रवी – ‘प्रेम आणि पुणे’
कुमार जावडेकर
पुण्यात
मी पूर्वी मुक्कामाला कधी आलो नव्हतो. तिथली कुशल ही एकच भानगड माझ्या महितीतली.
तोही खरं तर गुजराथी. म्हणजे मूळचा पुणेकर नाहीच. अर्थात, जन्मापासून पुण्यात
असल्यामुळे तो अस्सल पुणेकरासारखाच वागतो. हे माझ्या पुण्यात आल्यावर लक्षात आलं.
अलिप्तता हा पुण्याचा स्थायीभाव आहे. (काय पुणेरी वाक्य आहे!)
सुदैवानं
मला राहायला घर लगेच मिळालं. घरमालक मुंबईतला आणि माझ्या वडिलांच्या ओळखीचा
असल्यामुळे त्यात कुठलीही ‘बनवाबनवी’ झाली नाही. उलट ते घर (म्हणजे फ्लॅट)
ऑफिसच्याजवळच, म्हणजे बाईकवरून पंधरा मिनिटांत, पोचण्यासारखं निघालं.
आणि
हो! मी काही दिवसांतच पी.एम.टी.चा नाद सोडून एक सेकंड हँड बाईक घेतली. बाईक घेणं
हा पुणेकर होण्यातला पहिला टप्पा आहे - खरं तर ती पहिली अट आहे - याची शिकवणी मला
सुरुवातीलाच मिळाली होती. दोन प्रकारे. ऑफिसमध्ये पहिल्या दिवशी मी रिक्षानं गेलो
होतो. पण परत निघताना सहकाऱ्यांना ‘शिवाजीनगरहून कोथरूडला कुठली बस जाते?’ असा
प्रश्न विचारून मी त्यांचं मुबलक मनोरंजन केलं होतं. ‘म्हणजे तू बसने जाणार?’, ‘ब...र’, ‘सही!’,
‘एक नंबर’ अशी उत्तरं मिळाली! यातला ‘एक नंबर’ हा बसचा नव्हता हा प्रकाश पडेपर्यंत
मी त्या अंधाऱ्या बस स्टॉपवर पोहोचलो होतो! बरं, वर दोन बसेस
घेऊन ते अंतर काटायला मला एक तास लागला होता! लागलीच, वडिलांकडून पगारातून
परतफेडीच्या बोलीवर उसने पैसे घेऊन, मी एक 'बजाज कॅलिबर' विकत घेतली.
नोकरी
लागल्यामुळे आपलं आयुष्य आता सुखाचं होईल ही भाबडी अपेक्षा आणि अमाप कुतूहल सोबत
घेऊन मी के अँड एम या आमच्या आंतरराष्ट्रीय कंपनीच्या पुणे शाखेत सेल्स आणि
टेन्डरिंग विभागात ट्रेनी इंजीनियर म्हणून अशा रीतीनं दाखल झालो. आमच्या
विभागाशिवाय तिथे प्रोजेक्ट्स, इंजिनिअरिंग, साइट सर्विसेस आणि कमर्शियल
(फायनॅन्स) अशा वेगवेगळ्या विभागांची मंडळी असायची. पण आपलं मुख्य काम प्रत्येक
डिपार्टमेंटमधल्या वरिष्ठांचे आदेश पाळणं, त्यांच्यासाठी झेरॉक्स करणं, रात्री
उशिरापर्यंत कुठलीशी पत्रं लिहिणं / ती अनेकदा दुरुस्त करून घेणं, ड्रॉइंग्ज
तपासणं / सुधारणं, माहिती एक्सेलमध्ये
भरणं, प्रेझेंटेशन्स तयार करणं, असं असणार आहे आणि ‘यातूनच खरं शिकायला मिळतं’ हा
उपदेश मिळत राहणार आहे हे माझ्या लगेच लक्षात आलं. त्या व्यतिरिक्त माझ्या
डिपार्टमेंटमध्ये आलेल्या टेंडर्सची कामं होतीच. त्यांत तर इतर तिघे त्यांची कामं
माझ्यावर ढकलायचे. शिवाय, आम्हां चौघांमध्ये असलेले दोन फोन्स मलाच घ्यायला
लागायचे. फोन उचलल्यावर त्यावर हात ठेवून सहकाऱ्याला तो ‘आहे की नाहीये’ हे
विचारून बहुतेक वेळा ‘ते बाहेर गेलेत’ किंवा ‘हो साहेब, तुमच्याच टेंडर संबंधी
असलेल्या मीटिंगमध्ये आहेत’, असे निरोप द्यायला लागायचे. अर्थात तेही गडबडीतच
असायचे कुठल्यातरी.
