Saturday, 24 January 2026

४.२ गप्पा टप्पा - कबड्डीपटू वरद क्षीरसागर (मीरा पट्टलवार)

मध्यंतरी कबड्डीच्या युरोपियन चॅम्पियनशिप बद्दल ऐकलं आणि त्यातही मँचेस्टर युनिव्हर्सिटीत इंजिनिअरिंग शिकणारा वरद क्षीरसागर इंग्लंडच्या राष्ट्रीय टीमचा एक आघाडीचा खेळाडू आहे हे कळलं तेव्हा त्याच्याशी या विषयावर गप्पा करण्याचं ठरवलं.

मी वरदला विचारलं की क्रिकेट, फुटबॉल, टेनिस, इत्यादी मॉडर्न खेळ सोडून तू कबड्डी हा खेळ कसा काय निवडलास?

मँचेस्टर युनिव्हर्सिटीत प्रवेश घेतल्यावर इतर खेळांबरोबरच इथे कबड्डीची पण टीम आहे हे कळलं. संघाच्या शाखेत खो-खो आणि लंगडी नियमितपणे खेळत असल्यामुळे कबड्डी सारख्या भारतीय खेळातही आपण भाग घ्यावा असं वाटू लागलं. शारीरिक तंदुरुस्ती, चपळता, दीर्घकाळ श्वास धरून ठेवण्याची क्षमता आणि अर्थात टीमवर्क या कबड्डी खेळण्यासाठी लागणाऱ्या मूलभूत गरजा. स्विमिंग आणि इतरही चा नियमित सराव असल्यामुळे या सर्वांसाठी मी तयार होतोच पण संधी मिळण्यासाठी खूप स्पर्धा आणि चढाओढ सुध्दा होती. पण मी सातत्याने सराव करत राहिलो आणि एक-दोन प्रयत्नात माझी युनिव्हर्सिटी-कबड्डी संघात निवड झाली.

इतर खेळांबरोबरच इथल्या युनिव्हर्सिटीज मध्ये कबड्डीतही खूप चढाओढ असते हे ऐकून थोडं आश्चर्य वाटलं पण एका भारतीय खेळाला सन्मान मिळतो हे ऐकून अभिमान पण वाटतो.  मग कबड्डीतील तुझा यापुढचा अनुभव कसा होता?

युनिव्हर्सिटीतील पद्धतशीर प्रशिक्षणातून मी लवकरच बऱ्यापैकी तरबेज झालो. इंटर-युनिव्हर्सिटी स्पर्धांमधील माझी प्रगती पाहून राष्ट्रीय संघासाठी माझं नाव सुचवण्यात आलं. राष्ट्रीय पातळीवर खेळण्यासाठी निवडीचे निकष खूपच उच्च दर्ज्याचे आणि आव्हानात्मक असतात. आवश्यक त्या सर्व चाचण्यांतून यशस्वी होऊन २०२५ च्या दोन आंतरराष्ट्रीय स्पर्धा - मिलान मधील युरोपियन-चॅम्पियनशिप आणि ॲम्स्टरडॅम मधील युरोपियन-कप या दोन्ही साठी माझी निवड झाली.  सांगायला अभिमान वाटतो की मिलानमध्ये आम्हाला गोल्ड ट्रॉफी आणि ॲम्स्टरडॅम मधे आम्हाला सिल्वर ट्रॉफी मिळाली.

वा वा, तुझं आणि तुमच्या संपूर्ण टीमच मनःपूर्वक अभिनंदन.  आता शेवटचा आणि मुख्य प्रश्न. या खेळातील अनुभवातून तू काय शिकलास आणि इतर क्षेत्रात याचा काय फायदा होतो?

कबड्डी सारख्या सांघिक खेळातून खूप काही शिकण्यासारखं असतं. मुख्य म्हणजे ताण-तणावाच्या प्रसंगात संयम राखणे, शेवटच्या क्षणापर्यंत जिद्द कायम ठेवणे, सहखेळाडूंची स्ट्रेंथ आणि वीकनेसेस ओळखून एकमेकांना सांभाळून घेणे आणि वैयक्तिक पातळीवर फिजिकल फिटनेस, शिस्त पाळणे,  अडचणीच्या वेळी मनावर संयम ठेवणे या सर्व बाबतीत अशा खेळातील प्रशिक्षणाचा निश्चितच फायदा होतो.

हजारो वर्षाची परंपरा लाभलेल्या कबड्डी या भारतीय मैदानी खेळात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर अधिकाधिक सन्मान मिळवून देण्यासाठी त्यात नियमितपणे सक्रीय राहून वरद आपली वाटचाल पुढेही सुरू ठेवणार आहे. पुढील प्रवासासाठी पश्चिमाईतर्फे वरदला मनःपूर्वक शुभेच्छा.

मीरा पट्टलवारऋणकर्णयु.के. 

No comments:

Post a Comment

प्रतिसाद

संयोजक

श्रीकांत पट्टलवार, मीरा पट्टलवार, रवी दाते, मुकुल आचार्य, कुमार जावडेकर