Sunday, 28 September 2025

अंक ४ - अनुक्रमणिका


 1       स्वागत (रवी दाते)

2       लेख, कथा... 6

2.1        नॉर्दन लाइट्स  - आकाशातील दिवाळी (श्रीकांत पट्टलवार) 6

2.2        जानकी (डॉ. राजश्री शिरभाते) 11

2.3        मावळत्या सूर्याचा देश – अलास्का (आशुतोष केळकर) 13

2.4        दर वर्षी येत होतो , पुढल्या वर्षी येणार नाही! (आनंद शिंत्रे) 19

2.5        खेळ मांडियेला वाळवंटी घाई (रवी दाते) 23

2.6        महाराष्ट्राचे जनकवी पी. सावळाराम (डॉ. रवी आपटे) 26

2.7        मी कोण? (श्रीकांत कांबळे) 30

2.8        जाई जुईचा गंध मातीला (अदिती हिरणवार) 33

2.9        कादंबरी –बे-जमाव’: (प्रकरण ) – कुशल – ‘वन डे इन मुंबई’ (कुमार जावडेकर) 35

3       आस्वाद (कविता / गीत/ गजल) 42

3.1        नाते मनाचे (अनुपमा श्रोत्री) 42

3.2        आटपाट (अनिरुद्ध कापरेकर) 43

3.3        प्रेम म्हणजे (प्राची जावडेकर) 44

3.4        स्टेटस (करुणा नेहरकर) 45

3.5        राधा (रेश्मा विकास) 46

3.6        अभंग:  ए आय माउली (नेहा बापट अन्वेकर) 47

3.7        मैत्री (उल्का चौधरी) 48

3.8        '' ची बाधा  (सदर) -  ग़ज़ल आणि गजाली (वेगळा आणि सारखा) (कुमार जावडेकर) 49

4       गप्पा-टप्पा - फॅब्रिक कोलाजमधून सामाजिक योगदान - डॉ. अरुणा मेनेंशी गप्पा (मीरा पट्टलवार) 51

5       कलादालन – अंतरंगांची बाग (मानसी संत) 56

6       डिंगूचा कट्टा - जय जय रामकृष्ण हरी (पूनम पाटील) 57

7       चणे-फुटाणे - वड्यांचा उपास (अमृता तलाठी)


१. स्वागत (रवी दाते)

स्वागत

रवी दाते

"मला अजूनही तो दिवस आठवतोय जेव्हा श्रीकांतजी आणि मीराताई पट्टलवार, मुकुल, मी आणि कुमार या मासिकाच्या प्रकाशनाचा विचार करत होतो" असं म्हणायची पद्धत आहे. पण आज खरोखरच मला, मी या उपक्रमात कसा ओढला गेलो आणि ही “चळवळ” लेखक, कवी, चित्रकार आणि वाचक इत्यादींच्या सहकार्याने वाढत वाढत कशी फोफावली हे अजिबात आठवत नाही. सगळं कसं स्वप्नवत् वाटतंय. बघता बघता एक वर्ष निघून गेलं आणि आज पश्चिमाईचा दुसरा दिवाळी अंक प्रकाशित करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे.


वरील चित्रफित म्हणजे पश्चिमाईच्या जन्मापासून आतापर्यंतच्या प्रवासाची थोडक्यात उजळणी. त्या मासिकाचं नाव काय ठेवायचं? मासिक काढायचं का त्रैमासिक का वार्षिक? नाव ठरलं तरी तसं दुसरं प्रकाशन आहे का? असेल तर कॉपीराईटचा प्रॉब्लेम येईल का? पश्चिमाईतील चि, श् ला ची कशी जोडायची, प्रकाशन कसं करायचं, उद्घाटनाला इलेक्ट्रॉनिक फीत कशी कापायची? फक्त ब्लॉग ठेवायचा का अंक छापायचा? छापलं तर कोणी विकत घेईल का? एक ना दोन शंभर प्रश्न. आमची तयारी कोचरेकर मास्तरांच्या प्रवासाच्या तयारीपेक्षा फार वेगळी नव्हती. सगळ्या संभाव्य अडचणींसाठी स्वतःला तयार करून ठेवले होते. अगदी कोणी लेख किंवा कविता पाठवल्याच नाहीत तर? मासिक बंद करायला लागले तर? इत्यादी इत्यादी. परंतु सुदैवाने अशी वेळ आली नाही.

आपण स्थलांतरित मराठी मंडळी बरेच सांस्कृतिक कार्यक्रम सादर करतो, त्या निमित्ताने एकत्र येतो, मराठीत बोलतो, मराठी शिकवण्यासाठी शाळा चालवतो, टिकवण्यासाठी संमेलन भरवतो, परंतु मध्यंतरी काही प्रकाशक मंडळींशी बोलताना असं लक्षात आलं की निव्वळ साहित्याला वाहिलेलं पाश्चिमात्य देशांतलं हे बहुधा एकमेव प्रकाशन असावं; अगदी एकमेव नसलं तरी काही मोजक्या प्रकाशनांपैकी एक. आपल्या सर्वांच्या दृष्टीने ही अतिशय अभिमानाची गोष्ट आहे - केवळ संपादक, कवी किंवा लेखक म्हणून नव्हे, तर अगदी वाचक म्हणूनही. कारण समोर दर्दी श्रोताच नसेल तर गाणाऱ्याच्या गाण्याला काही अर्थच राहत नाही आणि तीच गत लिहिण्याची. आपण सर्व आहात म्हणून आम्ही आहोत. मध्यंतरी EMS च्या निमित्ताने सौदॅंप्टन पासून अबर्डीन पर्यंत च्या अनेक मराठी लोकांशी प्रत्यक्ष संवाद साधता आला आणि त्यांच्याशी बोलताना असं लक्षात आलं की प्रकाशनासाठी कुठचा मंचच उपलब्ध नसल्याने बऱ्याच जणांचे मूल्यवान साहित्य त्यांच्या कपाटात नुसतं पडून आहे. त्यापैकी काही नवीन मंडळी ज्यांनी आपली कपाटं (का कवाड) उघडून या अंकासाठी मदत केली त्यांचे विशेष आभार. यापैकी रेडिंगच्या आदिती हिरणवार, ब्रेकनेलच्या रेश्मा विकास, लॉर्ड्स्लीच्या उल्का चौधरी, ॲबर्डिनचे आशुतोष केळकर आणि राजश्री शिरभाते चेस्टर-ले-स्ट्रीट इथल्या. याशिवाय मँचेस्टरमध्येच दडलेले छुपे कवी / लेखक म्हणजे डॉक्टर रवी आपटे, डॉक्टर प्राची जावडेकर आणि श्रीकांत कांबळे.

विठ्ठलाची वारी यावर्षी थेट लंडनला येऊन पोचली. “संत कवयित्री” नेहा बापट अन्वेकरांनी विठ्ठलाला AI ने येऊ घातलेल्या संकटापासून वाचवण्यासाठी साकडं घातलं आहे. तर रेश्मा विकास राधा होणं म्हणजे काय हा शोध घेतायत. यानंतर भाद्रपदात येणाऱ्या गणेशोत्सवाच्या, बदलत्या व्यावसायिक आणि बीभत्स स्वरूपाचा केवळ आढावाच नाही, तर त्यावरील उपायही सांगताहेत डॉक्टर शिंत्रे.

डॉक्टर राजश्री शिरभाते यांचे वैद्यकीय जीवनातील अनुभव आणि या पेशाच्या मर्यादा तुम्हाला सुन्न करतील. अदिती हिरणवारांची “जाई जुई”, अनिरुद्धचे “आटपाट” आणि कुमारच्या कादंबरीतील “मुंबईतील पावसाळा” तुम्हाला “देश की मिट्टी” ची आठवण करून देईल.

