Sunday, 28 September 2025

१. स्वागत (रवी दाते)

स्वागत

रवी दाते

"मला अजूनही तो दिवस आठवतोय जेव्हा श्रीकांतजी आणि मीराताई पट्टलवार, मुकुल, मी आणि कुमार या मासिकाच्या प्रकाशनाचा विचार करत होतो" असं म्हणायची पद्धत आहे. पण आज खरोखरच मला, मी या उपक्रमात कसा ओढला गेलो आणि ही “चळवळ” लेखक, कवी, चित्रकार आणि वाचक इत्यादींच्या सहकार्याने वाढत वाढत कशी फोफावली हे अजिबात आठवत नाही. सगळं कसं स्वप्नवत् वाटतंय. बघता बघता एक वर्ष निघून गेलं आणि आज पश्चिमाईचा दुसरा दिवाळी अंक प्रकाशित करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे.


वरील चित्रफित म्हणजे पश्चिमाईच्या जन्मापासून आतापर्यंतच्या प्रवासाची थोडक्यात उजळणी. त्या मासिकाचं नाव काय ठेवायचं? मासिक काढायचं का त्रैमासिक का वार्षिक? नाव ठरलं तरी तसं दुसरं प्रकाशन आहे का? असेल तर कॉपीराईटचा प्रॉब्लेम येईल का? पश्चिमाईतील चि, श् ला ची कशी जोडायची, प्रकाशन कसं करायचं, उद्घाटनाला इलेक्ट्रॉनिक फीत कशी कापायची? फक्त ब्लॉग ठेवायचा का अंक छापायचा? छापलं तर कोणी विकत घेईल का? एक ना दोन शंभर प्रश्न. आमची तयारी कोचरेकर मास्तरांच्या प्रवासाच्या तयारीपेक्षा फार वेगळी नव्हती. सगळ्या संभाव्य अडचणींसाठी स्वतःला तयार करून ठेवले होते. अगदी कोणी लेख किंवा कविता पाठवल्याच नाहीत तर? मासिक बंद करायला लागले तर? इत्यादी इत्यादी. परंतु सुदैवाने अशी वेळ आली नाही.

आपण स्थलांतरित मराठी मंडळी बरेच सांस्कृतिक कार्यक्रम सादर करतो, त्या निमित्ताने एकत्र येतो, मराठीत बोलतो, मराठी शिकवण्यासाठी शाळा चालवतो, टिकवण्यासाठी संमेलन भरवतो, परंतु मध्यंतरी काही प्रकाशक मंडळींशी बोलताना असं लक्षात आलं की निव्वळ साहित्याला वाहिलेलं पाश्चिमात्य देशांतलं हे बहुधा एकमेव प्रकाशन असावं; अगदी एकमेव नसलं तरी काही मोजक्या प्रकाशनांपैकी एक. आपल्या सर्वांच्या दृष्टीने ही अतिशय अभिमानाची गोष्ट आहे - केवळ संपादक, कवी किंवा लेखक म्हणून नव्हे, तर अगदी वाचक म्हणूनही. कारण समोर दर्दी श्रोताच नसेल तर गाणाऱ्याच्या गाण्याला काही अर्थच राहत नाही आणि तीच गत लिहिण्याची. आपण सर्व आहात म्हणून आम्ही आहोत. मध्यंतरी EMS च्या निमित्ताने सौदॅंप्टन पासून अबर्डीन पर्यंत च्या अनेक मराठी लोकांशी प्रत्यक्ष संवाद साधता आला आणि त्यांच्याशी बोलताना असं लक्षात आलं की प्रकाशनासाठी कुठचा मंचच उपलब्ध नसल्याने बऱ्याच जणांचे मूल्यवान साहित्य त्यांच्या कपाटात नुसतं पडून आहे. त्यापैकी काही नवीन मंडळी ज्यांनी आपली कपाटं (का कवाड) उघडून या अंकासाठी मदत केली त्यांचे विशेष आभार. यापैकी रेडिंगच्या आदिती हिरणवार, ब्रेकनेलच्या रेश्मा विकास, लॉर्ड्स्लीच्या उल्का चौधरी, ॲबर्डिनचे आशुतोष केळकर आणि राजश्री शिरभाते चेस्टर-ले-स्ट्रीट इथल्या. याशिवाय मँचेस्टरमध्येच दडलेले छुपे कवी / लेखक म्हणजे डॉक्टर रवी आपटे, डॉक्टर प्राची जावडेकर आणि श्रीकांत कांबळे.

विठ्ठलाची वारी यावर्षी थेट लंडनला येऊन पोचली. “संत कवयित्री” नेहा बापट अन्वेकरांनी विठ्ठलाला AI ने येऊ घातलेल्या संकटापासून वाचवण्यासाठी साकडं घातलं आहे. तर रेश्मा विकास राधा होणं म्हणजे काय हा शोध घेतायत. यानंतर भाद्रपदात येणाऱ्या गणेशोत्सवाच्या, बदलत्या व्यावसायिक आणि बीभत्स स्वरूपाचा केवळ आढावाच नाही, तर त्यावरील उपायही सांगताहेत डॉक्टर शिंत्रे.

डॉक्टर राजश्री शिरभाते यांचे वैद्यकीय जीवनातील अनुभव आणि या पेशाच्या मर्यादा तुम्हाला सुन्न करतील. अदिती हिरणवारांची “जाई जुई”, अनिरुद्धचे “आटपाट” आणि कुमारच्या कादंबरीतील “मुंबईतील पावसाळा” तुम्हाला “देश की मिट्टी” ची आठवण करून देईल.

यु. के.च्या हवामानाला तुम्ही कंटाळला असाल, तर पर्यटनासाठी आशुतोष केळकरांच्या "मावळत्या सूर्याच्या" देशाला जायचे का श्रीकांत पट्टलवारांच्या "मध्यरात्रीच्या सूर्याच्या" असा गोड संभ्रम तुम्हाला पडेल. "तळपत्या सूर्याच्या" देशात कसाबसा वाचलेला बंडू वाचलात आणि घरीच थांबवंसं वाटलं तर मीरा पट्टलवारांच्या डॉक्टर अरुणा मेने यांच्याशी झालेल्या गप्पांमधून तुम्हांला इथे घर बसल्याच कोलाजची नवी दालनं तुमच्यासमोर खुललेली दिसतील!

अगम्य गझल सहजपणे समजावून द्यावी ती केवळ कुमारनीच आणि “मी कोण?” सारख्या गहन प्रश्नाचे साध्या सोप्या भाषेत स्पष्टीकरण श्रीकांत कांबळेनी. पी सावळारामांच्या आठवणी सांगताहेत आपलेच डॉक्टर रवी आपटे.

हे सर्व आणि अजून खूप काही घेऊन आलो आहोत विविध विषयांनी भरगच्च भरलेल्या या दिवाळी विशेषांकात.

- रवी दाते.



1 comment:

  1. आजचा कार्यक्रम खूप छान झाला 👏
    सगळ्यांचे विचार आणि तळमळ अतिशय प्रेरणादायी होती हा उपक्रम प्रत्येक मराठी माणसांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी ही आपल्या सगळ्यांची आहे.
    पुन्हा एकदा मनःपूर्वक शुभेच्छा आणि....
    शुभ दीपावली🪔

    ReplyDelete

प्रतिसाद

संयोजक

श्रीकांत पट्टलवार, मीरा पट्टलवार, रवी दाते, मुकुल आचार्य, कुमार जावडेकर