Friday, 18 October 2024

अंक १ - मुखपृष्ठ आणि अनुक्रमणिका

पश्चिमाई - दिवाळी अंक २०२४ 


सर्व हक्क लेखकांस स्वाधीन. या अंकातील मते संबंधित लेखकांची आहेत, त्यांस संपादक मंडळ जबाबदार नाही.

मुखपृष्ठ आणि रेखाचित्रे – रवी दाते. 

अनुक्रमणिका

1       स्वागत (श्रीकांत पट्टलवार)

2       लेख, कथा

2.1        लेख – माझे अलौकिक गुरू (सौ. वृंदा जोशी)

2.2        कथा – परतफेड (डॉ. अनुपमा श्रोत्री)

2.3        लेख – निरागस "फुलबाज्या" (लीना फाटक)

2.4        पत्र – यश : व्याख्या, प्राप्ती आणि मोजमाप (रवी दाते)

2.5        कादंबरी – ‘बे-जमाव’: प्रस्तावना (कुमार जावडेकर)

2.6        कथा – भुताचं भुयार (अंजली शेगुणशी)

2.7        लेख – कॅलिडोस्कोप (डॉ मृणाल शहा)

2.8        लेख – गान-सरस्वती (डॉ मुकुल आचार्य)

3       आस्वाद (कविता / गीत/ गजल)

3.1        आस्वाद – 'ग' ची बाधा (सदर) : किनारा (कुमार जावडेकर)

3.2        बॉडी पार्ट्स (लीना फाटक)

3.3        कविता – दान (अनिरुद्ध कापरेकर)

3.4        कविता – शरण (अनिरुद्ध कापरेकर)

3.5        कविता – व्यथा (अंजली शेगुणशी)

3.6        कविता – विसर्जन (डॉ. मुकुल आचार्य)

4       गप्पा

4.1        विष्णू येती घरा (मीरा पट्टलवार)

5       डिंगूचा कट्टा

5.1        इथे साकारल्या मूर्ती (श्रीकांत पट्टलवार, संतोष देशपांडे, अश्विनी काणे, कल्पना मुनागपती)

5.2        लहान मुलांसोबत केला दिवाळीचा किल्ला आणि सगळ्यांनी केला कल्ला (नुपूर व विक्रांत पवनीकर)

6       चणे-फुटाणे

6.1        मोफत ज्ञान (श्रीकांत पट्टलवार)

7       पश्चिमाई (कुमार जावडेकर) 

१. स्वागत (श्रीकांत पट्टलवार)

स्वागत 

श्रीकांत पट्टलवार





दिवाळी म्हटली की डोळ्यासमोर येतात सुंदर सुंदर रांगोळ्या, घरोघरी लकाकणाऱ्या पणत्या, धडाम-धुडूम वाजणारे फटाके आणि दिवाळीचा फराळ. आणि या सर्वांबरोबरच, विशेषत: मराठी कुटुंबियांकडे दिवाळीचा अविभाज्य बनलेले दिवाळी अंक!  दिवाळीच्या फराळा प्रमाणे त्यांची देवाण-घेवाण त्यातील चुटकुले, भविष्य इत्यादींचं सामूहिक वाचन, त्यातील लेख गोष्टी, मुद्दे आणि कधी कधी गुद्दे, यामुळे पुढील दिवाळीपर्यंत होणारे मनोरंजन हे खूपच अविस्मरणीय असतं. फराळाचे सर्व पदार्थ बाजारात अत्यंत माफक दरात मुबलक प्रमाणात उपलब्ध असले तरी शेजारच्या काकूंच्या हाताच्या चकल्या, मावशीच्या करंज्या, आत्याचे अनारसे, यांची गोडी मात्र अतुलनीय असते. त्यांनी स्वतःच्या हाताने बशीत दिलेला लाडू चिवडा खाताना जो ब्रह्मानंद दोघांनाही होतो तो अवर्णनीय असतो.

तर यंदा दिवाळीच्या या चविष्ट फराळाप्रमाणे आपल्या ताई-दादांनी, काका-काकूंनी खास आपल्यासाठी काही लेख आणि गोष्टी लिहिल्या आहेत, काहींनी कविता केल्या आहेत तर काहींनी आपले अनुभव शब्दांकित केले आहेत. ‘पश्चिमाई’च्या दिवाळी अंकातून हे सर्व आपल्यासमोर आग्रहाने सादर करायला आम्हाला खूप आनंद होतो आहे.  दिवाळीतील फराळा प्रमाणेच आपण सर्वांनी याचा भरपूर आनंद घ्यावा.  त्याची चव घेऊन यथोचित प्रतिसाद द्यावा हीच एक नम्र विनंती. .

‘पश्चिमाई' साठी चाचपणी करताना असं लक्षात आलं की आपल्या अवतीभोवती असंख्य प्रज्ञावंत आहेत. त्यांनाही आपले दर्जेदार विचार कुठेतरी व्यक्त करून समाजापुढे मांडायचे असतात. आपली कला आजूबाजूच्या लोकांनी पहावीप्रशंसावी असं त्यांनाही वाटत असतं. ही सर्वच मंडळी प्रथित यश लेखककवी किंवा नाटककार होऊ शकत नाहीत. त्यांना आपापले व्यवसाय सांभाळून या गोष्टी करणे शक्यही नसते. अशा आपल्या भोवतालच्या प्रज्ञावंतांना शोधण्यासाठी आणि त्यांच्या प्रतिभेला वाव देणारे नवीन दालन उघडण्यासाठीसोशल मीडियाचाच उपयोग करत, 'पश्चिमाईहे ऑनलाईन मराठी त्रैमासिक 'अभिजातरसिकांपुढे सादर करतांना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे.. आपल्या लेखनातून पहिल्याच अंकात अनेक कवी, लेखक, कथाकार मंडळींनी  उदंड योगदान दिल आहे. या सर्वांचे मनःपूर्वक आभार. आपण सर्व शब्द प्रेमींनी लेखक, कवी वाचक, प्रतिसादक या नात्याने पश्चिमाई उपक्रमात सहभागी व्हावं ही एक नम्र विनंती.

भरीस भर म्हणून नुकताच भारत सरकारने मराठी भाषेला 'अभिजात भाषा' म्हणून दर्जा प्रदान केला आहे ही समस्त मराठी भाषा प्रेमींसाठी अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे.  योगायोग असला तरी आपल्यासाठी हा एक नक्कीच प्रेरणादायी क्षण आहे. 



 नमन तुला मोरया (श्रीकांत पट्टलवार) - YouTube

 - श्रीकांत पट्टलवार, रुणकर्ण. 

 

२.१ लेख - अलौकिक गुरु - सौ. वृंदा जोशी

माझे अलौकिक गुरु  

सौ. वृंदा जोशी

अगदी लहानपणापासून मला गाण्याची आवड. मात्र ही आवड सुगम संगीत, विशेषतः भावसंगीतापुरतीच मर्यादित होती. याचे कारण सुरांबरोबरच शब्दाचीही मला ओढ होती. त्यामुळे ज्या गाण्याचा अर्थ समजत नाही, लावता येत नाही त्याबद्दल फारसे प्रेम वाटले नाही.

आमच्या काळात अनेक दिग्गज संगीतकारांची गाणी रेडिओवर सतत ऐकायला मिळत. कॅसेट्स चा जमाना फार नंतरचा! तेंव्हा रेडिओ हेच एकमेव माध्यम होते, तेही घरोघरी नसत. आपली आवड, भावसरगम या सारखे कार्यक्रम मन लावून ऐकायचे, चाल लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करायचा, शब्द लिहून घ्यायचे.  कधी कधी तेही स्पष्ट ऐकू येत नसत. मग कोणता शब्द बरोबर व योग्य अर्थवाही असेल असा चाळाच माझ्या मनाला लागे. स्मरणशक्ति कदाचित त्यामुळेच वाढली असावी. सुधीर फडके, श्रीनिवास खळे, यशवंत देव, हृदयनाथ मंगेशकर, वसंत प्रभू यांची अनेक भावगीते, चित्रगीते कानावर पडत आणि मनावर खोल ठसा उमटवीत. त्या काळात अधिकृत पणे संगीत शिकले गेले नाहीच पण तालासुरात स्पष्ट शब्दोच्चारात गाणे म्हणता येई एवढेच!

पुढे आयुष्याला वेगळे वळण लागले. लग्न करून मी परदेशात आले. काही वर्षांनी इकडचीच झाले. मात्र गाण्याची संगत सुटली नाही. उलट सहजपणे उपलब्ध झालेल्या कॅसेट्समुळे, गाण्याबजावण्यात गम्य असलेल्या मित्रमंडळींमुळे, तसेच भारतातून इकडे वेळोवेळी येत असलेल्या कलाकारांमुळे ती अधिकच जोपासली गेली. पतिदेवांनाही गाण्याची आवड खूपच असल्याने परदेशात असुनही माझे गाणे जास्त फुलले. कदाचित वासरात लंगडी गाय शहाणी या न्यायाने असेल पण गायची संधी बरीच मिळाली. अनेक कलाकारांच्या मार्गदर्शनाचा मला लाभ झाला.

