Saturday, 24 January 2026

अंक ५ - अनुक्रमणिका



 1       स्वागत (रवी दाते)

2       लेख, कथा... 6

2.1        प्रेमाची उत्क्रांती (डॉ. आनंद शिंत्रे) 6

2.2        एक छोटीसी टिचकी की कीमत तुम क्या जानो रवी बाबू? (रवी दाते) 10

2.3        शिशिरातूनी उगवेन मी (अदिती हिरणवार) 14

2.4        पृथ्वीवरील नैसर्गिक आश्चर्ये: लेक टिटिकाका आणि इग्वासु फॉल्स (डॉ. राजश्री शिरभाते) 16

2.5        रामदास नव्हे सूरदास  (वृंदा जोशी) 20

2.6        भीतीच्या पलीकडले (सुधांशू संजय बारस्कर) 23

2.7        धुंद वादळाची... (रवी दाते) 25

2.8        कादंबरी –बे-जमाव’: (प्रकरण ) – रवी – ‘प्रेम आणि पुणे’ (कुमार जावडेकर) 28

3       आस्वाद (कविता / गीत/ गजल) 39

3.1        प्रीती, संतऱ्याच्या गावाची (श्रीकांत पट्टलवार) 39

3.2        छोटी सी बात (अनिरुद्ध कापरेकर) 40

3.3        उत्तर दे पण संदेशातुन (प्राची जावडेकर) 41

3.4        आठवण (करुणा नेहरकर) 42

3.5        प्रेम व्हर्सेस लग्न (नेहा बापट अन्वेकर) 43

3.6        '' ची बाधा (सदर) - गीत: सांज-वारा (कुमार जावडेकर) 45

4       गप्पा-टप्पा – जे वेड मजला लागले (मीरा पट्टलवार) 46

4.1        दिव्या महाजनचे सप्तसागर आव्हान. 46

4.2        कबड्डीपटू वरद क्षीरसागर 48

4.3        क्रिकेटपटू अभिषेक कुलकर्णी... 50

4.4        निवृत्ती नंतरचे वेड – टेबल टेनिस अंपायर, डॉ. सुनील सप्रे. 52

5       कलादालन – (रती चौधरी) 55

6      डिंगूचा कट्टा  – नवे गुरुकुल - मिले सूर मेरा तुम्हारा (केतकी जमदग्नी - महाजन)




१. स्वागत (प्रेमा तुझा रंग कसा?)

प्रेमा तुझा रंग कसा? 

व्हॅलेंटाईन विशेषांकाच्या निमित्ताने विविध मित्रांच्या प्रेमात नाके खूपसून  त्यांची प्रेम पत्रे पश्चिमाईत छापण्याचा आमचा प्रयत्न साफ फसला. या प्रयत्नात आम्ही अनेक मित्रही गमावले. पण कोणी आपल्या प्रेमाचा जाहीर बोभाटा होऊ दिला नाही किंवा आम्ही प्रेम केलेच नाही असं कबूलही केले नाही. खरंतर खरं प्रेम हे असंच असावं. पूर्णपणे खाजगी. फेसबुक वर माझ्या हबीने आज सकाळी नाश्त्यासाठी कसे छान दडपे पोहे केले किंवा माझ्या बेबीने मला माझ्या बर्थडेला सकाळी उठल्या उठल्या कसे मोठे सरप्राईज दिले हेही प्रेमच असतंपण त्याची जाहीर वाच्यता पचवणं आमच्या पिढीला अजूनही कठीण जातं.  खचाखच भरलेल्या चित्रपटगृहातील ‘एकांतात’ प्रियकर किंवा प्रेयसी कडून आलेला एकाक्षरी  हुंकार ही आमच्या पिढीला प्रेमाची खात्री पटवायला  पुरेसा असतो. लग्नानंतर त्या ‘हुं’चा उच्चार अधिकाधिक जोरदार होतो आणि आपणही त्या हुंकाराचा गर्भित अर्थ डिक्शनरी न घेता आपल्या सोयीनुसार लावायला शिकतोया दोन हुंकारातला फरक आपल्या कवितेत सांगताहेत नेहा बापट अन्वेकर. निरपेक्ष प्रेमाची वेगळीच छटा आपल्या काव्यातून दाखवत आहेत अनिरुद्ध कापरेकर. इमोजीतून व्यक्त झालेल्या प्रेमाला कवितेत बांधले आहे प्राची जावडेकरांनी तर सांज आणि वारा हे प्रतीकात्मक स्वरूपातील युगुल गीत सादर केलय कुमार जावडेकरांनी.  करुणा, प्रेम आणि आठवण यांची सांगड घालतायत, तर उल्का प्रेम जात-पात मानत नाही हे दाखवतायत.

पण असं हे (अ)विवाहितांचं प्रेम हा एवढाच अर्थ पश्चिमाईला अभिप्रेत नाही. आमच्या या अंकात आहे केतकीचं तिच्या विद्यार्थ्यांवरील प्रेम आणि शिकवण्याची तळमळ. स्वतःमध्ये वयानुसार होणाऱ्या बदलांवरही प्रेम करत त्याची निसर्गातील बदलणाऱ्या ऋतूंशी सांगड घालत आहेत आदिती हिरणवार. 

आपल्यातील काही मराठी मंडळी खेळांवर इतकं प्रेम करतात की ते पद्धतशीरपणे जपत जपत त्या क्षेत्रात पुढे सन्माननीय कामगिरी बजावतात. क्रीडा क्षेत्रात प्राविण्य मिळवलेल्या अशाच काही क्रीडापटूंशी गप्पा मारताहेत मीराताई.

प्रेमाचं शास्त्र सांगताना कुसुमाग्रज, पाडगावकर यांच्यापासून थेट संतांपर्यंत प्रीतीची भक्ती आपण कशी करत आहोत हे सांगतायात डॉक्टर आनंद शिंत्रे.

कुशल, रवी आणि दिशा यांच्या प्रेम त्रिकोणातील एक कोन (कुशल) इंग्लंडला गेल्यामुळे सरळ रेषेत चाललेल्या दिशाच्या प्रेमाला योग्य दिशा मिळणार का ते मुंबई पुणे वादात अडकणार हे पाहूया जावडेकरांच्या कादंबरीतील पुढील प्रकरणात. त्यांच्या (म्हणजे  जावडेकरांच्या नव्हे, तर कादंबरीतल्या रवीच्या)  प्रेमप्रकरणात तुम्हाला फारसा रस नसेल तरी त्यातील पुणेकरांची खास वैशिष्ट्ये आणि पुण्याचा अगम्य पण व्यावहारिक भूगोल तुम्हाला नक्कीच पुण्याच्या प्रेमात पाडेल. 

जगभराचा प्रवास करून त्यातील 'याच' दोन  नैसर्गिक आश्चर्यांच्या प्रेमात आपण का पडलो हे वर्णन करतायत डॉक्टर राजश्री शिरभाते. 

मामाच्या गावाची ओढ कोणाला नसतेती ओढ आणि लहानपणापासून आपल्या मनात ठसलेले 'तेगाणे आपल्याला विसरायला लावूनत्याच निरागस प्रेमाचं नवीन रुपडं आपल्या गोड आवाजात सादर केले आहे पट्टलवारांनी.

‘सूरदासां’चे संगीतावरील प्रेम त्यांच्या शारीरिक अपंगत्वावर मात करायला कसे उपयोगी पडले हे सांगणारा वृंदाताईंचा लेख तुम्हाला नक्कीच अंतर्मुख व्हायला लावेल. तर प्रीती आणि भीती या दोन्ही भावना कशा आवश्यक आहेत हे सांगतायत सुधांशु संजय बारस्कर!  

