पत्र - यश : व्याख्या, प्राप्ती आणि मोजमाप
रवी दाते
सुप्रिया आणि संतोष देशपांडे
स. न.वि. वि.
पुस्तकं वाचायला आणि परत करायला बराच उशीर झालाय. क्षमस्व!
बर्याच दिवसांनी, खरंतर वर्षांनी,
पुस्तक वाचायला वेळ काढला. याच सगळं श्रेय तुम्हालाच. पुस्तक विकत घेतलं की वाचायची
घाई नसते, पण उधार उसनवारीची टांगती तलवार (जरी तुम्ही ठेवली नसलीत) तरी सारखी जाणवते
आणि वाचायला भाग पाडते. ‘टाटायन’ आणि ‘लंडनच्या आजीबाई’, दोन्ही पुस्तके अप्रतिम आणि
काही अंशी एकाच सूत्राने बांधलेली.
पुस्तके वाचल्यानंतर बऱ्याच वर्षांपूर्वी वाचलेल्या जेफ्री
आर्चरच्या ‘Kane and Abel’ या इंग्रजी कादंबरीची आणि त्यावर बेतलेल्या (???) शत्रुघ्न सिन्हाच्या ‘खुदगर्ज’ सिनेमाची आठवण झाली. तसं बघायला
गेलं तर ह्या दोन्हीचा, या पुस्तकांशी दुरान्वयेही संबंध नाही पण कादंबरीतील एक कथानायक
(बहुधा Abel) अगदी कफल्लक आणि Kane गर्भश्रीमंत, दोघे एकाच वेळी जन्मलेले, पण अगदी
भिन्न स्थितीत. मग ते एकमेकांच्या संपर्कात आधी योगायोगाने येतात आणि नंतर धंद्यात
तुल्यबळ प्रतिस्पर्धी म्हणून परस्परांसमोर उभे ठाकतात, असे काहीसे कथानक होते. ही गोष्ट
आठवायचे कारण असे की नुसेरवान टाटा आणि आजीबाई दोघेही Abel प्रमाणेच अत्यंत प्रतिकूल
परिस्थितीतून वर आलेले आणि नंतर Kane च्या तोडीस तोड यशस्वी झालेले. टाटा नवसारीतून
आणि आजीबाई चौडे गावातून आलेली. दोन्ही गावे गुगललाही नकाशावर शोधणं कठीण आणि तिथून
त्यांची भरारी थेट आकाशापर्यंत.
टाटांच्या पुढील पिढ्यांनी शिक्षणाची आस धरली आणि व्यापारी बाणा दाखवला. तर
आजीबाईंनी संधी सापडल्यावर तिचा पुरेपूर फायदा उठवला. दोघांनीही पैशाचा विनियोग समाजासाठी
केला. टाटांनी रोजगार निर्मिती करून तर आजींनी स्वतःच्या एक्सटेंडेड कुटुंबाचा आणि
गावाचा उद्धार करून.
टाटानी शिक्षणाचे महत्त्व ओळखले आणि आपली सामाजिक बांधिलकी पुढील पिढ्यात जोपासली,
पण आजींच्या पुढच्या पिढीला आजीबाईंचे यश टिकवता आले नाही. त्यांच्या पुढील पिढ्या
‘गतानुगतिको लोकः’ या धरतीवर सामान्य आयुष्य जगू लागल्या. बदलत्या काळाची पावले ओळखून
त्यांना त्याप्रमाणे व्यवसायात बदल करता आले नाहीत
तसं बघितलं सध्याच्या ब्रिटनची हीच स्थिती आहे असं म्हणायला हरकत नाही त्यांच्या
एका पिढीने पाऊण जगावर राज्य केलं पण पुढच्या प्रत्येक पिढीत भोगविलास वाढून ऐदीपणे
खाण्याकडे कल वाढत गेला आणि आत्ताच्या स्थितीला पोहोचले.
