Friday, 18 October 2024

२.२ कथा - परतफेड (अनुपमा श्रोत्री)

परतफेड

डॉक्टर अनुपमा श्रोत्री


अनन्या थिजून गाडीत बसली होती. बाहेर हॉर्नचे कर्कश्श आवाज येत होते. तिनं बाहेर पाहिलं. पृथ्वी काही अंशांनी कलली असली पाहिजे. सगळं उलटं पालट दिसत होतं. मगाशी तो मोठ्ठा आवाज झाला तो लांबून आला होता की जवळून आला होता? तिला काहीच आठवेना.

काही मिनिटांपूर्वी ती सुपर मार्केट मध्ये खरेदी करत होती. घाई घाईत गाडीच्या बूट मध्ये सामान टाकून ती तिथून निघाली. घरी जाऊन काय स्वैपाक करावा या विचारात आपण कार पार्क मधून सिग्नल पाशी कधी पोचलो हे तिला कळलंच नाही. सिग्नल बदलण्या आधी जाता येईल का थांबावं अशा द्विधा मनःस्थितीत असताना तिला रेअर वहयू मध्ये मागचा चालक खूप घाई करतोय असं जाणवलं. बहुतेक जाता येईल सटकून असं ठरवून तिनं accelerator वर पाय दाबला.

एवढंच आठवतंय.

हृदयाची जोरात धडधड होत होती. कोणीतरी तरुण मुलगा रस्त्यावर उभा राहून तिच्याकडे बघत अर्वाच्य शिवीगाळ करत आहे, हातवारे करतो आहे असं तिला एकदमच जाणवलं. आपला अपघात झाला आहे की काय? ती स्वतःचं शरीर चाचपून बघू लागली. सगळं धडधाकट होतं. मानेतून मात्र सणका येत होत्या. माझी चूक झाली की काय? माझ्या घाईमुळे तर अपघात झाला नाही ना? म्हणूनच तो तरुण माझ्यावर चिडला आहे की काय?

बाहेर एक लाल रंगाची गाडी विचित्र कोनात उभी होती. पुढचा बॉनेटचा भाग छिन्नविछिन्न झालेला दिसत होता. तिनं दोन्ही हातांनी चेहरा झाकून घेतला. हे काय झालं क्षणार्धात?

ती इकडे तिकडे बघू लागली. इतर गाड्या तिच्या आणि त्या तरुणाच्या गाडीला वळसा घालून पुढे निघून जात होत्या. जाता जाता आतले लोक उत्सुकतेने मागे वळून बघत होते. काही हसत होते. काही ट्रॅफिक रखडल्याचा वैताग व्यक्त करत होते. काही मात्र त्यांच्याच घाईत मग्न.

तिला त्या तरुणाची भीती वाटू लागली. दिसायला रासवट होता आणि संतापलेला. गाडीचं दार बंद आहे याची तिनं खात्री करून घेतली. पण ते लॉक होईना. तिला घाम फुटला. आता काय करायचं? अशीच गाडीत किती वेळ बसून राहू शकणार आहे? तो तरुण तरी किती वेळ असा आरडा-ओरडा करणार आहे? पोलीस येतील का आता? आपल्याला शिक्षा होईल का? हजारो विचारांचं थैमान तिच्या डोक्यात सुरु झालं. छातीतली धडधड वाढली. गाडी राईट ऑफ झाली तर? इन्सुरन्सचं काय होईल? अवी काय म्हणेल? तोंडाला कोरड पडली होती. तो तरुण जरा लांब गेला तर किती बरं होईल.

पण तो तर अजूनच जवळ येतोय. बाहेरून दाराला हात लावतोय की काय? काय करावं आता? तिला काही कळेना. कुणीच थांबून तिला मदत का करत नाहीये? त्याच्यापासून आता आपलं रक्षण कसं करावं? तिने डोळे घट्ट मिटून घेतले आणि मनातल्या मनात आठवेल ती प्रार्थना म्हणू लागली. काही क्षण गेले आणि दार उघडल्याचा आवाज झाला. तिने दचकून डोळे उघडले.

समोर साठीच्या आसपासची एक स्त्री उभी होती. ओठावर हलकं स्मित आणि चेहऱ्यावर अगदी शांत भाव होता. तिनं अनन्याचा हात हातात घेतला. तो तरुण मागे सरकला होता. त्याची बडबड बंद झाली होती आणि तो नुसताच पिंजऱ्यातल्या श्वापदा सारखा येरझाऱ्या घालत होता. ही स्त्री कोण होती? साधीसुधीच दिसत होती. चेहरा किती शांत होता. आणि विशेष म्हणजे काहीच बोलत नव्हती. तिच्या हाताला मात्र विलक्षण ऊब होती. तिला खूप सुरक्षित वाटू लागलं. श्वास नियमित होऊ लागला. धडधड ही शांत होत गेली. त्या पिवळ्या शर्टातल्या तरुणाची भीती वाटेनाशी झाली. तिनं त्या स्त्रीकडे बघून पुसटसं स्मित केलं. कोण आहात तुम्ही? कशा काय थांबलात इथे? तुम्हाला त्या गुंडाची भीती नाही वाटत? किती तरी प्रश्न. पण तिनी एकही विचारला नाही.

