर करणाऱ्या माणसांना आणि त्या अनुषंगानं
तिथल्या स्थानिक लोकांना एकमेकांशी जुळवून घेताना काय गमती-जमती आणि व्याप-ताप होऊ
शकतात हे मांडण्यासाठी मी हे लिखाण केलं होतं. त्या जोडीनं कित्येक गैरसमज / गफलतींमध्ये
आपण (दोन्ही बाजूंना हे लागू आहे) कसे स्वत:ला गुंफून ठेवतो आणि अगदी साध्या-साध्या
बाबतींतही तारतम्य विसरतो – उदाहरणार्थ, समोरच्या माणसाला कुठल्याही धर्माचं, रंगाचं
रूप न देता फक्त एक स्वतंत्र व्यक्ती म्हणून वागवणं – हेही मला दाखवायचं होतं.
आता मराठीत लिहिताना एक वेगळं समाधान मिळालं. अनेक बदलही (मूळ कल्पनेला, पात्रांना
आणि कथावस्तूला धक्का न पोचवता) करता आले. अनुवादापेक्षा नवीन पुस्तक म्हणूनच लिहिल्यासारखं
ते वाटावं असा माझा उद्देश होता. मातृभाषेत लिहिण्याची मजा काही औरच असते... ‘और’ हा
परका शब्दही आपला होतो त्या ओघात.
यापूर्वी मी मराठीत ‘अन गज़ल जुळे’हा गझलसंग्रह माझा जुळा भाऊ डॉ. आश्विनसोबत
लिहिला आहे. ‘निवडक अ-पुलं (थोडं पुलं, थोडं अपुलं)’ हे विनोदी इ-बुकही लिहिलं आहे.
याशिवाय हिंदी/उर्दू गज़लाही करायचा प्रयत्न केला आहे. पण कादंबरी-लेखन
हा या सर्वांपेक्षा वेगळाच अनुभव होता. कादंबरी मला वाचायला अतिशय आवडते. हरिभाऊ आपटयांपासून
ते विश्वास पाटलांपर्यंत मी अनेक मराठी कादंबऱ्या वाचल्या आहेत. तसंच जॉर्ज ऑरवेलपासून
जेफ्री आर्चरपर्यंत (किंवा चेतन भगतपर्यंत) अनेक इंग्रजीही. इथे ‘आर्चर’वरून माझे काही
इंग्रजी मित्र ‘'वुइ वोन्ट होल्ड इट अगेन्स्ट यू'’ असं म्हणतील – एकानं म्हटलं होतंही
(!)... पण हा त्यांच्या विनोदबुद्धीचा भाग
झाला. मी आपटे-ऑरवेल आणि पाटील-आर्चर/भगत हे मोजपट्टीच्या दोन बाजू म्हणून वापरले नाहीयेत.
(तुम्हांला तसं वाटलं तर तो तुमचा प्रश्न आहे.) पण काही उत्तम
आणि काही ‘उत्तम होऊ शकल्या असत्या’ अशा कादंबऱ्या वाचून मी कादंबरी लिहायला घेतली
तेव्हा माझ्यापुरती एक नियमावली तयार केली.
पहिला नियम. कादंबरी म्हणजे एक दीर्घ-कथा किंवा नुसतीच लांबलचक गोष्ट नाही.
पात्रांच्या मनातले विचार, त्यांच्या वर्तनामागची मन:स्थिती मांडता यायला हवी. डॅफ्ने
ड्यु मॉरिएचं 'माय कझिन रेचल' हे पुस्तक मला या बाबतीत आदर्श वाटतं. त्याची कथा दोन-तीन
वाक्यांत सांगता येईल; पण त्या नायकाच्या मनातली सगळी घालमेल कळण्यासाठी ती कादंबरीच
वाचायला हवी. अशा वर्णनांना रंजक करण्यासाठी संवादांची जोड असू नये असं मात्र नाही.
हर्मन हेसच्या ‘सिद्धार्थ’मध्ये संवाद आहेतच की.
दुसरा नियम. कादंबरी हा माझ्या मते असा लेखन-प्रकार आहे की ज्यातली प्रत्येक
काल्पनिक गोष्ट प्रत्यक्षात घडू शकते. अतिशयोक्ती, योगायोग वापरले जाऊ शकतात पण त्यांनाही
या नियमाचं बंधन हवं. या कादंबरीत ‘वेडनसफोर्ड’ नावाचं काल्पनिक खेडं आहे. 'के अँड
एम' नावाची एक काल्पनिक कंपनी आहे. बी. पी. सारख्या कंपन्यांबद्दलचे ‘पब्लिक डोमेन’
मधले संदर्भही आहेत आणि ‘ग्लेनमार्क’ संबंधित रचलेले काही कथेला आवश्यक प्रसंगही. सचिन
तेंडुलकर काल्पनिक नसला तरी त्याचा कथेतला सहभाग त्याच्याविषयी जी माहिती आपणां सर्वांनाच
असते त्यातून आलाय. स्वाती या पात्राच्या आयुष्यातल्या काही घटनाही याच नियमाचं पालन
करून लिहिल्या आहेत. किंबहुना त्या प्रसंगांसारख्या (पण तंतोतंत जुळणाऱ्या नव्हेत)
दोन घटना मला माहितीही आहेत!
