Sunday, 28 September 2025

२.१ - नॉर्दन लाइट्स - आकाशातील दिवाळी (श्रीकांत पट्टलवार)

नॉर्दन लाइट्स  - आकाशातील दिवाळी  

श्रीकांत पट्टलवार

१० मे २०२४ च्या मध्यरात्री संपूर्ण इंग्लंडचं आकाश – नॉर्दन लाइट्सच्या गुलाबी-हिरव्या रंगानी उजळून निघालं होतं. लगेचच या अविस्मरणीय प्रसंगाचे हजारो फोटो सोशल मिडियावर झळकू लागले. मात्र पुरेशी माहिती नसल्यामुळे  दर ११-१२ वर्षानंतरही क्वचितच घडणारा हा प्रसंग आपण नीट अनुभवू शकलो नाही, आपल्या कॅमेऱ्यात टिपू शकलो नाही याची आम्हाला खूप हळहळ वाटू लागली. आणि ठरवलं की आपण याबद्दल खोलात जाऊन माहिती काढायची, नॉर्दन लाइट्स बघण्याकरता काय काय गोष्टी माहित असायला हव्यात त्याचा शोध घ्यायला सुरवात केली.

नॉर्दन लाइट्स किंवा वैज्ञानिक भाषेत ‘अरोरा बोंरिअलिस’ बघायचे असतील तर त्या रात्री सोलर सबस्टॉर्म किंवा सोलर ऍक्टिव्हिटी स्ट्रॉंग असली पाहिजे. या सबस्टॉर्म मधून निघालेले अणू - रेणू पृथ्वीवरील उत्तर ध्रुवाजवळील तीव्र चुंबकीय क्षेत्रात शिरल्यावर वातावरणातील ऑक्सिजन किंवा नायट्रोजन बरोबर होणाऱ्या प्रक्रियेतून आकाशात हिरवा किंवा गुलाबी असा प्रकाश निर्माण होतो. सूर्यावरील या सबस्टॉर्मची तीव्रता सतत कमी जास्त होत असते आणि त्यातूनच आपल्याला नॉर्दन लाईटसच नृत्य पाहायला मिळतं. Glendale App वर रोज सबस्टॉर्मची तीव्रता किती आहे, पृथीवरील कुठल्या देशात, शहरात नॉर्दन लाईटस् दिसू शकतील ह्याची शक्यता वर्तवली जाते. नॉर्दन लाईट्स ची एक गंमत म्हणजे उघड्या डोळ्यांनी बघितलं तर तुम्हाला फक्त पांढरा धूसर प्रकाश झोत दिसतो पण मोबाईलवर नाईट मोड आणि ठराविक एक्सपोजर सेटिंग वापरले तर हा प्रकाश अतिशय सुंदर हिरवा किंवा गडद गुलाबी रंगाचा दिसतो आणि सहज टिपता येतो.

नॉर्वेच्या उत्तरेतील ट्रॉमसो हे गाव तर नॉर्दन लाइट्स साठीच प्रसिद्ध आहे. लँजेन आल्प्सच्या बर्फाच्छादित पर्वतरांगा, त्यांच्या कुशीत असणारे स्वच्छ निळ्या रंगाचे असंख्य फ्योर्ड्स, रस्त्यांच्या दोन्ही बाजूला बर्फाचे ढीग, अशा अतिशय निसर्गरम्य परिसरात वसलेल्या ट्रॉम्सोला जाऊन  नॉर्दन लाईट्सचा अनुभव घेण्याचं आम्ही ठरवलं.

योग्य वेळ, योग्य स्थान, योग्य वातावरण, निरभ्र आकाश ह्या तीनही गोष्टी जुळून आल्या तरच नॉर्दन लाइट्स दिसतात. ढगाळी किंवा पावसाळी हवामान असल तर तुमचं हिरमोड होणार हे नक्की. म्हणून आम्ही ट्रॉमसो भेटीत दोन दिवस जास्तच ठेवले...

