Friday, 10 July 2026

अंक ६ - अनुक्रमणिका

 अंक ६ - अनुक्रमणिका (भ्रमण विशेषांक)


2       लेख, कथा... 6

2.1        शोध शिवनंदनाचा (श्रीकांत पट्टलवार) 6

2.2        निसर्गरम्य अलास्काच्या सानिध्यात (डॉ. राजश्री शिरभाते) 9

2.3        हवाई - जणू पृथ्वीवरचा स्वर्ग (मीना कुलकर्णी) 11

2.4        सुंदर ते स्कॉटलंड (पुष्कर उज्जैनकर – धक्का मार पुष्कर!) 19

2.5        जय जय राम कृष्ण हरी (तुषार क्षीरसागर) 23

2.6        म्युनिचची न्यारी लीला (राहुल बारटक्के) 26

2.7        लेबनॉन: 'मध्यपूर्वेच्या पॅरिस'च्या मातीत हरवलेले काही दिवस (अश्विनी हुजुरबाजार) 31

2.8        ‘जन्नत- ए- काश्मीर का शापित नंदनवन? (रवी दाते) 34

2.9        काला पानी निळे पाणी (रवी दाते) 41

2.10      कैलास-मानसरोवर तीर्थयात्रा (बिपाशा शर्मा, शुभ्रा शिवांगी, अंजनी आणि आनंद शिंत्रे) 45

2.11      '' गच्छंतिचा - कझाखस्तान (कुमार जावडेकर) 48

2.12      विचारांचा प्रवास, सुधांशु संजय बारस्कर 51

2.13      प्रवासी बूट – जावे त्यांच्या वंशा (विशाखा जावडेकर) 53

2.14      भ्रमण-निसर्गाची किमया (मीरा पट्टलवार) 53

3       आस्वाद (कविता / गीत/ गजल) 57

3.1        '' ची बाधा (सदर) – गझल – भ्रमंती (कुमार जावडेकर) 57

3.2        कोलंबसाचे निवृत्ती गीत (आश्विन जावडेकर - ‘अजब’) 57

3.3        भावानुवाद -  मनात अस्वस्थता घेऊन चालत जाशील तर (आश्विन जावडेकर – ‘अजब’) 57

3.4        प्रवास माणसाचा (नेहा बापट) 58

3.5        ओढ (लिना फाटक) 59

3.6        भ्रमंतीची गोड आठवण (करुणा नेहरकर) 60

4       डिंगूचा कट्टा.. 61

4.1        माझी स्की ट्रिप – ऑस्ट्रिया (सार्थक कुलकर्णी) 61

4.2        स्नॉडन, वेल्स (चित्रकार: स्वरा पवार) 62

 


१. स्वागत: केल्याने देशाटन (रवी दाते)

स्वागत: केल्याने देशाटन 

रवी दाते

"केल्याने देशाटन, पंडित मैत्री, सभेत संचार।
शास्त्र ग्रंथ विलोकन, मनुजा येतसे चातुर्य फार।।"

प्रत्यक्ष देशाटन न करता ज्यांना घरबसल्या 'चातुर्य' लाभायला हवं असेल त्या रसिकांसाठी पश्चिमाईचा हा भ्रमंती विशेषांक म्हणजे "असेल माझा हरी, ... " मधल्या हरीचे वरदान ठरावा. 

हे चातुर्य येण्यासाठी या अंकात काय नाही?

देशांतर्गत केलेली भ्रमंती आहे, परदेशातील पर्यटन आहे, कैलासाची यात्रा आहे, "वैकुंठा"ची वारी आहे, डोंगरावर चढाई आहे. 'धाडसी' सफरी आहेत, नवीन काहीतरी शिकण्यासाठी केलेलं सीमोलंघन आहे, छोटीशी सहल आहे, मनाचा विहार आहे, आयुष्याचा प्रवास आहे आणि उत्क्रांतीची वाटचालही आहे.

मागील अंकातील आशुतोष केळकर यांच्या नजरेतून पाहिलेला "मावळत्या सूर्याचा"अलास्का यावेळी पाहूया (यापूर्वी "पृथ्वीवरील नैसर्गिक आश्चर्ये" दाखवणाऱ्या) राजश्री शिरभाते यांच्या नजरेतून.

सर्वसामान्यांच्या बकेट लिस्ट मध्ये नसलेल्या लेबनॉनला जाण्याचे धाडस दाखवले आहे अश्विनी आणि गिरीश हुजूरबाजारांनी आणि अशाच धाडसाने कझाखस्थानावर केलेल्या "स्वारीचे" आपल्या खुसखुशीत शैलीत वर्णन करत आहेत कुमार जावडेकर. 

इंग्लंड मधून स्कॉटलंडला केलेला प्रवास हा स्टेकेशन का देशाटन हा स्कॉटलंडमध्ये वादाचा मुद्दा होऊ शकेल, परंतु त्यामुळे स्कॉटलंडचे सौंदर्य तसूभरही कमी होत नाही. त्या सौंदर्याचे "धक्का मार" वर्णन करताहेत पुष्कर उज्जैनकर. 

पर्ल -हार्बर मुळे परिचित आणि आत्तापर्यंत फक्त जेम्स बॉण्डच्या ('Die Another Day') सिनेमात आंबट शौकिनांच्या नजरेने पाहिलेल्या, परंतु नकाशात शोधायला कठीण अशा नॉर्थ पॅसिफिक मधील चिमुकल्या हवाई बेटांची सहल घडवत आहेत मीना कुलकर्णी. 

म्युनिचला केवळ दोन दिवसांसाठी जाताना आलेल्या अडचणीतून, कोचरेकर मास्तरांच्या तयारीची आठवण करून देत आहे राहुल बारटक्के. 

जगातली विविध स्थळं पाहण्यासाठी आपण प्रवास करतो. पण असाही एक प्रवास आहे जो स्वतःकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलून टाकतो. कैलास-मानसरोवर हा असाच एक दुर्मिळ प्रवास.  या प्रवासाची अनुभुती घेऊया श्रीकांत पट्टलवारांच्या शब्दांकनातून. अलीकडेच नाबाद शतक झळकावलेल्या डेव्हिड अटेनबरो यांच्या आवडत्या फार्न बेटावरच्या पक्ष्यांच्या स्थलांतराचं अविश्वसनीय वर्णन करतायत मीरा पट्टलवार.   

प्रौढ मंडळी अशी प्रवासवर्णन लिहीत असताना आपल्या मराठी शाळेतील मुलं कशी मागे राहतील? पालकांकडून स्फूर्ती घेऊन आपल्या ऑस्ट्रियातील स्किइंग शिकण्याच्या प्रवासाचे वर्णन चक्क मराठीत लिहून आपल्या आई-वडिलांचे आणि मराठी शाळेचे  श्रम सार्थकी लावले आहेत, सार्थक कुलकर्णीने.

आपल्या आंग्ल देशातील उत्तुंग स्नोडॉनवर चढताना  दिसलेल्या दगडी पुलाला चित्रात बंदिस्त केलय स्वरा पवारनी आणि विठ्ठलावरील आपल्या अपार श्रद्धेने याच आंग्ल देशात "पंढरीची वारी" आणली आहे तुषार क्षीरसागर यांनी.

या आधीच्या अंकात आपण मामाच्या गावाला जाण्याचा आनंद लुटलात. तर अशाच छोट्याश्या सहलीतून मिळणारा आनंद यंदा लुटुया करुणा नेहरकरांच्या कवितेतून.

याशिवाय देशाच्या आणि विश्वाच्या सीमा ओलांडून त्या पल्याड जाणाऱ्या माणसाच्या "वढाळ वढाळ" मनाचा प्रवास ऐका आश्विन जावडेकरांच्या कवितेतून, मनातील विचारांचा प्रवास सुधांशू बारस्करांच्या लेखातून, मानवाच्या उत्क्रांतीचा प्रवास नेहा बापटांच्या निवेदनातून आणि आपल्या आयुष्याचा  प्रवास लीना फाटक यांच्या अभंगातून.

सध्याच्या आंतरजाल (internet) युगात सरफिंग करताना थोरामोठ्यांच्या "बुटातून" केलेला विशाखा जावडेकरांचा प्रवास तुम्हाला अंतर्मुख करेल.  

तर मंडळी, आता फार वेळ न घालवता गौरी नंदनाच्या रूपात परिचित अशा गणरायाचे स्वित्झर्लंडला शिवनंदनी रूपात झालेले स्वप्नवत दर्शन खुद्द श्रीकांतजींच्या मुखातून ऐकून प्रवासाला सुरुवात करूया.

- रवी दाते, मँचेस्टर, यु. के.

२.१ शोध शिवनंदनाचा (श्रीकांत पट्टलवार )

 शोध शिवनंदनाचा

श्रीकांत पट्टलवार

झुरिक येथील युरोपियन मराठी संमेलनात समूह गायनाचा हा वेगळा अविष्कार सादर करण्याची मोहीम हाती घेतल्यावर सुरुवातीचे काही दिवस (खरंतर महिने) गाताना श्वास कुठे कसा आणि केव्हा घ्यायचा, वृंदगानाचे विविध नियम, ते आत्मसात करण्याचे तंत्र आणि मंत्र व त्यावर खास तयार केलेल्या खाणा खुणा शिकण्यात गेले. आय पॅड, मोबाईल, एमपी३ अशा विविध माध्यमातून नवीन सर्व रचना आम्हा वृंदगायकांना  वितरित झाल्या. घरोघरी वैयक्तिक अभ्यास सुरू झाला. मी पण नियमित रियाज सुरू केला. हळूहळू जाणवायला लागलं की पहिलच गाणं आपल्याला काही जमत नाही. किंबहुना हे गाणं आपल्याला कळलेलंच नाही. बाबूजींनी 'कुशलव रामायण गाती' असं म्हटल्याबरोबर प्रभू रामचंद्राच्या राज्यसभेचा विशाल सभामंडळ डोळ्यासमोर येतो. ‘दाटून कंठ येतो’ या गाण्याची  नुसती आठवण झाली तरी लगेचच डोळे पाणवतात. पण हे शिवनंदन गजानना म्हटलं त्या चिमुकल्या शिवनंदनाला मागे सारून श्री गजानन आपलं महाकाय रूप घेऊन क्षणार्धात पुढे यायचा. कितीही वेळा कितीही प्रकारे ही ओळ म्हटली तरी प्रत्येक वेळी गजाननच पुढे! शिवनंदन कधी दिसायचाच नाही. शिवनंदन जर डोळ्यापुढे येतच नाही, त्याचं रूप जर आपल्याला कळलच नाही, तर त्याला आवाहन तरी कसं करायचं? त्याचं गाणं तरी कसं गायचं? प्रत्येक वेळी गाण्यातल्या पहिल्या ओळीतच मी आपला शिवनंदनाला शोधायला निघायचो. मग मध्येच एखादा धक्का मिळायचा, आठवण करून द्यायला की आता तुझी तान आहे. तान तर सुटायचीच पण शिवनंदनही सुटायचा.

एव्हाना इतर सर्वांची उत्तरोत्तर प्रगती होत होती. इतकच काय पण घरातल्या लहान मुलांना सुद्धा सर्व गाणी अगदी श्वासा-श्वासासकट पाठ झाली होती. माझी प्रगती मात्र वर्षानुवर्षे एकाच वर्गात शेवटच्या बेंचवर बसून उपद्रव देणाऱ्या मुलांप्रमाणे सुरू होती.

