Sunday, 28 September 2025

२.५ - खेळ मांडियेला वाळवंटी घाई (रवी दाते)

खेळ मांडियेला वाळवंटी घाई

रवी दाते

(गंगाधर गाडगीळांची माफी मागून)

स्नेहलबरोबर मराकेशला जायचे बंडूने निश्चित केल्यावर नानूने “त्या सहलीत अर्ध्या तासाचा उंटावरचा राईड नक्की घे.” असा अनाहुत सल्ला त्याला दिला. नाही तरी उंटावरून शेळ्या हाकण्याची त्याला सवयच होती. आतापर्यंत कुठच्याही चतुष्पादाच्या पाठीवर बसण्याचे धारिष्ट्य बंडूने दाखवले नसल्यामुळे त्याला त्या अर्ध्या तासाच्या “प्रवासा”ची थोडीशी उत्सुकता आणि बरीचशी भीती होती. आपल्याला मराकेश पर्यंत नेणारे विमान तीस हजार फुटावरून कोसळणे अधिक धोकादायक का उंटाच्या दहा ते पंधरा फूट उंच कुबडावरून वाळवंटात कोसळून कपाळ मोक्ष अधिक भीतीदायक असे काहीसे विचारही दोन क्षण त्याच्या मनात येऊन गेले. परंतु स्नेहलपेक्षा आपण कितीतरी शूर आहोत हे दाखवण्यासाठी उंटावर तब्बल अर्धा तास बसण्याची संधी बंडू सोडणार नव्हता.

उंट या प्राण्याबद्दल बंडूला फारशी माहिती नव्हती. परंतु तो उठताना आणि बसताना त्याचे पाय रामसे बंधूंच्या चित्रपटातील भुतासारखे वेड्यावाकड्या आकारात मोडतात आणि तोंडाने सतत माणिकचंद गुटख्याचे चर्वण केल्यासारखा त्याचा जबडा हलत असतो एवढी माहिती नॅशनल जिओग्राफिक बघून बंडूला झाली होती. इतर प्राण्यांप्रमाणे त्याचे डोळे कुठच्याही चित्रात नीट न दाखवल्यामुळे तो नक्की कुठे बघतो हे कसे ओळखावे याचीही बंडूला कल्पना नव्हती. वाघाची डरकाळी, सिंहाची गर्जना, कुत्र्याचे भुंकणे याप्रमाणे उंटाच्या आवाजाबद्दल ही बंडूला खूप उत्सुकता होती.

उंट हा जरी अरबांचा पाळीव प्राणी असला, तरी तो कुत्र्यामांजरांपेक्षा आकाराने खूप मोठा असल्यामुळे घोडा व हत्ती बरोबर त्याची गणना बंडू धोकादायक या दृष्टीने जंगली प्राण्यातच करत असे. प्राणी जमातीतील बहुसंख्य प्राणी धोकादायक का असतात याची आपल्याला साधारण कल्पना असते, उदाहरणार्थ, पाळीव असला तरी कुत्रा चावतो म्हणून, मांजर बोचकारते म्हणून, तर जंगली प्राण्यातील वाघ-सिंह खाऊन टाकतात म्हणून आणि गाढवासारखे प्राणी लाथाडतात म्हणून. परंतु उंट यापैकी नक्की कुठल्या पद्धतीने धोकादायक आहे याची बंडूला कल्पना नव्हती किंबहुना तो धोकादायक आहे की नाही हेही त्याला कळत नव्हते. परंतु आपली ही भीती उंटासमोर किंवा स्नेहलपुढे व्यक्त न करता प्रत्यक्ष राईडपूर्वी बंडू बाणेदारपणे एखाद्या सराईत सांडणीस्वारासाजेशी पोज देऊन फोटो साठी उभा राहिला. परंतु उंटापासून तो पंधरा फूट दूर असल्यामुळे स्नेहलने त्याच्या बाणेदारपणाची दखल घेतली नाही.

वाळवंटात कुठेही एकही काडी न दिसल्यामुळे उंटाला last straw on camel's back ही म्हण माहीत असावी आणि त्यामुळे दिसणाऱ्या सगळ्या  काड्या उंट खाऊन टाकत असावा असा विचार बंडूच्या मनात येऊन गेला. अन्यथा  उंटाला काडीत  काडीमात्रही स्वारस्य नसावे.