यु. के.च्या हवामानाला तुम्ही कंटाळला असाल, तर पर्यटनासाठी आशुतोष केळकरांच्या "मावळत्या सूर्याच्या" देशाला जायचे का श्रीकांत पट्टलवारांच्या "मध्यरात्रीच्या सूर्याच्या" असा गोड संभ्रम तुम्हाला पडेल. "तळपत्या सूर्याच्या" देशात कसाबसा वाचलेला बंडू वाचलात आणि घरीच थांबवंसं वाटलं तर मीरा पट्टलवारांच्या डॉक्टर अरुणा मेने यांच्याशी झालेल्या गप्पांमधून तुम्हांला इथे घर बसल्याच कोलाजची नवी दालनं तुमच्यासमोर खुललेली दिसतील!

अगम्य गझल सहजपणे समजावून द्यावी ती केवळ कुमारनीच आणि “मी कोण?” सारख्या गहन प्रश्नाचे साध्या सोप्या भाषेत स्पष्टीकरण श्रीकांत कांबळेनी. पी सावळारामांच्या आठवणी सांगताहेत आपलेच डॉक्टर रवी आपटे.

हे सर्व आणि अजून खूप काही घेऊन आलो आहोत विविध विषयांनी भरगच्च भरलेल्या या दिवाळी विशेषांकात.

- रवी दाते.



२.१ - नॉर्दन लाइट्स - आकाशातील दिवाळी (श्रीकांत पट्टलवार)

नॉर्दन लाइट्स  - आकाशातील दिवाळी  

श्रीकांत पट्टलवार

१० मे २०२४ च्या मध्यरात्री संपूर्ण इंग्लंडचं आकाश – नॉर्दन लाइट्सच्या गुलाबी-हिरव्या रंगानी उजळून निघालं होतं. लगेचच या अविस्मरणीय प्रसंगाचे हजारो फोटो सोशल मिडियावर झळकू लागले. मात्र पुरेशी माहिती नसल्यामुळे  दर ११-१२ वर्षानंतरही क्वचितच घडणारा हा प्रसंग आपण नीट अनुभवू शकलो नाही, आपल्या कॅमेऱ्यात टिपू शकलो नाही याची आम्हाला खूप हळहळ वाटू लागली. आणि ठरवलं की आपण याबद्दल खोलात जाऊन माहिती काढायची, नॉर्दन लाइट्स बघण्याकरता काय काय गोष्टी माहित असायला हव्यात त्याचा शोध घ्यायला सुरवात केली.

नॉर्दन लाइट्स किंवा वैज्ञानिक भाषेत ‘अरोरा बोंरिअलिस’ बघायचे असतील तर त्या रात्री सोलर सबस्टॉर्म किंवा सोलर ऍक्टिव्हिटी स्ट्रॉंग असली पाहिजे. या सबस्टॉर्म मधून निघालेले अणू - रेणू पृथ्वीवरील उत्तर ध्रुवाजवळील तीव्र चुंबकीय क्षेत्रात शिरल्यावर वातावरणातील ऑक्सिजन किंवा नायट्रोजन बरोबर होणाऱ्या प्रक्रियेतून आकाशात हिरवा किंवा गुलाबी असा प्रकाश निर्माण होतो. सूर्यावरील या सबस्टॉर्मची तीव्रता सतत कमी जास्त होत असते आणि त्यातूनच आपल्याला नॉर्दन लाईटसच नृत्य पाहायला मिळतं. Glendale App वर रोज सबस्टॉर्मची तीव्रता किती आहे, पृथीवरील कुठल्या देशात, शहरात नॉर्दन लाईटस् दिसू शकतील ह्याची शक्यता वर्तवली जाते. नॉर्दन लाईट्स ची एक गंमत म्हणजे उघड्या डोळ्यांनी बघितलं तर तुम्हाला फक्त पांढरा धूसर प्रकाश झोत दिसतो पण मोबाईलवर नाईट मोड आणि ठराविक एक्सपोजर सेटिंग वापरले तर हा प्रकाश अतिशय सुंदर हिरवा किंवा गडद गुलाबी रंगाचा दिसतो आणि सहज टिपता येतो.

नॉर्वेच्या उत्तरेतील ट्रॉमसो हे गाव तर नॉर्दन लाइट्स साठीच प्रसिद्ध आहे. लँजेन आल्प्सच्या बर्फाच्छादित पर्वतरांगा, त्यांच्या कुशीत असणारे स्वच्छ निळ्या रंगाचे असंख्य फ्योर्ड्स, रस्त्यांच्या दोन्ही बाजूला बर्फाचे ढीग, अशा अतिशय निसर्गरम्य परिसरात वसलेल्या ट्रॉम्सोला जाऊन  नॉर्दन लाईट्सचा अनुभव घेण्याचं आम्ही ठरवलं.

योग्य वेळ, योग्य स्थान, योग्य वातावरण, निरभ्र आकाश ह्या तीनही गोष्टी जुळून आल्या तरच नॉर्दन लाइट्स दिसतात. ढगाळी किंवा पावसाळी हवामान असल तर तुमचं हिरमोड होणार हे नक्की. म्हणून आम्ही ट्रॉमसो भेटीत दोन दिवस जास्तच ठेवले...

२५ फेब्रुवारीला आम्ही ट्रॉम्सो एअरपोर्ट ला पोचलो आणि टॅक्सीने सुमारे ८० किमी दूर असणाऱ्या रिसॉर्टला निघालो. लहान मोठ्या फ्योर्ड्समधून जाणारा  बर्फाळलेला रस्ता, बर्फांच्या ढिगाऱ्यांनी वेढलेली टुमदार बंगले पाहात  पाहात रात्री १० वाजता आम्ही रिसोर्टला पोचलो. मालांगेन रिसॉर्ट गावाबाहेर, कमी वस्तीच्या ठिकाणी त्यामुळे सर्वदूर शुकशुकाट. इथे पोचल्यावर आधी फोन सेटिंग ची प्रॅक्टिस केली. हळूच बालकनीच दार उघडताच आम्हाला  अक्षरशः आनंदाच्या उकळ्या फुटल्या. नॉर्दन लाईट्सनी आमचे स्वागत केले. आतापर्यंत जे काही वाचलं होतं, ऐकलं होतं त्यापेक्षा कितीतरी सुंदर दृश्य प्रत्यक्ष दिसू लागल. पुढील दोन-तीन तास भूक–थंडी विसरून आम्ही आकाशातील दीपोत्सवच पाहत होतो.


दुसऱ्या दिवशी सकाळी रिसॉर्टचं जवळच थंडीतच एक फेरफटका मारला. दिवसभरात आम्ही कॅमेरा टेक्निकस बऱ्यापैकी आत्मसात केलं होतं. संध्याकाळ होताच आजच्या शो-साठी रेस्टोरेंन्टच्या डेकवर ट्रायपॉड सज्ज केला! थोड्याच वेळात हिरव्या रंगाचा एक मोठा प्रकाश झोत अचानक आकाशात आला आणि त्याचे अक्षरशः नर्तन सुरु झाले. क्षणात सुदर्शन चक्रा सारखी गुंडाळी, क्षणात दिवाळीतील फुलभाज्यांसारखा सर्वदूर वर्षाव तर क्षणात बाणासारखा लांब पट्टा. हाच तो डाँसिन्ग अरोरा (अरोरा ही रोमन देवी जी सकाळच्या प्रकाशाचे प्रतिक आणि निसर्गाची मूर्ती जी तिच्या तेज आणि सौंदर्यासाठी ओळखली जात असे). अतिशय सुंदर अशी प्रकाशाची दिवाळी आकाशात सुरु झाली. ती प्रत्यक्ष अनुभवता आली आणि टिपता पण आली.


