Saturday, 24 January 2026

३.२ छोटी सी बात (अनिरुद्ध कापरेकर)

 छोटी सी बात

अनिरुद्ध कापरेकर 

हनुवटीवर हनुवटी घासत…
तू:
“नकोच जाऊ सोडुन मला, 
आणि गेलास ना,
तरी तुझं सगळं प्रेम आधीच
मला देऊन ठेव. 
मग जा,
जा मुला.
कुठेही.”
     मी: 
     “कसं जमणार गं मुली?
     रोज रात्री आकाशभर विखुरलेल्या 
     चांदण्यांवर परत-परत
     प्रेम करणारा मी,
     तुला माहीतेय, 
     कसं ते थांबणार?”
“काळोख करीन हं मी!
सर्व चांदण्या विझवुन टाकीन,
चंद्र पण गेला उडत,
गुडुप अंधार,
काहीच दिसणार नाही तुला,
मग कोणावर 
करशील रे प्रेम?”
     “स्वतःवर…”
“आलास मोठ्ठा!,
नाही चालणार.
आधी मी, 
मग तू, 
मग ते चांदण्या-बिंदण्या, 
जग-बिग.
     “असं कसं?”
“असंच!
तू माझा नाहीस,
चालेल मला,
पण मी तुझी आहे,
असं मला
सतत वाटलं पाहिजे.”
     “अरे, ये क्या बात हुई?”
“छोटी सी बात,
अब मान भी जाओ.”

-अनिरुद्ध कापरेकर, मॅंचेस्टर, यु. के. 

No comments:

Post a Comment

प्रतिसाद

संयोजक

श्रीकांत पट्टलवार, मीरा पट्टलवार, रवी दाते, मुकुल आचार्य, कुमार जावडेकर