एक छोटीसी टिचकी की कीमत तुम क्या जानो रवी बाबू?
रवी दाते
काही दिवसांपूर्वीची गोष्ट, आमच्या कॉलनीच्या व्हॉट्सअॅप ग्रुप वरील एका
मैत्रिणीने बायकोच्या मोबाईलवर सकाळी सहा वाजता एक मेसेज पाठवला. बायको कामात होती,
मेसेज पाहिला नाही. सहा वाजून पाच मिनिटांनी मैत्रीण कासावीस होऊन
दारात उभी. आम्हाला कळेना नक्की काय झाले?
“अगं, माझा मेसेज पाहिलास का?”
“नाही बाई, काही महत्त्वाचं होतं
का?”
“नाही, एक छान जोक होता. पण इतका
वेळ झाला, तुझी प्रतिक्रिया आली नाही म्हणून विचारायला आले.”
दुसरा प्रसंग नुकताच माझ्या ऑपरेशन थिएटरमध्ये घडलेला. ऑपरेशन थिएटरमध्ये
असा एक संकेत आहे की तुम्ही ऑपरेशन साठी निर्जंतुक कपडे घालून तयार झाल्यानंतर
कुठल्याही लहान-मोठ्या सबबीसाठी कोणी पेशंटला टेबलावर सोडून जात नाही. तोंडाला मास्क लावण्यापूर्वी नाक खाजवणे,
निर्जंतुक कपडे घालण्यापूर्वी टॉयलेटला जाणे इत्यादी सर्व विधी
ऑपरेशन सुरू करायच्या आधी उरकायचे असतात. परंतु एक स्टाफ नर्स ऑपरेशन सुरू झालं
आणि पाच मिनिटांत मला आणि पेशंटला सोडून अचानक गायब झाली. पहिल्या वेळेला जरा
विचित्र वाटलं. पण म्हटलं काही पर्सनल प्रॉब्लेम्स असतील. सगळ्यांसमोर सांगता येत
नसतील. एकदा, दोनदा सहन केलं, तीन चार
वेळा झाल्यावर मेट्रनकडे तक्रार केली. विचारपूस केल्यावर असं लक्षात आलं की बाईंना
शारीरिक त्रास काहीही नव्हता. अगदी ठणठणीत होत्या. पण खिशातला मोबाईल थरथरला की
अस्वस्थ व्हायच्या आणि परवानगीची वाट न पाहता आणि परिणामांची चिंता न करता पसार
व्हायच्या... केवळ थरथराटाने सूचित केलेल्या मेसेजला तात्काळ उत्तर देण्यासाठी!
आपल्यापैकी काही जणांनी सुद्धा असं पाहिल असेल की आपण चार लोक
गप्पा मारत असतो आणि अचानक त्यातील एक जण खिशातून मोबाईल काढतो आणि पटकन मेसेजला
उत्तर देऊन फोन खिशात टाकतो.
चाळीस वर्षाच्या माझ्या सर्जरीच्या कारकिर्दीत असं कधी घडलं
नव्हतं आणि साठ वर्षाच्या आयुष्यात शेजारीण मेसेजला लाईक का दिला नाही म्हणून जाब
विचारायला आमच्या दारात रामाच्या पारी उभी राहिली नव्हती. मग हे असं आत्ताच का
व्हायला लागलं?
बिरबलच्या एका गोष्टीत ‘भाकरी का करपली?’, ‘घोडा का अडला?’ आणि ‘विड्याची पाने का सडली?’ अशा तीनही प्रश्नांच
उत्तरं एकच होतं ‘न फिरवल्यामुळे’ तसंच ‘बाई (शेजारीण दारात) का आली?’, ‘बाई
(स्टाफ नर्स थिएटर सोडून) का गेली?’ आणि ‘बाईं (मैत्रिणींशी
गप्पा मारायच्या) का थांबली?’ ह्या तीनही प्रश्नांचे उत्तर,
‘केवळ मोबाईल वरील मेसेजला ताबडतोब ‘Like’ किंवा
👍 ची टिचकी न मारता आल्यामुळे!!!’
(समस्त स्त्री वर्गाची माफी मागून नम्रपणे नमूद करू इच्छितो की या ठिकाणी बाई हा शब्द
इथे केवळ वाक्यांच्या सोयीसाठी वापरला आहे स्त्रीमुक्तीवाद्यांनी “बाई”च्या जागी “पुरुष”
घालून वाचण्याचा प्रयत्न जरूर करावा.)