त्यामुळे तिसऱ्या रात्री नॉर्दन लाईट्सचा गायडेड-टूर घेण्याचे ठरवले. दोन तास प्रवास करून रात्री आठ वाजता आमची टूर बस ट्रोम्सोहून हंसनेज ह्या निर्जन ठिकाणी आली. आर्टिक मधलं लपलेलं रत्न असावं असं हे गाव. अतिशय सुंदर परिसर, एका बाजुला आल्प्स आणि फ्योर्ड, तर दुसऱ्या बाजुला आमच्यासारखे हौशी अरोरा प्रवासी. उणे ७, ८ ची कडक्याची थंडी, बोचरा वारा, खाच खळग्यानी भरलेली बर्फाळ जमीन. इथे चालणं खूप जोखमीचं होतं. पण सर्वांचाच उत्साह अगदी शिगेला पोचला होता. गाईड ने आधीच कल्पना दिली होती की हा टूर म्हणजे कॅम्प फायर, हॉट चॉकलेट, कुकीज आणि अरोरा बघण्याचा मनमुराद आनंद! ह्या रात्रीचा वैशिष्ट्य म्हणजे नॉर्दन लाइट्सच्या नर्तनाबरोबरच आकाशात ग्रह ताऱ्यांची सुंदर परेड सुरू होती. योग्य स्थळ, निरभ्र आकाश आणि योग्य वेळ असा सगळा मेळ जुळून आला होता. सतत तिसऱ्या रात्री आकाशातील दिवाळी पाहून मन अगदी तृप्त झालं.


चौथ्या रात्री आम्ही ट्रॉम्सोच्या फेरीतून प्रवास केला आणि त्याही वेळी आम्हाला याच नयनरम्य दिवाळीचा अनुभव आला. प्रवासातील चारही दिवस दिवाळी साजरी केल्यावर शेवटच्या दिवशी आम्ही दिवसभर वेगवेगळ्या फ्योर्डसचा प्रवास केला. ट्रॉम्सो आणि भवतालचा परिसर अतिशय निसर्गरम्य आहे शहरातून थोडं बाहेर पडलं की रेनडिअर दिसतात. काही ठिकाणी हस्की राईड करता येते. जागोजागी डोंगराची रांग आणि त्यांच्या पायथ्याशी लहान मोठी सरोवरं. ह्यातलं एक तर पूर्णपणे गोठलेलं. त्यावरही आम्ही मनसोक्त फिरुन घेतलं.


ट्रॉम्सोच्या ५ दिवसाच्या प्रवासातील प्रत्येक क्षण अवर्णनीय होता. जे काही अनुभवलं त्यावर बोलता बोलता परतीच्या प्रवासासाठी विमानात केंव्हा बसलो हे लक्षातच आलं नाही. टेक-ऑफ घेतल्यावर मॅंचेस्टर येईपर्यंत छान झोप घेऊ असं ठरवलं. पण कुठलं काय? पायलट महाशयांनी घोषणा केली की खिडीतून बाहेर पहा, नॉर्दनलाइटची दिवाळी सुरु आहे! आणि शेवटी शेवटी अगदी अनपेक्षितपणे आकाशातील दिवाळी आकाशातूनही पाहण्याच भाग्य आम्हाला लाभलं. 

- श्रीकांत पट्टलवार, रुणकर्ण, यु.के. 

२.२ - जानकी (डॉ. राजश्री शिरभाते)

 जानकी

डॉ. राजश्री शिरभाते

मी चंद्रपूर जवळच्या गडचिरोली गावातल्या सरकारी दवाखान्यात काम करीत होते. इथे आजूबाजूला बराच आदिवासी समाज होता. मला पूर्वीपासून आदिवासी लोकांबद्दल कुतूहल वाटायचे. मला येथे येऊन आता एक वर्ष झाले होते आणि माझे बरेचसे पेशंट आदिवासी लोक असल्यामुळे मी ह्या लोकांबद्दल जमेल ती माहिती गोळा करून त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न करीत होते. 

आज मी सुन्न पणे जानकीच्या रिपोर्टकडे बघत होते. माझ्या डोळ्यांसमोर सावळी, उंच, शेलाट्या बांध्याची, बोलक्या डोळ्यांची जानकी येत होती. मला आठवले, माझी ह्या सरकारी दवाखान्यात पोस्टिंग होवून दोन-तीन महिने झाले असतील. एक दिवस शिवा आणि जानकी मला भेटायला आलेत. हसरा शिवा आणि लाजरी जानकी जवळच्या आदिवासी गावातून आले होते.  शिवा म्हणाला- "डाॅक्टरीन बाई,  मी लवकरचं दुबईला कामासाठी जाणार आहे. मी नसताना जानकीला काही गरज पडली तर ती तुमच्याकडे यावी म्हणून मी माझ्यासोबत तिला घेऊन आलो. मला कळले की तुम्ही खूप चांगल्या डाॅक्टर आहात म्हणून." मला शिवाचे खूपचं कौतुक वाटले, खरचं किती बायकोची काळजी घेणारा नवरा होता शिवा! मी म्हटले, "शिवा, काळजी करु नकोस, जानकी माझ्याकडे केव्हाही येऊ शकते." 

शिवाचे जानकी बरोबर दीड वर्षांपूर्वीच लग्न झाले होते. 

... आणि आता माझ्यासमोर जानकीचा पोस्टमार्टम रिपोर्ट होता. जानकीने घराजवळच्या विहिरीत उडी घेऊन जीव दिला होता. जानकीचा रिपोर्ट घ्यायला तिची मैत्रीण कौसल्या आली होती. ती म्हणाली, "दोन महिन्यांसाठी मी माझ्या नणंदेच्या बाळंतपणासाठी दुसर्‍या गांवाला गेले होते. मी कालच परत आले. मी नणंदेकडे जाण्यापूर्वीच मला जानकी मध्ये काहीतरी फरक जाणवत होता. पण मला वाटले शिवा दूर असल्यामुळे आणि त्याला जाऊन आता बरेच दिवस झाल्यामुळे जानकीला त्याची आठवण येत असावी. शिवा अन जानकीचे एकमेकांवर खूप प्रेम होते. शिवाला त्याच्या आजीने वाढविले होते आणि शिवाचे लग्न झाल्यानंतर तीन महिन्यातचं ती पण गेली. त्यामुळे शिवाला जानकीशिवाय कुणीचं नव्हते. माझी सासू सांगत होती की मी नणंदेकडे गेल्यापासून जानकी झोपडी बाहेर पण जास्ती पडत नव्हती! आणि जानकीला माहिती होते की मी काल परत येणार होते, तरीही माझ्या येण्याच्या आदल्याच रात्री तिने स्वतःचा जीव घेतला. खरचं डाॅक्टरीन बाई, मला कळतं नाही की जानकीने असे का केले!"

माझ्या लक्षात सगळा प्रकार आला. रिपोर्ट मध्ये जानकीला एंडोमेट्रियोसिस असल्याचे लिहीले होते. मी कौसल्याला म्हटले, "जानकीला पोटाचा आजार झाला होता, त्यामुळे तिचे पोट वाढले होते. ह्या आजारात पीरेड्स पण अनियमीत होतांत, मळमळायला होतं, थकवा येतो. तिला कळले नसेल तिला काय झाले. शिवा लांब असल्यामुळे आणि पोट वाढलेले असल्यामुळे तिला वाटले की लोक तिला व्यभिचारी समजतील. तिला आपण निर्दोषी आहोत, पवित्र आहोत हे कसे सिद्ध करावे ते समजतं नव्हते! म्हणूनच तिने तू येण्याच्या आदल्या रात्रीच आत्महत्या केली. कौसल्या, जानकीने मला भेटायला यायला हवं होतं. काहीतरी मार्ग निघालाचं असता." आदिवासी जमातीतील आणि अशिक्षितपणामुळे एका तरूण, निष्पाप, लाजऱ्या तरुणीचा बळी गेला होता. मला शिवाचा हसरा चेहरा डोळ्यांसमोर आला, डोळ्यात अश्रू तरळले आणि मनांत विचार आला - 'दो हंसों का जोडा बिछड गयो रे!'  