अर्थात,
हे सगळे प्रसंग एकत्रितरीत्या क्षुल्लक वाटवायला लावू शकेल असा एक एक अनुभव देणारा
एक महात्मा, व्हिक्टर गांधी या नावानं, आमच्या राशीला आलेला होता. तसा प्रत्येक
विभागाचा एक गटप्रमुख होता. पण त्या सगळ्यांच्या वर असलेला महाभाग म्हणजे
व्हिक्टर! त्याचा आवाज (म्हणजे आरडाओरडा) रोज कानावर पडायचा.
अखेर
एकदा मला व्हिक्टरनं त्याच्या केबिन मध्ये पाचारण केलं.
“गुड मॉर्निंग सर!” मी दार ठोठावून किलकिलं उघडत
भीत-भीत म्हटलं.
“कम इन अँड डोन्ट कॉल मी सर.” त्यानं माझं स्वागत
केलं.
“ओके सर! आय मीन सॉरी सर.”
“आय सेड डोन्ट कॉल मी सर!” हे सांगणं बाहेरच्या पाचही
विभागांतल्या उपस्थित सदस्यांना ऐकू जाईल अशा आवाजात होतं. नंतर मला इतर
सहकाऱ्यांकडून कळलं की त्याला ‘मिस्टर गांधी’, किंवा ‘गांधीसाहेब’ म्हणायचं. मात्र
चुकूनही कुणी ‘गांधीजी’ म्हटलं तर तो त्याला ‘चले जाव!’ म्हणतो अशीही उपयुक्त
माहिती मिळाली.
“रवी, चिंचवडला या ‘पदमजी पेपर मिल्स’मध्ये जाऊन आजच्या आज ड्रॉइंग्ज तपासून
मंजूर करून घ्यायची. वास्तविक कराराप्रमाणे आपले वीस टक्के पैसे ती त्यांच्याकडे
पोचल्यावर मिळणार होते. पण ते ती पूर्ण तपासल्याशिवाय देत नाहीयेत. नीट कळलं काय
करायचंय ते? काम फत्ते करूनच इथे परत यायचं.”
मी
बाहेर आलो. इंजिनिअरिंग विभागात जाऊन ती ड्रॉइंग्ज कुठे आहेत ते समजून घेतलं. ‘पदमजी’च्या
किडमिडे नावाच्या इंजीनियरला फोन करून मी येत असल्याचं सांगितलं. तीन छापील प्रती (एक
परत शिक्के मारून परत आणण्यासाठी) आणि दोन सीडया घेऊन बाइकवर टांग मारली. साडे
अकरा झाले होते. तेवढ्यात लक्षात आलं मी पोच मिळवण्यासाठी एक पत्र, आणि त्याची एक
झेरॉक्स घ्यायला हवी होती. पुन: आत आलो, ते घेतलं, कस्टमरच्या इंजीनियरला पुन: फोन
केला आणि निघालो. आता अकरा पन्नास झाले होते. त्यानं साडेबाराला पोचायला सांगितलं.
मी
बारा वाजून बत्तीस मिनिटांनी पोचलो, तेव्हा तो जेवायला गेल्याचं कळलं! सुदैवानं जवळच
एक कामचलाऊ उपाहारगृह होतं. मीही क्षुधा-शांती करून घेतली.
किडकिडीत,
गोऱ्या-गोमट्या टकलू किडमिडेसाहेबांनी पुढचे तीन तास सगळी ड्रॉइंग्ज कशी चुकीची
आहेत हे अत्यंत अनुनासिक आवाजात, उसासे सोडत, डोळ्यांवरचा चष्मा नाकावर आणत, मग
पुन: डोळ्यांवर नेत, ‘अरे अरे अरे’ असं उच्चारून एकीकडे प्रत्येक कागदावर लाल
रंगाने फुली-गोळा खेळत मला हैराण केलं.
“कोण तुम्ही? विजिटिंग कार्ड नाही का?” या वाक्यानं
आमच्या मुलाखतीची सुरुवात झाली. याचा अर्थ मी ट्रेनी आहे हे त्यांनी ओळखलं होतं.
“गांधीजींनी वैयक्तिक सत्याग्रहासाठी आज तुमची निवड केलेली दिसतेय.” आमच्या अख्ख्या भेटीत ते एवढं एकदाच हसले. ते पण ओठांनी नाहीच, फक्त
नाकपुड्याच फुरफुरल्या त्यांच्या हसताना.
असा
माझा प्रथमदर्शनी तेजोभंग(!) करून झाल्यावर त्यांनी कुठलं तरी शल्य मनाला बोचत
असल्यासारखा चेहेरा केला आणि आमच्या ड्रॉइंग्जमधल्या चुका शोधण्यात आपलं कौशल्य
पणाला लावलं.
