Saturday, 24 January 2026

४.४ गप्पा टप्पा - निवृत्ती नंतरचे वेड – टेबल टेनिस अंपायर, डॉ. सुनील सप्रे (मीरा पट्टलवार)

 4.4  निवृत्ती नंतरचे वेड – टेबल टेनिस अंपायर, डॉ. सुनील सप्रे    

२०१३ मध्ये वैद्यकीय व्यवसायातून निवृत्त झाल्यावर डॉ. सुनील सप्रे यांनी टेबल टेनिस कडे जरा जास्तच लक्ष्य द्यायला सुरुवात केली. रीतसर प्रशिक्षण घेऊन २०१८ ITTF, (International Table Tennis Federation) च्या लास वेगास येथील वर्ल्ड वेटरन चॅम्पियनशिप मध्ये पण भाग घेतला. पण विशेष म्हणजे खेळता खेळता ते पुढे टेबल टेनिसचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे अंपायर झाले. अर्थातच खेळाडू ते अंपायर हा त्यांचा प्रवास कसा झाला हे जाणून घ्यायची इच्छा झाली आणि हा संवाद घडून आला.

डॉ. सुनील आपण आंतरराष्ट्रीय दर्जाचे अंपायर आहात हे कळल्यावर आम्हाला आपल्याबद्दल अभिमान तर वाटतोच पण आपल्या या प्रवासविषयी थोडं कुतुहलही वाटलं. तर, आपण अंपायरशिप कडे कसे वळलात?

२०१२  ला मी लंडन ऑलिंपिक टेबल टेनिस मॅच बघायला गेलो आणि पुन्हा ह्याकडे वळावं असं वाटलं.  नंतर मी एका कोच कडून रीतसर प्रशिक्षण घेतलं आणि टेबल टेनिस च्या विश्वात पुन्हा आलो. मी स्थानिक लीग मॅचेसही खेळायला लागलो.  

२०१८ मध्ये मला टेबल टेनिस इंग्लंड यांच्याकडून एक पत्र आलं की २०२२  च्या कॉमनवेल्थ गेम्स मध्ये तुम्ही अंपायर होण्यासाठी इच्छुक आहात का?. मी या पत्राला काहीच प्रतिसाद दिला नाही. थोडे दिवस गेले मग पुन्हा दुसरं पत्र आलं. मग मात्र मी ही संधी घेण्याचं ठरवलं.



अंपायर म्हणून पात्र होण्याकरता सुरुवातीला प्रशिक्षण घ्यावं लागतं. हे प्रशिक्षण चार भागात असतं लेव्हल वन  स्थानिक/ काउंटी मॅचेस करिता, लेव्हल टू राष्ट्रीय पातळीवर मॅचेस करिता (White Badge holder),  लेव्हल थ्री इंटरनॅशनल मॅचेस करिता (Blue badge holder) आणि लेव्हल फोर म्हणजे अत्यंत अनुभवी जे जागतिक अजिंक्यपद स्पर्धा आणि ऑलिंपिकसह सर्वात प्रतिष्ठित स्पर्धांसाठी असतात (Gold Badge holder). प्रत्येक लेवलला थियरी परीक्षा आणि इंटरव्यू असतो आणि दोन वर्ष त्या त्या स्तरावर मॅचेस घेतल्याचा अनुभव असावा लागतो. मी पहिली लेव्हल पास झालो आणि मॅचेस घ्यायला लागलो.

तुमचा अंपायर म्हणून सुरुवातीचा अनुभव कसा होता ?

माझा सुरुवातीचा अनुभव गमतीशीर आणि तणावपूर्ण म्हणावा लागेल. म्हणजे मॅच सुरू असतांना  खेळाडुंचे समर्थक आणि पालक असे सगळेच जोर जोरात ओरडून गोंधळ घालत होते आणि ही परिस्थिती हाताळणं म्हणजे एक आव्हान होतं. मॅच असतांना अंपायरला एक मार्गदर्शक दिलेला असतो आणि तोही हे सतत निरीक्षण करत असतो आणि गरज असेल तेंव्हा सगळी परिस्थिती हाताळतो. पुढे आणखीन काही मॅच खेळल्यावर माझा अनुभव वाढत गेला.

