कॅलिडोस्कोप
डॉ. मृणाल शहा
नमस्कार! सर्वांना
शुभ दिपावली अभिष्टचिंतन. दिवाळीनिमित्त प्रसिद्ध होणाऱ्या त्रैमासिकामधे हे सदर लिहिताना
मला खूप आनंद होत आहे.
कोविडच्या काळात
२०२० मध्ये आम्ही काही संगीतप्रेमी मंडळींनी एकत्र येऊन ‘आलाप’ ग्रुपची निर्मिती केली.
त्यानंतर अनेक ऑनलाईन मैफिली, कार्यशाळा, स्टेज-शोज असे वेगवेगळे उपक्रम गेल्या चार
वर्षात सादर केले.
परंतु याची प्रेरणा,
संकल्पना आमच्या पूर्वीच्या पुण्यातल्या ग्रुप पासूनची! पूर्वी पुण्यात कॉलेजमध्ये
शिकत असताना आम्ही संगीत-प्रेमी विद्यार्थ्यांनी एक ग्रुप तयार केला होता. ज्येष्ठ
गायिका मालती पांडे बर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या त्या ग्रुपचे नाव होते
‘भावसंध्या’. त्या काळात मी बी. जे. मेडिकलला प्रवेश घेतला होता
आणि बाईकडे गाणेही शिकत होते आजही मला आठवतोय तो दिवस जेव्हा मी बाईंना पहिल्यांदा
भेटले!
त्याच असं झालं की
भारत गायन समाजात पित्रे बुवांकडून काही वर्षे शास्त्रीय संगीत शिकल्यावर मी दहावीत
असताना आम्ही घर बदलून सहकार नगरमध्ये राहायला गेलो. त्यानंतर
काही महिन्यांनी बाईंचा पत्ता घेऊन त्यांना भेटायला स्नेहलबाग सोसायटीत मी त्यांच्या
घरी गेले. दुपारी चारची वेळ एवढ्या प्रसिद्ध ज्येष्ठ गायिकेला
भेटताना मनात थोडीशी धाक-धुकही होती. मी बेल वाजवली बाईंनी स्वतःच दरवाजा उघडला.
शरीरयष्टीने उंच
पुऱ्या सावळ्या रंगाच्या पण तरतरीत चेहऱ्याच्या बाई माझ्यासमोर उभ्या होत्या! डोळ्यात
काजळ, अंगावर सुती साडी, कुरळ्या केसांचा बुचडा आणि डोळ्यावर चष्मा.
माझी थोडी चौकशी
केल्यावर मला एखाद्या गाणे म्हणून दाखव असं त्या म्हणाल्या. त्या वेळची ती
audition च म्हणा ना! मी सुद्धा मोठ्या धाडसाने आणि विश्वासाने यमनची आलापी आळवत ‘मागे
उभा मंगेश’ हे गीत त्यांच्यासमोर गायले. बाई हसल्या. “तुझा आवाज पण तुझ्यासारखाच गोड
आहे हं” असं म्हणून त्यांनी माझ्या पाठीवर थोपटले! तेव्हापासून माझे गाण्याचे शिक्षण बाईंकडे आणि त्यांचे
यजमान पंडित पद्माकर बर्वे सर या दोघांकडे सुरू झाले. थोड्याच दिवसात बाईंची मी खूप
लाडकी झाले. मी मेडिकलला असल्याचा मेरिट लिस्ट मध्ये असल्याचा त्यांना अभिमान वाटत
असे. त्या स्वतःही बुद्धिमान कलाकार होत्या. मला डॉक्टर समजून त्या स्वतःच्या आजाराबद्दल
खूप बोलायच्या. सगळे रिपोर्ट, औषधे, ट्रीटमेंट माझ्याशी चर्चा करायच्या. त्यांना दम्याचा
त्रास होता अनेक वेगवेगळ्या गोळ्या inhalers, nebulisers त्या घेत असत. वरचेवर इन्फेक्शन
होऊन त्यांचा त्रास वाढत असे पण कशाही परिस्थितीत त्या गाणं शिकवायच्या स्वतः हातात
डग्गा घेऊन वाजवत त्या शास्त्रीय आणि सुगम संगीत असं दोन्ही शिकवायच्या.