“हे पाहा! इथे लांबी-रुंदी कोण दर्शवणार?”
“खाली प्रमाण दिलंय साहेब. आपण पट्टी घेऊन मोजू शकतो. आणि आम्ही पुढच्या
सबमिशनमध्ये नक्की दाखवू साहेब!”
“आणि हे बघा! हे इथे तुम्ही जे काही आकडे मांडले आहेत, ते कसे आलेत ते
आम्ही गणितं करून सिद्ध करायचं का?”
“साहेब ते टेंडरच्या वेळेलाच तुम्ही द्यायला सांगितलं होतं.” माझी लोणकढी थाप पचून गेली हे त्यांच्या पुढच्या विधानावरून माझ्या
लक्षात आलं.
“मग ते जोडा की इथे.”
“हो साहेब!”
“वास्तविक इतक्या त्रुटी असूनही मी तपासतोय हे सगळं. दुसरा कुणी असता तर
सरळ परतच पाठवली असती ‘रिजेक्टेड’ चा शिक्का मारून.”
जवळजवळ
पाच वाजायला आले होते.
“खरंय साहेब. तुम्ही इतका अमूल्य वेळ प्रत्येक गोष्ट बारकाईनं तपासण्यात
खर्च केलाय! मला खूप शिकायला मिळालं आज. मी सगळं तुम्ही मार्गदर्शन केल्याप्रमाणे
बदलून घेईन आणि मगच फॅक्टरीला पाठवेन.”
आता
निर्णयाची वेळ होती. किडमिडेसाहेबांनी सुदैवानं ‘अप्रूव्ह्ड सब्जेक्ट टू कॉमेंट्स’
असा शिक्का मारला. ते ज्या ज्या लाल खुणा अथवा नोंदी करत होते, त्या मी माझ्या
प्रतीवरही केल्या होत्या. त्यामुळे त्यांनी तोच शिक्का दोन ठिकाणी मारला आणि एक
प्रत घेऊन मी आनंदानं परत निघालो.
गेटबाहेर
पडताच व्हिक्टरला फोन लावला.
“गांधीसाब, अप्रूव्हल मिळालं!”
त्याच्या
पुढच्या वाक्यानं माझा सगळा आनंद मावळला...
“पैसे मिळाले?”
मी
काही बोलू शकलो नाही. ‘तुम्ही कुठे सांगितलं होतं’ वगैरे विचारायची किंवा ‘माझं हे
काम नाहीये’ वगैरे सांगायची हिम्मत नव्हती.
“कसला रे बिझनेसमन तू? एवढी साधी ...” त्यानं आणखी
काही बोलायची गरज नव्हती.
“सॉरी गांधीसाहेब. परत जातो आत.” असं म्हणून मी फोन
ठेवला.
नशिबानं
‘पदमजी’च्या फायनान्स विभागातला पारीख नावाचा सद्गृहस्थ अजून घरी गेला नव्हता.
त्याच्याकडे आमचा इनव्हॉइससुद्धा होता. मी त्याला विनंती केली,
“आज द्या ना चेक साहेब.”
“आज? उद्या या. साहेब मीटिंगमध्ये आहेत.”
“माझी नोकरी जाईल साहेब.” मी कळवळून म्हणालो.
वास्तविक
अशा कारणावरून नोकरी जात नाही, पण हे एक फक्त वाक्य नसून तो एक शिष्टाचार आहे आणि
त्याचं उत्तर ‘ठीक आहे, आम्ही देऊ तुला नोकरी’ असं मिळणार असतं, हे मी पुढे शिकणार
होतो. मात्र या खेपेला बहुधा माझी अवस्था बघून त्याला माझी दया आली.
“बसा जरा. बघतो.”
साडेसातनंतर
मला चेक मिळाला! मी व्हिक्टरला फोन न करता सरळ घरी निघालो. बरोब्बर आठ वाजता,
वाटेतच, त्याचा फोन आला.
“मिळाला चेक?”
“हो.”
“उद्या भेटू.”
दुसऱ्या
दिवशी ऑफिसमध्ये शिरतानाच व्हिक्टरचा आवाज माझ्या कानी पडला,
“शाब्बास रवी! शिकव जरा तुझ्या आजूबाजूच्या तुझ्या वरिष्ठांना, व्यवहारज्ञान
काय असतं ते. एकाची लायकी नाही अजून असं काम करायची.”
मी
आपला सगळ्यांच्या नजरा चुकवत अपराध्यासारखा आमच्या कमर्शियल डिपार्टमेंटमध्ये
गेलो. तिथे तो चेक त्यांच्या स्वाधीन केला आणि माझ्या जागेवर येऊन बसलो.
