Saturday, 24 January 2026

३.३ उत्तर दे पण संदेशातुन (प्राची जावडेकर)

उत्तर दे पण संदेशातुन

– प्राची जावडेकर 

इंदिरा संतांची एक नितांत सुंदर कविता "पत्र लिही पण नको पाठवू". पण आजकाल पत्र तर सोडाच, हातानं लिहिणंसुद्धा दुर्मिळ झालंय. संवाद होतो तो मेसेज आणि इमोजीमधून. इंदिरा संतांच्या त्या कवितेवर आधारित ही कविता (इंदिरा संतांची क्षमा मागून):

उत्तर दे पण संदेशातुन 
नको पाठवू बदाम रक्तिम,
रुक्ष कोरड्या जगण्यामध्ये 
कसा साठवू पाऊस रिमझिम?

नको पाठवू इमोजीतले 
लाजाळू चेहरे हासरे,
खुलता हासू ओठांवरती
प्रश्न विचारत बसती सारे.

नको पाठवू लाल मुखवटे,
लटके रुसवे, रागही खोटे
समजुत काढुन मनवायाला
धावत यावे असेच वाटे.

नको पाठवू भिरभिरणारे
ओठांचे ते खट्याळ चंबू,
अशक्य आहे माहित तरीही
मनात वादळ, कसे थांबवू?

अधोमुख तू पाठवतो ते
हिरमुसले पण किती गोजिरे,
कळते सगळी गम्मत तरीही
जगणे होते सुखद साजिरे.

*पाठविशी ते सगळे सगळे 
पहिल्या ओळीमधेच मिळते,
त्या नंतर तू जे जे लिहिशी 
वाचायाचे राहून जाते.....*

– प्राची जावडेकर, मॅंचेस्टर, यु. के. 

*मूळ इंदिरा संतांच्या कवितेतील शेवटचं कडवं तसंच ठेवलंय.







No comments:

Post a Comment

प्रतिसाद

संयोजक

श्रीकांत पट्टलवार, मीरा पट्टलवार, रवी दाते, मुकुल आचार्य, कुमार जावडेकर