त्यातली विशेष लक्षात राहण्यासारखी आठवण म्हणजे १९८४ आणि १९८८ साली श्रीयशवंत देव कार्यक्रमासाठी इकडे आले होते तेंव्हा त्यांची व माझी चांगली ओळख झाली. ते हाडाचे गुरू आहेत, गाण्याची आवड असलेल्या कोणालाही काहीतरी द्यायची त्यांची सदैव तयारी व खटपट असते. मी हौशीने गाणे म्हणते हे त्यांना कळले मग ते आमच्या घरी राहायला आले तेंव्हा त्यांनी मला गाणे म्हणायला लावले. शब्दोच्चारातील सहजता दाखवून दिली, गाण्यातील कृत्रिमपणा कसा घालवायचा याचे मार्गदर्शन केले. मला खूप आनंद झाला. आमच्या पुढच्या भारताच्या फेरीत, गेल्याबरोबर लगेच आम्ही यशवंत देवांना भेटलो, खूप गप्पा झाल्या. नंतर काही दिवसांनी त्यांचा फोन आला त्यांनी विचारले की आता परत कधी भेटता?" आम्ही म्हटले पुढल्या भारताच्या भेटीत. आम्ही दोन दिवसांनी तर परत चाललो". ते म्हणाले असं कसं चालेल? वृंदाला नवे गाणे कुठे शिकवले अजून, कसंही करुन याच किंवा उद्या मला त्या बाजूला यायचेच आहे तेंव्हा मीच तुमच्या घरी येतो, ठरल्या प्रमाणे ते आले. आम्ही शेजारून पेटी आणली होती. नुकतेच त्यांनी एक गाणे लिहिले होते. " श्री महाकाली प्रणाम तुला ". त्याची चाल कच्ची तयार होती, तिथल्या तिथेच त्याची सरगम लिहीत त्यांनी मला ते गाणे शिकवले. अधून मधून ते थोडा बदल करीत. आम्हा सर्वाना ती एक पर्वणीच होती. चाल कशी तयार होते याचे प्रात्यक्षिक, तेही यशवंत देवांकडून! कानात प्राण आणून मी सारे लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करीत होते. ध्वनिमुद्रणाची काही सोय नव्हती, त्यामुळे स्मरणशक्तीवरच सगळा भार होता. दोन तीनदा माझ्याकडून गाणे म्हणवून घेऊन ते गेले. त्यानंतर सतत परतीच्या प्रवासातसुद्धा ती चाल माझ्या मनात घोळत राहिली. आपल्याला आली आली असं वाटतानाच परत काही विसरल्यासारखे वाटायचे पण शेवटी गाणे माझ्या मनात चांगले ठसले.

त्यानंतर ते गाणे एका कॅसेटसाठी अनुराधा पौडवाल यांनी गायले. काही तांत्रिक कारणांनी चालीत थोडा बदल केला होता. मात्र मला शिकवलेली चाल सर्वस्वी माझीच आहे, ती मी प्रसादासारखी जपून ठेवली आहे, अशा अलौकिक गुरूंकडून मिळालेली. मनात येते, ही माझी कोणत्या जन्माची पुण्याई!

- सौ. वृंदा जोशी.

२.२ कथा - परतफेड (अनुपमा श्रोत्री)

परतफेड

डॉक्टर अनुपमा श्रोत्री


अनन्या थिजून गाडीत बसली होती. बाहेर हॉर्नचे कर्कश्श आवाज येत होते. तिनं बाहेर पाहिलं. पृथ्वी काही अंशांनी कलली असली पाहिजे. सगळं उलटं पालट दिसत होतं. मगाशी तो मोठ्ठा आवाज झाला तो लांबून आला होता की जवळून आला होता? तिला काहीच आठवेना.

काही मिनिटांपूर्वी ती सुपर मार्केट मध्ये खरेदी करत होती. घाई घाईत गाडीच्या बूट मध्ये सामान टाकून ती तिथून निघाली. घरी जाऊन काय स्वैपाक करावा या विचारात आपण कार पार्क मधून सिग्नल पाशी कधी पोचलो हे तिला कळलंच नाही. सिग्नल बदलण्या आधी जाता येईल का थांबावं अशा द्विधा मनःस्थितीत असताना तिला रेअर वहयू मध्ये मागचा चालक खूप घाई करतोय असं जाणवलं. बहुतेक जाता येईल सटकून असं ठरवून तिनं accelerator वर पाय दाबला.

एवढंच आठवतंय.

हृदयाची जोरात धडधड होत होती. कोणीतरी तरुण मुलगा रस्त्यावर उभा राहून तिच्याकडे बघत अर्वाच्य शिवीगाळ करत आहे, हातवारे करतो आहे असं तिला एकदमच जाणवलं. आपला अपघात झाला आहे की काय? ती स्वतःचं शरीर चाचपून बघू लागली. सगळं धडधाकट होतं. मानेतून मात्र सणका येत होत्या. माझी चूक झाली की काय? माझ्या घाईमुळे तर अपघात झाला नाही ना? म्हणूनच तो तरुण माझ्यावर चिडला आहे की काय?

बाहेर एक लाल रंगाची गाडी विचित्र कोनात उभी होती. पुढचा बॉनेटचा भाग छिन्नविछिन्न झालेला दिसत होता. तिनं दोन्ही हातांनी चेहरा झाकून घेतला. हे काय झालं क्षणार्धात?

ती इकडे तिकडे बघू लागली. इतर गाड्या तिच्या आणि त्या तरुणाच्या गाडीला वळसा घालून पुढे निघून जात होत्या. जाता जाता आतले लोक उत्सुकतेने मागे वळून बघत होते. काही हसत होते. काही ट्रॅफिक रखडल्याचा वैताग व्यक्त करत होते. काही मात्र त्यांच्याच घाईत मग्न.

तिला त्या तरुणाची भीती वाटू लागली. दिसायला रासवट होता आणि संतापलेला. गाडीचं दार बंद आहे याची तिनं खात्री करून घेतली. पण ते लॉक होईना. तिला घाम फुटला. आता काय करायचं? अशीच गाडीत किती वेळ बसून राहू शकणार आहे? तो तरुण तरी किती वेळ असा आरडा-ओरडा करणार आहे? पोलीस येतील का आता? आपल्याला शिक्षा होईल का? हजारो विचारांचं थैमान तिच्या डोक्यात सुरु झालं. छातीतली धडधड वाढली. गाडी राईट ऑफ झाली तर? इन्सुरन्सचं काय होईल? अवी काय म्हणेल? तोंडाला कोरड पडली होती. तो तरुण जरा लांब गेला तर किती बरं होईल.

पण तो तर अजूनच जवळ येतोय. बाहेरून दाराला हात लावतोय की काय? काय करावं आता? तिला काही कळेना. कुणीच थांबून तिला मदत का करत नाहीये? त्याच्यापासून आता आपलं रक्षण कसं करावं? तिने डोळे घट्ट मिटून घेतले आणि मनातल्या मनात आठवेल ती प्रार्थना म्हणू लागली. काही क्षण गेले आणि दार उघडल्याचा आवाज झाला. तिने दचकून डोळे उघडले.

समोर साठीच्या आसपासची एक स्त्री उभी होती. ओठावर हलकं स्मित आणि चेहऱ्यावर अगदी शांत भाव होता. तिनं अनन्याचा हात हातात घेतला. तो तरुण मागे सरकला होता. त्याची बडबड बंद झाली होती आणि तो नुसताच पिंजऱ्यातल्या श्वापदा सारखा येरझाऱ्या घालत होता. ही स्त्री कोण होती? साधीसुधीच दिसत होती. चेहरा किती शांत होता. आणि विशेष म्हणजे काहीच बोलत नव्हती. तिच्या हाताला मात्र विलक्षण ऊब होती. तिला खूप सुरक्षित वाटू लागलं. श्वास नियमित होऊ लागला. धडधड ही शांत होत गेली. त्या पिवळ्या शर्टातल्या तरुणाची भीती वाटेनाशी झाली. तिनं त्या स्त्रीकडे बघून पुसटसं स्मित केलं. कोण आहात तुम्ही? कशा काय थांबलात इथे? तुम्हाला त्या गुंडाची भीती नाही वाटत? किती तरी प्रश्न. पण तिनी एकही विचारला नाही.

असा किती वेळ गेला कोणास ठाऊक. मुलाला जशी आई जवळ असली की जगाची भीती वाटत नाही तशी तिची अवस्था झाली होती. हातात हात घेऊन दोघीही निःशब्द होत्या.

मग कधीतरी पोलिसचा सायरन वाजला आणि दोन उंचपुरे पोलीस त्यांच्या गाडीतून उतरले. एक जण त्या तरुणाकडे गेला आणि दुसरा तिच्या गाडीकडे वळला. त्याने तिच्या जवळच्या स्त्रीशी काहीतरी संवाद केला. ती खाली वाकून अनन्याला म्हणाली 'काही काळजी करू नकोस आता. तो गुंड तुला काही करणार नाही. पोलीस इथून तुझी काळजी घेतील. मी जाते आता.' अनन्या काही म्हणेपर्यंत ती गेली सुद्धा!

थँक यू. धन्यवाद. खरंच खूप उपकार झाले तुमचे. मी कशी परतफेड करू? तुमचं नाव पण माहिती नाही. कुठे राहता? परत कशा भेटाल आता? कुठे शोधायला येऊ तुम्हाला मी? सगळे प्रश्न ओठावरच राहिले. ती झपझप चालत गर्दीत दिसेनाशी झाली.

नंतर अवीशी बोलताना अनन्या तिचं वर्णन करायचा प्रयत्न करत होती. पण तिच्या लक्षात आलं की त्या स्त्रीचे पांढरे केस, तिच्या चेहऱ्यावरचं स्मित आणि तिच्या हातांची ऊब याशिवाय तिला दुसरं काहीच आठवत नव्हतं. आपल्या स्वार्थीपणाची लाज वाटली तिला. नाव, नंबर काही सुद्धा घेतलं नाही आपण तिचं. तिला धन्यवाद कसं म्हणणार आता? ती जर त्या वेळी तिथे आली नसती तर काय झालं असतं? कशी देवासारखी धावून आली अगदी वेळेवर. त्या रस्त्यावरून जाताना पुन्हा पुन्हा अनन्या ला ती स्त्री आठवे. अवी म्हणाला अगं किती ऑब्सेस करतेस. पुढच्या वेळी कुणी मदत केली तर थँक यू म्हणायला विसरू नकोस म्हणजे झालं. प्रत्येक चांगल्या कृत्याची आपल्याला परतफेड करता येईलच असं नाही. मनातल्या मनात धन्यवाद दिलेस ना? मग झालं तर.