यानंतर
व्हिक्टरचा मी आवडता झालो. ‘तू खूप हुशार आहेस, तुला व्यापार म्हणजे काय याची जाण
आहे’ असं म्हणायला लागला. अर्थात, हा मधुचंद्र एखाद-दोन आठवडेच टिकला. नंतर आमच्या
डिपार्टमेंटमधल्या दुसऱ्या एकाचं तो गुणगान गायला लागला आणि पुन: मी मर्जीतून
उतरलो. तेही फार काळ टिकलं नाही. तेव्हा माझ्या लक्षात आलं की तो आलटून पालटून एकाचं
कौतुक करायचा किंवा दुसऱ्याला पळता भुई थोडी करायचा. थोडक्यात ‘फोडा आणि राज्य
करा’ हे ब्रिटिशांचं धोरण हे गांधीजी आमच्या बाबतीत राबवत होते! सतत आम्हां
सहकाऱ्यांमध्ये चुरस असायची. दिवसा आम्ही ‘सेल्सच्या लोकांनी कस्टमरकडे असलं
पाहिजे’ या व्हिक्टरच्या तत्त्वानुसार बाहेर असायचो आणि परत येऊन मग रात्री उशिरापर्यंत
ऑफिसमध्ये टेंडरची कामं करायचो. बरं, कुठे गेलो होतो याची इत्थंभूत माहिती
व्हिक्टरला लागायची, मिनिटांच्या हिशोबानं. आम्हांला तर भीती वाटायची तो कस्टमरला
फोन करून विचारत असेल आम्ही कितीला आलो, गेलो, काय बोललो वगैरे. मोबाइलवर तो
जेव्हा संपर्क साधायचा तेव्हाही त्याला बहुधा मागच्या वाहनांच्या आवाजावरून कळायचं
आम्ही कुठे आहोत ते. असे भयंकर दहशतीचे दिवस होते. सुटी असली तरी शनिवारी ऑफिसला
आलं पाहिजे असा दंडक होता त्याचा. स्वत:ही येऊन बसायचाच. ‘पुण्यातल्या अनेक
कारखान्यांना गुरुवारी रजा असते, त्यामुळे आपण त्यांच्या कामाच्या दिवशी हजर
असायला हवं’ हे धोरण असायचं त्याचं. हे सगळं कमी म्हणून रविवारीही फोन यायचाच उगाच
‘सॉरी टू डिस्टर्ब’ असा मानभावीपणा करत.
व्हिक्टर
दर तीन-चार महिन्यांनी आमच्या कंपनीची पार्टी ठेवायचा. तिथे मात्र नुसती धमाल
करायचो सगळे. व्हिक्टरचं निराळं रूप बघायला मिळायचं. भरपूर दारू प्यायचा. नाचायचा.
गायचा. थोडक्यात, तिथेही आपल्या तालावर सगळ्यांना नाचवायचा! पण आता अगदी दिलखुलास,
मनमोकळं असायचं सगळं! प्रत्येकाशी येऊन बोलायचा. घरच्यांची चौकशी करायचा. हवं नको
ते विचारायचा. सगळ्या पुणेकरांमध्ये मला ‘मुंबई का किंग कौन’ असं म्हणून ‘सपनों
में मिलती है’ वर डान्स करायला लावायचा! त्याचं शिक्षण गुजराथेतलं असलं तरी
नोकरीची पहिली काही वर्षं त्यानं आमच्या मुंबई ऑफिसमध्ये घालवली होती. त्यामुळे
थोड्या वेळानं ‘ये है बंबई मेरी जान’ म्हणून गळाही काढायचा!
दुसऱ्या
दिवशी आठला ऑफिसात व्हिक्टर हजर व्हायचा. आदल्या दिवसाची पार्टी आम्ही पहिल्या
झटक्यातच विसरून जायचो त्याच्या. ‘टाटा मोटर्सची नवी इंक्वायरी कधी येणार आहे?’
किंवा ‘बजाज ऑटोमध्ये कधी गेला होतात शेवटचे?’ ‘अल्फा
लावाल बंद पडली का?’
वगैरे प्रश्न आले की आम्हांला पॅरोल संपून पुन: कारावास सुरू झालाय हे
लक्षात यायचं.
२००४-०५ च्या सुमाराला
भारतात अजून
तेजीचं वातावरण आलं.