त्यांनी स्वतः स्वरबद्ध
केलेली अनेक गाणी त्या मला शिकवायच्या. या घरात मी छान रमले होते. त्यांचा मुलगा राजीव
बर्वे सून संगीता बर्वे, दोन्ही नाती प्रियंका आणि प्रांजली या सगळ्यांची मी मैत्रिण
झाले होते. एकदा क्लासला गेले की तीन-चार तास मी तिथेच. गाणं जेमतेम तासभर, पुढे सरांची
गप्पा संगीता ताईंशी मेडिकलच्या गप्पा. ती स्वतः बी ए एम एस डॉक्टर होती आणि दवाखानाही
चालवायची. दोन्ही मुली शाळेत जाणाऱ्या! त्यांच्याशी खेळणे होमवर्क च्या वह्या पाहणे
असा माझा भरगच्च कार्यक्रम झाला होता माझा दुसरं घरच जणू.
बाईंचे आणि सरांचे
शिकवणे हे वेगळे असायचे. बाईंची गायकी अतिशय सुरेल आणि प्रतिभा संपन्न होती. बर्वे सरांचा शास्त्रीय संगीताचा खूप खोलवर
असा अभ्यास होता. ते स्वतः बंदीश रचनाकारही होते. कोणता स्वर कशा पद्धतीने लागला पाहिजे,
रागाकडे पाहायचा दृष्टिकोण कसा असावा एखाद्या रागाचा विचार कसा
करावा असे. Theory चे बारकावे ते छान विस्तृतपणे सांगायचे.
बाई स्वतः संवेदनशील
गायिका! मधुर लवचिक आवाज, शास्त्रीय संगीताची जबरदस्त तयारी! असं असूनही सुगम संगीत
गातांना एक्सप्रेशन कसे द्यावे हे त्या गाऊन शिकवायच्या. त्यांचा जन्म विदर्भातला वर्ध्याचा. अनेक दिग्गज गुरूंकडे गाणं शिकून त्यांनी त्यांची गायकी समृद्ध केली
होती. हिराबाई बडोदेकर, विलायात हुसेन खॉं, वसंतराव देशपांडे, जगन्नाथ बुवा, भोलानाथ
भट अशा गुरूंकडे त्यांनी शिक्षण घेतले होते.
चित्रपट संगीत, पार्श्वगायन,
मराठी सुगम संगीत आणि शास्त्रीय संगीत अशा सगळ्या गायकी प्रकारात त्यांनी नाव कमावले
होते.शास्त्रीय संगीतातले सगळे पैलू आपल्या गाण्यात असावे असे त्यांचे ध्येय होते.
१९४८-१९५४ हा काळ तर त्यांनी प्रचंड गाजवला होता. रेडिओवरून संगीत नाटकांमध्ये त्या कामे करायच्या.
आताही त्यांची ‘खेड्यामधले घर कौलारू’, ‘लपविलास तू हिरवा चाफा’, ‘मनोरथा चल त्या नगरीला’,
‘पाय नका वाजवू’, ‘या कातरवेळी’, ‘कशी रे तुला भेटू’, ‘ते दान त्या क्षणाचे’ अशी अनेक
सुप्रसिद्ध गाणी आजही रसिकांच्या मनात रुंजी घालतात. बाईंची माणिक वर्मा, गजानन वाटवे,
प्रभाकर जोग, बाबूजी यांच्याशी खूप मैत्री आणि जवळीक होती. त्यांचे सगळे किस्से त्या
कधी-कधी सांगायच्या. त्या कौतुकाने म्हणायच्या
अपराध मीच केला शिक्षा तुझ्या कपाळी म्हणत जो अपराध केला तो संपूर्ण महाराष्ट्राने
वरदाना सारखा उचलून धरला!
मी त्यांना साहजिक
लताबाईं बद्दल विचारायचे ‘मालती माधव’ चित्रपटाकरता १९५०-५२ मध्ये लताबाई पुण्यात यायच्या म्हणे! तेव्हा बाई सुद्धा घोले
रोडवर पेयिंग गेस्ट म्हणून राहायच्या. त्यांच्या घरी त्यांना भेटायला दीदी आल्या होत्या.