एकदा दुपारी अगदी भर रहदारीची वेळ. अवी गाडी चालवत होता. ख्रिसमस जवळ आलेला. लोकांची खरेदीची एकच घाई उडाली होती. पुण्यात दिवाळी च्या आधी लक्ष्मी रोड वर होते तशी. गाडी मोठ्या मुश्किलीने हळू हळू सिटी सेंटर मधून बाहेर पडू पाहात होती. अवी शिताफीनं गर्दीला तोंड देत गाडी त्या कोलाहलातून बाहेर काढत होता. तेवढ्यात अनन्याला समोर एक पोरसवदा मुलगी गाडी बाहेर थरथरत उभी राहिलेली दिसली. तिच्या गाडीनं समोरच्या गाडीला ठोकलं होतं बहुतेक. समोरच्या गाडीतून एक दांडगा माणूस बाहेर पडत होता. काय होतंय हे लक्षात यायच्या आधीच अवीनं गाडी पुढे नेली होती.

'अवी थांब थांब!'

'अगं असं काय करतेस? थांब काय? थांबायला जागा आहे का इथे? काय झालं?'

'नाही नाही प्लीज तुला जमेल तिथे थांब ना लवकर.'

'शॉपिंग राहिलंय वाटतं अजून. काय दिसलं? हॅन्ड बॅग का शूज?'

'अवी प्लीज थांबव ना गाडी पटकन.'

'अगं पण .... ओके!'

अवीनं गाडी थांबवताच अनन्या पटकन गाडीतून उतरली आणि पळतच मागे जाऊ लागली. अपघाताच्या ठिकाणी पोहोचेपर्यंत त्या दांडग्या माणसाचं त्या मुलीबरोबर एकतर्फी भांडण सुरु झालेलं होतं. ती मुलगी नवशिकी ड्रायव्हर असावी. खूपच लहान दिसत होती. एकीकडे हुंदके दाबत ती त्याच्या प्रश्नांच्या सरबत्तीला उत्तर द्यायचा प्रयत्न करत होती. पण तोंडातून शब्द फुटत नव्हते.

अनन्या दोघांच्या मध्ये जाऊन उभी राहिली.

'एक मिनिट. तुम्ही जरा मागे उभे राहता का? काय विचारायचं तुम्हाला ते नीट शांतपणे विचारा. ओरडू नका.'

'अहो तुम्ही कोण? कशाला मध्ये पडताय?'

'ते महत्वाचं नाही. तुम्हाला इन्शुरन्स चे डीटेल्स पाहिजेत ना? मग दोन मिनिटं दम धरा.'

अनन्यानं त्या मुलीजवळ जाऊन तिचा हात पकडला.

'गाडी इन्शुअर्ड आहे ना तुझी?'

मुलीनं हळूच होकारार्थी मान हलवली.

'बरं तू शांत हो. तो माणूस काही करणार नाही तुला. इन्शुअरन्सची माहिती कुठे आहे?'

'ते ते .. हॅन्ड बॅगेत ...' ती पुटपुटली. तिच्या तोंडून शब्द फुटत नव्हते.

'तुला थोडं पाणी हवय का?'

मुलीनं डोकं हलवलं. अनन्यानं इकडे तिकडे पाहिलं. समोरच एक छोटा कॅफे होता. मुलीच्या हाताला धरून ती कॅफेकडे जाऊ लागली आणि त्या माणसाला वळून म्हणाली,

'तुम्हाला इन्शुअरन्स ची माहिती हवी असेल तर त्या कॅफेमध्ये या.'

आत जाऊन त्या मुलीला बसवून अनन्यानं पाणी आणि गरम गरम चहा मागवला. पाणी प्यायल्याबरोबर मुलीच्या जीवात जीव आला. तिनं हॅन्ड बॅग उघडून इन्शुअरन्स ची माहिती काढली. त्या माणसानी ती लिहून घेतली आणि तो चालता झाला. चहा आल्याबरोबर अनन्यानं तिला विचारून साखर घातली.

'बरं तू ठीक आहेस का आता?'

तिनं मान हलवली.

'तुझी गाडी व्यवस्थित दिसते आहे. बहुतेक ड्राईव्ह करता येईल. कुणाला बोलवायचं का?'

तिनं पुनः मान हलवली.

'माझ्या बॉयफ्रेंडला.'

अनन्यानं नंबर घेतला आणि मुलीच्याच फोन वरून कॉल केला.

'बरं पोहोचतोय तो पाच मिनिटात. तू थांब इथेच.'

अनन्या उठली. मुलीच्या पाठीवरून हात फिरवून ती कॅफेमधून बाहेर पडली. पळत पळतच ती अवीने जिथे गाडी लावली होती तिथे पोहोचली. तो थोडा वैतागूनच तिची वाट पाहात होता.

'अगं दहा मिनिटं उभा आहे मी इथे नो पार्किंग मध्ये गाडी लावून, काय करत होतीस इतका वेळ?'

अनन्या गाडीत शिरली. सीट बेल्ट लावत म्हणाली,

'अवी, तुला ती माझ्या अपघताच्या वेळी मदतीला आलेली बाई ऐकून माहिती आहे ना?'

'हो, चांगलीच. ती दिसली तुला आत्ता? अरे वा! गळा-भेट झाली का काय मग?'

'भेट नाही झाली. पण आज फायनली इतक्या दिवसांनंतर, तिचे आभार मानून टाकले.'

२.३ लेख - निरागस "फुलबाज्या" (लीना फाटक)

निरागस "फुलबाज्या" 

लीना फाटक

लहान मुलांच मन खूप निर्मळ असतं. उत्स्फूर्तपणे ते जेव्हा काही बोलतात तेव्हा त्यातून निरागस विनोद होतात याची त्यांना अजिबात जाणीवही नसते. माझी मुले लहान असतानाचे असेच काही गमतीदार प्रसंग व विनोद सांगणार आहे. माझी मुलगी वय वर्षे साडेचार व मुलगा तर सहा महिन्याचा असल्यापासुन इथे यु.के. मधे वाढले आहेत. तेही स्कॉटलँडमधे जिथे आम्ही एकटेच भारतीय होतो. घरात आम्ही मराठीच बोलायचो पण बाहेर इंग्लिश. त्याची मला व मुलांना हळूहळू सवय होत होती.  पण काही वेळेस त्यातून विनोदही व्हायचे. 

पहिले सहा महिने लार्गजमधे व नंतर साॉल्टकोटसला सोनल शाळेत खूप छान रमली होती. मॉयरा, फिओना, सुझन, या मैत्रिणीही मिळाल्या होत्या. दर शनिवार/रविवार बहुतांशी सगळ्यांना इथे सुट्टी असायची. माझे यजमान त्या दिवशी घरी होते. सोनल, सुझन खेळत होत्या. मी दुपारच्या जेवणाची तयारी करत होते. बाहेरून काहीतरी जळत असल्याचा वास आला म्हणून आम्ही खिडकीतून बाहेर बघितल तर ३/४ घरं  टाकून एका घराच्या छप्परातून धूर येत होता. सोनल मराठी उत्तम बोलायची. आम्ही दोघं, "कशामुळे आग लागली असेल", असं एकमेकांशी बोलत होतो. लगेच सोनल धावत येऊन मला बिलगत, तिच्या नेहेमीच्या ठसकेबाजपणे, प्रत्येक शब्दावर जोर देत म्हणाली "मल्ला माहितीय कश्शामुळे "आग" लागली असेल". आम्ही दोघं चकीत झालो. घरात खेळतीय मग हिला कस माहिती? "अग सोनू, तुला कस माहिती?" असं मी विचारल्यावर "आई, (मी तोपर्यंत मम्मी नव्हते झाली) मला ~~वाटतय ~~ की कोणीतरी ना, त्या घराच्या छप्परावर मिरच्या टाकल्या असतील". म्हणजे भारतांत असतांना "मिरच्यांना हात लावायचा नाही. नाहीतर हाताची, डोळ्यांना हात लागला तर डोळ्यांची "आग" होईल", हे सांगितलं होत ना त्याची पक्की आठवण ठेवली होती माझ्या सोनूलीनी. काय विनोद केला हे तिला कळलंही नाही. "माझी सोनू गं" म्हणत मी तिला हसत जवळ घेतलं. आम्ही दोघं हसलो म्हणून ती पण हंसू लागली. 

दुसरी एक आठवण आमचा बबलू जेमतेम दोन वर्षांचा असेल तेंव्हाची आहे. व्यवस्थित बोलायला लागला होता. मराठीतून इंग्लिश मधे हळूहळू परिवर्तन होत होतं. मराठीच इंग्लिशीकरण सुद्धा करायचा. म्हणजे, "Look I am पळींग", असं गंमतीदार बोलायचा. सोनल वडीलांना "बाबा" म्हणायची आणि मी आमच्या काळच्या बाळबोध वळणामुळे त्यांना "अहो" म्हणत असे. त्यांना नांवानी हांक मारणारे दुसरे कोणी नव्हतेच. काही कामासाठी मी बाहेर पडले होते. आमचे बबलू महाशय पुशचेयर मधे बसून मस्तपैकी बडबडगीत म्हणत होते. तेवढ्यांत समोरून एक वयस्क बाई आल्या. आम्हीच एकुलते एक भारतीय, त्यामुळे मुलांच खुप कौतुक व्हायचं. छान स्कॉटिश उच्चारांत त्यांच, बबलूच,  "किती छान मोठ्ठे डोळे आहेत" इत्यादी कौतुक करण चालू होत. "तुझं नाव काय, तू शाळेत जातोस का" वगैरे नेहमी विचारले जाणारे प्रश्न सुरु होते. "तुझे डॅडी कुठे आहेत"? "ऑफिस" असं बबलूच व्यवस्थित उत्तरे देणेही चालू होते. त्या बाईंनी "तुझ्या डॅडीच नांव काय"? विचारल्याबरोबर बबलूनी पटकन् "अहो" म्हणून उत्तर दिलं. मी "अहो" म्हणायची त्यामुळे त्याला तेच नांव आहे असं वाटल. मला तर हसू येत होतंच  पण  पुढे त्या बाईंनी "ओ, व्हॉट अे, ब्यु~~टी~फु~ल नेम" असा त्यांच्या किंचीत हेल काढलेल्या स्कॉटिश उच्चारात प्रतिसाद दिला. मग मात्र मला हसू आवरण फार कठीण वाटलं. बबलूची स्पॅनीश बायको मात्र त्याला "यू आर् माय 'अहो'". म्हणून चिडवत असते. 