- डॉ. राजश्री शिरभाते, चेस्टर-ले-स्ट्रीट, यु.के.

२.३ - मावळत्या सूर्याचा देश –अलास्का (आशुतोष केळकर)

मावळत्या सूर्याचा देश – अलास्का

आशुतोष केळकर

उत्तर ध्रुव आणि तिथे जवळ वास्तव्य करणारी माणसांची जमात ह्या विषयी मला नेहमीच कुतूहल वाटत आलंय. मग तो अगदी उत्तरेकडील नॉर्वेचा भूभाग असो, नाहीतर ग्रीनलँडची भूमी असो, किंवा निर्मनुष्य बर्फाच्छादित रशियाचा प्रांत असो.

पण ह्या वेळेच्या प्रवासाचं वैशिष्ट्य म्हणजे फक्त उत्तर ध्रुवाजवळचा प्रदेश एवढाच नसून, पार अगदी पलीकडे पश्चिमेला वसलेला, उत्तर ध्रुवाशी जवळीक साधणारा, अमेरिकेचा प्रांत असला तरी रशियाला भिडू पाहणारा, ब्राउन, ब्लॅक आणि अगदी पोलार अस्वले यांच्याशी मैत्री साधणारा, व्हेल आणि किलर व्हेल यांच्याशी समुद्रात खेळणारा, मूस आणि इतर वन्य जमातीच्या अस्तित्वाची खूण दाखवणारा, कमी मनुष्यवस्ती असणारा पण निसर्गाच्या वैविध्याने नटलेला, हिरवेजगार झाडी आणि बर्फाच्छादित हिमशिखरे ह्याच्यातून डोकावणाऱ्या सूर्याला आलिंगन देणारा, नागमोडी रस्त्यांची वळणं घेत जवळून वाहणाऱ्या नदीच्या प्रवाहाबरोबर स्पर्धा करणारा प्रदेश हे आमचं गंतव्यस्थान म्हणून निश्चित झालं होतं.

मावळत्या सूर्याचा देश – अलास्का

जानेवारी महिना. आकाशात सूर्याची जेमतेम २-४ तास हजेरी. अशात रात्री ३ वाजताचा गडद अंधार, तीव्र वादळात वेगाने वाहणारे वारे, इतर कसलाही आवाज नाही,, वार्‍याबरोबर उडवला जाणारा पांढरा शुभ्र बर्फ, त्यामुळे रस्त्यावर जमा झालेले बर्फाचे डोंगर, निर्मनुष्य रस्ते, ह्यांतून मार्ग काढत जाणारी एक छोटिशी मोटार कार. त्याला कारणही तसंच — प्रसूतीच्या वेदना. गाडी भरधाव वेगाने धावते आहे. उत्तरेला अगदी आर्क्टिक सर्कल जवळ वसलेल्या नॉर्थ पोल गावाकडून अँकोरेजच्या दिशेने.

आम्ही अँकोरेजमध्ये पाय ठेवला त्या दिवशीच हा खरा घडलेला प्रसंग आम्हाला तिथे भेटलेल्या एका कुटुंबाने वर्णन करून सांगितला आणि आमच्या अंगावर शहारे आले.

“अँकरॉज” ही अलास्काची राजधानी. ३ लाख लोकवस्तीचं हे शहर विविधतेने नटलेलं आहे. मोकळे मोठे रस्ते, कमी रहदारी, चारही बाजूंनी बर्फाने आच्छादलेले डोंगर, नागमोडी वळणं घेत जाणारे रस्ते, उन्हाळ्यातील गुलाबी थंडी, तापमान सधारण १२ डिग्री सेल्सिअस. यामुळे बर्फाचा जोर ओसरू लागलेला अशा वातावरणात आम्ही तिथे पाऊल ठेवलं.

अलास्काला मावळत्या सूर्याचा देश म्हणण्याचं कारण की अलास्काचा भूभाग हा अगदी पश्चिमेकडे सरकलेला आहे. जपान किंवा न्यूझीलंडला उगवत्या सूर्याचा देश म्हणतात, तसंच पृथ्वी तलाच्या दृष्टिकोनातून सूर्य सगळ्यात शेवटी मावळण्याचं ठिकाण म्हणजे अलास्का. त्याच्या पश्चिमेला छोट्या बेटांवर वस्ती तशी नाहीच. त्यामुळे वस्तीच्या दृष्टिकोनातून मावळता सूर्य इथेच. म्हणजे उन्हाळ्यात इथे सूर्य मावळत असतानाच जपानमध्ये दुसऱ्या दिवसाची दुपार असते.

तसंच हा भूभाग उत्तरेला असल्यामुळे सूर्य उगवणे आणि मावळणे या दोन्ही गोष्टी दक्षिणेला घडतात. म्हणजे सूर्य पूर्वेकडे उगवून पश्चिमेला मावळतो ही संकल्पना लौकिकार्थाने थोडी चुकीची ठरते. उन्हाळ्यात जवळपास २२–२३ तास उजेड आणि हिवाळ्यात २० तास अंधार. मे महिन्यात रात्री १२:०० चा सूर्य पाहून गंमत वाटायची. त्यानंतर सूर्य मावळला असं वाटतं असतानाच अगदी २:०० वाजताच झुंजमुंजू व्हायला लागायचं.

पहिल्याच दिवशी 'मूस'चं दर्शन झालं. मूस हा घोड्यासारखा दिसणारा प्राणी. तसा कोणाच्या वाटेला जात नाही परंतु त्यापासून थोडं लांबच रहा असा आम्हाला सल्ला देण्यात आला होता. तगडे पाय आणि एक फटका प्राणघातक ठरायला पुष्कळ असतो. जागोजागी 'मूस आणि अस्वले' यापासून सावधान असे फलक पाहायला मिळाले. अलास्का खरं तर अस्वल आणि मूस यांची भूमी. मानवप्राण्याने या भागात अतिक्रमण केले आहे. परंतु राज्य त्यांचंच. त्यामुळे अनेक सूचना फलक जाणीव करून देतात की तुम्ही त्यांच्या राज्यात आला आहात. अस्वलांशी कसे वागायचे याचे नियम पाहून गंमत वाटली. जंगलातून चालताना अस्वल आले तर पहिले पळू नका. मुख्य म्हणजे पाठ दाखवू नका. तोंड त्याच्याकडेच ठेवा, हळूहळू मागे सरका. शिट्टी वाजवा. अस्वलाशी बोला असे गंमतीदार फलक. ब्राउन अस्वल आले तर जमिनीवर एखाद्या बॉलसारखे शरीराचं मुटकुळं करून डोकं जमिनीत घुसवून पडून रहा. शक्यतो श्वास रोखून ठेवा. खरोखरच अस्वल समोर आलं तर या गोष्टी लक्षात ठेवून जमिनीत तोंड खुपसून पडून माणूस राहील का, ह्या विचारानेच हसू फुटलं. धूम ठोकण हाच पर्याय मला वाटते आम्ही स्वीकारला असता, पण तशी वेळ आली नाही हे आमचं भाग्य. पण आम्ही अनेक जंगलातून पायी प्रवास केला तेव्हा मनात कायम भीती वाटत राहायची. मुळात अशा जंगलातून फिरताना दुसरा माणूस अपघातानेच दिसायचा. घनदाट झाडी, त्यात अस्वल केव्हा आणि कसं दिसेल ह्या विचाराने आमच्या मनाचं बरंच वेळा थरकाप उडाला, परंतु ते अनुभवण्यात एक थ्रिल देखील असायचं. सूचना होत्या की जंगलातून चालताना शिट्टी वाजवत चला. सहसा प्राणी जमात माणसाच्या वाटेला जात नाही.

