आटपाट
अनिरुद्ध कापरेकर
आटपाट नगर होतं,
कुशीत एक गाव होतं,
गावात एक वाडी होती,
वाडीत एक घर होतं.
झाडं-झुडप इकडे-तिकडे,
रस्ते छोटे वाकडे-तिकडे,
विहीर मोठी तोंड उघडे,
दगडाखाली खेकडे-बिकडे.
गल्लीपाशी देऊळ होतं,
देवळापाशी वड होता,
पारंब्यांचा झोका हाती,
चिंचेवर डोळा होता.
नदी कशी माय होती,
दुधावरची साय होती,
काठावरती घाट होता,
बाप्पासाठी थाट होता.
छोटं एक स्टेशन होतं,
छप्पर कुठे? नागडं होतं,
अर्धीच गाडी मावायची,
गर्दीलाही टोक होतं.
एकच एक शाळा होती,
पोरांची ती आजी होती,
लाईक्स नाय मैत्री होती,
टिवी नाय विटी होती.
गावाबाहेर नगर होतं,
थोडं लाबं, बरं होतं,
अंधारात लपुन-छपुन,
हळु-हळु सरकत होत.
आधाशी ते नगर झालं
गाव गिळुन फस्त केलं,
वाड्या-घरं खाऊन टाकली,
नदी काय? गटार केलं.
वाकडे-तिकडे रस्ते छोटे,
चावुन-चावुन खावुन टाकले,
झाडं बरी ठेवली काही,
झुडपं-पाडे गिळुन टाकले.
आता,
मित्र म्हणतो ये ना,
इथे - इथे भेट ना,
जावं कुठं कळेना.
जुन्या खुणा सापडेना!
हसवेना की रडवेना!
जुन्या खुणा सापडेना!
जुन्या खुणा सापडेना!
-अनिरुद्ध कापरेकर, मॅंचेस्टर, यु. के.
फारचं छान
ReplyDelete