तिसरा नियम. दुसऱ्या नियम जिथे संपतो तिथेच सुरू करूया. हे पुस्तक म्हणजे फक्त
माझी गोष्ट पात्रं बदलून लिहायचा प्रयत्न अजिबात नाहीये - तो तसा नसावा हे मी प्रथम
ठरवलं होतं. तसं झालं असतं तर कदाचित मी इतर पात्रांना, त्यांच्या भूमिकांना न्याय
देऊ शकलो नसतो. थोड्या घटना खरोखर माझ्या बाबतीत घडलेल्या आहेत किंवा मी पाहिलेल्या
आहेत, एवढं सोडल्यास ही पूर्णत: वेगळ्या पात्रांची, स्वभावांची आणि प्रसंगांची अशी
कादंबरी आहे की जिच्यातून मला काही विचार निदर्शनास आणून द्यायचे होते. पर्ल बकचं
'द गुड अर्थ' किंवा हरिभाऊ आपट्यांचं 'पण लक्षात कोण घेतो?' ही पुस्तकं या बाबतीत मला
लक्षणीय वाटतात.
चौथा नियम. माझे वडील (डॉक्टर मुरलीधर जावडेकर) मला नेहमी सांगायचे की कादंबरीचा
आवाका एवढा मोठा असायला हवा की तिच्यातून जीवनाची दिशा बदलू शकते, जगाचा रोख पालटू
शकतो! गांधीजींना आपल्या आश्रमाचं नाव ‘टॉलस्टॉय फार्म’ द्यावंसं वाटलं. पुढे सिद्ध
झालेल्या अनेक संकल्पनांचा उगम ज्यूल व्हर्नच्या लिखाणात सापडला. अशी अनेक उदाहरणं
यांची साक्ष देतात. अर्थात मला कुठेही या महान व्यक्तींशी तुलना करायची नाहीये. अतिशय
विनम्रपणे इतकंच म्हणायचंय की ‘वर्किंग वंडर्स’ची कल्पना, इंग्रजीत 'टू इज अ मॉब' आणि
मराठीत ‘बेजमाव’ ही शीर्षकं या साऱ्यांच्या बांधणीत कुठे तरी हे संस्कार माझ्या कामी
आले असावेत. 'टू इज अ मॉब' हे इंग्रजी नाव मला 'टू इज कंपनी' या म्हणीवरून सुचलं होतं.
दोन माणसं एकत्र आली आणि आपलं स्वत्व गमावून बसली की त्यांच्या विचारांतून 'बेबनाव'च
होण्याची शक्यता अधिक! ‘बेअक्कल’ हा आद्य शब्द (दोन जणांची एकत्रितपणे?) गेलेली अक्कल
असाच आहे ना? मग अशी माणसं अक्कल गहाण टाकून एकत्र आल्यावर ‘कंपनी’ मिळण्यापेक्षा जमाव
/ ‘मॉब’ (‘आम्ही’ विरुद्ध ‘ते’ – या बेबनावातून ‘बेजमाव’) होण्याचीच
शक्यता अधिक!
पाचवा नियम. कादंबरी-लिखाण कसं असावं याबद्दल. ‘इंडिका’ कशी असावी हे टाटा
मोटर्सच्या इंजिनियर्सना दिग्दर्शन करताना रतन टाटा म्हणाले होते – ‘मारुती ८००’ ची
किंमत पण ‘ॲम्बेसेडर’सारखी आलिशान आणि ‘झेन’सारखी ऐटदार गाडी (होय, त्या काळी ‘मारुती
८००’च्या तुलनेत ‘मारुती झेन’ म्हणजे ऐष वाटायची) – हे आपल्याला देता आलं पाहिजे. आपल्याला
माहिती आहे की प्रत्यक्षात बाजारात आली तेव्हा ‘इंडिका’ खूपच वेगळी होती. पण या दृष्टीतूनच
तिच्या जडण-घडणीची दिशा ठरली. माझ्या लेखनासाठी मी - हलकं-फुलकं विनोदी लिखाण, त्यात
गुंफलेले काही गंभीर प्रश्न (आणि त्यांची मला अभिप्रेत उत्तरं) आणि काही जीवन-विषयक
विचार (त्यांना मी नवे म्हणणार नाही, पण पुन: स्पष्टपणे मांडायचा प्रयत्न केला आहे
असं मात्र म्हणेन) ही चौकट (की त्रिकोण?) आखून घेतली होती. (कादंबरीतला प्रेमाचा त्रिकोण
अजून निराळा.)