अशीच आणखी एक खुप मजेशीर आठवण. बबलू चार वर्षांचा व्हायच्या आधी त्याला शाळेची सवय व्हावी म्हणून त्याला जवळच्या एका प्ले ग्रुप, म्हणजे "किंडर गार्डन" मधे घेऊन जायच ठरवल. मला वाटल होते की मी निघाले की हा रडणार. कुठलं काय. एवढी प्रचंड वेगवेगळी खेळणी व त्याच्या वयाची मुलं -मली पाहिली आणि स्वारी एकदम खुश होऊन, मला टाटा करून, आत  पसार झाली. मीच स्वत:चे डोळे पुसत घरी आले. दोन/तीन  महिने झाले होते. रोज घरी आल्यावर तिथे कोण-कोण मित्र, मैत्रीणी मिळाल्या, काय खेळला, वगैरे सविस्तर, मराठी/इंग्लिश दोन्ही मिसळवून सांगायचा. तिथे मुलांना सोडायला येणाऱ्या आयांशी माझी ओळख व पुढे मैत्री झाली. अँडीच्या आईला नुकतीच मुलगी झाली होती. तिच्याशी तर खुप छान मैत्री झाली. पण त्या सगळ्या व शिक्षिका सगळ्या बायकाच व त्या पण सगळ्या स्कॉटिश. म्हणजे, गोऱ्यापान. माझ्यासारख्या ब्राऊन रंगाच्या नाहीत. हे त्याला जाणवायला लागले होते. घरी आल्यावर "आय वॉन्ट व्हाईट, व्हाईट मम्मी" म्हणायला लागला होता. मी त्याच्या डॅडींना तक्रारीच्या सुरांत सांगीतले. अशावेळी चिडवायची संधी सोडणारा एकतरी नवरा आहे का या जगात? "मग, तो एवढे म्हणतोय तर मला पण आता काहीतरी विचार करायला पाहिजे", असं बोलून आगीत तेल ओतायचे. भारतातल्या सगळ्या जवळच्या लोकांची ओढ लागली होती. नकारात्मक विचारसरणी होऊन खुप चिडचिड होत असे. असच एकदा मिस्टरांच्या चिडवण्यामुळे चिडून, रागाच्या भरात "मला इथे अगदी कंटाळा आलाय, मी परत जाते" असं सांगून टाकले. सोनलही माझ्याबरोबर यायला तयार झाली. "मला भारतात यायचेच नाही", असं म्हणायची "शिंगं" फुटली नाहीत हे पाहून मला जरा समाधान वाटले. पण आमच्या बबलू महाराजांनी मात्र "तू जा", असं खुश्शाल सांगितल्यावर मी अवाक होऊन बघतच राहिले. त्याला एक धपाटा घालावासा वाटला. रागानी त्याच्याकडे बघत "मग तुमच्या दोघांचे कोण करेल, जेवायला कोण घालेल", असं थोडं दरडावूनच विचारल्यावर, "व्हाईट, व्हाईट मम्मी करेल", हे एैकून आणि त्याच्या डॅडींचे मिस्किलपणे माझ्याकडे पाहून हसणे बघून, आग  केवढी भडकली असेल याची तुम्हीच कल्पना करा. "हो, कुठे मिळणार आहे रे, तुम्हाला, ही व्हाईट, व्हाईट मम्मी?", मी असं आणखी आवाज चढवून विचारले. बबलू, एक क्षणभर विचार करून, शांतपणे, त्यांत काय विशेष आहे, अशा अविभ्रावांत म्हणाला, "आम्ही हॉस्पिटलमधे जाऊ, तिथून बेबी गर्ल घेऊ, ती मोठ्ठी झाली की मम्मी होईल, मग आमच्याकडे लुकआफ्टर करेल"झालं, हे ऐकल्यावर कसा राग टिकणार? रागाचे पाणी, पाणी होऊन डोळ्यांतून वाहायला लागले. मोठ्यांदा हसत, "माझा बुद्दुसिंग", म्हणत त्याला मिठी मारली. सोनलही हसायला लागली. ते बघून बबलू पण हसू लागला. आपण केवढा मोठा विनोद केला हे त्याला कळलंच नव्हत. आता मिस्टरांना चिडवायची संधी मला मिळाली आणि मी ती अजिबात सोडली नाहीच हे तुम्हाला सांगायला नकोच. 

सौ. लीना फाटक, वॉरिंग्टन. 

२.४ पत्र - यश : व्याख्या, प्राप्ती आणि मोजमाप (रवी दाते)

पत्र - यश : व्याख्या, प्राप्ती आणि मोजमाप 

रवी दाते

सुप्रिया आणि संतोष देशपांडे

स. न.वि. वि.

पुस्तकं वाचायला आणि परत करायला बराच उशीर झालाय. क्षमस्व!

 बर्‍याच दिवसांनी, खरंतर वर्षांनी, पुस्तक वाचायला वेळ काढला. याच सगळं श्रेय तुम्हालाच. पुस्तक विकत घेतलं की वाचायची घाई नसते, पण उधार उसनवारीची टांगती तलवार (जरी तुम्ही ठेवली नसलीत) तरी सारखी जाणवते आणि वाचायला भाग पाडते. ‘टाटायन’ आणि ‘लंडनच्या आजीबाई’, दोन्ही पुस्तके अप्रतिम आणि काही अंशी एकाच सूत्राने बांधलेली.

पुस्तके वाचल्यानंतर बऱ्याच वर्षांपूर्वी वाचलेल्या जेफ्री आर्चरच्या ‘Kane and Abel’ या इंग्रजी कादंबरीची आणि त्यावर बेतलेल्या (???) शत्रुघ्न सिन्हाच्या ‘खुदगर्ज’ सिनेमाची आठवण झाली. तसं बघायला गेलं तर ह्या दोन्हीचा, या पुस्तकांशी दुरान्वयेही संबंध नाही पण कादंबरीतील एक कथानायक (बहुधा Abel) अगदी कफल्लक आणि Kane गर्भश्रीमंत, दोघे एकाच वेळी जन्मलेले, पण अगदी भिन्न स्थितीत. मग ते एकमेकांच्या संपर्कात आधी योगायोगाने येतात आणि नंतर धंद्यात तुल्यबळ प्रतिस्पर्धी म्हणून परस्परांसमोर उभे ठाकतात, असे काहीसे कथानक होते. ही गोष्ट आठवायचे कारण असे की नुसेरवान टाटा आणि आजीबाई दोघेही Abel प्रमाणेच अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून वर आलेले आणि नंतर Kane च्या तोडीस तोड यशस्वी झालेले. टाटा नवसारीतून आणि आजीबाई चौडे गावातून आलेली. दोन्ही गावे गुगललाही नकाशावर शोधणं कठीण आणि तिथून त्यांची भरारी थेट आकाशापर्यंत.

टाटांच्या पुढील पिढ्यांनी शिक्षणाची आस धरली आणि व्यापारी बाणा दाखवला. तर आजीबाईंनी संधी सापडल्यावर तिचा पुरेपूर फायदा उठवला. दोघांनीही पैशाचा विनियोग समाजासाठी केला. टाटांनी रोजगार निर्मिती करून तर आजींनी स्वतःच्या एक्सटेंडेड कुटुंबाचा आणि गावाचा उद्धार करून.

टाटानी शिक्षणाचे महत्त्व ओळखले आणि आपली सामाजिक बांधिलकी पुढील पिढ्यात जोपासली, पण आजींच्या पुढच्या पिढीला आजीबाईंचे यश टिकवता आले नाही. त्यांच्या पुढील पिढ्या ‘गतानुगतिको लोकः’ या धरतीवर सामान्य आयुष्य जगू लागल्या. बदलत्या काळाची पावले ओळखून त्यांना त्याप्रमाणे व्यवसायात बदल करता आले नाहीत

तसं बघितलं सध्याच्या ब्रिटनची हीच स्थिती आहे असं म्हणायला हरकत नाही त्यांच्या एका पिढीने पाऊण जगावर राज्य केलं पण पुढच्या प्रत्येक पिढीत भोगविलास वाढून ऐदीपणे खाण्याकडे कल वाढत गेला आणि आत्ताच्या स्थितीला पोहोचले.

आमच्या आजीच्या पुण्यातील वाड्याची हीच गत, वाड्याच्या मालकांनी एकत्र कुटुंबासाठी बांधलेला हा वाडा पुढच्या पिढीत कोणीच न शिकल्याने वाड्यात भाडेकरू ठेवून त्यांच्या भाड्यावर जगायची वेळ आली. तिसर्‍या पिढीत वाडा पूर्णपणे विकला गेला.

यश मिळवणे जितकं महत्त्वाचं तितकच ते पचवणं आणि वाढवणं कठीण. माझ्या दहावीच्या परीक्षा नंतर कोणीतरी सांगितल्याचं स्मरतं की यश हा एक बिंदू नसून कंटीन्यूअस प्रोसेस किंवा प्रक्रिया आहे. ह्याचा अर्थ समजायला पुढे बरीच वर्षे गेली.