बरं प्रॅक्टिसची आखणी अगदी काटेकोरपणे झालेली. मिनटा-मिनिटांचे वेळापत्रक तयार झालं होतं. सर्व सूचनांचे पालन खूप शिस्तीत सुरू होतं त्यामुळे नवीन विषय काढण्याची मुळीच सोय नव्हती. उलट गाणं तर जमतच नाही पण आमचा अमूल्य वेळ वाया जातो आहे असा शेरा मिळण्याची शक्यता जास्त होती. आणि माझी अस्वस्थता दिवसागणिक वाढतच होती.

मग या शिवनंदनाचा शोध जरा वेगळ्या प्रकारे घेण्याचा मी ठरवलं. सर्वप्रथम गणेश दर्शन मोहीम हाती घेतली. लग्नपत्रिका, रांगोळ्या, कॅलेंडर, पेंटिंग्स अशा विविध वस्तूंमधून त्याला शोधण्याचा प्रयत्न केला. म्हटलं काहींना कधी नारळात, तर कधी भोपळ्यात, तर कधी पिंपळाच्या पानात हवा तसा गणपती दिसतो तर आपल्याला पण आवडेल असा शिवानंदन का दिसू नये? हाती येतील त्या आरत्या, श्लोक अगदी अथर्वशीर्षातूनही शोध घेतला पण व्यर्थ. शेकडो गाणी ऐकली पण गणपतीला शिवनंदन म्हणून संबोधलेलं एकही मराठी गाणं सापडलं नाही. मग धाडस करून एकदा काही जाणकार मंडळींकडे हा विषय काढला. श्री गजाननाच्या मागे लपलेला शिवनंदन कोणी पाहिला का? असं विचारलं तर ‘देव तो अंतरात नांदती’ अशी ह. भ. प. स्टाईल प्रतिक्रिया मिळाली. शिवनंदन शोधाचा हाही एक मार्ग बंद झाला.

Large Hadron Collider (LHC) या प्रयोगात सहभागी होण्यासाठी स्वित्झर्लंड मधील जिनीव्हा या गावी सर्न इथे माझं जाणं येणं नेहमीच सुरू असतं. या प्रयोगातून ब्लॅक होल म्हणजे कृष्णविवर उत्पन्न होऊन ते संपूर्ण पृथ्वी गिळंकृत करेल अशी भीती काही मंडळींनी व्यक्त करून हा प्रयोग बंद करण्याची चळवळ सुरू केली होती. त्याचवेळी आइसलँड मधील व्होलक्यानिक ॲशच्या प्रकारामुळे आमचे दिग्दर्शक-मार्गदर्शक-गुरु श्री. अरुण सराफ महिनाभर भारतातच अडकून पडले होते. अशा प्रकारची विचित्र विघ्ने  पाहून कृष्णविवराच्या उत्पत्तीची शंका खरी ठरते की काय अशी मला पण भीती वाटू लागली होती. वाटलं की शिवनंदनाला या प्रकरणाचा सुगावा लागला असावा आणि संम्मेलनासाठी झुरिक ला जाण्यापूर्वी जिनिव्हा मार्गे जाऊन आधी या कृष्णविवरा चा प्रश्न सोडवावा असा विचार या विघ्नहर्त्या श्री गणेशाच्या मनात आला असावा. एकीकडे हा छोटासा शिवनंदन खरंच त्या कृष्णविवरात गेला आणि अडकला तर काय होईल अशी भीती वाटली तर दुसरीकडे खरंच तो जर जिनीव्हात आला असेल तर आपल्याला लवकर सापडू शकेल म्हणून थोडा आनंदही होऊ लागला.

जिनीव्हा पासून पन्नास-साठ महिलावर मॉन्टब्लॉंक नावाचं  एक सुप्रसिद्ध आणि अतिशय रम्य ठिकाण आहे. एका दुपारी सर्न मधली कामे आटोपून काही मित्रांबरोबर मॉन्टब्लॉंकच्या भेटीला गेलो होतो. चारही बाजूंना पांढऱ्याशुभ्र बर्फाच्छादित आल्प पर्वताच्या रांगा, मधूनच ढगाआडून  चकाकणारे लहान-मोठे सुळके , स्किईंग साठी आलेली रोप वे मधून खालीवर करणारी उत्साही मंडळी. एका रेस्टॉरंटच्या बाहेर बसून आम्ही त्या अवर्णनीय प्रसंगाचा आनंद घेत होतो. दुपारची वेळ होती. एक दोन तासांचा प्रवासही झाला होता. खाणं-पिणंही छान झालं होतं. त्यामुळे हळूहळू डुलक्याही येऊ लागल्या होत्या. कानात एमपी ३ मार्गे ‘हे शिवनंदन गजानना’ या गीताचं सतत श्रवण सुरू होतं त्यामुळे केंव्हा  डुलकी लागली हे कळलच  नाही. अचानक डोळे उघडले तर एका मोठ्या ढगा-आडून एक लखलखीत सुळका हळूहळू वर येत होता. अचानक मला आलप्सऐवजी हिमालय दिसू लागला. जसा जसा ढग पुढे सरकत होता तसा तसा वर येणारा कैलास पर्वतही स्पष्ट दिसू लागला होता. थोड्याच वेळात शंकराच्या जटेतील गंगा... ध्यानस्थ झालेले प्रत्यक्ष भगवान शंकर आणि मग शेजारीच बसलेली प्रसन्नवदनी पार्वती पण पुढच्याच क्षणी प्रकट झाली. अचंबित होऊन या दोघांना वंदन करण्यासाठी मी हात जोडणार तेवढ्यात भगवान शंकराच्या मांडीवर बसून इतके दिवस कसं झुलवत ठेवलं असं म्हणत माझ्याकडे पाहून हसणारा शिवनंदन मला दिसला. गणेशाचं हे लोभस रूप पाहून मी भारावून गेलो, धन्य झालो, माझा शिवानंदन मला सापडला, माझ्याशी बोलू लागला... आणि मी गाऊ लागलो...

हे शिवनंदन गजानना

हे शिवनंदन गजानना

गोड तुझे हे रूप पाहुनी

आनंदलो मी मना

हे शिवनंदन गजानना  ॥

 

वृंदगान हे तुला अर्पितो

सप्तसूर गुंफुनी

आळवितो अम्ही नाम तुझे रे

श्वासा-श्वासातुनी.

येशील का रे रसिक होऊनी

 सोबत संम्मेलना

 

हे शिवनंदन गजानना  ॥१॥

 

किती शोधले तुजला मी रे

 विशाल भूवरी

सुजन सांगती कीर्ती तुझी रे

वसशी तू अंतरी.

येशील का रे डोळ्या पुढती

मोजू किती मी क्षणा

 

हे शिवनंदन गजानना॥२॥

कैलासावर शंकर दिसले

ध्यानमग्न होऊनी

जवळ पार्वती प्रसन्न वदने

आशिष वितरी जनी

मांडीवरती शिवनंदन तू

मोहवी मम नयना

हे शिवनंदन गजानना॥३॥

- श्रीकांत पट्टलवार, ऋणकर्ण, यु. के. 

२.२ निसर्गरम्य अलास्काच्या सानिध्यात (डॉ. राजश्री शिरभाते)

निसर्गरम्य अलास्काच्या सानिध्यात

डॉ. राजश्री शिरभाते

काही ठिकाणं अशी असतात की त्यांच्याबद्दल वाचतानाच मन तिकडे खेचलं जातं. अलास्का हे असंच एक स्वप्नवत ठिकाण! हिमनद्या, अथांग पर्वतरांगा, शांत फ्योर्ड्स, आणि वन्यजीवांचा मुक्त संचार—अलास्काची ही ओळख मनात खोलवर रुजली आणि नकळतच ते आमच्या ‘बकेट लिस्ट’मध्ये स्थान मिळवून बसले.

अखेर एका वर्षातच आम्ही सप्टेंबरमध्ये ‘सेलेब्रिटी क्रूझ’ने अलास्का ट्रिप करण्याचे ठरवले.

अलास्काशी पहिली ओळख

अलास्का हे युनायटेड स्टेट्सच्या उत्तर-पश्चिम किनारपट्टीवरील अद्भुत, ध्रुवीय निसर्गाने नटलेले राज्य. ‘मिडनाइट सन’ची भूमी म्हणूनही त्याची ओळख आहे. हिमनद्या, उंच पर्वत, स्वादिष्ट सामन मासे, अस्वल आणि व्हेल-अलास्काची कल्पना केली की हे सगळं डोळ्यासमोर उभं राहतं.

मी खरोखरचं आमच्या ह्या ट्रीपची खूप आतुरतेने वाट बघतं होते. आमचा टूर ७ सप्टेंबर ते १७ सप्टेंबर होता. शेवटी ७ सप्टेंबर उजाडला! आम्ही लंडनहून फ्लाईट घेवून कॅनडामध्ये व्हँकुव्हरला आलोत. ९ सप्टेंबरपासून आमचा क्रूझ सुरू होणार होता.

व्हँकुव्हर हे आहे मात्र खरोखरच सुंदर शहर! बर्फाच्छादित डोंगर, निळाशार समुद्र, फ्योर्ड्स आणि शहराच्या मध्यभागी विस्तीर्ण हिरवागार पार्क- सगळंच मोहक. आम्ही सिटी टूर केला, ग्राऊस माउंटनवर जाऊन अप्रतिम दृश्यांचा आनंद घेतला. ग्रॅनव्हिल आयलंड आणि कॅपिलानो सस्पेन्शन ब्रिजलाही भेट दिली—हा ब्रिज मला खूप आवडला.

दुसर्‍या दिवशी आमचा आयुष्यातला पहिला लक्झुरी क्रूझ सुरू होणार होता, खूप एक्साईटमेंट होती. मी आमच्या क्रूझ बद्दल बरेच वाचले होते, लोकांनी ह्या क्रूझवरं दिलेले रिव्हूजं पण! क्रूझ असला की तुम्हाला प्रवासाबद्दल फारसा विचार करण्याची गरज नसते,  कुठल्या हॉटेल मध्ये थांबायचे ह्याचा पण विचार करावा लागत नाही, तसेच प्रत्येक शहरात तुमच्या वस्तू अनपॅक करायची पण गरज नसते!

सेलिब्रिटी शीपवर आगमन

आमची क्रूझ शीप होती सेलिब्रिटी इंफिनिटी! ह्या आलिशान क्रूझवर आमचे आगमन म्हणजे जणू एखाद्या तरंगत्या शहरात प्रवेश केल्यासारखे वाटले!

आमचे शाम्पेन देऊन स्वागत करण्यात आले. शीपवर प्रत्येक क्षणी आदरातिथ्याची ऊब जाणवत होती. आमची सुरेख पेंटहाऊस डीलक्स बाल्कनी केबिन होती. निसर्गरम्य प्रदेशात क्रूझ करताना बाल्कनी केबिन घेतल्यास आजूबाजूच्या सौंदर्याचा पुरेपूर आनंद घेता येतो, हे आम्हाला लगेच जाणवले.

तुमच्यासाठी एक केबिन अटेंडंट पण असतो,जो सातही दिवस तुमच्या केबिनची आणि तुमची काळजी घेतो. हा सगळाचं अनुभव विलक्षण होता!

शीपवर काम करण्यासाठी फिलीपीनोज, थायलंड आणि आपल्या भारतातून पण बरेचं लोक येतात.  