सरते शेवटी तुम्हा सर्वांच्या सोशल मीडियावरील प्रेमासोबत एक चुटकी भर ‘वैधानिक इशारा’ माझ्यातर्फे.
प्रेमा तुझा रंग कसा
याचे उत्तर शोधताना आम्हाला सापडलेले प्रेमाचे असे हे विविध रंग आणि इतरही बरच काही तुमच्यापुढे सादर करत आहोत यंदाच्या व्हॅलेन्टाईन्स स्पेशल ‘पश्चिमाई’तून.



- रवी दाते, मँचेस्टर, यु. के. 

२.१ प्रेमाची उत्क्रांती (आनंद शिंत्रे)

प्रेमाची उत्क्रांती

– आनंद शिंत्रे

प्रेम म्हटले की मराठीतल्या अनेक प्रसिद्ध कवींच्या मनाला भिडणाऱ्या कविता आठवतात. मंगेश पाडगावकरांची कविता सांगते:

प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं
तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं!

प्रेम या दोन अक्षरी शब्दाचा अर्थ किंवा सोपी व्याख्या करायला कदाचित शेकडो शब्द लागतील आणि तरीही पूर्णता येईल अशी खात्री नाही. खाण्याची/संगीताची/प्रवासाची आवड, संपत्तीचा मोह, सौंदर्याचे/प्रसिद्धीचे  आकर्षण असते. आवड, आकर्षण, मोह हे प्रेमाहून वेगळे असल्याचे लक्षात न आल्याने बरेच लोक त्यांचे वर्णन करताना प्रेम शब्द वापरतात! प्रेमामध्ये दुसऱ्यांच्या सुखाची कामना करणे, त्यांच्या गरजांबद्दल संवेदनशील असणे आणि त्यांच्यासोबत भावनिक संबंध जोडणे अपेक्षित असते. ते केवळ रोमँटिक आकर्षण नसून त्याला मैत्री, कौटुंबिक स्नेह आणि परस्परांची काळजी असे अनेक स्तर असतात. लहानपण, किशोरवय, प्रौढावस्था आणि वृद्धावस्था यामधील प्रेम वेग-वेगळ्या प्रकारे प्रकट होते. त्याचप्रमाणे, विविध नातेसंबंधांमधील प्रेमाचे स्वरूप —विशेषत: पालक-पाल्यांमधील प्रेम, पती-पत्नीचे प्रेम आणि मुलांचे त्यांच्या पालकांवरील प्रेम यांचे रंग-रूप वेगळे असते.

आईचे बाळाबद्दल प्रेम, लहान मुलांचे पालकांवरील प्रेम, प्रियकर किंवा जोडीदाराचे प्रेम,तरुण मुलांचे वृद्ध आईवडिलांचे प्रेम , आपल्या पाळीव प्राण्याबद्दल प्रेम अशा एक ना अनेक प्रेमाचे रंग आणि छटा आहेत. प्रेम ही दोन सजीवांमधील अशी भावना आहे, जी वय आणि नातेसंबंधांच्या बदलत्या परिस्थितीनुसार विकसित होते. वयाच्या प्रत्येक टप्प्यावर त्या भावनेची तीव्रता, रूप आणि अपेक्षां यात फरक होत जातो हे आपण सर्वांनी अनुभवले आहे.

बाळपणी प्रेमाची भावना ही त्यांना आईपासून मिळणाऱ्या अनुभवांवर अवलंबून असते. लहान मुलांचे प्रेम निराकार असते, कारण त्यांना त्यांची काळजी घेणाऱ्यापासून अधिक काही अपेक्षित नसते. पालकांनी दिलेल्या भावनिक आणि शारीरिक संरक्षणाच्या आधारावर मुलांचा झपाट्याने विकास होतो. लहान मुलांच्या प्रेमाचे स्वरूप पालकाशी असणारी जवळीक, आणि भावनिक बंध यामार्गे निरागसतेने व्यक्त होते. पालकांचे प्रेम हा बाळाच्या वाढीसाठी महत्वाचा खुराक आहे, ज्यामध्ये मुलांना धोक्यातून वाचवण्याची, त्यांचा चांगला विकास होण्याची आणि त्यांच्या भविष्यासाठी आदर्श निर्मितीची क्षमता आहे. त्या आईच्या प्रेमाचे वर्णन कवि यशवंत ‘आई म्हणोनी कोणी’ या कवितेत करताना ‘स्वामी तिन्ही जगाचा । आईविना भिकारी । असे लिहून जातात.

मुले(/मुली) पौगंडावस्थेत (adolescence) प्रवेश करतात, तसे त्यांची प्रेमाची समज अधिक गुंता-गुंतीची होते. हे प्रेम हे रोमँटिक प्रेम आणि आपल्या कुटुंबाच्या बाहेर इतर नातेसंबंधांचा शोध घेण्याच्या प्रक्रियेत असते. ही वयात येणारी मुलं प्रेमाची भावना इन्फॅच्युएशन किंवा आकर्षण म्हणून अनुभवतात, जे त्यांच्या सहवासाच्या आणि साथीदाराच्या शोधाशी संबंधित असते. हे प्रेम, मुख्यतः, स्व-ओळखीचा, नवीन भावना अनुभवण्याचा आणि रोमँटिक नातेसंबंधांचा शोध घेण्याचा प्रयत्न असतो. पाडगावकर पुढे लिहितात:

दोन ओळींची चिठ्ठीसुद्धा प्रेम असतं,
घट्ट घट्ट मिठीसुद्धा प्रेम असतं…’

पालक आणि या वयातील मुलांमधील प्रेमाचा संबंध मात्र आता बदलू लागतो. पौगंडावस्थेतील मुलं स्वायत्ततेच्या शोधात असतात आणि पालकांपासून काही प्रमाणात दूर जातात. यामुळे कधीकधी ताण निर्माण होऊ शकतो. तरीही, पालकांचे प्रेम नेहमीच टिकून राहते. पालक आता अधिक मार्गदर्शन आणि आधार या स्वरूपात ते व्यक्त करतात. काही पालकांना मात्र हा बदल किंवा मुलांचे वाढते स्वातंत्र्य स्वीकारायला अवघड जाते.

प्रौढावस्थेत प्रेम एक अधिक प्रगल्भ आणि वचनबद्ध रूप धारण करते. सुधीर मोघे लिहितात

दाटून आलेल्या संध्याकाळी अवचित सोनेरी ऊन पडतं
 तसंच काहीसं पाऊल न वाजवता... आपल्या आयुष्यात प्रेम येतं

विशेषतः, पती-पत्नींचे प्रेम हे एक गडद, विश्वासावर आधारित आणि एकत्रित ध्येयांवर आधारित असते. किशोरवयातील उत्कटतेच्या तुलनेत, प्रौढावस्थेतील प्रेम सहवास, सामायिक अनुभव आणि दैनंदिन जीवनाच्या जबाबदाऱ्या यावर आधारित असते. रोमँटिक आकर्षण अद्याप अस्तित्वात असले तरी ते अर्थाजन, मुलांचे पालन-पोषण, आणि घराच्या जबाबदाऱ्या इत्यादी व्यावहारिक गोष्टींबरोबर संतुलित करावे लागते. सफल लग्नांमध्ये, प्रेम ही एक सुख-दुख्खाची भागीदारी असते. हे प्रेम वेळोवेळी बदलू शकते, परंतु त्याचा पाया असलेली विश्वास, आधार आणि सहवासाची भावना तीव्र असते. विशेषत: मुलांची काळजी, आर्थिक आणि इतर जबाबदाऱ्यांच्या दबावातही एकमेकांच्या प्रेमाची जपलेली स्थिरता आणि आधार या नात्याचे खास वैशिष्ट्य असते. 