 तसं बघायला गेलं तरी यश म्हणजे काय आणि ते ठरवणार कोण?

आपल्यासारख्या पांढरपेशात यशाचं मोजमाप हे शैक्षणिक पात्रतेत किंवा श्रीमंतीत मोजायची प्रथा आहे. पण टाटा आणि आजीबाई हे दोघेही कर्मवीर पूर्णपणे अशिक्षित. टाटांच्या नंतरच्या पिढ्या उच्चशिक्षित झाल्या, पण सुरुवात निरक्षरच. मग आपण तरी शिक्षणाचा ध्यास का धरतो आणि त्याने काय साध्य करतो? माझा हा प्रश्न बहुधा चुकीचा असावा, कारण शिक्षण हे यशासाठी नाही तर ज्ञानासाठी, चरितार्थासाठी आणि जगाचे व्यवहार करण्यासाठी असते. त्याचा उपयोग यशस्वी होण्यासाठी करणे आपल्या हातात असते. माझे वैयक्तिक मत तर असे आहे, की शिक्षण तुम्हाला यशस्वी नाही, पंगु बनवते. तुम्हाला शिक्षणाच्या कुबड्यांची इतकी सवय लागते की आपण बाकी काही करू शकतो याची बऱ्याच जणांना जाणीवही नसते. शिक्षण आणि त्यानुसार निवडलेला चरितार्थाचा मार्ग हेच आपले जीवन होऊन जाते. फक्त टक्केवारी प्रमाणे बघितले तर सुशिक्षितांचे सामान्य आयुष्य हे अशिक्षितांपेक्षा चांगले असेलही, पण उंची गाठण्यासाठी सर्वस्व पणाला लावण्याची मानसिकता शिक्षणाने नाहीशी होते.

याच दरम्यान व्हाट्सअप वर सद्गुरूंची एक मुलाखत पाण्यात आली. एक अत्यंत प्रथितयश cardiac सर्जन सद्गुरूंना प्रश्न विचारतात. त्यांचे सीनियर हेन अत्यंत कुशल, जगातील काही हाताच्या बोटावर मोजता येणाऱ्या सर्जनपैकी एक. एक प्रकारची अत्यंत अवघड शस्त्रक्रिया करणारे जगात जे काही थोडे लोक आहेत त्यात त्यांची गणना होते. त्यांनी आपली प्रॅक्टीस सोडून काशीला जाऊन ज्ञानप्राप्तीसाठी योगसाधना करण्याचे ठरवले असते आणि हे कितपत योग्य आहे असा प्रश्न मुलाखतीतील सर्जन सद्गुरुना विचारतो. अर्थात त्याचा या निर्णयाला कडाडून विरोध असतो. सद्गुरूंचे उत्तर असे की यश हे फक्त सर्जरी करून किंवा जीव वाचवण्यातच मोजायचे का आणि असे किती जीव वाचून पूर्ण यश मिळते? जर तुमचा सीनियर सर्जन सर्जरीत चांगला असेल तर तो योगसाधनेतही तितकेच यश मिळवून अधिक जीव वाचू शकतो असा विचार तुम्ही नाही का करू शकत?

आपण जी टाटा किंवा आजीबाईंसारखी प्रथितयश माणसे पाहतो त्यांनाच आपण यशस्वी का मानतो? इतरांना का नाही?

आजींच्या गोष्टीतला त्यांच्या सावत्र मुलगा विठ्ठल हा खरंतर मला अधिक यशस्वी वाटतो. पण तो कथानायक नाही आणि खरंतर सौम्यसा खलनायक म्हणूनच रंगवला गेला आहे. १९२९ च्या सुमारास खिशात फक्त ८५ पौंड घेऊन तो बायकोसोबत बोटीने त्याकाळच्या इंग्लंडला जातो. तिथल्या सामान्य इंग्रजांपेक्षा खूप श्रीमंत होतो. नंतर त्याचे वडील दुसरे लग्न करून ‘आजीं’ना (विठ्ठलची सावत्र आई) घेऊन इंग्लंडला येतात. मग आजींचे यश हे विठ्ठलच्या यशापेक्षा वेगळे कसे?

मला जाणवलेला दोघातला फरक असा की, पुढे १९५६ मध्ये विठ्ठलने घरातून बाहेर काढल्यावर या अशिक्षित आजीबाईंनी फक्त पैसाच कामावला नाही तर खूप माणसेही जोडली. मिळालेला पैसा स्वतःसाठी आणि इतरांसाठीही वापरला. लंडनमध्ये दुसरा महाराष्ट्र वसवला. आपलं व्यावसायिक यश आजींनी जिवंतपणी अनुभवल, पण मेल्यावर अंत्ययात्रेला येणार्‍या लोकांच्या संख्येवरून आणि प्रतिक्रियांवरून त्याचं प्रत्यक्ष  मोजमापही झालं.

 टाटांची गोष्टही अशीच. त्यांनी स्वतःच्या प्रगतीबरोबर समाजाचाही उद्धार पहिला. त्यामुळेच बिर्ला आणि धीरूभाईंसारखे यशस्वी स्पर्धक असूनही टाटांचे यश वेगळे आहे. ‘व्यापार’ आणि ‘उद्योग’ यातील फरक त्यांनी जाणला आणि अंगी बाणला. त्यांच्या इतक्या पिढ्या आल्या आणि गेल्या, पण ‘टाटा’ नावातली जादू अजूनही टिकून आहे.

या दोन पुस्तकांबरोबरच टिळकांचे गीताहस्य वाचणेही चालू होते. त्यात ‘ज्ञानी माणसाने लोकसंग्रह करावा’ असा उल्लेख वारंवार येतो. हा संदर्भ थोडा वेगळा आहे पण संक्षेपाने त्याचा अर्थ असा की ज्ञानी पुरुषाने आपले ज्ञान (आत्मज्ञान) आपल्या पुरते मर्यादित न ठेवता लोकांना त्या ज्ञानापर्यंत पोहोचवण्याचे काम करावे (अर्थात् त्यांचा उद्धार करावा).

वैयक्तिक यश हे प्रत्येक जण आपापल्या परीने मिळवतोच पण ते यश जेव्हा आपल्याबरोबर इतरांनाही वर उचलते तेव्हा त्या यशाची उंची ही अधिक होते.

रवी दाते, मँचेस्टर. 

२.५ कादंबरी - 'बे-जमाव' : प्रस्तावना (कुमार जावडेकर)

'बे-जमाव' : प्रस्तावना 

कुमार जावडेकर

   

‘टू इज अ मॉब’ या नावानं मी ही कादंबरी इंग्रजीत लिहिली होती – मातृभाषा मराठी असूनही. याचं मुख्य कारण इतकंच की ती भारत आणि इंग्लंड या दोन देशांत घडते. दोन्ही देशांतल्या लोकांना ती वाचता यावी, एवढंच नव्हे तर तिच्यातली भूमिका जाणून घेता यावी असं मला वाटत होतं. स्थलांतर म्हटलं की त्यातून काही प्रश्न, समस्या, पेचप्रसंग निर्माण होतात. बेकायदेशीर स्थलांतरं, त्यांच्यामागची रंगीत / रक्तरंजित कारणं, त्यांच्यामुळे होणारे सांस्कृतिक भेदभाव आणि राजकीय संधीसाधू घडामोडी यांवर खूप लिहिलं जातं. टी. व्ही., चित्रपट यांतूनही अनेकदा बघायला मिळतं. मात्र सामान्य कारणांसाठी – मग ते शिक्षण असो की नोकरी असो की लग्न – कायदेशीर देशांतर करणाऱ्या माणसांना आणि त्या अनुषंगानं तिथल्या स्थानिक लोकांना एकमेकांशी जुळवून घेताना काय गमती-जमती आणि व्याप-ताप होऊ शकतात हे मांडण्यासाठी मी हे लिखाण केलं होतं. त्या जोडीनं कित्येक गैरसमज / गफलतींमध्ये आपण (दोन्ही बाजूंना हे लागू आहे) कसे स्वत:ला गुंफून ठेवतो आणि अगदी साध्या-साध्या बाबतींतही तारतम्य विसरतो – उदाहरणार्थ, समोरच्या माणसाला कुठल्याही धर्माचं, रंगाचं रूप न देता फक्त एक स्वतंत्र व्यक्ती म्हणून वागवणं – हेही मला दाखवायचं होतं.

आता मराठीत लिहिताना एक वेगळं समाधान मिळालं. अनेक बदलही (मूळ कल्पनेला, पात्रांना आणि कथावस्तूला धक्का न पोचवता) करता आले. अनुवादापेक्षा नवीन पुस्तक म्हणूनच लिहिल्यासारखं ते वाटावं असा माझा उद्देश होता. मातृभाषेत लिहिण्याची मजा काही औरच असते... ‘और’ हा परका शब्दही आपला होतो त्या ओघात.

यापूर्वी मी मराठीत ‘अन गज़ल जुळे’हा गझलसंग्रह माझा जुळा भाऊ डॉ. आश्विनसोबत लिहिला आहे. ‘निवडक अ-पुलं (थोडं पुलं, थोडं अपुलं)’ हे विनोदी इ-बुकही लिहिलं आहे. याशिवाय हिंदी/उर्दू गज़लाही करायचा प्रयत्न केला आहे. पण कादंबरी-लेखन हा या सर्वांपेक्षा वेगळाच अनुभव होता. कादंबरी मला वाचायला अतिशय आवडते. हरिभाऊ आपटयांपासून ते विश्वास पाटलांपर्यंत मी अनेक मराठी कादंबऱ्या वाचल्या आहेत. तसंच जॉर्ज ऑरवेलपासून जेफ्री आर्चरपर्यंत (किंवा चेतन भगतपर्यंत) अनेक इंग्रजीही. इथे ‘आर्चर’वरून माझे काही इंग्रजी मित्र ‘'वुइ वोन्ट होल्ड इट अगेन्स्ट यू'’ असं म्हणतील – एकानं म्हटलं होतंही (!)...  पण हा त्यांच्या विनोदबुद्धीचा भाग झाला. मी आपटे-ऑरवेल आणि पाटील-आर्चर/भगत हे मोजपट्टीच्या दोन बाजू म्हणून वापरले नाहीयेत. (तुम्हांला तसं वाटलं तर तो तुमचा प्रश्न आहे.) पण काही उत्तम आणि काही ‘उत्तम होऊ शकल्या असत्या’ अशा कादंबऱ्या वाचून मी कादंबरी लिहायला घेतली तेव्हा माझ्यापुरती एक नियमावली तयार केली.  