अलास्का प्रांत हा प्रशांत महासागर प्लेट आणि उत्तर अमेरिका प्लेट यांच्या सरहद्दीवर वसलेला असल्यामुळे बऱ्याच भूगर्भीय हालचालींसाठी संवेदनशील आहे. या प्रांताने बरेच भूकंपाचे धक्के पचवले आहेत. १९६४ आणि १९६५ साली अनुक्रमे ९.२ आणि ८.७ रिश्टर स्केलच्या भूकंपाने अँकरॉज शहराला हादरवले. मोठी पडझड, जीवितहानी झाली. भूकंपाचा केंद्रबिंदू असणाऱ्या ठिकाणी आता एक मोठे उद्यान उभे आहे. भूकंपाच्या पूर्वी शहराची रचना कशी होती, भूकंपात काय हानी झाली, सरकारने त्यावर कशी मात केली आणि आता उभं असलेलं शहर — या सगळ्याची माहिती या उद्यानात ठेवली आहे.

अलास्का पूर्वी रशियाचा भाग होता. ह्या भूभागाचं महत्त्व त्यावेळी रशियन लोकांना कळालं नाही. “बेअरिंग” समुद्राने रशियापासून वेगळा झालेला हा भूभाग तसाही अमेरिकेच्या जवळ. सीमारेषेवर कॅनडा–रशियाचा अवाढव्यभूभाग बघता हा दूरवलेला प्रांत अमेरिकेला रशियाने १५० वर्षांपूर्वी ७२ लाख डॉलर्सना विकला. पण ही त्यांची चूक ठरली. वैश्विक निरीक्षणाच्या दृष्टिकोनातून खरं तर अलास्काला महत्त्व होतंच. परंतु आणखी महत्त्व प्राप्त झालं ते येथील समुद्रात मिळालेल्या तेल आणि नैसर्गिक वायूच्या आणि भूखजिनांच्या साठ्यांमुळे. हा भूभाग ताब्यात येताच अनेक आंतरराष्ट्रीय कंपन्यांनी अँकरेजमध्ये कार्यालयं स्थापन केली. मग त्याच्यामागोमाग इतर कॉन्ट्रॅक्टिंग कंपन्याही पोहोचल्या. अलास्काला मग आर्थिक आणि राजकीय महत्त्व प्राप्त झालं. परंतु आजही रशियन संस्कृतीचे ठसे आढळतात. रशियन बोलचाल, खाद्यपदार्थांची सवयी, भाषा यावर रशियाचा प्रभाव आढळतो. अर्थात अमेरिकेच्या धोरणांशी आता स्थानिक सहमत असल्याने दैनंदिन जीवनात अमेरिकेचा प्रभाव जाणवतो. हल्लीच झालेली ट्रम्प आणि पुतिन यांची भेट अलास्काच्या राजकीय महत्त्वाची साक्ष देते.

अँकरॉज नंतर आम्ही प्रस्थान केलं ते अँटन अँडरसन टनेलमधून सिवर्ड शहराकडे. ४ किलोमीटर लांबीच्या डोंगरातून वाट काढत खोदलेल्या या छोट्याशा टनेलमधूनच हा प्रवास करावा लागतो. दुसरा रस्ता नाही. जगात हा एकमेव टनेल आहे ज्यामधून आगगाडी आणि मोटार कार एकाच टनेलमधून जातात. ४ किलोमीटर हा प्रवास टनेलमधून कारने करताना थोडी भीती वाटते. कारण तुम्हाला रेल्वेच्या रूळांवरून गाडी चालवावी लागते. गाडीचा वेग हा २५ मैलांपेक्षा जास्त नसावा आणि मध्ये कुठे थांबायचं नाही. दर ठराविक वेळाने कार ट्रॅफिक बंद करून आगगाडी साठी टनेल मोकळा करण्यात येतो.


सिवर्ड हे थोडंसं पूर्व-दक्षिणेला वसलेलं छोटं शहर. समुद्रकिनारा आणि क्रूझसाठी प्रसिद्ध. येथे पहिल्या दिवशी आम्ही क्रूझ घेतली ते समुद्रातून दूर प्रवास करत हिमकडे पाहण्यासाठी. अलास्कामध्ये बर्फाच्छादित हिमनद्या समुद्राच्या किंवा सरोवराच्या काठावर पोहोचल्यावर त्यांच्या टोकावरून मोठे बर्फाचे तुकडे पाण्यात कोसळतात. या प्रक्रियेला 'ग्लेशियर कॅल्व्हिंग' म्हणतात. ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे जिथे हिमनदीचा पुढचा भाग तापमान, दाब आणि गुरुत्वाकर्षणामुळे कमकुवत होतो आणि अखेरीस तुटून पाण्यात पडतो. हे तुकडे नंतर हिमशिल्प किंवा 'आइसबर्ग' म्हणून ओळखले जातात. अलास्कामधील हबर्ड ग्लेशियर, कोलंबिया ग्लेशियर, ग्लेशियर बे नॅशनल पार्क आणि प्रिन्स विल्यम साउंड येथे ही दृश्ये पाहायला मिळतात. पर्यटक क्रूझ किंवा बोटींमधून ही दृश्ये अनुभवतात. थंड हवा, निरव शांतता, समुद्रात उभे असलेले उंच हिमकडे, त्यातून विलग होणारा एखादा छोटा कडा, तो पडताना होणारा प्रचंड आवाज आणि समुद्रात उसळणाऱ्या लाटा पाहणे हा एक विलक्षण अनुभव आहे.

दुसऱ्या दिवशी आम्ही प्रशांत महासागरात व्हेल वॉचिंग करण्यासाठी प्रस्थान केले. खवळलेल्या समुद्रात शिरताना भीती वाटत होती खरी. थोड्याच वेळाने आजूबाजूला व्हेल माशांचा संचार जाणवू लागला. जाणवू लागला म्हणण्याचे कारण की फक्त शेपटाने सापसाप उडालेले पाणी दिसत होते. दुसरीकडे मात्र ऑटर सारखे प्राणी जवळच पाण्यात पलथे पडून पोहत होते. बाजूलाच असलेल्या अनेक खडक माथ्यांवर अनेक सीलची वस्ती होती. सील आळसावलेले दिसत होते. पाण्यातील छोट्या माशांची शिकार करण्याचा त्यांचा काही मानस दिसत नव्हता. अलास्कातील वन्यजीवन आपल्याला खरंच थक्क करून जाते. बरेच लोक किलर व्हेल पाहण्याच्या उद्देशाने देखील सेवर्डमध्ये येतात. किलर व्हेल आपल्या सावजाची शिकार कशी करतात हे पाहण्यासारखे असते. ५-२० च्या गटाने हे एकत्र येतात, सावजाला सगळीकडून सामूहिकरित्या घेरून शिकार करतात. हा अनुभव मात्र आमच्या वाट्याला आला नाही.


यानंतर आम्ही थोडे उत्तरेला सरकले आणि मोर्चा वळवला तो बर्च सिरप फॅक्टरी आणि 'उलू' सुरीच्या फॅक्टरीकडे. जगात सगळीकडे मेपल सिरप प्रसिद्ध आहे. परंतु बर्च झाडाच्या खोडातून येणाऱ्या रसापासून देखील असाच सिरप बनवता येतो. मेपल सिरप सारखाच याला विशिष्ट गोड चव असते. बर्च झाडांच्या वनातून फेरफटका मारताना प्रत्येक झाडाच्या बुंध्यांना लावलेली बादली आणि सालीतून गळणारा रस याचे दृश्य मोहक होते. तिथून आम्ही प्रयाण केले ते 'उलू' सुरीच्या फॅक्टरीकडे. अर्धचंद्राकृती आकार असलेल्या या सुरीचा वापर एस्किमो स्त्रिया ३००० वर्षांपासून करत आल्या आहेत. धडधार पात, लाकडाची मूठ आणि अर्धचंद्राकृती आकार यामुळे धारदार अस्त्र तयार होऊन कुठलाही चिवट अथवा कडक पदार्थ कापण्याची क्षमता या अस्त्रात तयार होते.

