Saturday, 24 January 2026

६.१ डिंगूचा कट्टा - नवे गुरुकुल (केतकी जमदग्नी-महाजन)

नवे गुरुकुल - मिले सूर मेरा तुम्हारा

केतकी जमदग्नी-महाजन 


आपले अनुभव मग ते चांगले, वाईट, योग्य, अयोग्य, परिस्थिती अनुरूप, कसलेही असोत आपल्याला ते शहाणे करतात. आपण एक व्यक्ती म्हणून आपल्याला संपन्न करतात. बरेच अंतर पुढे चाललो, की मागे आलेल्या अनुभवांची किंमत आणि त्यातून मिळालेली शिकवण यांचा अर्थ समजतो. असाच एक गोड अनुभव मला माझ्या छोट्या दोस्तांना द्यायचा होता. 'साधना सिंगिग क्लासेस'च्या माध्यमातून बऱ्याच छोट्या दोस्तांशी माझी मैत्री झाली. मुलांना शिकवताना अनेकदा आपण नव्याने शिकत जातो,याचा प्रत्यय गेल्या चार वर्षात मला आला. 

प्रत्यक्षात, सामूहिकरीत्या गाणे शिकण्यातली खरी मजा मला त्यांना अनुभवू द्यायची होती. ऑनलाइन शिक्षणाच्या जमान्यात ऑनलाइनच्या मर्यादा त्यांना जाणवून द्यायच्या होत्या. माझी मुलगी  मीरा लहान असल्याने अनेक गोष्टींवर मर्यादा असतात; पण या वेळी मी मीरा तिला घेऊन माझ्या छोट्या दोस्तांसाठी 'सिंग प्ले अँड स्टे सेशन' प्लॅन केला. आज मी याच अनुभवांबाबद्दल लिहिते आहे.

पूर्वीची शिक्षण पूर्ण होईपर्यंत गुरूंकडे राहण्याची पद्धत (अर्थात गुरुकुल पद्धत) आपण मोठे सगळेच जाणून आहोत पण याची एक अतिशय छोटी झलक त्यांना मिळावी यासाठी सुट्यांमधला एक दिवस मुलांच्या पालकांशी बोलून एक दिवस निश्चित केला. त्यादिवशी दिवसभर आम्ही एकत्र असण्याची तयारी केली. मुलांसाठी वेगळ्या अँक्टिव्हिटीज, गेम्स, त्यातून ग्रुप परफॉर्मन्सचे महत्व, स्टेजवरचे भान,तिथला वावर, गाण्याचे काही अलंकार, तालासोबत एकत्र गाण्याची प्रॅक्टिस असे सगळे नीट आखून घेतले. मुलांना आवडणारा खाऊही केला. सकाळी ठरलेल्या वेळी सगळे आले.

मुलांना बोलते करण्यासाठी गेम्सचा फारच उपयोग झाला. सकाळी १० पासून संध्याकाळी ५ वाजेपर्यंत मुलेही उत्साहाने सगळ्या प्रकारात सहभागी झाली. 

त्या दिवशी थोडक्यात आम्ही काय केले?

सकाळी जमल्यावर एकत्र ओंकार, सा, शुद्ध स्वरांचा रियाज, काही अलंकार म्हणून मग तालासोबत अलंकारांची  प्रॅक्टिस केली, नंतर प्रत्येकाने स्वतःचा असा एक एक अलंकार  तयार केला, प्रत्येकाचे अलंकार आम्ही सगळ्यांनी मिळून म्हणून बघितले. सकाळपासून शांतपणे जे सांगेल तेच करत असलेली मुले काही खेळ खेळल्यावर एकमेकांशी संवाद साधू लागली. मग आम्ही सामूहिक खेळ घेतले, उड्या मारल्या, थोडे चाललो, धावलो आणि जेवणासाठी पोटात जागा केली. मुलांच्या आवडीचा पिझ्झा-पास्ता चा बेत असल्याने त्यांनी ही आवडीने सगळे खाल्ले आणि लगेचच आम्ही आमच्या 'सिंग अँड प्ले' सेशनच्या सेकंड हाफला सुरुवात केली.

काही वेळ शांतपणे शुद्ध स्वरांचा लगाव  झाल्यावर आम्ही काही गाणी एकत्र म्हणून समूह गायनाचा अनुभव घेतला, प्रत्येकाची काही सोलो गाणी म्हणून घेतली. समर असल्याने हवा छान होती मग घराच्या जवळच छोटासा वॉक घ्यायला गेलो. जाताना  तिथे  मुलांच्या दिनक्रम बद्दल एकूणच त्यांच्या आवडीनिवडी बद्दल बोलत होतो. घरी आल्यावर आम्ही आमचा एक ग्रुप फोटो काढला.