पहिला नियम. कादंबरी म्हणजे एक दीर्घ-कथा किंवा नुसतीच लांबलचक गोष्ट नाही. पात्रांच्या मनातले विचार, त्यांच्या वर्तनामागची मन:स्थिती मांडता यायला हवी. डॅफ्ने ड्यु मॉरिएचं 'माय कझिन रेचल' हे पुस्तक मला या बाबतीत आदर्श वाटतं. त्याची कथा दोन-तीन वाक्यांत सांगता येईल; पण त्या नायकाच्या मनातली सगळी घालमेल कळण्यासाठी ती कादंबरीच वाचायला हवी. अशा वर्णनांना रंजक करण्यासाठी संवादांची जोड असू नये असं मात्र नाही. हर्मन हेसच्या ‘सिद्धार्थ’मध्ये संवाद आहेतच की.

दुसरा नियम. कादंबरी हा माझ्या मते असा लेखन-प्रकार आहे की ज्यातली प्रत्येक काल्पनिक गोष्ट प्रत्यक्षात घडू शकते. अतिशयोक्ती, योगायोग वापरले जाऊ शकतात पण त्यांनाही या नियमाचं बंधन हवं. या कादंबरीत ‘वेडनसफोर्ड’ नावाचं काल्पनिक खेडं आहे. 'के अँड एम' नावाची एक काल्पनिक कंपनी आहे. बी. पी. सारख्या कंपन्यांबद्दलचे ‘पब्लिक डोमेन’ मधले संदर्भही आहेत आणि ‘ग्लेनमार्क’ संबंधित रचलेले काही कथेला आवश्यक प्रसंगही. सचिन तेंडुलकर काल्पनिक नसला तरी त्याचा कथेतला सहभाग त्याच्याविषयी जी माहिती आपणां सर्वांनाच असते त्यातून आलाय. स्वाती या पात्राच्या आयुष्यातल्या काही घटनाही याच नियमाचं पालन करून लिहिल्या आहेत. किंबहुना त्या प्रसंगांसारख्या (पण तंतोतंत जुळणाऱ्या नव्हेत) दोन घटना मला माहितीही आहेत!

तिसरा नियम. दुसऱ्या नियम जिथे संपतो तिथेच सुरू करूया. हे पुस्तक म्हणजे फक्त माझी गोष्ट पात्रं बदलून लिहायचा प्रयत्न अजिबात नाहीये - तो तसा नसावा हे मी प्रथम ठरवलं होतं. तसं झालं असतं तर कदाचित मी इतर पात्रांना, त्यांच्या भूमिकांना न्याय देऊ शकलो नसतो. थोड्या घटना खरोखर माझ्या बाबतीत घडलेल्या आहेत किंवा मी पाहिलेल्या आहेत, एवढं सोडल्यास ही पूर्णत: वेगळ्या पात्रांची, स्वभावांची आणि प्रसंगांची अशी कादंबरी आहे की जिच्यातून मला काही विचार निदर्शनास आणून द्यायचे होते. पर्ल बकचं 'द गुड अर्थ' किंवा हरिभाऊ आपट्यांचं 'पण लक्षात कोण घेतो?' ही पुस्तकं या बाबतीत मला लक्षणीय वाटतात.

चौथा नियम. माझे वडील (डॉक्टर मुरलीधर जावडेकर) मला नेहमी सांगायचे की कादंबरीचा आवाका एवढा मोठा असायला हवा की तिच्यातून जीवनाची दिशा बदलू शकते, जगाचा रोख पालटू शकतो! गांधीजींना आपल्या आश्रमाचं नाव ‘टॉलस्टॉय फार्म’ द्यावंसं वाटलं. पुढे सिद्ध झालेल्या अनेक संकल्पनांचा उगम ज्यूल व्हर्नच्या लिखाणात सापडला. अशी अनेक उदाहरणं यांची साक्ष देतात. अर्थात मला कुठेही या महान व्यक्तींशी तुलना करायची नाहीये. अतिशय विनम्रपणे इतकंच म्हणायचंय की ‘वर्किंग वंडर्स’ची कल्पना, इंग्रजीत 'टू इज अ मॉब' आणि मराठीत ‘बेजमाव’ ही शीर्षकं या साऱ्यांच्या बांधणीत कुठे तरी हे संस्कार माझ्या कामी आले असावेत. 'टू इज अ मॉब' हे इंग्रजी नाव मला 'टू इज कंपनी' या म्हणीवरून सुचलं होतं. दोन माणसं एकत्र आली आणि आपलं स्वत्व गमावून बसली की त्यांच्या विचारांतून 'बेबनाव'च होण्याची शक्यता अधिक! ‘बेअक्कल’ हा आद्य शब्द (दोन जणांची एकत्रितपणे?) गेलेली अक्कल असाच आहे ना? मग अशी माणसं अक्कल गहाण टाकून एकत्र आल्यावर ‘कंपनी’ मिळण्यापेक्षा जमाव / ‘मॉब’ (‘आम्ही’ विरुद्ध ‘ते’ – या बेबनावातून ‘बेजमाव’) होण्याचीच शक्यता अधिक!

पाचवा नियम. कादंबरी-लिखाण कसं असावं याबद्दल. ‘इंडिका’ कशी असावी हे टाटा मोटर्सच्या इंजिनियर्सना दिग्दर्शन करताना रतन टाटा म्हणाले होते – ‘मारुती ८००’ ची किंमत पण ‘ॲम्बेसेडर’सारखी आलिशान आणि ‘झेन’सारखी ऐटदार गाडी (होय, त्या काळी ‘मारुती ८००’च्या तुलनेत ‘मारुती झेन’ म्हणजे ऐष वाटायची) – हे आपल्याला देता आलं पाहिजे. आपल्याला माहिती आहे की प्रत्यक्षात बाजारात आली तेव्हा ‘इंडिका’ खूपच वेगळी होती. पण या दृष्टीतूनच तिच्या जडण-घडणीची दिशा ठरली. माझ्या लेखनासाठी मी - हलकं-फुलकं विनोदी लिखाण, त्यात गुंफलेले काही गंभीर प्रश्न (आणि त्यांची मला अभिप्रेत उत्तरं) आणि काही जीवन-विषयक विचार (त्यांना मी नवे म्हणणार नाही, पण पुन: स्पष्टपणे मांडायचा प्रयत्न केला आहे असं मात्र म्हणेन) ही चौकट (की त्रिकोण?) आखून घेतली होती. (कादंबरीतला प्रेमाचा त्रिकोण अजून निराळा.)

सहावा नियम. माझा मोठा भाऊ डॉक्टर योगेंद्र जावडेकर जेव्हा त्याची ‘डॉक्टर नावाचा माणूस’ (‘ग्रंथाली’ प्रकाशित) कादंबरी लिहीत होता, तेव्हा त्याच्याशी झालेली चर्चा मला आठवते. कादंबरीतली हॉस्पिटलची इमारत हेही एक पात्र असल्यासारखं लिहिलं असलं पाहिजे. तिची भव्यता, वॉर्ड्स, कॉरिडॉर्स, ऑपेरेशन-थिएटर्स, खाटा, उपकरणं, तिथली डॉक्टर-नर्स-आया, पेशंट-नातेवाईक लोकांची वर्दळ हे सगळं आपल्या डोळयांसमोर इतकं स्वच्छ दिसायला हवं की प्रत्यक्षात त्या नावाच्या ठिकाणी आपण गेलो तर आपल्याला नवखं वाटणारच नाही! या आठवणीतून मी काही जागा आणि काही निर्जीव गोष्टी (उदाहरणार्थ चहा – अर्थात तो सजीव नसला तरी संजीवनी असतोच -) पात्रांसारख्याच रंगावायचा प्रयत्न करू शकलो. प्रभाकर पेंढारकरांचं ‘रारंग ढांग’ हे एक उल्लेखनीय पुस्तक या नियमाबाबतीत. त्यांनी त्या पर्वत-कड्यालाच संजीवनी दिली आहे.

सातवा नियम. हा सर्वांत सोपा. पुस्तकाला वयोमर्यादा असू नये. उगाच चावट लिहायचं नाही. ‘गरजू’ मंडळींचा अपेक्षाभंग झाला तरी हरकत नाही.

आठवा नियम. खरं तर ही ‘सोय’ आहे. कादंबरीतली प्रकरणं लिहिताना मी त्यांना नावं दिली, तशी आवश्यकता नसली तरीही. कदाचित पान शोधायला त्यांचा वाचकांनाही उपयोग होईल.