प्रत्यक्ष उंटारोहणाची वेळ आली तेव्हा आपल्याला पाठीवर घेण्यास सज्ज झालेले उंट ब्रिटिशांप्रमाणे एका सरळ रेषेत न बसता स्नेहलच्या भजनी मंडळींप्रमाणे जिथे जागा मिळेल तिथे कुठच्याही दिशेला तोंड करून बसल्याचे बंडूला खूप आश्चर्य वाटले. त्यांच्या अशा वेड्यावाकड्या पद्धतीने बसण्यामुळे बंडूला ज्या उंटावर बसायचे होते त्याच्या कुबडाजवळ नेमके दुसऱ्या उंटाचे तोंड आले होते. त्यामुळे केवळ वाक्प्रचारात ऐकलेला अशक्यप्राय असा “उंटाचा मुका” प्रत्यक्ष घ्यावा लागतो की काय अशा धास्तीने बंडूने दुसऱ्या बाजूने उंटावर चढण्याचा निर्णय घेतला. परंतु ही क्रिया ही वाटते तेवढे सोपी नव्हती. सायकलवर टांग टाकल्याप्रमाणे उंटावर टांग टाकायचा बंडूने प्रयत्न केला. परंतु त्यासाठी टाकावी लागणारी टांग ब्रुसलीच्या लाथेप्रमाणे उंटाच्या माहुताच्या तोंडापर्यंत उंच न्यावी लागल्यामुळे पॅन्ट नको इथे फाटण्याची शक्यता निर्माण झाली. हत्तीप्रमाणेच उंटाला नियंत्रित करणाऱ्या व्यक्तीलाही आपण चुकून माहूत म्हणल्याची बंडूला क्षणभर गंमत वाटून गेली. उंटाच्या पाठीवर बसल्यावर उंटाची रुंदी ही त्याच्या उंची सारखीच अवाढव्य असल्याची जाणीव बंडूला झाली. इतक्या अवास्तव प्रमाणात पाय फाकवून आपण किती काळ आपण बसू शकू असे गणितही त्याच्या मनात सुरू झाले. परंतु स्नेहल आणि नानूपेक्षा आपण सराईत सांडणीस्वार आहोत याची खात्री असल्यामुळे त्याने या गणिताचा विचार लगेच झटकून टाकला.

यानंतरची खरी गंमत उंट बसल्या जागेवरून उभा राहताना सुरू झाली बंडूच्या सुटलेल्या पोटामुळे जमिनीवर स्थिर असतानाही क्षणोक्षणी पुढे-मागे जाणारी बंडूची “सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी” उंट उभा रहाताना क्षणात दोन फूट पुढे तर क्षणात तीन फूट मागे जाऊन बंडूचा तोल जाऊ लागला. त्यामुळे इतका वेळ केवळ डाव्या किंवा उजव्या बाजूला पडण्याची भीती जाऊन तिची जागा तोंडघशी पडण्याच्या भीतीने घेतली.

बंडूसकट बाकीच्या सहा उंटांचा हा प्रवास सुरू झाल्यावर अचानकपणे एका उंटिणीचे “खोलीत शिरताना गोंडस दिसणारे उंटाचे एक पिल्लू” बंडूच्या उजव्या पायाशी येऊन घुटमळू लागले. आपल्या मागील उंटावरील एखादा सहप्रवासी ॲनिमल ॲक्टिव्हिस्ट असला किंवा आपल्या बुडाखालील उंटीण नेमकी त्या पिल्लाची आई असेल अशा धास्तीने बंडूला त्या पिल्लाला धड लाथडता येईना किंवा टाळताही येईना. त्यामुळे बंडू हळूहळू डाव्या बाजूला सरकू लागला. परंतु बंडूचा उजवा पाय आपल्या तोंडाच्या आवाक्याबाहेर गेल्यामुळे उंटाचे पिल्लूही बंडूच्या उंटाच्या पोटाखालून त्याच्या डाव्या पायाकडे गेले आणि बंडू उजवीकडे सरकू लागला. असे उजवे डावे करता करता बंडूला भितीने घाम फुटला परंतु बाजूच्या उंटावर बसलेल्या स्नेहलला आपली ही कसरत केवळ उंटाच्या पिल्लाला खेळवण्यासाठी चालली आहे असा अविर्भाव चेहऱ्यावर आणण्यात बंडू पटाईत होता.