घरी जायची वेळ आली. जाताना एक आठवण म्हणून मुलांना आमच्या ग्रुप फोटोची प्रिंट सोबत दिली. या सगळ्यात मीरा सोबत होतीच. मुलांसोबत तीही खेळली, मध्ये मध्ये तिची लुडबुड होतीच. दिवसभरात ओजस दादा आणि मीराची चांगलीच गट्टी जमली होती.

आपण सगळेच लहान असताना उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये आत्या, ताई, मावशी, काकू यांच्याकडे जायचो, राहायचो.  तिथे त्यांच्या शेजारच्या मुलांच्यासोबत धिंगाणा घालताना दिवस कधी संपायचे हे कळायचंच नाही. मग संध्याकाळी ऑफिस झाल्यावर आई-बाबा आपल्याला घ्यायला यायचे. काय काय केले, चिंचा, कैरी, चिरमुरे, बर्फाच्या गोळ्याची रोज दुपारी गल्लीतून सगळे झोपल्यावर जाणारी गाडी, त्यातून आई-बाबांना चुकून खाल्लेला बर्फाचा गोळा, किती अन काय खाल्ले, किती धडपडलो, कुठे लागले, कुणाच्या गच्चीत जाऊन बॉल घेऊन आलो, आसपासच्या लोकांच्या किती शिव्या खाल्ल्या हे सगळे अगणित. त्या सगळ्या आठवणी आपल्या प्रत्येकाचा मनात घर करत आजही ताज्या आहेत, नाही का?

तसंच काही इथे जाणवलं. रात्री मुलांच्या पालकांचे मेसेजेस आले  मुलांनी दिवसभर काय केले ते आनंदाने घरी सांगितले होते  याची पोच पावती मला मिळाली. या छोट्याश्या माझ्या एका प्रयत्नातून मुलांच्यात फार मोठा आमूलाग्र बदल घडेल असे नाही, कारण त्यासाठी वेळही तितकाच लागतो पण आजचा दिवस केतकी मावशी कडे जाऊन काय काय केले या अर्थी एक आठवण रूपाने त्यांच्या कायम स्मरणात राहील, हे नक्की!

'सिंग प्ले अँड स्टे' सेशनचा प्लॅन थोडासा अचानक झाल्याने सर्व मुलांना येणे शक्य झाले नव्हते. पुन्हा नक्कीच अशा पद्धतीच्या एखाद्या दिवसाचे आयोजन पुन्हा करता येईल याची खात्री या दिवसाने दिली. आम्ही एकत्र व्यतित केलेल्या दिवसाचा एक छोटा व्हिडिओ आणि त्याची लिंक खाली देते आहे. तुम्ही नक्की बघा आणि तुमच्या मुलांनाही आवर्जून दाखवा.

- केतकी जमदग्नी-महाजन, मँचेस्टर, यु. के.

https://youtu.be/zwU6SoIpDPA?si=X-OQZiz7VR-b8keB

(व्हिडिओमध्येही थोडक्यात सगळी माहिती दिलेली आहे.)


13 comments:

  1. Best achievement! New experience, exciting world! Congrates & best wishes.

    ReplyDelete
  2. मुले देशात असोत वा परदेशात .. एक मायेची उत्साहाची मार्गदर्शक साथ मिळाली की बालपण रम्य होतं .. आणि सुरक्षितही .. अनेक उत्तम शुभेच्छा ! - स्मिता, मुंबई

    ReplyDelete
  3. छान उपक्र्म .best wishes for future

    ReplyDelete
  4. वाहवा केतकी. खूप छान उपक्रम.

    साधना सिंगिंग क्लासेस मधे मोठ्यानाही संगीत साधनेबद्दल याच पध्दतीने मामार्गदर्शन करायला हरकत नाही. त्याची पण आज खूप आवश्यकता आहे.

    ReplyDelete
  5. अतिशय छान उपक्रम आहे केतकी तू करीत असलेल्या या उपक्रमास अनेक आशीर्वाद व शुभेच्छा 👏🙏

    ReplyDelete
  6. खूप छांन उपक्रम....केतकी तुझं खूप कौतुक🥰

    ReplyDelete
  7. केतकी... छान उपक्रम.... चिमणा बांधतो बंगला या बालनाट्य संहितेचे वाचन करता येते का पहा... तुझे पहिले दिग्दर्शन....

    ReplyDelete
    Replies
    1. आठवण आहे ही अजूनही 🤗

      Delete
  8. ग्रेट! नवीन उपक्रमांसाठी खूप शुभेच्छा, keep it up

    ReplyDelete
  9. खूप स्तुत्य उपक्रम केतकी…. तुझ्या कलेचा पुरेपूर उपयोग होतो आहे याचा आनंद आहे..खूप खूप शुभेच्छा!!!

    ReplyDelete
  10. सुंदर उपक्रम आणि लेख!

    ReplyDelete
  11. congratulations and all the best

    ReplyDelete

प्रतिसाद

संयोजक

श्रीकांत पट्टलवार, मीरा पट्टलवार, रवी दाते, मुकुल आचार्य, कुमार जावडेकर