या काळातच पालकांच्या मुलांबद्दलच्या प्रेमातही बदल होऊ लागतो, मुलं प्रौढ होऊन स्वतंत्र जीवन जगायला लागतात, त्यामुळे पालकांचे प्रेम आता देखरेख करण्यापेक्षा सल्ला देण्याच्या आणि भावनिक आधाराचे  बनते. पालकांचे प्रेम कायम असतेच आणि ते मुलांच्या यशामुळे वाढत जाते.

वृद्ध वयातील पती-पत्नींचे प्रेम एकदम शांत, सहनशील आणि आठवणीने भरलेले असते. अनेक वर्षांच्या सहवासामुळे, प्रेम एकाच पातळीवर आणि त्यांच्या सहवासाच्या आणि आठवणींच्या आधारावर ठरते. खरे प्रेम कायम रहाते. उडते ती वासना. शारीरिक शक्ती कमी झाल्यामुळे, भावनिक जवळीक आणि सहवासाच्या गरजा वाढतात.

वयस्कर पालकांचे प्रेम त्यांच्या मुलांच्या कर्तृत्वाचा अभिमान आणि आनंदाच्या रूपात व्यक्त होते आणि त्याचवेळी मुलांचे पालकांवरील प्रेम आता त्यांची काळजी वाहण्याच्या आणि कृतज्ञतेच्या रूपात बदलते. मुले  त्यांच्या वयस्कर पालकांच्या शारीरिक कमजोरीचे आणि मुलांसाठी घेतलेल्या कष्टाचे /त्यागाचे मूल्य ओळखू लागतात, ज्यामुळे प्रेमाचा रंग अधिक गहिरा आणि सन्माननीय रूप धारण करतो ! यामुळे हेही सिद्ध होते की प्रेम ही एक शाश्वत पण उत्क्रांत होणारी भावना आहे. ‘पृथ्वीचे प्रेमगीत’ लिहिताना कुसुमाग्रज म्हटतात:

‘युगामागुनी चालली रे युगे ही, करावी किती भास्करा वंचना
किती काळ कक्षेत धावू तुझ्या मी,कितीदा करु प्रीतीची याचना’

आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर प्रेम मिळण्याचे फायदे होतात तितकेच प्रेमाच्या कमतरतेमुळे होणारे गुंतागुंतीचे परिणामही होतात. प्रेमाची कमतरता अनुभवलेल्या मुलांना समस्या सोडवण्यात, भावनिक नियमन आणि सामाजिक संवाद करण्यामध्ये अडचणी येतात. अशी मुले स्वतःवर आणि इतरांवर देखील विश्वास ठेऊ शकत नाहीत. किशोरवयातील आत्मसन्मानाचा अभाव, एकटेपण आणि आपली ओळख काय आहे याबद्दल गोंधळ यांचे व्यक्तिमत्वावर कायमचे व्रण रहातात. अनेकदा तरुणवयातील व्यक्ती असे भावनिक रिकामपण  भरून काढण्यासाठी दारु पिणे, नशाखोरी, बंडखोरी किंवा आत्मविनाशक वर्तन करू लागतात. यामुळे त्यांचे पालकांशी किंवा पालकांचे आपसातील प्रेमाचे नातेही बिघडते. जेव्हा प्रौढ जोडप्यातील एक जोडीदार दुसऱ्या जोडीदाराकडून भावनिक दुर्लक्ष किंवा कमी लेखला जाण्याचा अनुभव घेतो तेव्हा संवाद तुटतो आणि शेवटी नात्याचे विघटन होऊ लागते. प्रेमाची कमतरता हे पुढे अनारोग्याचेही कारण बनते.

अनेक प्राणी त्यांच्या देखरेख करणाऱ्यांशी, इतर प्राण्यांशी किंवा माणसांशी घट्ट स्नेह-बंध तयार करतात. हे बंध मानवी प्रेमासारखे मजबूत असतात.अनेक प्राण्यांमध्ये आनंद, भय, प्रेम, आणि शोक यांसारख्या भावना असू शकतात आणि त्या भावना मूकपणे वेगवेगळ्या मार्गाने व्यक्त करतात. असे प्रेम कळण्यासाठी संवेदनशील मानवी मन मात्र हवे ! माकडे, हत्तींसारखे कळपात राहाणारे प्राणी ज्या प्रकारे कळपातील इतर सभासदानाही  निस्वार्थीपणे मदत करतात तो त्या प्राणिमात्रातील प्रेमाचा दाखलाच आहे.  

आपल्या अनेक संतांनी परमेश्वराला आई किंवा माऊली असे संबोधून त्या प्रेमाचा दाखला दिला आहे.या प्रेमात भक्त ईश्वरासारख्या संकल्पनेशी भावनिक ऐक्य साधतो. हे ईश्वर प्रेम जीवनातील दुःखांपासून मुक्ती मिळवून देते, जसे संत तुकाराम म्हणतात, वेधले वो येणे श्रीरंगे, मी माझी अंगे हारपली’ आणि ‘परते चि ना दृष्टी बैसली ते ठायी, विसावोनि पायी ठेले मन’... ईश्वर-प्रेम अनुपम आहे, त्याला कशाचीही उपमा देता येत नाही. सर्वभावपूर्णतेने ईश्वराशी एकरूप होण्याचा दाखला देताना ज्ञानेश्वर सांगतात: (जशी) पावसाच्या धारेला पृथ्वीवर येण्याशिवाय दुसरी गती नाही.

‘परि तेचि भक्ति ऐसी, पर्जन्याची सुटिका जैसी,धरावांचूनि अनारिसी, गतीचि नेणें ॥ ६८६ ॥’

‘तैसें सर्वभावसंभारें, न धरत प्रेम एकसरें, मजमाजीं संचरे, मीचि होऊनि ॥ ६८८ ॥’

भगवंताविषयी प्रीती, लडिवाळपणा आणि त्याच्यातून फुललेला भक्तिरंग हा मानवी प्रेमाच्या उत्क्रांतीतील सर्वोच्च स्तर नाही का?  

- आनंद शिंत्रे. रेडिंग, यु. के. 

२.२ एक छोटीसी टिचकी की कीमत तुम क्या जानो रवी बाबू? (रवी दाते)

एक छोटीसी टिचकी की कीमत तुम क्या जानो रवी बाबू?

रवी दाते 

काही दिवसांपूर्वीची गोष्ट, आमच्या कॉलनीच्या व्हॉट्सअॅप ग्रुप वरील एका मैत्रिणीने बायकोच्या मोबाईलवर सकाळी सहा वाजता एक मेसेज पाठवला. बायको कामात होती, मेसेज पाहिला नाही. सहा वाजून पाच मिनिटांनी मैत्रीण कासावीस होऊन दारात उभी. आम्हाला कळेना नक्की काय झाले

अगं, माझा मेसेज पाहिलास का?” 

नाही बाई, काही महत्त्वाचं होतं का?” 

नाही, एक छान जोक होता. पण इतका वेळ झाला, तुझी प्रतिक्रिया आली नाही म्हणून विचारायला आले.” 

