गान-सरस्वती लता मंगेशकर
डॉ. मुकुल आचार्य
लता मंगेशकर हे भारतीय सिने-संगीताच्या क्षितीजावर अवतरलेलं सप्तसुरांचे
इंद्रधनुष्य आहे. माझ्या स्मृती-पटलावरून निसटलेला माझा दीदींवरचा लेख परवा
संगणकाच्या स्मृती-कक्षात मला सापडला आणि मेहदी हसन ह्यांनी गायलेल्या एका गझलच्या
ओळी आठवल्या:
"अब
के हम बिछडे तो शायद ख्वाबो मे मिले,
जिस तरह सुखे हुए फुल किताबो मे मिले"
लतादीदींबद्दल लिहीणे म्हणजे आकाशाला गवसणी घालण्यासारखे आहे.
महाभारतात अनेक थोर व्यक्ती आहेत, पण श्रीकृष्ण महाभारताचा आत्मा आहे, किंबहुना श्रीकृष्ण म्हणजे महाभारत आणि महाभारत म्हणजे श्रीकृष्ण. तसेच
हिंदी सिनेसृष्टीत अनेक दिग्गज कलाकार आहेत, पण लतादीदी त्या
क्षेत्राच्या मूर्तीमंत स्वरूप आहेत.
महाभारत लिहिणे हे केवळ व्यास ऋषी ह्यांनाच जमले, तसेच लतादीदींच्या संगीत
कारकीर्दीबद्दल लिहायला असेच एक व्यास ऋषी जन्माला यावे लागतील.
दीदींच्या गाण्याचा आस्वाद घेणे ही एक वेगळीच अनुभूती आहे.
त्यांची गाणी ऐकतांना कुठला ही प्रयास न करता ऐकणारा समाधी अवस्थेला
पोहोचतो.
भारतामधील विविध भाषा जेव्हा ह्या गान सरस्वतीच्या गळ्यातून गाण्याच्या
रूपाने प्रगट होतात, तेव्हा त्यांना देखील पावन झाल्याचा दिव्य अनुभव येत असावा.
अशा महान गायिकेबद्दल लिहिण्याचे धाडस करणे म्हणजे शिवधनुष्य पेलण्या
सारखे आहे आणि हे धाडस घातक ठरू शकते.. पण हे माहीत असून देखील हे धाडस करण्याचा
मोह मला आवरता येत नाही.
लतादीदी ह्या भारतीय सिने संगीताच्या अनभिषीक्त साम्राज्ञी आहेत का, हा युक्तीवाद कदाचित "देवाचे
अस्तित्व आहे की नाही", ह्या वादापेक्षा नक्कीच जास्त
वेळा केला गेला असेल.
अश्वत्थामा बळीर्व्यासो हनुमानश्च विभीषण । कृपा: परशुरामश सप्तते
चिरंजीवीं ।
अश्वत्थामा, राजा महाबली, वेदव्यास, हनुमान,
विभीषण, कृपाचार्य, परशुराम हे सप्त चिरंजीवी आहेत. पण माझे तर असे म्हणणे
आहे की लतादीदींचा स्वर हा आठवा चिरंजीवी आहे, कारण तो स्वर
आपल्या सर्वांच्या मनात आणि ह्या पृथ्वीवर अनादी काळा पऱ्यंत कायम राहील.
मानवी भावविश्वातील एकही भावना शिल्लक नसावी, जी लतादीदींच्या गाण्यातून किंवा
गाण्याच्या एखाद्या ओळीतून आली नसेल. असा नवरसमिश्रित दहावा रस म्हणजे लता दीदी.
आचार्य अत्रे आपल्या दैनिक मराठा च्या स्वरलता या अग्रलेखात लिहून गेले
आहेत
“प्रभातकाळची कोवळी सुवर्णकिरणे
दवबिंदूमध्ये भिजवून बनवलेल्या शाईने व मृणालतंतूच्या लेखणीने, वायुलहरींच्या हलक्या हाताने
फुलपाखराच्या पंखावर लिहिलेले मानपत्र गुलबकावलीच्या करंडकातून लतादीदींना अर्पण
करायला हवे.”
लतादीदी गातांना आपल्या मन:पटलावर स्वरांचे इंद्रधनुष्य उमलते.
लतादीदींनी शंकर जयकिशन यांचे बद्दल अपल्या कथनात उल्लेख केला आहे
....त्यांची सगळी गाणी उंच स्वरात (हाय
पिच) असायची....विशेषतः रसिक बलमा....किंवा लताने उल्लेख केलेले आरजू मधले.. अजी
रूठ कर अब कहा जाईयेगा. दिदींची परीक्षा पाहण्याकरता जयकिशन मुद्दाम उंच स्वरात
गाणे बांधायचे आणि लता दिदी त्यांना स्वर खालती आणायची विनंती करण्याची वाट
बघायचे. पण दीदी प्रत्येक आवाहन लिलया पेलून उंच स्वरात सहज गाऊन जायच्या!
जाहीर कार्यक्रमात अनेक गायक स्व:ताच्या गाण्याची तयारी दाखवायला मूळ
गाण्यातल्या अनेक जागा वेगळ्या पद्धतीने सादर करतांना आढळतात. दिदींना मात्र तसे
करतांना कधीच ऐकले नाही, कारण त्यांना आपली गायकी अशा पद्धतीने दाखवायची गरजच नव्हती.
