Friday, 18 October 2024

४.१ गप्पा - विष्णू येती घरा (मीरा पट्टलवार)

विष्णू येती घरा 

मीरा पट्टलवार

विष्णू मनोहर हे नाव ऐकलं होतं ते त्यांच्या प्रसिद्ध उपहारगृह ‘विष्णुजी की रसोई’ यामुळे. पण त्यांच्याबद्दल फार माहिती नव्हती. योग असा आला की नॉर्वेमा गणेश उत्सवात त्यांच्या मुलाखतीचा कार्यक्रम ठरला आणि त्यांच्याशी प्रत्यक्ष गप्पा मारण्याची संधी मिळाली. मुख्य म्हणजे इंग्लंड भेटीत एक आठवडा त्यांचा मुक्काम आमच्याच घरी होता.  आमच्या सारखेच तेही नागपूरचेच असल्यामुळे त्यांचाशी भरपूर गप्पा झाल्या. आमच्या कडील मुक्कामात त्यांनी कधी पुडाच्या वड्या, कधी गोळा भात असे खास नागपुरी पदार्थ स्वहस्ते बनवून आम्हाला, आमच्या मित्र मंडळींना खूप आग्रहाने खाऊ घातले. 


साहजिकच पहिला प्रश्न विचारला की तुमचा शेफ ते महाशेफ आणि  सेलिब्रिटी शेफ हा प्रवास कसा झाला?

विष्णूजी म्हणतात - मी शाळेत असताना अभ्यासात काही खास नव्हतो. मागच्या बाकावर बसणारा ढ मुलगा होतो. माझे वडील चित्रकार होते सोबत त्यांचा डेकोरेशन चा व्यवसाय होता. त्यात मी मदत करायचो. नंतर मी केटरिंगवाल्यांना मदत करू लागलो. या प्रवासात मला अनेक प्रकारचे कडू-गोड अनुभव आले. ज्यावेळी तुमच्याकडे पैसा प्रतिष्ठा असं काहीच नसतं तेव्हा समाजात तुम्हाला अपमानित होण्याचेच प्रसंग जास्त येतात.एखादा प्रसंग असा येतो की तो तुमच्या आयुष्याला कलाटणी देणारा ठरतो. विष्णूजी म्हणाले अशा असंख्य अनुभवातूनच मी घडत गेलो.

सुरुवातीला मी लेडीज क्लब मध्ये कुकरी शो करू लागलो. पहिल्यापासूनच त्यांना चांगला  प्रतिसाद चांगला मिळू लागला. नंतर असं लक्षात आलं की पाककृती जर लिहिलेल्या असल्या तर त्या महिलांना जास्त आवडतात म्हणून त्यांच्या फोटो कॉपीज मी १० -१० रुपयांना विकू लागलो - इथूनच पुढे मला मग दूरदर्शनवर कुकरी शोज करण्याची संधी मिळाली. मग ब्लॉग लेखन, वृत्तपत्रातून स्तंभ लेखन, पुस्तकं  असं माझं लिखाणही सुरू झालं, ‘विष्णू जी की रसोई’ ची कल्पना आली आणि तेही उत्तम रित्या सुरू झालं.

वेगवेगळी कामं करताना विष्णूजी नेहमी बघतात की आपण जे करतो त्याचा समाजातल्या गरजू व्यक्तींना उपयोग झाला पाहिजे. विष्णूजींनी एक प्रसंग सांगितला विष्णूजी की रसोई हे उपहारगृह आठवड्यातून एकदा बंद असायचं. एकदा एक गरजू विक्रेता - बांगडीवाला म्हणाला की तुमचं उपहारगृह ज्यादिवशी बंद असतं त्यादिवशी मी ती जागा वापरू का? आणि मग उपहारगृहाची जागा या बांगडीवाल्याला  विनामूल्य वापरायला मिळाली. अशी गरजूंना शक्य असेल तेव्हा मदत करण्याची त्यांची सामाजिक बांधिलकी !

(कार्यक्रमातले आणि घरचे काही संग्रहित फोटो.)

पुढे गप्पा खूप रंगल्या मग विष्णूजींनी केलेले फूड फेस्टिवल्स आणि विश्वविक्रम यावर त्यांना विचारलं तुम्हाला या आयडिया कशा सुचल्या?

त्यावर ते म्हणतात की काहीतरी वेगळं करून दाखवायचं याचाच मला ध्यास होता. आपण असं काहीतरी करावं की ज्यामुळे आपल्याला अभिमान वाटेल, आपल्या सहकाऱ्यांना, आपल्या समाजाला आणि आपल्या देशाला सुद्धा अभिमान वाटेल आणि त्यातूनच समरसता भाजी, महापराठा, मिलेट्स खिचडी, राम हलवा असे वेगवेगळे विश्वविक्रम घडत गेले.