भराभर नवे प्रकल्प आले आणि
आमचं काम वाढतच गेलं. व्हिक्टरचं एक मात्र
चांगलं होतं. आमची – म्हणजे विशेषत: जे त्याच्या, त्यानं कबूल केलं नाही तरी,
मर्जीतले होतो त्यांची - पगारवाढ, वरखर्च यात तो कधी चिंगूसगिरी करत नसे. कधी कधी
तोच सांगायचा – ‘रात्री जा तुम्ही तिघे जेवायला आणि टाका कंपनीच्या खात्यात’ किंवा
‘दाखव एक चाकण व्हिजिट’.
या
सगळ्या उद्योगांत माझं मुंबईला घरी जाणं आधीच कमी झालं होतं ते आता अजूनच कमी
व्हायला लागलं. दिशाशी फोनवर मधेमधे बोलणं व्हायचं तेही आता नैमित्तिक झालं.
त्यातच
एकदा व्हिक्टरनं उगाच – नेहेमीप्रमाणे
सगळ्यांना ऐकू जाईल अशा आवाजात - विचारलं मला,
“काय रवी, लग्न कधी करणार?”
“लवकरच.” त्याच्या मनाचा थांग नसल्यामुळे मी
थातुरमातुर उत्तरलो. त्याची मुलगी अजून लग्नाची नाहीये त्यामुळे आपण सुरक्षित आहोत
याची जाणीव होती.
“काय सांगतोस? कसं शक्य आहे ते? लग्न झालंय की तुझं. सांग बरं तुझ्या
बायकोचं नाव.”
“के अँड एम?” सगळे हसले. आमच्या बाबतीत खरंच होतं ते.
“बरोबर. पहिल्या बायकोशी प्रतारणा करायची नाही कधी.”
व्हिक्टर
फक्त हे म्हणाला नाही, तर पुढचे काही दिवस त्यानं हे जणू सिद्ध करून दाखवायचा चंगच
बांधला! तशी संधीही त्याला मिळाली लवकरच.
मला
दिशाचा फोन आला अचानक एका दिवशी.
“हाय रवी! पुढच्या आठवड्यात तीन दिवस मी पुण्यात येतेय. आहेस ना मोकळा?”
“तीन दिवस? लग्न आहे की काय?” मी चेष्टा केली.
“हो!”
क्षणभर
मी गडबडलो पण लगेच हसून म्हणालो,
“अरे वा! अभिनंदन! कुणाशी?”
“आहे एक हीरो.”
मी
तरीही धीर सोडला नाही.
“मस्त. मग काय अक्षता टाकायला कुणी मिळालं नाही म्हणून मी मोकळा पाहिजे का?
की पूजा सांगायला?”
“नाही, भटकायला.”
“म्हणजे?”
“आता आलास ना सरळ. माझ्या चुलत बहिणीचं लग्न आहे आणि मी तीन दिवस काय करणार
आहे मला कळत नाहीये. ए, टाक ना सुट्टी ऑफिसमधून! ”
ती
मंगळवारी दुपारी येणार होती आणि शुक्रवारपर्यंत असणार होती पुण्यात. पण तीन दिवस
सोडा, एक दिवस रजा घेणं फार दुर्लभ होतं आमच्यासाठी.
मी
व्हिक्टरचं दार ठोठावलं.
“गांधीसाहेब, पुढच्या आठवड्यात दोन दिवस रजा मिळेल का प्लीज?” माझ्या तोंडून ‘तीन’च्या ऐवजी ‘दोन’च बाहेर पडले.
“कुठे इंटरव्ह्युला चाललायस?”
“इंटरव्ह्यु नाही, लग्नाला जायचंय.”
“कधी आहे लग्न?”
“गुरुवारी.”
“अरे रवी! खरं तर मीच तुला सांगणार होतो. पुढच्या आठवड्यात गुरुवारी आपले
व्हाईस प्रेसिडेंट सी. के. दास येतायत पुण्यात. आपला बिझनेस प्लान मी बनवतोय ना,
त्याच्या निमित्तानं. मी ठरवलं होतं तू जर यावेळी मला मदत केलीस तर आपण दोघे मिळून
त्यांना तो प्रेझेंट करू शकू. तुलाही चांगली छाप पाडता येईल त्यांच्यावर. तुझ्या
प्रगतीसाठी ते आवश्यक आहे.”
“थॅंक यू गांधी साहेब, मला नक्कीच आवडलं असतं. पण या लग्नाला मी जर गेलो
नाही तर.. ”
“लग्न तुझं आहे का?”
“नाही.”
आमचा
विषय तिथेच संपला! मी दिशाला फोन करून सांगितलं की मला रजा मिळत नाहीये पण रोज
संध्याकाळी मी नक्की तिला भेटेन. आमच्या व्ही. पी. चं येणं, प्रेझेंटेशन आणि मला
मिळत असलेली संधी वगैरे कारणंही दिली.