सहावा नियम. माझा मोठा भाऊ डॉक्टर योगेंद्र जावडेकर जेव्हा त्याची ‘डॉक्टर
नावाचा माणूस’ (‘ग्रंथाली’ प्रकाशित) कादंबरी लिहीत होता, तेव्हा त्याच्याशी झालेली
चर्चा मला आठवते. कादंबरीतली हॉस्पिटलची इमारत हेही एक पात्र असल्यासारखं लिहिलं असलं
पाहिजे. तिची भव्यता, वॉर्ड्स, कॉरिडॉर्स, ऑपेरेशन-थिएटर्स, खाटा, उपकरणं, तिथली डॉक्टर-नर्स-आया,
पेशंट-नातेवाईक लोकांची वर्दळ हे सगळं आपल्या डोळयांसमोर इतकं स्वच्छ दिसायला हवं की
प्रत्यक्षात त्या नावाच्या ठिकाणी आपण गेलो तर आपल्याला नवखं वाटणारच नाही! या आठवणीतून
मी काही जागा आणि काही निर्जीव गोष्टी (उदाहरणार्थ चहा – अर्थात तो सजीव नसला तरी संजीवनी
असतोच -) पात्रांसारख्याच रंगावायचा प्रयत्न करू शकलो. प्रभाकर पेंढारकरांचं ‘रारंग
ढांग’ हे एक उल्लेखनीय पुस्तक या नियमाबाबतीत. त्यांनी त्या पर्वत-कड्यालाच संजीवनी
दिली आहे.
सातवा नियम. हा सर्वांत सोपा. पुस्तकाला वयोमर्यादा असू नये. उगाच चावट लिहायचं
नाही. ‘गरजू’ मंडळींचा अपेक्षाभंग झाला तरी हरकत नाही.
आठवा नियम. खरं तर ही ‘सोय’ आहे. कादंबरीतली प्रकरणं लिहिताना मी त्यांना नावं
दिली, तशी आवश्यकता नसली तरीही. कदाचित पान शोधायला त्यांचा वाचकांनाही उपयोग होईल.
हे पुस्तक मी का लिहिलं? मी ‘अर्पण’ करताना जे लिहिलंय ते थोडं स्पष्ट करतो.
आपल्याला कुठेही गेलो तरी बहुतांशी अतिशय निर्मळ, स्वच्छ मनाची माणसं भेटतात. त्यांना
आपण हवे असतो. मैत्री होवो, न होवो - एक चांगला परिचय हवा असतो. मग अचानक कुठे तरी
काही संकल्पना या मनांना कलुषित करतात. ‘देश’ हा देखील एक भ्रमच नाही का? वास्तविक
कायदा-सुव्यवस्थेसाठी आखलेले प्रांत इतकीच खरं तर त्यांच्याबद्दल भ्रांत बाळगायला हवी.
पण आपण किती संभ्रमात राहतो आणि वाहावत जातो! लोक इतिहासाची आठवण करून देतात. वुडहाऊसला
त्याच्याच देशात – इंग्लंडमध्ये – लोकांनी ‘या काळात राहायला अयोग्य’ ठरवलं होतं. अगदी
देशांचं जाऊ द्या. माझे आई-वडील महाराष्ट्रातच नोकरीनिमित्त देशावरून कोकणात गेले होते.
पंचवीसहून अधिक वर्षं तिथे काढूनही एकदा माझ्या आईला तिच्या सहकाऱ्यांनी ‘बाहेरची’
असं संबोधलं होतं! अर्थात, हे क्वचित होत असतानाच अनेक तिला जिवाभावाची माणसंही तिथे
लाभली होती. तिचा पाय मोडला असताना गावातल्या एक आजी तिला आईप्रमाणे सोबत करायला रोज रुग्णालयात यायच्या. कित्येकदा ज्या माणसांशी आपल्याला काही देणं-घेणं नसतं ती आपल्याला खरी
माणुसकी दाखवतात. कारण तिथे पगार, बढती अशा स्पर्धा नसतात. माझे स्वत:चे बहुतेक अनुभव
अधिकांश चांगल्या क्षणांनीच भरलेले आणि भारलेले आहेत. हीच माणुसकी आपल्या मनात कशी
जोपासता येईल, दुसऱ्यांत ती आहे ही जाणीव निर्माण करता येईल या विचारांतून हे पुस्तक
तयार झालं.