जसजसे आम्ही उत्तरेला सरकलो तसतसे तिथे राहणाऱ्या लोकांच्या दैनंदिन जीवनातील अडचणी लक्षात येऊ लागल्या. हिवाळ्यात तर ह्या अडचणी आ वासून उभ्याच राहतात. खरं म्हणजे बरेचसे लोक ह्या काळात पूर्वेकडील प्रदेशांकडे मार्गक्रमण करतात. ह्या अशा वातावरणात राहणे शक्यच नाही. ह्या काळात शाळा बंद असतात. “होम स्कूलिंग” हा शिक्षणासाठी सगळ्यात उत्तम मार्ग. ऑक्टोबर महिना सुरू लागताच मंडळी युरोपच्या दिशेने मार्गक्रमण करतात. शाळा बंद, होम स्कूलिंग हा सर्वात सोपा मार्ग उपलब्ध. सरकार त्यासाठी अनुदान देते. प्रत्येक होम स्कूलिंग करणाऱ्या कुटुंबाला सरकारकडून अनुदान मिळते. बरीचशी कुटुंबे ह्या संधीचा फायदा घेऊन नोव्हेंबर ते फेब्रुवारी महिन्यात युरोपात येऊन राहतात. होम स्कूलिंग करून परत मार्च महिन्यात अलास्काला प्रयाण करतात. परंतु बऱ्याच कुटुंबांना अनेक अडचणींमुळे हे शक्य होत नाही. म्हातारे आईवडील किंवा इतर जबाबदाऱ्या यामुळे ही मंडळी स्थानिकच राहतात. पण मग अशा कुटुंबांसाठी शाळा चालवणे ही एक जिकिरचं काम होऊन बसतं. थंडीच्या, वादळ वाऱ्याच्या दिवसात बर्फाच्छादित रस्त्यांमधून वाट काढत शिक्षकांना शाळेत यावं लागतं.

'हस्की' कुत्रे हे असंच अलास्काचं वैशिष्ट्य. अगदी फार उत्तरेला बर्फाच्छादित डोंगरातून मार्गक्रमण करताना अलास्कन लोक हस्की कुत्र्यांच्या गाडीचा वापर करतात. याला कारण की हस्की कुत्रे मूलतःच हुशार, मार्ग शोधून काढण्याची त्यांची क्षमता, अती थंड तापमान सहन करण्याची शरीरधारणा यामुळे अलास्कन लोकांच्या, मुख्यत्वे वनविभागाच्या अधिकाऱ्यांच्या दैनंदिन जीवनात त्यांचं योगदान. हस्की कुत्र्यांच्या एका कार्यक्रमाला आम्ही हजेरी लावली. सुमारे ६–८ कुत्रे एका गाडीत जुंपून ती गाडी ओढली जाते. त्या ६–८ कुत्र्यांची एकत्रित हालचाल, सामूहिक गती वाखाणण्याजोगी आढळते. सगळी कुत्रे एकाच गतीने, एकाच दिशेला, एकमेकांना सांभाळून घेत गाडी कशी पुढे ओढतात हा एक कौशल्याचाच भाग. त्यांची वाटचाल एखादा समूह कसा एका तालात पुढे सरकू शकतो ह्याचं एक जिवंत उदाहरण. १५० किलोचं सामान एका गाडीत घालून हे कुत्रे सहज ओढून नेऊ शकतात. तेही शरीर गोठवणाऱ्या थंडीत बर्फातून वाट काढत.

डेनाली अभयारण्य हे अलास्का चे मुख्य आकर्षण. डेनाली वन्यजीव अभयारण्य हे अगदी उत्तरेला, आर्क्टिक सर्कलच्या थोडे खाली ६० लाख एकरच्या अवाढव्य परिसरात वसलेले आहे. घनदाट झाडी, अवाढव्य परिसर, अनेक वन्यजीव, श्वापदे, रम्य निसर्ग आणि आपण.

अभयारण्याच्या वाहतूक खात्याने नेमलेल्या बसने अभयारण्यात शिरताना तुम्ही कुठे खाली उतारू नये अशी सूचना. इथे राज्य असते ते वन्य जीवांचे. अरण्यातून वळत जाणारा छोटासा रस्ता आणि त्यावरून जाणाऱ्या बसमधले सगळेच प्रवासी वन्य जीवन पाहण्यात मशगुल. लांडगे, कॅरिबू, मूस आणि ग्रिझली अस्वले यांचे हे वास्तव स्थान. आजूबाजूला डेनाली पर्वतरांगांची वस्ती. हिमाच्छादित उंच शिखरे. त्याचे सौंदर्य काही निराळेच. उन्हाळ्यात बरेच पर्यटक हे वन्यजीवन अनुभवण्यासाठी डेनालीमध्ये येतात तर हिवाळ्यात या भूमीवर अवतरनारे नॉर्दर्न लाइट्स पाहायला बोचऱ्या थंडीत तुरळक का होईना पण पर्यटकांची गर्दी होते. डेनाली पर्वतरांगा आणि शिखरे यात डौलाने उठून दिसतो तो पर्वत मॅककिन्ले. उत्तर अमेरिका खंडातील सर्वात उंच पर्वत असे बिरुद मिरवणाऱ्या या पर्वताची उंची २०,३०० फूट आहे. पर्वत माथा पाहायला मिळणे कठीणच. बर्फ आणि ढग यातच तो सोनेरी किरणे लपवून ठेवतो.

शेवटचा दिवस उजाडला आणि आम्ही विमानतळाकडे मार्गस्थ झालो ते अनेक अनुभवांची आणि आठवणींची शिदोरी घेऊन. प्रवासाची आवड असल्याने अनेक प्रदेश, अनेक जागा खुणावत असतात. आणि प्रत्येक जागेची एक महती असते, काहीतरी वेगळेपण असते. पृथ्वीतलावर पसरलेल्या अगाध सृष्टीचा मागोवा घेताना आपली पावले छोटी वाटू लागतात. १० दिवसांच्या कालात आम्ही अनुभवलेली अलास्काची भूमी ही निसर्गाच्या भाषेत किरकोळ होती. एखाद्या प्रदेशात कधी कधी ५० वर्षे राहून देखील त्या भूमीची आपल्याला जेमतेम तोंडओळख होते. पण हेही नसे थोडके असं म्हणत प्रस्थान केलं ते अलास्का प्रांताला “परत भेटू” म्हणतच.

- आशुतोष केळकर, ॲबर्डीन, यु. के.

२.४ - दर वर्षी येत होतो , पुढल्या वर्षी येणार नाही! (आनंद शिंत्रे)

दर वर्षी येत होतो , पुढल्या वर्षी येणार नाही! 