आम्ही शीपवर थोडासा फेरफटका मारला आणि नंतर आराम वगैरे करून, तयार होवून संध्याकाळी डिनरसाठी गेलोत. आणि हो, एका आठवड्याच्या क्रूझमध्ये एक दिवस ‘Formal Night’ असते. त्या दिवशी लेडीज अगदी सुंदररीत्या सजून-धजून येतात आणि जेंट्सही डिनर जॅकेटमध्ये रुबाबदार दिसतात. त्या संध्याकाळी संपूर्ण शिपवर एक वेगळाच, खास आणि उत्साही माहोल असतो. त्या दिवशीचा मेनू देखील खास आणि आकर्षक असतो. 

आमच्या क्रूझवर आम्हाला डिनरसाठी टेबल दिलेल होतं आणि सातही दिवस आम्हाला त्या टेबलवर, त्याचं लोकांबरोबर डिनर घ्यायचे होते. तुमची इच्छा असल्यास तुम्ही शीपवरच्या दुसर्‍या रेस्टॉरंट्स मध्ये पण डिनर घेऊ शकता पण इथे मात्र तुमच्या टेबलसाठी बटलर असतातं, ते तुमच्या जेवणाची पूर्णपणे काळजी घेतात.

आमच्या टेबलवरचा ग्रुप छान होता- एक मेक्झीकन तरूणी आपल्या आई, वडिलांना क्रूझवर घेवून आलेली होती. आणि दुसरे दोन अमेरिकन मित्र होते - रोज संध्याकाळी ठरलेल्या टेबलवर सहप्रवाशांसोबत जेवताना नव्या ओळखी जुळत गेल्या.

क्रूझवर खाण्यासाठी असंख्य रेस्टॉरंट्स असतात, तऱ्हेतऱ्हेचे  खाण्याचे पदार्थ अव्हेलेबल असतात, काही रेस्टॉरंट्स तर २४ तास उघडे असतात. रोज काहीतरी स्पर्धा, क्लासेस - कुकरी, पेंटींग वगैरेचे आणि रात्री अनेक प्रकारचे मनोरंजन कार्यक्रम असतात.  तसेच फीट राहण्यासाठी स्विमींग पूल, वॉकींग ट्रॅक आणि वेल इक्विप्ड जीम पण असते!

अलास्कामधील व्हेल्स, बाल्ड इगल आणि अस्वलाचे दर्शन!|

दुसऱ्या दिवशी आमची शिप ‘इनसाईड पॅसेज’मधून प्रवास करत होती. ‘इनसाईड पॅसेज’ मधून प्रवास करताना आम्ही शिप वरील विविध गोष्टींचा आनंद घेत होतो, सभोवतालचा निसर्गपण अक्षरशः डोळ्यांत साठवून ठेवावा असा होता. निळ्या समुद्रात अचानक होणाऱ्या व्हेल्सचे दर्शन हा तर एक अविस्मरणीय क्षण होता! 

ह्यानंतरच्या दिवशी होती केचिकनला भेट, इथे आम्ही 'केचिकन बाय लँन्ड अ‍ॅन्ड सी' आणि रेनफॉरेस्टचा वॉकींग टूर घेतला. ‘रेनफॉरेस्ट वॉक’ करताना अलास्काच्या हिरव्या संपदेचा जवळून अनुभव आला.

इथे आम्हाला अलास्का मधील बाल्ड इगल (Bald Eagle) चे दर्शन झाले. हा खूपच आकर्षक आणि शक्तिशाली पक्षी असून युनायटेड स्टेट्सचा हा राष्ट्रीय पक्षी आहे - शक्ती आणि स्वातंत्र्याचे प्रतीक.

एकून आमचा आजचा दिवस छानच गेला होता!

ह्यानंतर आम्ही अलास्काची राजधानी जुनोला भेट दिली, येथील 'स्टेट म्युझियम फॉर अलास्कन हिस्ट्री' आम्हाला आवडले. माउंट रॉबर्टवर ट्राम पण घेतली, तेथून देखावा छानचं होता.

नंतर आम्ही बघितले 'मंडेनहाल ग्लेशियर'. अथांग, भव्य आणि शब्दांच्या पलीकडचं! ते सुंदर आहे असे म्हणणे म्हणजे काहीच नाही. या बर्फाळ अनंतापासून दूर पाहणे अशक्य आहे ...येथील किनाऱ्यावर कधी कधी अस्वल दिसतात म्हणे, आपल्यालाही अस्वल दिसावे अशी मनात खूप सुप्त इच्छा होती! आणि कांय आश्च्रर्य, आम्ही ग्लेशियरच्या आजूबाजूला हिंडत असतांना अचानक आम्हाला खरोखरचं भल्या मोठ्या काळ्या अस्वलाचे दर्शन झाले, दुर्बीनीतून जेव्हा त्याला बघितले तेव्हा अंगावर रोमांच आले! आजचा दिवस खरोखरचं छान सार्थकी लागला होता.

हबर्ड ग्लेशियर दर्शनाचा अनोखा अनुभव

ह्यानंतर होता आमच्या ट्रीपचा हायलाईट 'हबर्ड ग्लेशियर'! येथे कोणतेही बंदर नाही. आम्हाला सांगीतल्या गेलेकी आमची शीप १२.३० च्या दरम्यान ग्लेशियरजवळ पोहचेल. आम्ही लवकर लंच करून मोठ्या लाउंजमध्ये जाऊन छान खिडकीशेजारची जागा घेतली. लांबून ग्लेशियर दिसायला सुरवात झाली आणि मनांत आले काही विशेष तर दिसतं नाही! पण शीप जसजशी ग्लेशियरजवळ येत गेली तसे जाणवले ग्लेशियरचे अस्तित्व! भली मोठी उंच बर्फाची भिंत आणि पलिकडे  बर्फाचा प्रचंड साठा थेट फजॉर्डमध्ये जाणारा! त्यादिवशी लकीली सुरेख सुर्य निघाला होता आणि सोनेरी सूर्यकिरणे ग्लेशियरवर पडून ग्लेशियरचा देखावा त्या सुर्यप्रकाशात खरोखरचं अप्रतिम दिसतं होता! सगळीकडे नीरव शांतता होती, प्रत्येकाला हा नजारा आपल्या ह्रदयाच्या कुपीत बंद करावासा वाटतं होता. ही शांतता केवळ भंग होत होती ती मधूनचं समुद्रात पडणाऱ्या मोठाल्या बर्फाच्या भिंतींचे कान बधीर करणार्‍या कर्णकर्कश आवाजने! त्या क्षणी निसर्गाच्या सामर्थ्याची जाणीव प्रकर्षाने होत होती.



थोड्या वेळाने आम्ही वरच्या डेकवर गेलो, आमची शीप अगदी ग्लेशियरच्या जवळ उभी होती, बाहेर थंड होते, आम्हाला हॉट चॉकलेट प्यायला देण्यात आले. आम्ही मन भरून हा निसर्गाचा देखावा बघतं होतो. एक तासानंतर आमची शीप वळली आणि तृप्त मनाने आम्ही आमच्या केबिन मध्ये आलो.

खरचं, हबर्ड ग्लेशियर म्हणजे -निसर्गाचा भव्य आविष्कार! आमच्या ह्या प्रवासातील परमोच्च बिंदू ठरला होता ‘हबर्ड ग्लेशियर’! 

अलास्का-एक जिवंत अनुभूती

आमचा अलास्का क्रूझ हा केवळ प्रवास नव्हता, तो एक अनुभव होता- निसर्गाशी जुळलेली एक भावनिक नाळ होती. हा इतर प्रवासापेक्षा काहीसा आगळा वेगळा होता! आपल्या बाल्कनीतून किंवा डेकवरून सतत बदलणारी सुरेख दृश्ये, सोबतीला समुद्राची अथांगता, अवर्णीय सूर्यास्त आणि सूर्योदय, एवढी गोड अनंतता...आणि  निसर्गाच्या विराट सौंदर्याचा स्पर्श हे सगळंच मनात खोलवर कोरलं गेलं. 

खरोखरचं आमच्या अलास्का वारीने आम्हाला आयुष्यभरासाठी आठवणींचा अमूल्य ठेवा दिला. त्याची आठवण करताना आजही मन पुन्हा त्या हिमनद्यांच्या सान्निध्यात हरवून जातं.

अलास्का- हे फक्त एक ठिकाण नाही, तर एक जिवंत अनुभूती आहे…

जी एकदा मनात सामावली की, आयुष्यभर सोबत राहते.

- डॉ. राजश्री शिरभाते, यु. के. 

२.३ हवाई - जणू पृथ्वीवरचा स्वर्ग (मीना कुलकर्णी)

हवाई जणू पृथ्वीवरचा स्वर्ग

मीना कुलकर्णी

मला खूप वर्षापासून हवाईला जायची इच्छा होती. पण वीस तास विमान- प्रवास करून जायचे हा विचार आला की मी म्हणायचे, जाऊ दे, पुढे कधीतरी जाऊ.

शेवटी एकदाची संधी मिळाली. आम्ही व्हँकूव्हरला कॉन्फरन्स साठी जाणार होतो. इथे आम्ही पूर्वी दोनदा येऊन गेलो होतो त्यामुळे तिथले विशेष काही बघायचे नव्हते. तसेच बाकीचा कॅनडाही बराच बघितला होता. इथून हवाई फक्त आठ तासांच्या अंतरावर होती. त्यामुळे अशी संधी परत लवकर येईल असे वाटत नव्हते. 

हवाईच्या ड्रीम हॉलीडेला जायचा माझा गेल्या कित्येक वर्षाचा बेत या वेळी पूर्ण होऊ शकेल असं वाटत होतं. पटापट सर्व माहिती काढायला सुरुवात केली.

या बेटांच्या समूहात एकूण १३७ बेटं आहेत. त्यामुळे सहा दिवसात हे कसं शक्य होणार असा प्रथम विचार आला. त्याबद्दल खूप वाचल्यानंतर असं लक्षात आलं कि यातली सगळी बेटे पाहाण्यासारखी नाहीत. ७/८ जास्त लोकप्रिय आहेत, पण त्यातल्या  अंतरामुळे एका आठवड्यात फार तर दोन बेट  पाहू शकलो असतो, आणखी माहिती काढल्यानंतर शेवटी मावी (Maui) आणि ओआहू (O’ahu) या दोघांची निवड केली. ही निवड करणे फारच अवघड होतं,  कारण सगळी बेटं खूप सुंदर दिसत होती. आमच्या जाण्याच्या तारखा फिक्स झालेल्या होत्या. त्यात बदल करणे शक्य नव्हते. एका बेटावरून दुसरीकडे जाण्यासाठी खूप लोक बोटीने किंवा क्रुझने प्रवास करतात यामुळे मधली छोटी बेटे पण दुरून का होईना पाहता येतात. पण वेळे अभावी बेटांमधीलचा प्रवास बोटींनी करणं शक्य नव्हतं. फ्लाइट घेणे एवढा एकच पर्याय होता. पण त्याही कमी असल्याने तिथे जायला फ्लाइट शोधणे पण खूप अवघड काम होत. कॉम्प्लिकेटेड  हॉलीडे अरेंज करताना जो पेशन्स लागतो तो मा‍झ्यामध्ये खूप आहे आणि शिवाय हवाई बेटे पाहण्याची ही आलेली सुवर्णसंधी पण सोडायची नव्हती.

शेवटी प्रयत्ने वाळूचे कण रगडता तेलही गळे, या नियमाप्रमाणे फ्लाइट मिळाल्या. त्यानंतर मावी मध्ये अपार्टमेंट आणि होनोलुलूमध्ये हॉटेलही सांपडलें. आता फक्त एकच काम राहील होतं. म्हणजे देवाला प्रार्थना की हा सगळा हॉलीडे चांगला  होऊ दे. कधी -कधी चित्रांमध्ये हॉटेल आणि जागा खूप छान दिसतात. प्रत्यक्षात वेगळा अनुभव येतो.