दुसऱ्या
दिवसापासून मी बिझनेस प्लानच्या कामाला लागलो. तो करणं – तोही एका आठवड्यात –
म्हणजे खायचं काम नव्हतं. प्रत्येक कस्टमरला त्याच्याकडे जाऊन (व्हिक्टरच्या मते
फोनवर पूर्ण माहिती मिळेलच असं नाही) पुढच्या वर्षीच्या त्याच्या अर्थसंकल्पातल्या
प्रकल्पांबद्दल विचारायचं. मग त्यांची यादी करून ‘अ’, ‘ब’ असं वर्गीकरण करायचं.
आम्हांला किती धंदा त्यातून मिळेल, किती नफा होईल याची कोष्टकं तयार करायची.
त्यांत आपले स्पर्धक कोण असतील, त्यांच्यावर मात करण्यासाठी आपली काय धोरणं असतील
हेही लिहायला लागायचं. रोज सकाळी लवकर बाहेर पडून मी पिंपरी चिंचवड, चाकण, अगदी रांजणगाव
सारख्या गावांपर्यंत धडक मारायचो आणि दुपारी ऑफिसमध्ये परत येऊन ही सगळी माहिती
आमच्या कम्प्युटरमध्ये टंकवायचो.
पहिल्या
आठवड्यातच आपण जास्त काम केलं तर दिशा येईल त्या आठवड्यात जरा वेळ काढता येईल या
माझ्या भाबड्या समजुतीला व्हिक्टरनं सुरुंग लावले. रोज संध्याकाळी तो मला घेऊन
बसायचा. ‘अ’ वर्गातले प्रकल्प ‘ब’ वर्गात टाकायचा. ‘तुझं मुळीच लक्ष नाहीये
कामात’, ‘दास म्हणजे कोण तुला माहिती नाही, ते कचऱ्याच्या टोपलीत टाकतील हे असं
त्यांना दिसलं तर’, ‘अजून माहिती काढता आली पाहिजे’ म्हणून मला दुप्पट काम करायला
लावायचा. पुढच्या आठवड्यात दिशा आल्यावर रोज संध्याकाळी मी तिला फोन करून
सांगायचो, ‘सातपर्यंत आवरतो आणि येतो’. मग त्याचे आठ व्हायचे. मग नऊ. मग दहा.
शेवटी ‘उद्या नक्की’. दिशाचं मास्टर्स आता संपत आलं होतं. वास्तविक तिच्या पुढच्या
योजनांविषयी खलबतं करणं अधिक गरजेचं होतं. इकडे मात्र आमची प्रेझेंटेशनमधली कोणती
अक्षरं ठळकवायची, कुठली वाकवायची, त्यांना रंग कुठला द्यायचा वगैरे अतिमहत्वाच्या
विषयांवर गहन चर्चा (म्हणजे व्हिक्टरनं बोलणं आणि मी ऐकणं) रंगलेली असायची.
अखेर
तो गुरुवार उजाडला. आमचं प्रेझेंटेशन दाससाहेबांना खूप आवडलं. त्यांनी एक-दोन बदल
सुचवले पण माझं कौतुकही केलं. व्हिक्टरही ‘याचं सगळं श्रेय रवीलाच जातं’ असं
म्हणाला! सुमारे सहा वाजता दाससाहेब उठले आणि
म्हणाले,
“चला, आपण असं करूया का? मी ‘ताज ब्ल्यु डायमंड’ मध्ये उतरलो आहे. तिथेच
जेवायला भेटूया सात वाजता.”
“जरूर.” व्हिक्टरनं मान तुकवली लगेच त्याच्या
साहेबासमोर.
“दास साहेब, मला एका लग्नाला जायचंय आज. प्लीज मी नाही आलं तर चालेल का?” मी कसाबसा धीर गोळा केला.
“अरे खाजगी कारण असलं तर आधीच सांगायचं! जा की.”
आता
यात टोमणा होता की नव्हता याचा विचार न करता मी व्हिक्टरची नजर चुकवली आणि काढता
पाय घेतला.
घरी
येऊन आंघोळ करून, कपडे बदलून जेव्हा मी ‘प्रेसिडेंट हॉटेल’मध्ये त्या लग्नाच्या
स्वागत समारंभाला पोचलो तेव्हा साडेसात वाजले होते. ‘कुठल्याही परिस्थितीत आज आपण
भेटणार आहोत’ असा दिशाचा मला सकाळीच निरोप (आदेश?) आला होता. आत्ताही मी आधी
ऑफिसमधून आणि मग घरून निघताना तिला फोन करून मी येत असल्याचं सांगितलं होतं.
