जाई जुईचा गंध मातीला
अदिती हिरणवार
पाच वर्ष मी आतुरतेने वाट पहात असलेली बागेतली जुई गेल्या आठवड्यात बहरली. कवयित्री असते तर सुरेख कविता केली असती त्या बहरण्यावर इतकी हरखले होते तो बहर पाहून. उमलणाऱ्या कळ्या अंगभर लेवून जणू ते झाड मला विचारत होत , खुष का आता? चहा पाणी, खाणं तिथे वेलीजवळच बसून करत होतो त्यावरून तिच्या लक्षात आलंच असेल, नुसतं खूष नाही तर वेडी झालीय मी.
१९ वर्षं राणीच्या निसर्गरम्य देशात आहोत. हिरवीगार वनराई चहुकडे पसरली आहे. ओसाड माळरानं पाहिलीच नाहीत इथे. उन्हाळ्यात विविध प्रकारची फुलं फुलतात. हिरव्या गार गवतावर नाजूक पिवळी, पांढरी फुले तर अतिशय मोहक दिसतात. सर्व घरांच्या पुढील अंगणात रंगांची उधळण असते, अनेक प्रकाराची गुलाब ताठ मानेने डोलत असतात. इथल्या गुलाबांचा रंग खूप वेगळा भासतो भारतातल्या गुलाबांपेक्षा. मूळ दिलेला रंग अजिबात उडालेला नसल्यासारखा - गडद लाल, पिवळाशार. भारताइतका उन्हाचा कडाका नाही म्हणून असेल कदाचित (असं खरं तर गेल्या दोन महिन्यांत म्हणू नाही शकत-) त्यामुळेच त्याला सुवासही नसतो. खूपच इथल्या लोकांसारखं भासतं हे मला.
दिसायला अतिशय मोहक असतात पण तरी काहीतरी उणीव असते... माणुसकी नसते असं नाही पण ती आपुलकी कोरडी भासते. जोपर्यंत मला काही तोशिश पडत नाही तोपर्यंत मी जमेल ती मदत करणार. अर्थात याला अपवादही आहेत बरं का! जसं इथल्या बहुतांशी फुलांना वास नसतो पण 'हनी सकल' सारखी वेल आहेच जिला मंद सुगंधी फुले येतात. सुवासिक लिली फुलते दारी, अगदी तसे. बरीच स्थानिक माणसं तशीही भेटली. नाती वाढवणारी, त्यातला ओलावा जपणारी.
पण हा घरच्या जूईचा वास मात्र थेट भारतात नेत होता. कुठे कुठे फिरवत होता, कित्येक जवळच्या माणसांची आठवण देत होता. मन हळवं करत होता. फुलाचा एवढासा जीव पण ते असलेलं सारं कसं उधळून देत. हातच राखून नाही तर असेल तेव्हढा सुगंध उधळतात. त्यामुळेच ती खेचतात मला. सगळी कामधाम सोडून त्यांच्या नादी लागते मी. वाऱ्याबरोबर पसरणारा तो गंध वेड लावतो. सतत तो गंध बरोबर रहावा म्हणून गजरा केला मी कित्येक वर्षांनी. देवाला वाहिली. घरभर घमघमाट होता त्या वासाचा. बरीच फुलं झाडावरच ठेवली.. त्यांचाही थाट बघण्यासारखा होता.
भारतातील पांढऱ्या रंगाच्या फुलांशी माझं जरा विशेष सख्य आहेच. जाई,जुई,मोगरा,सायली, मदनबाण, चमेली, निशिगंध, सोनटक्का, कुंदी कित्ती असतात... असतात दिसायला नाजूक, गंध मात्र आसमंत भरून टाकणारा. कोकणातल्या प्रथेप्रमाणे मोठं असेल तर एखादं फुल डोक्यात माळल तर दुनियेतील भलेभले परफ्यूम फिके पडतील असा सुवास दरवळतो तुम्ही जाल तिथे . छोटी फुले गजरा करून केसात माळायची. त्या वासाने एका धुंदीत वावरत असतो आपण. लहान असताना बांद्याच्या घरातील परस दारात खूप फुलांची झाडं होती. कोरांती, अबोली, मोगरा, कुंदी. मी दोरा घेऊनच कुंदी किंवा मोगऱ्याच्या झाडांशी जायची. एक एक फुल काढून दोर्यात तिथेच गुंफायाच आणि तो गजरा माळून शाळेत जायचं. हो, तेव्हा शाळेत गजरे फुलं चालायची. अख्खा दिवस तो सुवास लेवून वावरायचं.