दुसरा प्रसंग नुकताच माझ्या ऑपरेशन थिएटरमध्ये घडलेला. ऑपरेशन थिएटरमध्ये असा एक संकेत आहे की तुम्ही ऑपरेशन साठी निर्जंतुक कपडे घालून तयार झाल्यानंतर कुठल्याही लहान-मोठ्या सबबीसाठी कोणी पेशंटला टेबलावर सोडून जात नाही.  तोंडाला मास्क लावण्यापूर्वी नाक खाजवणे, निर्जंतुक कपडे घालण्यापूर्वी टॉयलेटला जाणे इत्यादी सर्व विधी ऑपरेशन सुरू करायच्या आधी उरकायचे असतात. परंतु एक स्टाफ नर्स ऑपरेशन सुरू झालं आणि पाच मिनिटांत मला आणि पेशंटला सोडून अचानक गायब झाली. पहिल्या वेळेला जरा विचित्र वाटलं. पण म्हटलं काही पर्सनल प्रॉब्लेम्स असतील. सगळ्यांसमोर सांगता येत नसतील. एकदा, दोनदा सहन केलं, तीन चार वेळा झाल्यावर मेट्रनकडे तक्रार केली. विचारपूस केल्यावर असं लक्षात आलं की बाईंना शारीरिक त्रास काहीही नव्हता. अगदी ठणठणीत होत्या. पण खिशातला मोबाईल थरथरला की अस्वस्थ व्हायच्या आणि परवानगीची वाट न पाहता आणि परिणामांची चिंता न करता पसार व्हायच्या... केवळ थरथराटाने सूचित केलेल्या मेसेजला तात्काळ उत्तर देण्यासाठी! 

आपल्यापैकी काही जणांनी सुद्धा असं पाहिल असेल की आपण चार लोक गप्पा मारत असतो आणि अचानक त्यातील एक जण खिशातून मोबाईल काढतो आणि पटकन मेसेजला उत्तर देऊन फोन खिशात टाकतो.

चाळीस वर्षाच्या माझ्या सर्जरीच्या कारकिर्दीत असं कधी घडलं नव्हतं आणि साठ वर्षाच्या आयुष्यात शेजारीण मेसेजला लाईक का दिला नाही म्हणून जाब विचारायला आमच्या दारात रामाच्या पारी उभी राहिली नव्हती. मग हे असं आत्ताच का व्हायला लागलं

बिरबलच्या एका गोष्टीत ‘भाकरी का करपली?’, ‘घोडा का अडला?’ आणि ‘विड्याची पाने का सडली?’ अशा तीनही प्रश्नांच उत्तरं एकच होतं ‘न फिरवल्यामुळे’ तसंच ‘बाई (शेजारीण   दारात)  का आली?’, ‘बाई (स्टाफ नर्स थिएटर सोडून) का गेली?’ आणि ‘बाईं (मैत्रिणींशी गप्पा मारायच्या) का थांबली?’ ह्या तीनही प्रश्नांचे उत्तर, ‘केवळ मोबाईल वरील मेसेजला ताबडतोब ‘Like’ किंवा 👍 ची टिचकी न मारता आल्यामुळे!!!’ (समस्त स्त्री वर्गाची माफी मागून नम्रपणे नमूद करू इच्छितो की या ठिकाणी बाई हा शब्द इथे केवळ वाक्यांच्या सोयीसाठी वापरला आहे स्त्रीमुक्तीवाद्यांनी “बाई”च्या जागी “पुरुष” घालून वाचण्याचा प्रयत्न जरूर करावा.)

असं काय आहे या टिचकीत की ज्यामुळे आपण तिला वश होऊन बाकी सर्व कामे सोडून टिचकीची प्रतीक्षा करतो किंवा टिचकी मारायला उत्सुक होतो. ही सर्व किमया त्या डोपामीनची. डोपामीन हे मेंदूतील रसायन जे त्या टिचकीमुळे आपल्याला राष्ट्रीय भाषेत सांगायचं तर “फील गुड” किंवा मराठीत “छान वाटतं” अशी भावना देते, आनंद देते. पण एकदा का या टिचकीमुळे मिळणाऱ्या आनंदरुपी बक्षिसाची म्हणजेच“Reward system”ची सवय लागली की “टिचकी - आनंद - पुन्हा टिचकी - पुन्हा आनंद” अस दुष्टचक्र किंवा “Dopamine loop” तयार होतो. हिंदी चित्रपटाच्या भाषेत सांगायचं तर मेंदूत केमिकल लो** होतो. तो पुढच्या थराला गेला की त्याचे व्यसनात रूपांतर होते आणि त्यातूनच मानसिक आजार निर्माण होतात. 

मग पूर्वी अशा टिचक्या नव्हत्या का आनंद नव्हता का डोपामीन नव्हते? सगळे काही होते, परंतु एवढ्या तीव्र इच्छांचे रूप सार्वत्रिक नव्हते. आता उदाहरण द्यायचे झाले तर काशिनाथ घाणेकरांकडे बघूया. त्यांना स्टेजची प्रचंड नशा होती. त्यांनी सिनेमात काम करून बघितले, पण तिथे स्टेजची नशा  न मिळाल्यामुळे त्यांनी सिनेमा सोडला आणि ते साहजिक होतं. स्टेजवरील अभिनयाने तात्काळ मिळणारी दाद, त्या टाळ्यांची इच्छा आणि कैफ ज्यांना होतो असे इतरही अनेक असतील, पण त्यांची ती नशा त्या उंचीला पोचल्यावर मिळणाऱ्या सन्मानांमुळे होती आणि काही जणांपुरतीच मर्यादित होती. ती नशा केवळ सामान्य दर्जाच्या जोकला लाईक मिळाल्यामुळे होणाऱ्या आनंदाची नव्हती आणि सध्या सारखी सार्वत्रिकही नव्हती. 

मग टिचकीने मिळणाऱ्या आनंदात वाईट काय आहे? ‘फील गुड’ किंवा ‘बरं वाटण्यात’ वाईट काहीच नाही; नाटकातील नटाला टाळ्यांचे आकर्षण असण्यातही काही गैर नाही आणि किंबहुना त्यांना ती दाद मिळालीच पाहिजे आणि त्याचा अभिमानही असावा.

डोपामीनची ही ‘reward system’ किंवा ‘आनंद बक्षिशी’ समजून घ्यायची असेल तर माणसाने तिचा करमणुकीसाठी कसा उपयोग करून घेतलाय ते बघूया. डिस्नीच्या आफ्रिकन सफारीमध्ये शिकवलेला पोपट आपल्या खिशातील नोट स्टेजवरील कलाकाराला एका शेंगदाण्यासाठी नेऊन देतो. सी वर्ल्डमधील सील एका माशाच्या तुकड्यासाठी आपल्याला कोलांटी मारून दाखवतो किंवा एखादा डॉल्फिन त्याच्या ट्रेनरला पाठीवर घेऊन तलावाला फेरी मारुन दाखवल्यावर बक्षीस म्हणून मिळणारा खाऊ मटकावतो. 

सोशल मीडिया हे अधिकाधिक लोकांना आकर्षित करण्यासाठी सतत प्रयत्नशील असते आणि त्यासाठी त्यांनी केलेले सर्व उपाय वापरणाऱ्यांना आनंद देण्यासाठी असतात. शेजारणीला एका टिचकीने मिळणारा आनंद काहींना हजार टिचक्यांनी, तर काहींना एक लाख ‘लाईक्स’ने मिळतो पण तात्काळ मिळणाऱ्या या क्षणिक आनंदाची चटक कधी लागते आणि तिचे कधी व्यसनात, तर कधी ADHD मधे रुपांतर होते हे बऱ्याच जणांना आणि किंबहुना सोशल मीडियाच्या जनकांनाही कळत नसावे. 

ही समस्या पौगंडावस्थेतील मुला मुलींची आहे आणि सोशल मीडियाचे सर्वाधिक वाईट परिणाम त्यांच्यावर होतात असं समजून आमची पिढी काही प्रमाणात गाफील होती, पण वरील प्रसंगांनी माझ्या या समजुतीला तडा दिला आणि हा रोग कोविड सारखाच सार्वत्रिक आहे याची खात्री पटली. 

