ग़ज़ल आणि गजाली (किनारा)
कुमार जावडेकर
'गमभन', 'ग' गणेशाचा
इथपासून (आपल्या श्रीकांत पट्टलवार यांनी अलीकडेच म्हटल्याप्रमाणे) 'ग' 'गूगल'चा अशी 'ग' ची बाधा तर आपल्याला झालेलीच असते.
'ग' गंमतीचा असला की तो संमतीचा होतो. मग तो 'ग' कधी गद्याचा असतो तर
कधी गाण्याचा. कधी 'ग' वरून 'ग़ज़ल' (वा 'गझल') आठवते - उर्दू 'ग़' आणि मराठी 'ग' मधले फरक मान्य करून. मग त्यावरून 'गजाली' हा मालवणीतला शब्द आठवतो - ज्याचा अर्थ गप्पा-टप्पा, थोडं गॉसिप (हे कुणाला आवडत
नाही?) असा आहे. अशाच काही ग़ज़ला आणि गजाली या सदरात लिहायचा मानस आहे.
'ग' वरून स्मरणारं आणि कधी कधी सुचणारं
गद्य किंवा गीत आणि त्यांचा आस्वादही पुढे-मागे लिहायची इच्छा आहे.
एका मुशायऱ्यात मी म्हटलेली माझी एक ग़ज़ल (सोबत वैभव जोशी, प्रसाद शिरगावकर
आणि बंधू डॉ. आश्विन 'अजब') इथे सादर करतोय. तिचा यूट्यूब
दुवा वर दिला आहे. त्यामुळे आपण ती ऐकू / पाहू शकता. वाचायची असली तर खाली पूर्ण
ग़ज़ल आहे.
ही ग़ज़ल कशी सुचली आणि तिच्यावर कशी चर्चा झाली, तेही या गजालीचं निमित्त करून सांगतो.
पहिल्या शेरात (मतल्यात) मी 'नाही मनात काही, भेटी घडून गेल्या' असं दुसऱ्या ओळीत (मिसऱ्यात) लिहिलं होतं. माझा भाऊ आश्विन ('अजब') याच्या सल्ल्यावरून दोन ओळींत संलग्नता येण्यासाठी
मग 'नसता' असा बदल केला.
दुसरा शेर लिहिताना 'घटिका बुडून गेल्या' हे मनात आलं आणि त्यावरून पूर्ण
शेर सुचला. यावरून चित्तरंजन भट (सुरेश भटांचे चिरंजीव, जे स्वत:
उत्तम ग़ज़लकार आणि ग़ज़लचे अभ्यासक आहेत) यांच्याशी चर्चा झाली होती 'मनोगत'
या संकेत-स्थळावर. 'घटका' न लिहिता 'घटिका' का लिहिलं असा
त्यांचा प्रश्न होता. माझ्या मनात 'घटिका गेली पळे गेली तास वाजे
ठणाणा' ही काव्यपंक्ती ('खडाष्टक'
या नाटकातली) घोळत असल्यामुळी तो 'ट' चा 'टि' मला क्लिष्ट वाटला नव्हता
असं मी त्यांना सांगितलं होतं.
'ठेवून याद मागे चिमण्या उडून गेल्या' हा मिसरा असलेला शेर अनेकांनी आवडला, 'हासिल-ए- ग़ज़ल' शेर वाटला असं मला सांगितलं असलं तरी मला स्वत:ला
त्यापेक्षा 'शून्याशिवाय साऱ्या संख्या दडून गेल्या' हा शेर अधिक भावला आहे, कारण तो मला अधिक सहज वाटतो.
'गृहीत' या शब्दावरूनही अशीच चर्चा झाली
होती. चित्तरंजन यांना आधी असं वाटलं होतं की मी तो 'ही'
उगाच दीर्घ केला आहे, पण नंतर त्यांनी मान्य केलं
तो व्याकरण-दृष्ट्या बरोबर आहे. मला स्वत:ला अशी कवितेसाठी केलेली ऱ्हस्व-दीर्घांची
ओढाताण टाळावीशीच वाटते.
'बागेतल्या कळ्याही आता झडून गेल्या' ह्या
मिसऱ्याचा शेर माझ्या मूळ गझलेत नव्हता. अनेक वर्षांनंतर तो सुचला. त्याची कहाणी मी
'यूट्यूब'च्या दुव्यात सांगितली आहेच.
शेवटचा शेर (मक्ता) – हज़ल (विनोदी ग़ज़ल ) स्वरूपाचा वाटू शकतो.
आता ग़ज़लेकडेच वळूया.
पूर्ण ग़ज़ल -
हा एकटा किनारा लाटा
भिडून गेल्या
नसता मनात काही भेटी घडून गेल्या
थांबून परतलो मी
झाला उशीर होता...
का प्रेम-मीलनाच्या घटिका बुडून गेल्या?
कुजबूज पाखरांची
मी ऐकली पहाटे
(ठेवून याद मागे चिमण्या उडून गेल्या)
केला हिशेब जेव्हा
माझ्याच जीवनाचा
शून्याशिवाय साऱ्या संख्या दडून गेल्या
धरल्या मनात होत्या
गोष्टी गृहीत खोट्या
एका क्षणात सगळ्या बघ उलगडून गेल्या!
केली कुणी मनाई खेळास
चिमुकल्यांच्या
बागेतल्या कळ्याही आता झडून गेल्या...
मी शब्द पेरले अन्
उमलून सूर आले
फुलता अखेर गाणे टाळ्या पडून गेल्या!
- कुमार जावडेकर
वाहवा, क्या बात है!
ReplyDeleteकुठल्याही गझलेमधे नेहमी कारुण्य, विरह असेच भाव असतात का? आनंद, विनोद अशा भावना नसतातच का?
ReplyDeleteपुढच्या वेळेला एक विनोदी गझल लिहितो :)
ReplyDeleteसुंदर ग़झ़ल ! मला शेवटचा शेर सगळ्यात आवडला !
ReplyDeleteशुन्या शिवाय साऱ्या संख्या दडून गेल्या ....... गझल खूप आवडली
ReplyDeleteभाषांतरही जबरदस्त 👌
धन्यवाद! तुम्ही भाषांतर कशाला म्हटलं ते कळलं नाही.
Deleteआज हातात अंक धरून ग ची बाधा वाचली खूप गंमत वाटली आणि तुमचं भाषेवरील प्रभुत्व खरंतर भाषांवरील प्रभुत्व आणि गजलेची जानकारी प्रशंसनीय आहे ग च्या खाली "अनुस्वार" काढून ग वेगळ्या प्रकारे लिहिता येतो हे प्रथमच समजले
ReplyDelete