हे पुस्तक मी का लिहिलं? मी ‘अर्पण’ करताना जे लिहिलंय ते थोडं स्पष्ट करतो. आपल्याला कुठेही गेलो तरी बहुतांशी अतिशय निर्मळ, स्वच्छ मनाची माणसं भेटतात. त्यांना आपण हवे असतो. मैत्री होवो, न होवो - एक चांगला परिचय हवा असतो. मग अचानक कुठे तरी काही संकल्पना या मनांना कलुषित करतात. ‘देश’ हा देखील एक भ्रमच नाही का? वास्तविक कायदा-सुव्यवस्थेसाठी आखलेले प्रांत इतकीच खरं तर त्यांच्याबद्दल भ्रांत बाळगायला हवी. पण आपण किती संभ्रमात राहतो आणि वाहावत जातो! लोक इतिहासाची आठवण करून देतात. वुडहाऊसला त्याच्याच देशात – इंग्लंडमध्ये – लोकांनी ‘या काळात राहायला अयोग्य’ ठरवलं होतं. अगदी देशांचं जाऊ द्या. माझे आई-वडील महाराष्ट्रातच नोकरीनिमित्त देशावरून कोकणात गेले होते. पंचवीसहून अधिक वर्षं तिथे काढूनही एकदा माझ्या आईला तिच्या सहकाऱ्यांनी ‘बाहेरची’ असं संबोधलं होतं! अर्थात, हे क्वचित होत असतानाच अनेक तिला जिवाभावाची माणसंही तिथे लाभली होती. तिचा पाय मोडला असताना गावातल्या एक आजी तिला आईप्रमाणे सोबत करायला रोज रुग्णालयात यायच्या. कित्येकदा ज्या माणसांशी आपल्याला काही देणं-घेणं नसतं ती आपल्याला खरी माणुसकी दाखवतात. कारण तिथे पगार, बढती अशा स्पर्धा नसतात. माझे स्वत:चे बहुतेक अनुभव अधिकांश चांगल्या क्षणांनीच भरलेले आणि भारलेले आहेत. हीच माणुसकी आपल्या मनात कशी जोपासता येईल, दुसऱ्यांत ती आहे ही जाणीव निर्माण करता येईल या विचारांतून हे पुस्तक तयार झालं.

एक अनुभव लिहावासा वाटतो. मी माझ्या इंग्लंडमधल्या एका नोकरीत सुमारे आठ वर्षं काढल्यावर त्याच कंपनीत माझी दुसऱ्या जागेवर नेमणूक झाली. या नव्या कामात मला सखोल तांत्रिक ज्ञान असणं आवश्यक होतं. अचानक – कुणी न सांगता - माझा एक पॉल नावाचा ब्रिटिश इंजिनियर सहकारी अतिशय आपुलकीनं तेव्हा मला येऊन भेटला आणि मी दुखावला जाणार नाही याची खबरदारी घेत मला म्हणाला, ‘कुमार, मला असं अजिबात म्हणायचं नाहीये हं की तुला हे अवगत नाहीये, बरं का! पण तुझी हरकत नसली तर मी तुला हे सगळं तंत्रज्ञान माझ्या परीनं शिकवू इच्छितो.’ माझ्यासाठी हे वरदानच होतं!... कोण होता हा माझा? – रंग, रूप, संस्कृती – सगळंच खूप वेगळं असूनही एक नातं आमच्यात का निर्माण झालं होतं? मग मी हे लक्षात ठेवायचं, की मला कुणीतरी कधीतरी वाईट वागवलं असेल ते? अनेक वाईटांना पुरून उरणारं हे चांगलं होतं, असं मला वाटतं. वास्तविक असे चांगले प्रसंगच वारंवार येत असतात – आपण आपलं मन पूर्वग्रहांपासून दूर केलं तर आपल्याला कळतातही! हा प्रसंग मी इंग्रजी कादंबरी प्रकाशित केल्यानंतर घडलेला आहे. मूळ पुस्तकात मी वेगळा अनुभव लिहिला होता. त्यामुळे माझे विचार यातून पुन: एकदा सिद्ध झाले असंच मला वाटतं. यानंतर दोन वर्षांनी हे भाषांतर करत असताना मी पॉलचा बॉसही झालो! तो आणि मी तरीही एकमेकांचे चांगले मित्र आहोत.अशा पुलंच्या भाषेत सांगायचं झालं तर ‘आपली जीवनं समृद्ध करायला आलेल्या’ अनेकांचा मी ऋणी आहे आणि तो विचार पुढे न्यावा असं वाटलं म्हणून हा उद्योग केला.

आणखी एक कारण म्हणजे ‘फाइव पॉइंट समवन’ सारख्या कादंबरीत आणि त्यावर बेतलेल्या ‘थ्री इडियट्स’ सारख्या चित्रपटात इंजिनियर होताना काय काय गोष्टींना तोंड द्यायला लागतं, चित्र-विचित्र प्राध्यापक / प्राचार्य कसे भेटतात हे सगळं आपल्याला पाहायला मिळतं. पण एकदा इंजिनियर म्हणून बाहेर पडल्यावर – भारतात आणि इंग्लंडमध्ये (कामाची वेगळी पद्धत असूनही) – कशी ‘आगीतून फुफाट्यात’ अशी आपली अवस्था होते (खरं तर ‘कालचा गोंधळ बरा होता..’ हे इथे चपखल बसेल) हेही सांगायची खुमखुमी होती.

ऋणनिर्देश करताना हेही मान्य करायला हवं की सध्याच्या काळात गुगल, विकिपीडिया, इएसपीएनक्रिकइन्फो इत्यादी ठिकाणांवरून इतकी सहज माहिती मिळते, संदर्भ तपासता येतात आणि ‘मायक्रोसॉफ्ट वर्ड’ मध्ये लेखनात इतके सहज बदल करता येतात की त्यांचा उल्लेख करायचा विसरही सहज पडू शकतो.

शेवटी इतकंच... या पात्रांना घडवताना मी जगाकडे एका चांगल्या नजरेनं बघायला शिकलो. जगानंही बहुतांशी माझा अपेक्षाभंग केला नाही. त्यामुळे हा प्रवास आनंददायी होत गेला. तुमचाही वाचन-प्रवास असाच सकारात्मक होवो ही इच्छा.

(क्रमश:)

- कुमार जावडेकर. 




२.६ कथा - भुताचं भुयार (अंजली शेगुणशी)

‘भुताचं भुयार’- ‘किस्से’ या मराठी पुस्तकातील एक किस्सा

कथा: अविनाश देशपांडे, शब्दांकन : अंजली शेगुणशी (वडिलांनी सांगितलेल्या बालपणीच्या कथा)

भुताचं भुयार’- ‘किस्से’ या मराठी पुस्तकातील एक किस्सा

 कथा: अविनाश देशपांडे, शब्दांकन: अंजली शेगुणशी (वडिलांनी सांगितलेल्या बालपणीच्या कथा)

ही गोष्ट आहे माझ्या लहानपणाची! १९५२ ते १९५३ च्या सुमाराची. आळंदीला माझ्या पक्का लक्षात राहिलेला हा अजून एक किस्सा.

तेव्हा मी तिसरीत म्हणजे आठ-नऊ वर्षांचा असेन. मी आणि माझे मित्र नेहमी आमच्या गल्लीत चोर-शिपाई खेळायचो. याच गल्लीत एक जुना पडका वाडा होता. तिथे दोनच खोल्या ठीकठाक होत्या आणि बाकी सर्व खोल्यांची पडझड झाली होती. या आख्ख्या वाड्यात, एकच म्हातारी राहायची, ती वयाने साधारण पंचाहत्तर-ऐंशीच्या दरम्यान असावी. तिचा चेहरा सुरकुतलेला, अंगकाठी बारीक आणि आवाज किरटा! या पडक्या मोठ्या वाड्यात ती एकटीच रहायची. या पडक्या वाड्याच्या परसात पेरू, डाळिंब, सीताफळ, पपई, बोरं अशी अनेक फळझाडं होती आणि ती कायम फळांनी लगडलेली असायची. आता ही म्हातारी कधी ती फळ उतरून पण घ्यायची नाही आणि कोणी मुलं फळं तोडायला आली तर त्यांना तोडू पण द्यायची नाही. असं का? ते तिचं तिलाच माहीत; पण त्या वाड्यात जाण्याची किंवा ती फळ तोडायची परवानगी कोणालाच नव्हती.

एक दिवस अचानक ही म्हातारी मेली. मग तिच्या नातेवाईकांची शोधाशोध सुरू झाली. कोणीतरी पुण्याहून, तिच्या एका लांबच्या नातेवाईकाला पकडून आणलं. मग तिचा अंत्यविधी पार पडला. अर्थात हा माणूस तिचा खूपच लांबचा नातेवाईक असल्यामुळे, तिला अग्नी देऊन तो लगेच परत गेला.

मग साधारणतः आठ ते दहा दिवसांनी मी आईला एका बाईशी बोलताना ऐकलं, “बिचारीचा दहावा बारावा कोण करणार? चांगली होती तशी.”

मग ती बाई म्हणाली, “आता तिच्या आत्म्याला शांती कशी मिळणार? तो गवळी माहीत आहे का?

काल पहाटेच, तिचं भूत पाहिलं म्हणे त्यांनी वाड्याबाहेर!”

त्यांचं बोलणं ऐकून मी चांगलाच चरकलो. मी त्या दोघींचं बोलणं ऐकतो आहे, असं लक्षात आल्यावर आईनी मला तिथून हकलवलं.

हळूहळू ही भुताची गोष्ट, अख्ख्या गावात पसरली. खरं खोटं कोणाला माहीत? पण हळूहळू म्हातारीचं भूत पाहिल्याचे दावे, इतर बऱ्याच जणांनी सुरू केले. लवकरच त्या वाड्याला भुताटकीचा वाडा म्हणून शिक्कापण मिळाला.

मागच्या परसातली झाडं फळांनी लगडलेली होती; पण आत जायची कोणाची हिम्मत नव्हती. संध्याकाळ झाली आणि अंधार पडला की, आम्ही मुलं रामरक्षा म्हणत जीव मुठीत धरून त्या वाड्यासमोरून पळत जायचो.

असाच एका दुपारी मी आणि माझेकाही मित्र त्या वाड्यापुढे उभे होतो.

“ती झाडं बघ कशी फळांनी लगडलेली आहेत. चल जायचं का?” मी विचारलं.

