स्वागत
श्रीकांत पट्टलवार
दिवाळी म्हटली की डोळ्यासमोर येतात सुंदर सुंदर रांगोळ्या, घरोघरी
लकाकणाऱ्या पणत्या, धडाम-धुडूम वाजणारे फटाके आणि दिवाळीचा फराळ. आणि या
सर्वांबरोबरच, विशेषत: मराठी कुटुंबियांकडे दिवाळीचा अविभाज्य बनलेले दिवाळी अंक!
दिवाळीच्या फराळा प्रमाणे त्यांची देवाण-घेवाण त्यातील चुटकुले,
भविष्य इत्यादींचं सामूहिक वाचन, त्यातील लेख गोष्टी, मुद्दे आणि कधी कधी गुद्दे, यामुळे
पुढील दिवाळीपर्यंत होणारे मनोरंजन हे खूपच अविस्मरणीय असतं. फराळाचे सर्व पदार्थ बाजारात अत्यंत माफक दरात मुबलक प्रमाणात उपलब्ध असले तरी शेजारच्या
काकूंच्या हाताच्या चकल्या, मावशीच्या करंज्या, आत्याचे अनारसे, यांची गोडी मात्र अतुलनीय असते.
त्यांनी स्वतःच्या हाताने बशीत दिलेला लाडू चिवडा खाताना जो ब्रह्मानंद दोघांनाही
होतो तो अवर्णनीय असतो.
तर यंदा दिवाळीच्या या चविष्ट फराळाप्रमाणे आपल्या ताई-दादांनी, काका-काकूंनी खास आपल्यासाठी काही
लेख आणि गोष्टी लिहिल्या आहेत, काहींनी कविता केल्या आहेत तर
काहींनी आपले अनुभव शब्दांकित केले आहेत. ‘पश्चिमाई’च्या
दिवाळी अंकातून हे सर्व आपल्यासमोर आग्रहाने सादर करायला आम्हाला खूप आनंद होतो
आहे. दिवाळीतील फराळा प्रमाणेच आपण सर्वांनी याचा
भरपूर आनंद घ्यावा. त्याची चव घेऊन यथोचित प्रतिसाद
द्यावा हीच एक नम्र विनंती. .
‘पश्चिमाई' साठी चाचपणी करताना असं लक्षात आलं की आपल्या अवतीभोवती असंख्य प्रज्ञावंत
आहेत. त्यांनाही आपले दर्जेदार विचार कुठेतरी व्यक्त करून समाजापुढे मांडायचे
असतात. आपली कला आजूबाजूच्या लोकांनी पहावी, प्रशंसावी
असं त्यांनाही वाटत असतं. ही सर्वच मंडळी प्रथित यश लेखक, कवी किंवा नाटककार होऊ शकत नाहीत. त्यांना आपापले व्यवसाय सांभाळून या
गोष्टी करणे शक्यही नसते. अशा आपल्या भोवतालच्या प्रज्ञावंतांना शोधण्यासाठी आणि
त्यांच्या प्रतिभेला वाव देणारे नवीन दालन उघडण्यासाठी, सोशल मीडियाचाच उपयोग करत, 'पश्चिमाई' हे ऑनलाईन मराठी त्रैमासिक 'अभिजात' रसिकांपुढे सादर करतांना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे.. आपल्या लेखनातून
पहिल्याच अंकात अनेक कवी, लेखक,
कथाकार मंडळींनी उदंड योगदान दिल आहे. या सर्वांचे मनःपूर्वक आभार. आपण सर्व शब्द प्रेमींनी लेखक, कवी वाचक, प्रतिसादक या नात्याने पश्चिमाई उपक्रमात सहभागी व्हावं ही एक नम्र विनंती.
भरीस भर म्हणून नुकताच भारत सरकारने मराठी भाषेला 'अभिजात भाषा' म्हणून
दर्जा प्रदान केला आहे ही समस्त मराठी भाषा प्रेमींसाठी अत्यंत अभिमानाची गोष्ट
आहे. योगायोग असला तरी आपल्यासाठी हा एक नक्कीच
प्रेरणादायी क्षण आहे.
नमन तुला मोरया (श्रीकांत पट्टलवार) - YouTube
- श्रीकांत पट्टलवार, रुणकर्ण.
Very nice 👍
ReplyDeleteस्तुत्य उपक्रम. अंकाला भरघोस प्रतिसाद मिळत राहो हीच सदिच्छा. काव्य पण सुंदर.
ReplyDelete