टीकाकार म्हणतात की लतादीदींना सर्वोत्कृष्ट गायिकेचा पुरस्कार केवळ ३
वेळाच मिळाला आहे, जो
इतर गायकांच्या तुलनेत कमी आहे. श्रेया घोषाल ह्यांना हा पुरस्कार, आणि चित्रा ह्यांना हा पुरस्कार ६ वेळा मिळाला आहे. पण केवळ राष्ट्रीय
पुरस्कार हा सर्वोत्कृष्ट गायकाचा मापदंड असू शकत नाही.. १९५८ ते १९६९ ह्या
अवधीतले बरेच फिल्म फेयर अवॉर्डस मिळाल्यानंतर लतादीदींनी आपल्या नावाचा ह्या
पुरस्कारा करता आयोजकांनी विचार करू नये असे कळवले.. ह्या नि:स्वार्थ कृतीच्या
मागे एक असामान्य कलाकार दडला आहे.
शास्त्रीय गायनातले अध्वर्यू उस्ताद बडे गुलाम आली खान ह्यांनी लतादीदींचे
अनारकाली मधील "ये जिंदगी उसी की है" हे गाणे ऐकल्या नंतर उदगार काढलेत
की
" कम्बख्त कभी बेसुरी गाती ही नाही!"
ह्या मधून लतादीदींच्या असामान्य प्रतिभेची जाणीव होते.
जावेद अख्तर दीदींबद्दल लिहितात:
"हम
उनके गीत है सुनते,
आज उसके गीत हम गाते,
पर जो उसके काबील है,
वो लफ़ज कहासे लाये"
लतादीदी ह्या सिने-संगीत आणि सुगम-संगीतातल्या मानबिंदू आहेत, त्यामुळे प्रत्येक गायकाला तो बिंदू
गाठावा अशी उत्कट इच्छा असते .
जसे संस्कृत काव्य रचनेत कालिदास ह्यांना स्थान आहे, गझलचा उल्लेख आला की गालिब आठवतो
आणि सिम्फनी म्हटले की बीथोव्हेनला पर्याय नाही, तसेच भारतीय
सिने संगीताचा उल्लेख केला की लता मंगेशकर हे हे नाव घेतले जाते.
दीदींची गाण्यातले साम्राज्य अजूनही भक्कम उभे आहे आणि त्या श्रोत्यांच्या
हृदयावर गेली सत्तर वर्षे अधीराज्य गाजवीत आहेत.
अशा ह्या गान सरस्वतीला त्रिवार अभिवादन.
दीदींच्या काही जुन्या व दुर्मीळ अशा निवडक गाणयांच्या इथे श्रुंखला
(लिंक) देत आहे:
जारे चंद्र...सुधीर फडके यांनी यमन रागात गुंफलेले आणि अत्यंत सुंदर सूर
दिलेले लता दिदींचे सजनी या चित्रपटातले
गाणे
भीनी भीनी है मीठी... मीठी है...नौशेरवान ए आदिल या चित्रपटात ले...सी
रामचंद्र यांच्या बहारदार संगीत आणि तितक्याच गोड आवाजात दिदींनी गायलेले हे गाणे
रामचंद्र चितळकर यांचे यास्मिन मधले मुझपे इलजाम बेवफाई है..
https://youtu.be/tIkbIFMGaQE?si=lzMaFAdiI1A5Y2zQ
तेरे नैनो मे निन्दिया, संगीतकार मुकुन्द मसुरेकर
https://www.youtube.com/watch?v=-_-BrTQMOIk
सौ सौ गम ने घेरा इक दिल मेरा, संगीतकार - हुस्नलाल भगतराम १९४९
https://www.youtube.com/watch?v=U7hrSt9vU48
बरबाद मुकद्दर ने मेरे; संगीतकार - बुलो सी रानी
https://www.youtube.com/watch?v=J9S2yFaSt_A
चुरा के दामन कहा चले - चित्रपट घुंगरू; संगीतकार - रामचंद्र चितळकर
https://www.youtube.com/watch?v=IubwFtUQQzE
- डॉ. मुकुल आचार्य
कान, नाक व घसा
शल्य चिकित्सक
मायक्रोबायोलॉजिस्ट व व्हायरॉलॉजिस्ट
संसर्गजन्य रोग प्रतिबंध व नियन्त्र्ण तज्ञ
लिव्हरपूल, इंग्लंड.
सुंदर लेख ! महान गायिकेला योग्य आदरांजली 🙏
ReplyDeleteफारच छान लिहिले आहे.गाण्यांची निवड अप्रतिम ! ही गाणी पुन्हा पुन्हा ऐकावीशी वाटतात .
ReplyDeleteमध्यंतरी एक कविता वाचण्यात आली त्यात लताबाईंच गाणं कसं विशेष असतं त्याची आठवण होते
सगळे गाती सूर लावूनी
जीव लावुनी गातो कोण ?
कवितेच्या गर्भात शिरुनि
भावार्थाला भिडतो कोण ?
असा हा आवाज 🙏🏼
व: मुकुलजी, एकदम सरस!
ReplyDeleteदीदींची गाणी एकताना जी अनुभूती आम्हाला येते ती आपण सुंदर शब्दात वर्णन केली आहे. असेच लिहीत रहा.
ReplyDeleteसुंदर लेख आहे. सुनिल सप्रे
ReplyDelete