त्यामुळे, पंजाबी लग्नसोहळ्यात एखादी मुलगी किती कमाल नटू शकते याचं मूर्तिमंत
उदाहरण झालेली दिशा हॉटेलच्या दारातच मला भेटली. मरून रंगाच्या रेशमी साडीत दिसत
मात्र अप्रतिम होती. तिचंच लग्न आहे की काय असा येणाऱ्या-जाणाऱ्याचा गैरसमज नक्की
झाला असेल.
“हाय! भेटलो अखेर एकदाचे.” मी
तिला बघताच म्हटलं.
“हम्म.” साहजिकच दिशा घुश्श्यात होती. मी बाइक
लावायला लागलो तेवढ्यात ती पुढे म्हणाली,
“आपण जर आत गेलो ना तर तिथेच अडकू. तुझ्या पुण्यात काही बरं खायला मिळतं का
दुसरीकडे कुठे?”
रस्त्यावरच्या
लोकांचा आता, ही वधू आपलं लग्न सोडून दुसऱ्याच्या बाईकवरून पळून जातेय’ असा दुसरा
गैरसमज होणार होता. त्याकडे फार लक्ष न देता,
“बस.” असं
म्हणून मी तिला बाईकवर घेऊन निघालो.
पुण्यातल्या
अनेक मोक्याच्या जागा आता मला माहिती होत्या. गेल्या कित्येक वर्षांत मनातल्या
मनात असं दिशाला घेऊन त्या ठिकाणी मी गेलोही होतो.
“आधी तुला फक्कड चहा पाजतो.” असं म्हणत मी डेक्कनला ‘तुलसी’कडे
गाडी वळवली.
अजून
जरी ती घुम्यानेच वागत असली तरी, “इथे ‘कटिंग’ला ‘अमृततुल्य’ म्हणतात वाटतं,” ही चापटी
त्या चपट्या कपातला चहा पिताना तिनं मला मारून घेतली.
“पुण्यात कशाला काय म्हणतील हे सांगता येत नाही. आत्ता आपण त्या छोट्या ‘गरवारे
फ्लाय-ओवर’ वरून आलो ना, त्याला ‘गरवारे टेंगुळ’ असंही म्हणतात.” मी विनोद करून दिशाला हसवायचा प्रयत्न केला. तिनं न हसता,
“आत्ता येताना कुठे ‘फ्लाय-ओवर’ लागला आपल्याला?” असा
मलाच प्रतिप्रश्न केला!
खरंच
आहे, ‘गरवारे उड्डाणपूल’ हे शब्द म्हणून होईपर्यंत तो पूल पार होतो. त्यामुळे मी तिचं
लक्ष नव्हतं हे निदर्शनाला आणून देण्यापेक्षा तो पूलच लक्षात न येण्यासारखा आहे हे
स्वत:ला पटवलं. तिथे लक्ष देण्यासारखं असं चितळ्यांचं दुकान आहे हे सांगायच्या
भानगडीत पडलो नाही. नेमका तिथे घेऊन जायचो आणि ते बंद झालेलं असायचं.
अशा
विचारांत आणि दिशा सोबत असल्याच्या आनंदात मी त्याच पुलावरून पुन्हा वळसा घालून
‘गुड लक’ चौक ओलांडला आणि ‘वैशाली’ गाठलं. तिला आता तरी तो पूल दिसला असावा. पण
त्याची शहानिशा करण्यापेक्षा अधिक महत्वाचे बरेच विषय होते बोलायचे अजून. तिथल्या
अनेक पुणेकर कॉलेज-कुमार-कुमारींच्या नजरा चुकवत (किंवा खरं तर आमच्याकडे वेधत)
आम्ही मागच्या गार्डनमध्ये एक कोपऱ्यातलं टेबल पटकावलं.
“भेटलो अखेर एकदाचे.” मी तिला पुन्हा म्हटलं.
“हे सांगून झालंय तुझं मघाशीच.” दिशा म्हणाली आणि
आजूबाजूला बघत म्हणाली,
“पुण्यात गर्ल फ्रेंडला इथे घेऊन येतात सगळे?”
“पुण्यातलं ‘चिरतरुण’ रेस्टॉरंट आहे हे. पण, मला काय माहिती? मला कुठे आहे
गर्ल फ्रेंड?” मी तिला खिजवलं.
“कशी असणार? त्यासाठी वेळ मिळाला पाहिजे ना तुला.”
“हे बघ दिशा. मला मान्य आहे मला खूप काम असतं. मात्र त्यामुळेच मी ऑफिसमध्ये
एक चांगलं नाव कमावलंय. या आठवड्यातही आमच्या व्ही. पी.च्या समोर प्रेझेंटेशन
करण्यासाठी माझ्या बॉसनं मलाच निवडलं. याचा सरळ अर्थ असा आहे की मला प्रमोशन लवकर
मिळू शकतं. मुंबईला वरच्या जागेवरही...”