जसजशी अम्पायर लेव्हल वरची तसे खेळाडूसुद्धा कुशल असतात आणि मॅच हाताळण्याचं कौशल्यही तेवढेच असावं लागतं. मी आता लेव्हल थ्री (Blue Badge holder) चा म्हणजे आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या मॅचेस घेतो. इंग्लंड टेबल टेनिस प्रशिक्षणाचा दर्जा उत्तम असल्यामुळे इथल्या अंपायर्सना कॉन्टिनेन्टल मॅचेस करिता पण बोलावतात. स्वीडन, जर्मनी, इटली, मोनटेनगरो, झेक रिपब्लिक भारत, ग्रीस  इत्यादी देशांमध्ये मी अंपायर म्हणून गेलो आहे.

आपण पॅरा टेबल टेनिस मॅचेस साठी पण अंपायर आहात तर त्यातील आपले अनुभव कसे आहेत?

पॅरा टेबल-टेनिसमध्ये निष्पक्ष स्पर्धेसाठी ११ वर्ग केले आहेत (TT1-11), व्हीलचेअरमध्ये विभागलेले (TT1-5), शारीरिक अपंगत्वासाठी उभे राहून खेळणारे (TT6-10) आणि बौद्धिक अपंगत्वासाठी बौद्धिक (TT11) वापरले जातात. अशा वर्गीकर्णा मुळे समान क्षमता असलेले खेळाडू स्पर्धा करतात याची खात्री होते. ह्या स्पर्धेत अम्पायरला खेळाडूंच्या प्रती सहानुभूती, त्यांना समजेल अशा भाषेत सूचना, परानुभूती (empathy) आणि आश्वासक असावे लागते.

मी ऐकलं की तुम्ही अंपायर असताना डॉक्टर म्हणूनही काही कठीण प्रसंगी खेळाडूंवर उपचार केलेत?

हो! असे काही प्रसंग आले त्यातला एक प्रसंग म्हणजे एकदा ऑल युके असोसिएशन ऑफ एम्पायर ची मीटिंग होती ज्यात अंपायर सुद्धा टेबल टेनिस खेळतात. एकदा एका अंपायरला बरं वाटत नसल्यामुळे तो विश्रांतीगृहात बसला होता. माझं लक्ष गेलं आणि मला लक्षात आलं की याची तब्येत बरोबर दिसत नाही बहुदा याला हृदयविकाराचा झटका आला आहे. आम्ही ॲम्बुलन्स बोलवली आणि हातात वेळ अगदी कमी होता. त्याच्याशी बोलून आम्ही त्याला शुद्धीवर ठेवण्याचा प्रयत्न करीत होतो पण ही वेळ अशी होती की निर्णय घेणे खूप महत्त्वाचे होते त्यामुळे आम्ही त्याला लगेचच रुग्णालयात नेले आणि लवकरात लवकर उपचार मिळावे अशी विनंती केली सुदैवाने त्याला उपचार मिळाले आणि तो बरा झाला.

दुसरा एक प्रसंग म्हणजे एकदा एका मॅच मध्ये एका खेळाडूची पाठ दुखायला लागली आणि त्यावेळी त्यांनी मला फोन करून बोलावले. त्यांनी पॅरामेडिक्सला पण बोलवले. तपासणी केल्यावर पॅरामेडिक्स ने सांगितलं की बहुदा याचा पाठीचा कणा मोडला आहे. मग मी तपासणी केल्यावर सांगितलं की ही इमर्जन्सी नाही आणि याला रुग्णालयात जाण्याचे आवश्यकता नाही.

व्वा! म्हणजे खेळाडू जेव्हा रुग्ण होतात तेव्हा तुम्हांला अंपायरची भूमिका बदलून डॉक्टरची भूमिका पण  पार पाडावी लागते. एकंदरीत टेबल टेनिस क्षेत्रातील आपला हा प्रवास, तोही निवृत्ती नंतरचा, आम्हा सर्वांसाठी नक्कीच प्रेरणादायी आहे. आपल्या पुढील वाटचाली करता पश्चिमाईतर्फे मन:पूर्वक शुभेच्छा.

 

No comments:

Post a Comment

प्रतिसाद

संयोजक

श्रीकांत पट्टलवार, मीरा पट्टलवार, रवी दाते, मुकुल आचार्य, कुमार जावडेकर