नागपूर इथल्या मुंडले हायस्कूल या शाळेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त शाळेचे विद्यार्थी, शिक्षक, इतर कर्मचारी आणि पालक अशा सगळ्यांना एकत्र आणून एक प्रोजेक्ट करावं असा प्रस्ताव पुढे आला. युनेस्कोच्या इनक्लुसिव्हनेस’ या कल्पनेवर आधारित हे प्रोजेक्ट होतं आणि यात पाच हजार किलो ची समरसता भाजी करायचं ठरलं. यात मुख्य उद्देश हा होता की यातून मुलांना स्वतः स्वयंपाक करायला प्रेरणा मिळेल. अशी ही ५००० किलो समरसता भाजी विशेष याच्यासाठी की यात १००० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांचा सहभाग होता,आणि काहीही वाया न घालवता म्हणजे झिरो वेस्ट अशी ही समरसता भाजी झाली आणि पुढे जवळजवळ २५ ह जार लोकांना ती वाटण्यात आली.

खाण्याबरोबरच गाणी, मराठी/हिन्दी, कविता करण हाही त्यांच एक छंद. कवी दिनकर यांच्या रचना सादर करणे यात तर विष्णूजींचा हातखंडा. ते स्वतः सुद्धा कविता आणि विडंबनपर रचना करतात. त्यांचा अभिनय सुद्धा वाखाणण्यासारखा आहे. याचं कारण म्हणजे त्यांची कविता म्हणण्याची शैली किंवा संवाद फेक अगदी बुलंद. आणि म्हणूनच श्री.प्रवीण तरडे यांच्यासारखे दिग्दर्शक त्यांना भूमिकेसाठी निवडतात. वन्स मोर, सरसेनापती खंबीरराव मध्ये त्यांनी भूमिका केल्या आहेत.

गाण्याची ही त्यांना खूप आवड. एका वर्ल्ड रेकॉर्डमध्ये कुकिंग चालू असताना त्यांनी तोडी रागातल्या गायलेल्या ओळी ऐकल्यावर असं वाटतं की हे गायकच आहेत की काय,? असे हे बहुआयामी व्यक्तिमत्व त्यांना पश्चिमाईच्या टीम तर्फे शुभेच्छा देते आणि आशा करते की इंग्लंडमध्ये 'विष्णूजी की रसोई'  लवकरच सुरु होईल आणि पश्चिमाईच्या सगळ्या वाचकांना त्याचा आस्वाद घेता येईल.

विष्णू येती घरा (सुप्रसिद्ध महा शेफ श्री. विष्णू मनोहर यांची इंग्लड भेट सप्टेंबर २०२४) - YouTube

-मीरा पट्टलवार. 


6 comments:

  1. मी सुदैवाने या वर्षी या कार्यक्रमाला सहकुटुंब उपस्थित होतो. त्यानंतर आपल्या घरी झालेल्या कार्यक्रमात मी आणि माझा मुलगा हजर होतो. त्याच्या गाण्याचा स्वाद चाखता आला. अवलिया आहे. तुम्हा सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा !काका करमरकर, मुंबई. 🙏🙏🙏

    ReplyDelete
  2. आम्ही यंदा तेथे हजर होतो.धन्यवाद व शुभेच्छा!

    ReplyDelete
  3. वा! विष्णू मनोहरांच्या व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू यामुळे माहिती झाले!

    ReplyDelete
  4. He is a versatile personality indeed,he is a trained actor ,singer,a very nice person to meet with .Your write up is very interesting to read ,thank you

    ReplyDelete
  5. कार्यक्रम हुकल्याची कसर काही प्रमाणात तुमच्या लेखाने भरून काढली. उरलेली कसर व्हिडिओ बघून भरून काढतो. पण प्रत्यक्ष भेटीचा आनंद मिळाला नाही!

    ReplyDelete
  6. मीरा, नीलिमा कडून कौतुकाची थाप! या आधी मुलाखत पाहिली होती पण लेखन आज वाचून मराठी भाषेवर प्रभुत्व अजून कायम आहे असं वाटले! छान लेख, परत अभिनंदन!

    ReplyDelete

प्रतिसाद

संयोजक

श्रीकांत पट्टलवार, मीरा पट्टलवार, रवी दाते, मुकुल आचार्य, कुमार जावडेकर