आता याची शहानिशा करण्यासाठी हा लेख मी व्हॉट्सअॅप वर टाकला असता तर माझ्या सोशल मीडियावरील ‘प्रौढ’, ‘व्यसनी’ मित्रांनी किंवा ओळखीच्या लोकांनी त्यातील पहिल्या तीन ओळी वाचून तात्काळ अंगठा 👍 आणि ❤️ दाखवलेही असते (ज्यांना असे करण्याची इच्छा नसेल त्यांनी हा “समझनेवाले को काफी” असणारा इशारा समजावा).

या ‘feel good’ किंवा ‘like’ किंवा 👍 टिचकीची सावत्र बहिण ...सॉरी चुकलो सावत्र भाऊ ...म्हणजे सोशल मीडियावरील dislikes किंवा  👎 म्हणजे सोशल मीडियावर किंवा आपल्या मित्रमंडळीत आपण अप्रिय होत आहोत असे वाटणे. तर हे कसे?, तर बाकीचे लोक त्यांच्या डीपीवर सुंदर दिसतात, त्यांच्या फेसबुक वर त्यांनी त्यांच्या ‘हॉलिडेज’ वर कुटुंबासमवेत कशी ‘मज्जा’ केली हे समजते, त्यांच्या ‘हबी’ने त्यांच्या वाढदिवसाला त्यांना कसं मस्त ‘सरप्राईज’ दिलं हे इंस्टाग्राम वर कळतं आणि या सर्व मंडळींकडून आपल्याला acceptance किंवा मान्यता हवी असेल तर आपणही सुंदर दिसलच पाहिजे आणि आपणही फेसबुक आणि इंस्टाग्राम वर यांच्याप्रमाणेच आयुष्य ‘एन्जॉय’ केलं पाहिजे  असं तीव्रतेने वाटू लागतं, मग भले आपले आयुष्य टिक टॉक वरील व्हिडिओज प्रमाणे आपले आयुष्य बायकोशी अर्धा वेळ भांडण्यात चाललेले असो की बायको सोबतच्या ड्रायव्हिंग सारखे असो किंवा बायकोचा वाढदिवस विसरल्यामुळे केलेल्या सारवा सारविने  भरलेले असो. आपल्याला हे लक्षातच येत नाही की फेसबुक वर सुंदर दिसणाऱ्या हॉटेलमधील खाण्याला  चवीसाठी दिलेला अभिप्राय फक्त 5/10 असू शकतो किंवा इंस्टाग्राम वर अप्रतिम दिसणाऱ्या हॉलिडेचा, फ्लाईट चुकल्यामुळे पहिल्याच दिवशी विचका झालेला असू शकतो. सगळ्यांचेच आयुष्य पुलंच्या ‘व्यक्ती आणि वल्ली’ मधील माधराव आणि मालतीबाई यांच्या ‘चौकोनी’ कुटुंबाप्रमाणे नसते, ज्यांना दोनच मुलं असतात, त्यापैकी मुलगी  डॉक्टर होते आणि मुलगा इंजिनियर होतो इत्यादी इत्यादी. 

मग ‘आपल्याच राशीला सगळे राहू-केतू का?’ किंवा ‘उसकी कमीज मेरी कमीज से सफेद कैसे?’ असे अनेक न्यूनगंड मनात निर्माण होतात आणि त्यातूनच नैराश्य anxiety आणि वैफल्य इ. इ. विकार उफाळतात. लहान वयात तर ते एवढ्या थराला जातात की पंधरा-सोळा वर्षाच्या मुली केवळ सहानुभूती मिळवण्यासाठी मनगटावरील नसा कापून किंवा पॅरासिटॅमॉलचे आख्खे पाकीट संपवून हॉस्पिटलमध्ये येतात. त्यांना पूर्णपणे जाणीव असते की यामुळे आपण मरणार नाही, पण लोकांचे लक्ष आपल्याकडे नक्की वेधले जाईल.

संपर्क माध्यमांच्या अभावी दुरावलेल्या नातेवाईकांना आणि मित्रांना कित्येक वर्षांनी एकत्र आणणाऱ्या संपर्क माध्यमांवरील, सकारात्मक आणि नकारात्मक टिचक्यांचे भयानक परिणाम टाळण्याचा उपाय गौतम बुद्धांच्या मध्यम मार्गाच्या शिकवणीत सापडतो. प्रत्येक गोष्टीत समतोल हवा असं विपश्यना शिकवते.  संपर्क माध्यमे ही आपल्याला जवळ आणण्यासाठी अस्तित्वात आली आहेत, पण ती कशी, कधी आणि किती वापरायची आणि त्यांच्या किती आहारी जायचं हे ज्याचं त्याने ठरवायचं. अन्यथा त्या एका छोट्या ‘टिचकी की किमत’ मोठे मानसिक आजार ठरू शकते.

- रवी दाते, मॅंचेस्टर, यु. के.  

२.३ शिशिरातूनी उगवेन मी (अदिती हिरणवार)

शिशिरातूनी उगवेन मी 

- अदिती हिरणवार



सध्याचा इंग्लंडमधला ऋतू म्हणजे निसर्गाने मुक्तहस्ते केलेली रंगांची उधळण. लाल, पिवळ्या, तपकिरी, शेंदरी रंगांच्या असंख्य छटा लेऊन मोठमोठ्या झाडांवर पानं सळसळताहेत. सप्टेंबर महिन्यात शेवटी शेवटी हवामान थंडावू लागतं. सूर्यप्रकाश असण्याचा दिवसाचा काळ कमी होतो , परिणामतः झाडांची अन्न बनवण्याची प्रक्रिया मंदावते,  "Fall" च्या ऋतूत ही पानं हळूहळू आपला हिरवा रंग सोडून या वेगळ्या वेगळ्या छटा परिधान करतात.  थंडी असूनही मुद्दाम पाहायला बाहेर पडावं इतकं विलक्षण दृश्य असतं ते. 
ही रंग बदललेली पानं फार काळ टिकत नाहीत झाडावर. Fall संपून जेव्हा Autumn चालू होतो तेव्हा वाऱ्याचा वेग वाढलेला जाणवतो.  झाडं सुसाट सुटलेल्या वाऱ्या सोबत हेलकावे घेत असतात, त्या वाऱ्याच्या झोताने पिकली पानं मात्र अलगद फांदीवरून निसटून खाली पडतात. ही पडलेली पानं वाऱ्याच्या भोवऱ्यात सापडून कुठे कुठे भरकटत फिरत असतात.  झाडं निष्पर्ण होऊन भकास बोडकी दिसू लागतात. आजूबाजूची बरीचशी झाडं भकास झाली, काही अजुन विविध छटा दाखवताहेत तर काही वाट्टेल ते झालं तरी ना आम्ही पानं पिकू देणार ना ही ती गळू देणार अशा तोऱ्यात दिमाखात हिरवी पाने लेवून उभी आहेत.
चालायला गेलं एकटंच की या निसर्गाच्या ऋतुचक्राचा आणि आपल्या मानवी जीवनातील अवस्थांचा एकत्र विचार मनात येतोच. झाडं एका वर्षात ऋतूनुसार विविध रूपं धारण करतात. शिशिरात बोडकी झालेली , थंडीचा बोचरा तडाखा सहन करून वसंताच्या आगमनाने कोवळी पालवी ल्यालेली,जसजसा दिवस आपले हात पाय पसरू लागतो, तसतशी गडद लोभस हिरवा रंग मिरवणारी, दिवसातील सूर्यप्रकाश कमी होऊ लागला की अनुभवाने पिकली तरी सौदर्याने नटलेली आणि पुन्हा ते सौंदर्य विरलं तरी हेही दिवस संपतील म्हणत उद्याच्या आशेवर भक्कम उभी ठाकलेली...
आपण माणसंही वयानुसार अशी सर्व स्थित्यंतर अनुभवतो. 
अल्लड बालक, सळसळते तरुणपण, चाळिशी, पन्नाशीत होणारे शारीरिक बदल gracefully हाताळत, साठी सत्तरी पार करून हळूहळू वृद्धावस्थेत पोचतो. माणसाच्या पूर्ण  आयुष्यात  वयानुसार होणारी ही स्थित्यंतरे एकदाच होतात, त्याला ना काही पर्याय असतो आणि कितीही लांबवायची म्हणाली तरी फार काही उपाय नसतो. प्रत्येक स्थित्यंतर स्वीकारत गेलं की बहुदा त्याचा फार त्रास होत नसावा.
वयाने एकदाच होत असली तरी मनाने मात्र ही स्थित्यंतरे आपण बरेचदा करतो. कधी तरल वाटतं तर कधी जोषपूर्ण. एखादं आलेलं आव्हान , त्याच्याशी दोन हात करून झाल्यावर जाणवतं की मन शिणलंय... त्याला निवांत पणाची गरज आहे. स्वतः कडे डोळसपणे बघून स्वतःचेच बरेचसे रंग अनुभवायची गरज आहे. त्यात नको असणारे जीर्ण झालेले, कुचकामी झालेले विचार आतून आलेल्या एखाद्या वावटळीत स्वाहा करायची गरज आहे. काही दिवस रिक्तपणा अनुभवत,आतून अलगद फुटणारे सर्जनशीलतेचे धुमारे शिलकावयाचे. पुन्हा तरल, सळसळणारी ऊर्जा घेऊन तरुण होतं मन.  
शरीराला जरी शिशिरातून उगवयाची मुभा नसली तरी मनाला नक्कीच आहे हो ना?
‘लहरेन मी, बहरेन मी
शिशिरातुनी उगवेन मी’*