असा किती वेळ गेला कोणास ठाऊक. मुलाला जशी आई जवळ असली की जगाची भीती वाटत नाही तशी तिची अवस्था झाली होती. हातात हात घेऊन दोघीही निःशब्द होत्या.

मग कधीतरी पोलिसचा सायरन वाजला आणि दोन उंचपुरे पोलीस त्यांच्या गाडीतून उतरले. एक जण त्या तरुणाकडे गेला आणि दुसरा तिच्या गाडीकडे वळला. त्याने तिच्या जवळच्या स्त्रीशी काहीतरी संवाद केला. ती खाली वाकून अनन्याला म्हणाली 'काही काळजी करू नकोस आता. तो गुंड तुला काही करणार नाही. पोलीस इथून तुझी काळजी घेतील. मी जाते आता.' अनन्या काही म्हणेपर्यंत ती गेली सुद्धा!

थँक यू. धन्यवाद. खरंच खूप उपकार झाले तुमचे. मी कशी परतफेड करू? तुमचं नाव पण माहिती नाही. कुठे राहता? परत कशा भेटाल आता? कुठे शोधायला येऊ तुम्हाला मी? सगळे प्रश्न ओठावरच राहिले. ती झपझप चालत गर्दीत दिसेनाशी झाली.

नंतर अवीशी बोलताना अनन्या तिचं वर्णन करायचा प्रयत्न करत होती. पण तिच्या लक्षात आलं की त्या स्त्रीचे पांढरे केस, तिच्या चेहऱ्यावरचं स्मित आणि तिच्या हातांची ऊब याशिवाय तिला दुसरं काहीच आठवत नव्हतं. आपल्या स्वार्थीपणाची लाज वाटली तिला. नाव, नंबर काही सुद्धा घेतलं नाही आपण तिचं. तिला धन्यवाद कसं म्हणणार आता? ती जर त्या वेळी तिथे आली नसती तर काय झालं असतं? कशी देवासारखी धावून आली अगदी वेळेवर. त्या रस्त्यावरून जाताना पुन्हा पुन्हा अनन्या ला ती स्त्री आठवे. अवी म्हणाला अगं किती ऑब्सेस करतेस. पुढच्या वेळी कुणी मदत केली तर थँक यू म्हणायला विसरू नकोस म्हणजे झालं. प्रत्येक चांगल्या कृत्याची आपल्याला परतफेड करता येईलच असं नाही. मनातल्या मनात धन्यवाद दिलेस ना? मग झालं तर.

एकदा दुपारी अगदी भर रहदारीची वेळ. अवी गाडी चालवत होता. ख्रिसमस जवळ आलेला. लोकांची खरेदीची एकच घाई उडाली होती. पुण्यात दिवाळी च्या आधी लक्ष्मी रोड वर होते तशी. गाडी मोठ्या मुश्किलीने हळू हळू सिटी सेंटर मधून बाहेर पडू पाहात होती. अवी शिताफीनं गर्दीला तोंड देत गाडी त्या कोलाहलातून बाहेर काढत होता. तेवढ्यात अनन्याला समोर एक पोरसवदा मुलगी गाडी बाहेर थरथरत उभी राहिलेली दिसली. तिच्या गाडीनं समोरच्या गाडीला ठोकलं होतं बहुतेक. समोरच्या गाडीतून एक दांडगा माणूस बाहेर पडत होता. काय होतंय हे लक्षात यायच्या आधीच अवीनं गाडी पुढे नेली होती.

'अवी थांब थांब!'

'अगं असं काय करतेस? थांब काय? थांबायला जागा आहे का इथे? काय झालं?'

'नाही नाही प्लीज तुला जमेल तिथे थांब ना लवकर.'

'शॉपिंग राहिलंय वाटतं अजून. काय दिसलं? हॅन्ड बॅग का शूज?'

'अवी प्लीज थांबव ना गाडी पटकन.'

'अगं पण .... ओके!'

अवीनं गाडी थांबवताच अनन्या पटकन गाडीतून उतरली आणि पळतच मागे जाऊ लागली. अपघाताच्या ठिकाणी पोहोचेपर्यंत त्या दांडग्या माणसाचं त्या मुलीबरोबर एकतर्फी भांडण सुरु झालेलं होतं. ती मुलगी नवशिकी ड्रायव्हर असावी. खूपच लहान दिसत होती. एकीकडे हुंदके दाबत ती त्याच्या प्रश्नांच्या सरबत्तीला उत्तर द्यायचा प्रयत्न करत होती. पण तोंडातून शब्द फुटत नव्हते.

अनन्या दोघांच्या मध्ये जाऊन उभी राहिली.

'एक मिनिट. तुम्ही जरा मागे उभे राहता का? काय विचारायचं तुम्हाला ते नीट शांतपणे विचारा. ओरडू नका.'

'अहो तुम्ही कोण? कशाला मध्ये पडताय?'