उंटावर बसण्याचे एवढे साहसी काम केल्यानंतर ह्या साहसाचा गाजावाजा करण्यासाठी किमान एक फोटो घेणे आवश्यक होते. त्या फोटोला पोज देताना आपण उंटावर किती सहजपणे बसलो आहोत असा अविर्भाव आणण्यासाठी दोन्ही हात सोडण्याच्या विचारानेच बंडूचा चेहरा कसनुसा होत होता. परंतु स्नेहलच्या मैत्रिणींच्या कळपात आपली नाचक्की होऊ नये एवढ्या एकाच विचाराने बंडूने काही क्षणांसाठी उंटाच्या खोगीरावरील दोन्ही हात सोडून शाहरुख खानसारखे पसरले. परंतु नेमक्या त्याच क्षणी एवढा वेळ बंडूचे वजन पाठीवर घेऊन दमलेल्या त्या उंटाला आपला अवघडलेला पाय मोकळा करण्यासाठी एका पायावरचे वजन दुसऱ्या पायावर टाकण्याचा मोह झाला आणि त्यामुळे तोल गेलेल्या बंडूचा खोगीर पुन्हा पकडण्यासाठी झालेला आटापिटा फोटोत व्यवस्थित टिपला गेला.

अर्ध्या तासाच्या या जीवघेण्या अनुभवामुळे “उंटावरून शेळ्या हाकणे” ही काही वाक्प्रचारात वाटते तेवढीशी सोपी गोष्ट नाही याची बंडूला खात्री पटली. आणि वाळवंटातील या भीतीदायक खेळासाठी आपल्याला भरीस घालणाऱ्या उंटावरच्या शहाण्या नानूचा सूड उगवण्यासाठी त्याला पुढच्या सहलीसाठी कुठे पाठवावे याचा बंडू विचार करू लागला.

रवी दाते, मॅंचेस्टर, यु. के.

13 comments:

  1. विनोदी लेखन ,वाचून निखळ मनोरंजन झाले ! उंटावर बसण्याचा अनुभव खरंच मजेदार असतो.

    ReplyDelete
  2. रवी .. फारच सुंदर लिहिलं आहेस.. गाडगीळांच्या बंडू चं पात्र जबरदस्त पचवलेलं दिसतंस.. खूप कमाल..

    ReplyDelete
  3. 😂😂 superb.
    हसून हसून पोट दुखलं. सकाळ सुंदर सुरू झाली माझी 🤣🤣

    ReplyDelete
  4. विनोद आणि वास्तव यांची छान सांगड घातली आहे. वाचताना नकळत हसू फुटत राहिले. अतिशय मनोरंजक लेख — धन्यवाद!

    ReplyDelete
  5. श्रीकांत मराठे5 October 2025 at 02:56

    मस्त विनोदी शैलीत वास्तवाचे वर्णन. मी व नीलिमाने जयसलमेर व लडाख मध्ये डबल हम्प उंटावरील सफर केल्याने उंटावर बसण्याच्या काय वेदना व कौशल्य लागते हे माहीत असल्याने लेख अधिक भावला. उंटवाल्याने मला उंट शहाणा आहे व तो नीट नेतोहे सांगीतल्यावर “हे तुला माहित आहे पण उंटाला माहीत आहे का” हा माझा प्रश्ण ही आठवला.
    एकूण छानच!

    ReplyDelete
  6. रवि, झकास! मजा आली वाचायला 😃👌

    ReplyDelete
  7. हहपुवा. मजा आली वाचताना

    ReplyDelete
  8. सुंदर कथा. बंडू फारच आवडला. मूळ लेखनातला बाज पूर्णतः तुमच्या कथेत उतरला आहे.

    ReplyDelete
  9. Dr Rajshree Shirbhate7 October 2025 at 14:13

    खूप छान. वाचतांना मजा आली.

    ReplyDelete

प्रतिसाद

संयोजक

श्रीकांत पट्टलवार, मीरा पट्टलवार, रवी दाते, मुकुल आचार्य, कुमार जावडेकर