आमच्या आजीच्या पुण्यातील वाड्याची हीच गत, वाड्याच्या मालकांनी एकत्र कुटुंबासाठी
बांधलेला हा वाडा पुढच्या पिढीत कोणीच न शिकल्याने वाड्यात भाडेकरू ठेवून त्यांच्या
भाड्यावर जगायची वेळ आली. तिसर्या पिढीत वाडा पूर्णपणे विकला गेला.
यश मिळवणे जितकं महत्त्वाचं तितकच ते पचवणं आणि वाढवणं कठीण. माझ्या दहावीच्या
परीक्षा नंतर कोणीतरी सांगितल्याचं स्मरतं की यश हा एक बिंदू नसून कंटीन्यूअस प्रोसेस
किंवा प्रक्रिया आहे. ह्याचा अर्थ समजायला पुढे बरीच वर्षे गेली.
तसं बघायला गेलं तरी यश म्हणजे काय
आणि ते ठरवणार कोण?
आपल्यासारख्या पांढरपेशात यशाचं मोजमाप हे शैक्षणिक पात्रतेत किंवा श्रीमंतीत
मोजायची प्रथा आहे. पण टाटा आणि आजीबाई हे दोघेही कर्मवीर पूर्णपणे अशिक्षित. टाटांच्या
नंतरच्या पिढ्या उच्चशिक्षित झाल्या, पण सुरुवात निरक्षरच. मग आपण तरी शिक्षणाचा ध्यास
का धरतो आणि त्याने काय साध्य करतो? माझा हा प्रश्न बहुधा चुकीचा असावा, कारण शिक्षण
हे यशासाठी नाही तर ज्ञानासाठी, चरितार्थासाठी आणि जगाचे व्यवहार करण्यासाठी असते.
त्याचा उपयोग यशस्वी होण्यासाठी करणे आपल्या हातात असते. माझे वैयक्तिक मत तर असे आहे,
की शिक्षण तुम्हाला यशस्वी नाही, पंगु बनवते. तुम्हाला शिक्षणाच्या कुबड्यांची इतकी
सवय लागते की आपण बाकी काही करू शकतो याची बऱ्याच जणांना जाणीवही नसते. शिक्षण आणि
त्यानुसार निवडलेला चरितार्थाचा मार्ग हेच आपले जीवन होऊन जाते. फक्त टक्केवारी प्रमाणे
बघितले तर सुशिक्षितांचे सामान्य आयुष्य हे अशिक्षितांपेक्षा चांगले असेलही, पण उंची
गाठण्यासाठी सर्वस्व पणाला लावण्याची मानसिकता शिक्षणाने नाहीशी होते.
याच दरम्यान व्हाट्सअप वर सद्गुरूंची एक मुलाखत पाहण्यात
आली. एक अत्यंत प्रथितयश cardiac सर्जन सद्गुरूंना प्रश्न विचारतात. त्यांचे सीनियर
हेन अत्यंत कुशल, जगातील काही हाताच्या बोटावर मोजता येणाऱ्या सर्जनपैकी एक. एक प्रकारची
अत्यंत अवघड शस्त्रक्रिया करणारे जगात जे काही थोडे लोक आहेत त्यात त्यांची गणना होते.
त्यांनी आपली प्रॅक्टीस सोडून काशीला जाऊन ज्ञानप्राप्तीसाठी योगसाधना करण्याचे ठरवले
असते आणि हे कितपत योग्य आहे असा प्रश्न मुलाखतीतील सर्जन सद्गुरुना विचारतो. अर्थात
त्याचा या निर्णयाला कडाडून विरोध असतो. सद्गुरूंचे उत्तर असे की यश हे फक्त सर्जरी
करून किंवा जीव वाचवण्यातच मोजायचे का आणि असे किती जीव वाचून पूर्ण यश मिळते? जर तुमचा
सीनियर सर्जन सर्जरीत चांगला असेल तर तो योगसाधनेतही तितकेच यश मिळवून अधिक जीव वाचू
शकतो असा विचार तुम्ही नाही का करू शकत?
आपण जी टाटा किंवा आजीबाईंसारखी प्रथितयश माणसे पाहतो त्यांनाच आपण यशस्वी
का मानतो? इतरांना का नाही?