२५ फेब्रुवारीला आम्ही ट्रॉम्सो एअरपोर्ट ला पोचलो आणि टॅक्सीने सुमारे ८० किमी दूर असणाऱ्या रिसॉर्टला निघालो. लहान मोठ्या फ्योर्ड्समधून जाणारा  बर्फाळलेला रस्ता, बर्फांच्या ढिगाऱ्यांनी वेढलेली टुमदार बंगले पाहात  पाहात रात्री १० वाजता आम्ही रिसोर्टला पोचलो. मालांगेन रिसॉर्ट गावाबाहेर, कमी वस्तीच्या ठिकाणी त्यामुळे सर्वदूर शुकशुकाट. इथे पोचल्यावर आधी फोन सेटिंग ची प्रॅक्टिस केली. हळूच बालकनीच दार उघडताच आम्हाला  अक्षरशः आनंदाच्या उकळ्या फुटल्या. नॉर्दन लाईट्सनी आमचे स्वागत केले. आतापर्यंत जे काही वाचलं होतं, ऐकलं होतं त्यापेक्षा कितीतरी सुंदर दृश्य प्रत्यक्ष दिसू लागल. पुढील दोन-तीन तास भूक–थंडी विसरून आम्ही आकाशातील दीपोत्सवच पाहत होतो.


दुसऱ्या दिवशी सकाळी रिसॉर्टचं जवळच थंडीतच एक फेरफटका मारला. दिवसभरात आम्ही कॅमेरा टेक्निकस बऱ्यापैकी आत्मसात केलं होतं. संध्याकाळ होताच आजच्या शो-साठी रेस्टोरेंन्टच्या डेकवर ट्रायपॉड सज्ज केला! थोड्याच वेळात हिरव्या रंगाचा एक मोठा प्रकाश झोत अचानक आकाशात आला आणि त्याचे अक्षरशः नर्तन सुरु झाले. क्षणात सुदर्शन चक्रा सारखी गुंडाळी, क्षणात दिवाळीतील फुलभाज्यांसारखा सर्वदूर वर्षाव तर क्षणात बाणासारखा लांब पट्टा. हाच तो डाँसिन्ग अरोरा (अरोरा ही रोमन देवी जी सकाळच्या प्रकाशाचे प्रतिक आणि निसर्गाची मूर्ती जी तिच्या तेज आणि सौंदर्यासाठी ओळखली जात असे). अतिशय सुंदर अशी प्रकाशाची दिवाळी आकाशात सुरु झाली. ती प्रत्यक्ष अनुभवता आली आणि टिपता पण आली.


त्यामुळे तिसऱ्या रात्री नॉर्दन लाईट्सचा गायडेड-टूर घेण्याचे ठरवले. दोन तास प्रवास करून रात्री आठ वाजता आमची टूर बस ट्रोम्सोहून हंसनेज ह्या निर्जन ठिकाणी आली. आर्टिक मधलं लपलेलं रत्न असावं असं हे गाव. अतिशय सुंदर परिसर, एका बाजुला आल्प्स आणि फ्योर्ड, तर दुसऱ्या बाजुला आमच्यासारखे हौशी अरोरा प्रवासी. उणे ७, ८ ची कडक्याची थंडी, बोचरा वारा, खाच खळग्यानी भरलेली बर्फाळ जमीन. इथे चालणं खूप जोखमीचं होतं. पण सर्वांचाच उत्साह अगदी शिगेला पोचला होता. गाईड ने आधीच कल्पना दिली होती की हा टूर म्हणजे कॅम्प फायर, हॉट चॉकलेट, कुकीज आणि अरोरा बघण्याचा मनमुराद आनंद! ह्या रात्रीचा वैशिष्ट्य म्हणजे नॉर्दन लाइट्सच्या नर्तनाबरोबरच आकाशात ग्रह ताऱ्यांची सुंदर परेड सुरू होती. योग्य स्थळ, निरभ्र आकाश आणि योग्य वेळ असा सगळा मेळ जुळून आला होता. सतत तिसऱ्या रात्री आकाशातील दिवाळी पाहून मन अगदी तृप्त झालं.