कॉन्फरन्स संपल्यानंतर काहुलाई या मावी मधील विमानतळाकडे जाणारी फ्लाइट घेतली. नवीन देशात जाताना मला तिथे दिवसा उजेडी पोचायला आवडते. पण इथे जाणार्‍या फ्लाइट कमी असल्यामुळे ते शक्य झाले नाही त्यामुळे  रात्री दहाला पोचलो. त्यानंतर बुक केलेली कार मिळायला आणखी थोडा वेळ लागला. ती घेऊन आम्ही आमच्या अपार्टमेंटकडे निघालो. याचे नाव होते. हॅले पाव हॅना रिसॉर्ट. (Hale Pau Hana Resort) हा कीहाई या गावामध्ये होता. आधीच सगळी कडे अंधार होता , त्यातच भर म्हणजे कार मधले सॅटलाइट नेव्हिगेशन चालत नव्हते आणि आमच्या फोनलाही रिसेप्शन नव्हते. रात्र झाल्यामुळे वाटेतली सगळी दुकाने बंद होती. आता काय करावं असा प्रश्न पडला होता. तेवढ्यात मला एक दुकान थोडेच उघडे दिसले. म्हणून कार थांबून. त्याने दार बंद करायचे आधी पटकन दुकानात शिरलो. त्या दुकानदाराला ही काही माहित नव्हते. पण तिथून बाहेर पडणारा शेवटचा गिर्‍हाईक आमचे बोलणे ऐकत होता. आमच्या सुदैवाने त्याला या भागाची माहिती होती. सुदैवाने  या दुकानाच्या समोरच आमचे अपार्टमेंट होते. पण अंधारामुळे मला नाव दिसले नव्हते. जीव भांड्यात पडणे म्हणजे काय हे समजले. पण अजूनही प्रॉब्लेम संपला नव्हता. अपार्टमेंटचे रिसेप्शनही आता बंद झाले होते. नशीबाने कंपनीला फोन लागला. त्यांनी किल्ली कुठे सापडेल ते सांगीतले. ती रिसेप्शनच्या समोर की लॉक मध्ये ठेवलेली होती. अशा प्रकारे किल्ली ठेवलेली आम्ही पहिल्यांदाच पाहत होतो. जड बॅग घेऊन कसे बसे तिसर्‍या मजल्या वरच्या अपार्टमेंट मध्ये पोचलो. नवऱ्याची बोलणी पण खाल्ली. कशाला अपार्टमेंट बुक करायला पाहिजे वगैरे- वगैरे. खूप दमल्यामुळे पूर्ण अपार्टमेंट न पाहता तसेच झोपी गेलो.






सकाळी उठल्यावर थोडा उत्साह कमी झाला होता. पण सगळे पडदे उघडले आणि समोरचा अतिसुंदर देखावा पाहून कालपासूनची सगळी निराशा एकदम पळाली. आमचे अपार्टमेंट वर्णन केल्याप्रमाणे अगदी समुद्रकिनार्‍यावर होते. मागच्या बाजूला सुंदर बाग होती आणि त्याच्यापुढे मऊ रेतीचा लांबच लांब किनारा आणि जिकडे पाहाल तिकडे अफाट समुद्र आणि त्याच्यावर निळेभोर आकाश. खरोखर स्वप्नात असल्यासारखे वाटत होते. धावत जाऊन नवऱ्याला बोलावले आणि त्याचे कालचे शब्द मागे घ्यायला लावले, आणि हो एक सांगायचे राहिले. इथे व्यवस्थित दोन्ही बाजूला लिफ्ट होत्या. पण रात्री आम्ही त्या शोधायच्या मनस्थितीत नव्हतो. समोर जो जिना होता त्यांनी वर गेलो.

या अपार्टमेंटचे वर्णन  पाठवलेल्या माहितीत “हे नुसते बीच वर नाही, तर मावी मधल्या सगळ्यात सुंदर बीच वरती आहे”. असे केले होते. हे अगदी पटले. यात काही अतिशयोक्ती नव्हती. माझी निवड (अपार्टमेंटची तरी) चुकली नाही याचाही मला खूप आनंद झाला.

आजचा संपूर्ण दिवस आम्ही बीच वरती आणि पाण्यात काढला. इतकी सुंदर मऊ वाळू मी आतापर्यंत कुठेच पाहीली नव्हती. समुद्रही अगदी शांत आणि पाणी गरम होते. वारा अजिबात नव्हता आणि सुंदर सूर्यप्रकाश होता. यापेक्षा आणखी काय पाहिजे? दुपारचे लंच आम्ही समुद्राकडे बघत आमच्या बाल्कनीत घेतले. खूप दिवसांनी चविष्ट पपई, पेरू अशी फळ खायला मिळाली. संध्याकाळी सूर्यास्त पाहून  नाइलाजानीच तिथून निघालो.

त्यानंतर तयार होऊन  एका छानशा रेस्टॉरंटमधे जेवायला गेलो.

इथे बघण्यासारखे तर खरेच खूप होते पण आम्हाला आता फक्त दोन दिवस उरले होते. त्यामुळे आम्ही इथली सर्वात प्रसिद्ध अशी दोन ठिकाणे निवडली होती यामधून इथला जास्तीत जास्त भाग पाहायला मिळणार होता.

रोड टू हॅना

दुसर्‍या दिवशी लवकर उठून आम्ही  Hanna हया नावाच्या गावाकडे जाणारा प्रसिद्ध रस्ता पकडला. हा जवळजवळ  ८० किलोमीटरचा प्रवास होता. हा इथला अतिशय सुंदर रस्ता समजला जातो. हा संपूर्ण रस्ता हीच पहाण्याची जागा आहे. त्यामुळे हा रस्ता नुसता  वेगात प्रवास करून जाण्यासाठी नाहीये. त्याच्या एका बाजूला हिरवेगार रेन फॉरेस्ट आणि दुसर्‍या बाजूला समुद्र आहे. रस्ता खूप वळणाचा आणि अरूंद आहे. याच्या वरती  60, छोटे- छोटे पूल आहेत. म्हणजे तेवढेच या डोंगरावरून येऊन या पुलाखालून जाऊन ,समुद्राला मिळणारे झरे आहेत. प्रत्येक ३/४ किलोमीटर नंतर काही तरी सुंदर पाहण्यासारखे आहे. आम्ही स्वत:च्या कारने प्रवास करत असल्याने अशा प्रत्येक ठिकाणी थांबू शकत होतो. वाटेवरती अनेक धबधबे, सुंदर गार्डन्स, पोहता येतील अशी  स्विमिंग पूलसारखी सुंदर छोटी सरोवरे , बांबूचे एक मोठे वन, मोठ्या उंच डोंगरावरती ठिकठिकाणी केलेले लुकआउट पॉइंट, तर समुद्राच्या बाजूला सूर्यप्रकाशात. 

 सोन्या- चांदीसारखे चमकणारे वेगवेगळ्या रंगाच्या वाळूचे किनारे. कुठे आणि काय पाहू असे झाले होते. यातल्या सगळ्याचे सविस्तर वर्णन करणे अवघड आहे. हे प्रत्यक्ष बघायलाच पाहिजे. पण दोन गोष्टी मात्र फार उल्लेखनीय आहेत बांबूचे बेट आणि एक बोटॅनिकल गार्डन ज्याच्यामध्ये खास हवाई मध्ये उगवणारी फुले आणि झाडे बघायला मिळाली. ही नक्की बघा.

असे छोटे- छोटे स्टॉप करत  शेवटी Waianapanapa नॅशनल पार्क मध्ये पोचलो. याचा अर्थ चमकदार वाळू. इथली वाळू अगदी काळ्या रंगाची होती.  यात एका टोकाला इथल्या मोठ्या- मोठ्या खडकावरती समुद्राच्या लाटा आपटून कारंज्यासारख्या वरती उडत होत्या. हे पहायला फारच मजा येत होती. सगळी कडे व्यवस्थित सूचना लिहिलेले बोर्ड होते. त्यामुळे गाइडची गरज नाही पडली.

रस्त्याच्या एका बाजूला एका छोट्या गार्डन मध्ये ताजा ऊसाचा रस मिळत होता. कित्येक वर्षांनी मी अशा रसाचा आस्वाद घेतला. 

या ट्रिपमधे आधी गाइडबुक मध्ये माहिती वाचल्याचा फायदा झाला. या वाटेवरती पेट्रोल पंप आणि खाण्याच्या मोठ्या जागा नाहीत. असे त्यात सांगीतले होते. त्यामुळे आम्ही सकाळी निघताना दिवसभरासाठीचे खाणे, पिण्याचे पाणी आणि पेट्रोल टँक फुल करून घेतला होता. रस्ता अरूंद आणि खूप वळणाचा आहे. शिवाय प्रवाशांची खूप गर्दी असते. त्यामुळे गाडी चालवणे हे सोपे काम नाही.

शेवटी आम्ही Hana या गावामध्ये पोचलो. हे गाव मात्र काही सुंदर वाटले नाही. एक छोटा पडका किल्ला आणि जरा दुर्लक्षित छोटासा समुद्र किनारा एवढेच होते. इथे गेलो नसतो तरी चालले असते आणि थोडावेळही वाचला असता. खरे तर गाइडबुकमध्ये वाचले होते की रोड टू Hana या ट्रिपचा हेतू  Hana गावाला पोचणे असा नसून तिथपर्यंतचा रस्ता आणि त्याच्या आजूबाजूच्या गोष्टी यांचा आस्वाद घेणे असाच आहे. त्याऐवजी त्यांनी सरळ हे गाव इतके बघण्यासारखं नाही, असे सांगीतले असते तर बरं झालं असतं. 

या ट्रिपमध्ये आमचा सर्व प्रवास उत्तर आणि पूर्व किनार्‍यावरून होता.

वाटेत खूप ठिकाणी थांबल्यामुळे परत आमच्या अपार्टमेंट मध्ये येईपर्यंत रात्र झाली होती. तरीही आमच्या जवळच्या समुद्र किनार्‍यावर एक चक्कर मारलीच. चंद्राच्या प्रकाशात इथले पाणी आणि वाळू अगदी छान चमकत होते.

इथल्या तिसर्‍या आणि शेवटच्या दिवशी आम्ही हालेकेला (Haleakala) नॅशनल पार्क बघायला गेलो. याचा अर्थ सूर्याचे घर. हा ज्वालामुखी समुद्र सपाटीपासून १००२३ फूट उंचीवर आहे. त्यामुळे खूप दूर वरून दिसतो. हा जिवंत ज्वालामुखी आहे पण आमच्या नशीबाने सध्या तो निद्रिस्त होता. याच्या बद्दल खूप आख्यायिका आहेत. त्यातील एक म्हणजे. मावी नावाचा देव, दिवस लांब करण्यासाठी, सूर्याला अडवायला याच्या शिखरावर उभा राहला होता असे म्हणतात. 