असं काय आहे या टिचकीत की ज्यामुळे आपण तिला वश होऊन बाकी
सर्व कामे सोडून टिचकीची प्रतीक्षा करतो किंवा टिचकी मारायला उत्सुक होतो. ही सर्व
किमया त्या डोपामीनची. डोपामीन हे मेंदूतील रसायन जे त्या टिचकीमुळे आपल्याला
राष्ट्रीय भाषेत सांगायचं तर “फील गुड” किंवा मराठीत “छान वाटतं” अशी भावना देते, आनंद देते. पण एकदा का या टिचकीमुळे
मिळणाऱ्या आनंदरुपी बक्षिसाची म्हणजेच“Reward system”ची सवय
लागली की “टिचकी - आनंद - पुन्हा टिचकी - पुन्हा आनंद” अस दुष्टचक्र किंवा “Dopamine
loop” तयार होतो. हिंदी चित्रपटाच्या भाषेत सांगायचं तर मेंदूत
केमिकल लो** होतो. तो पुढच्या थराला गेला की त्याचे व्यसनात रूपांतर होते आणि
त्यातूनच मानसिक आजार निर्माण होतात.
मग पूर्वी अशा टिचक्या नव्हत्या का आनंद नव्हता का डोपामीन
नव्हते? सगळे काही होते,
परंतु एवढ्या तीव्र इच्छांचे रूप सार्वत्रिक नव्हते. आता उदाहरण
द्यायचे झाले तर काशिनाथ घाणेकरांकडे बघूया. त्यांना स्टेजची प्रचंड नशा होती.
त्यांनी सिनेमात काम करून बघितले, पण तिथे स्टेजची नशा
न मिळाल्यामुळे त्यांनी सिनेमा सोडला आणि ते साहजिक होतं. स्टेजवरील
अभिनयाने तात्काळ मिळणारी दाद, त्या टाळ्यांची इच्छा आणि कैफ
ज्यांना होतो असे इतरही अनेक असतील, पण त्यांची ती नशा त्या
उंचीला पोचल्यावर मिळणाऱ्या सन्मानांमुळे होती आणि काही जणांपुरतीच मर्यादित होती.
ती नशा केवळ सामान्य दर्जाच्या जोकला लाईक मिळाल्यामुळे होणाऱ्या आनंदाची नव्हती
आणि सध्या सारखी सार्वत्रिकही नव्हती.
मग टिचकीने मिळणाऱ्या आनंदात वाईट काय आहे? ‘फील गुड’ किंवा ‘बरं वाटण्यात’ वाईट काहीच
नाही; नाटकातील नटाला टाळ्यांचे आकर्षण असण्यातही काही गैर
नाही आणि किंबहुना त्यांना ती दाद मिळालीच पाहिजे आणि त्याचा अभिमानही असावा.
डोपामीनची ही ‘reward system’ किंवा ‘आनंद बक्षिशी’ समजून घ्यायची
असेल तर माणसाने तिचा करमणुकीसाठी कसा उपयोग करून घेतलाय ते बघूया. डिस्नीच्या
आफ्रिकन सफारीमध्ये शिकवलेला पोपट आपल्या खिशातील नोट स्टेजवरील कलाकाराला एका
शेंगदाण्यासाठी नेऊन देतो. सी वर्ल्डमधील सील एका माशाच्या तुकड्यासाठी आपल्याला
कोलांटी मारून दाखवतो किंवा एखादा डॉल्फिन त्याच्या ट्रेनरला पाठीवर घेऊन तलावाला
फेरी मारुन दाखवल्यावर बक्षीस म्हणून मिळणारा खाऊ मटकावतो.
सोशल मीडिया हे अधिकाधिक लोकांना आकर्षित करण्यासाठी सतत
प्रयत्नशील असते आणि त्यासाठी त्यांनी केलेले सर्व उपाय वापरणाऱ्यांना आनंद
देण्यासाठी असतात. शेजारणीला एका टिचकीने मिळणारा आनंद काहींना हजार टिचक्यांनी, तर काहींना एक लाख ‘लाईक्स’ने मिळतो पण
तात्काळ मिळणाऱ्या या क्षणिक आनंदाची चटक कधी लागते आणि तिचे कधी व्यसनात, तर कधी ADHD मधे रुपांतर होते हे बऱ्याच जणांना आणि
किंबहुना सोशल मीडियाच्या जनकांनाही कळत नसावे.
ही समस्या पौगंडावस्थेतील मुला मुलींची आहे आणि सोशल मीडियाचे
सर्वाधिक वाईट परिणाम त्यांच्यावर होतात असं समजून आमची पिढी काही प्रमाणात गाफील
होती, पण वरील प्रसंगांनी
माझ्या या समजुतीला तडा दिला आणि हा रोग कोविड सारखाच सार्वत्रिक आहे याची खात्री
पटली.
