लहान मुलांसोबत केला दिवाळीचा किल्ला आणि सगळ्यांनी केला कल्ला
विक्रांत आणि नुपूर पवनीकर
दिवाळी म्हटली की
मनात येते चिवडा, लाडू, करंज्या यासारखे फराळाचे पदार्थ, तर लहान मुलांना मिळणारी शाळेची सुट्टी, फटाके आणि सर्वात
आवडीचे काम म्हणजे दिवाळीतील किल्ला. पण हे काम काही एकट्याने करण्याची गोष्ट नाही.
त्यासाठी मुलांना माती, दगड, विटा काय काय
गोळा करावे लागते. किल्ला म्हटलं की आठवतात ते छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे शूर
मावळे. या सर्वांना अभिवादन करण्यासाठी दिवाळीत किल्ला बनवायची प्रथा सुरू झाली असावी.
पण जसजशी शहरात इमारतींची संख्या वाढली राहण्याकरिता जागा पुरेनाशी झाली मग मुलांना
किल्ला करायला जागा कुठून उरणार? पूर्वीच्या काळी जागेचा तुटवडा
नव्हता. त्यामुळे प्रत्येक घरातून एक किल्ला तयार व्हायचा. मग त्यात स्पर्धा सुरू व्हायची
आणि त्यात एक आनंद मिळायचा.
हाच अनुभव आम्ही
आमच्या मुलांना कसा देऊ याचे विचार चक्र आमच्या डोक्यात सुरू झाले. दिवाळी म्हणजे मँचेस्टरच्या
कडाक्याच्या थंडीचा काळ. अशा परिस्थितीत किल्ला उभा करणे खूप कठीण. परंतु या अडचणींना
न जुमानता आम्ही हा उपक्रम मँचेस्टर च्या उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये करायचा निर्णय
घेतला. हे कळताच मायदेशापासून लांब असलेल्या आपल्या मराठी मंडळींनी या संधीचा फायदा
घेतला. या उन्हाळ्याच्या छान उन्हात मँचेस्टरच्या छोट्या मावळ्यांनी किल्ला बांधण्याचे
स्वप्न पूर्ण केलं. किल्ला म्हटलं की त्याला लागणारी माती, दगड, विटा यांची
जुळवाजुळव करायला सुरुवात केली. मुलांची ही धडपड पाहून इथल्या स्थानिक मंडळींनी सुद्धा
या कार्यक्रमात सहभाग घेतला. न लाजता, न बिचकता मुलांनी मातीत
हात घालायला सुरुवात केली. हळूहळू त्या मातीचं चिखलात रूपांतर झाले.
गमतीचा भाग म्हणजे
या सगळ्या क्रियेत मुलांचे आनंदी चेहरे आणि खराब झालेले कपडे बघण्यासारखे झाले होते.
स्वच्छंदपणे नांदणाऱ्या या चिमुकल्यांना बघून त्यांच्या आई-वडिलांच्या चेहऱ्यावरचा
आनंद बघण्यासारखा होता. बघता बघता मातीचा किल्ला उभा राहिला. ह्या लहान चिमुरड्यांमध्ये
किती कल्पनाशक्ती असते याचं साक्षात उदाहरण डोळ्यासमोर उभं राहिलं.
मँचेस्टरमध्ये किल्ला
उभा करणे आणि त्या मागचा इतिहास समजून घेणे,
हीच आम्हा सर्व पालकांच्या दृष्टीने खूप मोठी गोष्ट होती. बरं महत्त्वाची
गोष्ट म्हणजे मुलं फक्त किल्ला बांधून थांबणाऱ्यांतली अजिबात नव्हती. त्यावर त्यांनी
मावळे, शिवाजी महाराज आणि प्राणी रचून, त्यातून इतिहासातील गोष्टींची रचना करायला सुरुवात केली. किल्ल्याच्या खाली
एक छोटसं तळं, त्यात बोटी, मासे,
बदक, मावळ्यांना असणारे घोडे, उंट आणि महाराजांची सेना सर्व कल्पनाशक्तीने उभी केली. तो दिवस पालकांसाठी
आणि मुलांसाठी अविस्मरणीय ठरला. या वर्षीप्रमाणे, दरवर्षी आपण
असाच किल्ला करायचा, याचा अट्टाहास मुलांनी पालकांजवळ ठेवला,
देशापासून दूर असलो जरी तरीसुद्धा परंपरा जपून ठेवणे हे आपण सर्वांचं
कर्तव्य नाही का? आणि अशाच छोट्या छोट्या कार्यक्रमातून आपली
संस्कृती आणि परंपरा आपल्या पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवणे शक्य होते. आम्हाला नक्की
विश्वास आहे आपण सगळे अशाच छोट्या छोट्या कार्यक्रमांमध्ये सहभागी होऊन आपली परंपरा
पुढे नेण्याचा प्रयत्न करूया.
नुपूर आणि विक्रांत पवनीकर
Shabbash ekdam mast upakram kelay tumhi mulanna khara anand dilat
ReplyDeleteदिवाळीचा किल्ला हा शब्द वाचूनच आम्ही एकदम लहान झालो. नुपूर आणि विक्रांत, खूप छान उपक्रम. आम्हालाही पुढील वर्षी त्यांत सहभागी होता आलं तर खूप आवडेल.
ReplyDelete