माझे अलौकिक गुरु
सौ. वृंदा जोशी
अगदी लहानपणापासून मला गाण्याची आवड. मात्र ही आवड सुगम संगीत, विशेषतः भावसंगीतापुरतीच
मर्यादित होती. याचे कारण सुरांबरोबरच शब्दाचीही मला ओढ होती. त्यामुळे ज्या गाण्याचा
अर्थ समजत नाही, लावता येत नाही त्याबद्दल फारसे प्रेम वाटले नाही.
आमच्या काळात अनेक दिग्गज संगीतकारांची गाणी रेडिओवर सतत ऐकायला मिळत. कॅसेट्स
चा जमाना फार नंतरचा! तेंव्हा रेडिओ हेच एकमेव माध्यम होते, तेही घरोघरी नसत. आपली
आवड, भावसरगम या सारखे कार्यक्रम मन लावून ऐकायचे, चाल लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करायचा,
शब्द लिहून घ्यायचे. कधी कधी तेही स्पष्ट ऐकू
येत नसत. मग कोणता शब्द बरोबर व योग्य अर्थवाही असेल असा चाळाच माझ्या मनाला लागे.
स्मरणशक्ति कदाचित त्यामुळेच वाढली असावी. सुधीर फडके, श्रीनिवास खळे, यशवंत देव, हृदयनाथ
मंगेशकर, वसंत प्रभू यांची अनेक भावगीते, चित्रगीते कानावर पडत आणि मनावर खोल ठसा उमटवीत.
त्या काळात अधिकृत पणे संगीत शिकले गेले नाहीच पण तालासुरात स्पष्ट शब्दोच्चारात गाणे
म्हणता येई एवढेच!
पुढे आयुष्याला वेगळे वळण लागले. लग्न करून मी परदेशात आले. काही वर्षांनी
इकडचीच झाले. मात्र गाण्याची संगत सुटली नाही. उलट सहजपणे उपलब्ध झालेल्या कॅसेट्समुळे,
गाण्याबजावण्यात गम्य असलेल्या मित्रमंडळींमुळे, तसेच भारतातून इकडे वेळोवेळी येत असलेल्या
कलाकारांमुळे ती अधिकच जोपासली गेली. पतिदेवांनाही गाण्याची आवड खूपच असल्याने परदेशात
असुनही माझे गाणे जास्त फुलले. कदाचित वासरात लंगडी गाय शहाणी या न्यायाने असेल पण
गायची संधी बरीच मिळाली. अनेक कलाकारांच्या मार्गदर्शनाचा मला लाभ झाला.
त्यातली विशेष लक्षात राहण्यासारखी आठवण म्हणजे १९८४ आणि १९८८ साली श्री. यशवंत देव कार्यक्रमासाठी
इकडे आले होते तेंव्हा त्यांची व माझी चांगली ओळख झाली. ते हाडाचे गुरू आहेत, गाण्याची
आवड असलेल्या कोणालाही काहीतरी द्यायची त्यांची सदैव तयारी व खटपट असते. मी हौशीने
गाणे म्हणते हे त्यांना कळले मग ते आमच्या घरी राहायला आले तेंव्हा त्यांनी मला गाणे
म्हणायला लावले. शब्दोच्चारातील सहजता दाखवून दिली, गाण्यातील कृत्रिमपणा कसा घालवायचा
याचे मार्गदर्शन केले. मला खूप आनंद झाला. आमच्या पुढच्या भारताच्या फेरीत, गेल्याबरोबर लगेच आम्ही यशवंत देवांना भेटलो, खूप
गप्पा झाल्या. नंतर काही दिवसांनी त्यांचा फोन आला त्यांनी विचारले
की आता परत कधी भेटता?" आम्ही म्हटले पुढल्या भारताच्या भेटीत. आम्ही दोन दिवसांनी
तर परत चाललो". ते म्हणाले असं कसं चालेल? वृंदाला नवे गाणे कुठे शिकवले अजून,
कसंही करुन याच किंवा उद्या मला त्या बाजूला यायचेच आहे तेंव्हा मीच तुमच्या घरी येतो,
ठरल्या प्रमाणे ते आले. आम्ही शेजारून पेटी आणली होती. नुकतेच त्यांनी एक गाणे लिहिले
होते. " श्री महाकाली प्रणाम तुला ". त्याची चाल कच्ची तयार होती, तिथल्या
तिथेच त्याची सरगम लिहीत त्यांनी मला ते गाणे शिकवले. अधून मधून ते थोडा बदल करीत.
आम्हा सर्वाना ती एक पर्वणीच होती. चाल कशी तयार होते याचे प्रात्यक्षिक, तेही यशवंत
देवांकडून! कानात प्राण आणून मी सारे लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करीत होते. ध्वनिमुद्रणाची
काही सोय नव्हती, त्यामुळे स्मरणशक्तीवरच सगळा भार होता. दोन तीनदा माझ्याकडून गाणे
म्हणवून घेऊन ते गेले. त्यानंतर सतत परतीच्या प्रवासातसुद्धा ती चाल माझ्या मनात घोळत
राहिली. आपल्याला आली आली असं वाटतानाच परत काही विसरल्यासारखे वाटायचे पण शेवटी गाणे
माझ्या मनात चांगले ठसले.
त्यानंतर ते गाणे एका कॅसेटसाठी अनुराधा पौडवाल यांनी गायले. काही तांत्रिक
कारणांनी चालीत थोडा बदल केला होता. मात्र मला शिकवलेली चाल सर्वस्वी माझीच आहे, ती
मी प्रसादासारखी जपून ठेवली आहे, अशा अलौकिक गुरूंकडून मिळालेली. मनात येते, ही माझी
कोणत्या जन्माची पुण्याई!
- सौ. वृंदा जोशी.
खूप छान अनुभव वृंदा ,एवढ्या मोठ्या संगीतकारा बरोबर शिकायला मिळण म्हणजे भाग्याची गोष्ट आहे .
ReplyDeleteयशवंत देवांसारखे गुरू फक्त भाग्यवंतांनाच लाभतात. त्यांनी तर आपल्यासाठी नवीन गाणं बसवून आपल्याकडून गाऊन पण घेतलं. अलौकिक गुरू आणि अलौकिक शिष्या.
ReplyDeleteआपण गायलेल्या गाण्याचं रेकॉर्डिंग असल्यास ते ऐकायला आवडेल.
यशवंत देवांसारखे गुरु लाभणे हे हेवा वाटेल असे भाग्य. छान लेख. "प्रसादासारखे" जपून ठेवलेले गाणे ऐकायला नक्कीच आवडेल.
ReplyDelete