आता याची शहानिशा करण्यासाठी हा लेख मी व्हॉट्सअॅप वर टाकला
असता तर माझ्या सोशल मीडियावरील ‘प्रौढ’, ‘व्यसनी’ मित्रांनी किंवा ओळखीच्या
लोकांनी त्यातील पहिल्या तीन ओळी वाचून तात्काळ अंगठा 👍 आणि ❤️ दाखवलेही असते (ज्यांना असे करण्याची इच्छा
नसेल त्यांनी हा “समझनेवाले को काफी” असणारा इशारा समजावा).
या ‘feel good’ किंवा ‘like’ किंवा 👍 टिचकीची सावत्र बहिण ...सॉरी चुकलो सावत्र
भाऊ ...म्हणजे सोशल मीडियावरील dislikes किंवा 👎 म्हणजे सोशल मीडियावर किंवा आपल्या
मित्रमंडळीत आपण अप्रिय होत आहोत असे वाटणे. तर हे कसे?, तर
बाकीचे लोक त्यांच्या डीपीवर सुंदर दिसतात, त्यांच्या फेसबुक
वर त्यांनी त्यांच्या ‘हॉलिडेज’ वर कुटुंबासमवेत कशी ‘मज्जा’ केली हे समजते,
त्यांच्या ‘हबी’ने त्यांच्या वाढदिवसाला त्यांना कसं मस्त ‘सरप्राईज’
दिलं हे इंस्टाग्राम वर कळतं आणि या सर्व मंडळींकडून आपल्याला acceptance किंवा मान्यता हवी असेल तर आपणही सुंदर दिसलच पाहिजे आणि आपणही फेसबुक आणि
इंस्टाग्राम वर यांच्याप्रमाणेच आयुष्य ‘एन्जॉय’ केलं पाहिजे असं तीव्रतेने वाटू लागतं, मग भले आपले आयुष्य टिक
टॉक वरील व्हिडिओज प्रमाणे आपले आयुष्य बायकोशी अर्धा वेळ भांडण्यात चाललेले असो
की बायको सोबतच्या ड्रायव्हिंग सारखे असो किंवा बायकोचा वाढदिवस विसरल्यामुळे
केलेल्या सारवा सारविने भरलेले असो. आपल्याला हे
लक्षातच येत नाही की फेसबुक वर सुंदर दिसणाऱ्या हॉटेलमधील खाण्याला चवीसाठी दिलेला अभिप्राय फक्त 5/10 असू शकतो किंवा
इंस्टाग्राम वर अप्रतिम दिसणाऱ्या हॉलिडेचा, फ्लाईट
चुकल्यामुळे पहिल्याच दिवशी विचका झालेला असू शकतो. सगळ्यांचेच आयुष्य पुलंच्या ‘व्यक्ती
आणि वल्ली’ मधील माधराव आणि मालतीबाई यांच्या ‘चौकोनी’ कुटुंबाप्रमाणे नसते,
ज्यांना दोनच मुलं असतात, त्यापैकी मुलगी
डॉक्टर होते आणि मुलगा इंजिनियर होतो इत्यादी इत्यादी.
मग ‘आपल्याच राशीला सगळे राहू-केतू का?’ किंवा ‘उसकी कमीज मेरी कमीज से सफेद कैसे?’ असे अनेक न्यूनगंड मनात निर्माण होतात आणि त्यातूनच नैराश्य anxiety
आणि वैफल्य इ. इ. विकार उफाळतात. लहान वयात तर ते एवढ्या थराला
जातात की पंधरा-सोळा वर्षाच्या मुली केवळ सहानुभूती मिळवण्यासाठी मनगटावरील नसा
कापून किंवा पॅरासिटॅमॉलचे आख्खे पाकीट संपवून हॉस्पिटलमध्ये येतात. त्यांना
पूर्णपणे जाणीव असते की यामुळे आपण मरणार नाही, पण लोकांचे
लक्ष आपल्याकडे नक्की वेधले जाईल.
संपर्क माध्यमांच्या अभावी दुरावलेल्या नातेवाईकांना आणि
मित्रांना कित्येक वर्षांनी एकत्र आणणाऱ्या संपर्क माध्यमांवरील, सकारात्मक आणि नकारात्मक टिचक्यांचे भयानक
परिणाम टाळण्याचा उपाय गौतम बुद्धांच्या मध्यम मार्गाच्या शिकवणीत सापडतो.
प्रत्येक गोष्टीत समतोल हवा असं विपश्यना शिकवते. संपर्क
माध्यमे ही आपल्याला जवळ आणण्यासाठी अस्तित्वात आली आहेत, पण
ती कशी, कधी आणि किती वापरायची आणि त्यांच्या किती आहारी
जायचं हे ज्याचं त्याने ठरवायचं. अन्यथा त्या एका छोट्या ‘टिचकी की किमत’ मोठे
मानसिक आजार ठरू शकते.
- रवी दाते, मॅंचेस्टर, यु. के.
मस्त 👍 (ही घे तिचकी 😂😂)
ReplyDelete