अदिती हिरणवार, रेडिंग, यु. के. 
[सुधीर मोघे यांच्या ‘एकाच या जन्मी जणू’ या कवितेतील ओळींप्रमाणे]


२.४ पृथ्वीवरील निसर्गरम्य नैसर्गिक आश्चर्ये: लेक टिटिकाका आणि इग्वासु फॉल्स (डॉ. राजश्री शिरभाते)

पृथ्वीवरील निसर्गरम्य नैसर्गिक आश्चर्ये: लेक टिटिकाका आणि इग्वासु फॉल्स

डॉ राजश्री शिरभाते, इंग्लंड

आपल्या पृथ्वीतलावर सुरेख निसर्गाने नयनरम्य दृश्यांची मुक्तहत्ताने उधळण केलेली आहे. काही काही ठिकाणी तर निसर्गाच्या कुंचल्यातून रेखाटलेली दृश्ये बघून मन मंत्रमृग्ध होऊन जातं. आम्हांला दोघांनाही पर्यटनाची, जग बघायची आवड आहे आणि दोघांनाही निसर्गरम्य जागेचे विशेष आकर्षण! 
सुमारे बारा वर्षांपूर्वीची गोष्ट-  आमच्या एका सिनीअर मैत्रिणीशी गप्पा मारताना मी त्यांना म्हटले- तुम्ही एवढे जग हिंडलात तर तुमची सगळ्यांत आवडीची जागा कुठली? तरं त्या चटकन् उद्गारल्या –‘इग्वासु फॉल्स’. मी आश्चर्यचकीतच झाले, मी म्हटले मी तर ह्याच्याबद्दल कधी ऐकलंही नाही! तरं त्या म्हणाल्या -'ऐकलं नसशील, पण जरूर बघ; नक्कीचं डोळ्यांची पारणं फिटतील'. 
लवकरचं आम्हाला साऊथ अमेरिकेची ट्रीप करायचा योग आला.  आमच्या १७ दिवसाच्या (१८ सप्टेंबर ते ४ ऑक्टोबर) ट्रीप मध्ये आमचा छोटासा १४ लोकांचा ग्रूप होता, त्यांत एक कपल न्युझीलंडहून आलेले होते. 
आम्ही पेरू, बोलेव्हीया, ब्राझील आणि अर्जेंटिना देशांना भेट देणार होतो. आमच्या ट्रीप मध्ये 'कुस्को', 'लीमा' , 'पुनो',  'ला पाझ', 'रिओ दे जनेयरो', 'बुएनोस आइरेस', 'माचू पिच्चू', 'इग्वासु फॉल्स', 'लेक टिटिकाका' वगैरे ठिकाणे होती. पण ह्या लेखात मी लिहीणार आहे जगातील माझ्या आवडीच्या दोन निसर्गातील आश्चर्यांबद्दल: लेक टिटिकाका आणि इग्वासु फॉल्स.
२४ सप्टेंबरला भल्या पहाटे पाच वाजता उठून, ब्रेकफास्ट आटोपून ६.४५ला आम्ही कुस्कोहून निघालो. आजचा आमचा ८ तासांचा बसचा प्रवास होता. पण वाटेवरचे नॅचरल सौदर्य मात्र डोळ्यांना सुखावत होते. आमची बस बर्फानी आच्छादलेल्या उंच एंडीज पर्वतांमधून जात होती. आम्ही बसमध्ये अगदी पुढल्या सीटवर बसल्यामुळे ह्या सौदर्याचा पुरेपूर आस्वाद घेत होतो. मध्ये मध्ये सुंदर इंका रूइन्स पण नजरेला पडतं होते. आम्ही वाटेवरच्या Andahuaylillas and Racchi ह्या पहाडातल्या छोट्या गावांना पण भेटी दिल्या.
दुपारी ३ वाजता आम्ही पुनोला पोचलो. दक्षिण अमेरिकेत पेरू-बोलेव्हिया सीमेवर असलेले छोटेसे गाव 'पुनो'. या गावाजवळच आहे लेक टिटिकाका. हा प्रचंड लेक जवळ जवळ तीन मिलीयन वर्षांपासून आहे म्हणतात. ह्या लेकचा जास्ती भाग म्हणजे ६०% पेरू देशात येतो आणि ४०% बोलेव्हिया मध्ये. हा लेक या दोन देशातील ‘नैसर्गिक – सरहद्द’ आहे!

टिटिकाका लेक म्हणजे पेरु देशाचा नैसर्गिक व राष्ट्रीय ठेवा आहे! पन्नास मैल रुंद हा लेक बारा हजार पाचशे सात फूट उंचीवर आहे आणि जगातील सर्वात उंचावर असणारा मोठा लेक म्हणून प्रसिध्द आहे.  
अगदी पुरातन काळापासून ह्या लेकच्या किनाऱ्यावर लोकांची वसाहत राहिली आहे. आजकाल मात्र पेरू मधल्या 'पुनो' आणि बोलेव्हिया मधल्या 'कोपाकबाना' बेटांवर लोकांची वस्ती आहे.
पण गंमत म्हणजे ह्या बेटांना  'ऊरोस आयलंड' म्हणजेच 'तरंगती बेटं' म्हणतात. अशी ४०-५० आयलंडस् ह्या लेकवर आहेत. ह्या बेटांवर पाचशे-साडेपाचशे कुटुंबं राहतात. हे लोकं 'आयमारा' आणि 'केचवा' भाषा बोलतांत.