'ते महत्वाचं नाही. तुम्हाला इन्शुरन्स चे डीटेल्स पाहिजेत ना? मग दोन मिनिटं दम धरा.'

अनन्यानं त्या मुलीजवळ जाऊन तिचा हात पकडला.

'गाडी इन्शुअर्ड आहे ना तुझी?'

मुलीनं हळूच होकारार्थी मान हलवली.

'बरं तू शांत हो. तो माणूस काही करणार नाही तुला. इन्शुअरन्सची माहिती कुठे आहे?'

'ते ते .. हॅन्ड बॅगेत ...' ती पुटपुटली. तिच्या तोंडून शब्द फुटत नव्हते.

'तुला थोडं पाणी हवय का?'

मुलीनं डोकं हलवलं. अनन्यानं इकडे तिकडे पाहिलं. समोरच एक छोटा कॅफे होता. मुलीच्या हाताला धरून ती कॅफेकडे जाऊ लागली आणि त्या माणसाला वळून म्हणाली,

'तुम्हाला इन्शुअरन्स ची माहिती हवी असेल तर त्या कॅफेमध्ये या.'

आत जाऊन त्या मुलीला बसवून अनन्यानं पाणी आणि गरम गरम चहा मागवला. पाणी प्यायल्याबरोबर मुलीच्या जीवात जीव आला. तिनं हॅन्ड बॅग उघडून इन्शुअरन्स ची माहिती काढली. त्या माणसानी ती लिहून घेतली आणि तो चालता झाला. चहा आल्याबरोबर अनन्यानं तिला विचारून साखर घातली.

'बरं तू ठीक आहेस का आता?'

तिनं मान हलवली.

'तुझी गाडी व्यवस्थित दिसते आहे. बहुतेक ड्राईव्ह करता येईल. कुणाला बोलवायचं का?'

तिनं पुनः मान हलवली.

'माझ्या बॉयफ्रेंडला.'

अनन्यानं नंबर घेतला आणि मुलीच्याच फोन वरून कॉल केला.

'बरं पोहोचतोय तो पाच मिनिटात. तू थांब इथेच.'

अनन्या उठली. मुलीच्या पाठीवरून हात फिरवून ती कॅफेमधून बाहेर पडली. पळत पळतच ती अवीने जिथे गाडी लावली होती तिथे पोहोचली. तो थोडा वैतागूनच तिची वाट पाहात होता.

'अगं दहा मिनिटं उभा आहे मी इथे नो पार्किंग मध्ये गाडी लावून, काय करत होतीस इतका वेळ?'

अनन्या गाडीत शिरली. सीट बेल्ट लावत म्हणाली,

'अवी, तुला ती माझ्या अपघताच्या वेळी मदतीला आलेली बाई ऐकून माहिती आहे ना?'

'हो, चांगलीच. ती दिसली तुला आत्ता? अरे वा! गळा-भेट झाली का काय मग?'

'भेट नाही झाली. पण आज फायनली इतक्या दिवसांनंतर, तिचे आभार मानून टाकले.'

7 comments:

  1. सुंदर !

    ReplyDelete
  2. साध्या प्रसंगाचं सुंदर कथानकात रूपांतर कसं करावं याचं हे छान उदाहरण आहे. निवेदनातली लज्जत वाचण्यापेक्षा खूपच अधिक आहे.

    ReplyDelete
  3. खूप छान कथा , वाचून आणि ऐकून सुद्धा छान वाटली

    ReplyDelete
  4. एखाद्या छोट्याशा घटनेतून कधी कधी आपल्याच वलयातून बाहेर पडण्याची प्रेरणा मिळते. आपल्यालाही समाजात काही देणं लागतं याची जाणीव होते. एक मोठं अध्यात्मच या छोट्याशा गोष्टीतून आपण सांगितलं आहे. पण "परतफेड" हे शीर्षक जरा खटकतं. परतफेड म्हणजे हिशोब पूर्ण. आयुष्यात असेच प्रसंग पुन्हा आले तर त्यांनाही अनन्या याच प्रकारे समोर जाईल. कारण तिला एक नवीन दृष्टी मिळाली आहे.
    बाकी लेख खूप छान. ऑडियो मुळे तो अधिकच इफेक्टिव झाला आहे.

    ReplyDelete
  5. सुरेख कथा आणि सादरीकरण!

    ReplyDelete
  6. लिना फाटक, वाॅरिंगटन28 October 2024 at 18:25

    कथा छान, सहजसुंदर शब्दात लिहीली आहे. सादरीकरण खूपच सुंदर झालंय व त्यामुळे कथेत समरस होता आले. खूप छान.

    ReplyDelete
  7. छान, सहजसुंदर शब्दात कथा लिहीली आहे. सादरीकरण फारच सुंदर झालंय. त्यामुळे कथेत खुप समरस होता आले. सुरेख.

    ReplyDelete

प्रतिसाद

संयोजक

श्रीकांत पट्टलवार, मीरा पट्टलवार, रवी दाते, मुकुल आचार्य, कुमार जावडेकर