इथला निसर्ग  काल बघितलेल्या निसर्गापेक्षा अगदी वेगळा होता. पण हासुद्धा खूप सुंदर होता. अर्धा डोंगर चढल्यानंतर वरती अजिबात झाडी नव्हती. पण इथल्या मातीतसुद्धा त्यातल्या विविध धातुंमुळे अगदी बघत राहावे  इतके वेगवेगळे रंग होते. बहुतेक ज्वालामुखीच्या बाजूला असेच असते. पायथ्यापासून वर जायला खूप वेगवेगळे रस्ते आहेत. आम्ही कारच्या रस्त्याने गेलो. इथे चालण्यासाठी खूप प्रकारचे ट्रेक आहेत. अर्थात ते करायला खूप वेळ पाहिजे. तसेच तिथले हवामान एका क्षणात खूप बदलू शकते त्यामुळे असे ट्रेक करताना खूप तयारी आणि काळजी घ्यावी लागते. नाहीतर तुम्ही खूप अडचणीत पडू शकता. कारण हा संपूर्ण परिसर खूपच मोठा आहे. इथल्या व्हिजिटर सेंटरमधे सर्व माहिती मिळू शकते. या पार्कच्या आतमध्ये कुठेही पेट्रोल पंप नाही, तसेच खाण्या पिण्याची विशेष सोय नाही. त्यामुळे सर्व बरोबर घेऊन जावे लागते. इथे आतमध्ये काही राहण्याची सोय दिसली नाही पण काही लोकं इथे तंबूमध्ये राहतात. सनराइज पॉइंटला जाऊन कुणाला इथे सूर्योदय बघायचा असेल तर बहुतेक वेळा आधी रिझर्वेशन करायला लागते. तसेच पार्क मध्ये शिरायच्या आधी इथली फी पण भरावी लागते. 

जरी खूप मोठे  ट्रेक केले नाहीत. तरी अगदी उंचावर पोहोचल्यानंतर वरती फिरून सर्व बाजूचा परिसर आणि खाली दिसणारा सुंदर प्रदेश दोन ते तीन तासात आरामात पाहता येतो. इथल्या मातीत खूप वेगवेगळे रंग आहेत. कदाचित चंद्रावर असेच असेल असे वाटले. वरती एक मोठी ऑब्जर्वेटरी आहे. पण त्याच्यामध्ये प्रवाशांना प्रवेश नाही.

समुद्र सपाटीपेक्षा इथले तपमान १५/२० डिग्रीने कमी असू शकते आणि वरती वाराही खूप असतो. त्यामुळे बरोबर योग्य ते कपडे आणि चालण्यासाठी भक्कम बूट हे न्यायला विसरू नका.

हे सर्व आरामात बघून आम्ही परत निघालो. फोटो तर कुठले काढू व कुठले नको असं झालं होतं.

या पार्क मधून बाहेर पडल्यानंतर आमच्या परतीच्या वाटेवर अचानक एक सुंदर  ज्यापनीज गार्डन दिसले. ही गार्डन्स मला फार आवडतात.  यामध्ये पाणी, त्यामध्ये  किंवा सरोवरात बांधलेले रंगीबेरंगी छोटे पूल, अतिशय कलात्मकतेने मांडलेले दगड किंवा वाळू यांचा इतका सुंदर मिलाफ असतो की बघतच राहावेसे वाटते. सगळ्यात मोक्याच्या जागेवरती टुमदार टी हाऊस किंवा पॅगोडा असतो. ही गार्डन्स बांधताना  निसर्गापासून मिळणार्या गोष्टीच वापरलेल्या असतात. हे सर्व इतके छान होते की एकदा आत गेल्यानंतर सर्व पूर्ण बघितल्याशिवाय बाहेर पडू शकले नाही. अशा गार्डनमध्ये फिरणे आणि तिथल्या निसर्गाशी एकरूप होणे हे मला तरी मेडिटेशनपेक्षा खूप आनंददायी  आणि उल्हासकारक वाटते. अशा ठिकाणी थोडा जरी वेळ काढला तरी शरीराला आणि मनाला खूप ऊर्जा मिळते.

लोकांनी जर का रोज थोडे जरी बागेत काम केले तर  डिप्रेशनचा प्रॉब्लेम खूपच कमी होईल. निसर्गामध्ये जी काही हीलिंग पॉवर आहे ती कधी- कधी औषधांमध्ये सुद्धा मिळत नाही.

गेले तीन दिवस खूप छान गेले होते. रवीला बरेच ड्रायव्हिंग करायला लागले  पण त्यामुळे थोड्या दिवसात खूप बघून झाले, तेसुद्धा अगदी आरामात.

शेवटच्या दिवशी  सर्व सकाळ आमच्या जवळच्या बीच वरती काढून आम्ही पुन्हा  विमानतळावर पोचलो. तिथे कार परत करून  होनोलुलूची फ्लाइट घेतली.

इथले सर्व दिवस खूप छान गेले होते. खरं तर इथे आणखी दोन/तीन दिवस तरी हवे होते.

होनोलुलूला आल्यानंतर टॅक्सीने हॉटेलवरती पोचलो. इथे कार नको असे ठरवले होते आमचे हॉटेल इथल्या प्रसिद्ध  वायकीकी बीच वरती होते. आमच्या रूमच्या खिडकीतून समोरचा समुद्र किनारा आणि त्याच्या भोवती असलेले गार्डन दिसत होते. इथे काय करायचे खरं तर आधी ठरवले नव्हतं. त्यामुळे प्रथम हॉटेलचे ट्रॅव्हल डेस्क गाठले. इथे पण मला तीनच दिवस होते आणि बघण्यासारखं मात्र खूप होतं. सर्व माहिती काढून आम्ही तीन गोष्टी  करायच्या ठरवल्या. हेलिकॉप्टरने वरून बेट बघायचं. एक दिवस कार रेंट करून संपूर्ण बेटाला चक्कर मारायची. उरलेला वेळ होनोलुलूमध्ये काढायचा. इथे मुख्य बघण्यासारखे म्हणजे इथली बीचेस आणि पर्ल -हार्बर मॉन्युमेंट. हेलिकॉप्टर ट्रिप आज दुपारीच करू शकत होतो म्हणून लगेच बुकिंग केले. आज वेदर पण चांगली होती त्यामुळे ही ट्रिप कॅन्सल होण्याची शक्यता नव्हती.

हेलिकॉप्टरची ट्रिप एक तासाची होती. आत बसायच्या आधी त्यांनी आम्हाला विचारले की तुम्हाला तुमच्या बाजूचे दार उघडे ठेवायचे का बंद करायचे मी ताबडतोब बंद आणि मा‍झ्या नवऱ्याने उघडे असे पटकन सांगीतले.

हे बेटसुद्धा ज्वालामुखीचं आहे. वरून दिसणारा देखावा म्हणजे अगदी सुंदर बर्ड्स आय व्ह्यू होता. एका बाजूला ज्वालामुखीचे क्रेटर- डायमंड हेड, मध्ये उंचच उंच डोंगर आणि खोल दर्या त्यामध्ये रेनफॉरेस्ट, सर्व बाजूंनी समुद्र आणि वेगवेगळ्या रंगांचे वाळूचे किनारे, सेकंड वर्ल्ड वॉर मुळे प्रसिद्ध झालेले पर्ल हार्बर, होनोलुलूमध्ये उंच इमारती तर बाकीच्या बेटावर छोटी -छोटी घरे आणि सपाट जमिनीवरती अननसाची शेती असा मस्त देखावा दिसत होता.

आम्हाला हेडफोन वापरायला दिले होते ते कानाला लावून आम्ही  पायलटने केलेली कॉमेंट्री ऐकत होतो. हेलिकॉप्टर चालवता- चालवता तो कुठे काय बघायचे दाखवत होता आणि वर्णन सांगत होता. इथल्या जंगलांमध्ये जुरासिक पार्क या प्रसिद्ध हॉली वूड सिनेमाचे शूटिंग केले होते. हेलिकॉप्टरच्या सोयीमुळे संपूर्ण बेट एका तासात वरून पाहून झाले. माझी ही हेलिकॉप्टरची दुसरी ट्रिप होती. याआधीची ट्रिप मी अलास्कामधे ग्लेशियर बघण्यासाठी केली होती. त्या ट्रिपमधे तर हेलिकॉप्टर  ग्लेशियरवरती उतरले पण होते. हेलिकॉप्टर ट्रिपनंतर संध्याकाळी थोडा हॉटेल जवळचा परिसर पाहून आरामात जेवण केले. 

दुसर्‍या दिवशी ब्रेकफास्ट नंतर तीन/चार तास वायकीकी बीच वर काढले हा बीच खूप लोकप्रिय असल्यामुळे माविपेक्षा इथे खूप गर्दी होती. पण पोहण्यासाठी वेगळी जागा होती. बाकीच्या बीच वरच्या एक्टिविटीज, सर्फिंग , वॉटरबोर्डिंग. जेट-स्की या सर्व जोरात चालू होत्या. माझ्या  अनुभवाप्रमाणे जे समुद्रकिनारे सर्फिंगसाठी अनुकूल असतात ते आमच्या सारख्या फक्त स्विमिंग पूलमध्ये पोहू शकणार्‍या लिंबूटिंबूसाठी फारसे उपयोगी नसतात. कारण तिथे प्रचंड लाटा आणि खूप वाराही असतो. लंचनंतर पर्ल हार्बर परिसर आणि म्युझियम बघायला गेलो. ६ डिसेंबर १९४१ साली जपानी एअर फोर्सने पर्ल हार्बरच्या अमेरिकन नौदलाच्या बेसवरती अचानक हल्ला केला. यामध्ये जवळजवळ, २५०० सैनिक दिवंगत झाले तसेच नौदलाचेही खूप नुकसान झाले. याचा परिणाम म्हणजे अमेरिका दुसर्‍या महायुद्धात उतरली. त्यानंतर ६ आणि ९ ऑगस्ट १९४५ साली अमेरिकेनी हिरोशिमा आणि नागासाकी याच्या वरती अणुबॉम्ब टाकला. यामध्ये जवळ तीन मिलियन लोक मृत्युमुखी पडले. वाचलेल्या पैकी कितीतरी लोकांना नंतर कॅन्सर आणि रेडिएशनच्या संपर्कांमुळे मुळे होणार्‍या व्याधी जडल्या. यानंतर जपानने शरणागती पत्करली. या पूर्वी हिरोशिमामध्ये मी ते बेचिराख झालेले शहर आणि तिथले मेमोरियल हे पण पाहीले होते, आणि आज  ज्यामुळे हिरोशिमा घडले ते पर्ल हार्बर बघत होते. आज तिथे असताना मी फक्त कल्पना करू शकत होते की त्यावेळी  लोकांनी काय- काय सहन केले असेल? दोन्हीकडेही मृत्यूने थैमान घातले होते एका ठिकाणी जास्त सैनिक मारले गेले तर दुसर्‍या ठिकाणी सामान्य नागरिक. पण त्यांना आपण काहीही लेबले लावली तरी शेवटी ती सगळी माणसंच. कुणाची तरी मुलं, कुणाची तरी भाऊ अथवा बहीण, कुणाची तरी माता पिता. ही अशी वॉर मेमोरियल पाहताना मला फार वाईट वाटते. प्रत्येक देशात अशी आहेत. तरीसुद्धा पुन्हा- पुन्हा युद्धे का होतात याचे उत्तर मला वाटते अजून तरी कुणाला सापडलं नाहीये. आपल्याला नुसते सांगीतले जाते की एकदा केलेल्या चुका परत करू नका. प्रत्यक्षात हे कोणीच कसे ऐकत नाही? मला हे मान्य आहे काही युद्धे टाळणे अशक्य आहे. पण काही नक्की शक्य असतील. पण हा एक वेगळाच विषय आहे. 

यानंतर इथल्या एका हॉलीडे रिझॉर्टमध्ये जेवताना  हवाईयन डान्स आणि म्युझिकची झलक पाहायला मिळाली.