ह्या लेकमध्ये उगवणाऱ्या 'टोटोरो' नांवाच्या गवतापासून ही बेटे तयार करतांत.  ह्या सोनेरी रंगाच्या रिड गवतांची विशेष गुणधर्म आहेत- हे एकदम हलके असल्यामुळे पाण्यावर तरंगते आणि पाण्यात ओले होतं नाही. ह्या गवताच्या काड्या उभ्या आडव्या एकमेकातं अडकवून त्याचे कारपेट बनवले जाते, त्याचे एकावर एक थर देवून बेटांचा बेस बनवला जातो. हा बेस ह्या गवतांचा उपयोग करून चांगल्यारित्या लेकमधल्या खालच्या गवतांना बांधून तो स्थिर करतात. आणि मग त्यावर बांधातात ह्याच गवताचा उपयोग करून त्यांची घरे! तसेचं त्यांच्या होड्या आणि नावाही ह्या गवतापासूनच तयार केलेल्या असतात. 
पुनोजवळच्या लेक टिटिकाकावरच्या एका बेटाला आम्ही भेट दिली. त्या बेटावर गेलो, तिथल्या लोकांच्या घरात गेलो. ते लोक कसे राहतात ते बघितले. त्यांनी आम्हाला ते लोक ह्या गवतापासून होड्या, नावा इत्यादी वस्तू कसे तयार करतांत ते दाखविले.
दुसऱ्या दिवशी आम्ही कँटामारान क्रुझ बोट मध्ये लेक टिटिकाका वरच्या 'आयलंड ऑफ दी सन' बघायला गेलो. आयलंडवर २६० पायऱ्या चढल्यानंतर तेथून बघितलेले सृष्टीसौदर्य बघून घेतलेली मेहनत खरोखरचं सार्थक झाल्यासारखी वाटली. आम्ही तेथे दोन तास घालवून परतं बोटवर आलो. परतीच्या प्रवासात आम्हाला टीटीकाका लेक, त्यावरील आयलंडस, तेथील लोक, त्यांचे जीवन ह्यावरचा सुरेख व्हिडीओ दाखविला. 
आजकाल पर्यटकांसाठी तरं लेक टिटिकाका वरची ही बेटं म्हणजे 'मस्ट सी' गोष्ट झालेली आहे. खरं म्हणजे ते वावगंही नाही - कारण किती वेगळी, अनोखी, अद्भूतं पाण्यावरं तरंगणारी बेटं ही आणि त्यावर राहणारी ही लोकं! जमल्यास एकदा अगदी जरूर घ्यावा असा हा अनुभव. 
२९ सप्टेंबरला बुएनोस आइरेसहून इग्वासुसाठी आमची फ्लाइट सकाळी ८.३० ला होती. त्यामुळे सकाळी पाचलाच उठावे लागले. आम्ही एअरपोर्टवर आल्यानंतर आम्हाला कळले की आमची फ्लाइट उशीरा सुटणार! दुपारी दीड वाजता आमची फ्लाइट निघाली आणि ३.१५ ला आम्ही इग्वासुला पोहचलो. आमच्या हॉटेलला येईपर्यत संध्याकाळचे सहा वाजले. हॉटेल सुरेख होते. आम्ही सगळे थकलेले होतो. त्यामुळे आम्ही सगळ्यांनी थोडा वेळ विश्रांती घेतली आणि नंतर डिनरसाठी भेटलोत. दुसऱ्या दिवशी ज्याची मी अगदी खूप आतुरतेने वाट बघतं होते त्या इग्वासु फॉलला आम्ही भेट देणार होतो.
जेव्हा कधी जगातल्या वाटरफॉल्स बद्दल बोललं जातं तेव्हा अमेरिकेतल्या 'नायगरा फॉल' चे नाव सगळेचं घेतात. पण खरे बघता इग्वासु फॉल हा मोठा वाटरफॉल आहे. कारण हा नायगरा फॉल पेक्षा उंच असून रूंदीने कितीतरी पट जास्ती आहे!
इग्वासु फॉल्स ब्राझील आणि अर्जेंटीनाच्या सीमेवर आहे. १५४१ मध्ये स्पँनीश प्रवासी 'इवार काबेज़ा डी वाका' ने सर्वप्रथम ह्या वाटर फॉल्सचा शोध लावला म्हणतात. पण नंतर १९व्या शतकाच्या शेवटी बोसेली नावाच्या प्रवाश्याला ह्या फॉल्सचा पुन्हा एकदा शोध लागला! 
३० सप्टेंबरला सकाळी ८.३० ला आमचा टूर सुरू झाला. सुरवातीला आम्ही ब्राझीलीअन साइडने इग्वासु फॉल्स बघितले. २.७ किलोमीटरच्या इग्वासु नदीच्या एरीआ मध्ये इथे २७५ वाटर फॉल्स आहेत. हे फॉल्स नदीला अप्पर इग्वासु आणि लोअर इग्वासु मध्ये विभागतात.  एवढेच नाही तर हे आहेत सब ट्रॉपीकल रेन फॉरेस्ट मध्ये; अर्जेटिनामधील इग्वाझु नॅशनल पार्क आणि ब्राझीलमधील इगुआ नॅशनल पार्क. सगळा नजारा खरोखरच अद्भुत आहे, निसर्गसौंदर्याची उधळणच करणारा आहे. खरं म्हणजे हे दृश्य साठवायला आपले दोन डोळे अपुरेच पडतातं! जगातील सात नैसर्गिक आश्चर्यापैकी हे एक आश्चर्य समजले जाते. 
ह्यानंतर आम्ही अर्जेटिना साइडला गेलो. ह्या बाजूने काही वाटरफॉल्स अगदी जवळून बघता येतात. आम्ही इग्वाझु नॅशनल पार्कमधून ड्राइव्ह केले आणि तेथील हिरव्यागार सब ट्रॉपीकल रेनफॉरेस्टच्या सानिध्यात काही वेळ घालवला. 
नंतर आम्ही फूटब्रीज वरून चालत गेलो अन् नजरेसमोर आला 'दी डेव्हील्स थ्रोटचा अप्रतिम नजारा! ह्या ठिकाणी 'U' आकारात १४ इग्वासु वाटर फॉल्स ३५० फुटावरून कोसळतांत. 
जरी बहुसंख्य फॉल्स अर्जेटिनाच्या भागात असलेत तरी ब्राझीलच्या बाजूने मात्र उत्कृष्ट विहंगम दृश्ये आहेत. 

जरी बहुसंख्य फॉल्स अर्जेटिनाच्या भागात असलेत तरी ब्राझीलच्या बाजूने मात्र उत्कृष्ट विहंगम दृश्ये आहेत. हे सगळे निसर्गाचे आगळे वेगळे सुरेख स्वरूप बघून डोळे मंत्रमृग्ध झाले होते आणि मन तृप्त. 
आयुष्यात कधी संधी मिळाली तर पृथ्वीवरील ह्या निसर्गरम्य नै
सर्गिक आश्चर्याचा नजारा जरूर बघावा. 
- डॉ. राजश्री शिरभाते, चेस्टर-ले-स्ट्रीट, यु. के. 



२.५ रामदास नव्हे सूरदास (वृंदा जोशी)

रामदास नव्हे सूरदास  

वृंदा जोशी

भीमसेन जोशी, बाबूजी, सी रामचंद्र, वसंतराव, छोटा गंधर्व, यशवंत देव... किती दिग्गजांची नावं घ्यावी! इंग्लंड / अमेरिकेच्या दोऱ्यावरून जाता-येता मँचेस्टरमध्ये बैठकी केल्याशिवाय या मंडळींचे समाधान होत नसे. आणि याचं मुख्य कारण म्हणजे रामदास गोठीवरेकर. संगीतावर अपार प्रेम, कलाकारांबद्दल प्रचंड आदर, कुणाशीही उत्तम संवाद साधण्याची कला यामुळे रामदासना भेटल्यावर कुणालाही एक वेगळंच समाधान मिळे. त्यामुळे  रामदासची अगदी पहिल्याच भेटीत कुणाशीही घट्ट मैत्री होई. मग काय, सतत मैफिली, मैफिलींच्या गप्पा आणि पुन्हा मैफिली... मॅंचेस्टर मध्ये संगीत उत्सव नित्यनेमाने घडू लागले.