चौथ्या रात्री आम्ही ट्रॉम्सोच्या फेरीतून प्रवास केला आणि त्याही वेळी आम्हाला याच नयनरम्य दिवाळीचा अनुभव आला. प्रवासातील चारही दिवस दिवाळी साजरी केल्यावर शेवटच्या दिवशी आम्ही दिवसभर वेगवेगळ्या फ्योर्डसचा प्रवास केला. ट्रॉम्सो आणि भवतालचा परिसर अतिशय निसर्गरम्य आहे शहरातून थोडं बाहेर पडलं की रेनडिअर दिसतात. काही ठिकाणी हस्की राईड करता येते. जागोजागी डोंगराची रांग आणि त्यांच्या पायथ्याशी लहान मोठी सरोवरं. ह्यातलं एक तर पूर्णपणे गोठलेलं. त्यावरही आम्ही मनसोक्त फिरुन घेतलं.


ट्रॉम्सोच्या ५ दिवसाच्या प्रवासातील प्रत्येक क्षण अवर्णनीय होता. जे काही अनुभवलं त्यावर बोलता बोलता परतीच्या प्रवासासाठी विमानात केंव्हा बसलो हे लक्षातच आलं नाही. टेक-ऑफ घेतल्यावर मॅंचेस्टर येईपर्यंत छान झोप घेऊ असं ठरवलं. पण कुठलं काय? पायलट महाशयांनी घोषणा केली की खिडीतून बाहेर पहा, नॉर्दनलाइटची दिवाळी सुरु आहे! आणि शेवटी शेवटी अगदी अनपेक्षितपणे आकाशातील दिवाळी आकाशातूनही पाहण्याच भाग्य आम्हाला लाभलं. 

- श्रीकांत पट्टलवार, रुणकर्ण, यु.के. 

4 comments:

  1. नमस्कार श्रीकांत जी

    आम्हाला नेहमीच वाटायचे की दिवाळी मासिकामध्ये फक्त कविता किंवा हलक्याफुलक्या कथा असतात. पण तुम्ही नवीन काळानूसार वैज्ञानिक अनुभवकथांपर्यंत वाढवले ​​आहे. मला खात्री आहे की हा अनुभव तरुण कुटुंबांना अशा स्थळांना भेट देण्यासाठी/पुढील संशोधन करण्यासाठी प्रोत्साहित करेल.

    खूप छान लिहिले आहे. 🙏🙏

    ReplyDelete
  2. Heavenly feeling given by your article, photos especially. Purely cosmic dance, with scientific explaination. I sujjest to add a link for its video if possible. No words to say how much to thank Dr. Shrikant. Great scientist with urge to share everything. You may even write and sing a science poem on this dance.

    ReplyDelete
  3. शीर्षकासकट संपूर्ण लेख आवडला!

    ReplyDelete
  4. Dr Rajshree Shirbhate7 October 2025 at 14:09

    व्वा, व्वा खूपचं छान अनुभव. नाॅर्दन लाइट्स बघायला पण नशीब लागतं! मला नाॅर्दन लाइट्स चे खूप वेड- म्हणून विंटर मध्ये चार दिवस आइसलंडला गेलोत, टूर घेतलेत (जेव्हा की नवर्‍याला असे थंड जागेवरील हाॅलिडेज अजिबात आवडतं नाहीत). नंतर "In search of Northern Lights" Norway चा Hurtigruten Cruse घेतला. ट्राॅम्सो पर्यंत जाऊनही विशेष नाॅर्दन लाइट्स दिसलेच नाहीत. मन खूपचं हिरमुसले, वाटले- जावू दे. नाॅर्दन लाइट्स आपल्या नशीबातचं नाहीत! पण शेवटी - मागल्या वर्षी मात्र इंग्लंड मध्येच, अगदी घराच्या बाल्कनीतून खूप छान नाॅर्दन लाइट्सचा आनंद घेतला आणि मन तृप्त झाले.

    ReplyDelete

प्रतिसाद

संयोजक

श्रीकांत पट्टलवार, मीरा पट्टलवार, रवी दाते, मुकुल आचार्य, कुमार जावडेकर