तिसर्‍या दिवशी सकाळी लवकर ब्रेकफास्ट करून आमची कार ताब्यात घेतली. त्याआधी आम्ही साधारणतः आमचा प्लॅन ठरला होता. प्रत्यक्ष प्रवासाला किती वेळ लागेल याची पूर्ण कल्पना नसल्यामुळे  आधी ठरवल्या पैकी जितके जमेल तेवढे  बघायचे असे ठरवले. 

प्रथम आम्ही बेटाच्या पश्चिम किनार्‍यावरून निघालो.

मागच्या वेळेप्रमाणेच  जिथे कुठे स्टॉप दिसतील तिथे थांबून आसपासचा परिसर पाहून घेतला. वाटेमध्ये खूप सुंदर समुद्रकिनारे, गार्डन्स होती. पहिल्यांदा लागले ते गार्डन इथल्या ज्वालामुखीच्या म्हणजे डायमंड हेडच्या पायथ्याला. इथून त्याचे छान फोटो काढता आले. त्यानंतर एका कड्यावरती व्ह्यू पॉईंटला थांबलो. तिथून खालच्या समुद्रामधील कोरल्स छान दिसत होती. हेलिकॉप्टर राइडमध्ये ही आम्ही आकाशातून बघितली होती.

त्यानंतर कहाला इथल्या, हवाईच्या बेवर्ली हिल समजल्या जाणार्‍या भागातील श्रीमंत लोकांची  समुद्रकिनार्‍यावरील आलिशान घरे बघून पुढे गेलो.

त्याच्या पुढचा स्टॉप होता. हॅलोना ब्लोहोल. इथे लावाच्या ट्यूबमधून 30/40 फुट वरती उडणारी समुद्राच्या पाण्यातील कारंजी आहेत, ही खूपच विलोभनीय होती. भरतीच्या वेळा आणि वारा जास्त असल्यास ही जास्तीत जास्त उंच उडतात. ही इतकी सुंदर आणि मजेशीर दिसत होती की त्यांच्याकडे पहातच बसावे असे वाटत होते.  पण वेळ कमी असल्याने थोडा वेळ थांबून पुढे निघालो.

इथून निघाल्यानंतर आम्ही कहालूमधल्या, टेंपल मेमोरियल पार्क मधल्या. Byodo in टेंपलला पोचलो. हे बघण्याची मला फार उत्सुकता होती. ही जपान मधल्या १००० वर्ष जुन्या असलेल्या वर्ल्ड हेरिटेज साइट UJI  इथल्या टेंपलची प्रतिकृती आहे. ७ जून १९६८ ला पहिली जपानी लोकं हवाई मध्ये येऊन १०० वर्ष पूर्ण झाली. त्याचा गौरव करण्यासाठी हे टेम्पल बांधले. हे टेम्पल आणि त्याचा परिसर खरंच फार सुंदर आहे. जगातल्या सर्वात सुंदर वीस जपानी टेम्पल मधले हे एक समजलं जाते. या टेंपलच्या परिसरात पुष्कर टीव्ही सीरीजचे शूटिंग झाले आहे. तसेच हा परिसर लग्न सोहळ्यासाठीसुद्धा वापरला जातो. इथे मात्र आम्ही सर्व काही अगदी सावकाश बघितले. हे टेंपल आणि हा परिसर मी कधीच विसरणार नाही. त्याचे फोटो माझ्या कॅमेरात असले तरी ते मा‍झ्या मनावरती कोरले गेलेत. मी डोळे मिटून ते कधीही मा‍झ्या मन:पटलावर पाहू शकते.

इथे बराच वेळ गेल्यामुळे आम्ही आता होनोलुलुकडे परत जायचे ठरवले. पण थोडे पुढे गेल्यानंतर वाटेमध्ये पॉलिनेशियन कल्चरल सेंटर अशी एक पाटी दिसली. हे काय आहे ते बघावे  म्हणून आत गेलो तर खूपच मोठा परिसर दिसला. गाडी पार्क करून आत गेलो. आत प्रत्येक पॉलिनेशियन कंट्रीचे वैशिष्ठ्य दाखवणारे प्रदर्शन वेगवेगळ्या दालनांमध्ये होते. यामध्ये त्यांची भाषा, वेषभूषा, त्यांचे फूड, आणि सुंदर आर्ट वर्क असे सगळे सर्व माहितीसकट मांडलेले होते. हे सगळं बघून मग तिथे जेवण केले. तसेच एक बोट ट्रिपही केली. हे आम्हाला अगदी योगायोगानेच पाहायला मिळाले. त्यामुळे परतायला उशीर झाला तरी चालेल असा विचार करून सर्व बघितले. या सर्व देशाविषयी एका ठिकाणी इतका माहितीचा खजाना ही मला एक पर्वणीच वाटली.

इथून बाहेर पडल्यानंतर मात्र आता वाटते कुठेही न थांबता हॉटेलमध्ये परत जायचे असा निश्चय केला. आम्ही कार फक्त एक दिवसासाठी घेतली होती त्यामुळे ती त्या रात्री परत करायची होती. या वेळी आम्ही बेटाच्या दुसर्‍या बाजूने परत आलो. तो रस्ताही खूप वळणाचा आणि घाटातून होता. वाटेमध्ये पाईनअॅपलच्या खूप बागा लागल्या. त्याला डोल प्लांटेशन असे म्हणतात. ही इथे खूप प्रमाणात आहेत ती मात्र वेळे अभावी आम्ही लांबूनच बघितली. एका दिवसात आम्ही  संपूर्ण आयलँडला चक्कर मारली होती.

होनोलुलूमध्ये  परत आल्यावर एक मोठाच प्रॉब्लेम समोर आला. सकाळी आम्ही ज्या रस्त्याने आलो होतो त्यातले बरेच आता बंद केले होते. त्यामुळे कार परत करण्यासाठी तिथे पोहोचायचे कसे हा प्रश्न पडला. दोन/तीन वेळा परत मागे फिरावे लागले. शेवटी एका ठिकाणी थांबून ट्रॅफिक पोलीसालाच विचारले. तेव्हा त्याने सांगीतले आज इथे हवाई डे चे सेलीब्रेशन असल्यामुळे हे सगळे रस्ते ट्रॅफिकला बंद केले आहेत. मग त्यालाच विचारले आम्ही या कारच्या ऑफिसकडे जायचे कसे? शेवटी ते ऑफिस बंद व्हायच्या आधी  कसे बसे पोचलो आणि सुटकेचा निश्वास टाकला. ते बंद झाले असते सकाळी परत उघडे पर्यंत कार कुठे ठेवायची हा प्रश्न आला असता आणि आणखी एक दिवसाचे भाडे पण द्यावे लागले असते. आमचे हॉटेल अगदी बीचवरती असल्यामुळे जवळ पार्किंग नव्हते.

पटकन रूम मध्ये येऊन फ्रेश झालो आणि अनपेक्षितरीत्या मिळालेल्या हवाई डेचे सेलीब्रेशन बघायला बाहेर पडलो. हे अगदी प्लेजंट प्लेझट सरप्राइज होते. आधी याची मला काहीच कल्पना नव्हती. आमच्या हॉटेलसमोरचा समुद्राच्या काठीचा  दोन मैल रस्ता पूर्ण बंद केला होता. त्याच्यावर आता वेगवेगळ्या प्रकारचे फूडचे स्टॉल्स आणि एक मोठे स्टेज उभारले होते.  सकाळी दुसर्‍या बाजूने गेल्याने आम्हाला यातले काही दिसले नव्हते. संपूर्ण परिसर माणसांनी भरलेला होता. खाण्यासाठी काही पदार्थ घेऊन स्टेजच्या बाजूला जागा पकडली. त्यानंतर खाण्याबरोबरच हवाईयन कल्चरल प्रोग्रामची मेजवानी पाहायला मिळाली. आमच्या शेजारी बसलेल्या लोकांकडून माहिती कळली की यातले काही सिंगर्स  आणि अॅक्टर्स हवाई मधले खूप प्रसिद्ध लोक आहेत. अगदी अनपेक्षितपणे आमच्या हवाईतल्या शेवटच्या रात्री आम्हाला दुर्मिळ संधी मिळाली याबद्दल देवाचे आभार मानत समोरचा प्रोग्राम पाहात इथल्या चविष्ट पदार्थांवर ताव मारला. रेस्टॉरंटमध्ये गेलो असतो तर खाण्याचे इतके वेगळे पदार्थ एका ठिकाणी मिळाले नसते. आजचा दिवस छान गेला होता पण त्याचा शेवट पण अनपेक्षित स्ट्रीट पार्टीची भेट देऊन गेला.

रात्री उशिरा परत आल्यानंतर पॅकिंग केले. दुसर्‍या दिवशी सकाळी आम्हाला  लंडनकडे जाणारी फ्लाइट पकडायला  जायचे होते. परतीचा प्रवास खूप लांबचा असल्याने आम्ही लॉसएंजेलिसला एका रात्रीचा मुक्काम करायचे ठरवले होते. त्या दिवशी संध्याकाळी तिथे पोचलो. दुसर्‍या दिवशी रात्री उशीरा आमची लंडनची फ्लाइट होती. त्यामुळे दिवसभर तिथल्या मॉलमध्ये बरीच खरेदी करून संध्याकाळी एअर पोर्टला गेलो.

इथे जायचे असे मी खूप वर्षं ठरवत होते. ते माझे स्वप्न पूर्ण झाले. हा सर्व प्रवास अगदी सुरळीत झाला आणि आम्ही बघितलेली दोन्ही हवाईयन बेट इतकी सुरेख निघाली,कि यात मला शोधूनसुद्धा काही न्यून सापडले नाही. 

मी सुरुवातीला म्हणल्याप्रमाणेच  मी खरोखरच पृथ्वीवरचा स्वर्ग पाहून आले होते. 

- मीना कुलकर्णी, सरे, यु. के. 


२.४ सुंदर ते स्कॉटलंड (पुष्कर उज्जैनकर)

सुंदर ते स्कॉटलंड 

पुष्कर उज्जैनकर (धक्का मार पुष्कर!)

बरोब्बर सकाळी ७ वाजता गणरायाच्या नावासोबत आमचा सगळ्यांचा म्हणजे मी, स्नेहल, आई आणि बाबा ह्यांचा प्रवास विल्मस्लोपासून ते स्कॉटलंडच्या दिशेने. आई बाबा तर उत्सुक होतेच पण त्यासोबत आम्ही देखील होतो. कारण आमचा पण हा पहिलाच प्रवास स्कॉटलंडला. त्यात आम्ही नवीन गाडी देखील घेतली होती. होती सेकंड हँड पण आमच्यासाठी नवीनच.

"पृथ्वीवर स्वर्गासारखी जागा कुठे आहे?" असा प्रश्न जर कुणी विचारला, तर डोळ्यांसमोर उभी राहते ती स्कॉटलंडचे निळेभोर तलाव (Lochs), ढगांशी संवाद साधणारे डोंगर (म्हणजे अक्षरशः डोंगरांवर ढग लोळत पडले आहेत असं वाटत होतं) आणि सुंदर रस्ते. २०२४ साली मी माझ्या कुटुंबासोबत स्कॉटलंडचा एक पाच दिवसांचा प्रवास केला, जो माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर अनुभवांपैकी एक ठरला.

कारने प्रवास करताना वाटेत बदलणारे निसर्गाचे रंग मनाला मोहून टाकत होते. स्कॉटलंडच्या सीमेत शिरताच वातावरणात एक वेगळाच गारवा आणि ताजेपणा जाणवला. 