रामदास आणि जया गोठीवरेकर या आगळ्या दांपत्याला आम्ही प्रथम भेटलो श्री. रामदास कामतांच्या कार्यक्रमाच्या वेळी १९७५ मध्ये. या भागात आम्ही नुकतेच आलो होतो. ही पर्वणी साधायची म्हणून उत्साहाने नेहमीप्रमाणे हॉल झाडायलाच वेळेआधीच पोचलो. थोड्या वेळाने एक धिप्पाड गृहस्थ एका सुंदर खाशा सुबक ठेंगणी बरोबर येताना दिसले. जवळ आल्यावर लक्षात आलं की ते अंध आहेत. आपुलकीने त्यांनी आमची चौकशी करीत रीतसर ओळख करून घेतली. त्यांची बायको जया पण छान मोकळी वाटली मैफिलीला सुरुवात झाली ते गृहस्थ, म्हणजे रामदास गोठीवरेकर, चक्क पेटीवर सा करायला बसले होते. आम्हालाही गाण्याची आवड असल्यामुळे रामदासशी हळूहळू परिचय वाढत गेला आणि रामदास ही काय चीज आहे हे कळायला लागलं. 

नंतर मात्र फिनिक्स पक्षाप्रमाणे त्यांनी नवजीवनात पदार्पण केलं. टायपिंग येत होतं मग ब्रेलचा आणि कॉम्प्युटरचा कोर्स केला, नव्या उमेदीने लंडन सोडून स्टॉकपोर्ट येथे पुनर्वसनासाठी दाखल झाले. सीमेन्स कंपनीत गाईड डॉग चार्लीला घेऊन नोकरीवर जायला लागले.  हा सगळा बदल स्वीकार करणं कुटुंबीयांनाही अवघड गेलं, पण जया अगदी सावली सारखी सतत बरोबर होती. नोकरी व्यतिरिक्त इतर वेळाचं काय करायचं हा एक मोठा प्रश्नच होता. भारतात रामदासना बासरी वाजवायचा छंद होता, गाण्याचा अतोनात षौक होता, पेटीशी पण ओळख होतीच. मग पुढे त्यांनी पेटीचा छंद जोपासला आणि पेटीच्या सुरांचा ध्यास घेत ते सूरदास बनले.  सुप्रसिद्ध पेटीवादक श्री पुरुषोत्तम वालावलकर यांना मानस गुरु मानून एकलव्याप्रमाणे पेटीची साधना सुरू करून त्यात खूप प्राविण्य मिळवले. सप्तसुरांच्या साथीने त्यांचे जीवन झंकारून उठले. स्वत:सारखे असंख्य संगीत प्रेमी त्यांनी गोळा केले. त्या सर्वांनाच आपली जुनी गाण्याची आवड पुन्हा सापडली आणि एक छान कलाप्रेमी मंडळ तयार झाले. सगळेच हौशी, तरुण, उत्साही मंडळी! गाण्याच्या मैफिली वीकएंडला रंगायला लागल्या. महाराष्ट्रातून कुठलेही  कलावंतही लंडनला आले की त्यांचा एक कार्यक्रम मँचेस्टर ला करण्याचा उपक्रम सुरू झाला. रामदास कामत, प्रभा अत्रे, बाबूजी, अभिषेकी असे प्रथितयश गायक त्यात होते. रामदास जयाचा त्यात अगदी सिंहाचा वाटा असायचा. कलाकारांची आपल्या घरी राहण्याची सोय करण्यापासून गरजेनुसार त्यांना पेटीची साथ करण्यापर्यंत हसतमुखाने दोघेही तयार असायचे. एकेकाळी नवोदित असलेल्या आशा खाडीलकर, उपेंद्र भट, अतुल उपाध्ये प्रथम इंग्लंडला येण्याचे श्रेय रामदासना देतात.  पंडित भीमसेन जोशी, वसंतराव देशपांडे, छोटा गंधर्व, शोभा गुर्टू आदी दिग्गजांना ऐकण्याचीची संधी इथल्या रसिकांना रामदासनीच दिली. सी.रामचंद्र, सुधीर फडके, यशवंत देव यासारख्या संगीतकारांचा स्नेह त्यांना लाभला आणि त्यांच्यामुळे आम्हालाही! स्थानिक कलाकारांच्या कार्यक्रमाचा ते एक महत्त्वाचा घटक होते.

आपल्या दृष्टीहीनतेचा बाऊ न करता अतिशय सकारात्मक उत्साही आनंदी जीवन ते जगत होते. सुरांप्रमाणेच सुरेची ही मस्ती घेत गप्पांचा फड रंगवत होते. अपघातामुळे प्रतिकूल परिस्थितीला तोंड द्यावे लागले याबद्दलची कटूता त्यांच्या बोलण्यात चुकूनही नसे. मला फक्त दिसत नाही एवढेच! असं ते म्हणायचे. तीव्र बुद्धिमत्ता आणि चौफेर वाचन यामुळे त्यांच्या सगळ्या विषयांवरच्या गप्पा ऐकणे हा एक सुखद अनुभव असायचा.  त्यांच्या सहवासात आलेली व्यक्ती अत्यंत प्रभावीत होऊनच परत जायची.  त्यांच्या घरी कधीही जा हसत सहज सुंदर अगदी अनौपचारिक स्वागत व्हायचे त्यामुळे कुणाला कधी संकोच वाटत नसे.


(गायिका रजनी जोशी , किर्ती शिलेदार ,सुलभा आपटे आणि वृंदा जोशी यांना साथ करताना पेटीवर रामदास गोठीवरेकर. फोटो सौजन्य : जया गोठीवरेकर)

जिद्द, हुशारी आणि परिश्रम यामुळे रामदास ने नोकरीतही सिस्टीम अनालिस्टचा हुद्दा मिळवला मायक्रोसॉफ्टसारखी कंपनी सुद्धा विकसित केलेले प्रोग्राम चाचणीसाठी त्यांच्याकडे पाठवीत असे. १९८४ मध्ये बीबीसीने रामदासबद्दल एक माहितीपट टीव्हीवर प्रसारित केला होता. २००२ च्या युरोपीय मराठी संमेलनात रामदासना उल्लेखनीय कामगिरीबद्दल मानपत्र देऊन गौरवीत केले होते. २००६ च्या आरंभी त्यांच्या संगीत सेवेने प्रभावित होऊन सौ. आशा व श्री माधव खाडिलकर यांनी आपल्या उत्तुंग संस्थेतर्फे इंग्लंडचे तबलापटू श्री मधुकर कोठारे आणि रामदास यांचा मोठा सत्कार विलेपार्ले येथे केला. रामदास अगदी भारावून गेले. ते खूप आनंदात होते पण पुन्हा एकदा नियतीने घाव घातला त्यांना अर्धांगवायुचाचा झटका आला, आता सतत अंथरुणावर खिळण्याची शिक्षा नशिबी आली डावी बाजू लुळी झाल्याने पेटीचा विरंगुळा ही बंद झाला. मनाची उभारी खचत चालली होती.  आता ते या  जगात नाहीत पण त्यांच्या पेटीचे सूर कानात सतत गुंजत राहतील अशा आपल्या मित्राबद्दल म्हणावेसे वाटते

स्पर्श बुद्धी श्रुतींच्या साह्याने उभारली नवीन सृष्टी
एका अंधाने आम्हा डोळसांना दिली जगण्याची दृष्टी!

– वृंदा जोशी

*****


संयोजक

श्रीकांत पट्टलवार, मीरा पट्टलवार, रवी दाते, मुकुल आचार्य, कुमार जावडेकर