आजींच्या गोष्टीतला त्यांच्या सावत्र मुलगा विठ्ठल हा खरंतर मला अधिक यशस्वी
वाटतो. पण तो कथानायक नाही आणि खरंतर सौम्यसा खलनायक म्हणूनच रंगवला गेला आहे. १९२९ च्या सुमारास खिशात फक्त ८५ पौंड घेऊन तो बायकोसोबत बोटीने त्याकाळच्या
इंग्लंडला जातो. तिथल्या सामान्य इंग्रजांपेक्षा खूप श्रीमंत होतो. नंतर त्याचे वडील
दुसरे लग्न करून ‘आजीं’ना (विठ्ठलची सावत्र आई) घेऊन इंग्लंडला
येतात. मग आजींचे यश हे विठ्ठलच्या यशापेक्षा वेगळे कसे?
मला जाणवलेला दोघातला फरक असा की, पुढे १९५६ मध्ये विठ्ठलने
घरातून बाहेर काढल्यावर या अशिक्षित आजीबाईंनी फक्त पैसाच कामावला नाही तर खूप माणसेही
जोडली. मिळालेला पैसा स्वतःसाठी आणि इतरांसाठीही वापरला. लंडनमध्ये दुसरा महाराष्ट्र
वसवला. आपलं व्यावसायिक यश आजींनी जिवंतपणी अनुभवल, पण मेल्यावर अंत्ययात्रेला येणार्या
लोकांच्या संख्येवरून आणि प्रतिक्रियांवरून त्याचं प्रत्यक्ष मोजमापही झालं.
टाटांची गोष्टही अशीच. त्यांनी स्वतःच्या
प्रगतीबरोबर समाजाचाही उद्धार पहिला. त्यामुळेच बिर्ला आणि धीरूभाईंसारखे
यशस्वी स्पर्धक असूनही टाटांचे यश वेगळे आहे. ‘व्यापार’ आणि ‘उद्योग’ यातील फरक त्यांनी
जाणला आणि अंगी बाणला. त्यांच्या इतक्या पिढ्या आल्या आणि गेल्या, पण ‘टाटा’ नावातली
जादू अजूनही टिकून आहे.
या दोन पुस्तकांबरोबरच टिळकांचे गीताहस्य वाचणेही चालू होते. त्यात ‘ज्ञानी
माणसाने लोकसंग्रह करावा’ असा उल्लेख वारंवार येतो. हा संदर्भ थोडा वेगळा आहे पण संक्षेपाने
त्याचा अर्थ असा की ज्ञानी पुरुषाने आपले ज्ञान (आत्मज्ञान) आपल्या पुरते मर्यादित
न ठेवता लोकांना त्या ज्ञानापर्यंत पोहोचवण्याचे काम करावे (अर्थात् त्यांचा उद्धार
करावा).
वैयक्तिक यश हे प्रत्येक जण आपापल्या परीने मिळवतोच पण ते यश जेव्हा आपल्याबरोबर इतरांनाही वर उचलते तेव्हा त्या यशाची उंची ही अधिक होते.
रवी दाते, मँचेस्टर.
उत्कृष्ट लिखाण 👍👍. शेवटचं वाक्य अप्रतिम.. संपूर्ण लेखाचं सार सांगणारं 👌
ReplyDeleteगीतारहस्य - अत्यंत सोप्या शब्दात समाजातील दोन भिन्न पातळीवरील व्यक्तींच्या उदाहरणातून समजून सांगितला आहे. यश आणि यशाची उंची यातील फरकही अत्यंत सोप्या शब्दात स्पष्ट करून सांगितला आहे. खूप छान लेख.
ReplyDeleteआपण काही विशिष्ट व्यक्तींच्या यशालाच यश का म्हणतो हा मुद्दा फार आवडला.
ReplyDeleteसुंदर लेखाबद्दल अभिनंदन.
ReplyDeleteफार छान लेख, युद्ध जन्य परिस्थिती त मानसिक संतुलन कायम ठेऊन, रोजचे जीवन जगणारा सामान्य माणूस यशस्वी समजावा का?
ReplyDelete