एक अनुभव लिहावासा वाटतो. मी माझ्या इंग्लंडमधल्या एका नोकरीत सुमारे आठ वर्षं
काढल्यावर त्याच कंपनीत माझी दुसऱ्या जागेवर नेमणूक झाली. या नव्या कामात मला सखोल
तांत्रिक ज्ञान असणं आवश्यक होतं. अचानक – कुणी न सांगता - माझा एक पॉल नावाचा ब्रिटिश
इंजिनियर सहकारी अतिशय आपुलकीनं तेव्हा मला येऊन भेटला आणि मी दुखावला जाणार नाही याची
खबरदारी घेत मला म्हणाला, ‘कुमार, मला असं अजिबात म्हणायचं नाहीये हं की तुला हे अवगत
नाहीये, बरं का! पण तुझी हरकत नसली तर मी तुला हे सगळं तंत्रज्ञान माझ्या परीनं शिकवू
इच्छितो.’ माझ्यासाठी हे वरदानच होतं!... कोण होता हा माझा? – रंग, रूप, संस्कृती
– सगळंच खूप वेगळं असूनही एक नातं आमच्यात का निर्माण झालं होतं? मग मी हे लक्षात ठेवायचं,
की मला कुणीतरी कधीतरी वाईट वागवलं असेल ते? अनेक वाईटांना पुरून उरणारं हे चांगलं
होतं, असं मला वाटतं. वास्तविक असे चांगले प्रसंगच वारंवार येत असतात – आपण आपलं मन
पूर्वग्रहांपासून दूर केलं तर आपल्याला कळतातही! हा प्रसंग मी इंग्रजी कादंबरी प्रकाशित
केल्यानंतर घडलेला आहे. मूळ पुस्तकात मी वेगळा अनुभव लिहिला होता. त्यामुळे माझे विचार
यातून पुन: एकदा सिद्ध झाले असंच मला वाटतं. यानंतर दोन वर्षांनी हे भाषांतर करत असताना
मी पॉलचा बॉसही झालो! तो आणि मी तरीही एकमेकांचे चांगले मित्र आहोत.अशा पुलंच्या भाषेत
सांगायचं झालं तर ‘आपली जीवनं समृद्ध करायला आलेल्या’ अनेकांचा मी ऋणी आहे आणि तो विचार
पुढे न्यावा असं वाटलं म्हणून हा उद्योग केला.
आणखी एक कारण म्हणजे ‘फाइव पॉइंट समवन’ सारख्या कादंबरीत आणि त्यावर बेतलेल्या
‘थ्री इडियट्स’ सारख्या चित्रपटात इंजिनियर होताना काय काय गोष्टींना तोंड द्यायला
लागतं, चित्र-विचित्र प्राध्यापक / प्राचार्य कसे भेटतात हे सगळं आपल्याला पाहायला
मिळतं. पण एकदा इंजिनियर म्हणून बाहेर पडल्यावर – भारतात आणि इंग्लंडमध्ये (कामाची
वेगळी पद्धत असूनही) – कशी ‘आगीतून फुफाट्यात’ अशी आपली अवस्था होते (खरं तर ‘कालचा
गोंधळ बरा होता..’ हे इथे चपखल बसेल) हेही सांगायची खुमखुमी होती.
ऋणनिर्देश करताना हेही मान्य करायला हवं की सध्याच्या काळात गुगल, विकिपीडिया,
इएसपीएनक्रिकइन्फो इत्यादी ठिकाणांवरून इतकी सहज माहिती मिळते, संदर्भ तपासता येतात
आणि ‘मायक्रोसॉफ्ट वर्ड’ मध्ये लेखनात इतके सहज बदल करता येतात की त्यांचा उल्लेख करायचा
विसरही सहज पडू शकतो.
शेवटी इतकंच... या पात्रांना घडवताना मी जगाकडे एका चांगल्या नजरेनं बघायला
शिकलो. जगानंही बहुतांशी माझा अपेक्षाभंग केला नाही. त्यामुळे हा प्रवास आनंददायी होत
गेला. तुमचाही वाचन-प्रवास असाच सकारात्मक होवो ही इच्छा.
(क्रमश:)
-
कुमार जावडेकर.
कमालीचं मुद्देसूद आणि नेटकं लेखन ! माझ्या उल्लेखाबद्दल आभार 🙏🙏
ReplyDeleteप्रस्तावनाच इतकी मुद्देसूद तर प्रत्यक्ष कादंबरी किती व्यवस्थित बेतलेली असेल, या कल्पनेने उत्सुकता ताणलेली आहे. इंग्लिशमधे वाचलेली असेल तरी मराठीतून वाचण्याचा अनुमान आणि आनंद नक्कीच निराळा असेल.
ReplyDeleteकादंबरीची वाट पाहतो आहोत . सगळे मुद्दे खूप पद्धतशिर मांडले आहेत .
ReplyDeleteवाह खूप सुरेख. मला तु हा office चा किस्सा सांगितला होतास आणि आपण ह्यावर चर्चा केली होती. पण आता वाचतांना खुप मजा आली
ReplyDelete