आनंद शिंत्रे


(खालच्या काही सूचनांप्रमाणे आमच्या घरी बनवलेले गणपतीचे नमुने)

मराठी माणूस भाद्रपदातील रम्य निसर्गाच्या कुशीत गणपतीच्या आगमनाचे उत्साहाने स्वागत करतो आणि त्यानंतर येणाऱ्या हिंदू दिन-दर्शिकेतील घटस्थापना, नवरात्र, दसरा आणि दिवाळी अशा मागोमाग येणाऱ्या सणवारांचीही वाट पाहतो. सुमारे दीडशे वर्षांपूर्वी गणेश चतुर्थी हा बहुतांशी देवालयात किंवा लहान प्रमाणात साजरा होणारा सण होता. पेशवाईमध्ये १८ व्या शतकात अष्टविनायकांची महती वाढीस लागली, नंतर इंग्रजांच्या काळात त्याला राजाश्रय राहिला नाही. मग १९ व्या शतकाच्या अखेरीस लोकमान्य टिळकांनी निष्क्रिय समाजावर फुंकर घालतानाच एकता आणि संघटन यासाठी सार्वजनिक गणेशोत्सव (१८९३)आणि शिवजयंती उत्सव (१८९५) सुरू केले. यानिमित्ताने स्फूर्तिदायी भाषणे, कीचक-वधासारखे राजसत्तेविरुद्ध संदेश देणारे संगीत नाटक, पोवाडे, कीर्तने यातून स्वातंत्र्यप्रेमी समाजाला लोकजागृतीसाठी वैचारिक व्यासपीठ मिळाले.

स्वातंत्र्यानंतर मात्र गेल्या ६०-७० वर्षात मात्र मूळ हेतु विसरुन त्याचे स्वरूप झपाट्याने बदलत गेले. त्यातून बऱ्याच ठिकाणी स्थानिक राजकीय महत्वाकांक्षा बाळगणाऱ्या तरुणाना शक्तिप्रदर्शनाच्या प्रशिक्षणासाठी तेथील स्थानिक पुढाऱ्यानी या “कार्यकर्त्यांना” व्यासपीठ म्हणून वापरू दिले. सर्वच राजकीय पक्षांनी या पुंडगिरीमधून शहरातील मोक्याच्या जागा बळकावणे, खंडणीसारखी वर्गणी “वसूल” करणे, या दहा दिवसाच्या कालावधीत अनेक प्रकारचे बेकायदेशीर वर्तन करणे या गैर-प्रकारांकडे सोयीस्कर कानाडोळा केला. वाढत्या TV वाहिन्यामुळे या उत्सवाचेही व्यापारीकरण झपाट्याने सोपे झाले. बहुजन समाजापर्यंत पोचण्याच्या व्यापारी संधि दिसल्यामुळे जाहिराती/प्रायोजक यांच्या माध्यमातून अमाप पैशाचा खेळ सुरू झाला. आता हे लोण महाराष्ट्रातून कर्नाटक, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश या राज्यांतच काय पण भारताबाहेरही पसरते आहे. कदाचित् आजच्या भारतातील तरुण पिढीला आपापली वेगळी धार्मिक “ओळख” (identity) म्हणून असे शक्तिप्रदर्शन करायचे आहे. त्याचबरोबर आता बहुजन समाजाने स्वीकारलेल्या या उत्सवाचे स्वरूपही त्यांच्या कल्पनेनुसार आणि करमणुकीच्या गरजेप्रमाणे बदलले आहे. आपल्या अंतर्मनातील देवाचे चिंतन /दर्शन करायला कुणालाच सवड आणि उमज नाही. मात्र भारताबाहेर गेलेल्या सुजाण भारतीयांनी नुसत्या घरच्या गणेशपूजनावर न थांबता मोठाले ढोल-ताशे, लेजीम पथके यासोबतच अजून तरी सार्वजनिक उत्सवाला चांगल्या सांस्कृतिक कार्यक्रमांची जोड दिली आहे.

अखिल भारतीय व्यापारी संघटनेच्या अहवालानुसार २०२४ मध्ये भारतात गणेशोत्सवामुळे पंचवीस हजार कोटी रुपयांची उलाढाल झाली. मूर्ती बाजार केवळ ५०० कोटी ,मांडव उभारणी २००० हजार कोटी, कपडे/सजावट ३००० कोटि, व्यवस्थापन/सुरक्षा ५००० कोटी अशी मुख्य विभागणी आहे. हिंदू समाज उत्सवप्रिय तर आहेच आपल्या देशात २०२४ मध्ये जी. डी. पी. च्या १.२% (रु. ४.२५ लाख कोटी) उलाढाल दिवाळीमध्ये झाली ! दिवाळीचा हा आकडा २०२३ साली रु.३.७५ लाख कोटी इतका होता. तुलनेसाठी भारताचे संरक्षण बजेट GDP च्या २.२-२.४% तर शिक्षणावर खर्च २.९% असतो.

सार्वजनिक गणेश भक्तिचा एक नमुना : आंध्र प्रदेश मधील सार्वजनिक “खैरताबाद गणेश“ ची सुरवात १९५४ साली एका नगरसेवकाने केली आणि गणेशमूर्तीची उंची दरवर्षी १ फुटाने वाढविण्याचे त्याने जाहीर केले. त्यानुसार २०१४  साली ६० फूटी उंच मूर्तीसाठी एक कोटी रु खर्चून, ३५ टन प्लास्टर ऑफ पॅरिस (PoP) आणि २२ टन लोखंड आणि ५०० लीटर रंगद्रव्य वापरले गेले. या गणपतीसमोर ५०० किलोचा लाडू ठेवण्यात आला! पुढे लाडूच्या प्रायोजक हलवायाने त्याचा प्रायोजनाचा करार गणपतीच्या हातात ठेवण्याच्या लाडूसाठी असल्याचे सांगत ११०० किलोचा लाडूही देवाच्या हातात ठेवण्याचा आग्रह धरला.  सुरक्षेसाठी तो महाकाय लाडू देवाच्या चरणीच ठेवण्याची पोलिसांना सक्ती करावी लागली.या लाडूचा तुकडा तरी मिळवण्यासाठी झालेल्या चेंगराचेंगरीत अनेकजण जखमी झाले. हुसेन सागर तलावात अशा महाकाय मूर्तीचे विसर्जनास स्थानीय प्रशासनाने परवानगी नाकारली. या विरुद्ध सुप्रीम कोर्टापर्यंत हा विसर्जनाचा तंटा या गणपती मंडळाने नेला. दबाव-नीतीनुसार अनुकूल निर्णयापर्यंत विसर्जन मूर्तीला ताटकळत ठेवले गेले आणि शेवटी हुसैन सागर तलावाची गाळ उपसा करून खोली वाढवावी लागली! पुढे तर २०२० साली कोविड्ची राष्ट्रीय नियंत्रणे न जुमानता भक्तगणांनी (!) खैरताबादला गर्दी केली होती. आता या मंडळाने मूर्तीची कमाल ऊंची पायरी-पायरीने २० फुटांपर्यंत कमी करण्यास आणि ती मातीची घडवण्याचे मान्य केले आहे! (अधिक माहितीसाठी : विकिपीडिया)

मुंबईच्या गिरगाव चौपाटीवर गणेशाचे मूर्तीस्वरूप पाण्यात विसर्जित केल्यावर नदी किंवा समुद्रकाठी दुसरे दिवशी त्याच मूर्तीच्या भंगलेल्या अवशेषांचे, भोवती घिरट्या घालणाऱ्या कावळ्यांचे विषण्णकारक दृश्य दिसते. महापालिकेला वाळूत ट्रॅक्टर आणि बुलडोझर लावून हे अवशेष हलवण्याचे अवघड आणि खर्चीक काम करावे लागते. भारताच्या या आर्थिक राजधानीत प्रचंड विद्युत रोषणाई , लेजर किरणाचे (प्रसंगी दृष्टीला अपायकरक) झोत, कर्णबधीर करणारे (प्रसंगी अश्लील गाण्यांचे आणि नृत्याचे) कर्कश म्युझिक, विसर्जनाच्या मिरवणुकीदिवशी होणारी वाहतुकीची प्रचंड गैरसोय, नाचण्याच्या नावाखाली घातलेला धांगडधिंगा, महिलांची छेडछाड /असुरक्षितता , दहशतवाद / घातपाताची आणि इतर गुन्ह्यांची शक्यता यावर नियंत्रण ठेवण्यासाठी CCTV , Drones, वॉकी-टॉकी, अंबुलन्स, अग्निशामक दलाची व्यवस्था, पोलिसांचा प्रचंड फौजफाटा (एकट्या मुंबईत २०००० पोलिस) ,गर्दी /चेगराचेंगरी टाळण्यासाठीचे नियमन ,वाहतूक नियमनासाठी केलेले अनेक रस्त्यांचे तात्पुरते दिशाबदल या बाबींवरचा भोवळ आणणारा खर्च आणि कोट्यावधी मनुष्यतासांचा राष्ट्रीय अपव्यय पाहून गणपतीबाप्पा आणि जग अचंबित होत असेल!