“तू बदलला आहेस खूप!”
कुठल्याही
मुलीला आपल्या जोडीदाराबद्दल हे विधान करण्यासाठी आपण किती वर्षं एकत्र घालवली
आहेत, आपली वयं काय आहेत वगैरे संदर्भ लागत नाहीत हा धडा मला आज प्रथमच मिळणार
होता. मला यात एवढंच समाधान मिळालं की ती माझा जोडीदार म्हणून विचार करते आहे.
“प्रत्येकाला बदलायला लागतं दिशा. कॉलेजचे दिवस संपले आता. माझे पूर्वीच,
आणि तुझेही हल्लीच.”
यावरून
आपण आपल्या भवितव्याविषयी काही बोलूया असं मला सुचवायचं होतं. तिला ते कळलं असावं
पण तिनं मुद्दा सोडला नाही.
“तू कायमच असा कामात गर्क राहिलास तर कसं होणार?”
“मग काय करू? तुझ्यासारखं उच्चशिक्षित होऊन प्राध्यापक व्हायची स्वप्नं बघू
का?” मी जरा छद्मीपणेच विचारलं.
“हे बघ रवी, मला पैसा आणि लाइफ-स्टाइल दोन्ही महत्त्वाचे वाटतात. एक सोडलं
तर दुसरं मिळत नाही.”
“मी तुला एवढंच सांगेन की जरी आपण गेली काही वर्षं भेटलो नसलो तरी माझ्या
मनात सतत तू होतीस. तुझं पोस्ट ग्रॅजुएशन पूर्ण व्हायची मी वाट बघत होतो. ते आता
झालंय.”
“कुशल इंग्लंडला गेला. तुला माहिती आहे?” दिशानं
संभाषणाचा रोख बदलला.
“हो! नसायला काय झालं?”
“पण तुला हे माहिती नसेल की माझ्यामुळे तो गेला तिथे.”
“तुझ्यामुळे?” मला हसूच फुटलं.
“माझ्यापेक्षा माझ्या वडिलांमुळे.” ती गंभीरच होती.
दिशानं
कुशल तिच्या घरी कसा आला होता, तिच्या वडिलांना कसा भेटला होता, त्यांनी दोघांनी
त्याला काय काय सल्ले दिले होते, ही सगळी कथा मला सांगितली.
एकीकडे
मी विचार करत होतो, की ती मला हे का सांगतेय?
हळू
हळू मला हे कळत गेलं की तिचा काही तरी हेतू होता हे सांगण्यात. ती सुचवत होती मला
बरंच काही. तिच्या इच्छा. अपेक्षा. आणि एक सत्य - त्या पूर्ण करण्यासाठी तिला कुशल
नको होता.
तिच्यासमोर
मी होतो.
जणू
कॉलेजमधल्या सचिनला आणण्याच्या स्पर्धेसारखी हेदेखील एक स्पर्धा होती. पण त्यात मी
जिंकायला हवं असं दिशाला वाटत होतं.
मलाही
तेच हवं होतं. नाही का? मी मलाच विचारलं. आमच्या ऑफिसमध्येही मुली होत्या. त्या
चांगल्या ओळखीच्याही झाल्या होत्या. पण दिशाचं स्थान अबाधित होतं मनात.
“मला कळलं तुला काय म्हणायचंय ते. मात्र थोडा वेळ दे मला.” मी तिला म्हटलं, तिच्या नजरेला नजर देत.
दिशा
हसली. आज पहिल्यांदाच.
“दिला.”
पंजा
लढवताना करतात ना तसा तिनं टेबलावर कोपर टेकवून तिचा हात पुढे केला माझ्या दिशेनं.
मी तो अलगद दोन्ही हातांत घेतला. मग तिनंही त्यात दुसरा हात मिळवला. आम्ही पुढची
काही क्षण फक्त न बोलता परस्परांना समजून घेत
एका अनामिक आनंदात घालवले.
“काही गोड पदार्थ ऑर्डर करणार का आता?” बराच वेळ
थांबून वेटरनं शेवटी आमची टर उडवत विचारलं.
दोघेही
हसलो एकमेकांकडे बघून आणि ‘मस्तानी’ आणायला सांगितली त्याला.
“मला आवडली ही जागा.” दिशा म्हणाली.
‘पुणं
आहेच प्रेमात पडण्यासारखं, पण तू ते आता मला सोडायला लावणार आहेस’. मी मनात म्हणालो.
(क्रमश:)
- कुमार जावडेकर
मूळ कादंबरीचा दुवा -
भारत:
No comments:
Post a Comment
प्रतिसाद