“अरे, पण ती म्हातारी डोक्यावर बसली तर? ती इथे भूत बनून राहते. तुम्हाला मरायचं असेल, तर तुम्हीच मरा. आम्ही नाही येणार.” काही जण म्हणाले.

मी थोडा नाराज झालो; पण अचानक माझ्या भावड्या नावाच्या एका धटिंगण मित्राचा हात माझ्या खांद्यावर पडला, “चल, मी येतो तुझ्या बरोबर.” तो म्हणाला. माझा हा मित्र माझ्यापेक्षा दोन तीन वर्षं मोठ्ठा असावा. तो माझ्यापेक्षा उंच आणि अंगाने पण चांगला दणकट होता. आता त्याची साथ मिळाल्यावर माझा आत्मविश्वास दुणावला. तशीपण ती वेळ दुपारचीच होती, त्यामुळे आम्हीपण तसे निवांतच होतो. इतर मुलांकडे दुर्लक्ष करून आम्ही त्या वाड्यात शिरलो. आत जाईपर्यंत तसा मी निर्धास्त होतो; पण त्या वाड्याचं आतलं पडकं आणि भीषण स्वरूप पाहून माझा उत्साह जरा कमी झाला.

“तुला काय वाटत अव्या? ह्या वाड्यात खरंच भूत असेल का?” भावड्या हळूच माझ्या कानात खुसफुसला आणि माझ्या मनात भीतीची एक कळ उठली.

“मला भाऊंनी सांगितलंआहे की, भूत-बीत असलं काही नसतं, आणि जरी भुतं असली, तरी ती उन्हाला घाबरतात आणि पळून जातात असं माझी आई म्हणाली होती मला एकदा.” मी कसनुसा मनाचा धीर करून बोललो.

मग दबकत दबकत, त्या पडक्या-झडक्या खोल्या ओलांडून आम्ही परसापर्यंत पोहोचलो. तिथे फळांनी लगडलेली झाडं पाहून आमची भीती पार पळाली. आम्ही अगदी हावरटासारखे एकमेकांकडे पाहिलं. बरीच फळं खाली गळून पण पडली होती; पण तरीही आम्ही उगीचंच झाडांवर चढून झाडावरची फळं तोडली. मस्त हाताला लागेल त्या फळावर आम्ही तुटून पडलो. अर्धा एक तास फळांवर यथेच्छ ताव मारून झाल्यावर आम्ही इकडे तिकडे बघायला लागलो. मग आमची नजर एका मोठ्ठ्या गाडग्यावर पडली. त्या गाडग्याच्या बाजूला बऱ्याच विटा रचलेल्या होत्या. हे गाडगं थोडं सरकलेलंहोतंआणि त्या गाडग्याच्या खाली कसला तरी खड्डा असावा असं वाटलं. आम्ही जवळ जाऊन त्याचं निरीक्षण केलं. आम्हांला वाटलं की, ते न्हाणी घरातलं पाणी जायचं भोक असावं; पण तेअसं झाकलं का बरं असावं? असं आमच्या मनात आलं आणि आम्ही ते गाडगं थोडं सरकवलं. पाहतो तर काय त्याच्या खाली माणूस आत जाऊ शकेल एवढा मोठा खड्डा दिसला. आम्ही आत वाकून बघितलं. आत चक्क भुयार असावं असं वाटतं होतं. माझ्या मनात या भुयाराचं भयंकर कुतूहल निर्माण झालं.

“कदाचित या भुयारात काही तरी खजिना दडवला असेल कोणी. आत जाऊन बघायचं?” मी विचारलं.

“नको बाबा! फळ खाण्यापर्यंत ठीक आहे; पण असल्या भुयारात वगैरे आपण नाही येणार.” असं जाहीर करून भावड्या मोकळा झाला.

पण माझं कुतूहल हे माझ्या भीतीपेक्षा अधिक भारी ठरलं. इथे भूत नाही याची मला खात्री पटली होती. मग मी त्याला म्हणालो, “हे बघ मी जातो आत, नी पाहतो काय आहेते. तू इथे उभा राहा आणि जर मी खूप वेळ परत नाही आलो, तर आरडाओरडा करून लोकांना बोलव, कोण न कोण तर मदतीला येईलच.” मी म्हणालो. आता या योजनेला फार काही विरोध करण्याचं कारण नसल्यामुळे भावड्या तयार झाला.

मग त्यानी मला हाताला धरून त्या भुयारात उतरवलं. तसा हा खड्डा निदान चार ते पाच फूट खोल असावा, कारण त्याने मला सोडल्यावर मी काही इंचांनी जमिनीवर आपटलो. बाहेर कडक ऊन असल्यामुळे आत बऱ्याच दूर पर्यंत अंधुकसं दिसत होतं. हे भुयार आतनू अगदी व्यवस्थित लिंपल्यासारखं दि सत होतं. थोडं पुढे गेल्यावर मला दोन मार्ग दिसले. त्यातल्या एकात मी घुसलो. हळूहळू पुढे सरकत मी बराच पुढे गेलो. आता अंधार वाढू लागला आणि आत एक प्रकारचा ओलसर कुबट वास येऊ लागला. पण कदाचित पुढे खजिना असेल, या आशेनी मी पुढे चालत राहिलो. मातीच्या कोंदट, कुबट वासानी मला घुसमटायला लागलं. आता अंधार इतका वाढला होता की, मला काहीच दिसेना. अचानक माझा पाय कशाला तरी अडखळला आणि मी खाली पडलो. मी हातानी चाचपलं आणि हाताला जे लागलं, ते हाड आहे की लाकडाचा ओंडका हे सांगण अवघड होतं; पण तरीही मनाचा हिय्या करून मी परत उठलो आणि चालायला लागलो.

गंमत अशी, की अंधारात पडल्यामुळे मी नेमक्या कुठल्या दिशेने चालत आलो होतो ते मला उमगेना. मग मात्र माझी चांगलीच तंतरली आणि आता परत फिरण्याच्या हेतूने, मी एका दिशेला चालू लागलो. बराच वेळ चालून जेव्हा मला काहीच दिसेना, तेव्हा माझ्या पायातलं त्राणच गेलं. श्वास घेणं अजून कठीण झालं होतं. मी जिवाच्या करारावर उठलो आणि उलट्या दिशेनं जोरजोरात धावायला लागलो.

“भावड्या... भावड्या...” असं जिवाच्या आकांतानी ओरडायला लागलो.

काही वेळ पळल्यावर मला थोडा अंधुकसा उजेड दिसू लागला, आणि मला पळायला आणि ओरडायला थोडा हुरूप आला.

“भावड्या... भावड्या... आहेस का तू?” मी परत ओरडलो.

“मी आहे ... मी आहे!” असा पुसटसा आवाज माझ्या कानी पडला. मी आवाजाच्या दिशेने धावलो,

आणि शेवटी जिथून मी या भुयारात शिरलो होतो, तिथे परत पोहोचलो.

हा खड्डा तसा उंच असल्यामुळे मला बाहेर पडता येईना. “माझी उंची पुरत नाहीये, तू ये आत मला बाहेर काढायला.” मी ओरडलो.

भावड्या आत वाकून पाहू लागला. माझं तोंड पाहून त्याला काय वाटलं माहीत नाही; पण तो आत उतरला आणि मग त्याने मला बाहेर ढकललं आणि मग स्वतः पण वर आला.

सर्वांत पहिल्यांदा मी मोठ्ठे मोठ्ठे खोल श्वास घेतले; पण अजून पण माझ्या हृदयाचे ठोके मला स्पष्टपणे ऐकू येत होते. पाच एक मिनिटं बसल्यावर मला जरा हुशारी आली.

“तरी मी तुला सांगत होतो, आत नको जाऊस. बरं मेला-बिला नाहीस. चल आता निघूया इथून आणि या विषयी कोणाला बोलू नकोस, नाहीतर दोघं लाटण्याने मार खाऊ,” भावड्या बोलला.

मला त्याचं म्हणणं पटलं आणि मी मान डोलावली. मग ते गाडगं होतं तसं पुन्हा जागेवर सरकवून आम्ही त्या वाड्याच्या बाहेर पडलो.

हा प्रसंग मी कधीच विसरणार नाही. पुढे मोठा झाल्यावर एकदा मला हा प्रसंग आठवला आणि मी त्यावर विचार करू लागलो. सहज आईला मी त्या वाड्याविषयी बोललो आणि मग मला असं समजलं की, त्या बाईचे नवरा, दीर आणि सासरे, स्वातंत्र्य लढ्यात सहभागी होते. एकाला तर शिक्षा पण झाली होती म्हणे.

सर्व बाजूंनी विचार करता मी या अनुमानाला पोहोचलो की, तो नक्की पळवाटीसाठी बनवलेला भुयारी मार्ग असणार, कारण हे भुयार आतून चक्क सारवल्यासारखंहोतं. शिवाय त्याला दोन मार्गसुद्धा होते. स्वातंत्र्यपूर्व काळात, हे घर या क्रांतिकारकांचं भेटायचं ठिकाण असावं. चुकून पोलीस आले, तर लपनू बसायला किंवा पळून जायचा हा मार्ग असावा. म्हणूनच कदाचित ही म्हातारी कोणाला तिथे येऊ देत नसावी? अर्थात हा माझा तर्क, खरं खोटं कोणाला माहीत?

पुढे मी सैन्यात भरती झालो तेव्हा मला कायम वाटायचं की जर मी त्या वेळी थोडा मोठ्ठा असतो आणि माझ्या हातात मशाल असती, तर ते भुयार नक्की कुठे जातं हे मी नक्की जाणून घेतलं असतं!

- अंजली शेगुणशी.  

संयोजक

श्रीकांत पट्टलवार, मीरा पट्टलवार, रवी दाते, मुकुल आचार्य, कुमार जावडेकर