सार्वजनिक गणेशोत्सवाचे असे कमर्शियल इवेंट / “व्यापारी संधी”त झालेल्या  परिवर्तनाचे प्रतिबिंब घराघरातील गणपती पूजेवरही पडले! मित्र मंडळी अगर शेजारी यांचेसमोर आपल्या श्रीमंतीचे प्रदर्शन करायला ज्यास्त उंचीचा किंवा वेगळ्या वेश-भुषेतला गणपती, त्याचे आसन, पूजा उपकरणे, दागिने , मुकुटच नव्हे पण अगदी पूजेच्या दूर्वा सुद्धा सोन्या/चांदीच्या बनवणे, आणि इलेक्ट्रिक रोषणाईच्या भारंभार माळा यातून  सुरुवात झाली आहे. पूजेची तयारी, उकडीचे मोदक ते रेडिमेड नऊवारी साडीपर्यन्त झटपट होम डिलीवरीची सोय झाल्याने वाचलेला वेळ सोशल मीडियावर आपले सजलेले फोटो /सेल्फी लावण्यासाठी मिळाला!

विघ्नहर्त्याचे गणेश चतुर्थीला पृथ्वीवर झालेले आगमन साधेपणा आणि अर्थपूर्ण भक्तीने साजरा करायचा प्रयत्न करायला काय हरकत आहे?

पर्यावरणास पूरक गणेश-मूर्ती : या विषयावर खालील पर्यायांचा विचार व्हावा. (यू-ट्यूब वर पहा)

१. दर वर्षी बाजारातून मूर्ती विकत न आणता एकदाच सुंदर गणेश प्रतिमा(चित्र/पेंटिंग) आणून दर गणेश चतुर्थीला तिच्याच भोवती दर वर्षी ताज्या फुलांची /रांगोळीची वेगवेगळ्या प्रकारे सजावट करून पूजेसाठी(आणि विसर्जनासाठी) सुपारीचा गणपती वापरावा.

२. वर्तमानपत्राच्या कागदाच्या लगद्या (Papier-mâché) पासून सुंदर मूर्ती बनवता येतात.

३. हस्तव्यवसायाची आवड असेल तर यू ट्यूब वर पाहून मातीचा गणपतीही घरी बनवता येतो

४. कणिक अगर Salt-dough पासून मूर्ती बनवून घरीच ओवनमध्ये भाजून नंतर रंगवता येते

५ ओरिगामीने गणेश-मुख बनवून सभोवती ओरिगामीने बनवलेली फुले /कमानी लावा.

६. लाकडाचे अगर Salt-dough चे गणेश प्रतिमेचे वेगवेगळे भाग बनवून, ovenbake करून ते Puzzle सारखे जुळवायला लहान मुलांना शिकवा.

 

७. घरी गणेश स्थापना न करता जवळच्या मंदिरात जाऊन तिथे पूजा आणि आरती मद्धे श्रद्धेने सामील व्हा! त्या निमित्ताने देवादारी पवित्र वातावरणात शांत चित्ताने ध्यान करा.  

सामान्य माणसाला “अमूर्त” स्वरूपातला ईश्वर उमजत नाही म्हणून आपल्याला भावणाऱ्या रूपात/मूर्तीत तो भजण्याचे असणारे स्वातंत्र्य/ लवचिकता हिंदू प्रार्थना पद्धतीतच  (religion) आहे. (“धर्म” शब्दाचा सहज होणारा चुकीचा वापर येथे टाळला आहे). खरे तर “तत्वमसि” या महावाक्यात सांगितलेला आपल्या मनात वसलेल्या ईश्वराचे अंतर्मुख होवून दर्शन घेण्याची, आत्मज्ञानाची सवय करून आपले चित्त प्रसन्न होवू शकते. हिंदू धर्मात अनेक सुंदर रुपके आहेत – गणाचे नेतृत्व करणाऱ्या गणेशाने त्याच्या रुपातून आपण अंगी बाणवण्यासारखे अनेक गुण सुचवले आहे. हत्तीचे मस्तक म्हणजे प्रचंड बुद्धी आणि अचाट स्मरणशक्तीची निदर्शक आहे. त्याचे मोठे सुपासारखे पुढे मागे हलणारे कान हे सर्व बाजुंचे म्हणणे(आवाज) ऐकून घेण्याचे सुचवते तर मोठे पोट (ऐकलेल्या) अनंत गोष्टीना (gossip न करता) पोटात ठेवण्याची आठवण करते. बारीक डोळे कोणतीही गोष्ट सूक्ष्म दृष्टीने पाहायला तर लांब सोंड ही कोणत्याही गोष्टीचा गंध आधी लांबून घेण्याचा दूरदर्शीपणां सुचवते.

हा ज्ञानदेवतेचा उत्सव कसा साजरा करता येईल?

-उत्तमोत्तम विषयांवरची मराठी पुस्तके स्वतः वाचण्यासाठी विकत घ्या. आपल्या मित्र मंडळीनाही भेटवस्तू म्हणून छोट्या गणेश मूर्ती न देता पुस्तके भेट द्या (त्यामुळे मराठी प्रकाशन व्यवसायास निकडीची मदतच होईल आणि वर्षानुवर्षे घरी साठणाऱ्या भेटवस्तू गणेश मूर्तीचे काय करावे हा प्रश्नही निर्माण होणार नाही !

- मुलांकडून / स्वतःकडून गणपती स्तोत्र आणि अथर्वशीर्ष यांचे पाठांतर आणि एखादी नवी कला शिकायला आरंभ करा. या विषयांवर वक्तृत्व स्पर्धा /संवाद आणि गुणदर्शन कार्यक्रम आयोजन करा.

सार्वजनिक गणेशोत्सवाचे राक्षसी व्यापारी स्वरूप आणि पर्यावरणाची हानी कमी करण्यासाठी लोकजागृती हाच उपाय आहे. केवळ शासकीय नियम किंवा कायद्याने हे साध्य होणार नाही. त्यासाठी या उत्सवाला कालानुरूप अधिक अर्थपूर्ण बनवण्याची जबाबदारी प्रत्येकांने स्वतःपासून उचलली पाहिजे.

प्रख्यात संगीतकार आणि कवी यशवंत देव यांच्या “गणपती-विसर्जन” कवितेतील बाप्पा काय म्हणतो पाहा:

आरती करण्याच्या मिषे, वेडेवाकडे गात बसता
तुमचंच रंजन अधिक होतं,  निमित्त मात्र माझं करता

तुम्ही ढोल पिटीत बसा, मी कौल देणार नाही
माझ्या प्रिय भक्तानो,  आता पुनः फसणार नाही

दर वर्षी येत होतो , पुढल्या वर्षी येणार नाही... 

- आनंद शिंत्रे. 

संयोजक

श्रीकांत पट्टलवार, मीरा पट्टलवार, रवी दाते, मुकुल आचार्य, कुमार जावडेकर