दोघींनी पंधरा-वीस मिनिटे गप्पा मारल्या कॉफी घेतली. पुढे दीनानाथ
स्मृती महोत्सवानिमित्त लतादीदींनी बाईंना आमंत्रण दिले त्यावेळी ते आमंत्रण पत्र स्वरूपात
स्वतःच्या स्वाक्षरीने पाठवले होते. त्या कार्यक्रमात बाईंचे ‘त्या तिथे पलीकडे, हे
सुप्रसिद्ध गाणे लताबाई गायल्या. ‘माझी आवडती गाणी’ या ध्वनिमुद्रिके मध्ये बाईंच्या
दोन गाण्यांचा त्यांनी समावेश केला होता. गाणी
होती ‘मनोरथा चल त्या नगरीला’, ‘त्या तिथे पलीकडे’. बाईंच्या फोटोसकट त्यांनी ब्लॉग
लिहिला आहे. स्वतः इतक्या मोठ्या कलाकार असूनही घरातली सगळी कामे त्या स्वतः करायच्या.
घरगुती संसाराच्या गप्पा चार चौघींप्रमाणे साधेपणात करायच्या. साधी राहाणी ,ध्येयाचा
ध्यास, यशात अत्यंत समाधानाने त्या जगल्या. त्यांच्या ‘माझ्या सांगितिक जीवनाची वाटचाल’
या आत्मचरित्रात बाबूजींची छान प्रस्तावना आहे.
अगदी अखेरच्या क्षणी
सुद्धा गाणं गातच त्यांना देवाज्ञा झाली. बाईंचे जर्मन डेलिगेट्स शास्त्रीय शिकायला
यायचे असेच ते घरी येऊन गेले होते बाई गायल्या होत्या प्रात्यक्षिकही दिले होते त्यानंतर
काही वेळातच cardiac arrest होऊन त्या चिरनिद्रेत विलीन झाल्या.
त्यांच्या आत्मचरित्रात
त्या लिहितात,
‘कल्पनेच्या साम्राज्यात
मुक्तपणे विहार करणारी मी कुणी कवयित्री नव्हे, की हे शब्द भंडार अमापपणे उधळून सरस्वतीला प्रसन्न करून घेणारी तिची
भक्त नव्हे. मी आहे साधी-सुधी स्त्री! शब्दसंभाराने नव्हे तर स्वरसंभाराने
वीणावादीनी सरस्वतीला प्रसन्न पाहणारी एक कलाकार. संगीताच्या
साम्राज्यातली ही वाटचाल करताना अनेक अडथळे आले परंतु त्याच्यासाठी हा जन्मच काय पण
सात जन्म घेण्याची ही माझी तयारी आहे. ही साधना एका जन्मात पुरी होणारी नाही. परमेश्वराच्या
कृपेने या संगीत सागरातला एखाद् दुसरा थेंबच माझ्या वाट्याला
आला असेल पण त्याला थेंबाने अमृत होऊन माझं जीवन कृतार्थ करून टाकलाय, पण मी तहानलेलीच आहे आणि तहान शमवण्यासाठी मला अनेक जन्म घ्यावे लागले
तरी मी ते घेईन. संगीताची उपासना करताना मी आयुष्यात काही गमावलेही असेल परंतु मला
त्याची खंत नाही.’
हे वाचतांना शब्द
काळजाला भिडतात! डोळ्यांच्या कडा पाणवतात, भावना दाटून येतात,
नकळत ओठी शब्द येतात -
तिथेच वृत्ती गुंगल्या
चांद राती रंगल्या
कल्पनेत स्वर्ग जो तिथे मनात सापडे
माझी या प्रियेचे झोपडे ……….
डॉ. मृणाल शहा
कन्सल्टंट स्त्रीरोगतज्ञ
मंचेस्टर फाउंडेशन ट्रस्ट, यु.के.
गुरू शिष्याचं नातं किती निर्मळ असू शकतं ही कळलं . त्याचबरोबर कला साधनेसाठी गुरू योग्य गुरू मिळणं हेही किती महत्वाच आहे हेही सिद्ध होत. गुरुंची परंपरा अशी पुढे नेट रहा. आणि गात रहा.
ReplyDeleteमालती बाई पांडे यांचं नाव आलं की 'कुणीही पाय नका वाजवू' किंवा 'लपविलास तू हिरवा चाफा' अशा गाण्यांची आठवण होते .
ReplyDeleteभावमधुर गाण्यांचं पर्व म्हणजे मालती बाई . गुरु शिष्याचं आपुलकीच नातं आणि तुझ्या (मृणालच्या ) अनुभवाची शिदोरी share केल्याबद्दल आभार .
त्याच्या आत्मचरित्राबद्दल माहिती झाली ,ते वाचू .
👌Sunil Sapre
ReplyDelete