लातूरच्या आत्याकडे जाईचा वेल होता. खाली जमिनीत लावलेला पण गच्चीत फुलं काढता यायची इतका फोफावले ला. पाऊस सुरू झाला की त्याला बहर यायचा. झालं , माझा बराचसा वेळ गच्चीत त्या वेली भोवती जायचा.आता कुठेही टपोरी फुललेली जाई आणि सुगंध आला की मी लातूरला ' रसिक ' च्या गच्चीत पोचते.
लहानपणी जायचो तेव्हा सांगलीच्या काकांच्या घरी बाहेरून जिना होता. घरात जायला या जिन्यावरून जावं लागे. त्या जिन्यावर मदन बाणाची वेल होती. त्यांच्या वासाने मी तेव्हाही तशीच जिन्यात जास्त वेळ घालवत असे. ते घर काकांनी सोडून जमाना उलटला पण ते दृश्य आणि तो सुगंध अजून मनात आहे.
पुण्यातल्या आत्याच्या अंगणा तील पारिजात पण तितकाच आवडीचा माझ्या. किती नाजूक फुल पण अतिशय देखणी, आणि मंद सुगंध तर जीवघेणा. देवाला वाहण्यासाठी ही फुलं परडीत गोळा करताना नाजूक हाताने वेचावी लागत. एखादं फुल चुकून जरी कुस्करल गेलं तर त्याच्या देठाचा केशरी रंग बोटं रंगवत. तेही आवडे पण नको वाटायचं. अजूनही स्वप्नात ' पथिक ' आणि तो पारिजातक येतो माझ्या.
कोकणात येणारं अजुन एक वेड फूल म्हणजे सुरंगी. त्याचं झाड मोठं असतं पण ठिसूळ. त्यावर चढून फुलं काढली तर झाड मोडून आपण धडपडायची शक्यताच जास्त. त्या पिवळ्या फुलांचा गंध इतका विलक्षण असतो की माणसं काही तरी शक्कल लढवून ती फुलं काढतात. बांद्याच्या बाजारात दिसला की आम्ही हमखास आणायचो सुरंगीचो वळेसार (गजरा).
बकुळीची फुलं राहिली की! ओवळी म्हणतात त्याला कोकणात. त्या झाडाखाली भुतं असतात म्हणून तिकडे जाऊ द्यायचे नाहीत आजूबाजूची माणसं. पण मी कित्येकदा जाऊन ती फुलं वेचून यायची. मस्त माळ करायची त्याची नारळाच्या झावळीच्या केलेल्या दोऱ्यात.
या सर्व फुलांचे वास मनात साठवलेले आहेत. त्या वासात बहुदा मला जवळ नसलेल्या माणसांचा ओलावा जाणवतो की काय ठाऊक. सु4गंधाने त्या मातीत, त्या माणसात हरवून जाते. तेव्हाचा आजूबाजूचा परिसर, ते ऋतु डोळ्यासमोर येतात जसेच्या तसे. कुंदी तशी वर्षभर यायची. उन्हाळा आला की मोगरा,जुई, पावसाळा आला की जाई, मदनबाण, सोनटक्का.
सोनटक्का मी माळत नसे पण अतिशय सुवासिक फूल. लांब देठाचं, पातळ पण लुसलुशीत पाकळ्या असलेलं. एखाद्या उंच देखण्या नाजूक ललने सारखं भासतं. डोक्यात घातलं तर खूप पटकन मान टाकतं. शरीराची उष्णता सहन होत नाही त्याला फार. सांडपाण्यावर वाढणारं हे झाड. निसर्गाची कमाल आहे खरी, power to create fragrance from filth.
आपलंही असं व्हायला हवं ना! समोरच्याने चिखलफेक केली की आपण पण करणार असं न करता, तू फेक काय तो चिखल माझ्याकडे, माझ्यातून जे उमटेल ते नेहमी उदात्त आणि उन्नतच असेल. आयुष्य काय आव्हानं द्यायची ते देईल पण आपण त्यांचं काय करतो ते महत्वाचं. Filth or fragrance?
- अदिती हिरणवार, रेडिंग, यु.के.
खूपच इथल्या लोकांसारखं भासतं हे मला.... अगदी खरं आहे
ReplyDeleteवा वा आदिती खूप छान . सगळ्या फुलांच्या बगीच्यातला फेरफटका आणि आठवणींचे स्मरण रंजन सगळ्यांचा सुवास काही औरच ! शेवटी मांडलेला विचार आपण त्याचं काय करतो हा विचार खूप आवडला . 🙌
ReplyDeleteमनात लपलेला फुलांचा सुवास हे वाचून पुनः जाणवला..छान विषय… छान लिखाण!
ReplyDeleteखूप छान.. बालपणीच्या आजोळच्या - वसईच्या आठवणी जागवल्या..
ReplyDelete