स्कॉटलंडमधील पहिल्याच दिवशी आम्ही लेक लोमंड (Loch Lomond) ला भेट दिली. हा युकेमधील सर्वात मोठा तलाव आहे. या तलावाच्या काठाने ड्राइव्ह करताना उजव्या हाताला दिसणारे निळे पाणी आणि सभोवतालचा डोंगर बघून आपण एखाद्या हॉलिवूडपटात आहोत की काय, असा भास होतो.


आम्ही ज्या दिवशी प्रवास सुरू केला त्या दिवशी बाबांचा वाढदिवस होता (१६ सप्टेंबर). त्यांना माहित नव्हतं आम्ही आधीच गुपचुप केक घेऊन ठेवला होता. Loch Lomond ला पोहोचल्यावर छान एक बाक बघून तिथे आम्ही सगळे बसलो आणि हळूच केक बाबांपुढे सरकवला. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघण्यासारखा होता. Loch Lomond च्या बाजूला आणि निसर्गाच्या कुशीत आम्ही केक कापत होतो. बाबा खुश तर आई जास्त खुश झाली होती त्याचं कारण म्हणजे आम्ही जेव्हा Loch Lomond ला पोहोचलो तेव्हा तिथे एक लग्न सुरू होतं आणि त्यांनी खास bagpiper चा बँड बोलावला होता. स्कॉटलंडची जी खासियत आहे की किल्ट घालून चालणारे bagpipers आणि त्यांचं सुरेल संगीत तुमच्या अवतीभवती, अगदी तेच आम्हाला अनुभवायला मिळत होतं. त्यामुळे आमचा वाढदिवस साजरा करणं तर छानच सुरू होतं. 

त्यानंतर आम्ही ग्लेन को (Glen Coe) माउंटेन्सच्या दिशेने निघालो. इथला रस्ता छोटा असला तरी निसर्ग मात्र अथांग होता. जिकडे बघावं तिकडे त्याच्या पर्वतरांगा आणि त्यातून चालणारी आमची छोटीशी कार. शब्दात मांडणं पण कठीण आहे इतका छान प्रवास आमचा सुरू होता आणि त्यात आई बाबांना आवडतील म्हणून मध्ये मध्ये किशोर कुमार, रफी अशी गाणी देखील सुरू होती. 

आमचा मुक्काम त्या रात्री फोर्ट विल्यम (Fort William) मधील एका 'स्टॅटिक कॅराव्हॅन' (Static Caravan) मध्ये होता. तसं आम्ही फोर्ट विलियम ला पोहोचलो. आमच्यासाठी पण नवीनच होतं. आम्हीदेखील पहिल्यांदा त्याच्यात राहणार होतो. घरासारख्या सर्व सोयी असलेल्या या फिरत्या घरासमोरून दिसणारा सूर्यास्त डोळ्यांचे पारणे फेडणारा होता. आम्ही जवळ जवळ तासभर सूर्यास्त, आकाशाचे रंग आणि समोर असणारा अथांग तलाव बघत होतो. अगदी तलावासमोर म्हणजे Loch Linhe समोर ती स्टॅटिक कॅराव्हॅन म्हणजे आमचं तीन दिवसांचं घर होतं. त्यात आम्ही राहणार होतो. आणि गेल्या गेल्या आम्हाला जे दृश्य दिसलं ते बघूनच आम्ही सगळे म्हणालो उत्तम निर्णय. गाडीच्या डीक्कित आम्ही आवर्जून काही गोष्टी घेतल्या होत्या त्यात कुकर, डाळ, तांदूळ, पोहे आणि मसाले. जेणेकरून आई बाबांची जेवणाची सगळी सोय होईल.

फोर्ट विल्यम हे पर्यटकांसाठी एक केंद्रस्थान आहे. असं आमच्या मित्रांनी सांगितलेलं आणि अगदी तसंच होतं. दुसऱ्या दिवशी तिथून आम्ही विविध ठिकाणी भटकंती केली. इंग्लंड सारखेच स्कॉटलंडमधील लोक देखील आरोग्याप्रति खूप जागरूक आहेत; तिथे अनेक लोक ट्रेकिंग, सायकलिंग, बोटिंगचा आनंद घेताना दिसत होते. सुरुवातीला ते बघून आम्हाला लाज वाटत होती की आपण काहीच करत नाही पण नंतर सारखं सारखं बघून ती लाज देखील गेली की लोक हेच करतात इकडे. त्यामुळे ठीक आहे. वाटेत अनेक ठिकाणी बेरीजची (Berries) झाडं आणि डोंगरातून वाहणारे स्वच्छ पाण्याचे झरे मन प्रसन्न करत होते. बाबा जास्त व्यक्त होत नाही आईसारखे पण त्यांच्याकडे बघून कळत होतं की खुश आहेत ते. 

दुसऱ्या दिवशी आम्ही Cairngorm Mountain, रेनडीअर सेंटर आणि Loch Morlich फिरलो. Cairngorm Mountain ला आम्ही सकाळी सकाळी गेलो पण इंग्लंड सारखंच स्कॉटलंडचं वेदरदेखील अनप्रेडिक्टेबल. आम्ही वर गेलो म्हणजे बेस स्टेशन (६३५ मीटर ) च्या इथे पोहोचलो आणि गाडी पार्क केली. गाडीच्या बाहेर पडलो आणि जोरदार हवा तिकडे. आम्ही ढकलले जाऊ लागलो इतकी हवा. तापमान अगदी १-३ असेल. आई बाबा पूर्ण पॅक झाले. आम्हीपण पूर्ण पॅक झालो. कारण गार हवा गाडीच्या किल्लिवरचं lock button पण दाबू देत नव्हती इतक्या जोरात सुरू होती. कसं बसं आम्ही तिथल्या प्रसिद्ध आणि स्कॉटलंडमधील एकमेव ट्रेन जवळ पोहोचलो ती म्हणजे Funicular train. जी तुम्हाला बेस स्टेशनपासून म्हणजे ६३५ मीटर पासून टॉप स्टेशन (१०९७ मीटर) ला दहा मिनिटांमध्ये घेऊन जाते. पण दुर्दैवाने ती बंद होती. दुर्दैवाने की सुदैवाने असा आम्ही विचार केला कारण खाली जर इतकी हवा होती तर वर पूर्ण वाट लागली असती हे आम्हाला खालीच लक्षात आलं होतं. मग आम्ही तिथे कॅन्टीनला जाऊन गरम सूप आणि ब्रेड खाऊन आलो. तिथे फायर प्लेसला छान आग सुरू होती. उबदार होतं ते कॅन्टीन  छान. त्यामुळे तिथे थांबलो आणि आम्ही निघालो रेनडीअर सेंटरच्या दिशेने. स्कॉटलंड मधला प्रवास हा अंतराने कायम मोठा असतो. प्रवास वर्णनात वाचताना छोटा वाटतो पण बराच मोठा असतो. म्हणजे रोजचे ३०० ते ३५० किलोमीटर चा प्रवास आमचा होत होता. आम्ही रेनडीअर सेंटरला भेट दिली की रेनडीअरने आम्हाला भेट दिली ते काही कळलं नाही. कारण मी जिथे उभो होतो तिथेच सगळे रेनडीअर समोर येऊन उभे राहिले. आणि घे एकदाचे फोटो असं म्हणत असावेत किंवा आपल्यातलाच एक दिसतोय असं म्हणत असावेत! असो पण भेट छान झाली. संध्याकाळी छान loch Morlich ला बसून कॉफी घेतली. (कॉफीच घेतली बरका!!) आणि तिथून परत फोर्ट विलियमला येऊन आम्ही मुक्काम केला. एकंदरीत त्या दिवशी लक्षात आलं की वातावरण काही छान मिळणार नाहीये आपल्याला आणि तशी आम्ही सगळ्यांनीच मनाची तयारी केली होती. 


तिसऱ्या दिवशी आम्ही निघालो ते Isle Of Skye ह्या बेटाच्या दिशेने. जो स्कॉटलंडचाच भाग आहे. जाताना आम्ही गाडीने गेलो आणि येताना फेरीने परत आलो. Isle of Skye ला जाताना Eilean Donan castle बघायला थांबलो. पण तो किल्ला बघायला जात असताना रस्त्यात लघु शंका आणि नाश्ता करण्यासाठी आम्ही थांबलो. तशी एकांत जागा होती. आजुबाजूला काहीच घरं नाही की दुसरे हॉटेल नाही. एक पेट्रोल पंप आणि हॉटेल बास. आजूबाजूला सगळ्या पर्वतरांगा. आम्ही रिस्कघेऊन तिथे थांबलो. पण थांबण्याचा निर्णय अतिशय योग्य होता हे आम्हाला आत जाऊन कळलं. कारण नाश्त्याला भारतीय समोसे आणि मसाला चहा होता. आणि नुसतेच नव्हते तर चवीला पण तितकेच भारतीय होते म्हणजे छान होते. आम्ही सगळे प्रचंड खुश झालो होतो की स्वर्गात अजून छोटा स्वर्ग सापडला. पोटभर खाऊन, आनंद व्यक्त करत आम्ही तिथून Eilean Donnan castle बघायला पोहोचलो. पण तिकीट ऐकून बाबा तडक म्हणाले की बाहेरूनच बघू इतकं काही नाही. आईची पण संमती त्याला होती. तिथे आम्ही काही फोटो काढले. त्या कॅसलचं एक वैशिष्ट्य आम्हाला माहिती आहे म्हणजे 'कुछ कुछ होता है ' ह्या गाण्याचं शूटिंग इथे झालं  आहे म्हणून तिथे शाहरुख पोजमध्ये काही फोटोज् काढले आणि निघालो Isle of Skye च्या दिशेने. जाताना Skye Bridge वरून मुद्दाम ह्या बेटावरून त्या बेटावर आम्हाला जायचं होतं म्हणून तो रस्ता आम्ही निवडला. त्या पुलावरून जाताना खरच असं वाटतं की तुम्ही आकाशात जाताय पण ते काही सेकंदच वाटतं आणि परत तुम्ही जमिनीवर येता. आणि तिथून Portree ला गेलो जी Isle of Skye ची राजधानी आहे. खरं सांगायचं तर तो अनुभव काही इतका खास नव्हता पण तरी तिथे थोडावेळ घालवला आणि तिथून आम्ही Harry Potter च्या Hogwarts Express ला बघण्यासाठी निघालो आणि ते म्हणजे Glenfinnan Viaduct ला. त्यासाठी आम्ही Portree वरून ferry boat केली आणि तिथून परत स्कॉटलंड ला म्हणजे Mallaig उतरून आम्ही ती express बघायला गेलो. त्या फेरी बोटीचं ऑनलाइन बुकिंग  होत नव्हतं पण सुदैवाने आम्हाला त्यात ऑन द स्पॉट जाऊन जागा मिळाली. त्या एक्सप्रेस ची वेळ बघून आमचा सगळा प्लॅन सुरू होता. तसं आम्ही तिथे पोहोचलो. पण तिथे पोहोचल्यावर लक्षात आलं की आई बाबांसाठी ते चालणं आणि चढणं खूप कठीण होतं म्हणून आम्ही त्यांना खाली थांबवून दोघे वर चढत गेलो. ट्रेन आम्हाला दिसली पण उलट्या बाजूने दिसली. आमचं नशीब खराब होतं कारण वर चढेपर्यंत काहीच पाऊस नव्हता पण वर पोहचलो आणि ट्रेन यायच्या बरोब्बर ३० सेकंद आधी धो धो पाऊस पडायला लागला. पण ट्रेन दिसली त्यात आनंद आम्ही मानला. हा सगळा दौरा मी माझ्या YouTube चॅनलवर टाकला आहे. पण ट्रेन गेल्यावर आम्हाला त्या सुंदर पुलाच्या अवतीभवती २ मोठ्ठे इंद्रधनुष्य दिसले. मी कधीच इतके मोठे इंद्रधनुष्य पाहिले नव्हते ते पण एकदम २ आणि तेही खूप प्रखर. म्हटलं चला इतक्या वर येऊन काही तर सार्थकी लागलं. हे सगळं करून आम्ही परत फोर्ट विल्यमला मुक्कामाला गेलो. 

चौथ्या दिवशी आम्ही सकाळी लवकर उठून तळ्याजवळ थोडं फिरून घेतलं, कारण आमचा तो मुक्काम शेवटचा होता त्या स्टॅटिक कॅराव्हॅनमधला आणि तो निसर्ग परत अनुभवायला परत मिळणार नव्हता. पण मनात सगळं साठवून आम्ही निघालो Ben Nevis च्या दिशेने जायला. Ben Nevis तसं मुक्कामाच्या ठिकाणापासून जवळ होतं. आम्ही घरीच नाश्ता केला आणि तिकडे जायला निघालो. Ben Nevis चे वैशिष्ट्य म्हणजे तिथे Gondola आहे वर जाण्यासाठी म्हणजे केबल कार किंवा रोपवे आहे. त्याने आम्ही वर जाणार होतो. तर Cairngorm Mountain ला आमची जी हालत झाली होती तीच हालत आमची इथे पण झाली. जोरदार हवा, प्रचंड थंडी आणि त्यात पाऊस पण होता. आम्ही दोन दोन तीन तीन कपड्यांचे लेयर घातले आणि वर जाण्यासाठी निघालो. पण तरी थंडी वाजत होती. तिकीटे काढण्यासाठी आम्ही तिथे काउंटर वर गेलो आणि तिथल्या बाईने आम्हाला वॉर्निंग  दिली की सीनियर सिटिजनला वर नेऊ नका कारण इथे १-२ तापमान आहे तर वर कमीत कमी ० ते -३ असेल. तर तुम्ही विचार करा. आम्ही एकमेकांशी बोललो की वर जाऊन बघू आणि नाही जमलं तर लगेच खाली येऊ. इतकी तयारी केली होती आम्ही कपड्यांवर कपडे घालून तर जाऊन तर येऊ. बाकी बघू. असं म्हणून आम्ही निघालो. गोंडोलाचा प्रवास तसा मस्त होता. ती गोंडोला थांबत नाही त्यात ती सुरू असतानाच बसायचं असतं. आम्हाला आईची काळजी होती की तिला जमेल का नाही पण तिने जमवलं. वर जातानाचं दृश्य मस्त होतं एकदम. छान वेळ जात होता. जवळ जवळ २५ मिनिटांनी आम्ही वर पोहोचलो. आणि त्या तिकीट काउंटर वाल्यांनी जसं सांगितलं होतं तसंच झालं. तुफान पाऊस, तुफान थंडी आणि जोरदार हवा. आई बाबांना त्रास व्हायला लागला पण सुदैवाने तिथे कॅन्टीन होतं. तिथे ते जाऊन बसले. आणि दोघांनी कॉफी घेतली. 

मी आणि स्नेहलने विचार केला की इतकं आलो आहोत तर मेन पॉइंट जाऊन बघूया. म्हणून आम्ही निघालो तर तडक पावसाने भिजवून, हवेने सपके देऊन आणि थंडी ने गोठवून आमचं स्वागत केलं पण तरी मी सुरुवातीला जसं म्हटलं की सगळे व्यायाम करत असतात, पळत असतात तसे काही उत्साही मंडळी होतेच आणि त्यांना बघून आम्ही जबरदस्तीचा उत्साह आमच्या अंगात संचारावून घेतला आणि मेन पॉइंटसाठी निघालो. जाताना पूर्ण वाट लागत होती. हात पाय थंडीने चालत नव्हते, पावसाने आम्ही गच्च भिजलो होतो आणि हवा ढकलत होती. असं कसं बसं करत करत मेन पॉइंटला गेलो. जाऊन काहीच उपयोग झाला नाही कारण ढगांमुळे दिसत तर काहीच नव्हतं उलटं थंडीने वाट लागली होती. आम्ही साधारण २ तास हे करत होतो त्यामुळे भूकपण तुफान लागली होती. कसंबसं परत कॅंटीनला पोहोचलो. आणि आई बाबा काळजी करत बसले होते. आम्हाला पाहून पहिले तर त्यांना अजूनच कसंतरी झालं कारण आम्ही गच्च ओले होतो जॅकेट्स असून देखील. जीन्स तर सगळी ओली आणि जॅकेटमधून पण आत पाणी गेलं होतं. चेहरा हात सगळं सपक्यांमुळे लाल झालं होतं. आम्ही पटापट हीटर समोर जाऊन बसलो आणि वाळत होतो. आम्ही पण कॉफी घेतली आणि तिथून निघू असं म्हणालो. पण वाटलं जेवणाची वेळ झाली आहे तर विचारून घेऊ काही खायला आहे का! तिथल्या माणसाला विचारलं की आज मेनू काय आहे तर तो म्हणाला १५-२० मिनिट्स मध्ये कळेल. म्हणून आम्ही ठरवलं की आपण थांबूया. आणि १५-२० मिनिटांनी बघतो तर काय की जसा देव बाप्पा प्रसन्न व्हावा तसं झालं. जेवायला आपल्या फुलकोबीची भाजी, भारतीय पद्धतीने बनवलेली, ज्यात छान खोबऱ्याचा कीस घातलेला थोडी रस्सा असलेली आणि सोबत गरमा गरम भात. मग काय सगळी थंडी, ओलावा सगळं सगळं गायब. प्रत्येकाने एक प्लेट घेतली पोटभर जेवलो आणि मग तिथून निघालो. आई अन्नपूर्णा प्रसन्न!

 खाली गेलो आणि पुढच्या प्रवासासाठी निघालो. Loch Ness बघायला. Loch Ness हा स्कॉटलंड मधला सगळ्यात मोठ्या तलावांमधला एक. या तलावात 'नेसी' नावाचा एक जलचर प्राणी (Monster) असल्याच्या अनेक कथा आम्ही ऐकल्या होत्या. Dinosaur सारखा एक प्राणी त्यात आहे असं म्हणतात. मी तर पूर्ण वेळ त्याला शोधत होतो. त्याबद्दलची माहिती देणारे म्युझियमही तिथे आवर्जून पाहण्यासारखे आहे. बराच वेळ तिथे घालवला. आई बाबा पण थकलेले होते तर पुढचं आम्ही सावकाश केलं. आणि थेट पुढच्या प्रवासासाठी निघालो ते म्हणजे शहरात जाण्यासाठी Edinburgh शहरात. आम्हाला कल्पना नव्हती की त्यादिवशी वातावरणाचा ऑरेंज अलर्ट होता. धो धो पाऊस सुरू झाला होता आणि जोरदार हवा आम्ही जेव्हा प्रवासात होतो तेव्हा. मोटर वेला लागल्यानंतर तर काहीच दिसत नव्हतं. सगळ्या गाड्या स्लो झाल्या होत्या. समोरचं वायपर आणि मागचं वायपर फुल स्पीड सुरू होतं. गाडीच्या काचा हीट करणं सुरू होतं. गाडीचे चारही इंडिकेटर्स सुरू होते, दिवे सुरू होते. तरीही काहीही दिसत नव्हतं. तशाच ह्याच्यात आमचा प्रवास सुरू होता. जवळ जवळ ५ तास सुरू होतं. असं करत करत आम्ही Edinburgh ला पोहोचलो. तिथे आम्ही AirBnB घेतलं होतं राहायला. तिथे गेलो. पूर्ण प्रवासात मला एकच धाकधूक होती की मला हॉर्न नको मिळायला. म्हणजे इथे गाडी चुकीची चालवली तर हॉर्न वाजवतात अपमान करायला. आणि मी UK मध्ये नुकतीच गाडी चालवायला शिकलो होतो. भारतात चालवायचो पण इकडे मला नियमात चालवायची होती.  

शेवटच्या टप्प्यात आम्ही स्कॉटलंडची राजधानी एडिनबरा (Edinburgh) गाठली. एडिनबरा शहरात प्रवेश करताना दिसणारा 'द फोर्थ ब्रिज' (The Forth Bridge) हा अडीच किलोमीटर लांबीचा पूल अभियांत्रिकीचा एक अद्भुत नमुना आहे. त्यावरून जाताना मजा आली पण पाऊस खूप असल्याने नीट दिसला नाही आम्हाला.

एडिनबरामध्ये आम्ही ऐतिहासिक एडिनबरा कॅसल (Edinburgh Castle) बाहेरून पाहिला. हॅरी पॉटर प्रेमींसाठी हे शहर म्हणजे पर्वणीच! तिथल्या 'डायगन अ‍ॅली'वरून (Diagon Alley) प्रेरित असलेल्या गल्लीत फिरताना आणि हॅरी पॉटरचे अधिकृत मर्चेंडाईज बघताना एक वेगळीच जादू जाणवली. स्नेहल Harry Potter ची फॅन तिने तर खूपच आनंद घेतला. आम्ही तिकडे स्कॉटलंड museum पण बघितलं. दिवसभर शहरात फिरलो पण आम्ही कार AirBnB मध्येच ठेवली कारण शहरात गाडी चालवणं आणि पार्किंग शोधणं अवघड होतं. काही बसवाल्यांनी तर आम्ही चुकीच्या बसमध्ये बसलो म्हणून आम्हाला फुकट पुढच्या बस स्टॉपपर्यंत सोडलं. तो दिवस पण आमचा पूर्ण पायी फिरण्यात गेला. ह्यात आई बाबांच्या हिमतीला दाद दिली पाहिजे की काहीही तक्रार न करता ते इतके आमच्यासोबत फिरत होते.

निरोप घेताना...

पाचव्या दिवशी जेव्हा आम्ही परतीचा प्रवास सुरू केला, तेव्हा पाऊस आणि ऊन यांच्या खेळातून उमटलेली इंद्रधनुष्ये आम्हाला निरोप देत होती. स्कॉटलंडचा हा प्रवास फक्त प्रेक्षणीय स्थळांचा नव्हता, तर तो निसर्गाच्या सानिध्यात घालवलेल्या अमूल्य क्षणांचा होता. आई बाबांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघताना खूप जास्त छान वाटत होतं. मला आणि स्नेहलला असं वाटत होतं की आयुष्यात काहीतरी चांगलं काम केलंय आपण. माझ्या चेहऱ्यावर तर प्रचंड समाधान होतं. काही वर्षांनी स्नेहलचे आई बाबा आले तेव्हा देखील आम्ही हाच टूर त्यांना घडवला. आणि माझ्या चेहऱ्यावर जसा माझ्या आई बाबांना घेऊन फिरण्याचा आनंद होता तसाच आनंद मी स्नेहलच्या डोळ्यात देखील त्यावेळेस पाहत होतो. 


जर तुम्हाला शांतता, इतिहास आणि अफाट निसर्ग सौंदर्याची आवड असेल, तर स्कॉटलंडला एकदा तरी नक्की भेट द्या!

- धक्का मार पुष्कर (पुष्कर उज्जैनकर), विल्मस्लो, यु. के. 

संयोजक

श्रीकांत पट्टलवार, मीरा पट्टलवार, रवी दाते, मुकुल आचार्य, कुमार जावडेकर